तेरा
हीरोचा
प्रवेश
तर, अनोळखी
माणसाने इवानला बोटाने धमकावले आणि तो कुजबुजला, “श्
श्...!”
इवानने पाय
पलंगावरून खाली घेतले आणि बघूं लागला. बाल्कनीतून चिकण्या चेह-याचा, काळे
केस असलेला आणि तरतरीत नाकाचा एक माणूस उत्तेजित डोळ्यांनी खोलींत डोकावंत होता.
जवळपास अडतीस वर्षांच्या ह्या माणसाच्या कपाळावर केसांची एक बट रुळंत होती.
जेव्हां
ह्या रहस्यमय आगंतुकाला विश्वास झाला,
की इवान खोलींत एकटाच
आहे, तर त्याने इकडची-तिकडची चाहुल घेतली आणि उडी मारून आत
आला. आता इवानने बघितलं,
की तो हॉस्पिटलच्या
कपड्यांमधे आहे. लांब अंतर्वस्त्र,
जोडे, खांद्यावर भु-या रंगाचा गाउन.
आगंतुकने
इवानला डोळा मारंत किल्ल्यांचा जुडगा आपल्या खिशांत लपवला आणि विचारलं, “मी बसू काँ?” आणि
इवानने खूण केल्यावर खुर्चीत बसला.
“तुम्हीं
इथे आलांत कसे?
धमकावणारं बोट आठवून
इवानने कुजबुजंत विचारलं,
“बाल्कनीच्या जाळीच्या
दारांवर तर कुलूप आहे नं.?”
दारांवरतर
कुलुपं आहेत,”
पाहुणा सांगू लागला, “पण प्रास्कोव्या फ्योदोरोव्ना खूपच लाघवी, पण विसराळू बाई आहे. मी महिन्याभरापूर्वी तिचा
किल्ल्यांचा जुडगा पार केला,
आणि अशा प्रकारे मी
बाल्कनींत येऊं शकतो,
जी सगळ्या खोल्यांना
वळसा घालते. म्हणूनंच मी कधी कधी आपल्या शेजा-याला भेटू शकतो.”
“जर
तुम्हीं बाल्कनीत येऊं शकता,
तर उडी मारून पळूं देखील
शकता. की उँची जास्त आहे?”
इवानने कुतूहलाने
विचारलं.
“नाही,” पाहुणा ठामपणे म्हणाला, “उंचीची
भीति मला नाही वाटंत. पळंत ह्यासाठी नाही, की
पळून जाणार कुठे.” मग थोडं थांबून म्हणाला, “तर, बसूं या?”
“”बसूं
या...” इवानने त्याच्या तपकिरी आणि अत्यंत व्याकुळ डोळ्यांमधे डोकावंत म्हटलं.
“हो...”
पाहुण्याने उत्साहाने विचारले,
“पण, तू आक्रामक तर नाहीयेस नं.? मला
हल्ला, अत्याचार,
सतावणं, पाठलाग करणं...हे सगळं बिल्कुल सहन नाही होत.
विशेषकरून माणसाची किंकाळी मी ऐकूंच शकंत नाही, मग ती
दुःखाने फोडलेली किंकाळी असो,
किंवा पागलपणाची. पहिले
तुम्हीं मला सांगा,
तुम्हीं धोकादायक तर
नाहीये नं.?”
“काल
मी रेस्टॉरेन्टमधे एका माणसाचं थोबाड लाल केलं होतं,” कवीने फुशारकी
मारंत स्वीकार केलं.
“कारण?” पाहुण्याने दटावून विचारलं.
“हो, मान्य करतो, काहीच
कारण नव्हतं,”
इवानने गोंधळून उत्तर
दिलं.
“निर्ल्लजपणा आहे,” पाहुण्याने आपलं मत सांगून पुढे म्हटलं, “आणि तुम्हीं काय
म्हणालांत, थोबाड लाल केलं? हे सिद्ध नाही झालंय की माणसाकडे असतं काय, थोबाड की चेहरा; कदाचित चेहराच
असतो. तुम्हीं...मुक्क्यांने...नाही, असं नाही चालणार, ही सवय सोडावी लागेल.”
अशा प्रकारे इवानला दटावून पाहुण्याने विचारलं:
“व्यवसाय?”
“कवि,” इवानने रुक्षतेने म्हटलं.
आगंतुकाला आवडलं नाही.
“आह, माझ्याबरोबर असंच का होतं!” तो उद्गारला, पण मग लगेच स्वतःला सावरंत विचारूं लागला, “तुझं नाव काय आहे?”
“बिज़्दोम्नी.”
“ओय, ओय!” पाहुण्याच्या कपाळावर आठ्या पडल्या.
“तुम्हाला काय माझा कविता आवडंत नाहींत?”
इवानने उत्सुकतेने विचारलं.
“बिल्कुल नाही आवडंत.”
“तुम्हीं कोणत्या वाचल्यायंत?”
“मी तुझी एकही कविता नाही वाचली,” पाहुण्याने अगदी रुक्षपणे म्हटलं.
“मग तुम्ही असं कसं म्हणू शकता?”
“ओह, असं पण काय आहे त्यांत?” पाहुणा म्हणाला, “जसं की मी इतरांच्या कविता वाचल्याच नाहीत? आणि
मग...त्यांच्यात खास असं काय आहे? मी स्वीकार करतो, की त्या चांगल्या आहेत. तुम्हीं स्वतःच सांगा, तुमच्या कविता
खरंच चांगल्या आहेत कां?”
“अद्भुत आहेत!” इवानने निडरतेने दिलखुलास उत्तर दिलं.
“लिहिणं बंद करा,” आगंतुकाने जणु विनंती करंत म्हटलं.
“वचन देतो! शप्पथ घेतो!” इवानने दरबारी थाटांत म्हटलं.
ह्या शपथ विधिवर हात मिळवणी करून शिक्का मोर्तब झालं, तेवढ्यांत
कॉरीडोरमधे हल्क्या पावलांचा आणि कुणाच्या तरी बोलण्याचा आवाज आला.
“श्...” पाहुणा कुजबुजला आणि बाल्कनींत उडी
मारून त्याने जाळीचं दार बंद करून घेतलं.
प्रास्कोव्या फ्योदोरोव्नाने खोलींत डोकावून इवानला विचारलं की त्याला कसं
वाटतंय. त्याला अंधारांत झोपायचंय, की त्याच्यासाठी लाइट राहू द्यायचा? इवानने म्हटलं की
लाइट जळू द्यावा. पेशन्टला ‘गुड नाइट’ म्हणून प्रास्कोव्या फ्योदोरोव्ना निघून गेली. जेव्हां
सगळ्यादूर सामसूम झाली तेव्हां पाहुणा परंत आला.
त्याने तसंच कुजबुजंत इवानला सांगितलं की 119नंबरच्या खोलींत एका लाल
रंगाच्या लट्ठ्याला आणलंय, जो नेहमी वेन्टिलेटरमधे ठेवलेल्या नोटांबद्दलंच बडबड
करंत असतो. तो ठामपणे सांगतोय की सादोवाया भागांत सैतानी शक्तीच आगमन झालंय.
“पूश्किनला तोंड भरून शिव्या देतोय आणि सारखा म्हणतोय : ‘कुरोलेसोव, वन्स मोर, वन्स मोर!’ पाहुणा
उत्तेजनेने थरथरंत होता. थोडा शांत झाल्यावर तो बसला आणि पुढे म्हणाला, “देव त्यांचं
रक्षण करो!” आणि इवानशी होत असलेला संवाद पुढे वाढवंत म्हणाला, “तर, तुम्हांला इथे
कशाला आणलंय?”
“पोंती पिलात मुळे,” तोंड वाकडं करून, फरशीकडे बघंत इवानने उत्तर दिलं.
“काय?!” सावधगिरीबद्दल विसरून पाहुणा ओरडला आणि मग त्याने स्वतःच्या हाताने तोंड बंद
केलं, “किती विचित्र गोष्ट आहे! प्लीज़, प्लीज़ मला सर्व काही सांगा!”
माहीत नाही कां, इवानला वाटलं की तो ह्या अनोळखी माणसावर विश्वास ठेवूं
शकतो. त्याने आधी काहीशा संकोचाने, लाजंत आणि मग निडर होऊन पत्रियार्शी पार्कमधे काल
घडलेली घटना सांगितली. ह्या रहस्यमय चावी-चोराच्या रूपांत त्याला आपली व्यथा-कथा
ऐकणारा सहृदय श्रोताच भेटला होता! पाहुण्याने इवानला वेडा नाही ठरवलं, त्याची कथा
सम्पूर्ण तल्लीनतेने ऐकली आणि जशी-जशी गोष्ट पुढे वाढंत होती, तो अधिकाधिक
उत्तेजित होत गेला. मधून-मधून तो इवानला टोकंतसुद्धां होता, “हो, हो! पुढे, पुढे, प्लीज़, पण देवासाठी
एकसुद्धां शब्द सोडूं नका!”
इवानने पण अगदी पूर्णपणे सगळं सांगितलं. त्याला स्वतःला पण खूप चांगलं वाटंत
होतं. तो बोलंत राहिला, बोलंत राहिला आणि त्या प्रसंगापर्यंत आला जेव्हां लाल
किनारीच्या पांढ-या अंगरख्यांत पोंती पिलातने बाल्कनींत प्रवेश केला.
तेव्हां पाहुण्याने प्रार्थनेच्या मुद्रेंत हात जोडले आणि बुदबुदला:
“ओह, मी हाच तर अंदाज
केला होता! ओह, माझा अंदाज अगदी खरा होता!”
बेर्लिओजच्या भयानक मृत्युबद्दल श्रोत्याने एक रहस्यपूर्ण टिप्पणी केली, त्याच्या
डोळ्यांत कटुता झळकू लागली:
“मला एका गोष्टीचं दुःख आहे, की ह्या बेर्लिओज़च्या जागेवर आलोचक लातून्स्की किंवा
साहित्यकार म्स्तिस्लाव लाव्रोविच नव्हते,”
– आणि जणुं स्वतःशीच बोलला: “पुढे!”
कण्डक्टरला पैसे देणा-या बोक्याच्या वर्णनावर तर पाहुणा खूप खुश झाला आणि
जेव्हां इवान आपल्या पंज्यांवर उड्या मारंत मिशांजवळ पैसे ठेवलेल्या बोक्याची
नक्कल करंत होता, तेव्हां तर त्याची हसता-हसता पुरेवाट झाली.
“आणि अशा प्रकारे...” ग्रिबोयेदोवमधे घडलेल्या घटनेबद्दल सांगताना उदास
झालेल्या इवानने म्हटलं, “मी इथे येऊन पोहोचलो.”
पाहुण्याने सांत्वना देत इवानच्या खांद्यावर थोपटले आणि म्हणाला, “दुर्दैवी कवि! पण, मित्रा, तू स्वतःच ह्या
सगळ्या भानगडीसाठी जवाबदार आहेस. त्याच्याशी इतकं अघळ-पघळ बोलण्याची आणि उर्मटपणा
करण्याची काही गरजंच नव्हती. त्याचाच प्रसाद तुला मिळाला. तुला तर ‘धन्यवाद’ म्हणायला पाहिजे, की तू स्वस्तांत
सुटला.”
“पण, खरं तर, तो आहे कोण?”
इवानने तावातावाने मुक्का दाखवंत विचारले.
पाहुण्याने उत्तरादाखल इवानला एक प्रश्न विचारला, “तू घाबरणार तर नाहीं? आपण सगळे निराश लोक आहोत...डॉक्टर्स, इंजेक्शन वगैरे
तर नाही ना होणार?”
“नाही, नाही!” इवान अधीरतेने ओरडला, “सांगा न, तो कोण आहे?”
“ठीक आहे,” पाहुणा म्हणाला आणि अत्यंत गंभीरतेने आणि शांतपणे
म्हणाला, “काल पत्रियार्शी तलावाच्या किना-यावर तुमची भेट झाली होती सैतानाशी.”
इवान घाबरला नाही, कारण त्याने तसं वचन दिलं होतं, पण तो अगदी
आतपर्यंत हादरला.
“हे अशक्य आहे! सैतानाचं अस्तित्वच नाहीये!”
“माफ़ करा! कमीत कमी तुम्हांला तरी असं म्हणायला नको. तुम्ही पहिले व्यक्ति
आहांत ज्याला त्याच्यामुळे दुःख भोगावं लागलंय. तुम्ही इथेच पागलखान्यांत बसले
राहा आणि विचार करंत बसा की तो नाहीये. कमाल आहे!”
इवान प्रतिवाद नाही करूं शकला.
“ज्या क्षणी तुम्हीं त्याचं वर्णन करूं लागलात, मला अंदाज येत गेला की काल तुम्हांला कोणाशी बोलायचं
भाग्य लाभलं. मला तर बेर्लिओज़चं आश्चर्य वाटतंय! पण तुम्ही अगदी बालिश आहांत,” पाहुण्याने
दिलगिरीच्या स्वरांत म्हटले, “त्याच्याबद्दल मी कितीतरी ऐकलंय, थोड फार वाचलंपण
आहे! ह्या प्रोफेसरच्या पहिल्याच वर्णनाने माझा संदेह दूर झाला. त्याला न ओळखणं
अशक्य आहे, मित्रा! पण तुम्हीं...तुम्हीं मला पुन्हां माफ करा, जर मी चुकंत नसलो, तर अगदीच कच्चे
आहांत?”
“नक्कीच,” इवानला ओळखणं कठीण होतं.
“आणि...चेहरापण, ज्याचं वर्णन तुम्ही करंत होते...वेगवेळ्या रंगाचे
डोळे, भिवया! माफ़ करा, तुम्हीं कदाचित ‘फाउस्ट’ ऑपेराबद्दलसुद्धां नाही ऐकलंय?”
इवान खूपच गोंधळला आणि लाल होत, माहीत नाही कां, याल्टाच्या सेनिटोरियमच्या कोणच्यातरी यात्रेबद्दल
बडबडू लागला...
“हेच तर...हेच तर...मला जरासुद्धां आश्चर्य नाही वाटलं! पण बेर्लिओज़ने, मी पुन्हां
म्हणतो, त्याने मला धक्काच पोहोचवलांय. त्याने न केवळ बरंचसं वाचलं होतं, तो अतिशय धूर्त
देखील होता. पण वोलान्द तर मोठ्या-मोठ्या धूर्त लोकांच्या डोळ्यांत सुद्धा धूळ झोकू
शकतो, तर बेर्लिओज़ कुठे लागतोय!”
“काय...” आता ओरडायची पाळी इवानची होती.
“हळू!”
इवानने कपाळावर हात मारला आणि कुजबुजला, “बरोबर आहे, बरोबर आहे, त्याच्या विज़िटिंग कार्डवर ‘व’ अक्षर होतं. अरे, अरे, अरे; तर अशी गोष्ट
होती!” तो काही वेळ चुप राहिला. बावरला होता. जाळीच्या पलिकडे तरंगणा-या चंद्राकडे
बघंत त्याने विचारलं, “तर, तो, खरंच पोंती पिलातजवळ हजर होता? त्याचा तेव्हां
जन्म झालेला होता कां? आणि सगळे मला वेडा म्हणतात!” इवानने दाराकडे बोट
दाखवंत म्हटलं.
“आपण सत्याचा सामना करूं या,” पाहुणा तोंड वळवून ढगांमधे पळणा-या रात्रीच्या
मुशाफिराकडे बघंत म्हणाला, “तू आणि मी वेडे आहोत, नाही कसं म्हणायचं! बघ ना, त्याने तुला बुद्धू बनवलंय आणि तू त्याच्या जाळ्यांत
अडकलास; तुझी मनःस्थिति ह्यासाठी अनुकूल होती. तू जे सांगतोयंस, ते खरोखरंच घडल
होतं. किती विचित्र गोष्ट आहे, की मनोवैज्ञानिक स्त्राविन्स्कीने पण तुझा विश्वास
नाही केला. त्याने तुला बघितलं होतं?” (इवानने डोकं हलवलं). “तुझ्याशी गोष्टी करणारा
पिलातच्या जवळसुद्धां होता, काण्टसोबत ब्रेकफास्टच्या टेबलाशीपण बसला होता. आणि
आता तो मॉस्कोत आलाय.”
“सैतानंच जाणे तो इथे काय-काय करेल! कसंही करून त्याला पकडलंच पाहिजे नं?” नवीन इवानमधे
पुन्हां जुन्या इवानने डोकं वर करंत अविश्वासाने म्हटलं.
“तू प्रयत्नतर केलांच होता, पस्तावशील,” पाहुणा उपहासाने म्हणाला, “मी तर म्हणतो की कुणीच असा प्रयत्न करूं नये. तो जे काही करेल, कदाचित चांगलंच
करेल. आह, आह! मला कित्ती वाईट वाटतंय की त्याची भेट तुझ्याशी झाली, माझ्याशी नाही!
माझं तर सगळंच स्वाहा झालंय, पण ह्या भेटीसाठी मी प्रास्कोव्या फ्योदोरोव्नाचा हा
किल्ल्यांचा जुडगासुद्धां देऊन टाकला असता, देण्यासारखं दुसरं काही तर माझ्याजवळ नाहीये, मी निर्धन आहे!”
“पण तुला तो कशाला हवाय?”
पाहुणा उदास झाला, थोडा डळमळला आणि बरांच वेळ शांत राहून म्हणाला, “बघ, किती विचित्र
गोष्ट आहे, मी इथे त्याच्याचमुळे आलोय, ज्याच्या मेहेरबानीने तूं आलाय. हो, त्याच पोंती
पिलात मुळे,” पाहुण्याने भयभीत नजरेने इकडे-तिकडे बघंत म्हटलं,
“गोष्ट अशी आहे, की साधारण वर्षभरापूर्वी मी पोंती पिलातबद्दल एक
कादम्बरी लिहिली होती.”
“तू लेखक आहेस?” कवीने उत्सुकतेने विचारलं.
पाहुण्याचा चेहरा काळवंडला, त्याने इवानला मुक्का दाखवंत म्हटलं, “मी मास्टर आहे,” तो गंभीर झाला
आणि त्याने आपल्या गाउनच्या खिशांतून एक काळी टोपी काढली, ज्याच्यावर
पिवळ्या रेशमी धाग्याने ‘एम’ अक्षर भरलेले होते. त्याने टोपी घातली आणि इवानला आपली
सम्पूर्ण काया फिरून-फिरून दाखवूं लागला, जणु त्याला सिद्ध करायचं होतं की तो – मास्टर आहे, “तिने स्वतः
आपल्या हातांनी ही टोपी माझ्यासाठी बनवली आहे,”
त्याने रहस्यमय आवाजांत सांगितलं.
“तुझं आडनाव काय आहे?”
“आता माझ काही नाव किंवा आडनाव नाहीये,”
विचित्र पाहुणा नैराश्याने म्हणाला, “मी त्याचा त्याग
केलांय, अगदी तसांच, जसा जीवनाच्या इतर वस्तूंचा केला. त्याबद्दल विसरूं
या.”
“कमींत कमी तू कादंबरीबद्दल तरी सांग,”
इवानने अगदी सभ्यतेने विनंती केली.
“तर ऐकं, माझं जीवन, खरोखरंच, साधारण नाहीये,”
पाहुण्याने सांगायला सुरुवात केली.
…इतिहासाची पदवी
घेतल्यावर दोन वर्षापूर्वीपर्यंत तो मॉस्कोच्या एका म्यूज़ियममधे काम करंत होता.
त्याबरोबरंच भाषांतर देखील करायचा.
“कोणच्या भाषेतून?” इवानला आता मजा वाटू लागली.
“मातृभाषेव्यतिरिक्त मला आणखी पाच भाषा येतात,”
पाहुण्याने सांगितले, “इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, लैटिन आणि ग्रीक. इटालियनसुद्धां थोडीफार वाचू शकतो.”
“वस्ताद आहेस!” इवानच्या स्वरांत ईर्ष्या होती.
इतिहासकार एकटाच राहात असे. त्याचे कुणी नातेवाईक नव्हते, मॉस्कोमधे कुणी
ओळखीचं सुद्धा नव्हतं. आणि, एक दिवस त्याने एक लाख रूबल्स जिंकले. “मला कित्ती
आनंद झाला असेल, ह्याची तुम्ही कल्पनापण करूं शकंत नाही. काळ्या टोपीवाला पाहुणा तसंच कुजबुजंत
पुढे म्हणाला, “जेव्हां मी मळक्या कपड्यांच्या टोपल्यांत हात घातला
आणि टिकिट बघितलं: त्याच्यावर तोच
नम्बर होता, जो वर्तमान पत्रांत छापलेला होता! स्टेट बॉण्ड1...” त्याने
समजावलं, “मला त्यांनी म्यूज़ियममधे दिला होता.”
एक लाख जिंकल्यावर ह्या रहस्यमय पाहुण्याने हे केलं, की पुस्तकं विकत
घेतली, म्यास्नित्स्कायाच्या आपल्या खोलीला राम राम ठोकला...
“ऊ...ऊ, तो अगदी कबुत्तरखाना होता...” पाहुण्याने फिर्यादी
सुरांत म्हटले.
...आणि अर्बातच्या जवळ एका घर मालकाकडून घर भाड्याने घेतलं.
“घर मालक म्हणजे काय, माहीत आहे कां?”
पाहुण्याने इवानला विचारलं आणि लगेच स्पष्ट केलं, ‘ हे काही थोडेशे
बदमाश आहेत, जे मॉस्कोमधे सही-सलामत शिल्लक उरलेयंत.’ तर, घरमालकाकडून दोन खोल्या भाड्याने घेतल्या. ह्या खोल्या
बगिच्याने वेढलेल्या एका लहानश्या घराच्या तळमजल्यावर होत्या. म्यूज़ियमची नौकरी
सोडून दिली आणि पोंती पिलातबद्दल कादम्बरी लिहूं लागला.
“आह, ते सोनेरी दिवंस होते,” चमकत्या डोळ्यांनी वक्ता म्हणाला, “एकदम स्वतंत्र घर, त्यांत प्रवेश
कक्ष – सिंक असलेला,” त्याने थोड्याश्या गर्वाने सांगितले, “अगदी गेटकडून
येणा-या पायवाटेकडे उघडणा-या छोट्या-छोट्या खिडक्या, समोरंच, चार पावलांवर फ़ेन्सिंगला लागून लिली, लिण्डन आणि
मैपलचे सुगंधित झाडं! आहा, आहा, आहा! हिवाळ्यांत मला कधी कधी कुणाचे काळे पाय दिसायचे
आणि त्यांच्या खाली करकर करणारा बर्फाचा आवाज ऐकूं यायचा. माझ्या खोलीची शेकोटी
सदा पेटलेली असायची. पण अचानक बहर आला आणि घाणेरड्या काचेच्या पलिकडे मी
लिलीच्या नग्न फांद्यांना हिरवे वस्त्र घालताना पाहिलं. आणि तेव्हां, मागच्या वसंत
ऋतूंत, एक अशी सुखद गोष्ट घडली, जी एक लाख रूबल्स जिंकण्यापेक्षांही जास्त महत्वपूर्ण
होती. तसं, एक लाख पुष्कळ असतांत, हे तर तूसुद्धां मान्य करशील.”
“बरोबर म्हणतोयंस,” लक्ष देऊन ऐकंत इवान उत्तरला.
“मी खिडक्या उघडल्या आणि अगदी लहान, दुस-या खोलींत, बसू लागलो.” पाहुण्याने हावभाव करंत सांगितलं, “हा दिवान, त्याच्यासमोर
आणखी एक दिवान, त्यांच्यामधे एक छोटंसं टेबल, त्यावर सुंदरसा
नाइट लैम्प, आणि तिकडे, खिडकीजवळ पुस्तकं; आणि इथे – लहानसं राइटिंग टेबल; आणि समोरच्या
चौदा वर्गमीटर्सच्या खोलीत – पुस्तकं, पुस्तकं आणि शेकोटी! आहा, काय ते दिवंस! – लिलीचा सुगंध! माझं डोकं थकून हल्लक
व्हायचं, पिलात शेवटाकडे वाटचाल करंत होता...”
“पांढरा अंगरखा, लाल किनार! मी समजतोय!” इवान उद्गारला.
“अगदी बरोबर! पिलात धावत होता, समाप्तिकडे, समाप्तिकडे, आणि मला माहीत होतं की कादम्बरीचे शेवटचे शब्द असतील :
‘जूडियाचा पाचवा न्यायाधीश, अश्वारोही पोंती पिलात’.
मग, साहजिक आहे, मी हिंडायला निघून जायचो. एक लाख बरीच मोठी रकम होती.
माझ्याकडे राखाडी रंगाचा सूट होता. किंवा एखाद्या स्वस्त रेस्टॉरेन्टमधे जेवायला
निघून जायचो. अर्बातमधे एक छानसं रेस्टॉरेन्ट आहे, माहीत नाही आता ते आहे किंवा नाही.”
पाहुण्याचे डोळे विस्फारले आनी तो चंद्राकडे बघंत पुढे म्हणाला:
“ती हातांत घाणेरडे, उत्तेजित करणारे पिवळे फुलं घेऊन चालली होती. सैतान
जाणे त्या फुलांच काय नाव आहे, पण काय माहीत कां ते सगळ्यांत आधी मॉस्कोमधेच दिसतांत.
ही फुलं तिच्या काळ्या हलक्या कोटावर विसंगतंच वाटंत होती. ती पिवळे फुलं घेऊन
चालली होती! घाणेरडा रंग आहे. त्वेर्स्काया स्ट्रीट वरून ती एका गल्लीत शिरली आणि
तिने एकदम वळून माझ्याकडे बघितलं. त्वेर्स्काया स्ट्रीट माहीत आहे ना? त्वेर्स्कायावर हज़ारो
लोक जात होते, पण मी शप्पथ घेऊन सांगतो की तिने फक्त मला बघितलं. आणि
उत्तेजनेने नाहीं, तर काहीश्या पीडेने. तिच्या सौंदर्याने मला तेवढं
घायाळ नाही केलं, जेवढं तिच्या डोळ्यांत असलेल्या असाधारण, समजू न शकणा-या
एकटेपणाने!
“त्या पिवळ्या रंगामुळे मीसुद्धां गल्लीत वळलो आणि तिच्या मागे-मागे चालू
लागलो. आम्ही त्या वाकड्या-तिकड्या, कंटाळवाण्या गल्लींत चुपचाप चालंत होतो; मी एका बाजूला
आणि ती दुस-या बाजूला. आणि, कल्पना करा, गल्लींत एकही चिटपाखरू नव्हतं. मी व्याकुळ होतो, कारण मला असं
वाटंत होतं, की माझं तिच्याशी बोलणं गरजेचं होतं. आणि मी धास्तावलो होतो, की मी एकही शब्द बोलूं शकणार नाही आणि ती तिथून निघून
जाईल, मी तिला पुन्हां कधीही बघू शकणार नाही.
“आणि, बघा, ती एकदम म्हणाली:
“तुम्हांला माझी फुलं आवडलीत?”
“मला चांगलंच आठवतंय की त्या गल्लीत तिचा आवाज कसा घुमला होता; किंचित जाड, थांबंत-थांबंत - त्याची प्रतिध्वनि गल्लीत घुमली आणि
घाणेरड्या पिवळ्या भिंतीवर आदळून परत फिरली.
मी लगेच तिच्याकडे जात म्हटलं, “नाही!”
“तिने आश्चर्याने माझ्याकडे पाहिलं आणि मी, लगेच, अप्रत्याशितपणे, चक्क समजून चुकलो की ही तीच आहे, जिच्यावर मी
आयुष्यभर प्रेम करतोय! झाला नं चमत्कार, हँ? तू नक्की म्हणशील, वेडा आहे कां?”
“मी काहीच म्हणंत नाहीये,” इवानने उत्तर दिलं आणि म्हणाला, “पुढे सांग नं, प्लीज़!”
पाहुणा पुढे म्हणाला:
“हो, तिने आश्चर्याने माझ्याकडे बघितलं आणि पुन्हां विचारलं, ‘तुम्हांला फुलं
आवडंत नाहीत?”
तिच्या आवाजांत, कदाचित, आक्रामकता होती. मी तिच्या बरोबर-बरोबर चालंत होतो, तिच्या पावलाशी
पाऊल मिळवंत आनि मला जरा सुद्धां संकोच वाटंत नव्हता.
“नाही, आवडतांत फुलं, पण ही, असली नाहीं,”
मी म्हटलं.
“मग कसली?”
“मला गुलाब आवडतो.”
“मला दुःख झालं की मी असं कां म्हटलं, कारण की ती किंचित लाजली आणि तिने फुलं खड्ड्यांत फेकून
दिले. मी चाटंच पडलो. मी फुलं उचलून तिच्या हातांत देऊं लागलो, पण तिने हसून
त्यांना दूर सारलं. मीच फुलं हातांत धरून चालू लागलो.
असे चुपचाप आम्हीं तोपर्यंत चालंत होतो, जोपर्यंत तिने ती फुलं माझ्या हातांतून खेचून फुटपाथवर
नाही फेकून दिली. मग तिने आपल्या सुरेख काळा हातमोजा घातलेल्या हातांत माझा हात
घेतला आणि आम्हीं बरोबर चालूं लागलो.”
“मग?” इवानने विचारलं, “कृपा करून सगळं सांगा, काहीही सोडूं नका.”
“मग?” पाहुण्याने उलंट प्रश्न केला, “मग काय झालं, तुम्हीं स्वतःच अंदाज़ लावूं शकता. त्याने डोळ्यांत
अचानक आलेल्या अश्रूंना उजव्या हाताने पुसलं आणि सांगू लागला – “आमच्या समोर जसं
अचानक मूर्तिमंत प्रेम उसळून प्रकट झालं; जणु एखाद्या निर्मनुष्य गल्लींत ज़मिनीतून कोणी मारेकरी
प्रकट होतो, त्याने आम्हां दोघांना दचकवलंच!
जशी वीज दचकवते, जसा फिनिश सुरा दचकवतो!
नंतर तिने मला सांगितलं, की अशी ‘अचानक’ सारखी गोष्ट नव्हतीच, खरं म्हणजे आम्ही दोघं फार पूर्वी पासून एकमेकावर
प्रेम करंत आलोय, एक-दुस-याला न ओळखता, न बघता. ती कोण्या दुस-या माणसाबरोबर राहात होती आणि
मी सुद्धां तेव्हां…त्या...काय नाव...”
“कोणाबरोबर?” इवानने विचारलं.
“त्याच...ओह, तीच...अ...” पाहुणा बोट मोडंत म्हणाला.
“तुमचं लग्न झालं होतं कां?”
“हो, हो, म्हणूनंचतर मी आठवायचा प्रयत्न करतोय...लग्न झालं...वारेन्काशी, की मानेच्काशी, नाही, वारेन्काशी...रेघा-रेघांचा
ड्रेस घातलेली...म्यूज़ियम...पण मला आठवंत नाहीये.
“मग ती म्हणाली, की हातांत पिवळी फुलं घेऊन त्यादिवशी ती ह्याचसाठी
निघाली होती की मी तिला ओळखावं, आणि जर असं नसतं झालं तर ती विष खाऊन मरून गेली असती, कारण तिचं जीवन
एकदम पोकंळ आहे.”
“हो, प्रेमाने एका क्षणांत आम्हाला चकित केलं, मी ही गोष्ट त्याच दिवशी एका तासानंतर समजून गेलो, जेव्हां कुठेच
लक्ष न देता क्रेमलिनच्या नदीकडच्या भिंतीजवळ पोहोचलो. आम्ही अशा प्रकारे बोलंत
होतो, जणु कालंच एकमेकांपासून दूर झालो होतो, जणु एकमेकांना वर्षानुवर्षे ओळखंत होतो. दुस-या दिवशी
पुन्हां तिथेंच, मॉस्को नदीच्या किना-यावर भेटण्याचं वचन देऊन आम्ही
एकमेकांचा निरोप घेतला आणि सांगितल्याप्रमाणे भेटलो. मेचा सूर्य आम्हांला आलोकित
करायचा. आणि लवकरंच ती माझी बायको झाली, उघडपणे नाही, गुप्तपणे.
“ती रोज माझ्याकडे यायची, मी सकाळपासूनंच तिची वाट बघायचो. आपली अस्वस्थता
लपविण्यासाठी मी उगीचंच टेबलावर पडलेल्या वस्तू इकडे-तिकडे करायचो. ती यायच्या दहा
मिनिटांपूर्वीच मी खिडकींजवळ बसून जायचो
आणि गेटचा कानोसा घ्यायचो. आणि बघा : तिच्याशी माझी भेट व्हायच्या आधी आमच्या
अंगणांत क्वचितचं कुणी यायचं, खरं-खरं सांगायचं म्हटलं तर कुणीच नाही यायचं; आणि आता, मला असं वाटायचं
की जणु सम्पूर्ण शहरंच आमच्याकडे धावत येतंय. गेट वाजायचं, हृदय धडधडायचं, पण हाय, माझ्या
खिडकीलगतच्या पायवाटेवर दिसायची घाणेरड्या जोड्यांची एक जोडी. चाकूची धार करणारा.
कोणाला पाहिजे चाकूची धार करणारा? कशाची धार करायचीय? कुठले चाकू? कसले चाकू?
“ ती गेटमधून एकदांच
आत यायची, पण हृदय त्याआधी दहा तरी वेळा धडधडून जायचं. मी खोटं नाहीं सांगत. नंतर
जेव्हां तिची यायची वेळ व्हायची आणि घड्याळांत बारा वाजायचे, हृदय तोपर्यंत
धडधडंत राही, जोपर्यंत पावलांचा आवाज न करतां, चुपचाप, स्टीलचे सुंदर
बकल्स लावलेले काळे जोडे माझ्या खिडकीसमोरून जायचे.
“कधी कधी ती खोडकरपणाने दुस-या खिडकीजवळ थांबून आपल्या जोड्याच्या नोकेने काचेवर
ठक-ठक करायची. मी लगेच खिडकीजवळ धावायचो. जोडा गायब व्हायचा; काळी, उजेडाला रोखणारी
मखमल लुप्त व्हायची आणि मी तिच्यासाठी घराचे दार उघडायचो.
“आमच्या प्रेमाबद्दल कुणालांच कळलं नाही, हे मी अगदी पैजेवर सांगू शकतो, खरं तर असं कधी
होत नाही. पण ह्या बाबतीत तिच्या नव-याला , किंवा परिचितांना पत्ता देखील लागला नाही. त्या जुन्या
घरांत, ज्याच्या तळघरांत मी राहायचो, लोकांना फक्त येवढचं माहीत होतं, की माझ्याकडे
कुणी बाई येते, पण तिचे नाव कुणालांच माहीत नव्हते.”
“पण ती आहे कोण?” इवानने विचारलं, त्याला ह्या प्रेम प्रकरणांत कमालीची उत्सुकता वाटंत
होती.
पाहुण्याने खुणेनेंच सांगितलं की तो कधीसुद्धां कुणालाही ह्याबद्दल सांगणार
नाही. त्याने आपली गोष्ट चालू ठेवली.
इवानला कळून चुकले की मास्टर आणि ती अनोळखी महिला एकमेकांवर इतकं प्रेम करंत
होते की त्यांना दूर करणे अशक्य होते. इवान आपल्या कल्पनेंत तळमजल्यावरच्या दोन
खोल्या बघंत होता, तिथे लिलीच्या झाडांमुळे आणि कम्पाउन्डच्या
भिंतीमुळे नेहमी अंधुक प्रकाश असायचा; महोगनीचं जुनं फर्नीचर, अलमारी, त्यावर घड्याळ, जी दर तीस मिनिटांनी घंटे वाजवायची, आणि पुस्तकं –
खालपासून वरपर्यंत – आणि छोटीशी शेकोटी.
इवानला हे पण कळलं की त्याचा पाहुणा आणि त्याची रहस्यमय बायको आपल्या
संबंधांच्या सुरुवातीलाच समजून चुकले होते की त्या दिवशी त्वेर्स्काया रोडवर आणि
नंतर गल्लींत नशीबंच त्यांना खेचंत घेऊन गेलं होतं आणि हे सुद्धां, की अनंत
काळासाठी त्यांचा जन्म एकमेकांसाठीच झालाय.
पाहुण्याच्या वर्णनावरून इवानला कळले, की हे प्रेमी आपला दिवस कसे घालवायचे. आल्याबरोबर ती
एप्रन घालायची आणि त्या छोट्याश्या खोलींत, जिथे त्या रुग्णाचं प्रिय वाश-बेसिन होतं, लाकडाच्या टेबलवर
केरोसिन-स्टोव पेटवून नाश्ता तयार करायची. मग समोरच्या खोलींत टेबलवर नाश्ता
ठेवायची. जेव्हां मे महिन्यांत विजा कडकडायच्या, मुसळधार पाऊस पडायचा आणि त्यांच्या अंधुक पडलेल्या
खिडक्यांच्या जवळून पाणी झरझर वाहंत, ह्या आरामशीर घरट्यांत घुसायचा प्रयत्न करायचं, त्यावेळेस
प्रेमी शेकोटी पेटवायचे आणि त्यांत बटाटे भाजायचे. बटाट्यांमधून वाफ निघायची, त्यांचे काले
पडलेले सालटं बोटांनापण काळ करायचे. तळघरांत हास्याचे पडसाद ऐकूं यायचे; पावसानंतर बागेतील
झाडं आपल्या ओल्या फांद्या काढून फेकायचे. पावसाळ्यानंतर दमंट उन्हाळा आला आणि
फ्लॉवरपॉटमधे, ब-याच प्रतीक्षेनंतर दोघांच्या पसंतीचे गुलाब सजू
लागले.
तो, ज्याने आपलं नाव मास्टर सांगितलं होतं, लिहीत बसायचा आणि ती, केसांत आपले नाजुक बोटं घालून लिहिलेली पानं पुष्कळदां
वाचायची आणि वाचून झाल्यावर ह्या टोपीवर विणकाम करूं लागायची. कधी-कधी ती
अलमारीच्या खालच्या खणासमोर उक्कड बसायची किंवा टेबलवर चढून वरच्या खणासमोर उभी
राहायची आणि कापडाने शैकडो पुस्तकांचे धुळीने माखलेले कवर्स पुसायची. ती त्याच्या
प्रसिद्धीची कामना करायची, त्याला काम करायची प्रेरणा द्यायची आणि तेव्हांच ती
त्याला ‘मास्टर’ म्हणूं लागली. ती जूडियाच्या पाचव्या न्यायाधीशाबद्दल
लिहिल्या जाणा-या शब्दांची वाट बघायची, जोरजोरांत कादम्बरीतील आपल्या आवडीचे अनेक वाक्य
म्हणायची आणि सांगायची की ही कादम्बरी म्हणजे तिचा प्राण आहे.
कादम्बरी पूर्ण झाली ऑगस्टच्या महिन्यांत, एका टाइपिस्टने त्याच्या पाच प्रति टाइप केल्या. शेवटी
तो क्षणसुद्धां येऊन पोहोचला, जेव्हाँ गुप्त विसावा सोडून कठोर जगांत जायचं होतं.
“आणि मी जगांत निघालो, कादम्बरी हातांत घेऊन, आणि तेव्हां माझा जीवन संपुष्टांत आल,” मास्टर कुजबुजला
आणि त्याने मान खाली घातली. पिवळा रेशमी ‘एम’ असलेली बिचारी काळी टोपी बरांच वेळ इकडे तिकडे हलंत
होती. मग त्याने उरलेली कथापण सांगितली, पण आता त्याच्या क्रम तुटला होता. फक्त एकंच गोष्ट
समजंत होती की इवानच्या पाहुण्याच्या जीवनांत काहीतरी भीषण घटना घडली होती.
“मी साहित्य जगांत पहिल्यांदाच आलो होते, पण आता, जेव्हां सगळंच संपलं आहे आणि माझा अंत जवळ आहे, मी त्याबद्दल
विचार करताना हादरून जातो!” मास्टर उद्विग्नतेने पुटपुटला आणि त्याने आपला हात वर
केला – “हो, त्याने मला धक्कांच दिला, आह, कसला धक्का दिला!”
“कुणी?” उद्विग्न वक्त्याची विचार श्रूंखला मधेच तुटायच्या
भीतीने इवाननेसुद्धां हळुवारपणेच विचारलं.
“त्याच सम्पादकाने, मी सांगतोय नं, सम्पादकाने! तर त्याने माझी कादम्बरी वाचली. तो
माझ्याकडे असा बघत होता, जणू माझा गाल सुजलाय. घडी घडी वाकड्या डोळ्यांने एका
कोप-याकडे बघायचा आणि उगीचंच खी-खी करायचा. उगीचंच पाण्डुलिपि चुरगळायचा आणि
घुर्र-घुर्र करायचा. जे प्रश्न त्याने मला विचारले, ते पण अगदी मूर्खासारखे होते. कादम्बरीबद्दल काहीच न
विचारतां, त्याने मला हे विचारलं की मी आहे तरी कोण, कुठून आलोय, खूप दिवसांपासून लिहितोय कां, आणि माझ्याबद्दल
कुठेच, कशी, काही चर्चा नाहीये; आणि त्याने अगदीच मूर्खासारखा प्रश्न विचारला : मला
असल्या विचित्र विषयावर कादम्बरी लिहिण्यास कोणी प्रवृत्त केलंय?”
“त्याने प्रश्न विचारून-विचारून मला हैराण केलं, मी त्याला सरंळ-सरंळ विचारलं की तो माझी कादम्बरी छापणार
आहे किंवा नाही.
“ तेव्हां तो गडबडून गेला आणि म्हणाला, की तो एकटा ह्या संदर्भांत कोणतांच निर्णय घेऊं शकंत
नाही, ही कादम्बरी सम्पादक मण्डळाच्या इतर सदस्यांने वाचली पाहिजे; विशेषकर आलोचक
लातून्स्की आणि अरीमान, तसंच साहित्यकार म्स्तिस्लाव लाव्रोविचने2
तर वाचलीच पाहिजे. त्याने मला दोन आठवड्यानंतर यायला सांगितलं.
मी दोन आठवड्यानंतर परंत गेलो. माझं
स्वागत केलं एका मुलीने, जिचे डोळे नेहमी खोटं बोलण्यामुळे सतंत आपल्या
नाकाकडेच बघायचे.”
“ती लाप्शोन्निकोवा आहे, सम्पादकाची सेक्रेटरी,”
इवानने किंचित स्मित करंत म्हटलं. तो त्या जगाला
चांगलंच ओळखंत होता, ज्याचं विद्रूप वर्णन आत्ताच त्याच्या पाहुण्याने केलं
होतं.
“असेल,” त्याला एकदम मधेच थांबवंत पाहुणा म्हणाला, “तर तिने मला माझी
खूपंच चिक्कट झालेली, चुरगळलेली
कादम्बरी परंत केली. माझी नजर टाळंत लाप्शोन्निकोवाने सांगितलं, की सध्या प्रकाशन
गृहाकडे पुढच्या दोन वर्षांसाठी भरपूर साहित्य आहे, म्हणून माझी कादम्बरी छापण्याचा प्रश्नंच नाहीये.
“त्यानंतर मला काही आठवंत नाही,” मास्टर डोळे पुसंत बडबडला, “आठवतांत फक्त कादम्बरीच्या आवरणावर विखुरलेल्या लाल
पाकळ्या आणि माझ्या प्रियतमेचे डोळे. हो, ते डोळे मला अजूनही लक्षांत आहेत.”
इवानच्या पाहुण्याची गोष्ट आतां असम्बद्ध होत गेली, तो
इकडच्या-तिकडच्या गोष्टीपण तींत घुसवंत होता. कधी तो पावसाबद्दल बोलायचा आणि
त्यामुळे त्याच्या आरामशीर घरांत होणा-या त्रासाबद्दल, कधी म्हणायचा की तो कुठेतरी निघून गेला. कुजबुजंत
ओरडायचा आणि म्हणायचा की तो तिला जरासुद्धां दोष नाही देत, जिने त्याला ह्या
संघर्षांत ढकललं होतं – ओह, नाही, जरासुद्धां नाही.
“आठवतंय, आठवतंय, वर्तमानपात्रांत ठेवलेलं ते शापित परिशिष्ट,” पाहुणा कुजबुजला
आणि त्याने दोन्हीं हातांनी वर्तमानपत्राचं चित्र काढलं. पुढे सांगितलेल्या
असंबद्ध वाक्यांनी इवानला कळलं, की दुस-या एका संपादकाने वर्तमानपत्रांत कादम्बरीचा एक
मोठा अंश छापला होता, त्याच्या कादम्बरीचा, जो स्वतःला मास्टर म्हणायचा.
पाहुण्याच्या म्हणण्याप्रमाणे ह्या गोष्टीला दोन दिवससुद्धां झाले नव्हते, की आणखी एका
वर्तमानपत्रांत आलोचक अरीमानचा3 लेख छापून आला. लेखाचं शीर्षक होतं, ‘सम्पादकाच्या
पंखांखाली दडलेला शत्रू’, लेखांत म्हटलं होतं की इवानच्या पाहुण्याने
सम्पादकाच्या अनुभवहीनतेचा आणि बेअक्कलपणाचा फायदा घेऊन येशू ख्रिस्ताच्या
औचित्यास छापण्याचा प्रयत्न केला आहे.
“हो, आठवलंय, आठवलंय!” इवान ओरडला, “पण मी विसरून गेलो की तुमचं नाव काय छापलं होतं!”
“माझ्या नावाला विसरून जाऊया, मी पुन्हां सांगतो, आता माझं काही नाव नाहीये,”
पाहुण्याने उत्तर दिलं, “प्रश्न नावाचा नाहीये. आणखी एका दिवसाने आणखी एका
वर्तमान पत्रांत म्स्तिस्लाव लाव्रोविचचा लेख आला, ज्यांत लेखकाने पिलातवाद आणि ईश्वराच विद्रूप वर्णन
करणा-या त्या माणसावर जमून प्रहार करण्यास सांगितले होते, ज्याने त्याला
(पुन्हां तो शापित शब्द!) प्रेसमधे खेचले होते.
“ ‘पिलातवाद’ शब्दाने स्तंभित होऊन मी तिसरा पेपर उघडला. त्यांत दोन
लेख होते : पहिला लातून्स्कीचा आणि दुस-याच्या खाली होते अक्षरं ‘न.ए.’. मी तुला ठामपणे
सांगतो, की लातून्स्कीच्या लेखासमोर अरीमान आणि लाव्रोविचचे लेख अगदीच पांचट होते.
फक्त येवढंच म्हणणं पुरेसं आहे, की लातून्स्कीच्या लेखाचं शीर्षक होतं ‘लढवय्या रूढिवादी’ 4. माझ्याबद्दल लिहिलेल्या लेखांत मी इतका मग्न झालो होतो, की ती केव्हां (दार
बंद करायचेसुद्धां मी विसरून गेलो होतो) ओली छतरी आणि भिजलेले वर्तमानपत्र घेऊन
माझ्यासमोर उभी राहिली, हे सुद्धां मला कळलं नाही. तिचे डोळे आग पाखडंत होते, हात थरथरंत होते
आणि गारठले होते. आधी तर ती मला बिलगून माझं चुम्बन घेत राहिली आणि मग टेबलवर हात
मारंत म्हणाली, की ती लातून्स्कीला विष देऊन देईल.”
इवान गोंधळून किंचित खाकरला, पण काही बोलला नाहीं.
“दिवस अगदीच उदास, निर्जीव होते. कादम्बरी लिहून झाली होती, करण्यासारखं दुसरं
काहीच नव्हतं, म्हणून आम्हीं दोघं फक्त हेच करायचो, की शेकोटीसमोर
गालिच्यावर बसून ज्वाळांकडे बघंत राहायचो. आता आम्ही पूर्वीपेक्षा जास्त वेळ
एकमेकांपासून दूर राहायचो. ती हिंडायला निघून जायची. आणि मी आपल्या स्वतःमधे, आपल्या वास्तविक
रूपांत यायचो, जसं माझ्या आयुष्यांत फार कमी झालंय... अचानक, अप्रत्याशितपणे
मला एक मित्र भेटला. जरा विचार करा, तसा मी लोकांपासून दूरंच राहतो, अनोळखीपणाचा आव
आणतो, लोकांना भेटलो तरी अविश्वासाने, संशयाने; आणि बघा, आता माझ्या मनांत एक अनोळखी, अप्रत्याशित, न जाणे कोणच्या
रंग-रूपाचा माणूस सर्वांत जास्त भरला होता आणि तो मला सर्वांत जास्त
आवडायचासुद्धां.
तर, त्या दुर्दैवी काळांत आमच्या बगीच्याचे गेट उघडले. मला आठवतंय, दिवस हेमन्त
ऋतूतला, प्रसन्न होता. ती घरी नव्हती. गेटमधून एक माणूस आला. तो माझ्या घरमालकाकडे
काही कामानिमित्त आला होता; परंत बागेंत आला आणि लगेच माझ्याशी दोस्ती करून
घेतली. त्याने सांगितले की तो पत्रकार
आहे. तो मला इतका आवडला होता, की मला अजूनही त्याची फार आठवण येते. मग तो माझ्याकडे
वारंवार येऊं लागला. मला कळलं, की तो माझ्या बाजूच्यांच फ्लैटमधे राहातो, अगदी अश्याच
फ्लैटमधे, पण तो अगदीच लहान आहे वगैरे, वगैरे. त्याना मला कधीच स्वतःच्या घरी नाही बोलावले.
माझ्या बायकोला तो बिल्कुलंच नाही आवडला, पण मी त्याची तारीफ़ंच करायचो. तेव्हां ती म्हणाली:
“जे तुझ्या मनांत येईल, ते कर; पण मी सांगून ठेवते, की मला हा माणूस अगदी किळसवाणा वाटतो.”
मी हसलो. पण
विचार करण्यासारखी गोष्ट होती, की त्याने मला येवढं आकर्षित कां केलं होतं? खरं म्हणजे एक
साधा सरळ माणूस आपल्या पोटांत काहीतरी रहस्य दवडल्याशिवाय इतका चित्तवेधक असूंच
शकंत नाही. अलोइज़ी...हो, मी सांगायला विसरलो की माझ्या नव्या मित्राचं नाव
अलोइज़ी मगारिच होतं...तो रहस्यमय माणूस होता. इतक्या हुशार माणसाला मी आपल्या
जीवनांत कधीच भेटलो नव्हतो, आणि भेटणारही नाही. जर वर्तमान पत्रांतील एखाद्या
टिप्पणीचा अर्थ मला कळला नाही, तर अलोइज़ी चुटक्या वाजवंत मला समजावून द्यायचा, जणु काही हा
त्याच्यासाठी डाव्या हाताचा खेळ असायचा. दैनंदिन जीवन आणि त्याच्याशी संबंधित
समस्यांबद्दलसुद्धां असेच व्हायचे. पण हे तर काहीच नाही. मला आकर्षित केलं
त्याच्या साहित्य-प्रेमाने. जोपर्यंत माझी सम्पूर्ण कादम्बरी त्याने माझ्याकडून
वाचून नाही घेतली, तो स्वस्थ नाही बसला; कादम्बरीबद्दल त्याने खूपंच चांगला अभिप्राय दिला, पण सम्पादकाची
ह्याबद्दल काय प्रतिक्रिया होती हेसुद्धां अचूक सांगितलं, जणू त्यावेळेस तो
तिथे हजर होता. त्याचे निष्कर्ष अगदी शंभर टक्के बरोबर असायचे. शिवाय त्याने
हेसुद्धां सांगितलं की माझी कादम्बरी कां नाही प्रकाशित होऊं शकली. त्याने सरळ-सरळ
सांगून टाकलं की अमुक-अमुक अध्याय काढून टाकावा लागेल...
वर्तमान पत्रांमधे तीव्र आलोचनात्मक लेख येतंच राहिले. सुरुवातीला तर मी
हसण्यावारी नेत असे, पण जशी-जशी त्यांची संख्या वाढंत गेली, माझ्या वागण्यांत
फरक पडूं लागला. दुस-या प्रकारची प्रतिक्रिया होती – आश्चर्याची. ह्या लेखांच्या
प्रत्येक पंक्तीत काही न काही खोंटं आणि अविश्वसनीय ज़रूर असायचं; भले ही ते मोठ्या
दमदार शैलींत लिहिलेले कां नसो. मला असं वाटायचं, की ह्या लेखांचे लेखक ते नाहीं सांगंत आहेत, जे त्यांना खरोखर
सांगायचंय, म्हणूनंच त्यांची आलोचना इतकी तीव्र होत चाललीय. मग आली तिसरी अवस्था –
भीतीची. भीति त्या लेखांची नाहीं, पण अश्या वस्त्तूंची ज्यांचा कादम्बरीशी जरासा सुद्धा
सम्बंध नव्हता. जसं, मला अंधाराची भीति वाटू लागली. अर्थात, ही अवस्था मानसिक
रोगाची, वेडेपणाची होती. मला रात्रभर लाइट उघडा ठेवून झोपावे लागे, कारण की नेहमी
भीति वाटायची, की बंद खिडक्यांतून लांब-लांब तंतूंचा कोणी ऑक्टोपस
उडी मारून खोलीत शिरेल.
“माझी प्रियतमासुद्धां बरीच बदलली होती, जरी मी तिला ऑक्टोपसबद्दल काहींच सांगितले नव्हते, तरी तिला कळंत
होतं की माझ्याबरोबर काही तरी विचित्र घडतंय. ती कृश झाली, फिक्कट पडली, तिचं हसूं जणु
कुठेतरी हरवलं. ती माझी क्षमा मागायची, फक्त येवढंच म्हणायची, की तिच्याचमुळे माझ्यावर हा प्रसंग ओढवलाय. तिने जर
कादम्बरी पूर्ण करायचा हट्ट नसता केला, तर हे सगळं झालंच नसतं, तिने जर कादम्बरीचा एक अंश छापण्याचा हट्ट नसता केला, तर सगळं जग माझ्यामागे
लागलं नसतं. तिने म्हटलं की मी सर्व काही सोडून एक लाख रूबल्समधून उरलेल्या रकमेंत
दक्षिणेंत ब्लैक-सी च्या किना-यावर जाऊन राहावे.
“ती खूपंच हट्ट करूं लागली आणि मला तिच्याशी वाद घालायचा नव्हता, (मला पूर्वाभास
झाला होता की मी ब्लैक-सीला नाही जाऊं शकणार) मी शब्द दिला की लवकरंच जाईन; पण तिने म्हटलं
की माझं टिकिट तीच काधेल. तेव्हां मी उरलेले पैसे, जे जवळ-जवळ दहा हजार रूबल्स होते, तिच्या हातांत
दिले.
“येवढे कशाला?” तिला आश्चर्य झाला. मी म्हटलं की मला चोरांची भीति
वाटते, आणि मी जाईपर्यंत हे धन सुरक्षित ठेवण्याची विनंती केली. तिने पैसे पर्समधे
ठेवले आणि माझं चुम्बन घेत म्हणाली, की मला अश्या स्थितींत सोडून जाण्यापेक्षां मरण बरं, पण घरी तिची वाट
बघंत असतील, तिचा नाइलाज आहे आणि ती उद्या पुन्हां येईल. तिने मला कशालांच न घाबरण्याची
विनंती केली.
“हे झालं ऑक्टोबरमधे, संध्याकाळच्या अंधुक प्रकाशांत. ती चालली गेली. ती
गेल्यावर मी लाइट न लावतां सोफ्यावर लोळलो आणि माझा डोळा लागला. अचानक मला असा
आभास झाला की खोलींत ऑक्टोपस आहे. अंधारांत चाचपडंत मी लैम्प लावला. माझ्या
पॉकेट-वाचमधे रात्रीचे दोन वाजले होते. मी स्वतःला आजारी अनुभवंत झोपलो होतो, उठल्यावर खरोखरंच
आजारी झालो होते. मला वाटलं, की शिशिराचा अंधार खिडक्यांच्या काचांतून आत घुसतोय
आणि मी त्यांत बुडंत चाललोय. मी आपलं मानसिक संतुलन हरवून बसलो होतो. मी किंचाळंत
कुणाकडेतरी जाण्यासाठी हातपाय मारूं लागलो, मग तो वरच्या मजल्यावर राहणारा माझा घरमालक कां नसो.
मी वेड्यासारखा हात-पाय मारूं लागलो. उरली-सुरली शक्ति एकवटून मी शेकोटीजवळ आलो
आणि आत ठेवलेल्या लाकडांचा जाळ केला. जेव्हां ते चटचट आवाज करंत जळूं लागले आणि
शेकोटीच्या लहानश्या दारावर आवाज करूं लागले, तेव्हां मला थोडा सा धीर आला. मी समोरच्या खोलींत गेलो, तिथे लाइट लावला, पांढ-या वाइनची
बाटली काढली आणि तिचं झाकंण काढून बाटलीनेच गटगट पिऊ लागलो. माझी भीतो आता पुष्कळ
कमी झाली होती – घर मालकाकडे जाण्याऐवजी मी शेकोटीजवळ आलो, मी शेकोटीच दार
उघडलं, ज्याने गरम हवा माझ्या हातांना आणि चेह-याला भाजूं लागली आणि कुजबुजली: ‘तुला कळतंय ना, की माझ्यावर
आपत्ति ओढवलीयं?...ये, ये, ये!’
“पण कोणीच नाही आलं. शेकोटींत ज्वाळा गरजंत होत्या, खिडकीवर पाऊस
आदळंत होता. आणि मग जणु काही ह्या सगळ्याचा अंतिम चरण येऊन ठेपला. मी टेबलाच्या
ड्रावरमधून जाडजूड कादम्बरीचं हस्तलिखित आणि ड्राफ्ट-नोट्स काढले आणि त्यांना जाळू
लागलो. हे फार कठीण काम आहे, कारण की लिहिलेला कागद सहजासहजी जळंत नाही. आपल्या
नखांना जखमी करंत मी पानं फाडंत गेलो. त्यांना लाकडांच्या मधे उभं ठेवत गेलो आणि
चिमट्याने आत घुसवंत गेलो. त्यांची राख मधून-मधून कागदांना लवकर-लवकर जळूं देत
नव्हती, राख ज्वाळांचा गळा दाबंत होती, पण मी तिच्याशी संघर्ष करंत राहिलो आणि माझी
कादम्बरीसुद्धां जबर्दस्त प्रतिकार करून सुद्धां नष्ट होत गेली. माझ्या
डोळ्यांसमोर चिर परिचित शब्द नाचंत होते. पिवळेपण खालून वर सरकंत पानांना वेढा
घालंत होतं. पण शब्द ज्वाळांमधूनसुद्धां चमकंत होते. ते फक्त तेव्हांच लुप्त झाले, जेव्हां कागद
काळे झालेत आणि मी चिमट्याने त्यांचा चुरा करंत राहिलो.
इतक्यांत खिडकीवर हळूच खरचटल्याचा आवाज आला. माझं हृदय उसळलं आणि मी शेवटची
पानं शेकोटीत फेकून दार उघडण्यासाठी धावलो. पाय-या तळघरांतून अंगणाकडच्या
दारापर्यंत जात होत्या. कसा तरी धडपडंत मी दाराजवळ पोहोचलो आणि विचारलं:
“कोण आहे?”
“आणि त्या आवाजाने, तिच्या आवाजाने उत्तर दिलं, “मी आहे...”
“माहीत नाही कसं मी दार उघडलं. आत येतांच ती मला बिलगली. ती पूर्ण ओली होती.
ओले गाल, विस्कटलेले केस, थरथरणारी काया. मी फक्त येवढंच म्हणू शकलो:
“तू...तू?” आणि माझा आवाज तुटला. आम्ही खाली धावलो. तिने पटकन्
कोट काढून फेकला आणि आम्हीं लगेच पहिल्या खोलीत आलो. हलक्या आवाजांत ओरडून तिने
उघड्या हातांनी शेकोटीतून ती शेवटची पानं बाहेर काढली, जी जळायची राहून गेली होती. खोलीत धूर भरला होता. मी
पायांनी आग विझवली. ती सोफ्यावर लवंडली आणि हुंदके देत-देत रडंत राहिली.
ती थोडी शांत झाल्यावर मी म्हटलं, “मला ह्या कादम्बरीचा तिटकारा वाटतो आणि मला भीति
वाटते. मी आजारी आहे. मला खूप भीति वाटतेय.”
ती उठली आणि म्हणाली, “अरे देवा, तू कित्ती आजारी आहेस! कां? कशासाठी? पण मी तुला वाचवीन, वाचवीन मी तुला. हे काय झालंय?”
“मी धुराने आणि रडण्याने सुजलेल्या तिच्या डोळ्यांत बघितलं. मला भास झाला की
तिचे थंड हात माझ्या कपाळाला थोपटंत आहेत.
“मी तुझा इलाज करीन, तुला बरं करीन,”
ती पुटपुटली, माझ्या खांद्यांना पकडून म्हणाली, “तू तिला
पुनर्जीवित करशील. ओह, हिची एक प्रत मी माझ्याजवंळ कां नाही ठेवली!”
ती रागाने दात-ओठ खात होती, काहीसं असंबद्ध पुटपुटंत होती. मग ओठ दाबून किनारीवर जळलेली
पानं गोळा करूं लागली. कादम्बरीच्या मधलाच कोणचा तरी प्रसंग होता, आठवंत नाही
कोणचा. तिने ती पानं ओळीने लावली, त्यांना एका कागदांत गुण्डाळलं. त्यावर एक रिबिन
बांधली. तिच्या हालचालीवरून असं वाटंत होतं की तिने काहीतरी निश्चय केला आहे आणि
स्वतःवर ताबा मिळवला आहे. तिने थोडीशी वाइन मागितली आणि पिऊन झाल्यावर शांतपणे
म्हणाली:
“बघ, अशी द्यावी लागते खोटेपणाची किंमत...” ती बोलंत होती, “माझी आणखी खोटं
बोलायची इच्छा नाही. मी आत्तांसुद्धां तुझ्याजवळ थांबू शकते, पण हे मला अशा
प्रकारे करायचं नाहीये. माझी अशी इच्छा नाहीये, की त्याने नेहमी हा विचार करावा, की मी रात्री
त्याच्या घरांतून पळून गेले. त्याने मला कधीच काही दुःख नाही दिलं. त्याला अचानकंच
बोलावले. त्याच्या फैक्ट्रीत आग लागलीय. पण तो लवकरंच परंत येईल. मी उद्या सकाळी
त्याला सगळं सांगून टाकेन. सांगून देईन की माझं कुणा दुस-यावर प्रेम आहे आणि मग मी
नेहमीसाठी तुझ्याकडे येऊन जाईन. बोल, तू नाही तर म्हणणार नाहींस?”
“माझी लाडकी, भोळी सखी,” मी तिला म्हटलं, “मी तुला असं करण्याची परवानगी नाही देणार. माझं
भविष्यतर अंधारांत आहे आणि माझी अशी बिकुल इच्छा नाही, की माझ्याबरोबर तू सुद्धां कणाकणाने नष्ट व्हावंस.”
“फक्त हेंच कारण आहे?”
“फक्त हेंच!”
तिच्या जिवांत जीव आला. ती मला बिलगली. माझे खांदे थोपटंत म्हणाली, “तर मी पण
तुझ्याबरोबरंच मरेन. सकाळी मी तुझ्याकडे येतेय.”
“बस, हीच माझ्या जीवनातली, मला आठवणारी शेवटची गोष्ट आहे. बाहेरच्या खोलींतून
येणारी प्रकाशाची किरण...त्या उजेडांत विस्कटलेली केसांची बट...तिची हैट आणि
निश्चयाने भरलेले तिचे डोळे, बाहेरच्या उंबरठ्यावर असलेला अंधार आणि पांढरं
पैकेटसुद्धां आठवतंय.
“मी तुला सोडायला आलो असतो, पण माझ्यांत एकटं परंत यायची हिंमतंच नाहीये. मला भीति
वाटतेय.”
“घाबरू नको. बस, काही घण्टे वाट बघ. उद्या सकाळी मी तुझ्याबरोबर असेन,” – हेंच तिचे शेवटचे
शब्द होते.
“श्...श्...श्...!”
तेव्हांच रोग्याने स्वतःला थांबवंत म्हटले आणि बोट वर केलं, “आजची पूर्णचंद्राची
रात्र खूप बेचैन आहे.”
तो बाल्कनींत लपला. इवानने कॉरीडोरमधे चाकांच्या गाडीचा आवाज ऐकला, कोणीतरी हळूच विव्हळलं
किंवा ओरडलं.
जेव्हां सर्वत्र सामसूम झाली, तेव्हां पाहुणा पुन्हां परंत आला आणि त्याने सांगितलं
की 120नम्बरच्या खोलीत कोणी तरी आलंय. एका अश्या माणसाला आणलंय जो ही विनंती करतोय
की त्याचं डोकं त्याला परत मिळावं. दोघंही उत्तेजनेमुळे गप्प बसले. काही वेळ शांत
राहून आपल्या संभाषणावर परतले. पाहुण्याने काहीतरी बोलण्यासाठी तोंड उघडलं, पण रात्र खरोखरंच
खूप बेचैन होती. कॉरीडोरमधून अजूनही आवाज येत होते म्हणून पाहुण्याने इतक्या हळू
आवाजांत इवानच्या कानांत सांगायला सुरुवात केली, की फक्त कवीलाच त्याचं बोलणं ऐकूं येत होतं, पहिलं वाक्य
सोडून जे काही त्याने ऐकलं ते असं होतं:
“ती गेल्यावर पंधरा मिनिटांनी माझ्या खिडकीवर ठकठक झाली...”
मनोरुग्णाने इवानच्या कानांत जे काही सांग़ितलं, त्याने त्याला स्पष्टपणे खूपंच अशांत केलं होतं.
त्याच्या चेह-यावर घडी-घडी शहारे येत होते. त्याच्या डोळ्यांत भीति आणि रानटीपणाचे
भाव तरंगंत होते. तो घडी-घडी चंद्राकडे बोट दाखवंत होता, जो केव्हांचाच
बाल्कनीतून निघून गेलेला होता. जेव्हां बाहेरून येणारे सगळे आवाज शांत झाले, तेव्हां इवानचा
पाहुणा थोडं दूर सरकून बसला आणि म्हणाला:
“तर, जनवरीच्या मध्यांत, रात्री, त्याच कोटांत, ज्याच्या गुंड्या आता तुटून गेल्या होत्या5, मी आपल्या
अंगणांत थण्डीत कुडकुडंत होतो. माझ्यामागे बर्फाच्या टेकड्या, लिलीचे लपलेले
झुडुपं होते. माझ्यासमोर होत्या पडदे लावलेल्या माझ्या खिडक्या, ज्यांच्यांतून
मंद प्रकाश येत होता. मी पहिल्या खिडकीजवळ गेलो आणि ऐकूं लागलो - माझ्या खोलींत
पियानो वाजंत होता; मी फक्त ऐकूंच शकंत होतो, दिसंत काहीच नव्हतं. कांही वेळ थांबून मी बाहेर गल्लींत
निघून आलो. बर्फाचं तूफान सैतानी नाच करंत होतं. माझ्या पायांत कडमडणा-या एका
कुत्र्याने मला घाबरवून टाकलं. मी रस्त्याच्या दुसरीकडे धावलो, थण्डी आणि भीति, जे माझे सवंगडीच
झालेले होते, मला उन्मादापर्यंत घेऊन गेले. माझ्याकडे कोणताही
विसावा नव्हता. माझ्या गल्लीसमोरून जाणा-या ट्रामगाडीखाली जीव देण्याशिवाय
माझ्याकडे दुसरा काही विकल्प नव्हता. दुरून मी प्रकाशाने भरलेले, बर्फाने आच्छादित
डबे पाहिले आणि बर्फावर त्यांची करकर ऐकली. पण मित्रा, समस्या ही होती, की भीतीने माझ्या प्रत्येक अणुरेणूंत घर केलेलं होतं, आणि मी ट्रामगाडीला
सुद्धां असांच घाबरलो, जसा कुत्र्याला बघून घाबरलो होतो. माझ्या आजारापेक्षा
वाईट ह्या दवाखान्यांत आणखी दुसरा आजार नाहीये, हे मी ठामपणे सांगू शकतो!”
“पण तुम्हीं तिला कळवूं शकले असते,”
इवानने बिचा-या मनोरुग्णाबद्दल दिलगिरी प्रकट करंत
म्हटलं, “शिवाय तिच्याकडे तुमचे पैसे पण तर आहेत? कदाचित तिने संभाळून ठेवले असतील?”
“ह्यांत काही शंकांच नाहीं, ठेवलेच आहेत संभाळून. पण तू कदाचित मला समजूं शकला
नाहीस? किंवा, कदाचित, मीच आपली गोष्ट सांगण्याची क्षमता हरवून बसलोय. मला
ह्या गोष्टीचं जरासुद्धां दुःख नाहीये, कारण मला आता तिची गरंजच नाहीय. तिच्या समोर...” पाहुण्याने दूर अंधारांत दृष्टी लावंत म्हटलं, “ह्या
पागलखान्याचं पत्र पडलं असेल. आता तूंच सांग, ह्या पत्त्यावरून मी तिला कसा पत्र पाठवूं शकतो? मानसिक रुग्ण? तू चेष्टा करतोय, मित्रा! तिला
दुःख देऊं? मी हे नाही करूं शकत.”
इवानकडे ह्या तर्काचे उत्तर नव्हते, पण चुपचाप बसलेल्या इवानला पाहुण्याची पीडा जाणवंत
होती, त्याच्याबद्दल सहानुभूति वाटंत होती.
पाहुण्याने आठवणींत हरवून काळी टोपी घातलेलं आपलं डोकं हलवलं आणि म्हणाला, “गरीब बिचारी, मला विश्वास आहे, की ती मला
विसरलीच असेल!”
“तुम्हीं बरे पण होऊं शकता...” इवानने संकोचून म्हटलं.
“माझा आजार असाध्य आहे,” पाहुणा शांतपणे म्हणाला, “जेव्हां स्त्राविन्स्की म्हणतो, की तो मला माझं
जीवन परंत आणून देईल, तेव्हां माझा विश्वास नाही बसंत. तो एक सहृदय माणूस आहे
आणि मला फक्त सांत्वना देऊं इच्छितोय. पण मी ही गोष्टसुद्धां नाकारू शकत नाही, की मी आतां
पूर्वीपेक्षा बरांच सुधारलोय. तर, मी कुठे होतो? बर्फ, त्या उडत्या ट्रामगाड्या. मला माहीत होतं की हे
हॉस्पिटल सुरू झालेल आहे आणि मी सम्पूर्ण शहर पार करून येथे येण्यासाठी पाईच
निघालो. वेडेपणा! कदाचित, शहरातूंन बाहेर निघून बर्फामुळे जमूनंच गेलो असतो. पण
सौभाग्याने वाचलो. एका लॉरीमधे काही बिघाड झाला होता, मी ड्राइवरकडे आलो. हे ठिकाण चार किलोमीटर्स दूर होतं.
ड्राइवरला माझ्यावर दया आली. लॉरी इकडेच येत होती. आणि तो मला इथे घेऊन आला.
माझ्या पायांची बोटं जमून गेली होती, पण त्यांना बरं केलंय. आता चार महिन्यापासून मी येथे
आहे. मला इथे इतकं वाईट नाही वाटंत. माणसाने मोठ्या-मोठ्या योजना बनवूं नये, खरंच! जसं, मी जगभर फिरायचं
स्वप्न पाहत होतो, पण कदाचित ते माझ्या नशिबांत नाहीये. मी ह्या जगाचा एक
छोटा सा भागंच बघूं शकतो. हा भाग सर्वोत्तम तर नाहींच, पण वाईटसुद्धां नाहीये. आता लौकरंच उन्हाळा येईल.
प्रास्कोव्या फ्योदोरोव्ना म्हणते, की बाल्कनीवर वेल पसरेल. किल्ल्यांच्या जुडग्याने माझं
काम सोपं केलंय. रात्री चंद्र असेल. ओह, तो लपलाय! थोडंसं बरं वाटतंय. अर्धी रात्र संपलीसुद्धा.
आता मी निघालो”
“पिलात आणि येशूचे पुढे काय झाले?”
इवानने विनंती करंत म्हटलं, “मला ऐकायचं आहे. सांगा नं!!”
“ओह, नाही, नाही,” पाहुणा थरथर कापत म्हणाला, “आपल्या कादम्बरीच्या आठवणीनेच मला कापरं भरतं. पत्रियार्शीवर
जो तुला भेटला होता, तोच बरोबर सांगू शकतो. संभाषणाबद्दल धन्यवाद! पुन्हां
भेटूं!”
आणि इवानच्या काही लक्षांत येण्याअगोदरंच हलक्या आवाजाने जाळीचं दार बंद
झालं. पाहुणा गायब झाला.
**********
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें