गुरुवार, 20 जुलाई 2017

मास्टर आणि मार्गारीटा - 01



मास्टर आणि मार्गारीटा


लेखक
मिखाइल बुल्गाकोव


मराठी भाषांतर
आ. चारुमति रामदास










मास्टर आणि मार्गारीटा


          
        प्रथम भाग       







...तर, शेवटी, तू आहेस तरी कोण?
- मी – त्या शक्तीचा अंश आहे,
जी सदैव वाईट इच्छिते
आणि सदैव चांगलेच करते...
-ग्योथ, फ़ाउस्ट



एक


अनोळखी व्यक्तींशी कधींच बोलूं नका

वसंत ऋतूतील एका अभूतपूर्व अशा उष्ण सूर्यास्ताचा वेळेस मॉस्कोच्या पत्रियार्शी तलावाच्या1 काठावरच्या पार्कमधे दोन नागरिक प्रकट झाले. त्यांच्यापैकी पहिला, ज्याने राखाडी रंगाचा उन्हाळ्याचा सूट घातला होता, कमी उंचीचा होता, लट्ठ, टकल्या, आपली सुंदर, सुबक हैट हातांत केक सारखी धरली होती, चिकण्या, चमकदार चेहर्यावर शिंगांच्या काळ्या फ्रेमचा खूप मोठा चष्मा लावला होता. दुसरा, रुंद खांदे आणि लाल केस असलेला, ज्यांच्या उद्दाम लटा त्याच्या डोक्यावर मागे सरकलेल्या चौकटीच्या टोपीतून बाहेर निघत होत्या, त्याने चौकटीचांच शर्ट आणि चुरगळलेली पांढरी विजार घातली होती. पायांत काळ्या चपला होत्या.

पहिला, कुणी आणखी नसून, मिखाइल अलेक्सांद्रोविच बेर्लिओज़2, मॉस्कोच्या एका प्रख्यात साहित्यिक संगठनाचा अध्यक्ष होता. ह्या साहित्यिक संगठनाचे संक्षिप्त नाव मॉसोलित3 असे होते. बेर्लिओज़ एका लट्ठ मासिक पत्रिकेचा संपादकदेखील होता. त्याचाबरोबर चालणारा तरुण, कवी इवान निकोलायेविच पनीरेव होता, जो बिज़्दोम्नी4 (घर नसलेला) ह्या उपनावाने कविता लिहायचा.
किंचित हिरव्या लिण्डन वृक्षांच्या सावलींत येतांच, दोन्हीं लेखक सगळ्यांत आधी चटक रंगांने रंगवलेल्या बिअर आणि पाणीअसा बोर्ड लावलेल्या एका स्टॉलमधे घुसले.

पण आधी मे महिन्याच्या ह्या संध्याकाळच्या संदर्भांत एक विचित्र गोष्ट तर सांगून टाकूं. न केवळ ह्या स्टॉलच्या जवळपास, पण वृक्षांनी वेढलेल्या संपूर्ण आळीमधे आणि तसेंच समानांतर जात असलेल्या मालाया ब्रोन्नायारस्त्यावरसुद्धां एकही व्यक्ति दिसंत नव्हतां. त्या वेळेस, जेव्हां प्रकृति थकून गेलेली होती, जेव्हां श्वास घ्यायचीसुद्धां शक्ति उरली नव्हती, जेव्हां मॉस्कोला भस्म करून सूर्य कोरड्या धुक्यांत सादोवायारिंगरोडवर लपून जायला अधीर झालेला होता, कुणीही बेंचवर नव्हतं बसलं. अगदी रिकामी होती आळी.

“नरज़ान” (एक प्रकारचे शीतल पेय-अनु.) द्या.” बेर्लिओज़ म्हणाला.
“नरज़ान नाहीये,” स्टॉलमधे उभ्या असलेल्या सेल्सगर्लने न जाणे कां चिडून म्हटलं.
“बिअर आहे?” कर्कश आवाजांत बिज़्दोम्नीने विचारलं.
“बिअर संध्याकाळपर्यंत येईल,” तिने उत्तर दिलं.
“मग काय आहे?” बेर्लिओज़ने पुन्हां विचारलं.
“ज़र्दाळूचं सरबत, फक्त गरम...” सेल्सगर्ल म्हणली.
“ओह, द्या, तेंच द्या, लवकर द्या!”

ज़र्दाळूचं सरबत, खूप सारा पिवळा-पिवळा फेस काढंत असलेलं, न्हाव्याच्या दुकानांतून येत असलेल्या वासाचं. गटागट पिऊन साहित्यकार उचक्या देऊं लागले, आणि पैसे देऊन जवळंच पडलेल्या बेंचवर बसले. तोंड तलावाकडे आणि पाठ ब्रोन्नाया स्ट्रीटकडे होती.   

तेवढ्यांत दुसरी विचित्र गोष्ट घडली, जिचा संबंध एकट्या बेर्लिओज़शी होता. त्याच्या उचक्या एकदम बंद झाल्या. हृदय जोराने धडधडकरून जणु कुठेतरी क्षणभरासाठी लुप्त झालं आणि जेव्हां परंत आलं तर जणू त्याच्यांत एक बोथट सुई घुसलेली होती. शिवाय बेर्लिओज़ला एका निराधार, परंतु प्रचण्ड भीतिने वेढून टाकलं, की त्याला कुठेही लक्ष न देतां पत्रियार्शीवरून पळून जावसं वाटलं. ह्या भीतीचं कारण न समजून बेर्लिओज़ने व्याकुळतेने इकडे तिकडे बघितलं. त्याचा चेहरा विवर्ण झाला. त्याने रुमालाने कपाळावरचा घाम पुसला, विचार केला, “हे मला काय होतंय? आजपर्यंत असं कधीच नाहीं झालं...हृदय चावटपणा करतंय... थकव्यामुळे मी पस्त झालोय, सगळं काही सोडून किस्लोवोद्स्कला5 पळून जावं.”

तेवढ्यांत त्याच्या चारीकडची कोंदट, गरम हवा जणु त्याच्या समोर दाट होत गेली आणि तिच्यातूंन एक चमत्कारिक दिसणारा पारदर्शी व्यक्ति प्रकटला. लहानश्या डोक्यावर जॉकीसारखी टोपी, चौकड्या-चौकड्यांचे आखूड हवाई जैकेट...उँची सात फुट, खांदे आखूड, अविश्वसनीय प्रकारे कृश, आणि व्यक्तित्व, कृपया लक्ष द्या, एकंदरीत उपहास करणारे व्यक्तित्व होते.

बेर्लिओज़ची जीवन पद्धति अशा प्रकाराची होती, की त्याला चमत्कार बघण्याची सवय नव्हती. भीतिमुळे आणखीनंच निस्तेज होऊन, त्याने डोळे विस्फ़ारले आणि विचार केला: “हे अशक्य आहे!...”
पण हे सत्य होतं आणि तो उंच माणूस, ज्याच्या शरीराच्या आरपार बघता येत होतं, ज़मिनीला स्पर्श न करतां बेर्लिओज़च्या डावीकडे –उजवीकडे झुलूं लागला.

बेर्लिओज़ला इतकी भीति वाटली, की त्याने आपले डोळे बंद करून घेतले. आणि जेव्हां डोळे उघडले तेव्हां सगळं संपलं होतं...भ्रम वितळून गेलेला होता, चौकड्यांचे जैकेटवाला लम्बू गायब झाला होता आणि हृदयांत घुसलेली सुईपण निघून गेली होती.

“छिः छिः, डेविल!” सम्पादक उद्गारला, “इवान, माहितीये, ह्या उष्णतेमुळे मला हार्ट अटैकच जवळ जवळ आलांच होता! काहीतरी वशीकरणासारखं...” त्याने हसण्याचा प्रयत्न केला, पण अजूनही डोळ्यांत भीतीची सावली होती, हात कापंत होते.

पण हळू-हळू तो सावरला, रुमाल झटकून थोडीशी हिम्मत करंत म्हणाला, “हं, तर मग...” आणि त्याने ज़र्दाळूच्या सरबतामुळे मधेच तुटलेल्या संभाषणाचे सूत्र संभाळले.

नंतर असं कळलं, की संभाषण येशू ख्रिस्ताबद्दल होतं. सम्पादकाने कवीला आपल्या पत्रिकेच्या आगामी अंकासाठी एक लांबकचक, धर्मविरोधी कविता लिहिण्यासाठी अनुबंधित केलं होतं. इवान निकोलायेविचने थोड्यांच वेळांत अशी एक कविता लिहून सुद्धां टाकली, पण सम्पादकाला ती जरासुद्धां आवडली नाही. कारण असं होतं की बिज़्दोम्नीने आपल्या कवितेच्या प्रमुख पात्राला – येशूला काळ्या रंगांत, म्हणजे अत्यंत घृणित, नीच स्वरूपांत प्रस्तुत केलं होतं आणि सम्पादक महाशयांची इच्छा होती की त्याने कविता पुन्हां लिहावी. आता ह्या पार्कमधे सम्पादक कवीला येशूबद्दल भाषण देत होता, ह्या उद्देश्याने, की कवीला त्याची चूक दाखवेल. हे सांगणं कठीण आहे, की इवान निकोलायेविचला कोणच्या शक्तीने असली कविता लिहिण्यासाठी प्रेरित केलं, कदाचित् ही त्याच्या आविष्कार-प्रेमी डोक्यांची देणगी होती, किंवा येशूबद्दलच्या अज्ञानामुळे असेल, पण त्याच्या कवितेत येशू एका जिवंत व्यक्तिप्रमाणे अवतरले होते, मात्र हे व्यक्तित्व कोणालांच आपल्याकडे आकर्षित करंत नव्हते. बेर्लिओज़ला हे सिद्ध करायचं होतं की मुख्य प्रश्न येशूच्या व्यक्तित्वाबद्दल, आणि त्याच्या चांगल्या किंवा वाईट चित्रणाबद्दल सुद्धां नसून, हा आहे की व्यक्तिच्या स्वरूपांत येशू पृथ्वीवर कधीच अवतरित झालेले नाहीये. त्यांच्याबद्दल प्रचलित सगळ्या गोष्टी फक्त कपोल-कल्पित आहे, मिथ्या आहे.       

वाचकगण, कृपया लक्ष द्या, की सम्पादकाचं वाचन खूप दांडगं होतं आणि आपल्या ह्या भाषणांततो अत्यंत सुरेखपणे प्राचीन इतिहासकारांचे संदर्भ देत होता. उदाहरणार्थ त्याने प्रसिद्ध इतिहासकार फिलौन अलेक्सान्द्रीस्की6 आणि अत्यंत विद्वान अशा जोसेफ़ फ्लावी7 ह्यांच्या नावांचा उल्लेख केला, ज्यांनी एका शब्दानेही येशूच्या अस्तित्वाचा उल्लेख केलेला नाहीये. एका प्रसिद्ध संदर्भाचा उल्लेख करताना मिखाइल अलेक्सान्द्रोविचने कवीला असं सुद्धां सांगितलं की टेसिटसच्या8 प्रसिद्ध एन्नल्सच्या पंधराव्या खण्डाच्या चौवेचाळीसाव्या अध्यायांत, जिथे येशूला फासावर लटकावण्याचं वर्णन आहे, ती सुद्धां वास्तविकता नाहीये. मूळ होली बाइबलमधे ह्याबद्दल काहींच लिहिलेलं नाहींये...हे सगळं नंतरच्या आवृत्यांत भरले आहे.

कवी, ज्याच्यासाठी सम्पादक सांगत असलेल्या गोष्टी अगदी नवीन होत्या, आपले मोठे-मोठे हिरवे डोळे बेर्लिओज़वर रोखून लक्षपूर्वक ऐकत होता. तो मधून मधून उचक्यापण देत होत्या. दर उचकी बरोबर ज़र्दाळूच्या सरबताला शिव्या देण्याचा क्रमसुद्धा चालू होता.

“पूर्वेकडचा असा एकही धर्म नाहीये,” बेर्लिओज़ पुढे म्हणाला, “ज्यांत एखाद्या पवित्र युवतीने ईश्वराला जन्म  दिला नसेल. ख्रिश्चन लोकांनी पण काहीही विचार न करतां येशूचा निर्माण अशाच प्रकारे करून टाकला, जेव्हां येशू कधी नव्हतेच. ह्याच मुद्द्यावर तुला विशेष जोर द्यायचा आहे...” 

बेर्लिओज़चा ज़ोरदार स्वर आळीत घुमंत होता. जसा जसा मिखाइल अलेक्सांद्रोविच पौराणिकतेच्या जाळ्यांत अडकंत होता, ज्यांत कोणी फक्त उच्च शिक्षित व्यक्तीच आपली मान मुरगळू न देण्याची सावधगिरी बाळगून जाऊं शकतो, कवीला आणखी कितीतरी नवीन-नवीन आणि मजेदार गोष्टींचं आकलन होत होतं. दयाळु देव, तसेंच पृथ्वी आणि आकाशाचा पुत्र – ओज़िरिसबद्दल9, फिनिशियन्सच्या फ़ामूस10 आणि मार्दूक11 ह्या देवांबद्दल कवीला सांगून झाल्यावर बेर्लिओज़ने कमी प्रसिद्ध, भयंकर देव वित्स्लिपुत्स्लिबद्दल12 सुद्धां सांगितलं, ज्याला एके काळी मैक्सिकोत अज़टेक लोक खूप मानायचे.

आणि जेव्हां मिखाइल अलेक्सांद्रोविचने सांगितलं की वित्स्लिपुत्स्लिच्या प्रतिमेचा निर्माण मळलेल्या पीठानी केला जात असे, तेव्हांच आळीत एक माणूस दिसला.

नंतर, जेव्हां स्पष्ट सांगायचं तर खूप उशीर झालेला होता, अनेक संस्थांनी ह्या माणसाचे वर्णन प्रस्तुत केले. जर ह्या सगळ्या वर्णनांची तुलना केली, तर आश्चर्यच होईल, कारण पहिल्या वर्णनाप्रमाणे हा माणूस कमी उंचीचा होता, त्याचे दात सोनेरी होते आणि तो उजव्या पायाने लंगडायचा; दुसर्या वर्णनांत हाच माणूस खूपंच उंच होता, त्याचे दात प्लेटिनमचे होते आणि डाव्या पायाने लंगडायचा. तिसर्या वर्णनांत ह्या माणसाबद्दल कोणतीच विशेष गोष्ट नव्हती.

तात्पर्य असें, की ह्यांच्यातील एकही वर्णन त्या माणसापर्यंत घेऊन जाण्यास सफल नाहीं झाले.

सगळ्यांत आधी: तो माणूस कोणत्याच पायाने लंगडंत नव्हता. त्याची उंची कमीपण नव्हती, आणि खूप जास्तसुद्धां नव्हती; तो फक्त उंच होता. राहिला दातांचा प्रश्न, त्याचे दात उजवीकडून प्लेटिनमचे आणि डावीकडून सोन्याचे होते. त्याने राखाडी रंगाचा भारी सूट घातला होता. सूटच्याच रंगाचे विदेशी जोडे होते, त्याच रंगाची टोपी कानावर झुकलेली, आणि बगलेत एक छडी दबलेली होती, जिची मूठ कुत्र्याच्या डोक्यासारखी13 होती. दिसायला साधारण चाळीस वर्षाचा, चेहरा किंहित वाकडा, दाढी-मिशा सफ़ाचट, केस काळे, उजवा डोळा – काळा, डावा – न जाणे कां हिरवा, भुवया काळ्या, पण एक दुसरीपेक्षा किंचित उंच होती. थोडक्यांत – परदेशी.

संपादक आणि कवि ज्या बेंचवर बसले होते, तिच्या जवळून जातांना परदेशी माणसाने तिरप्या नजरेने त्यांच्याकडे पाहिलं, तो थांबला आणि दोन पावलं दूर असलेल्या बेंचवर बसला.

जर्मन...बेर्लिओज़ने विचार केला.
ब्रिटिश’, बिज़्दोम्नीने विचार केला, ‘ओफ़, ह्याला हातमोजांमधे गरमपण नाहीं वाटंत!

परदेशी14 माणूस ह्या दरम्यान तलावाच्या चारी बाजूला असलेल्या उंच-उंच बिल्डिंग्सकडे बघंत होता. असं वाटंत होतं, की हे सगळं तो पहिल्यांदा बघतो आहे आणि त्याला हे सगळं मजेदारपण वाटंत होतं.

त्याने वरच्या मजल्यांकडे लक्ष देऊन पाहिलं, जिथे खिडक्यांच्या काचांतून तुटलेल्या आणि मिखाइल अलेक्सान्द्रोविचवरून नेहमीसाठी निघून गेलेल्या सूर्याचा प्रकाश परावर्तित होत होता., मग त्याने आपली नज़र खाली वळवली, जिथे संध्याकाळच्या धूसर प्रकाशांत काचा काळ्या होत चालल्या होत्या. अनोळखी माणूस न जाणे कां, हळूंच हसला. आपले डोळे बारीक करंत त्याने छडीच्या मुठीवर हात ठेवले आणि हातांवर हनुवटी टेकवली.

“तू, इवान...” बेर्लिओज़ म्हणंत होता, “खूप सुंदर आणि उपहासात्मक पद्धतीने ईश्वराचे पुत्र समजल्या जाणा-या  येशूच्या जन्माचं वर्णन केलं आहे, पण खरी गोष्ट तर अशी आहे, की येशूच्या आधीपण ईश्वराच्या अनेक पुत्रांचा जन्म झालेला होता, जसं अडोनिस15, एटिस16, मित्राज़17. खरं म्हणजे त्यांच्यापैकी एकसुद्धां जन्माला नाहीं आला, कोणीच नाहीं, येशूपण नाही. त्याच्या जन्माचे, मागींच्या18  आगमनाचे वर्णन करण्यापेक्षां, हे जास्त ज़रूरी आहे, की तू त्याच्या जन्माबद्दल प्रचलित असलेल्या आधारहीन मान्यतांबद्दल लिही...नाहींतर तुझ्या गोष्टीतून असं वाटतंय की येशूचा खरोखर जन्म झाला होता!...”

उचक्यांनी त्रस्त बिज़्दोम्नीने आपला श्वास रोखून उचकी थांबवण्याचा प्रयत्न केला, पण परिणाम उलटंच झाला, तो आणखीनंच जोरजोरांत आणि त्रासदायक उचक्या देऊ लागला. अगदी तेव्हांच बेर्लिओज़चा जिभेला पण खीळ बसली, कारण की तो परदेशी माणूस अचानक उठून लेखकांकडे येऊं लागला.

दोघंही विस्फ़ारित नेत्रांनी त्याच्याकडे बघू लागले.

“क्षमा करा...” जवळ येत-येत तो परदेशी उच्चारांत म्हणाला, “अनोळखी असताना पण मी हिम्मत करतोय...पण तुमच्या विद्वत्तापूर्ण संभाषणाचा विषय इतका मजेदार आहे की...”

त्याने सौजन्याने आपली हैट काढली आणि दोन्हीं मित्रांसमोर उठून त्याचे अभिवादन करण्याशिवाय पर्यायच नाहीं उरला.

नाहीं, कदाचित फ्रेंच आहे...बेर्लिओज़ने विचार केला.
पोलिश?’ बिज़्दोम्नी विचार करंत होता. 

मी असं म्हणेन, की कवीला प्रथम दृष्टीतंच परदेशी किळसवाणा वाटला, पण बेर्लिओज़ला तो जवळ-जवळ आवडला, म्हणजे असं नाही की आवडला, पण...कसं...मजेदार वाटला, कदाचित.

“मला बसायची परवानगी द्याल कां?” अत्यंत गोडीने परदेशी माणसाने विचारलं. मित्रगण अनिच्छेने थोडंसं इकडे-तिकडे सरकले. परदेशी माणूस आरामांत दोघांच्या मधे बसून गेला आणि लगेच संभाषणाला सुरुवात केली.

“जर माझ्या ऐकण्यांत चूक नाहीं झाली, तर तुम्हीं हे म्हणंत होता, की येशू जगांत नव्हतेच?” अनोळखी माणसाने आपला हिरवा डोळा बेर्लिओज़कडे वळवून विचारलं.

“नाहीं, तुम्हीं बरोबरंच ऐकलंय,” बेर्लिओज़ने अत्यंत शालीनतेने उत्तर दिलं, “मी बिल्कुल हेंच म्हटलं होतं.”
“आह, किती मनोरंजक!” अनोळखी उद्गारला.
ह्याला कोणचा सैतान पाहिजे?’ बिज़्दोम्नीने विचार केला आणि कपाळावर आठ्या चढवल्या.
“आणि तुम्हीं आपल्या मित्राच्या मताशी सहमत आहांत कां?” आता अनोळखी माणसाने उजवीकडे बसलेल्या बिज़्दोम्नीकडे वळून विचारलं.
“शंभर टक्के!...” बिज़्दोम्नी म्हणाला, ज्याला थोड्या नाटकीय आणि अलंकारिक ढंगाने बोलण्याचा शौक होता.
“आश्चर्य आहे!” अनाहूत पाहुणा पुन्हां उद्गारला आणि न जाणे कां चोरासारखं इकडे तिकडे बघून आपल्या जाड्या आवाजाला आणखी भसाड्या करंत म्हणाला, “माझ्या उत्सुकतेला माफ़ करा, पण मला हे समजलंय की तुम्हीं देवावरपण विश्वास नाहीं करंत?” आपल्या डोळ्यांत भीतिचे भाव आणून तो पुढे म्हणाला, “शप्पथ घेतो, मी कुण्णाला काहीही सांगणार नाहीं.”

“हो, आम्हीं देवावर विश्वास नाहीं करंत,” बेर्लिओज़ने परदेशीच्या घाबरण्याची टिंगल करंत म्हटलं, “पण हे आम्हीं अगदी उघंडपणे सांगू शकतो, न घाबरतां.”

अनोळखी माणसाने बेंचला पाठ टेकवून आणखीनंच उत्सुकतेने विचारलं, “तुम्हीं नास्तिक आहांत कां?”
“हो, आम्हीं नास्तिक आहोत.” बेर्लिओज़ने स्मित करून म्हटलं. बिज़्दोम्नीने दात खात विचार केला, ‘पिच्छांच पुरवतोय परदेशी उंदीर.

“ओहो, काय थाट आहे!” परदेशी आश्चर्याने ओरडला, आणि आपलं डोकं दोन्हींकडे हलवंत कधी ह्याच्याकडे, तर कधी त्याच्याकडे बघूं लागला.

“आमच्या देशांत नास्तिकतेने कोणी आश्चर्यचकित होत नाहीं,” बेर्लिओज़नी एखाद्या राजनयिकाच्या थाटांत म्हटलं, “आमच्या जनसंख्येचा बहुतांश भाग बरेंच दिवसांपासून देवाबद्दल कोणत्याही किंवदंत्यावर विश्वास नाहीं ठेवंत.”

अनोळखी माणसाने एक अजबंच काम केलं, तो उठून उभा राहिला आणि आश्चर्यचकित संपादकाचा हात पकडून म्हणाला, “मी हृदयपूर्वक तुम्हांला धन्यवाद देतो!”
“तुम्हीं ह्यांना धन्यवाद कां देताय?” पापण्यांची उघडझाप करंत बिज़्दोम्नीने विचारलं.
“एका अश्या महत्वपूर्ण माहितीसाठी, जी माझ्यासारख्या पर्यटकासाठी अत्यंत रोचक आहे,” खूप गूढपणे बोट वर करून परदेश्याने समजावले.

ह्या महत्वपूर्ण माहितीने पर्यटकावर निश्चितंच गंभीर प्रभाव टाकला होता, कारण की तो सारखा आपले भयभीत डोळे फिरवंत सगळ्या बिल्डिंग्सकडे बघंत होता, जणु त्याला प्रत्येक खिडकींत एकेका नास्तिकाचे दर्शन होतं आहे.

नाही, हा ब्रिटिश नाहीये...बेर्लिओज़ने पुन्हां विचार केला, तर बिज़्दोम्नीला आश्चर्य वाटंत होतं की – हा रशियनमधे कसा बोलतो आहे, अद्भुत्!त्याने पुन्हां कपाळावर आठ्या टाकल्या.
“पण, मला एक विचारायची परवानगी द्या...” ताणलेल्या उत्सुकतेने अनोळखी माणसाने विचारलं, “परमेश्वराच्या अस्तित्वाबद्द्ल विद्यमान असलेल्या पाच प्रमाणांबद्दल तुमचं काय मत आहे?”
“ओफ़!” बेर्लिओज़ने सहानुभूतिपूर्ण स्वरांत उत्तर दिलं, “त्यांच्यापैकी एकही काही लायकीचा नाहीये. मानवतेने खूप आधीच त्यांना नाकारून पुरातत्व संग्रहालयांत फेंकून दिलंय. विश्वास करा, की तार्किक बुद्धि परमेश्वराच्या अस्तित्वाबद्दल कोणत्यांच प्रमाणाला मान्यता नाही देत.”
“शाबास!” परदेशी ओरडला, “ शाब्बास! तुम्हीं अगदी एमानुएलचेच19 विचार सांगितलेय. पण आश्चर्याची गोष्ट अशी आहे की त्याने पांचही प्रमाणांना नाकारून, स्वतंचाच उपहास करंत सहाव्या प्रमाणाची रचना करून टाकली!”
“काण्टचे प्रमाण,” किंचित हसंत शिकलेला सम्पादक म्हणाला, “तो पण बरोबर नाहीये. शिलेरने20 बरोबरंच म्हटलं होतं, की ह्या संदर्भातील काण्टचे विचार फक्त गुलामांनाच आवडूं शकतील. श्त्राउसनी21 तर ह्या प्रमाणाची सपशेल खिल्लीच उडवलीयं.”

बेर्लिओज़ बोलंत होता, पण त्याबरोबरंच विचारही करंत होता, “पण, हा आहे कोण? आणि हा इतकी चांगली रशियन कशी बोलतोय?”
“ह्या काण्टला तर असल्या प्रमाणांसाठी सलोव्कीत22 तीन वर्षासाठी शिक्षा मिळाली पाहिजे!” इवान निकोलायेविच मधेच टपकला.
“इवान!” अवघडून बेर्लिओज़ पुटपुटला. पण काण्टला तीन वर्षासाठी सलोव्कीला पाठविण्याच्या कल्पनेनी जणु अनोळखी माणसावर जादूच केली.
“ बरोबर, बरोबर...” तो ओरडला आणि बेर्लिओज़कडे बघणारा त्याचा हिरवा डोळा चमकूं लागला, “त्याला तिथेंच पाठवलं पाहिजे! मी त्याला ब्रेकफास्ट करताना सांगितलं होतं: ‘तुम्हीं, प्रोफेसर, तसं म्हणा हे तुमचं मत आहे, पण खूपच घाणेरडा विचार मांडलाय! तुमचा विचार, कदाचित, खूप बुद्धिमत्तापूर्ण असेल, पण तो आकलना पलिकडे आहे. लोक तुम्हांला हसतील.”
बेर्लिओज़चे डोळे विस्फ़ारले, ‘ब्रेकफास्ट करतांना...काण्टला?...हा काय वटवट करतोय?” त्याने विचार केला.

“पण,” बेर्लिओज़च्या विस्मयाकडे लक्ष न देतां आणि कवीकडे वळंत परदेशी बोलतंच होता, “त्याला सोलोव्कीला पाठवणं संभव नाहीये, कारण की जवळ-जवळ शंभर वर्षांपासून सोलोव्कीपेक्षांही खूप दूरच्या जागेवर राहतोय, आणि त्याला तेथून आणणं कसंही शक्य नाहीं, खरंच सांगतोय.”
“ओह, दुःखद गोष्ट आहे!” चिडखोर कवीने प्रतिसाद दिला.
“मला पण दुःख आहे!” अनोळखी माणूस आपला डोळा चमकावंत पुढे म्हणाला, “पण मला एक वेगळाच प्रश्न सतावतोय: ज़र परमेश्वर नाहीये, तर सांगा की मानव जीवनाचे संचालन कोण करतंय आणि पृथ्वीवर चाललेल्या सगळ्या हालचालींचं सूत्र कोण सांभाळतंय?”
“मनुष्य, आणखी कोण?” बिज़्दोम्नीने चिडून म्हटलं. पण स्पष्ट होतं की त्याला हा प्रश्न समजला नव्हता.
“माफ़ करा,” अनोळखी माणसाने हळूंच विचारलं, “पण, संचालन करण्यासाठी काहीतरी वेळबद्ध योजनातर आखावी लागतेच ना, भले ही थोड्याचं वेळासाठी असूं दे? मला सांगा की मनुष्य सूत्रधार कसा असूं शकतो, जेव्हां तो थोड्या वेळासाठी, जसं एक हज़ार वर्षांसाठीसुद्धां, कोणतीच योजना आखण्यास असमर्थ आहे, उलंट त्याचं आपल्या उद्यावरपण नियंत्रण नाहीये, आणि, खरोखरंच,” अनोळखी माणूस बेर्लिओज़कडे वळून म्हणाला, “समजा, तुम्हीं हे संचालन सुरूं करता, स्वतःचं आणि इतरांचंदेखील आणि अचानक तुम्हांला...हे...हे...हे फुफ्फुसांचा ट्यूमर होतो...” अनोळखी गोड हसंत म्हणाला, जणु ह्या ट्यूमरच्या कल्पनेनी त्याला फार आनंद झाला असावा, “ हो, ट्यूमर...” मांजरासारखे डोळे बारीक करंत त्याने पुन्हां म्हटलं, “बस, तुमचं काम खल्लास! तेव्हां तुम्हीं इतर कोणाच्या नाहीं, तर फक्त स्वतःचीच काळजी कराल. नातेवाईक तुम्हांला सांत्वना देतील आणि तुम्हीं, दुर्भ्याग्याच्या कल्पनेनी घाबरून डॉक्टर्सकडे, वैद्यांकडे, भोंदू डॉक्टर्सकडे आणि ज्योतिषांकडे सुद्धां जाल. त्यांच्यापैकी कोणीच तुमची मदत करूं शकणार नाही – हे तुम्हांला माहीतंच असणार. आणि ह्या सर्वाचा दुर्भाग्यपूर्ण अंत होईल. तो, जो थोड्याच वेळापूर्वी राज्य करंत होता, आता अगदी प्राणहीन पडलेला असेल. लाकडी पेटीत, आणि त्याला पाहणारे, हे समजून की आता ह्या निर्जीव शरीराचा काही उपयोग नाही, त्याला भट्टीत जाळून टाकतील. ह्याहून वाईटही होऊं शकतं: माणूस किस्लोवोद्स्क जाण्याची तयारी करतोय...” अनोळखी माणसाने डोळे बारीक करून बेर्लिओज़कडे पाहिलं, “छोटीशीच गोष्ट आहे, पण ती सुद्धां पूर्ण करतां येत नाहीं, कारण की कदाचित त्याचा पाय घसरेल आणि तो ट्रामचा खाली येईल! तरीही तुम्हीं म्हणाल कां की तुम्हीं स्वतःचं असल्या घटनाक्रमाची रचना केली होती? हा विचार करणं जास्त तर्कसंगत नाहीं वाटंत कां की दुसरंच कोणीतरी संचालन करतोय?” आणि अनोळखी माणूस विचित्रपणे हसला.

बेर्लिओज़ खूप लक्ष देऊन ट्यूमर आणि ट्रामबद्दल अप्रिय गोष्ट ऐकत होता. तो काही अज्ञात विचाराने भयभीत झाला. हा परदेशी नाहीये! हा परदेशी असूंच शकत नाहीं!’…त्याने विचार केला – ही एक फार आश्चर्यजनक वस्तु आहे...पण हा आहे कोण?’
“कदाचित तुम्हांला सिगरेट प्यायचीये?” अकस्मात् अनोळखी माणसाने बिज़्दोम्नीला विचारलं, “कोणचा ब्राण्ड पाहिजे?”
“तुमच्याकडे, जसे काही खूप सारे ब्राण्ड्स आहेत?” पडलेल्या स्वरांत कवीने विचारलं, ज्याच्या सिगरेट्स खरंच संपल्या होत्या.
“कोणचा ब्राण्ड?” अनोळखी माणसाने पुन्हां विचारलं.
“अच्छा, ‘नाशा मार्का’! बिज़्दोम्नीने कटुतेने उत्तर दिलं.

अनोळखी माणसाने लगेच खिशातूंन सिगरेट केस काढली आणि बिज़्दोम्नी समोर केली, “घ्या, ‘नाशा मार्का’!”                                           

सम्पादक आणि कवीला ह्या गोष्टीचं जास्त आश्चर्य नाहीं झालं, की सिगरेटकेसमधे नाशा मार्काब्राण्डची सिगरेट होती, त्यांना विस्मित केलं सिगरेटकेसनी. ती एक विशाल सिगरेट केस होती, शुद्ध सोन्याची, तिचे झाकण उघडताना निळसर पांढरा प्रकाश फेकणारा त्रिकोणी हीरा चमकंत होता.

दोन्हीं साहित्यकारांच्या मनांत वेगवेगळे विचार आले. बेर्लिओज़च्या : नाहीं, परदेशीच आहे!आणि बिज़्दोम्नीच्या: मसणांत जा, एह?’

कवी आणि सिगरेट केसचा मालक कश घेत होते, पण बेर्लिओज़ने सिगरेट पिण्यास नकार दिला.
त्याच्या गोष्टीचा विरोध केला पाहिजे की, ’ बेर्लिओज़ने विचार केला, ‘मनुष्याला एक न एक दिवस मरायचंच आहे, ह्या वास्तविकतेचा विरोध कोणीच करंत नाहीये. पण मुद्दा हा आहे की...

पण तो हे शब्द म्हणायच्या आधीच परदेशी मध्येच बोलूं लागला, “ हो, माणूस नश्वर आहे, पण हे तर अर्धंच दुर्भाग्य आहे. वाईट भाग हा आहे, की कधी कधी तो अचानकंच मरून जातो, ह्याच गोष्टीवर मी जोर देतोय! आणि त्याला हे पण माहीत नसतं आणि तो विश्वासपूर्वक नाही सांगू शकंत, की आज संध्याकाळी तो काय करणार आहे.”

विचित्र आहे हा प्रश्न’…बेर्लिओज़ने विचार केला आणि म्हणाला, “तुम्हीं तर अगदी अतिशयोक्तीच करतांय. आज संध्याकाळी मी काय करणारेय ह्याची मला जवळ-जवळ सम्पूर्ण माहिती आहे. हो, जर ब्रोन्नाया स्ट्रीटवर माझ्या डोक्यावर जर एखादी वीटंच पडली तर...”
“विटेची गरज नाहीये,” अनोळखी माणसाने मधेच सोद्देश्य म्हटलं, “ती अशीच कुणावर कधीही पडंत नसते. तुमच्यावर तर ती नाहींच पडणार. तुम्ही वेगळ्यांच प्रकारे मरणार आहांत.”
“कदाचित तुम्हांला माहितीये, की कोणच्या प्रकाराने?” बेर्लिओज़ने तीक्ष्ण उपहासाने विचारलं, आणि नकळतंच ह्या निरर्थक संभाषणांत तो ओढला गेला – “आणि मला सांगाल?”
“मजेत!” अनोळखी म्हणाला. तो जणु डोळ्यांने बेर्लिओज़चे माप घेत होता, जसं त्याच्यासाठी सूट शिवणारेय, आणि ओठांतल्या ओठांत पुटपुटंत होता: एक, दोन...बुध दोन मधे, ...चंद्र अस्त झालांय...सहा – दुर्भाग्य...संध्याकाळ – सात’ – आणि मग आनंदाने ओरडला, “तुमचं डोकं कापलं जाणारेय!”

बिज़्दोम्नी खाऊ की गिळूनजरेने हात-पाय पसरंत असलेल्या अनोळखी माणसाला बघंत होता आणि बेर्लिओज़ने उपहासात्मक आवाजांत विचारलं, “कोण कापणारेय? शत्रू? आततायी 23?”
नाहीं,” अनोळखी म्हणाला, “रशियन महिला, कम्सोमोल्का.”24
“हुम्!” अनोळखी माणसाच्या थट्टेने थोडासा चिडून बेर्लिओज़ म्हणाला, “माफ़ करा, ह्या गोष्टीवर विश्वास करणं कठीण आहे!”
“मला पण माफ़ करा!” परदेशीने उत्तर दिलं, “मगर असंच होणारेय, हो, मी तुम्हांला विचारणार होतो, की आज संध्याकाळी तुम्हीं काय करतांय, जर काही सीक्रेट नसेल तर सांगा.”
“काहींच सीक्रेट नाहीये. आतां मी सादोवाया स्ट्रीटवर माझ्या घरी जाईन आणि मग रात्री दहा वाजतां – मॉसोलित. तिथे एक मीटिंग आहे ज्याची अध्यक्षता मला करायची आहे.”
“नाहीं, हे शक्य नाहीं...” परदेशीने जोरांत प्रतिवाद केला.
“कां?”

परदेशी माणसाने डोळे बारीक करून घेतले आणि आकाशाकडे बघंत म्हणाला, जिथे संध्याकाळच्या गारव्याचा अनुभव करंत पक्ष्यांचे झुण्ड उडत होते, “कारण की अन्नूश्काने सनफ्लॉवर ऑइल विकंत घेतले आहे, आणि फक्त विकतंच नाहीं घेतलंय, उलट थोडंसं सांडलं पण आहे. ह्याचा अर्थ असा झाला की मीटिंग नाहीं होणार.”

ह्या बरोबरंच लिण्डन वृक्षांच्याखाली शांतता पसरली.

“माफ़ करा,” बेर्लिओज़ने आश्चर्याच्या पोतडीसारख्या परदेशी माणसाकडे बघंत पुन्हां सुरुवात केली, “इथे सनफ्लॉवर ऑइलचं काय काम आहे...आणि ही अन्नूश्का कोण आहे?”
“सनफ्लॉवर ऑइल अश्यासाठी की,” बिज़्दोम्नी उघड-उघड अनोळखी माणसाबरोबर युद्धं जाहीर करंत मधेच टपकला, “महाशय, तुम्हीं कधी पागलखान्यांत गेले आहांत?”
“इवान!” मिखाइल अलेक्सांद्रोविच हळूच त्याला रागावला.

पण अनोळखी माणसाने ह्या गोष्टीचं वाईट नाहीं वाटून घेतलं आणि खूपंच आनंदाने हसंत सुटला.
“गेलो होतो, गेलो होतो आणि एकदांच नाहीं!” तो हसतां हसतां ओरडला, पण त्याचे डोळे कवीवरंच होते. “मी कुठे-कुठे नाहीं गेलो! दुःख फक्त एकांच गोष्टीचं आहे, की मी प्रोफेसरला विचारूं नाहीं शकलो, की शिज़ोफ्रेनिया म्हणजे काय? तुम्हीं स्वतःच प्रोफेसरला ह्या बद्दल विचाराल, इवान निकोलायेविच!”
“तुम्हांला माझ नाव कसं माहीत?”
“हे घ्या! इवान निकोलायेविच, तुम्हांला कोण नाहीं ओळखंत?” अनोळखी माणसाने आपल्या खिशातूंन 

एक दिवस आधीचा लितेरातूर्नाया गज़ेताचा अंक काढला ज्यांत पहिल्यांच पानावर इवान निकोलाएविचला आपला फोटो दिसला, फोटोच्या खाली त्याची कविता छापलेली होती. पण ह्या लोकप्रियतेचा आणि प्रसिद्धीचा जितका आनंद त्याला काल झाला होता, आज तो तितकांच निर्विकार होता.
“मला माफ़ करा,” तो म्हणाला आणि त्याचा चेहरा काळवंडला, “तुम्हीं एक मिनिट थांबाल कां? मला माझ्या मित्राशी थोडं बोलायचंय.”
“ओह, ज़रूर!” परदेशी उद्गारला. “येथे, लिण्डनच्या सावलीत इतकं चांगलं वाटतंय, शिवाय, मला कसंलीच घाई नाहीये.”
“बघ, मीशा,” कवी बेर्लिओज़ला एकीकडे खेचंत नेतां नेतां म्हणाला, “हा कोणी टूरिस्ट नाहीये, मला तर हा कुणी हेर वाटतोय. हा आपला देश सोडून गेलेला25 रशियन आहे, जो येथे परत आलांय. त्याच्या डॉक्यूमेन्ट्स बद्दल विचार, नाहींतर तो पळून जाईल...”
“तुला असं वाटतंय?” उत्तेजित होऊन बेर्लिओज़ पुटपुटला, पण तो मनांत विचार करंत होता: हा बरोबर म्हणतोय!
“माझ्यावर विश्वास ठेव,” कवीने त्याच्या कानांत सांगितलं, “तो मूर्ख असल्याचं नाटक करतोय, म्हणजे आपल्याकडून काहीतरी उकळतां येईल. तू ऐकतोयंस ना, कशी चांगली रशियन बोलतोय तो?” कवी पुढे म्हणाला आणि सावधगिरीने मागे वळून पाहिलं की तो परदेशी ऐकंत तर नाहीये, “चल, त्याला पकडूं या, नाहींतर तो पळून जाईल.”
आणि कवी हात धरून बेर्लिओज़ला खेचंत बेंच पर्यंत आला.

अनोळखी माणूस बेंचवर बसलेला नव्हता, तो जवळंच उभा होता, हातांत एक छोटंस काळं पुस्तक, मस्त कागदाचा लिफ़ाफ़ा आणि विज़िटिंग कार्ड घेऊन.

“माफ़ करा, गोष्टींमधे मी इतका रमलो, की आपला परिचयसिद्धां देण्याचं विसरून गेलं. हे आहे माझं कार्ड, पासपोर्ट आणि मॉस्कोला येण्याचं निमंत्रण...कन्सल्टेशनसाठी.” अनोळखी माणूस स्पष्ट आवाजांत म्हणाला, आणि दोन्हीं साहित्यकारांकडे तीक्ष्ण नजरेने बघंत राहिला.

ते गडबडून गेले, “सैतानाने सगळं ऐकलंय...” बेर्लिओज़ने विचार केला, पण अत्यंत सौजन्यपूर्ण दाखवंत त्याने स्पष्ट केलं की डॉक्यूमेन्ट्स दाखवायची काहीं गरंज नाहीये. जेव्हां परदेशी बेर्लिओज़च्या हातांत डॉक्यूमेन्ट्स देत होता, तेवढ्यांत कवीने पटकन बघितलं की कार्ड पर विदेशी अक्षरांमधे प्रोफेसरछापलं होतं आणि त्याच्या नावाचं पहिलं अक्षर होतं दुहेरी ’ (डबल V- W)…खूप आनंद झाला...” आपली फजिती लपवंत सम्पादक पुटपुटला आणि अनोळखी माणसाने सगळे डॉक्यूमेन्ट्स खिशांत ठेवून घेतले.

सूत्र पुन्हां जोडलं गेलं होतं. तिघं पुन्हां बेंचवर बसले.
तर, तुम्हांला कन्सल्टेन्ट म्हणून येथे बोलावलंय, प्रोफेसर?” बेर्लिओज़ने विचारलं.
“हो, कन्सल्टेन्ट म्हणून.”
“तुम्हीं जर्मन आहांत कां?” बिज़्दोम्नीने विचारलं.
“मी...?” प्रोफेसरने जणु त्यालांच प्रतिप्रश्न केला आणि एकदम विचारांत पडला, “हो जर्मनंच समजा...” त्याने उत्तर दिलं.
पण तुम्हीं खूप चांगली रशियन बोलता...” बिज़्दोम्नीने म्हटलं.
“ओह, तसा, मी बहुभाषी आहे आणि पुष्कळश्या भाषा मला अवगत आहेत,” प्रोफेसरने उत्तर दिलं.
“तसं, तुमचं प्रोफेशन काय आहे?” आतां बेर्लिओज़ने विचारलं.
“मी ब्लैक-मैजिकचा विशेषज्ञ आहे.”
तुझी तर!...मिखाइल अलेक्सांद्रोविचच्या डोक्यांत जणु घणाचे घाव पडूं लागले. “आणि...आणि तुम्हांला ह्या संदर्भांत सल्ला द्यायला आमच्याकडे बोलावलंय?” मोठ्या मुश्किलीने त्याच्या तोंडून शब्द फुटले.
“हो, ह्यासाठीच बोलावलंय,” प्रोफेसरने जोर देऊन म्हटलं आणि स्पष्ट केलं, “इथे सरकारी लायब्रेरीत दहाव्या शतकांतील विद्वान हर्बर्ट अव्रीलाक्स्कीच्या26  ब्लैक मैजिकवर लिहिलेल्या अनेक मूळ हस्तलिखिते सापडली आहेत. त्यांचा अर्थ सांगण्यासाठीच मला बोलावलंय. सम्पूर्ण जगांत मी एकटांच ह्या क्षेत्रांतला विशेषज्ञ आहे.”
“आ-आ!...तर, तुम्हीं इतिहासकार आहांत?” सुटकेचा निःश्वास सोडून किंचित आदराने बेर्लिओज़ने विचारलं.
“मी इतिहासकारंच आहे.”  विशेषज्ञाने म्हटले आणि लगेच जसं त्याला काहींच माहीत नाही, अश्या आविर्भावांत म्हणाला, “आज संध्याकाळी पत्रियार्शी पार्क जवळ एक रोचक घटना घडणार आहे!”

कवी आणि सम्पादक पुन्हां चकित झाले. प्रोफेसरने दोघांना आपल्या अगदी जवंळ बोलावलं आणि जेव्हां ते त्याच्याकडे वाकले तेव्हां तो पुटपुटला, “लक्षांत ठेवा, येशू अवतरित झाले होते.”
“हे बघा प्रोफेसर,” बळे-बळे हसत बेर्लिओज़ने म्हटलं, “आम्हीं तुमच्या विद्वत्तेचा सम्मान करतो, पण ह्या मुद्द्यावर आमचं वेगळं मत आहे.”
“तुमच्या वेगळ्या मताची काही गरज नाहीये!” विचित्र प्रोफेसर म्हणाला, “ते होते म्हणजे होते, आणि बस, ह्यापुढे काहीही नाहीं.”               
“पण एखाद्या प्रमाणाची आवश्यकता तर असणारंच...” बेर्लिओज़ने पुन्हां सुरुवात केली.
“कोणत्यांच प्रमाणाची गरज नाहीये...” प्रोफेसर हळूंच म्हणाला, आणि त्याचं परदेशी उच्चारणसुद्धां एकदम बदललं – “सगळं अगदी स्पष्ट आहे: रक्तवर्णीय किनारीचा पांढरा अंगरखा घातलेला...”  

**********

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें