मंगलवार, 7 नवंबर 2017

मास्टर आणि मार्गारीटा - 27



   सत्तावीस



क्वार्टर नम्बर 50चा अंत


जेव्हां मार्गारीटा “... अश्या प्रकारे निस्सान महिन्याच्या पंधराव्या तिथीच्या पहाटेचं स्वागत केलं जूडियाच्या न्यायाधीश पोंती पिलातने,” ह्या शेवटचा शब्दांपर्यंत पोहोचली, तेव्हां सकाळ झालेली होती.
विलो आणि लिंडेनच्या फांद्यांतून चिमण्यांचा प्रसन्न किलबिलांट ऐकू येत होता.
मार्गारीटाने खुर्चीतून उठून आळस दिला आणि तेव्हांच तिला कळलं, की ती किती थकलीये आणि तिला कित्ती झोप येतेय. मजेदार गोष्ट ही होती, की मार्गारीटाची आत्मा अगदी ठीक ठाक होती, तिचे विचार इकडे-तिकडे भरकटंत नव्हते, तिला जरासुद्धां आश्चर्य नव्हतं होत, की रात्र तिने अत्यंत विचित्रपणे घालवली होती. सैतानाच्या नृत्योत्सवांत स्वतःच्या उपस्थितीच्या आठवणी तिला त्रास नव्हत्या देत. तिला ह्या गोष्टीचंपण आश्चर्य नव्हतं वाटंत, की किती आश्चर्यजनक पद्धतीने तिचा मास्टर तिला परंत मिळाला होता, की राखेतून कादम्बरी पुनर्जीवित झाली होती, की त्या तळघरांत सगळं आपल्या पूर्वस्थितींत होतं, जिथून त्या चुगलखोर खब-या अलोइजी मोगारिचला काढून टाकलं होतं. थोडक्यांत म्हणजे, वोलान्दशी झालेल्या भेटीचा तिच्यावर कोणताही मानसिक परिणाम नव्हता झाला. सगळं तसंच होतं, जसं व्हायला पाहिजे होतं. ती बाजूच्या खोलींत गेली, खात्री करून घेतली, की मास्टर शांत आणि गाढ झोपेंत आहे, अनावश्यक टेबल लैम्प विझवून टाकला आणि स्वतःपण समोरच्या भिंतीलगतच्या दिवानावर झोपली, ज्याच्यावर जुनी, फाटकी चादर पडली होती. तळघराच्या दोन्हीं खोल्या शांत होत्या, कॉन्ट्रेक्टरचं छोटंस घर शांत होतं. त्या बंद गल्लींतसुद्धां सगळं शांत होतं.
पण ह्यावेळेस, म्हणजे शनिवारी सकाळी, मॉस्कोच्या एका ऑफिसचा सम्पूर्ण मजला जागा होता. मोट्ठ्या, सिमेन्टच्या चौकांत उघडणा-या त्याच्या खिडक्या, ज्यांना ह्यावेळेस मोट्ठ्या-मोट्ठ्या विशेष गाड्या मंद घरघरांट करंत ब्रशने स्वच्छ करंत होत्या, खूप चमकंत होत्या आणि सूर्याच्या प्रकाशाला भेदंत होत्या.
सम्पूर्ण मजला वोलान्दच्या केसच्या तपासांत व्यस्त होता. ऑफिसच्या डजनभर खोल्यांमधे रात्रभर लाइट जळंत होती.
खरं म्हणजे हा मामला आदल्या दिवशीच, म्हणजे शुक्रवारीच प्रकाशांत आला होता, जेव्हां व्यवस्थापकांची सम्पूर्ण टोळी गायब झाल्यावर आणि काळ्या जादूच्या त्या प्रसिद्ध ‘शो’नंतर झालेल्या लाजिरवाण्या, अपमानकारक घटनांमुळे वेराइटी थियेटरला बंद करावं लागलं होतं. पण विशेष गोष्ट ही होती की तेव्हांपासूनंच लागोपाठ होणा-या विचित्र घटनांची सूचना ह्या निद्राहीन मजल्यावर येतंच होती.
आता विशेषज्ञ मॉस्कोच्या विभिन्न भागांत घडंत असणा-या ह्या विचित्र केसच्या सैतानी, सम्मोहनकारी, चोरी-लबाडी, पेचांत टाकणा-या पैलूंना एका सूत्रांत गुंफायचा प्रयत्न करंत होते.
सगळ्यांत आधी ज्या माणसाला ह्या निद्राहीन, विजेच्या प्रकाशांत जगमगणा-या मजल्यावर बोलावण्यांत आलं, तो होता ध्वनि-संयोजक समितीचा प्रमुख अर्कादी अपोलोनोविच सिम्प्लेयारोव.
शुक्रवारी लंचनंतर त्याच्या कामेन्नी पुलाजवळच्या फ्लैटमधे घंटी वाजली आणि एका पुरुषी आवाजाने अर्कादी अपोलोनोविचला टेलिफोनवर बोलावलं. टेलिफोन उचलंत त्याच्या पत्नीने निराशेने सांगितलं, की अर्कादी अपोलोनोविचची तब्येत बरी नाहीये, म्हणून ते झोपलेयंत आणि टेलिफोनजवळ नाही येऊं शकंत. पण अर्कादी अपोलोनोविचला टेलिफोनजवळ यावंच लागलं. हे विचारल्यावर की अर्कादी अपोलोनोविचला कोण बोलावतंय, त्या आवाजाने थोडक्यांत सांगितलं, की तो  कुठून बोलतोय.
“लगेच...आत्तांच...आत्ता...लगेच...” साधारणपणे धृष्ठ असलेली प्रमुखाची पत्नी तीरासारखी शयनगृहांत जाऊन अर्कादी अपोलोनोविचला सोफ्यांतून उठवूं लागली, जिथे तो झोपला होता आणि कालच्या शोशी संबंधित नारकीय अनुभवांच्या आठवणीने थरथरंत होता. रात्री झालेला लफडा, ज्यांत सरातोवच्या त्याच्या भाचीला फ्लैटवरून काढून टाकलं होतं, त्याला विसरतां येत नव्हता.
खरोखरंच, एका सेकन्दात तर नाही, आणि एका मिनिटानंतर सुद्धां नाहीं, पण पाव मिनिटांतंच अर्कादी अपोलोनोविच डाव्या पायांत एक जोडा अडकवून, फक्त अंतर्वस्त्रांतच टेलिफोनजवळ येऊन म्हणाला, “हो, हा मीच आहे, ऐकतोय, ऐकतोय.”
त्याची बायको, आता, ह्यावेळेस त्या सगळ्या नीच आणि व्यभिचारी वर्तनाला विसरून, ज्याचा दोषी अर्कादी अपोलोनोविच होता, भयभीत चेह-याने दारातून बाहेर डोकावून कॉरीडोरमधे बघून घेत होती, आणि हवेंत जोडे दाखवंत कुजबुजंत होती:
“जोडे घाल, जोडे...पायांना थंडी लागेल,” ज्यावर अर्कादी अपोलोनोविच बिनजोड्याचा पाय हलवून बायकोला झिडकारंत होता आणि तिच्याकडे क्रूरतेने पाहात टेलिफोनवर बडबडंत होता:
हो, हो, हो, असं कसं, मला कळतंय...आत्ता निघतो.”
पूर्ण संध्याकाळ अर्कादी अपोलोनोविचने त्या मजल्यावरंच होता, जिथे तपास चालू होता. त्रासदायक वार्तालाप खूप वेळ चालू होता...अत्यंत अप्रिय होता हा वार्तालाप. सगळंच खरं-खरं सांगावं लागलं होतं, फक्त त्या घृणित कार्यक्रमाबद्दल आणि बॉक्समधे झालेल्या भांडणाबद्दलंच नाही, तर गोष्टी-गोष्टींमधे ते पण सांगावं लागलं, जे जरूरी होतं; एलोखोव्स्काया मार्गावर राहणा-या मिलित्सा अन्द्रेयेव्ना पाकोबात्काबद्दल, सरातोवच्या भाचीबद्दल, आणखीही बरंच काही, जे सांगताना अर्कादी अपोलोनोविचला अवर्णनीय दुःख होत होतं.
अर्कादी अपोलोनोविचने, जो एक बुद्धिमान आणि सुसंस्कृत व्यक्ती होता, जो त्या धक्कादयक शोचा प्रत्यक्षदर्शी होता, जो प्रत्येक गोष्ट नीट पारखू शकंत होता, ह्या शोचं सजीव चित्रण प्रस्तुत केलं; त्या रहस्यमय जादुगाराचं आणि त्याच्या दोन्हीं सहायकांचंसुद्धां; त्याला चांगलंच आठवंत होतं, की त्या जादुगाराचं नाव वोलान्द होतं. त्याच्या साक्षींनी तपासाच्या कामाला पुढे वाढवण्यांत बरीच मदत केली. अर्कादी अपोलोनोविचने सांगितलेल्या तथ्यांची इतर लोकांनी सांगितलेल्या गोष्टींशी तुलना केल्यावर - विशेषकरून अश्या महिलांच्या उत्तरांशी, ज्या शोच्या नंतर खूप त्रस्त झाल्या होत्या (ती, जी जांभळ्या अंतवस्त्रांमधे होती, जिने रीम्स्कीला आश्चर्यचकित केलं होतं, आणि, आणखीही अनेक महिला), पत्रवाहक कार्पोवच्या कथनाशी ज्याला सादोवायाच्या फ्लैट नं. 50मधे पाठवण्यांत आलं होतं – हे निश्चित झालं, की कोणत्या ठिकाणी ह्या सगळ्या चमत्कारांसाठी जवाबदार असलेल्या व्यक्तीला शोधतां येईल.
फ्लैट नं. 50मधे पण जाऊन आले, एकदांच नाही, तर अनेकदा आणि न केवळ त्याची व्यवस्थित तपासणी केली, तर भिंतीनासुद्धां ठोकून-ठोकून बघितलं, शेकोटीतून वर जात असलेले धुराचे पाइप्स तपासले, गुप्त जागा शोधल्या, पण ह्या सगळ्याचा काहीही परिणाम नाही निघाला आणि एकदासुद्धां त्या फ्लैटमधे कोणीही सापडलं नाही, तसं सतत असं वाटंत होतं, की फ्लैटमधे नक्कीच कोणीतरी आहे; ह्याविरुद्ध, ते सगळे लोक, जे मॉस्कोत येणा-या परदेशी लोकांबद्दल माहिती ठेवायचे, सांगंत होते की वोलान्द नावाचा कोणतांच काळ्या जादूचा जादुगार मॉस्कोत नाहीये आणि असूंपण शकंत नाही.
खरंच, त्याने मॉस्कोत आल्यावर कुठेच आपलं नाव नोंदवलं नव्हतं, कोणालाही आपलं पासपोर्ट किंवा अन्य काही डोक्यूमेन्ट दाखवलं नव्हतं; काही कॉन्ट्रॅक्ट, काही एग्रीमेन्ट...काहीही नाही आणि कोणीच त्याच्याबद्दल काहीच ऐकलेलं नव्हतं! थियेटर्सच्या प्रोग्राम्स-कमिटीचा प्रमुख कितायत्सेव शप्पथ घेऊन, हात जोडून सांगंत होता, की गायब झालेल्या स्त्योपा लिखादेयेवने वोलान्दच्या कार्यक्रमाशी संबंधित कोणतांच प्रस्ताव मंजूरीसाठी त्याच्याकडे पाठवलेला नव्हता., आणि त्याने वोलान्दच्या आगमनाबद्दल कितायत्सेवला फोनसुद्धां केला नव्हता. म्हणूनंच कितायत्सेवला काहींच कळंत नाहीये आणि काही माहीतपण नाहीये, की स्त्योपा वेराइटी थियेटरमधे अश्या कार्यक्रमाचं आयोजन कसा काय करूं शकला. जेव्हां त्याला हे सांगितलं, की अर्कादी अपोलोनोविचने स्वतःच्या डोळ्यांनी हा कार्यक्रम बघितला आहे, तर कितायत्सेव हात नाचवंत आकाशाकडे बघूं लागला. कितायत्सेवच्या स्वच्छ, पारदर्शी डोळ्यांकडे बघतांच कळंत होतं, की तो निर्दोष आहे.
तोच प्रोखोर पेत्रोविच, मुख्य दर्शक कमिटीचा प्रमुख...
बोलतां-बोलतां हे पण सांगून टाकतो, की जसेंच पोलिस त्याच्या खोलीत घुसले, तो आपल्या सूटमधे परत आला, ज्याने हैराण, त्रस्त आन्ना रिचार्दोव्नाला अत्यंत आनंद झाला आणि उगाचंच उत्तेजित होत असलेल्या पोलिसवाल्यांना झाला – चरम अविश्वास. आणखीही : आपल्या जागेवर परंत आल्यावर प्रोखोर पेत्रोविचने त्या सर्व निर्णयांची पुष्टी केली, जे त्याच्या अल्पकालीन गैरहजेरीत त्याच्या सूटने घेतले होते.
...तर, तोच प्रोखोर पेत्रोविच म्हणंत होता, की त्याला कोणत्याचं वोलान्दबद्दल काहीही माहीत नाहीये. आणि हे घ्या, तुमची इच्छा असो, वा नसो, एक फारंच विचित्र गोष्ट समोर आली : हज्जारो दर्शकांनी, वेराइटीच्या कर्मचा-यांनी, आणि उच्च शिक्षा प्राप्त सिम्प्लेयारोव अर्कादी अपोलोनोविचनेपण ह्या जादुगाराला आणि त्याच्या सहायकांना बघितलं होतं, पण त्याला शोधणं अशक्य झालं होतं. तर मग, मी तुम्हांला विचारूं शकतो का, की तो काय आपल्या घृणित प्रदर्शनानंतर लगेच जमिनींत गडप झाला कां, किंवा जसं काही लोकांच मत आहे, तो मॉस्कोला आलेलाच नव्हता? पण, जर पहिल्या गोष्टीवर विश्वास करावा, तर हेसुद्धां स्पष्ट आहे, की तो जमिनींत गडप होताना आपल्याबरोबर वेराइटीच्या सम्पूर्ण प्रशासनिक टीमला घेऊन गेला; आणि जर दुसरी गोष्ट खरी असेल, तर काय हे सिद्ध नाही होत, की ह्या बदनाम थियटरचे प्रशासक काही खतरनाक कारनामा करून (फक्त खोलीतली फुटलेली खिडकी आणि तुज़्बुबेनच्या विचित्र व्यवहाराकडेच लक्ष द्या) मॉस्कोतून काहीही माग न सोडतां गायब झाले?
जो ह्या तपासाचं नेतृत्व करंत होता, त्याची तारीफ़ करावीच लागेल. गायब झालेल्या रीम्स्कीला विस्मयकारी शीघ्रतेने शोधून काढण्यांत आलं. फक्त सिनेमा हॉलच्या जवळच्या टैक्सी स्टैण्डच्या जवळ तुज़्बुबेनच्या व्यवहाराचा वेळेच्या काही आकड्यांशी मेळ बसवावा लागला, जसं की शोकिती वाजतां संपला आणि रीम्स्की केव्हां गायब झाला असेल, म्हणजे लगेच लेनिनग्रादला तार पाठवतां येईल. एका तासाने उत्तर आलं (शुक्रवारी संध्याकाळी), की रीम्स्की एस्तोरिया1हॉटेलच्या चारशे बारा नंबरच्या खोलीत सापडला; चौथ्या मजल्यावरच्या त्या खोलीच्या बाजूला, जिथे मॉस्कोच्या एका थियेटरच्या प्रमुख कार्यक्रम-संयोजक थांबला होता, जो सध्या लेनिनग्रादच्या दौ-यावर आहे; त्याच खोलींत, जिथे, सगळ्यांना माहीतंच आहे, की भुरकट निळ्या रंगाचं सोनेरी चमकदार फर्नीचर आहे आणि सुंदर स्नानगृह आहे.
कपड्यांच्या अलमारीत लपून बसलेल्या रीम्स्कीला एस्तोरियाच्या चारशे बारा नंबरच्या खोलींतून बाहेर आणलं, त्याला लगेच अटक करून लेनिनग्रादमधेच विचारपूस करण्यांत आली. त्यानंतर मॉस्कोला टेलिग्राम पाठविण्यांत आला, की फिन-डाइरेक्टर कोणत्याही प्रश्नांच उत्तर देण्यास असमर्थ आहे, आणि तो फक्त येवढंच म्हणतोय, की त्याला बन्द बुलेटप्रूफ खोलींत सशस्त्र पोलिसांच्या कडक पहा-यांत ठेवावं. मॉस्कोहून टेलिग्रामनेच आज्ञा देण्यांत आली, की रीम्स्कीला कडक पहा-यांत मॉस्कोला आणण्यांत यावं, त्याप्रमाणे शुक्रवारीच संध्याकाळी कडक पहा-यांत रीम्स्की मॉस्कोसाठी रवाना झाला.
शुक्रवारीच संध्याकाळी लिखादेयेवचापण पत्ता लागला. सगळ्या शहरांमधे लिखादेयेवचं वर्णन करणारे टेलिग्राम्स पाठवण्यांत आले, आणि याल्टाहून उत्तर आलं होतं की लिखादेयेव याल्टांत होता, पण विमानाने मॉस्कोसाठी रवाना झाला आहे.
एकंच माणूस ज्याचा अजूनपर्यंत पत्ता नव्हता लागला, तो होता वारेनूखा. सम्पूर्ण मॉस्कोला परिचित असलेला तो थियेटरचा एडमिनिस्ट्रेटर जणू पाण्यांत बुडून गेला होता.
त्याबरोबरंच वेराइटीच्या बाहेर, मॉस्कोच्या अन्य ठिकाणी घडलेल्या घटनांचासुद्धां तपास करायचा होता.
सुंदर सागरगाण्यामागच्या असाधारण घटनेचे काय रहस्य होते, जे दर्शक कमिटीचे सगळे कर्मचारी गात होते, हे पण स्पष्ट करायचं होतं (हे सांगून टाकतो, की प्रोफेसर स्त्राविन्स्कीने काही इन्जेक्शन देऊन दोन तासांत त्यांना बरं केलं होतं), त्या माणसांचा पत्ता लावण आवश्यक होतं जे पैशाच्या नावावर दुस-या माणसांना किंवा संस्थांना सैतानंच जाणे काय देत होते, आणि त्यांचापण ज्यांना ह्याच्यामुळे त्रास झाला होता.
ह्या सगळ्या घटनांमधे सगळ्यांत अप्रिय, लफ़डेवालं आणि न सोडवतायेणारं कोड म्हणजे ग्रिबोयेदोव हॉलमधे कॉफिनमधे ठेवलेल्या मृत साहित्यिक बेर्लिओज़चं डोकं चोरण्याची घटना, जी अगदी दिवसा ढवळ्या घडली होती.     
बारा माणसांची तपास-कमिटी संपूर्ण मॉस्कोत पसरलेल्या ह्या अत्यंत कठिन केसचे विभिन्न धागे-दोरे एकत्र करण्यांत गुंतली होती.
एक तपासनीस प्रोफेसर स्त्राविन्स्कीच्या हॉस्पिटलमधे पोहोचला आणि सगळ्यांत आधी त्याने त्या लोकांची लिस्ट दाखवायला सांगितलं, ज्यांना मागच्या तीन दिवसांत हॉस्पिटलमधे आणलं होतं. अश्या प्रकारे निकानोर इवानोविच बासोय आणि दुर्दैवी सूत्रधार, ज्याचं डोकं उपटलं होतं, दिसले. त्यांच्याकडे, माहीत नाही कां, कमी लक्ष दिलं गेलं. आता हे सिद्ध करणं सोपं होतं, की हे दोघं एकाच टोळीचे शिकार झालेले होते, जिचं नेतृत्व रहस्यमय जादुगार करंत होता. पण इवान निकोलायेविच बिज़्दोम्नीने तपासनीसाचं लक्ष वेधलं.
इवानूश्काच्या खोली नं 117चं दार शुक्रवारी संध्याकाळी उघडलं आणि एक गोल चेह-याचा, शांत, सौम्य स्वभावाचा तरुण, जो बिल्कुल तपासनीसासारखा नव्हता - तसं पाहिलं तर तो एक उत्कृष्ट हेर होता - खोलींत आला. त्याने पलंगावर लोळलेल्या तरुणाकडे पाहिलं, ज्याच्या चेह-याचा रंग अगदी फिक्कट झाला होता आणि गाल आत गेले होते. त्या तरुणाच्या डोळ्यांत दिसंत होती आपल्या चारीकडे होत असलेल्या घटनांबद्दल पूर्ण उदासीनता, कधी हे डोळे कुठेतरी दूर, आजूबाजूच्या वातावरणाच्या वर, बघत होते, तर कधी स्वतःच्याच अंतरंगात डोकावंत होते.
तपासनीसाने मोठ्या प्रेमाने स्वतःचा परिचय दिला आणि म्हणाला की तो इवान निकोलायेविचला परवा पत्रियार्शीवर झालेल्या घटनेबद्दल विचारायला आलांय.
ओह, इवान कित्ती खूष झाला असता, जर हा हेर त्याच्याकडे आधी आला असता, कमींत कमी गुरुवारी रात्री, जेव्हां इवान आटोकाट प्रयत्न करंत होता की कुणीतरी त्याचं म्हणणं ऐकावं. आता त्या कन्सल्टेन्टला पकडायची इच्छाच मरून गेली होती; आता तर त्याला कोणाच्यामागे धावण्याची गरंज नव्हती, ते स्वतःच त्याच्याकडे चालून आले होते, हे विचारण्यासाठी की बुधवारी संध्याकाळी काय घडलं होतं.
पण, बेर्लिओज़च्या मृत्युपासून आतापर्यंत, इवानूश्का एकदम बदलला होता. तो हेराच्या प्रश्नांचे उत्तरं देण्यासाठी लगेच तयार झाला, पण इवानच्या चेह‌-यातून आणि त्याच्या बोलण्याच्या ढंगातून उदासीनता डोकावंत होती. आता कवी बेर्लिओज़च्या दुर्दैवाने हेलावला नव्हता.
तपासनीस यायच्या आधी इवान झोपेच्या गुंगीत होता आणि त्याच्या डोळ्यांसमोर अनेक दृश्य तरंगंत होते. जसं की, त्याने बघितलं एक विचित्र, अनाकलनीय, अस्तित्वहीन शहर...त्यांत संगमरमरचे ढीग, सूर्याच्या प्रकाशांत चमकणारे जीर्ण-शीर्ण छप्परं; अन्तोनियोची काळी, उदास आणि निर्दय मीनार; पश्चिमेकडच्या टेकडीवर असलेला प्रासाद, ज्याच्यावर छतापर्यंत दाट हिरव्या वेली लटकल्या होत्या; अस्त होत असलेल्या सूर्याच्या प्रकाशांत धगधगंत असलेल्या तांब्याच्या प्रतिमा, ज्या ह्या हिरवळीवर उभ्या होत्या. त्याने प्राचीन शहराच्या भिंतींखाली चालंत असलेले कवचधारी रोमन कमाण्डरपण पाहिले.
ह्या गुंगीत इवानच्या समोर आला खुर्चीवर निश्चल बसलेला एक माणूस, तिरस्काराने ह्या परक्या, बहरलेल्या उद्यानाकडे बघंत असलेला. इवानने निर्मनुष्य पिवळी टेकडीसुद्धां बघितली जिच्यावर रिकामे वध स्तम्भ उभे होते.
आणि म्हणूनंच पत्रियार्शी तलावाच्या जवळ घडलेल्या घटनेंत कवी इवान बिज़्दोम्नीला काहीही रस नव्हता.
“मला सांगा, इवान निकोलायेविच, तुम्हीं स्वतः त्या फिरत्या दरवाजापासून किती लांब होते, जेव्हां बेर्लिओज़ घसरून ट्रामच्या खाली पडला?”
इवानच्या ओठांवर मुश्किलीने कळणारे उदासीन स्मित तरंगले आणि तो म्हणाला:
“मी बरांच दूर होतो.”
“आणि तो चौकटीचा लम्बू दाराच्या जवळंच होता कां?”
“नाही, तो जवळंच पडलेल्या एका बेंचवर बसला होता.”
“तुम्हांला नक्की आठवतंय कां, की तो फिरत्या दाराजवळ तेव्हांच पोचला, जेव्हां बेर्लिओज़ पडून गेला होता?”
“आठवतंय. नाही पोहोचला. तो ऐसपैस बसला होता.”
हे तपासनीसाचे शेवटचे प्रश्न होते. ह्याच्यानंतर तो उठला, इवान समोर हात करंत त्याच्या शीघ्र स्वास्थ्य-लाभाची कामना केली आणि असाही विश्वास प्रकट केला, की लवकरंच त्याच्या कविता वाचेल.
“नाही,” इवानने हळूच उत्तर दिल, “मी आता आणखी कविता नाही लिहिणार.”
तपासनीस सौजन्याने हसला, त्याने म्हटलं की त्याला विश्वास आहे, की कवी सध्या निराशाजनक मनःस्थितीत आहे, पण ही लवकरंच निघून जाईल.
“नाही,” इवानने प्रत्युत्तर दिलं, तो तपासनीसाकडे बघंत नसून दूर विझंत असलेल्या क्षितिजाकडे बघंत होता, “ही स्थिती कधीच सम्पणार नाही, त्या कविता ज्या मी लिहिल्या होत्या – वाईट होत्या, आणि आता ही गोष्ट मी समजून चुकलोय.”
तपासनीस इवानकडून अत्यंत महत्वाची माहिती गोळा करून तिथून निघून गेला. शेवटाहून सुरुवातीपर्यंत घटनांचे टोकं पकडंत-पकडंत तो त्या उद्गमस्थळापर्यंत पोहोचला होता, जिथून ह्या घटना सुरू झाल्या होत्या. हेराची खात्री पटली होती, की ह्या घटनांची स्र्रुवात पत्रियार्शीवर झालेल्या हत्येपासून झाली होती. निश्चितंच, मासोलितच्या दुर्दैवी प्रमुखाला ट्रामच्या खाली ना तर इवानूश्काने, ना चौकटीच्या लम्बूने ढकललं होतं. त्याच्या ट्रामच्या चाकांखाली येण्यामागे ह्यांच्यापैकी एकही कारणीभूत नव्हता. पण हेराला ही खात्रीतर होती, की बेर्लिओज़ने आपणहूनंच स्वतःला ट्रामच्या खाली फेकलं होतं (किंवा तो तिच्या खाली पडला), कारण की तो सम्मोहनाच्या प्रभावाखाली होता.               
हो, बरेच प्रमाण एकत्रित झाले होते, हे सुद्धां कळलं होतं, की कोणाला पकडायचं आहे आणि कुठे पकडायचंय. पण मुद्दा हा होता, की पकडणं शक्यंच होत नव्हतं. त्या त्रिवार शापित फ्लैट नं. 50मधे, निश्चितंच, आम्हीं पुन्हां सांगू, की कोणीतरी होतं. कधी-कधी ह्या फ्लैटमधून टेलिफोनच्या घंट्यांचं भसाड्या किंवा चिरचि-या आवाजांत उत्तर दिलं जायचं, कधी-कधी फ्लैटची खिडकी उघडलेली असायची; कमालीची गोष्ट ही होती, की त्यांतून पियानोचा आवाज यायचा. पण, तरीही, दर वेळेस, तिथे कोणी गेलं तर त्याला कोणीही दिसायचं नाही; आणि तिथे अनेकदा, दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी गेले. फ्लैटमधे जाळी घेऊन गेले, सगळे काने-कोपरे तपासले. हा फ्लैट ब-याच दिवसांपासून संदेहास्पद झालेला होता. फक्त गल्लीच्या कोप-यावरून कम्पाउण्डपर्यंत येणा-या रस्त्यावरंच नजर ठेवली जात नसून, गुप्त दरवाज्याचीपण निगराणी केली जात होती. येवढंच नाही, छतावर निघणा-या धुराड्यांजवळसुद्धां पहारा बसवला होता. हो, फ्लैट नं. 50 खोड्या करतंच होता, पण त्याचं काहीही करणं अशक्यच होऊन बसलं होतं.                        
अशाप्रकारे हे काम लांबतंच गेलं, शुक्रवारपासून ते शनिवारच्या मध्य रात्रीपर्यंत, जेव्हां सामन्त मायकेल आपली सायंकालीन पार्टीची पोषाक घालून, चमकदार जोडे घालून अतिथी म्हणून फ्लैट नं. 50 मधे जात होता. ऐकूं येत होतं, की सामन्तला कश्याप्रकारे फ्लैटच्या आंत घेतलं गेलं, ह्याच्यानंतर बरोब्बर दहा मिनिटांनी, घंटी न वाजवता, फ्लैटची तपासणी केली, पण त्यांत होस्ट मालक सापडलांच नाही. आश्चर्याची गोष्ट तर ही होती, की तिथे सामन्त मायकेलचा पण पत्ता नव्हता.
तर, अश्या प्रकारे, जसं आम्हींच आधीच सांगितलंय, हे प्रकरण शनिवार सकाळपर्यत लांबलं. आता त्यांत आणखी काही नवीन रोचक तथ्य जोडले गेले. मॉस्कोच्या विमानतळावर एक सहा सीट्सचं लहानसं विमान उतरलं. ते क्रीमियाहून आलेलं होतं. इतर मुशाफिरांबरोबर त्यांतून एक विचित्र प्रवासी उतरला...हा एक तरुण नागरिक होता, दाढी वाढलेली, तीन दिवसांपासून आंघोळ न झालेली, सुजलेल्या, भयभीत डोळ्यांनी बघंत असलेला; बरोबर सामान नसलेला; वेशभूषापण विचित्रंच होती. त्या नागरिकाने एक उंच, मेंढ्याच्या चामड्याची टोपी घातली होती, नाइटसूटवर फक्त एक गाउनसारखं काहीतरी घातलं होतं, आणि पायांत नवीनंच विकंत घेतलेले निळे, सुरेख नाइट शूज़ होते. जसांच तो विमानाला लावलेल्या शिडीवरून खाली उतरला, त्याच्या जवळ ऑफिसर्स पोहोचले. ह्या नागरिकाची वाटंच बघंत होते, आणि थोड्याच वेळांत हा अविस्मरणीय तरुण, स्तेपान बोग्दानोविच लिखादेयेव तपास-कमिटीच्या समोर होता. त्याने नवीनंच माहिती दिली. आता स्पष्ट झालं, की वोलान्द कलाकारच्या रूपांत वेरायटीत घुसला, स्त्योपा लिखोदेयेवला सम्मोहित करून; आणि मग ह्याच स्त्योपाला त्याने चलाखीने मॉस्कोच्या बाहेर फेकून दिलं – देवंच जाणे, किती किलोमीटर्स दूर. तर, माहितीत तर भर पडली, पण ह्याने काम सोपं तर झालंच नाही, उलट, माफ करा, आणखीनंच गुंतागुंतीचं झालं, कारण की हे स्पष्ट कळलं होतं, की जो व्यक्ती अश्या प्रकारची गंमत करू शकतो, जिचा शिकार स्तेपान बोग्दानोविच झाला होता, त्याला पकडणं सोपं नव्हतं. लिखादेयेवला त्याच्याच विनंतीवर एका सुरक्षित बंद खोलींत ठेवण्यांत आलं. आता तपास-कमिटीच्या समोर प्रकट झाला वारेनूखा, ज्याला आत्ताच त्याच्या फ्लैटमधून पकडण्यांत आलं होतं, जिथे तो दोन दिवस गायब झाल्यानंतर परतला होता.
अजाज़ेलोला दिलेल्या वचनाविरुद्ध, की तो कधी खोटं नाही बोलणार, एडमिनिस्ट्रेटरने खोटं बोलण्यानेच सुरुवात केली. त्यासाठी त्याला अत्यंत कठोर शिक्षा देणंसुद्धां बरोबर नाहीये, कारण अजाज़ेलोने त्याला फोनवर खोटं न बोलायला आणि गुण्डगिरी करायला नाही म्ह्टलं होतं आणि ह्यावेळेस एडमिनिस्ट्रेटर फोनवर नव्हता बोलंत. डोळ्यांची उघडझाप करंत इवान सावेल्येविचने सांगितलं, की गुरुवारी दुपारी थियेटरच्या आपल्या खोलींत एकटा बसून तो खूप दारू प्यायला, त्याच्यानंतर तो कुठेतरी निघून गेला, पण कुठे – ते त्याच्या लक्षांत नाही. आणखी कुठेपण जुनी दारू प्यायला, पण कुठे – लक्षांत नाही. मग कुठेतरी पडून गेला, कोणच्यातरी कम्पाउण्डजवळ, पण कुठे – तेसुद्धां लक्षांत नाही. पण जेव्हां एडमिनिस्ट्रेटरला सांगण्यांत आलं, की तो आपल्या ह्या मूर्खपणाने एका महत्वपूर्ण केसच्या तपासांत अडथळा आणतो आहे आणि त्यालांच ह्यासाठी जवाबदार धरलं जाईल, तर वारेनूखा रडायला लागला आणि थरथरत्या गळ्याने शप्पथ घेऊन कुजबुजंत म्हणाला, की तो फक्त भीतीमुळे खोटं बोलतोय, कारण की त्याला भीती आहे, की वोलान्दची टोळी नक्कीच त्याच्याशी बदला घेईल, जिच्या हातांत तो आधीच पडलेला होता, आणि तो विनंती करतोय, की त्याला बुलेटप्रूफ सुरक्षित बंद खोलींत ठेवण्यांत यावं.                           
“छिःतू, सैतान! हे आणि ह्यांच्या बुलेटप्रूफ खोल्या!” तपास कमिटीचा एक सदस्य रागांत बडबडला.
“त्या दुष्टांनी ह्यांना भयानक भीती दाखवलीय,” त्या तपासनीसाने म्हटलं, जो इवानूश्काला भेटून आला होता.
वारेनूखाला जमेल तसं शांत केलं. त्याला वचन दिलं की इथेपण त्याची पूर्ण सुरक्षा केली जाईल. तेव्हां कुठे पत्ता लागला की तो काही दारू-बीरू नव्हता प्यायला, तर त्याला दोन लोकांनी मिळून मारलं होतं, ज्यांच्यापैकी एकाचे केस लाल होते, दात बाहेर निघालेला होता आणि दुसरा जाडा...”
“आह, बोक्या सारखा?”
“हो, हो, हो,” भीतीने अर्धमेला होत त्याने इकडे-तिकडे बघून कुजबुजंत सांगितलं. एडमिनिस्ट्रेटरने सविस्तर सांगितलं की त्याने फ्लैट नं. 50मधे रक्त-पिशाचाच्या रूपांत दोन दिवस कसे घालवले, आणि कसा तो फिन-डाइरेक्टर रीम्स्कीच्या मृत्यूचं कारण होता होता राहिला...
तेवढ्यांत रीम्स्कीला आत आणलं, ज्याला लेनिनग्रादहून ट्रेनने आणलं होतं. पण तो भीतीने थरथरंत असलेला, मानसिक रूपाने गडबडलेला पांढ-या केसांचा म्हातारा, ज्याच्याकडे बघून आधीच्या रीम्स्कीला ओळखणं खूप कठीण होतं, काही केल्या खरं सांगायला उत्सुक नव्हता, आणि ह्याबाबतींत खूपंच हट्टी निघाला. रीम्स्कीने सांगितलं की त्याने आपल्या खोलीच्या खिडकींत कोण्यताही हैला-बीलाला नाही पाहिलं आणि वारेनूखाला सुद्धां नाही बघितलं; त्याची फक्त तब्येत बिघडली होती आणि ह्या स्मृति-विभ्रमामुळे तो लेनिनग्रादला चालला गेला होता. हे सांगण्याची गरंज नाहीये, की हे सांगितल्यावर फिन-डाइरेक्टरने विनंती केली की त्याला बुलेटप्रूफ खोलींत ठेवावं.
अन्नूश्काला तेव्हां पकडण्यांत आलं, जेव्हां ती अर्बातच्या एका डिपार्टमेन्टल स्टोरमधे कैशियरला दहा डॉलर्सची नोट देत होती. अन्नूश्काची गोष्ट – सादोवाया बिल्डिंगच्या खिडकीतून उडून बाहेर जाणा-या लोकांबद्दल आणि घोड्याच्या नालेबद्दल, जी अन्नूश्काच्या म्हणण्याप्रमाणे तिने अशासाठी उचलली होती की तिला पोलिसांत जमा करतां येईल, खूप लक्ष देऊन ऐकली.
“घोड्याची नाल, काय खरोखरंच सोन्याची होती आणि तिच्यावर हीरे जडलेले होते?” अन्नूश्काला विचारलं.
“जणु काही मला हीरे-बीरे ओळखतांच येत नाहींत!अन्नूश्काने उत्तर दिलं.
“पण, जसं तुम्हीं सांगितलंय, त्याने तुम्हांला दहा रूबल्सचे नोट दिले होते.”
जणु काही मला दहा रूबल्सचे नोट ओळखतां येत नाहीत!” अन्नूश्काने म्हटलं.
“पण ते डॉलर्समधे केव्हां बदलले?”
“मला काही माहीत नाही, कुठले डॉलर्स, कसले डॉलर्स, मी काही डॉलर्स-वॉलर्स नाही बघितले,” अन्नूश्काने उत्तेजित होऊन म्हटलं, “आम्हीं आपल्या अधिकाराचा उपयोग करंत होतो! आम्हांला बक्षीस दिलं गेलं, आम्ही कापड खरेदी करायला गेलो...” आणि तिने म्हटलं, की ती हाउसिंग सोसाइटीच्या कोणत्याही कामासाठी जवाबदार नाहीये, जिने पाचव्या मजल्यावर सैतानांना पाळलंय, ज्याच्यामुळे जगणं कठीण होऊन बसलंय.
आता तपासकर्ताने पेनने खूण करंत तिला चूप राहायला सांगितलं, कारण की तिने सगळ्यांना खूप हैराण करून सोडलं होतं. तिला हिरव्या कागदावर बिल्डिंगमधून बाहेर जाण्याचं अनुमति-पत्र लिहून दिलं. तेव्हां सगळ्यांना आश्चर्यांत टाकंत अन्नूश्का त्या बिल्डिंगमधून गायब झाली.
ह्याच्यानंतर ब-यांच लोकांची एक रांगंच आली, ज्यांत निकोलाय इवानोविचपण होता, जो आपल्या ईर्ष्यालू बायकोच्या मूर्खतेमुळे पकडला गेला होता, जिने सकाळी पोलिसांत रिपोर्ट दिली होती, की तिचा नवरा गायब झालांय. निकोलाय इवानोविचच्या उत्तराने कमिटीला काहीच आश्चर्य नाही झालं, जेव्हां त्याने सैतानाच्या नृत्योत्सवांत घालवलेल्या रात्रीबद्दल एक विचित्र सर्टिफिकेट प्रस्तुत केलं. आपल्या गोष्टींमधे, की तो कसा हवेंत उडंत आपल्या पाठीवर मार्गारीटा निकोलायेव्नाच्या नग्न मोलकरणीला माहीत नाही कुठे, सगळ्या सैतानांबरोबर अंघोळ करायला नदीवर घेऊन गेला, आणि ह्याच्या आधी त्याने कसं मार्गारीटा निकोलायेव्नाला नग्नावस्थेंत खिडकींत बसलेलं पाहिलं होतं – निकोलायेविच सत्यापासून किंचित दूर झाला होता. उदाहरणार्थ त्याला हे सांगणं आवश्यक नाही वाटलं, की तो फेकलेला गाउन उचलून शयनकक्षांत गेला होता आणि त्याने नताशाला वीनसची उपमा दिली होती. त्याच्या शब्दांतून हा निष्कर्ष निघंत होता, की नताशा खिडकीच्या बाहेर उडाली, त्याच्यावर स्वार झाली आणि त्याला मॉस्कोच्या बाहेर घेऊन गेली.
“बल प्रयोगाच्या शक्यतेला घाबरून मला तिच्या हुकुमाचं पालन करावंच लागलं,” निकोलाय इवानोविच सांगत होता. त्याने आपली व्यथा-कथा ह्या विनंतीने पूर्ण केली, की त्याच्या बायकोला ह्याबद्दल काहीही सांगण्यांत येऊं नये.
निकोलाय इवानोविचच्या तपशीलाने हे सिद्धं करणं शक्य झालं, की मार्गारीटा निकोलायेव्ना आणि तिची मोलकरीण काहीही मागमूस न सोडतां गायब झाल्या आहेत. त्यांना शोधण्याचे उपाय करण्यांत आले.
अशा प्रकारे, क्षणभरही न थांबता चालंत असलेल्या ह्या तपासांतंच शनिवारची सकाळ उजाडली...
शहरांत ह्या दरम्यान अनेक अविश्वसनीय अफवा जन्म घेत राहिल्या, पसरंत राहिल्या, ज्यांत रत्तीभर सत्याला मणभर असत्याने सजवलं होतं. असं म्हणंत होते की वेराइटीत शोझाला होता ज्याच्या नंतर सगळेच दोन हजार दर्शक नग्नावस्थेंत उड्या मारंत रस्त्यावर आले होते, की बनावट नोट छापणा-या प्रेसचा सादोवायावर पत्ता लागला आहे, की एका टोळीने मनोरंजन विभागाच्या पाच अधिका-यांचं अपहरण केलंय पण पोलिसांनी त्यांना शोधून काढलंय, आणिआणखीही बरंच काही, ज्याची पुनरावृत्ती करण्यांत काही अर्थ नाही.
तोपर्यंत दुपारच्या जेवणाची वेळ झाली, आणि तेव्हां, तिथे, जिथे तपास चालू होता, टेलिफोनची घण्टी वाजू लागली. सादोवायावरून माहिती आली, की तो शापित फ्लैट पुन्हां जीवनाचे लक्षण दाखवतोय. असं सांगण्यांत आलं, की त्याच्या खिडक्या आतून उघडल्या गेल्या, त्यातून पियानो वाजायचा आणि गाण्याचा आवाज आला, आणि खिडकीच्या चौकटीवर ऊन शेकंत असलेला काळा बोका दिसला.
जवळ-जवळ चार वाजता, उन्हाळ्याच्या त्या दुपारी, सरकारी युनिफॉर्ममधे एक मोट्ठी टोळी तीन गाड्यांमधून सादोवायाच्या बिल्डिंग नं. 302-बीच्या जवळ उतरली. ही टोळी दोन छोट्या-छोट्या टोळ्यांमधे विभक्त झाली, एक टोळी गल्लीच्या वळणावरून कम्पाउण्डमधून सहा नंबरच्या प्रवेश द्वारांत घुसली; आणि दुसरीने साधारणपणे बंद राहणारं छोटं दार उघडलं, जे चोर दरवाज्याकडे जात होतं. ह्या दोन्हीं टोळ्या वेगळ्या-वेगळ्या जिन्यांनी फ्लैट नं. 50 कडे आल्या.  
ह्यावेळेस करोव्येव आणि अजाज़ेलो – करोव्येव उत्सवांतल्या काळ्या फ्रॉककोटमधे नसून आपल्या नेहमीच्या पोषाकांत होता – डाइनिंग हॉलमधे टेबलावर ब्रेकफास्ट घेत होते. वोलान्द आपल्या सवयीप्रमाणे, शयनगृहांत होता, आणि बोका कुठे होता, ते आम्हांला माहीत नाही, पण किचनमधून येत असलेल्या भांड्यांच्या खडखडाटाने अंदाज लावता येत होता, की बेगेमोत तिथेच आहे, काही तरी खोड्या करंत, आपल्या सवयीप्रमाणे.
“पाय-यांवर हा पावलांचा कसला आवाज आहे?” करोव्येवने ब्लैक कॉफीच्या प्याल्यांत पडलेल्या चमच्याशी खेळंत विचारलं.
“हे आपल्याला पकडायला येताहेत,” अजाज़ेलोने उत्तर दिलं आणि कोन्याकचा एक पैग पिउन गेला.
“आ...बरं, बरं,” करोव्येवने उत्तरादाखल म्हटलं.
आता पर्यंत पाय-या चढणारे तिस-या मजल्यावर पोहोचले होते. तिथे पाण्याचा नळ दुरुस्त करणारे दोन प्लम्बर्स बिल्डिंग गरम करणारा पाइप दुरुस्त करंत होते. येणा-यांने अर्थपूर्ण नजरेने प्लम्बर्सकडे पाहिलं.
“सगळे घरींच आहे,” त्यांच्यापैकी एक प्लम्बर म्हणाला, आणि हातोड्याने पाइपवर खट्खट् करंत राहिला.
तेव्हां येणा-यांपैकी एकाने आपल्या कोटाच्या खिश्यातूंन काळा रिवॉल्वर काढला आणि दुस-याने, जो त्याच्या जवळंच होता, काढली - मास्टर की’. फ्लैट नं. 50मधे प्रवेश करणा-यांजवळ आवश्यक असलेले हत्यार होते. त्यांच्यापैकी दोघांच्या खिशांत होत्या सहजपणे उघडणा-या पातळ, रेशमी जाळ्या होत्या, आणि एकाकडे होता – फास असलेला दोरखण्ड, आणखी एकाने घेतला होता – मास्क आणि क्लोरोफॉर्मच्या छोट्या-छोट्या कुप्या.
एका सेकन्दातंच फ्लैट नं. 50चं दार उघडलं आणि आलेले सगळे लोक प्रवेश कक्षांत घुसले. किचनच्या धडाम् करंत बंद झालेल्या दाराने हे सिद्ध केलं, की दुसरी टोळी पण अगदी त्याच वेळेस चोर-दरवाज्याने किचनमधे घुसली आहे.
ह्यावेळेस शंभर टक्के नाही, तरी थोडी फार सफलता मिळाली. हे लोक लगेच सगळ्या खोल्यांमधे पसरले, आणि त्यांना कुठेही कोणीच नाही सापडलं, पण डाइनिंग हॉलमधे आत्ताच अर्धवट सोडलेल्या ब्रेकफास्टच्या खुणा दिसल्या; आणि ड्राइंगरूममधे फायरप्लेसच्या वरच्या स्लैबवर क्रिस्टलच्या सुरईच्या शेजारी एक भव्य काळा बोका बसलेला दिसला. त्याने आपल्या पंजांमधे स्टोव पकडलेला होता.
अगदी शांत राहून, बराच वेळ, आलेले लोक लक्ष देऊन ह्या बोक्याकडे बघंत राहिले.
“हो...हो...खरंच कमालीची वस्तू आहे,” आगंतुकांपैकी एक कुजबुजला.
“मी गडबड करंत नाहीये, कोणालाही हातपण लावंत नाहीये, फक्त स्टोव्ह दुरुस्त करतोय,” बोक्याने तोंड वेंगाडंत म्हटलं, “आणि हे सांगण माझ कर्तव्य आहे, की बोका फार प्राचीन आणि परम पवित्र प्राणी आहे.”
“एकदम उत्कृष्ट काम आहे,” आगंतुकांपैकी एक कुजबुजला आणि दुसरा जो-याने आणि स्पष्टपणे म्हणाला, “तर, परम पवित्र गारुडवाणी (पोटबोला – तोंड न हलवता बोलणारा – अनु.)  बोके साहेब, कृपा करून इकडे या.”
रेशमी जाळी उघडली, ती बोक्याकडे उसळणारंच होती, की फेकणारा, सगळ्यांना विस्मित करंत अडखळला आणि फक्त सुरईच धरू शकला, जी छन् करंत तिथेच फुटली.
“हरले,” बोका गरजला, “हुर्रे!” आणि त्याने स्टोव्ह सरकावून पाठीमागून पिस्तौल काढली. त्याने लगेच जवळ उभ्या असलेल्या आगंतुकावर पिस्तौल ताणली, पण बोक्याच्या पिस्तौल चालवण्यापूर्वीच त्याच्या हातांत जणु वीज चमकली आणि पिस्तौल चालतांच बोकापण उल्टा होऊन फायरप्लेसच्या स्लैबवरून खाली पडूं लागला, त्याच्या हातांतून पिस्तौल सुटून दूर जाऊन पडली आणि स्टोव्हपण दूर जाऊन पडला.
“सगळं संपलं,” क्षीण आवाजांत बोका म्हणाला आणि धप्पकन् रक्ताच्या थारोळ्यांत पडला, “एका सेकंदसाठी माझ्यापासून दूर व्हा, मला धरणीमातेचा निरोप घेऊं द्या. आह, माझ्या मित्रा, अजाज़ेलो!” बोका कण्हला, “तू कुठे आहेस?” बोक्याने निस्तेज होत चाललेल्या डोळ्यांनी ड्राइंगरूमच्या दाराकडे बघितलं, “तू माझ्या मदतीला नाही आला, ह्या असमान युद्धांत तू मला एकटं सोडून दिलंस. तू गरीब बेगेमोतला सोडून दिलं, एका प्याल्यासाठी सोडून दिलं – खरंच, कोन्याकच्या एका सुरेख प्याल्यासाठी! चला, जाऊं द्या, माझी मृत्यु तुला शांति नाही लाभू देणार; तुझ्या आत्म्यावर ओझ्यासारखी राहील; मी आपली पिस्तौल तुझ्यासाठी सोडून जातोय...”
“जाली, जाळी, जाळी,” बोक्याच्या चारीकडे कुजबुज ऐकूं येत होती. पण जाळी, सैतानंच जाणे कां, कोणच्यातरी खिशांत अडकून गेली होती आणि बाहेरंच नाही निघाली.
“एकचं वस्तू, जी एका गंभीरपणे घायाळ झालेल्या बोक्याला वाचवूं शकते,” बोका म्हणाला, “ती म्हणजे बेंज़ीनचा एक घोट...” आणि आजूबाजूला होत असलेल्या गडबडीचा फायदा घेत तो स्टोव्हच्या गोल झाकणाकडे सरकून तेल पिऊन गेला. तेव्हां समोरच्या डाव्या पंजाच्या खालून निघंत असलेला रक्ताचा फवारा बंद झाला. बोक्याच्या जीवांत जीव आला, त्याने बेधडक स्टोव्ह बगलेंत दाबला, पुन्हां उडी मारून फायरप्लेसच्या वरच्या स्लैबवर बसून गेला. तिथून भिंतीवर लावलेला वॉलपेपर फाडंत वर रांगून गेला आणि दोनंच सेकंदांत आगंतुकांपासून खूप वर चढून लोखण्डाच्या कार्निसवर बसून गेला.
क्षणभरांतच त्याचे हात पडद्याला बिलगले आणि कार्निसबरोबर त्याला पण फाडंत गेले, ज्यामुळे खोलींत सूर्य घुसून आला, पण ना तर चलाखीने बरा झालेला बोका, ना ही स्टोव्ह खाली पडले. स्टोव्हला न सोडतां बोक्याने हवेंत हात हालवला आणि उडी मारून झुम्बरावर बसला, जे खोलीच्या मधोमध लटकंत होतं.
“शिडी!” खालून लोक ओरडले.
“मी द्वन्द-युद्धां साठी बोलावतोय!” झुम्बरावर बसून झोके घेत खाली उभ्या असलेल्या लोकांवर बोका गरजला, आणि त्याच्या हातांत पुन्हां पिस्तौल दिसली. स्टोव्हला त्याने झुम्बराच्या फांद्यांमधे अडकवलं होतं. बोक्याने घड्याळाच्या पेंडुलमसारखे झोके घेत खाली उभ्या असलेल्या लोकांवर गोळ्यांचा अंधाधुंध वर्षाव सुरू केला. गोळ्यांच्या आवाजाने फ्लैट हादरला. झुम्बरांतून पडलेले काचेचे तुकडे फरशीवर विखुरले, फायरप्लेसच्या वरती लावलेला आरसा ता-यांच्या आकारांत चटकला. प्लास्टरची धूळ उडूं लागली. रिकामे कारतूस फरशीवर उडू लागले, खिडक्यांचे काच फुटून खाली पडले, लटकंत असलेल्या स्टोव्हमधून तेल खाली पडू लागलं. आता बोक्याला जिवन्त पकडण्याचा प्रश्नंच नव्हता, आणि आगंतुकांनी रागाने आपल्या पिस्तुलांनी नेम धरंत त्याच्या डोक्यावर, पोटावर, छातीवर आणि पाठीवर दनादन गोळ्यांचा वर्षाव केला. ह्या गोळीबारीने बिल्डिंगच्या बाहेरच्या कम्पाउण्डमधे दहशत पसरली.
पण ही गोळीबारी जास्त वेळ नाही चालू शकली आणि आपणहून कमी झाली. कारण हे होतं, की ह्याने ना तर बोका, ना ही कोणी आगंतुक जखमी झाला. बोक्यासमेत कोणालांच काहीही इजा नाही झाली. ह्याची पुष्टी करण्यासाठी आगंतुकांपैकी एकाने ह्या धृष्ठ जानवरावर लागोपाठ पाच गोळ्या चालवल्या आणि ह्याच्या उत्तरांत बोक्यानेपण गोळ्यांची झडीच लावली, आणि पुन्हां तेच – कोणावरही जरासासुद्धां असर नाही झाला. बोका झुम्बरावर झोके घेत राहिला, ज्याचा आयाम हळू-हळू कमी होत गेला. माहीत नाही कां, पिस्तौलच्या मुठीवर फूक मारंत तो घडी-घडी आपल्या पंजावर थुंकत होता. खाली उभ्या असलेल्या लोकांच्या चेह-यांवर न जाणे कां अविश्वासाचा भाव पसरला. ही एक अद्भुत, अभूतपूर्व घटना होती, जेव्हां गोळीबारीचा कोणावरही, काहीही असर नव्हता झाला. असं वाटू शकतं की बोक्याची पिस्तौल खेळणं होती, पण आगंतुकांच्या पिस्तुलींबद्दल असं म्हणता येत नव्हतं. पहिलीच जखम, जी बोक्याला झाली होती, तीसुद्धां एक नाटकंच होती, ह्यांत काही शंका नाही, की ती लोकांचं लक्ष आपल्याकडे वेधण्याचा फक्त बहाना होती; अगदी तसाच, जसं बेंज़ीन पिणं.
बोक्याला पकडण्याचा आणखी एक प्रयत्न करण्यांत आला. फास असलेला दोरखण्ड फेकला गेला, जो एका मेणबत्तीत अडकला, झुम्बर खाली पडलं. त्याच्या झणझणाटाने सम्पूर्ण बिल्डिंग हादरली, पण ह्याने काही फायदा झाला नाही. तिथे उपस्थित असलेल्या लोकांवर काचेच्या तुकड्यांचा वर्षाव झाला, आणि बोका हवेंत उडून फायरप्लेसच्या वरती लावलेल्या आरश्याच्या सोनेरी फ्रेमच्या वरच्या भागावर जाऊन बसला. तो कुठेच जायला तयार नव्हता आणि उलंट आरामांत बसून आणखी एक भाषण देऊं लागला : “मला कळंत नाहीये...” तो वरून बोलला, “की माझ्याबरोबर होत असलेल्या ह्या खतरनाक व्यवहाराचं कारण काय आहे?”
तेवढ्यांत भाषणाच्या मधे टपकला एक जाड, खालच्या सुरातला आवाज, “फ्लैटमधे हे काय चाललंय? मला त्रास होतोय.”
आणखी एक अप्रिय, कर्कश आवाज म्हणाला, “नक्कीच हा बेगेमोत आहे, सैतान त्याला घेऊन जावो!”
तिसरा गडगडीत आवाज बोलला, “महाशय! शनिवारचा सूर्य अस्त होतोय. आपली जाण्याची वेळ झालीये.”
“माफ़ करा, मी तुमच्याशी आणखी नाही बोलूं शकणार,” बोका आरशाच्या वरून म्हणाला, “आम्हांला जायचंय.” त्याने आपली पिस्तौल फेकून खिडकीचे दोन्ही काच फोडून टाकले. मग त्याने तेल खाली सांडलं, आणि हे तेल आपणहून भडकलं. त्याच्या लपटा छतापर्यंत जाऊ लागल्या.
सगळं काही अत्यंत विचित्रपणाने जळंत होतं, अत्यंत शीघ्रतेने आणि सम्पूर्ण ताकदीनिशी, जसं कधी तेलाबरोबर होत नसतं. बघतां-बघतां वॉल पेपर जळून गेला, फाटलेला पडदा जळून गेला जो फरशीवर पडला होता आणि तुटलेल्या खिडक्यांच्या चौकटी वितळूं लागल्या. बोका उड्या मारंत होता, म्याँऊ-म्याँऊ करंत होता. मग तो आरशावरून उडी मारून खिडकीच्या चौकटीवर गेला आणि आपल्या स्टोव्हसकट तिच्यामागे लपून गेला. बाहेरून गोळ्यांचे आवाज घुमूं लागले. समोरून, जवाहि-याच्या बायकोच्या फ्लैटच्या ठीक समोरून, लोखण्डाच्या शिडीवर बसलेल्या माणसाने बोक्यावर गोळ्या झाडल्या, जेव्हां तो एका खिडकी वरून दुसरी खिडकी पार करंत बिल्डिंगच्या पाण्याच्या पाइपकडे जात होता, ह्या पाइपने बोका छतावर पोहोचला.
इथेपण त्याच्यावर पाइप्सजवळ असलेल्या निगराणी दलाने तसाच, बिनपरिणामाचा गोळीबार केला आणि बोका शहराला न्हाऊ घालणा-या अस्त होत असलेल्या सूर्याच्या प्रकाशांत चिंब झाला.
आतापर्यंत फ्लैटच्या आत असलेल्या लोकांच्या पायाखालची फरशी धू-धू करंत जळूं लागली होती, आणि तिथे, जिथे खोट्या जखमेने आहत होऊन बोका पडला होता, आता शीघ्रतेने आकुंचित होत असलेलं भूतपूर्व सामत मायकेलचं प्रेत दिसंत होतं, थिजलेले डोळे आणि वर खेचलेल्या हनुवटीसकट. त्याला खेचून बाहेर काढणं आता अशक्य होतं. फरशीच्या जळत्या स्लैब्सवर उड्या मारंत, हातांनी धुराने वेढलेले खांदे आणि छातीवर थपथप करंत, ड्राइंगरूममधे असलेले लोक आता स्टडीरूम आणि प्रवेशकक्षाकडे धावले. ते, जे शयनकक्ष आणि डाइनिंगरूममधे होते, ते कॉरीडोरमकडे पळाले. तेसुद्धां धावले जे किचनमधे होते. सगळे प्रवेशकक्षाकडे धावले. ड्राइंगरूम पूर्णपणे धुराने भरून गेला होता. धावतां-धावतां कोणीतरी अग्निशामक दलाचा नंबर फिरवून दिला आणि म्हणाला:
 “सादोवाया स्ट्रीट, तीनशे दोन बी!
आणखी थांबणं शक्य नव्हतं. ज्वाळा प्रवेशकक्षापर्यंत येऊं लागल्या. श्वास घेणं कठीण झालं होतं.
जसंच त्या जादुई फ्लैटच्या खिडक्यांमधून धुराचं पहिलं वादळ निघालं, अंगणांत लोकांच्या घाबरलेल्या किंकाळ्या ऐकूं आल्या:
“आग, आग, जळतोय!”
बिल्डिंगच्या इतर फ्लैट्समधून लोक टेलिफोन्सवर ओरडंत होते, “सादोवाया, सादोवाया, तीनशे दोन-बी!”
त्या वेळेस जेव्हां शहराच्या सगळ्या भागांत लाम्ब-लाम्ब लाल गाड्यांच्या घाबरवणा-या घंट्या ऐकूं येऊ लागल्या, अंगणांत थांबलेल्या लोकांनी बघितलं, की धुराबरोबर पाचव्या मजल्याच्या खिडकीतून पुरुषाची आकृति असलेल्या तीन सावल्या तरंगंत बाहेर आल्या, त्यांच्याबरोबर एक सावली नग्न महिलेच्या आकृतीचीपण होती.



************

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें