बारा
काळा जादू आणि त्याचं रहस्योद्घाटन
भोकाभोकांची
पिवळी टोपी घातलेला,
नासपातीच्या आकाराचं लाल नाक असलेला, चौकटीची पैन्ट आणि पॉलिश केलेले जोडे घातलेला एक बुटका
माणूस वेराइटीच्या स्टेजवर एक साधारण दुचाकी सायकल चालवंत प्रविष्ट झाला. फॉक्स्ट्रॉटच्या
स्वरलहरींच्या पार्श्वभूमीवर त्याने एक चक्कर मारला. मग तो विजयी मुद्रेंत ओरडला, ज्याने सायकल मागच्या चाकावर सरळ उभी राहिली. मागच्या
चाकाला चालवंत तो बुटका माणूस पाय वर करून डोक्यावर उभा राहिला. अत्यंत निपुणतेने
त्याने समोरच्या चाकाचे स्क्रू उघडून त्याला सायकलीतून काढून टाकलं आणि फक्त
मागच्या चाकावर दोन्हीं हातांनी पैडल फिरवंत सायकल चालवंत राहिला.
एका
उंच धातुच्या दांड्यावर,
ज्याच्या टोकावर एक सीट
लावलेली होती आणि एक चाक फिट केलेलं होतं, भरलेल्या
अंगाची, भुरे केस असलेली मुलगी जाळीदार ब्लाउज आणी चांदीचे
तारे शिवलेला स्कर्ट घालून आली. ती स्टेजवर गोल गोल चक्कर मारूं लागली. तिच्याजवळ
आल्यावर बुटक्या माणसाने आपल्या पायाने डोक्यावरची टोपी काढून तिचं अभिवादन केलं
आणि स्वागतार्थ वेगवेगळ्या प्रकारचे आवाज काढूं लागला.
शेवटी
आठ वर्षाचा, म्हाता-या चेह-याचा एक मुलगा स्टेजवर आला आणि दोन्हीं
मोठ्या कलाकारांचामधे आपल्या लहानग्या सायकलसकट फिट झाला, जिच्यावर मोटरचा भोंगा लावला होता.
ह्या
तिघांनी काही वेळ चक्कर लावले आणि बैण्डच्या हल्ल्यांत स्टेजच्या अगदी टोकापर्यंत
आले. समोरच्या रांगेत बसलेले दर्शक धक्क झाले आणि मागच्या बाजूस झुकले, कारण की दर्शकांना असं वाटंत होतं, की हे त्रिकूट आपल्या सायकलींसकट स्टेजच्या समोरच्या ऑर्केस्ट्रा-पिटवर
जाऊन आदळेल.
पण
सगळ्या सायकली अगदी त्याच वेळी थांबल्या, जेव्हां
पुढचं चाक वादकांच्या डोक्यांवर पडणारंच होतं. सायकल स्वार ‘आप्प’
करंत ओरडले आणि खाली
उतरून दर्शकांच अभिवादन करूं लागले. भु-या केसांची मुलगी दर्शकांकडे फ्लाइंग किस
फेकंत राहिली आणि लहान मुलगा आपल्या भोंग्यावर हास्यास्पद आवाज काढंत राहिला.
सम्पूर्ण
हॉल टाळ्यांच्या गडगडाटाने भरून गेला,
निळ्या पडद्याने
दोन्हींकडून सरकंत सायकल स्वारांना झाकून टाकलं; दारांवर
हिरव्या प्रकाशांत चमकणारे ‘निर्गम’
शब्द विझले आणी
ट्रेपेज़ीच्या जाळींत गुम्बदाच्या वर,
सूर्यासारखे पांढरे गोळे
जळूं लागले. शेवटच्या ‘शो’
पूर्वीचं मध्यांतर झालं
होतं.
फक्त
एक माणूस असा होता,
ज्याला ज्यूलीच्या फैमिलीने
दाखवलेले सायकलचे खेळ बिल्कुल पसंत नाही आले, तो
होता ग्रिगोरी दानिलोविच रीम्स्की. तो आपल्या ऑफ़िसच्या खोलींत अगदी एकटा बसून आपले
पातळ ओठ चावंत होता. त्याचा चेहरा सारखा थरथरंत होता. लिखादेयेवच्या
अप्रत्याशितपणे गायब होण्याच्या घटनेशी वारेनूखाच्या अचानक गायब होण्याची घटनापण
जोडली गेली होती.
रीम्स्कीला
माहीत होतं, की तो कुठे चाललांय, पण तो
गेला तर खरं...पण परंत नाही आला! रीम्स्कीने खांदे उंचावत स्वतःलाच विचारलं, “पण कां?”
आणि आश्चर्याची गोष्ट ही
होती की त्याच्यासारख्या फिनडाइरेक्टरसाठी सगळ्यांत सोपं होतं त्या ठिकाणी फोन
करणं, जिथे वारेनूखा गेला होता आणी माहिती काढणं की
त्याला काय झालंय, पण रात्रीचे दहा वाजेपर्यंत तो ह्याबाबत
काही निर्णय नाही घेऊ शकला.
शेवटी रात्री दहा वाजतां
त्याने ठरवलं की फोन करावा. टेलिफोनचा रिसीवर उचलतांच त्याला कळलं की त्याचा
टेलिफोन बंद पडलाय. चौकीदारने सांगितलं की थियेटरचे बाकी सगळे फोनसुद्धां बंद
आहेत. ह्या अप्रिय घटनेने, जिला अलौकिक नाही
म्हणता येणार, फिनडाइरेक्टरला हलवून टाकलं, पण त्याबरोबरंच तो खूषपण झाला, टेलिफोन करण्यापासून
वाचला!
जेव्हां फिनडाइरेक्टरच्या
डोक्याच्या अगदी वरचा लाल रंगाचा बल्ब लागला आणि उघडझाप करूं लागला,
जी मध्यांतराची खूण होती, तेव्हांच चौकीदाराने
येऊन सांगितलं की परदेशी कलाकार आलाय. फिनडाइरेक्टर हृदय जणु बंदंच झालं, घोर निराशेने तो पर्यटक पाहुण्याच्या स्वागतासाठी पुढे आला, कारण की त्याचं स्वागत करण्यासाठी कोणी उरलंच नव्हतं.
मोट्ठ्या मेक-अप रूममधे,
जिथे सिग्नलची घंटा वाजंत होती, बरेंच लोक
काही ना काही कारणाने उत्सुकतेने डोकावंत होते. तिथे चमकते ड्रेसेस घातलेले आणि
डोक्यावर पगडी बांधलेले जादूगर होते; विणलेलं जैकेट घातलेला
स्केटर होता; पावडर लावल्याने पिवळा-पिवळा जाणवंत असलेला संयोजक
आणि मेकअपमैन दिसंत होते.
आगंतुक पाहुण्याने
सगळ्यांना आपल्या अभूतपूर्व लाम्बीच्या मस्त फिटिंगच्या फ्रॉककोटने आणि काळ्या
नकाबने प्रभावित केलं होतं. ह्याच्याही पेक्षा अद्भुत होते ह्या काळ्या जादुगाराचे
दोन सहायक : तुटका चश्मा घातलेला चौकटीवाला लम्बू आणि काळा लट्ठया बोका. बोका
मागच्या पायांवर चालंत मेकअप रूम मधे आला आणि सोफ्यावर बसून उघडझाप करणारे विजेचे
बल्ब्स बघूं लागला.
रीम्स्कीने चेह-यावर हसूं
आणायचा प्रयत्न केला, पण त्याच्या चेह-यावर कटुता
आणि दुष्टता पसरली. त्याने वाकून जादूगाराचं अभिवादन केलं, जो
बोक्याच्या बाजूला सोफ्यांत बसला होता. हस्तांदोलन नाही झालं. चौकटीच्या लम्बूने
स्वतःच आपला परिचय ‘ह्यांचे सहायक’ असं
म्हणून दिला. फिनडाइरेक्टरला ह्या गोष्टीचं आश्चर्य झालं आणि त्याला हे आवडलं पण
नाही: अनुबन्धांत कोणत्याच सहायकाचा उल्लेख नव्हता.
खूप कटुतेने आणि बळजबरीने
ग्रिगोरी दानिलोविचने आपल्या डोक्यावर येत असलेल्या चौकटीच्या लम्बूला विचारलं की
कलाकार महाशयांच सामान कुठे आहे.
“आमचे स्वर्गातले हीरे,
बहुमूल्य डाइरेक्टर महोदय,” फाटक्या आवाजांत
जादुगाराच्या सहायकाने म्हटले, “आमचं सामान सदा आमच्या
बरोबरंच असतं. हे बघा! एक, दोन,
तीन!” आणि आपले हडकुळे बोटं रीम्स्कीच्या डोळ्यांसमोर नाचवंत त्याने
अचानक बोक्याच्या कानामागून रीम्स्कीचं सोनेरी घड्याळ पट्ट्यासकट काढलं. हे घड्याळ
आत्तापर्यंत फिनडाइरेक्टरच्या कोटाच्या आत घातलेल्या जैकेटच्या खिशांत चेनने
लटकवलेलं होतं.
रीम्स्कीने इच्छा
नसतानासुद्धां आपलं पोट धरलं. तिथे उपस्थित सगळेजण आश्चर्याने ओरडले आणि दारांतून
डोकावणारा मेकअपमैन ‘वाह-वाह’ करूं लागला.
“तुमचं घड्याळ आहे?
प्लीज़, घ्या!” चौकटीचा लम्बू म्हणाला आणि
आपल्या घाणेरड्या हाताने घड्याळ रीम्स्कीपुढे केलं.
“ह्याच्याबरोबर ट्राममधे
नका बसू...” संयोजकाने मेकअपमैनला हळूंच पण प्रसन्नतेने म्हटलं.
पण बोक्याने आणखी एक कमाल
केला, जो घड्याळ्याच्या जादूपेक्षा कितीतरी पटींनी
चांगला होता. तो अचानक सोफ्यावरून उठला आणि मागच्या पंजांने चालंत ड्रेसिंग़
टेबलजवळ ठेवलेल्या तिपाईजवळ गेला; पुढच्या पंज्याने तिपाईवर
ठेवलेल्या काचेच्या मोट्ठ्या बाटलीचं झाकंण उघडून ग्लासमधे पाणी ओतलं, पाणी पिऊन झाल्यावर परंत झाकण लावलं आणि मेकअपच्या रुमालाने आपल्या मिश्या
पुसल्या.
ह्यावेळेस कोणाच्यांच
तोंडून आवाजदेखील नाही निघाला, सगळ्यांचे तोंड
उघडेच राहिले, फक्त मेकअपमैन खिदळला, “ओह,
कमाल आहे!”
तिस-यांदा घंटी वाजली.
सगळे लोक अन्य चमत्कारांच्या आशेने मेकअपरूम मधून निघून गेले.
एका मिनिटाने दर्शक हॉलमधे
लाइट्स बंद झाले, पडद्याच्या समोर, खाली लावलेल्या लैम्पचा लाल प्रकाश येऊं लागला. पडद्याच्या मागून स्टेजवर
आला एक जाडा, लहान मुलासारख्या प्रसन्न चेह-याचा, चिक्कण दाढी केलेला, चुरगळलेला चोगा आणि घाणेरडे
कपडे घातलेला माणूस. हा होता सम्पूर्ण मॉस्कोला परिचित आणि प्रिय असलेला संयोजक
जॉर्ज बेंगाल्स्की.
“तर,
नागरिक हो...” बेंगाल्स्कीने मुलांसारखं स्मित करंत म्हणायला
सुरुवात केली, “आता आपल्या समोर येणार आहेत...” आणि
बेंगाल्स्कीने आपलंच म्हणणं मधेच तोडंत दुस-यांच स्टाइलमधे म्हणायला सुरुवात केली,
“मी बघतोय की तिस-या सेक्शनमधे दर्शकांची संख्या वाढलीये. आमच्याकडे
आज अर्धं मॉस्को आलंय! काही दिवसांपूर्वी मी आपल्या एका मित्राला भेटलो होतो. मी
विचारलं : “आजकाल तू आमच्याकडे कां येत नाहीस? काल आमच्याकडे
अर्धं मॉस्को आलेलं होतं.” त्याने उत्तर दिलं, “मी उरलेल्या
अर्ध्या मॉस्कोंत राहतो.” बेंगाल्स्की थोडा थांबला, ह्या अपेक्षेने, की लोक हसतील, पण जेव्हां कोणीच नाही हसलं तेव्हां तो म्हणाला, “तर,
प्रस्तुत आहे प्रसिद्ध परदेशी कलाकार मिस्टर वोलान्द - आपल्या
काळ्या जादूचे कमाल घेऊन आलेले! पण, आपल्याला तर माहीतंच
आहे...” बेंगाल्स्की विद्वत्तापूर्ण स्मित करंत म्हणाला, “की
काळ्या जादूच अस्तित्व नसतं, तो फक्त एक भ्रम आहे; आणि मिस्टर वोलान्दला सगळ्या प्रकारचे जादू अवगत आहेत; जे ह्या कार्यक्रमाच्या सगळ्यांत मनोरंजक भागांत प्रकट होईल – हा
कार्यक्रम आहे जादूच्या कलाकौशल्याचे रहस्योद्घाटन, आणि
आम्हां सगळ्यांना ह्या प्रक्रियेंत आणि तिच्या रहस्योद्घाटनाचे कुतूहल आहे,
म्हणून मी वोलान्द महाशयांना आमंत्रित करतो...”
येवढं म्हणून
बेंगाल्स्कीने आपल्या दोन्ही हातांना अभिवादनाच्या मुद्रेंत हलवंत पडद्याकडे इंगित
केलं, आणि हलका आवाज करंत पडदा उघडला.
जादूगाराचं आपल्या उंच
किडकिडीत सहायक आणि मागच्या पंजांवर चालंत येणा-या बोक्याबरोबर प्रवेश करणं जनतेला
खूप आवडलं.
“खुर्ची!” वोलान्दने हळूंच
आज्ञा दिली, आणि लगेच माहीत नाही कुठून आणि कशी
स्टेजवर एक खुर्ची प्रकट झाली, जिच्यावर बसून जादुगार
म्हणाला, “मला हे सांग, लाडक्या फागोत,”
वोलान्द चौकटीच्या लम्बूकडे वळला, ज्याचं
स्पष्ट आहे की करोव्येव व्यतिरिक्त आणखी एक नाव होतं, “तुला
काय वाटतंय, मॉस्कोची जनता खूप बदललीयं?”
जादुगाराने जनतेकडे बघितलं,
जिला हवेतून प्रकट झालेली खुर्ची बघून धक्का बसला होता.
“बरोबर म्हणतांय,
साहेब!” फागोत-करोव्येवने पण हळूंच आवाजांत उत्तर दिलं.
“तू बरोबर म्हणतोस,
लोक खूप बदललेत; बाहेरून, मला वाटतं, अगदी तसेच, जसं हे
शहर बदललंय. त्यांच्या वेशभूषेबद्दल तर काही म्हणायलांच नको, पण आता दिसतांत ह्या...काय म्हणतांत...ट्रामगाड्या, मोटरगाड्या...”
“बसेस,”
फागोत नम्रतेने पुढे म्हणाला.
जनता लक्षपूर्वक हे संभाषण
ऐकंत होती, ह्या भावनेने की ही जादूच्या
प्रयोगांची प्रस्तावना आहे. रंगमंचाचा पार्श्वभाग कलाकार आणि रंगकर्मी ह्यांनी
खचाखच भरला होता आणि त्यांच्यामधे रीम्स्कीचा तणावग्रस्त, निस्तेज
चेहरा दिसंत होता.
बेंगाल्स्की,
जो स्टेजच्या एका कोप-यावर होता, बेचैन
व्हायला लागला; त्याने एक भुवई वर केली आणि ह्या रिकाम्या
क्षणाचा फायदा घेत म्हणाला, “परदेशी कलाकार मॉस्कोने विस्मित
झालेले वाटतांत, जे तांत्रिकदृष्ट्या खूप विकसित झालंय,
आणि मॉस्कोवासियांनीसुद्धां त्यांना प्रभावित केलंय,” इथे बेंगाल्स्कीने दोनदा स्मितहास्य केलं : पहिलांदा – खाली बसलेल्या
दर्शकांसाठी, आणि दुस-यांदा – बाल्कनीत बसलेल्या लोकांसाठी.
वोलान्द,
फागोत आणि बोक्याने आपले चेहरे संयोजकाकडे वळवले.
“मी काय विस्मयाचं
प्रदर्शन केलंय?” जादुगाराने फागोतला विचारलं.
“बिल्कुल नाही,
महाशय, तुम्हीं कोणत्याही प्रकाराच्या
विस्मयाचं काहीच प्रदर्शन केलेलं नाहीये,” त्याने उत्तर
दिलं.
“मग, हा माणूस काय म्हणतोय?”
“ते तर तो असंच खोटं
बोललाय!” खणखणीत आवाजांत सम्पूर्ण थियेटरला सम्बोधित करंत चौकटीवाला सहायक म्हणाला
आणि बेंगाल्स्कीकडे वळून तो पुन्हां म्हणाला, “अभिनंदन,
तुमचं, महाशय खोटारडे!”
बाल्कनीतून हसण्याचे आवाज
घुमले. बेंगाल्स्कीने थरथरंत आपले डोळे दाखवले.
“पण मला,
स्पष्टंच आहे, तेवढी उत्सुकता नाहीये बसेसमधे,
टेलिफोन्समधे आणि इतर ...”
“उपकरणांमधे!” लम्बू
म्हणाला.
“अगदी बरोबर,
धन्यवाद!” हळू-हळू भारी-भरकम आवाजांत जादुगार म्हणाला, “मला ह्या गोष्टींत उत्सुकता आहे, की काय ह्या
लोकांच्या अंतरात्म्यांतदेखील काही परिवर्तन झालंय?”
“हो,
महाशय, हा फार महत्वपूर्ण प्रश्न आहे.”
स्टेजच्या पार्श्वभागांत
लोक डोळ्यांच्या कोप-यांतून एकमेकांकडे बघूं लागले आणि खांदे उचकावूं लागले.
बेंगाल्स्कीचा चेहरा लाल झाला होता. रीम्स्कीचा पिवळा,
पण तेवढ्यांत हॉलमधे सुरूं झालेल्या उत्सुकतेकडे बघून जादुगार म्हणाला,
“आपण बरंच बोललोय, प्रिय फागोत, आणि जनता ‘बोर’ होऊं लागलीय.
चल, सुरुवातीला काही सोपांसा खेळ दाखवून दे.”
हॉलमधे थोडीशी हालचाल
झाली. फागोत आणि बोका वेगवेगळ्या दिशांकडे सरकले. फागोतने आपली बोटं नाचवंत म्हटलं,
“तीन, चार!” आणि हवेतूंन एक पत्त्यांची गड्डी
अवतरली. तिला फेटून त्याने अश्या प्रकारे सोडलं, की ती एका
रिबिनसारखी दिसूं लागली. बोक्याने ह्या रिबिनीला पकडून परंत सोडलं. फागोतने
घरट्यांत दुबकलेल्या पक्ष्यासारखं आपलं तोंड उघडलं आणि सापासारख्या वळवळंत
असलेल्या रिबिनीचा एक-एक पत्ता गिळून टाकला.
बोक्याने मागचा उजवा पंजा
फिरवंत झुकून जनतेचं अभिवादन केलं. हॉल टाळ्यांचा गडगडाटाने दुमदुमून गेला.
“अप्रतिम,
शाबास!” लोक ओरडले.
फागोतने खाली बसलेल्या
लोकांकडे बोट दाखवलं आणि त्यांना संबोधित करंत म्हणाला:
“मेहेरबान,
कदरदान! ह्या वेळेस पत्त्यांची गड्डी सातव्या रांगेत बसलेल्या
पार्चेव्स्कीच्या खिशांत आहे – तीन रूबलचा नोट आणि कोर्टाच्या त्या समनच्या मधे,
ज्यांत त्यांना मैडम जेल्कोवायाचं कर्ज फेडण्याच्या संबंधांत
बोलावलंय.”
समोरच्या रांगांमधे
बसलेल्या लोकांमधे गडबड व्हायला लागली, लोकं
उठून-उठून बघायला लागले आणि शेवटी एका नागरिकाने, ज्याचं नाव
खरंच पार्चेव्स्की होतं, विस्मयाने आणि भीतीने आपल्या
खिशांतून पत्त्यांची गड्डी काढली आणि तिला हवेंत फिरवूं लागला, हे न समजल्याने की तिचं करायचं तरी काय.
“ती तुमच्या जवळंच राहू
द्या, आठवणीसाठी!” फागोत ओरडला, “काल संध्याकाळी डाइनिंग टेबलवर तुम्हीं खरंच सांगंत होता की जुगाराशिवाय
मॉस्कोंत राहणं कठीण झालं असतं.”
“नेहमीचीचं चाल आहे!”
बाल्कनीतून आवाज आला, “हा त्यांचाच माणूस आहे.”
“तुम्हांला असं वाटतंय?”
डोळे बारीक करून बाल्कनीकडे बघंत फागोत गरजला, “मग तर तुम्हीं सुद्धां आमचेच आहांत, कारण की
पत्त्यांची गड्डी आतां तुमच्या खिशांत आहे!”
बाल्कनींत काही हालचाल
झाली आणि एक आश्चर्यमिश्रित किंचाळी ऐकूं आली.
“अगदी बरोबर! त्याच्यांच
जवळ आहे! ही घ्या, ही आहे! थांब! हो, ही तर दहा-दहा रूबल्सच्या नोटांची गड्डी आहे!”
खाली बसलेल्या लोकांनी
वळून बघितलं. बाल्कनींत बसलेल्या एका माणसाच्या खिशांतून बैंकेत बनवलेली गड्डी
निघाली, जिच्यावर लिहिलं होतं “एक हज़ार
रूबल”.
आजूबाजूला बसलेले लोकं
त्याच्यावर ओणवे होऊं लागले, आणि तो
घबारलेल्या अवस्थेत बैंकेकडून चिकटवलेला कागद फाडून हे बघण्याचा प्रयत्न करंत होता,
की नोट खरे आहेत की जादूचे.
“अरे देवा! खरे आहेत!
दहा-दहा रूबल्सचे नोट!” बाल्कनीतूंन प्रसन्न किंचाळ्या ऐकूं आल्या.
“माझावरसुद्धां हा
पत्त्यांचा चमत्कार करा,” हॉलच्या मधोमध बसलेला एक
जाडा ओरडला.
“ओह,
आनंदाने!” फागोतने उत्तर दिलं, “पण फक्त
तुमच्यावरंच कां? आपण सगळेच ह्या खेळांत कां सामिल होऊं
नये!” आणि त्याने हुकुम दिला, “कृपा करून वर बघा! एक!”
त्याच्या हातांत पिस्तौल दिसूं लागली, तो ओरडला, “दोन!” पिस्तौलची नळी वर गेली. तो ओरडला, “तीन!”
पिस्तौल चालायचा आवाज आला आणि हॉलमधे पांढ-या कागदांचा पाऊस पडूं लागला. ते हॉलमधे
तरंगत होते; इकडे-तिकडे, बाल्कनीवर,
ऑर्केस्ट्रावर, स्टेज वर...काही क्षणानंतर
नोटांचा हा पाऊस आणखी दाट होत-होत खुर्च्यांपर्यंत पोहोचून गेली. दर्शक त्यांना
पकडूं लागले.
शैकडो हात उचलले गेले;
दर्शकांनी नोटांच्या आर-पार प्रकाशित स्टेजकडे पाहिलं आणि
त्यांच्यावर छपलेल्या चिन्हांना लक्षपूर्वक बघितलं – ते खरे होते. नोटांच्या वासाने
तर काही शंकांच नाही सोडली: हा ताज्या छापलेल्या नोटांचा सुगंध होता. आधी
प्रसन्नतेने आणि मग विस्मयाने सम्पूर्ण थियेटर व्यापून गेलं. चारीकडून आवाज येत
होते, “नोट, नोट!” विस्मयजनित
किंचाळ्या, “आह, आह!” ऐकूं येत होत्या.
आणि खिदळणंसुद्धा ऐकूं येत होतं. कोणी-कोणीतर रांगंत-रांगंत खुर्च्यांच्या खाली
उडून पोहोचलेल्या नोटांना पकडंत होतं. बरेंच लोक खुर्च्यांवर उभे राहिले आणि
तरंगणा-या सैतान नोटांना पकडूं लागले. पोलिसचे शिपाई दंग झाले होते आणि कलाकार निःसंकोच
स्टेजच्या पार्श्व भागांतून निघून बाहेर येऊं लागले.
ड्रेस सर्कलमधे एक आवाज
ऐकूं आला, “तू हिला कां पकडतोयं? ही माझी आहे. माझ्याकडे उडून आली होती!” आणि दुसरा आवाज म्हणाला, “धक्का कशाला मारतोयंस? मी पण धक्का मारीन!”
तेवढ्यांत हॉलमधे पोलिसवाल्याची हैट दिसली. हॉलमधून कोणालातरी पकडून नेलं.
लोकांची उत्तेजना वाढंतच
होती आणि जर फागोतने हवेंत फूक मारून नोटांचा हा पाऊस थांबवला नसता,
तर न जाणे ती कोणच्या थराला पोहोचली असती.
दोन तरूणांनी अर्थपूर्ण
नजरेने एकमेकांकडे पाहिलं आणि हसंत आपल्या जागेवरून उठून सरंळ जलपानगृहाकडे
निघाले. थियेटरमधे धिंगाणा चालू होता, सगळ्यांच
दर्शकांच्या डोळ्यांत चमक होती. माहित नाही हे कसं थांबलं असतं, जर बेंगाल्स्की हिम्मत करून आपल्या जागेवरून नसतां उठला. स्वतःवर नियंत्रण
ठेवंत आधी त्याने सवयीनुसार आपले हात चोळले, आणि खणखणीत
आवाजांत म्हणाला, “तर, नागरिक हो,
आत्तांच आपण सामूहिक सम्मोहनाचे एक उदाहरण पाहिले, हा एक वैज्ञानिक प्रयोग होता, जो हे सिद्ध करंत होता,
की कोणत्याही प्रकारचा जादू, कोणत्याही
प्रकारचा चमत्कार नसतोंच. आम्हीं वोलन्द महाशयला विनंती करतो की ह्या प्रयोगामागचं
रहस्य आम्हांला समजावून सांगावं. आतां, नागरिक हो, तुम्हीं बघाल की हे, नोटांसारखे कागद तसेच गायब
होतील, जसे ते प्रकट झाले होते.”
त्याने टाळी वाजवली,
पण कोणीचं त्याचा साथ नाही दिला. त्याच्या चेह-यावर विश्वासपूर्ण
स्मित होतं, पण डोळ्यांमधे ह्या विश्वासाचा मागमूसही नव्हता,
त्यांच्यांत दिसंत होती प्रार्थना.
जनतेला बेंगाल्स्कीचं भाषण
आवडलं नाही. हॉलमधे पूर्ण शांतता पसरली, जिला
तोडलं चौकटीच्या लम्बूने.
“हे पुन्हां खोटं
बोलण्याचं उदाहरण आहे...” तो जो-याने म्हणाला, “नागरिक
हो! नोट खरे आहेत!”
“हुर्रे!” वरून कुठून तरी
भारी-भरकम आवाज आला.
“पण हा,”
फागोतने बेंगाल्स्कीकडे बोट दाखवंत म्हटलं, “मला
त्रास देतोय. सतत मूर्खासारख बोलतंच चाललाय. त्याला कुणी विचारो, किंवा न विचारो, खोट्या-नाट्या बडबडीने सगळ्या ‘शो’चा विचका करतोय! ह्याचं काय करायला पाहिजे?”
“ह्याचं
डोकंच छाटलं पाहिजे,” बाल्कनीतून कोणीतरी गंभीरतेने सुचवलं.
“तुम्हाला काय वाटतं? हे चांगल होईल?” फागोत ह्या मूर्खतापूर्ण
प्रस्तावावर खिदळला, “ह्याचं डोकं छाटावं? काय कल्पना आहे! बेगेमोत!” तो बोक्याकडे बघून ओरडला, “असंच कर! एक, दोन, तीन!!”
आणि,
एक अप्रत्याशित घटना घडली. बोक्याचे काळे केस उभे राहिले, तो भीतीदायक आवाजांत ओरडला, मग त्याने आपल्या अंगाला
गोल-गोल केलं आणि बेंगाल्स्कीच्या छातीकडे चित्त्यासारखी झेप घेतली, तिथून त्याच्या डोक्यावर उडी मारली. संयोजकाची मान आपल्या पंजांनी कुरतडंत
त्याने दोन झटक्यांत त्याच्या भरलेल्या मानेपासून डोकं तोडून घेतलं.
थियेटरमधे बसलेले अडीच
हजार लोक एका आवाजांत किंचाळले. तुटलेल्या नसांमधून कारंज्यासारखं उसळंत रक्त खाली
पडून कोट आणि अंगरख्याला भिजवंत होतं. डोकं नसलेलं धड आपल्या पायांवर काही वेळ उभं
राहिलं आणी मग लटपटंत जमिनीवर बसून गेलं. हॉलमधे महिलांच्या उन्मादयुक्त किंचाळ्या
ऐकूं येत होत्या. बोक्याने डोकं फागोतला दिलं, ज्याने
त्याला केसांने धरून दर्शकांना दाखवलं, आणि हे डोकं एकदम
ओरडलं, “डॉक्टरला बोलवा!”
“तू पुन्हां प्रत्येक
गोष्टींत आपलं खोटारडं नाक खुपसशील?” फागोतने रडंत
असलेल्या डोक्याला दरडावून विचारलं.
“नाही,
कधींच नाही!” डोकं भसाड्या आवाजांत उत्तरलं.
“देवासाठी,
त्याला नका छळूं!” अचानक बॉक्समधून एका महिलेचा आवाज ऐकूं आला,
आणि जादुगार त्या दिशेकडे वळला.
“तर,
नागरिक हो, ह्याला माफ़ करायचं कां?” फागोतने हॉलकडे बघंत विचारलं.
“माफ करून टाका! माफ़ करून
टाका!” आधी फक्त महिलांचे आवाज आले. नंतर त्यांत पुरुषांचे आवाजपण मिसळले.
“काय हुकूम आहे,
आका?” फागोतने नकाबपोशाला विचारलं.
“जाऊं दे.” तो विचार करंत
उत्तरला, “हे लोकं साधारण माणसांसारखेच
आहेत. पैश्यावर प्रेम करतांत, पण हे तर नेहमीच होत
आलंय...मानवाला पूर्वीपासूनंच पैसा प्रिय आहे, मग तो कशाचा
पण बनवलेला असो...चमड्याचा असो, किंवा कागदाचा, पितळेचा असो, किंवा सोन्याचा. क्षुद्रपणा आहे,
आणखी काय...पण कधी-कधी त्यांच्या हृदयांतपण दयाभावना जागृत
होते...साधारण लोकं...थोडक्यांत सांगायचं तर पूर्वीच्या लोकांसारखेच
आहेत...क्वार्टर्सच्या समस्येने त्यांना बिघडवून टाकलंय...” त्याने आदेश दिला,
“डोकं परंत ठेवून दे.”
बोक्याने अत्यंत कुशलतेने
डोकं परंत मानेवर ठेवलं आणि ते आपल्या जागेवर असं बसलं जसं काही तिथून कधी निघालंच
नव्हतं. आश्चर्याची गोष्ट तर ही होती की जखमेचं काही चिन्हही शिल्लक नाही उरलं.
बोक्याने आपल्या पंजांने बेंगाल्स्कीचा कोट आणि अंगरखा झटकून टाकला. त्यावरचे
रक्ताचे डागसुद्धां गायब झाले.
फागोतने बसलेल्या
बेंगाल्स्कीला उभं केलं. त्याच्या अंगरख्याच्या खिशांत नोटांची एक गड्डी टाकली आणि
त्याला हे म्हणंत स्टेजवरून घालवून दिलं, “इथून
निघून जा! तूं नसलांस की जास्त चांगलं वाटतं!”
उगीचंच इकडे-तिकडे बघून
अडखळंत-अडखळंत संयोजक अग्निशामक यंत्राजवळ पोहोचलांच होता,
की त्याची तब्येत बिघडली, तो दयनीय स्वरांत
ओरडला, “डोकं, माझं डोकं!”
काही लोक त्याच्याजवळ
धावले, ज्यांत रीम्स्कीपण होता. सूत्रधार रडंत होता,
हातांनी हवेंत जणु काही पकडंत होता आणि बडबडंत होता:
“माझं डोकं परंत द्या!
परंत द्या डोकं! क्वार्टर घेऊन घ्या, पेन्टिंग्स घेऊन
घ्या, फक्त डोकं परंत द्या!”
चपरासी डॉक्टरला बोलवायला
धावला. बेंगाल्स्कीला मेकअपरूम मधे सोफ़्यावर झोपवण्यांचा प्रयत्न केला,
पण तो उठून-उठून पळंत होता. तो हळू-हळू आक्रामक होत चालला होता.
एम्बुलेन्स बोलवावी लागली. जेव्हां दुर्दैवी संयोजकाला तिथून घेऊन गेले, तेव्हां रीम्स्की परंत स्टेजकडे धावला. त्याने बघितलं की तिथे अजूनही
नवीन-नवीन विचित्र गोष्टी होतायंत. हो, आता, कदाचित, थोड्यावेळा पूर्वी, जादुगार,
आपल्या रंग उडालेल्या खुर्चीबरोबर गायब झालेला होता, पण दर्शकांना कदाचित ह्याची जाणीवंच नव्हती झाली. त्यांचं लक्ष फागोतच्या
विचित्र हालचालीनेच वेधलं होतं.
आणि फागोतने तडफडंत
असलेल्या संयोजलाला पाठवल्यानंतर दर्शकांना म्हटलं:
“चला,
शेवटी ह्या ‘बोरिंग’ माणसापासून
मुक्ति मिळाली. चला, आता ‘मीना-बाजार’
सुरूं करूं या!”
त्याच क्षणी स्टेजवर फारसी
गालिचे प्रकट झाले, मोट्ठे-मोट्ठे आरसे दिसूं
लागले, त्यांच्यावर हिरवा-हिरवा प्रकाश पडंत होता; आरश्यांच्या अधे-मधे होते शो-केसेस. ज्यांच्यांत वेगवेगळ्या रंगाचे आणि
डिज़ाइन्सचे सुरेख फारसी पोषाक लटकंत होते. दुस-या शो-केसेसमधे शैकडो टोप्या होत्या
– महिलांसाठी – पंखांच्या, बिनपंखांच्या, घुंघरू लावलेल्या, बिना घुंघरूच्या. शैकडो जोडे होते
– काळे, पांढरे, पिवळे, चामड्याचे, उंच टाचेचे, लेस
लावलेले, स्टोन्स लावलेले. जोड्यांच्या शोकेसेसच्या मधे
दिसंत होते सेंटचे शो केसेस, ज्यांत ठेवलेल्या क्रिस्टलच्या
कुप्यांमधे प्रकाशाचे किरण लपा-छिपी खेळंत होते. लेडीज़ पर्सेसचा तर जणु पहाडंच
लागलेला होता – चित्त्याच्या चामड्याचे, रेशमी, मखमली, त्यांच्या मधे लाम्ब-सोनेरी लिपस्टिक-केसेसचा
ढेर लागला.
सैतान जाणे कुठून लाल केस
असलेली एक सुंदर मुलगी, काळा ड्रेस घालून स्मित करंत
सेल्सगर्लच्या स्टाइलमधे शो-केसेसजवळ टपकली. मुलगी फारंच सुरेख होती...फक्त तिच्या
मानेवर असलेल्या जखमेच्या खुणेला सोडलं तर तिच्यांत काहीही न्यून नव्हतं.
फागोतने अत्यंत गोड हास्य
पसरंत म्हटलं की हे दुकान जुन्या पोषाकांच्या आणि जोड्यांच्या बदल्यांत नवीन पोषाक
आणि नवीन जोडे देणारेय, पैरिसच्या फैशनचे. प्रसाधन
सामग्री आणि पर्सेस बद्दलसुद्धां त्याने हेच सांगितलं.
बोका मागच्या पंजांवर
चालूं लागला, पुढच्या पंजांने त्याने दार
उघडायच्या मुद्रेचा अभिनय केला.
मुलगी गोड,
पण किंचित भसाड्या आवाजांत काहीतरी गाऊ लागली, जे कळंत नव्हतं. हो, हॉलमधे बसलेल्या महिलांचचे
हावभाव बघून कळंत होतं की हे बरंच मनोरंजक होतं:
“गेर्लेन,
शानेल नंबर पाच, मित्सुको, नार्सिस, नुआर, ईवनिंग ड्रेसेस,
कॉकटेल पार्टीसाठी ड्रेस...”
फागोत दूर सरकला,
बोक्याने अभिवादन केलं आणि मुलीने काचेचे शोकेसेस उघडले.
“या!” फागोत गरजला,
“संकोच करू नका, लाजू नका!”
जनता बुचकळ्यांत पडली,
पण आत्तापर्यंत कुणीच स्टेजवर यायचं धाडंस नव्हतं केलं. शेवटी
दहाव्या रांगेतून सावळ्या रंगाची एक मुलगी स्मित करंत उठली, जणू
तिला ह्या सगळ्याची काहीच फिकिर नव्हती, तिला फक्त असंच
बघायचं होतं; मुलगी बाजूला असलेल्या पाय-या चढून स्टेजवर
आली.
“शाबाश!” फागोत ओरडला,
“पहिल्या पाहुण्याचं स्वागत आहे! बेगेमोत, खुर्ची!
जोड्यांपासून सुरुवात करूं, मैडम!”
सावळी मुलगी खुर्चीवर बसली,
आणि फागोतने लगेच तिच्यापुढे जोड्यांचा ढीग लावला. त्या श्यामलेने
आपल्या उजव्या पायाचा जोडा काढला, गुलाबी जोडा घालून बघितला,
गालिच्यावर एक-दोनदा पायाने धम्-धम् केलं, टाच
बघितली.
“हे चावणांरतर नाही?”
तिने विचारमग्न मुद्रेने विचारलं.
फागोतला दुःख झालं,
“काय म्हणताय!” बोक्यालासुद्धां आवडलं नाही, त्यानेपण
रागाने म्याऊँ-म्याऊँ केलं.
“मी ही जोडी घेते,
महाशय,” सावळ्या मुलीने अत्यंत गरिमेने
दुसरापण जोडा घालंत म्हटलं.
तिचे जुने जोडे पडद्यामागे
फेकले गेले, आणि ती सुद्धां फागोत आणि लाल
केसांच्या मुलीसोबंत पडद्याच्या मागे गेली, फागोतच्या हातांवर
हैंगरवर लटकलेले अनेक फैशनेबल ड्रेसेस होते. बोका किंचित संकोचला, मदत करूं लागला आणि भाव खाण्यासाठी त्याने आपल्या मानेंवर एक टेप लटकावून
घेतला.
एक मिनिटाने ती असा पोषाक
घालून आली, की लोकांने आपाआपल्या हृदयावर हात
ठेवले. ही बहाद्दर मुलगी आश्चर्यकारकपणे सुंदर दिसंत होती. ती आरश्यासमोर थांबली,
तिने आपले उघडे खांदे बघितले, केसावर हात
फिरवला आणि वळून आपली पाठ बघूं लागली.
आमची फर्म आठवणीसाठी
तुम्हांला ही भेट देतेय,” फागोतने तिला सेंटची कुपी ठेवलेला
डबा देत म्हटलं.
“धन्यवाद!” सावळ्या मुलीने
म्हटलं आणि ती आपल्या सीटकडे जाऊ लागली. जोपर्यंत ती चालंत होती,
दर्शक उचकून-उचकून त्या डब्याकडे बघंत होते.
आता तर चारी बाजूंनी
स्टेजवर महिलांची गर्दी येऊं लागली. ह्या लोंढ्यांत, उत्तेजनेच्या
वातावरणांत, हास्यांत, खिदळण्यांत आणि
उसास्यांमधे एका पुरुषाचा आवाज ऐकूं आला : “मी तुला नाही जाऊ देणार!” नंतर बाईचा
आवाज आला, “तानाशाह, दुष्ट! आह,
माझा हात तर नको पिरगळूं!”
महिला पडद्यामागे गायब होत
होत्या, आपला घातलेला ड्रेस तिथे फेकून
नवीन पोषाकांत बाहेर येत होत्या. सोनेरी पायाच्या तिपायांवर महिलांची मोट्ठी रांग
बसली होती, ज्या नवीन जोडे घालून-घालून खूप ताकदीने गालीच्यावर
पाय आपटंत होत्या. फागोत गुडघ्यांवर उभा राहून जोडे चढवायला मदत करंत होता तर पर्सेस
आणि जोड्यांच्या ओझ्याने दमलेला बोका शो केसेसमधून जोडे काढून-काढून तिपाईपर्यंत
आणंत होता आणि पुन्हां शोकेसेसकडे परतंत होता.
मानेवर जखमेची खूण असलेली
मुलगी अधून-मधून दिसंत होती आणि शेवटी थकून ती फक्त फ्रेंच भाषेतंच बडबडू लागली.
आश्चर्याची गोष्ट ही होती, की तिने अर्धा
शब्द उच्चारतांच सगळ्या बायका, ज्यांना बिल्कुल फ्रेंच येत
नव्हती, त्यासुद्धां, तिचं म्हणणं
पूर्णपणे समजून जायच्या.
येवढ्यांत लवकर-लवकर
स्टेजवर येणा-या माणसाने सगळ्यांना चकित केलं. तो धावतंच स्टेजवर पोहोचला आणि
म्हणाला, की त्याच्या बायकोला फ्लू झालांय
म्हणून तो विनंती करतोय की तिच्यासाठीपण काही तरी देण्यांत यावे. हे सिद्ध
करण्यासाठी की तो खरंच विवाहित आहे, तो आपला पासपोर्ट
दाखवायलासुद्धां तयार होता. ह्या पत्नीप्रेमी पतीच्या विनंतीचं जोरदार हास्याने
स्वागंत झालं, फागोतने गरजंत म्हटलं की तो पासपोर्ट न बघतांच
ह्या माणसाच्या बोलण्यावर विश्वास करतोय आणि त्याने त्याला दोन रेशमी स्टॉकिंग्स
दिले. बोक्याने आपल्याकडून लिप्स्टिकची ट्यूब दिली.
ज्या महिलांना उशीर झाला
होता, त्या स्टेजकडे धावंत येत होत्या. स्टेजवरून
हसंत-हसंत भाग्यशाली महिला बॉल डान्सच्या वेश-भूषेंत, ड्रैगनचे
डिजाइन असलेल्या स्टॉकिंग्समधे, फॉर्मल ड्रेसमधे, एका भुवईवर झुकलेल्या टोपीमधे खाली उतरंत होत्या.
तेवढ्यांत फागोतने घोषणा
केली की उशीर झाल्यामुळे बरोब्बर एक मिनिटाने दुकान उद्या संध्याकाळपर्यंत बंद
करण्यांत येत आहे. आतां तर चेंगरा-चेंगरी आपल्या चरम सीमेवर पोहोचली. महिलांनी
सगळी लाज-शरम गुण्डालून ठेवली, संकोच न बाळगतां
त्या जे हातांत येईल तेच खेचून घेत होत्या. एक महिला वादळासारखी पडद्याच्या मागे
घुसली आणि तिथे आपला घातलेला पोषाक फेकून देऊन जो तिच्या हातांत आला, तोच ड्रेस घालून बाहेर आली. हा होता मोठाल्या फुलांचा गाउन, त्याबरोबरंच तिने सेन्टच्या दोन कुप्या पण हस्तगत केल्या.
बरोब्बर एक मिनिटानंतर
पिस्तौलचा आवाज ऐकूं आला. आरसे गायब झाले, शो-केसेस
आणि तिपाया जमिनीत गडप झाले, गालीचे आणि पडदा हवेंत विरघळून
गेले. शेवटी जुने जोडे आणि जुन्या पोषाकांचा पहाडसुद्द्धां गायब झाला आणि शिल्लक
राहिला फक्त स्टेज – गंभीर, रिकामा आणि नग्न.
आता ह्या घटनाक्रमांत एका
नवीन व्यक्तिने प्रवेश केला.
बॉक्स नं. 2 मधून एक जड,
खणखणीत, जोरदार आवाज आला : “तरीपण, कलाकार महाशय, आमची मागणी आहे की तुम्हीं लवकरंच
आपल्या ह्या युक्त्यांचं सगळ्यांसमोर रहस्योद्घाटन करावे; विशेष
करून तुम्हीं जो नोटांचा कमाल दाखवला, त्याबद्दल. त्याचबरोबर
संयोजकालासुद्धां स्टेजवर परंत आणावे. दर्शकांना त्याच्या भविष्याबद्दल काळजी
वाटते.”
हा आवाज होता आज
संध्याकाळचे प्रमुख पाहुणे असलेल्या अर्कादी अपोलोनोविच सिम्प्लेयारोवचा,
जे मॉस्कोच्या थियेटर्सच्या ध्वनि-संयोजन समितीचे प्रमुख होते.
अर्कादी अपोलोनोविच
बॉक्समधे दोन महिलांबरोबर बसले होते. एक होती मोठ्या वयाची,
फैशनेबल, महागडा ड्रेस घातलेली; आणि दुसरी – तरूण, आकर्षक, साध्या
ड्रेसमधे. पहिली, जसं की नंतर लिहिलेल्या रिपोर्टने स्पष्ट
झालं, त्यांची पत्नी होती आणि दुसरी,
एक दूरची नातेवाईक, जिला अभिनेत्री व्हायचं होतं. सरातोवहून
आलेली ही तरुणी अर्कादी अपोलोनोविचच्याचं फ्लैटमधे राहात होती आणि थियेटर जगतांला
तिच्याकडून खूप अपेक्षा होत्या.
“क्षमा करा!”
फागोत म्हणाला, “मी दिलगीर आहे. रहस्योद्घाटन करण्यासारखं
काहीच नाहीये, सगळं स्पष्ट आहे.”
“नाही,
माफ़ करा! रहस्योद्घाटनतर झालंच पाहिजे. त्याच्याशिवाय तुमच्या ह्या अद्भुत
युक्त्या बुचकळ्यांत टाकतायंत. दर्शक समुदाय मागणी करतोय की तुम्हीं त्यांना
समजवावे!”
“दर्शक समुदाय,”
सिम्प्लेयारोवला मधेच टोकंत तो धीट जोकर म्हणाला, “काहीच म्हणंत नाहीये. पण अर्कादी अपोलोनोविच,
तुमच्या ह्या हार्दिक विनंतीकडे लक्ष देत, मी,
रहस्योद्घाटन करूंनच टाकतो. पण त्यासाठी मला एक छोटासा प्रयोग
करायची अनुमति द्याल कां?”
“कां नाही,”
अर्कादी अपोलोनोविचने सौजन्यानेम्हटले, “पण
त्याचं सुद्धा रहस्य उलगडावं लागेल!”
“कबूल आहे,
कबूल आहे! तर, अर्कादी अपोलोनोविच, तुम्हांला विचारण्याची परवानगी द्या की काल संध्याकाळी तुम्हीं कुठे होते?”
ह्या अनपेक्षित आणि
धृष्ठतापूर्वक विचारलेल्या प्रश्नाने अर्कादी अपोलोनोविचच्या चेह-याचा रंग पार
उडाला.
“काल संध्याकाळी अर्कादी
अपोलोनोविच ध्वनि संयोजन समितीच्या मीटिंगमधे होते,” त्यांच्या
पत्नीने झटक्याने उत्तर दिलं आणि पुढे म्हणाली, “पण, मला समजंत नाहीये की ह्या प्रश्नाचा जादूच्या प्रयोगांशी काय संबंध आहे?”
“उई,
मैडम!” फागोतने ठासून म्हटलं, “स्वाभाविकंच आहे
की तुम्हांला नाही समजणार. मीटिंगबद्दल तुम्ही पूर्णपणे भ्रमांत आहांत. मीटिंगचा बहाना
करून, जी काल संध्याकाळी होणारंच नव्हती, अर्कादी अपोलोनोविचने आपल्या ड्राइवरला चिस्तीये प्रूदीत असलेल्या ध्वनि संयोजन
समितीच्या बिल्डिंगसमोर सुट्टी दिली (सम्पूर्ण थियेटर स्तब्ध झालं), आणि स्वतः बसने योलोखोव्स्काया रोडवर प्रवासी थियेटरची अभिनेत्री मीलित्सा
अन्द्रेयेव्ना पोकोबात्काकडे गेले. तिच्यासोबत ते जवळ-जवळ चार तास होते.”
“ओह!” स्तब्धतेंत कोणाचंतरी
विव्हळणं ऐकू आलं.
अर्कादी अपोलोनोविचची तरुण
नातेवाईक हळू, पण भयानक आवाजांत हसू लागली.
“आता समजलं!” ती म्हणाली,
“मला फार पूर्वीपासूनंच शंका होती. आतां तर स्पष्टंच झालं की ह्या प्रतिभाहीन
बाईला लुइज़ा1चा रोल कसा मिळाला!”
तिने अचानक आपल्या छोट्याश्या,
पण वजनदार छत्रीने अर्कादी अपोलोनोविचच्या डोक्यावर प्रहार केला.
धूर्त फागोत,
जो खरं म्हणजे करोव्येवपण होता, ओरडला,
“नागरिकहो, हा होता रहस्योद्घाटनाचा एक नमूना,
ज्यासाठी अर्कादी अपोलोनोविच इतका हट्ट करंत होते!”
“बेशरम,
तू अर्कादी अपोलोनोविचला हात लावायची हिंमत कशी केली?” अर्कादी अपोलोनोविचची बायको गरजली. ती आपल्या विशालकाय आकारांत बॉक्समधे उभी
होती. नातेवाइक तरुणीला सैतानी हास्याचा दुसरा झटका आला.
“माझ्याशिवाय त्यांना दुसरं
कोण हात लावूं शकतं?” आणि दुस-यांदा छत्री अर्कादी
अपोलोनोविचच्या डोक्यावर आपटल्याचा आवाज आला.
“पोलिस! हिला घेऊन जा,”
सिम्प्लेयारोवची बायको इतक्या भयंकर आवाजांत ओरडली की कित्येकांच्या
हृदयाची धडधड थांबली.
आणि तेव्हां बोका उडी मारून
माइक्रोफोनजवळ गेला आणि मानवी आवाजांत म्हणाला, “शो संपलाय!”
ऑर्केस्ट्रा! मार्च कापा!!”
मतिहीन झालेल्या निर्देशकाने
न उमजून, की काय करतोय, यंत्रवत् आपली छडी फिरवली, पण ऑर्केस्ट्रा सुरूं नाही
झाला, झंकार ऐकू नाही आला, साजिंद्यांनी
पकड नाही घेतली, फक्त बोक्याच्या घाणेरड्या विशेषणाप्रमाणे जणुं
कापंत असल्यासारखं, विसंगत मार्च वाजवणं सुरू केलं.
क्षणभरासाठी असं वाटलं,
की कदाचित कधीतरी, दक्षिणी ता-यांच्या खाली,
कोणच्यातरी कॅफ़ेंत काही-काही न समजणारे, धुंद,
तरंगत असल्यासारखे ह्या मार्चचे शब्द ऐकले होते:
आमच्या साहिबे आज़मला
आवडतांत पाळीव पक्षी
आणि आनंद देतांत त्यांना
सुंदर मुली!!!
कदाचित, असे कुठलेही
शब्दंच नव्हते, पण ह्याच चालीवर दुसरे कोणचे शब्द होते,
फालतू सारखे, पण मुख्य गोष्ट ही नाहीये. मुख्य
गोष्ट ही आहे, की वेराइटी थियेटरमधे ह्या प्रकारानंतर गोंधळंच
झाला. सिम्प्लेयारोवच्या बॉक्सकडे पोलिस धावले. काही मनचले बॉक्सच्या रेलिंगवर चढून
गेले, विषारी हास्याचे फेर ऐकूं येत होते. वेड्यासारख्या किंचाळ्या,
ज्या ऑर्केस्ट्राच्या सोनेरी प्लेट्सच्या खणखणाटांत दबून गेल्या.
स्पष्ट दिसंत होतं,
की स्टेज अचानक रिकामा झाला, फागोत आणि तो दुष्ट
बोका बेगेमोत हवेंत विलीन झाले, गायब झाले, अगदी तसेच जसा तो जादूगार काही वेळापूर्वी आपल्या रंग उडालेल्या खुर्चीसकट
गायब झाला होता.
***********