मंगलवार, 22 अगस्त 2017

मास्टर आणि मार्गारीटा - 11



अकरा


इवानचे दोन रूप



नदीच्या पलिकडच्या किना-याचं जंगल, जे आत्ता तासभरापूर्वी मे महिन्याच्या दुपारच्या उन्हांत चमकंत होतं, अचानक मलूल झालं, त्याचे रंग विखुरले आणि अंधारांत वितळून गेलं.
खिडकीच्याबाहेर मुसळधार पाऊस पडंत होता. आकाशांत राहून-राहून वीज चमकून जात होती, आकाश जणु कोसळण्याच्या बेतांत होतं आणि रोग्याच्या खोलींत भीतिदायक रंग भरंत होतं.
इवान चुपचाप रडंत होता. तो पलंगावर बसून मातकट, उसळत्या, फेसाळ नदीकडे बघंत होता. विजेच्या प्रत्येक कडकडाटाबरोबर तो विव्हळंत होता आणि चेहरा हातांने झाकंत होता. इवानने लिहिलेले कागद चारीकडे उडंत होते. वादळ यायच्या आधी खोलींत घुसलेल्या वा-याने त्यांना इकडे तिकडे फेकलं होतं.
त्या खतरनाक कन्सल्टेन्टबद्दल एक अर्ज लिहिण्याचा त्याचा प्रत्येक प्रयत्न असफल झाला होता. त्याने डॉक्टरची लट्ठ सहायिका, प्रास्कोव्या फ्योदोरोव्नाकडून पेन्सिल आणी कागद मागितला आणि टेबलाशी बसून लिहायला सुरुवात केली. सुरुवातीच्या ओळी मोठ्या झोकांत लिहिल्या;
“पोलिसकडे मॉसोलितचा सदस्य इवान निकोलायेविच बिज़्दोम्नीचे निवेदन. काल संध्याकाळी मी स्वर्गीय एम.ए.बेर्लिओज़सोबत पत्रियार्शी तलावावर गेलो...”
तेवढ्यांत तो वैतागला, विशेषकरून स्वर्गीयशब्दामुळे. फार आश्चर्याची गोष्ट लिहून टाकली होती त्याने – स्वर्गीयसोबंत गेला? मृतकतर चालंत नाहीत नं! ठीकंच आहे, असं लिहिल्याने त्याला खरंच पागल समजतील.
असा विचार करून इवान निकोलायेविचने ह्या पंक्त्यांमधे सुधार करायचं ठरवलं. पुन्हां लिहिलं :
“एम.ए. बेर्लिओज़सोबंत, जो नंतर मेला...” ह्याने पण संतुष्ट नाही झाला. तिस-यांदा लिहिलं, जे पहिल्या दोनपेक्षांही वाईट होतं : “...बेर्लिओज़सोबत, जे ट्रामखाली आले होते...” लगेच त्याला आठवंण झाली की ह्या नावाचा एक संगीतकारपण आहे, म्हणून त्याने लिहिलं...”संगीतकाराबरोबर नाही...”
ह्या दोन्हीं बेर्लिओज़ांच्या भानगडीपासून दूर राहण्यासाठी इवानने पुन्हां खूप सशक्त स्टाइलमधे लिहिण्याचा प्रयत्न केला, ज्याने वाचणा-याचं लक्ष एकदम त्याच्याकडे आकर्षित होईल. त्याने लिहिलं की बोका ट्रामगाडींत बसला होता, मग डोकं कापल्याच्या घटनेकडे वळला. कापलेल्या डोक्याने आणि कन्सल्टेन्टच्या भविष्यवाणीने त्याचं लक्ष पोंती पिलातकडे वळवलं. इवानने निश्चय केला की आपल्या विचारांना स्पष्टपणे समजावण्यासाठी पोंती पिलातची पूर्ण गोष्ट लिहिली पाहिजे, त्या क्षणापासून जेव्हां तो रक्तवर्णी किनारीच्या पांढ-या अंगरख्यांत हिरोदच्या महालाच्या स्तंभ असलेल्या दालनांत अवतीर्ण झाला होता.
इवान खूप मेहनतीने लिहीत होता. लिहिलेल्याला घडी घडी पुसून नवीन शब्द लिहीत होता. त्याने पोंती पिलात आणि मागच्या पंजांवर उभ्या असलेल्या बोक्याचे चित्र काढण्याचापण प्रयत्न केला. पण ह्या चित्रांचा काही उपयोग नाही झाला. जसा-जसा तो पुढे-पुढे लिहीत होता, त्याचा लेख जास्तीतजास्त क्लिष्ट, गुंतागुंतीचा, न समजण्यासारखा होत गेला.
जेव्हां आकाशांत दुरून धुरकट किनारीचं भीतिदायक वादळ पुढे वाढंत होत आणि शेवटी त्याने जंगलाला पूर्णपणे झाकून टाकलं; जेव्हां सोसाट्याचं वारं वाहूं लागलं, तोपर्यंत इवान अगदी शिथिल झाला होता. त्याला कळून चुकलं की त्याच्याने हा अर्ज नाही लिहिला जाणार, म्हणून त्याने विखुरलेल्या कागदांना गोळा करायचा प्रयत्न नाही केला आणि निराश होऊन निःशब्द रडूं लागला.
सहृदय प्रास्कोव्या फ़्योदोरोव्ना वादळाच्या दरम्यान इवानला बघायला आली. तिला हे बघून खूप दुःख झालं की तो रडतोय. कडकडणा-या विजेची रोग्याला भीति न वाटो, म्हणून तिने पडदे बंद केले; फरशीवर पडलेले कागद गोळा केले आणि त्यांना घेऊन डॉक्टरकडे पळाली. लवकरंच जंगल पूर्वीसारखं झालं. स्वच्छ निळ्या आकाशाखाली त्याचं एक एक झाड दिसू लागलं आणि नदीचं पाणीसुद्धां शांत झालं. इवानची पीडा हळू-हळू कमी होऊं लागली; आता कवि शांतचित्त होऊन पलंगावर पडल्या पडल्या आकाशातील इंद्रधनुष्य पाहात होता.
संध्याकाळपर्यंत असंच राहिलं, त्याच्या लक्षांतपण आलं नाही, की केव्हां इंद्रधनुष्य विखुरलं, केव्हां आकाश उदास होऊन गहिरं झालं, आणि केव्हां जंगल पुन्हां काळं झालं.
गरम गरम दूध पिऊन इवान पुन्हां लोळला. त्याला आश्चर्य वाटलं, की त्याच्या विचारांत इतकं परिवर्तन कसं झालं. त्याच्या स्मृतींत आता तो दुष्ट बोका आतां इतका दुष्ट नव्हता वाटंत, कापलेल्या डोक्याची इतकी भीति नव्हती वाटंत आणि त्याच्याबद्दल विचार करणं सोडून इवानच्या मनांत असले विचार आले, की हे हॉस्पिटल इतकं वाईट नाहीये, की स्त्राविन्स्की खूप हुशार आहे, त्याच्याशी बोलणं चांगलं वाटतं. वादळानंतर संध्याकाळचं वारं गोड आणि सुखद वाटंत होतं.
दुःखाचं हे घर झोपलं होतं. शांत कॉरीडोर्समधे मातकट पांढरे बल्ब्स विजले होते, त्यांच्या ठिकाणी मंद निळे बल्ब्स जळंत होते. दारांच्या बाहेर कॉरीडोरच्या रबरी फरशीवर परिचारिकांच्या सतर्क, सावध पावलांचा आवाज हळू-हळू कमी होत होता.
इवानला आता प्रसन्न वाटंत होतं. पडल्या-पडल्या तो मंद प्रकाश फेकणा-या बल्बकडे बघून घेत होता, किंवा जंगलाच्या मागून डोकावणा-या चंद्राकडे. त्याबरोबरंच स्वतःशीच बोलंत होता.
जर बेर्लिओज़ ट्रामखाली येऊन मेला तर मी इतका उत्तेजित कशाला झालो?’ कविने कारण मीमांसा करंत विचार केला, ‘शेवटी, तो चिखलांत जरी पडला तरी मला त्याचं काय! मी आहे कोण त्याचा? मी काय त्याचा मित्र आहे, किंवा व्याही? जर नीट विचार केला, तर, मी त्याला ओळखंतदेखील नव्हतो. खरंच मला त्याच्याबद्दल असं कितीसं माहीत आहे? फक्त येवढंच, की तो टकल्या भयंकर गोड बोलणारा होता.मग न जाने कुणाला संबोधित करंत कविने पुढे विचार केला, “मी त्या रहस्यमय कन्सल्टेन्ट, जादूगर आणि काळ्या आणि रिकाम्या डोळ्याच्या सैतान प्रोफेसरमुळे इतका वेडा कां झालो? इतकी धावपळ कां केली? त्याच्या मागावर कां गेलो? चड्डी घालून, हातांत मेणबत्ती घेऊन, आणि रेस्टॉरेन्टमधे त्याच्यामुळे इतका धिंगाणा कां केला?’                            
पण, पण, पण,” अचानक कुठेतरी, न कानांत, न डोक्यांत जुन्या इवानने नव्या इवानला गंभीरतेने म्हटलं, “बेर्लिओज़चं डोकं कापलं जाणारेय, हे तर त्याला आधीपासून माहीत होतं? मी काळजी कशी नसती केली?”
“काय म्हणतोस मित्रा!” नव्या इवानने जुन्या इवानचा विरोध करंत म्हटलं – “इथे काही तरी गोलमाल आहे, येवढंतर एका लहान मुलालासुद्धां कळतं. तो शंभर टक्के रहस्यमय व्यक्ति आहे. हीच तर गंमत आहे! माणूस व्यक्तिशः पोंती पिलातला ओळखंत होता. तुम्हांला आणखी काय पाहिजे? आणि पत्रियार्शीवर इतका धिंगाणा घालण्यापेक्षां त्याला हे विचारणं जास्त चांगलं नसतं का झालं, की पोंती पिलात आणि कैदी हा-नोस्त्रीचं पुढे काय झालं?”
“आणि मी न जाने काय विचार करूं लागलो! मुख्य गोष्ट ही आहे, की मासिक पत्रिकेच्या संपादकाला ट्रामगाडीने चिरडून टाकलं. तर काय. पत्रिका निघणं बंद होईल? करणार तरी काय; माणूस नश्वर आहे आणि आकस्मिक रूपाने त्याचा नाश होतो. ईश्वर त्याच्या आत्म्याला शांति देवो! दुसरा सम्पादक येईल...कदाचित पहिल्यापेक्षां जास्तं गोड बोलणारा.”
किंचित डुलकी घेतल्यावर नव्या इवानने जुन्याला विचारलं:
“मग, ह्या सगळ्यांत मी कोण ठरलो?”
“मूर्ख,” कुठून तरी जाडा-सा आवाज आला. हा जुन्या इवानचा आवाज नव्हतां, नव्या इवानचासुद्धां नव्हता. ह्याचं त्या कन्सल्टेन्टच्या आवाजाशी खूप साम्य होतं.
माहीत नाही कां, इवानला “मूर्ख” शब्द ऐकून राग नाही आला, त्याला आश्चर्यंच झालं. तो हसला आणि अर्धनिद्रितावस्थेत शांत झाला. इवान पर्यंत हलक्या पावलांनी एक स्वप्न पोहोचलं, ज्यांत त्याला हत्तीच्या पायासारखं लिण्डन वृक्ष दिसलं. बाजूने बोका निघून गेला. भीतिदायक नाही, पण आनंद देणारा. निद्रादेवी थोपटून इवानला झोपवणारंच होती, की अचानक जाळीचं दार आवाज न करतां उघडलं. मग बाल्कनींत एक रहस्यमय आकृति प्रकट झाली, जी स्वतःला चंद्राच्या प्रकाशापासून लपवंत होती. तिने इवानला बोटाच्या इशा-याने धमकावलं. इवान न घाबरतां पलंगावरून उठला. त्याने पाहिलं की बाल्कनींत एक माणूस उभा आहे. ह्या माणसाने ओठांवर बोट नेत म्हटल – “श् श्!”


*******

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें