अट्ठावीस
करोव्येव आणि
बेगेमोतचं शेवटचं साहस
त्या सावल्या
होत्या,
की सादोवाया बिल्डिंगच्या भीतीने अर्धमेल्या लोकांना फक्त भास झाला
होता, हे सांगणं कठीण आहे. जर त्या खरंच सावल्या होत्या,
तर त्या कुठे गेल्या, हे कोणालाच माहीत नाही. त्या
कुठे वेगळ्या झाल्या, आम्हीं सांगू शकंत नाही, पण आम्हांला येवढं माहीत आहे, की सादोवायावर आग
लागल्यानंतर जवळ-जवळ पंधरा मिनिटांनी स्मोलेन्स्क मार्केटच्या ‘तोर्गसीन’1 नावाच्या स्टोअरच्या काचेच्या
दारासमोर एक चौकटीचा लम्बू प्रकट झाला, ज्याच्याबरोबर एक
लट्ठ काळा बोका होता.
येणा-या
जाणा-यांच्या गर्दीत सहजपणे मिसळून त्या नागरिकाने स्टोअरचा बाहेरचा दरवाजा मोठ्या
शिताफीने उघडला. पण तिथे असलेला छोटासा, लुकडा आणि अत्यंत तुसडा
दरबान त्याचा रस्ता अडवंत चिडखोरपणाने म्हणाला, “मांजरींबरोबर
आत जायची परवानगी नाहीये.”
“माफ करा,” लम्बूने खडबड्या आवाजांत म्हटलं आणि त्याने वाकडे-तिकडे बोटं असलेला हात
अश्याप्रकारे कानावर ठेवला, जणु त्याला कमी ऐकूं येतं,
“मांजरींबरोबर, हेच म्हटलं न तुम्हीं? पण मांजर आहे कुठे?”
दरबानाचे डोळे
विस्फारले,
हे स्वाभाविकंच होतं : कारण की नागरिकाच्या पायांजवळ काही
मांजर-बिंजर नव्हतं, तर त्याच्या मागून फाटकी टोपी घातलेला
एक जाड्या निघून स्टोअरमधे घुसून गेला, ज्याचं थोबाडं
मांजरीसारखं होतं. जाड्याच्या हातांत एक स्टोव होता. मानव द्वेषी दरबानाला,
न जाणे कां, ही जोडी आवडली नाही.
“आमच्याकडे फक्त
परकीय मुद्राचं चालते,” तो खुरखु-या, अस्तव्यस्त,
वाळवी लागल्यासारख्या, पिकलेल्या भिवयांखालून
डोळे दाखवंत म्हणाला.
“माझ्या लाडक्या,” लम्बूने तुटलेल्या चष्म्याच्या आंतून डोळे मिचकावंत गडगडंत म्हटलं,
“तुम्हांला कसं माहीत, की आमच्याकडे परकीय
मुद्रा नाहीये? तुम्हीं कपड्यांकडे बघून म्हणतांय का?
असं कधीही करू नको, माझ्या लाडक्या दरबाना!
तुम्हीं चूक कराल, फार मोठी चूक! जरा ख़लीफा हारून-अल-रशीदची2
गोष्ट पुन्हां वाचा, पण आत्ता, ह्या
वेळेस, ती गोष्ट बाजूला ठेवून, मला
तुम्हांला हे सांगायचंय, की मी तुमची कम्प्लेन्ट करीन आणि
तुमच्याबद्दल अश्या-अश्या गोष्टी सांगेन, की तुम्हांला ह्या
चकचकीत दारांच्यामागची आपली नौकरी सोडावी लागेल.”
“माझ्याकडे, कदाचित,
पूर्ण स्टोवभरून परकीय मुद्रा असेल,” बोक्या
सारखा जाड्यापण तावातावाने संभाषणांत सामील झाला. त्यांच्या मागे आत घुसण्यासाठी
लोकं धक्का-मुक्की करूं लागले होते आणि उशीर होत असलेला पाहून हल्ला करंत होते.
तिरस्कार आणि संदेहाने ह्या रानटी जोडीकडे बघंत दरबान बाजूला झाला आणि आपले परिचित,
करोव्येव आणि बेगेमोत, स्टोअरमधे घुसले.
सगळ्यांत आधी
त्यांनी चारीकडे बघितलं आणि खणखणीत आवाजांत, जी पूर्ण दुकानांत घुमली,
करोव्येव म्हणाला, “खूप चांगलं स्टोअर आहे!
खूप, खूप छान स्टोअर!”
लोक काउन्टरवरून
वळले आणि माहीत नाही कां, विस्मयाने त्या बोलणा-याकडे बघू
लागले, खरं म्हणजे त्याच्याजवळ स्टोअरची तारीफ करण्याचे अनेक
कारणं होते.
बंद शेल्फ्समधे
रंगीबेरंगी फुलांचे, महागडे, कापडाचे शैकडों
थान ठेवलेले होते. त्यांच्या मागे शिफॉन, जॉर्जेट डोकावंत
होते; सूटिंग मटीरियलपण होतं. मागच्या भागांत जोड्यांचे
डब्बे रचलेले होते, आणि अनेक महिला छोट्या-छोट्या खुर्च्यांवर
बसून उजव्या पायांत जुना, फाटका जोडा घालून आणि डाव्या पायांत
नवा, चकचकीत जोडा चढवून गालिच्यावर धम्-धम् करंत होत्या. दूर,
कुठेतरी आंत, पियानोचा, गाण्याचा
आवाज येत होता.
पण ह्या सगळ्या
मनमोहक डिपार्टमेन्ट्सला पार करंत करोव्येव आणि बेगेमोत कन्फेक्शनरी आणि
किराणामालाच्या डिपार्टमेन्ट्सच्या सीमारेषेवर पोहोचले. इथे खूप मोकळी जागा होती.
इथे रुमाल बांधून,
एप्रन घातलेल्या महिला काउन्टर्समागे नव्हत्या, जश्या त्या कपड्यांच्या डिपार्टमेन्टमधे होत्या.
एक ठेंगणा, एकदम
आयताकार माणूस, चिकणी दाढी असलेला, शिंगांचा
चष्मा लावून, नवीन हैट घालून, जी
बिल्कुल चुरगळलेली नव्हती, आणि जिच्यावर घामाचे डाग नव्हते,
फिकट जांभळा सूट आणि मुलांचे लाल हातमोजे घालून, शेल्फच्या जवळ उभा होता आणि काहीतरी हुकुम देत होता. पांढरा एप्रन आणि
निळी टोपी घातलेला सेल्समैन ह्या फिक्कट जांभळ्या सूटवाल्याच्या सेवेंत हजर होता.
एका धारदार चाकूने, जो लेवी मैथ्यूने चोरलेल्या चाकूसारखा
होता, तो रडक्या गुलाबी सेल्मन (रावस) मास्याची सापासारखी झिलमिल
करणारी कातडी काढत होता.
“हे
डिपार्टमेन्टसुद्धां शानदार आहे,” करोव्येवने गंभीरतेने म्हटलं,
“आणि हा परदेशीपण सुरेख आहे,” त्याने
सहृदयतेने त्या जांभळ्या पाठीकडे बोट दाखवंत म्हटलं.
“नाही, फागोत,
नाही,” बेगेमोतने विचार करण्याच्या मुद्रेत
म्हटलं, “तू, माझ्या मित्रा, चूक आहे...माझ्या मते ह्या जांभळ्या सज्जनाच्या चेह-यावर एखाद्या गोष्टीची
कमतरता आहे!”
जांभळी पाठ
थरथरली,
पण, कदाचित, संयोगवश,
नाही तर परदेशी तर करोव्येव आणि बेगेमोतचा रशियनमधे होणारा संवाद
समजू शकंत नव्हता.
“छांगली आहे?” जांभळ्या ग्राहकाने कठोरतेने विचारलं.
“विश्व प्रसिद्ध,” विक्रेत्याने मास्याच्या चामडीत चाकू गडवंत म्हटलं.
“छांगली – पसन्त ; वाईट
– नाही,” परदेशी गंभीरतेने म्हणाला.
“काय म्हणता!”
सेल्समैन उत्तेजनेने खिदळला.
आता आपले परिचित
परदेशी आणि त्याच्या सेल्मनपासून थोडं दूर, कन्फेक्शनरी
डिपार्टमेन्टच्या काउन्टरजवळ सरकले.
“खूप गरम आहे आज,” करोव्येवने लाल-लाल गालवाल्या तरुण सेल्सगर्लला म्हटलं आणि ह्यावर काहीही
उत्तर न मिळाल्यावर त्याने तिला विचारलं, “ह्या संत्र्याची
काय किंमत आहे?”
“तीस कोपेकचे एक
किलो,”
सेल्सगर्लने उत्तर दिलं.
“प्रत्येक वस्तू
इतकी महाग आहे,”
उसासा भरंत करोव्येवने शेरा मारला, “आह,
ओह, ऐख़,” त्याने थोडा
वेळ विचार केला आणि आपल्या मित्राला म्हणाला, “बेगेमोत,
खा!”
जाड्याने आपला
स्टोव बगलेंत दाबला, सगळ्यांत वरचं संत्रं तोंडांत टाकलं आणि खाऊन
गेला, मग त्याने दुस-याकडे हात वाढवला.
सेल्सगर्लच्या
चेह-यावर भीतीची लाट पसरली.
“तुम्हीं वेडे
झालांयत कां?”
ती ओरडली, तिच्या चेह-याची लाली गायब झाली
होती, “रसीद दाखवा! रसीद!” आणि तिच्या हातून कन्फेक्शनरीचा चिमटा
खाली पडला.
“लाडके, प्रिये,
सुन्दरी,” करोव्येव काउन्टरवर वाकून
सेल्सगर्लला डोळा मारंत भसाड्या आवाजांत म्हणाला, “आज
आमच्याकडे परकीय मुद्रा नाहीये...पण करणार काय? पण मी वचन
देतो, की पुढच्या वेळेस, सोमवारच्या
आधींच सगळं नगद चुकवून देईन. आम्हीं इथे, जवळंच राहातो,
सादोवायावर, जिथे आग लागलीये.”
बेगेमोतने तिसरं
संत्रं संपवलं,
आणि आता तो छानपणे रचलेल्या चॉकलेट बार्सच्या टॉवरमधे आपला पंजा
घुसवंत होता; त्याने सगळ्यांत खाली असलेला चॉकलेट बार बाहेर
काढला, ज्याने सगळे चॉकलेट बार्स खाली पडले; त्याने आपला चॉकलेट बार सोनेरी वेष्टनासकट गिळून टाकला.
फिश-काउन्टरचे
सेल्समैन जणु दगडाचे झाले, त्यांच्या हातातले चाकू तसेंच
राहिले; जांभळ्या ह्या दरोडेखोरांकडे वळला, तेवढ्यांत सगळ्यांनी बघितलं, की बेगेमोतने चूक
सांगितलं होतं : जांभळ्याच्या तोंडावर एखाद्या वस्तूची कमतरता नसून एक फालतूची
वस्तू होती – लटकंत असलेले गाल आणि गर-गर फिरणारे डोळे.
पूर्णपणे फिक्कट
झालेली सेल्सगर्ल घाबरून जो-याने ओरडली:
“पालोसिच3!
पालोसिच!”
ही किंकाळी ऐकून
कपड्यांच्या डिपार्टमेन्टमधून ग्राहक धावंत आले, पण बेगेमोत कन्फेक्शनरी
डिपार्टमेन्ट पासून सरकून आपला पंजा त्या ड्रममधे घुसवंत होता ज्याच्यावर लिहिलं
होतं, “स्पेशल केर्च हैरिंग4’, त्याने मीठ लावलेल्या दोन हैरिंग्स खेचून बाहेर काढल्या आणि गिळून गेला,
शेपट्या थुंकून दिल्या.
“पालोसिच!” ही
घाबरलेली किंकाळी कन्फेक्शनरी डिपार्टमेन्टमधून पुन्हां ऐकू आली, आणि
फिश-डिपार्टमेन्टचा बक-यासारखी दाढी असलेला सेल्समैन गुरगुरला, “तू काय करतोयस, दुष्टा?!”
पावेल योसिफोविच
लगेच तीरासारखा घटनास्थळावर धावला. हा त्या स्टोअरचा प्रमुख होता – पांढरा, चक्क
एप्रन घातलेला, जसे सर्जन लोक घालतात, त्याच्या
खिशांतून पेन्सिल डोकावंत होती. पावेल योसिफोविच, स्पष्टपणे,
एक अनुभवी व्यक्ती होता. बेगेमोतच्या तोंडांत तिस-या हैरिंगची शेपूट
बघून त्याने लगेच परिस्थितीचा आढावा घेतला, सगळं समजून घेतलं,
आणि त्या बदमाशांवर ओरडण्याऐवजी त्याने दूर कुठेतरी बघून हाताने खूण
केली आणि आज्ञा दिली:
“शिट्टी वाजवं!”
स्मोलेन्स्कच्या
कोप-यावर काचेच्या दरवाजातूंन दरबान बाहेर धावला आणि भयंकर शिट्टी वाजवूं लागला.
लोक ह्या बदमाशांच्या चारीकडे गोळा व्हायला लागले, आणि तेव्हां करोव्येवने
सूत्र आपल्या हातात घेतले.
“नागरिक हो!”
बारीक,
थरथरत्या आवाजांत तो ओरडला, “हे काय चाललंय?
आँ? तुम्हांला ह्याबद्दल विचारायची परवानगी
द्या! गरीब बिचारा माणूस,” करोव्येवने आपल्या आवाजांत आणखी
जास्त कम्पन उत्पन्न करंत म्हटलं आणि बेगेमोतकडे खूण केली, ज्याने
लगेच आपली मुद्रा दयनीय करून घेतली होती, “गरीब माणूस,
दिवसभर स्टोव दुरुस्त करंतो; तो उपाशी
होता...त्याच्याकडे परकीय मुद्रा कुठून येणार?”
ह्यावर साधारणपणे
शांत आणि संयत राहणा-या पावेल योसिफोविचने गंभीरतेने ओरडंत म्हटलं:
“तू
हे सगळं बंद कर!” आणि त्याने पुन्हां दूर कुठेतरी खूण केली,
अधीरतेने. तेव्हां दरवाज्याच्या जवळ शिट्ट्या आणखी जोराने वाजूं लागल्या.
पण पावेल
योसिफोविचच्या व्यवहाराने क्षुब्ध न होता करोव्येव बोलंत राहिला, “कुठून? मी तुम्हांला विचारतोय! तो भुकेने, तहानेने बेहाल आहे! त्याला गर्मी होतेय. ह्या होरपळंत असलेल्या माणसाने
स्वाद घेण्यासाठी एक संत्रं तोंडांत टाकलं. त्याची किंमत आहे
फक्त तीन कोपेक. आणि हे शिट्ट्या वाजवतायंत, जशा वसन्त ऋतूंत
जंगलांत कोकिळा कू-कू करतांत; पोलिसवाल्यांना त्रास देताहेत,
त्यांना आपलं काम नाही करू देत आहेत. आणि तो खाऊं शकतो? आँ?” आता करोव्येवने जांभळ्या जाड्याकडे खूण केली,
ज्याने त्याच्या चेह-यावर प्रचण्ड घाबरल्याचा भाव पसरला, “तो आहे कोण? आँ? कुठून आलाय?
कशाला? काय त्याच्याशिवाय आम्हांला कंटाळवाणं
वाटंत होतं? काय आम्ही त्याला बोलावलं होतं? निश्चितंच,” उपहासाने तोंड वाकडं करंत तो सम्पूर्ण
ताकदीने ओरडला, “तो, बघताय नं, शानदार जांभळ्या सूटांत, त्याचे खिसे परकीय मुद्रेने
गच्च भरलेयंत. आणि आमच्या साठी...आमच्या नागरिकासाठी! मला दुःख होतंय! दुःख! दुःख!5” करोव्येव विलाप करूं लागला, जसं प्राचीन काळांत लग्नांत बेस्ट-मैन करायचा.
ह्या
मूर्खपणाच्या,
असंबद्ध, पण राजनीतिक दृष्टीने धोकादायक
भाषणामुळे पावेल योसिफोविचला शेवटी राग आलांच, तो थरथरू
लागला, पण जरी हे खूप विचित्र वाटंत होतं, तरी चारीकडे जमलेल्या लोकांच्या डोळ्यांतून स्पष्ट दिसंत होतं, की लोकांना त्याच्याबद्दल सहानुभूती वाटूं लागलीये! आणि जेव्हां बेगेमोत
आपल्या कोटाची फाटलेली, घाणेरडी बाही डोळ्यांवर ठेवून
दुःखाने म्हणाला, “धन्यवाद, माझ्या
चांगल्या मित्रा. तू एका पीडित माणसाच्या मदतीला तर पुढे आलांस!” तेव्हाँ आणखी एक
चमत्कार झाला. एक अत्यंत सज्जन, शांत म्हातारा, ज्याने गरीबांसारखे, पण स्वच्छ कपडे घातले होते,
ज्याने कन्फेक्शनरी डिपार्टमेन्टमधून तीन पेस्ट्रीज़ विकंत घेतल्या होत्या,
एकदम नवीन रूपांत अवतरला. त्याच्या डोळ्यांतून जणु ज्वाळा निघू
लागल्या; त्याचा चेहरा लाल झाला, त्याने
पेस्ट्रीज़चं पैकेट जमिनीवर फेकून दिलं आणि ओरडू लागला, “खरंय!”
लहान मुलांसारख्या आवाजांत येवढं म्हटल्यावर त्याने ट्रे उचलला, त्यांतून बेगेमोतने मोडून टाकलेल्या ‘एफिल टॉवर’चे उरले-सुरले तुकडे फेकून दिले, ट्रे वर उचलला,
डाव्या हाताने परदेशी माणसाची टोपी खेचली, उजव्या
हाताने ट्रे त्याच्या डोक्यावर मारला. असा आवाज झाला, जणु
एखाद्या ट्रकमधून लोखण्डाचे पतरे फेकताहेत. जाड्या फक् झालेल्या चेह-याने केर्च
हेरिंगच्या ड्रममधे पडला, ज्यामुळे त्यातून खारंट पाण्याचा
फवारा निघाला.
तेवढ्यांत आणखी
एक चमत्कार झाला,
जांभळा माणूस ड्रममधे पडल्यावर स्पष्ट-शुद्ध रशियनमधे ओरडला,
“मारून टाकतील! पोलिस! मला डाकू मारताहेत!” स्पष्ट होतं, की अचानक लागलेल्या ह्या मानसिक धक्क्यानंतर आतांपर्यंत अनोळखी असलेल्या
भाषेवर त्याचा अधिकार झाला होता .
मग दरबानाची
शिट्टी थांबली, घाबरलेल्या ग्राहकांच्यामधून पोलिसच्या दोन टोप्या जवळ येताना
दिसल्या. पण चतुर बेगेमोतने स्टोवच्या तेलाने कन्फेक्शनरी डिपार्टमेन्टचं काउन्टर
अश्या प्रकारे भिजवायला सुरुवात केली, जश्या बादलीने पब्लिक बाथहाउसच्या बेंचा
भिजवतांत;
आणि ते आपणहून भडकलं. ज्वाळा वर धावली आणि तिने सम्पूर्ण
डिपार्टमेन्टला आवळून घेतलं. फळांच्या टोपल्यांवर बांधलेले लाल कागदाचे रिबिन्स जळून
गेले. सेल्सगर्ल्स किंचाळंत काउन्टरच्या मागून निघून धावू लागल्या आणि त्या बाहेर
निघाल्याबरोबर खिडक्यांवर टांगलेले पडदे जळूं लागले आणि फरशीवर सांडलेलं तेल जळू
लागलं. लोक एकदम ओरडून कन्फेक्शनरी डिपार्टमेन्टपासून दूर सरकले, आता अनावश्यक वाटंत असलेल्या पावेल योसिफोविचला चेंगरंत; आणि फिश-डिपार्टमेन्ट मधून आपल्या तीक्ष्ण चाकूंसकट सेल्समैनची भीड
मागच्या दाराकडे धावली. जांभळा नागरिक कसातरी ड्रममधून बाहेर निघाला. खारट पाण्याने पूर्ण चिम्ब झालेला तो सुद्धा धडपडंत त्यांच्यामागे धावला.
बाहेर निघणा-या लोकांच्या धक्क्याने काचेचे दरवाजे खणखणंत पडंत होते आणि फुटंत
होते. आणि दोघे दुष्ट – करोव्येव आणि बेगेमोत – माहीत नाही
कुठे चालले गेले, पण कुठे – हे समजणं कठीण आहे. मग प्रत्यक्षदर्शी
लोकांनी, जे अग्निकाण्डाच्या सुरुवातीपासून तोर्गसीनमधे हजर
होते, सांगितलं की ते दोन्हीं बदमाश छताला चिटकून-चिटकून
उडंत होते आणि मग लहान मुलांच्या फुग्ग्यांसारखे फुटून विखुरले. ह्यांत शंका आहे, की नक्की असंच झालं असेल, पण जे आम्हांला माहीत नाहीये, ते बस, नाही माहीत.
पण आम्हांला फक्त
इतकंच माहीत आहे की स्मोलेन्स्कवर झालेल्या घटनेच्या बरोबर एका मिनिटाने बेगेमोत
आणि करोव्येव ग्रिबोयेदोवच्या आत्याबाईंच्या घराजवळच्या त्या रस्त्याच्या फुटपाथवर
दिसले,
ज्यावर दुतर्फा झाडं होते. करोव्येव जाळीच्या जवळ थांबला आणि
म्हणाला, “ब्बा! हो, हे लेखकांचं भवन
आहे. बेगेमोत, माहीत आहे कां, मी ह्या
भवनाची खूप तारीफ ऐकली आहे. ह्या घराकडे लक्ष दे, माझ्या मित्रा!
हा विचार किती चांगला वाटतो, की ह्या छताखाली येवढी योग्यता
आणि बुद्धिमत्ता दडलेली आहे आणि परिपक्व होत आहे!”
“जसे
ग्रीनहाउसमधे अनन्नास!” बेगेमोत म्हणाला आणि स्तंभांच्या ह्या भवनाला नीट
बघण्यासाठी लोखण्डाच्या जाळीच्या आधारावर चढला.
“अगदी बरोब्बर,” करोव्येव आपल्या मित्राच्या कथनाशी सहमत होत म्हणाला, “हा विचार मनांत येतांच शहारे येतात, की आता ह्या
भवनांत ‘दोन किखोते’, किंवा ‘फाउस्ट’ किंवा, सैतान मला घेऊन
जावो, इथे ‘मृत आत्मा’6
सारख्या रचना लिहिणारा भावी लेखक वाढतोय! आँ?”
“विचित्र वाटतंय, विचार
करूनंच,” बेगेमोतने दुजोरा दिला.
“हो,” करोव्येव बोलंत होता, “अजब-अजब गोष्टींची अपेक्षा
करू शकता, ह्या भवनाच्या ग्रीनहाउसमधून, जे आपल्या छताखाली हज्जारो अश्या लोकांना आश्रय देतंय, ज्यांना मेल्पोमीन, पोलिहिम्निया, आणि थेलियाच्या7 सेवेंत आपलं पूर्ण जीवन समर्पित करायचंय. तू
विचार कर, कित्ती हो-हल्ला होईल, जेव्हां
ह्यांच्यापैकी कोणी एक जनतेसमोर अशी रचना प्रस्तुत करेल – जशी ‘इन्स्पेक्टर जनरल’8 किंवा कमींत कमी – ‘येव्गेनी अनेगिन’9!”
“अगदी
सोप्पं आहे,”
बेगेमोत पुन्हां म्हणाला.
“हो,”
करोव्येव पुढे म्हणाला आणि त्याने काळजीने बोट वर केलं, “पण!...पण,
मी म्हणतो, आणि पुन्हां-पुन्हां म्हणतो हे – ‘पण!’ जर ह्या ग्रीनहाउसच्या नाजुक पिकाला कीड नाही लागली
तर, तिने त्यांना मुळासकट खाऊन नाही टाकलं तर, जर ते सडून गेले नाही तर! आणि असं अनन्नासांबरोबर बहुधा होतं! ओय, ओय, ओय, कसं होतं!”
बेगेमोतने
जाळीत असलेल्या भोकातून आपलं डोकं आत घुसवंत विचारलं, “पण हे सगळे लोक वराण्ड्यांत काय करताहेत?”
“लंच
करताहेत,” करोव्येवने समजावलं, “मी
तुला हेसुद्धां सांगतो, प्रिय मित्रा, की
इथे एक खूप छान आणि स्वस्त रेस्टॉरेन्ट आहे. आणि मला, जसं की
लांबच्या प्रवासावर जाण्याआधी प्रत्येक यात्रेकरूला वाटतं, इथे
काहीतरी खावसं वाटतंय. थंडगार दारूचा एक पैग प्यावासा वाटतोय मला.”
“मलापण,” बेगेमोतने उत्तर दिलं आणि दोघे बदमाश लिण्डेनच्या झाडांच्या सावलीत
असलेल्या सिमेन्टच्या रस्त्यावर चालंत सरळ, संभावित धोक्याची
जाणीव नसलेल्या रेस्टॉरेन्टच्या प्रवेश द्वारापर्यंत आले.
एक
फिक्कट,
कंटाळवाणी महिला, पांढरे स्टॉकिंग्ज़ आणि शेपूट
असलेली गोल पांढरी टोपी घालून, कोप-यांत असलेल्या प्रवेशद्वाराजवळ बसली होती, जिथे
हिरव्या वेलींच्यामधे एक छोटसं प्रवेश द्वार ठेवण्यांत आलं होतं. तिच्यासमोर एका
साधारण टेबलवर एक जाड रजिस्टर पडलं होतं. त्यांत ही महिला, न
जाणे कां, रेस्टॉरेन्टमधे येणा-यांची नावं लिहीत होती. ह्या
महिलेने करोव्येव आणी बेगेमोतला थांबवलं.
“तुमचं
परिचय-पत्र?”
तिने करोव्येवच्या चष्म्याकडे आणि बेगेमोतच्या फाटक्या बाहीकडे आणि
बगलेंत दबलेल्या स्टोवकडे आश्चर्याने बघंत विचारलं.
“हज्जारदां
माफी मागतो,
कसलं परिचय पत्र?” करोव्येवने आश्चर्याने
विचारलं.
“तुम्हीं
लेखक आहांत?”
महिलेने उत्तरादाखल विचारलं.
“नक्कीच!”
करोव्येवने गर्वाने म्हटलं.
“तुमचं
परिचय पत्र?”
महिला पुन्हां म्हणाली.
“माझे
मनमोहिनी...” करोव्येवने अत्यंत भावुकतेने सुरुवात केली.
“मी
मनमोहिनी नाहीये,” महिला त्याला मधेच टोकंत म्हणाली.
“ओह, कित्ती
दुःखाची गोष्ट आहे,” करोव्येव निराशेने म्हणाला, “जर तुम्हांला मोहक असणं आवडंत नाहीये, तर चला, असंच असूं द्या,
पण हे तुमच्यासाठी चांगलं झालं असतं. तर,
मैडम, दस्तोयेव्स्की लेखक आहे, हे सिद्ध करण्यासाठी काय त्याच्याच कडून प्रमाण-पत्र मागायला हवं? तुम्हीं त्याच्या कोणत्याही कादम्बरीतून कोणतेही पाच पृष्ठ घ्या, आणि कोणत्याही परिचय-पत्राशिवाय तुमची खात्री होईल, की
तुम्हीं एका चांगल्या लेखकाला वाचतांय. हो, त्याच्याकडे
कदाचित कोणतंही परिचय-पत्र नव्हतंच! तुला काय वाटतं?” करोव्येव
बेगेमोतकडे वळला.
“पैज
लावतो,
की नव्हतं,” तो स्टोवला रजिस्टरजवळ ठेवून एका
हाताने धुराने काळ्या झालेल्या कपाळाचा घाम पुसंत म्हणाला.
“तुम्हीं
दस्तोयेव्स्की नाहीये,” करोव्येवच्या तर्कांने पस्त होत ती
महिला म्हणाली.
“घ्या, तुम्हांला
कसं माहित? तुम्हांला कसं माहीत?” त्याने
उत्तर दिलं.
“दस्तोयेव्स्की
मेलाय,”
महिला म्हणाली, पण कदाचित तिलासुद्धां ह्या
गोष्टीचा विश्वास नव्हता.
“मी
विरोध करतो,”
बेगेमोत तावातावाने म्हणाला, “दस्तोयेव्स्की
अमर आहे!”
“तुमची
परिचय-पत्रं,
नागरिकहो!” त्या महिलेने पुन्हां विचारलं.
“माफ़ करा, हे
तर अतीच झालंय?” करोव्येव माघार घ्यायला तयार नव्हता आणि तो
बोलंत राहिला, “लेखकाला कोणी त्याच्या परिचय पत्राने नाही
ओळखंत, तर त्याला ओळखतांत त्याच्या लेखनाने! तुम्हांला
कल्पना तरी आहे कां, की माझ्या डोक्यांत कसले-कसले विचार
उठतायंत? किंवा ह्या डोक्यांत?” त्याने
बेगेमोतच्या डोक्याकडे खूण करंत म्हटलं, ज्याने लगेच आपली
टोपी काढून टाकली, कदाचित अश्यासाठी की त्या महिलेला त्याचं
डोकं चांगल्या प्रकारे दिसावं.
“रस्ता
सोडा,
श्रीमान,” त्या महिलेने घाबरंत म्हटलं.
करोव्येव
आणि बेगेमोतने एकीकडे सरकून भु-या सूटवाल्या, टाय न बांधलेल्या लेखकाला
रस्ता दिला. ह्या लेखकाने पांढरा शर्ट घातला होता, ज्याची
कॉलर कोटाच्या वर उघडी पडलेली होती. त्याने बगलेत वर्तमान पत्र दाबलं होतं.
लेखकाने अभिवादन करंत महिलेकडे बघून डोकं झुकवलं आणि समोरच्या रजिस्टरमधे
चिमणीसारखं काहीतरी रेखाटून दिलं आणि वराण्ड्यांत चालला गेला.
“ओह,” अत्यंत दुःखाने करोव्येवने उसासा भरला, “आपल्याला
नाहीं, पण त्याला मिळेल ती थण्डगार बियर जिचं आपण गरींब भटके
लोक स्वप्न बघंत होतो. आपली परिस्थिती चिंताजनक झालीये, कळंत
नाहीये, की काय करावं.”
बेगेमोतने
दुःख प्रकट करंत हात हलवले आणि आपल्या गोल डोक्यावर टोपी चढवली, ज्याच्यावर
अगदी मांजरीच्या मऊ केसांसारखे दाट केस होते. त्याच क्षणी त्या महिलेच्या
डोक्यावरून एक अधिकारपूर्ण आवाज घुमला:
“येऊ
द्या,
सोफ्या पाव्लोव्ना.”
रजिस्टरवाली
महिला दचकली. समोरच्या वेलींच्या हिरवळीतून एक पांढ-या जैकेट वाली छाती आणि टोकदार
दाढी असलेला समुद्री डाकूचा चेहरा अवतरला. त्याने ह्या दोन्हीं फाटके कपडे घातलेल्या
सन्देहास्पद प्राण्यांकडे अत्यंत प्रेमाने बघितलं, आणि वरून, तो त्यांना खुणेने आमंत्रित देखील करूं लागला. आर्किबाल्द
आर्किबाल्दोविचचा दबदबा पूर्ण रेस्टॉरेन्टमधे त्याच्या आधीनस्थ कर्मचा-यांना
जाणवायचा. सोफ्या पाव्लोंव्नाने करोव्येवला विचारलं, “तुमचं
नाव?”
“पानायेव11,” अत्यंत सौजन्याने त्याने उत्तर दिलं. महिलेने ते नाव लिहून घेतलं आणि
प्रश्नार्थक नजरेने बेगेमोतकडे बघितलं.
“स्काबिचेव्स्की12,” तो न जाणे कां आपल्या स्टोवकडे बोट दाखवंत उत्तरला. सोफ्या पाव्लोव्नाने
हे नाव सुद्धां लिहून घेतलं आणि रजिस्टर आगंतुकांसमोर ठेवलं, म्हणजे त्यांना सही करता यावी. करोव्येवने ‘पानायेव’च्या पुढे लिहिलं ‘स्काबिचेव्स्की’; आणि बेगेमोतने ‘स्काबिचेव्स्की’च्यापुढे लिहिलं ‘पानायेव’. सोफ्या
पाव्लोव्नाला आश्चर्याचा मोट्ठा धक्का देत आर्किबाल्द आर्किबाल्दोविच पाहुण्यांना
मोठ्या प्रेमाने स्मित करंत वराण्ड्याच्या दुस-या टोकावर असलेल्या सर्वोत्तम
टेबलाकडे घेऊन गेला. तिथे बरीच सावली होती. टेबलाच्याजवळ सूर्याचे हसरे किरण
वेलींमधून डोकावंत होते. सोफ्या पाव्लोव्ना विस्मयाने थक्क होऊन त्या विचित्र
सह्यांकडे बघंत होती, जे त्या अप्रत्याशित पाहुण्यांने केले
होते.
वेटर्सलापण
आर्किबाल्द आर्किबाल्दोविचने कमी आश्चर्यचकित नाही केलं. त्याने स्वतः खुर्ची
खेचून करोव्येवला बसायला सांगितलं, मग एका वेटरला खूण केली, दुस-याच्या कानांत कुजबुजंत काहीतरी सांगितलं, आणि
दोन्हीं वेटर्स पाहुण्यांच्या खिदमतीत हजर झाले. पाहुण्यांपैकी एकाने आपला स्टोव
स्वतःच्या लाल जोड्यांच्या बाजूला फरशीवर ठेवला होता. टेबलावरचा जुना, पिवळे डाग पडलेला टेबलक्लॉथ लगेच गायब झाला आणि हवेंत उडंत पांढरा,
स्टार्च लावलेला टेबलक्लॉथ येऊन त्याच्या जागेवर विराजमान
झाला.
आर्किबाल्द
आर्किबाल्दोविच हळू-हळू करोव्येवच्या अगदी कानाजवळ कुजबुजंत होता, “आपली काय सेवा करूं शकतो? खास बनवलेली बलीक13,
आर्किटेक्ट्सच्या कॉन्फ्रेन्समधून चोरून आणलीये...”
“तुम्हीं...अँ...आम्हांला
काहीही खायला द्या...अँ...” करोव्येव खुर्चीवर पसरंत सहृदयतेने म्हणाला.
“समजलो.”
डोळे मिटंत आर्किबाल्द आर्किबाल्दोविचने अर्थपूर्ण ढंगाने म्हटलं.
हे बघून
की ह्या संदिग्ध दिसणा-या पाहुण्यांशी आर्किबाल्द आर्किबाल्दोविच अत्यंत सौजन्याने
वागतोय,
वेटर्सने पण आपल्या डोक्यांतून सगळे संदेह काढून टाकले आणि खूप
तन्मयतेने त्यांची आवभगत करायला लागले. त्यांच्यापैकी एकाने तर बेगेमोतच्या जवळ
पेटलेली काडीसुद्धां आणली, हे बघून की त्याने खिशांतून सिगरेटचा
तुकडा काढून तोंडांत दाबलाय; दुसरा खणखण करणारी हिरवळ घेऊन
जणु उडतंच आला आणि टेबलावर हिरवीगार सुरई आणि प्याले ठेवून गेला. प्याले इतके
सुरेख होते, ज्यांत तम्बूच्या खाली बसून नर्ज़ान पिण्याचा
मजाच काही और असतो...नाही, आम्हीं ह्याहूनही पुढे
सांगू...ज्यांत तम्बूच्याखाली अविस्मरणीय ग्रिबोयेदोवच्या वराण्ड्यांत बरेंचदा
नर्ज़ान प्यायचे.
“पहाडी
बदाम आणि तीतरचं पकवान पेश करूं शकतो,” संगीतमय सुरांत आर्किबाल्द
आर्किबाल्दोविच म्हणाला. तुटका चष्मा असलेल्या पाहुण्याला हा प्रस्ताव फार आवडला
आणि आभार प्रदर्शित करंत त्याने त्या बेकारच्या चष्म्यातून त्याच्याकडे बघितलं.
जवळच्या
टेबलवर बसलेला कथाकार पेत्राकोव सुखोयेव, जो आपल्या बायकोसोबंत पोर्क
चॉप्स खात होता, आपल्या स्वाभाविक निरीक्षण शक्तीने
आर्किबाल्द आर्किबाल्द करंत असलेली आवभगत बघून खूप चकित झाला. त्याच्या सम्माननीय
पत्नीने करोव्येवची ह्या समुद्री डाकूशी होत असलेली जवळीक बघून ईर्ष्येने चमचा
वाजवला, जणु म्हणंत असावी – हा काय प्रकार आहे की आम्हांला
वाट बघायला लावतायेत, जेव्हां आइस्क्रीम द्यायची वेळ झालीये!
काय, होतं काय आहे? आर्किबाल्द
आर्किबाल्दोविचने स्मित करंत पेत्राकोवाकडे एका वेटरला पाठवून दिलं, पण तो स्वतः आपल्या पाहुण्यांपासून दूर नाही झाला. आह, आर्किबाल्द आर्किबाल्दोविच अत्यंत हुशार होता! लेखकांपेक्षाही तीक्ष्ण नजर
असलेला. आर्किबाल्द आर्किबाल्दोविचला वेराइटीच्या ‘शो’बद्दलसुद्धां माहीत होतं, ह्या काळांत होत असलेल्या अनेक
चमत्कारिक घटनांबद्दलसुद्धां त्याने ऐकलं होतं; पण
इतरांप्रमाणे ‘चौकट वाला’ आणि ‘बोका’ ह्या दोन शब्दांना त्याने कानांतून काढून
नव्हतं टाकलं. आर्किबाल्द आर्किबाल्दोविचला लगेच अंदाज आला की हे पाहुणे कोण आहेत.
त्याला कळलं होतं, म्हणून त्याने त्यांच्याशी वाद नाही
घातला. पण सोफ्या पाव्लोव्ना चांगलीच आहे! फक्त कल्पनाच करा – ह्या दोघांना
वराण्ड्यांत जाण्यापासून थांबवणं! पण तिच्याकडून आणखी दुस-या गोष्टीची अपेक्षाच
नव्हती!
वैतागाने
खूप क्रीम असलेल्या आइस्क्रीममधे चमचा टोचंत पेत्राकोवा बघंत होती, की
जवळच्या टेबलवर जोकरांसारखे कपडे घातलेल्या दोन माणसांच्या समोर कसे फटाफट
खाण्यापिण्याच्या वस्तूंचे ढीग लागंत होते. चमकदार धुतलेल्या सैलेडच्या पानांमधून
डोकावंत असलेल्या ताज्या कैवियरची प्लेट आता तिथे ठेवण्यांत आली...एका क्षणांत
विशेषकरून ठेवलेल्या आणखी एका लहानग्या टेबलावर थेंब सोडंत असलेली चांदीची छोटीशी
बादली आली.
सगळ्या
व्यवस्थेने संतुष्ट झाल्यावर, तेव्हांच, जेव्हां
वेटर्सच्या हातांत एक बंद बाउल आलं, ज्यांत कोणचीतरी वस्तू
खदखदंत होती, आर्किबाल्द आर्किबाल्दोविचने पाहुण्यांचा निरोप
घेतला. जायच्या आधी त्यांच्या कानांत कुजबुजला, “माफ करा!
फक्त एक मिनिटासाठी!...मी स्वतः जाऊन तीतर बघून येतो.”
तो
टेबलापासून दूर जाऊन रेस्टॉरेन्टच्या आतल्या कॉरीडोरमधे गायब झाला. जर कोणी
आर्किबाल्द आर्किबाल्दोविचच्या पुढच्या कार्यकलापांचं निरीक्षण केलं असतं, तर
त्याला ते रहस्यमयंच भासले असते.
रेस्टॉरेन्ट
प्रमुख टेबलापासून दूर जाऊन तीरासारखा किचनमधे नाही, पण रेस्टॉरेन्टच्या स्टोअर रूममधे
गेला. त्याने आपल्या किल्लीने स्टोअर रूम उघडलं आणि त्याच्या आंत बंद झाला. शर्टाच्या
कफ़्सला डाग लागू नयेत म्हणून अत्यंत काळजीपूर्वक बर्फाने भरलेल्या डब्ब्यांतून दोन
जड-जड बलीक काढले आणि त्यांना वर्तमान पत्रांत गुंडाळलं, त्यावर
दोरी बांधली आणि एकीकडे ठेवून दिलं. मग बाजूच्या खोलींत जाऊन बघून घेतलं की त्याचा
रेशमी अस्तरचा उन्हाळ्याचा कोट आणि टोपी जागेवर आहेत किंवा नाही. तेव्हांच तो किचनमधे
पोहोचला, जिथे सांगितल्याप्रमाणे स्वयंपाकी पाहुण्यांसाठी तीतर
तळंत होता.
सांगावं लागेल, की
आर्किबाल्द आर्किबाल्दोविचच्या कार्यकलापामधे काहीही गूढ नव्हतं आणि फक्त एक वरवर बघणारांच
त्यांना रहस्यमय म्हणू शकतो. पूर्वी घडलेल्या घटानांची माहिती आणि ईश्वर प्रदत्त पूर्वानुमान
करण्याच्या अद्वितीय शक्तीने आर्किबाल्द आर्किबाल्दला सांगितलं होतं की त्याच्या पाहुण्यांचं
जेवण कितीही चविष्ट असलं तरी ते बस थोडा वेळंच चालणार आहे. आणि त्याच्या ह्या शक्तीने
त्याला ह्यावेळेस सुद्धां फसवलं नाही.
जेव्हां करोव्येव
आणि बेगेमोत मॉस्कोच्या अत्यंत शुद्ध थंडगार वोद्काचा दुसरा पैग घेत होते, तेव्हांच
वराण्ड्यांत घामाने थबथबलेला, घाबरलेला संवाददाता बोबा कन्दालूप्स्की
घुसला, जो मॉस्कोत सर्वज्ञानी म्हणून प्रसिद्ध होता. आल्याबरोबर
तो पेत्राकोव दम्पत्तीजवळ बसून गेला. आपली फुगलेली ब्रीफकेस टेबलवर ठेवंत बोबाने आपले
ओठ लगेच पेत्राकोवच्या कानाला चिकटवले आणि कुजबुजंत अत्यंत मजेदार गोष्टी सांगू लागला.
मैडम पेत्राकोवानेपण उत्सुकतेने आपला कान बोबाच्या चिक्कट, जाड्या-जाड्या
ओठांना लावला. तो तिरप्या नजरेने आजूबाजूल बघंत नुसतं कुजबुजतंच होता. काही शब्द,
जे ऐकू आले, ते असे होते:
“शप्पत घेऊन
सांगतो! सादोवायावर... सादोवायावर...” बोबाने आवाज आणखी खाली करंत म्हटलं, “गोळ्या लागतंच नाहीये! गोळ्या...गोळ्या...तेल...तेल...आग...गोळ्या...”
“अश्या खोटारड्यांना, जे
असल्या घाणेरड्या अफवा पसरवतांत,” रागाने मैडम पेत्राकोवा काहीशा
मोठ्या, जड आवाजांत, जसा बोबाला नको होता,
उद्गारली, “त्यांचातर खरपूस समाचार घेतला पाहिजे!
चला, काही हरकत नाही, असंच होईल,
त्यांना धडा शिकवलांच जाईल! ओह, किती धोकादायक
खोटारडे आहेत!”
“कुठले खोटारडे, अंतोनीदा
पर्फीरेव्ना!” लेखकाच्या बायकोच्या अविश्वास दाखवल्याने उत्तेजित आणि आहत होऊन बोबा
ओरडला, आणि कुजबुजंत म्हणाला, “मी सांगतोय
तुम्हांला, गोळ्यांचा काहीच फायदा होत नाहीये...आणि आता आग...ते
हवेत...हवेत...” बोबा सांगंत राहिला, किंचितही विचार न करतां,
की ज्यांच्याबद्दल तो सांगंत आहे, ते त्याच्या
बाजूलाच बसलेले आहेत, आणि त्याची शिट्टीसारखी कुजबुज ऐकून आनंदित
होत आहेत. पण हा आनंद लवकरंच संपला.
रेस्टॉरेन्टच्या
आतल्या भागांतून तीन माणसं वराण्ड्यांत आले. त्यांच्या शरीरावर अनेक पट्टे कसलेले होते.
हातांत रिवॉल्वर्स होते. सगळ्यांत पुढच्या माणसाने गरजंत म्हटलं, “आपल्या जागेवरून हलू नका!” आणि लगेच त्या तिघांनी करोव्येव आणि बेगेमोतच्या
डोक्यावर गोळ्या चालवायला सुरुवात केली. गोळ्या खाल्ल्यावर ते दोघं हवेंत विलीन झाले,
आणि स्टोवमधून आगीची एक तीव्र लपंट त्या शामियान्यांत उठली जिथे रेस्टॉरेन्ट
होतं. जणु काळी किनार असलेला एक विशाल उघडा जबडा शामियान्यांत प्रकट झाला आणि चारीकडे
पसरू लागला. आगीच्या ज्वाळा उंच होत-होत ग्रिबोयेदोव भवनाच्या छतापर्यंत पोहोचू लागल्या.
दुस-या मजल्यावर सम्पादकाच्या खोलींच्या खिडकींत ठेवलेल्या फाइल्स आणि कागदपत्र जळू
लागले; त्यानंतर लपटांनी पडद्यांना पकडलं, मग आग भीषण रूप धारण करून, किंचाळंतच आत्याबाईच्या घरांत घुसली, जणु कोणी तिला हवा देत आहे.
काही क्षणांनी
सिमेन्टच्या रस्त्यावर, अर्धवट जेवण सोडून लेखक, वेटर्स,
सोफ्या पाव्लोव्ना, बोबा, पेत्राकोवा आणि पेत्राकोव धावंत होते. हा तोच रस्ता आहे, जो लोखंडाच्या जाळीपर्यंत जातो, आणि जिथून बुधवारी संध्याकाळी
ह्या दुर्भाग्याची प्रथम सूचना देणारा दुर्दैवी इवानूश्का आला होता, आणि ज्याला कोणीच समजून नव्हतं घेतलं.
वेळेवारीच
मागच्या दारांतून घाई न करतां निघाला आर्किबाल्द आर्किबाल्दोविच – जळंत असलेल्या जहाजाच्या
कैप्टनप्रमाणे,
जो सगळ्यांत शेवटी जहाज सोडतो. त्याने आपला रेशमी अस्तरचा कोट घातला
होता आणि बगलेत दोन बलीक असलेलं पैकेट दाबलं होतं.
*********
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें