एकोणतीस
मास्टर आणि मार्गारीटाच्या
भाग्याचा निर्णय झाला
सूर्यास्ताच्या वेळेस शहरावरून खूप उंचीवर सुमारे
दीडशे वर्षांपूर्वी बनवलेल्या एका अतिसुन्दर इमारतीच्या दगडी छतावर दोन व्यक्ती
होते : वोलान्द आणि अजाज़ेलो. खालून रस्त्यावरून बघितल्याने ते दिसंत नव्हते, कारण की चीनी
मातीचे फ्लॉवरपॉट्स आणि चीनीमातीच्याच फुलांची जाळी त्यांना अनावश्यक नजरांपासून दूर
ठेवंत होते. पण ते मात्र शहराला अगदी शेवटच्या टोकापर्यंत बघू शकंत होते.
वोलान्द एका फोल्डिंग स्टूलवर आपला काळा सैल झगा घालून
बसला होता. त्याची लाम्ब आणि चौडी तलवार छ्ताच्या एक दुस-याला छेदणा-या
पट्ट्यांच्या मधे उभी होती, ज्याने सूर्य-घड्याळाचा आकार निर्माण झाला होता.
तलवारीची सावली हळू-हळू लाम्ब होत चालली होती आणि सैतानाच्या पायांत असलेल्या
काळ्या जोड्यांकडे येत होती. आपली टोकदार हनुवटी हातावर ठेऊन, एक पाय स्वतःच्या
खाली दुमडून बसलेला वोलान्द एकटक अगणित महाल, विशाल गगनचुम्बी इमारती आणि छोट्या-छोट्या झोपड्यांकडे, ज्या लवकरंच तोडल्या
जाणार होत्या, एकटक1 बघंत होता. अजाज़ेलो आपली आधुनिक वेशभूषा
– जैकेट, हैट, चकचकीत जोडे - सोडून वोलान्दसारखाच काळ्याच रंगाच्या पोषाकांत आपल्या
मालकापासून किंचित दूर निश्चल उभा होता. तो सुद्धां मालकासारखाच शहराकडे बघंत
होता.
वोलान्द म्हणाला, “किती मजेदार शहर आहे, हो ना?”
अजाजेलो किंचित हलला आणि आदरपूर्वक म्हणाला, “मालक, मला रोम जास्त
आवडतं!”
“हो, आपली आपली आवड आहे,”
वोलान्द म्हणाला. काही क्षणांनी त्याचा आवाज पुन्हां
आला, “हा त्या दुतर्फा झाडं असलेल्या रस्त्यावर कसला धूर आहे?”
“हे ग्रिबोयेदोव जळतंय,”
अजाज़ेलोने उत्तर दिलं.
“मी अंदाज़ लावूं शकतो का, की ही सदाबहार जोडी करोव्येव आणि बेगेमोत तिथे गेली
होती?”
“ह्यांत काही शंकाच नाही, मालक!”
पुन्हां शांतता पसरली आणि छतावर असलेल्या त्या दोघांनी
बघितलं की विशाल इमारतींच्या पश्चिमेकडे उघडणा-या खिडक्यांमधे, वरच्या मजल्यांवर
तुकडे झालेला, आपल्या प्रकाशाने दिपवणारा सूर्य धगधगतोय. वोलान्दचा
डोळासुद्धां तस्सांच धगधगंत होता, तशी त्याची पाठ अस्तंगत सूर्याकडे होती.
पण तेवढ्यांत कशाने तरी वोलान्दला मागे बघायला भाग
पाडलं. आता त्याचं लक्ष होतं गोल गुम्बदाकडे, जे छतावर त्याच्या पाठीमागे होतं. त्याच्यामागून
निघाला फाटके कपडे घातलेला, धुळीने माखलेला, काळी दाढी असलेला एक उदास माणूस. त्याने चोगा
घातला होता, पायांत स्वतःच बनवलेल्या चपला होत्या.
“ब्बा!” आगंतुकाकडे स्मित करंत बघून वोलान्द उद्गारला, “तू इथे येशील, अशी मला
जरासुद्धां आशा नव्हती! तू काय काही फिर्याद घेऊन आलायंस, अनाहूत, पण अपेक्षित
पाहुण्या?”
“मी तुझ्याकडे आलोय, वाईटाची आत्मा आणि सावल्यांच्या शासका,” येणा-याने
तिरप्या नजरेने वोलान्दकडे अमैत्रीपूर्ण भावनेने बघंत म्हटलं.
“जर तू माझ्याकडे आला आहेस, तर माझं अभिवादन कां नाही केलं, भूतपूर्व
टैक्स-कलेक्टर?” वोलान्दने गंभीरतेने विचारलं.
“कारण की तू चिरंजीवी व्हावंस अशी माझी इच्छा नाहीये,” आगंतुकाने
तीव्रतेने उत्तर दिलं.
“पण तुला हे मान्य करावं लागेल,” वोलान्दने
प्रतिवाद करंत म्हटलं आणि त्याच्या चेह-यावर कटु हास्य पसरलं, “छतावर येतांच
असभ्यपणा करूं लागलास. मी तुला सांगून ठेवतो, ही असभ्यता आहे – तुझ्या उच्चारणांत, बोलण्याच्या
पद्धतीत. तू आपल्या शब्दांचं उच्चारण अशाप्रकारे करतोस, की जणू तू सावल्यांना, दुष्टपणाला मानतंच नाही. तू ह्या प्रश्नावर विचार
करशील कां : जर दुष्टपणाचं अस्तित्व नसतं, तर तुझ्या चांगुलपणाला चांगुलपणा कोण म्हणेल? जर पृथ्वीवरून
सगळ्या सावल्या लुप्त झाल्या, तर ती कशी दिसेल? सावल्या बनंत असतात वस्तूंनी, व्यक्तींनी. ही
बघ माझ्या तलवारीची सावली. सावल्या झाडांच्यासुद्धा असतात आणि इतर सजीव
प्राण्यांच्यासुद्धा. तुला काय पृथ्वीवरून सगळ्या वृक्षांना आणि सजीव पदार्थांना
दूर करून पृथ्वीला नग्न करायंच आहे, फक्त नग्न प्रकाशाचा आनंद घेण्याच्या आपल्या
कल्पनेसाठी? तू मूर्ख आहे!”
“मला तुझ्याशी वाद नाही घालायचा, वृद्ध दार्शनिका,”
लेवी मैथ्यूने उत्तर दिलं.
“तू माझ्याशी वाद घालूपण शकंत नाही, कारण की तू मूर्ख
आहेस,” वोलान्दने उत्तर देऊन विचारलं, “पट्कन सांग, मला वैताग आणायला तू इथे कां आलायस?”
“मला त्याने पाठवलंय.”
“त्याने तुला काय संदेश देऊन पाठवलंय, दासा?”
“मी दास नाहीये,”
वाईट वाटून घेऊन मैथ्यूने उत्तर दिलं, “मी त्याचा शिष्य
आहे.”
“आपण नेहमीसारखेच एकमेकांशी वेगळ्या भाषांमधे बोलतो
आहे. पण ह्याने त्या गोष्टी बदलून तर नाही जात, ज्यांच्याबद्दल आपण बोलतो आहे. तर...” वोलान्दने आपला
मुद्दा अर्धवट सोडून दिला.
“त्याने मास्टरची कादम्बरी वाचलीये,” लेवी मैथ्यूने
म्हटलं, “तो तुला विनंती करतोय की तू आता मास्टरला आपल्या सोबत घेऊन जा आणि
पुरस्कारास्वरूप त्याला शांती प्रदान कर. हे तुझ्यासाठी कठीण आहे का, वाईटाची आत्मा?”
“माझासाठी काहीही कठीण नाहीये, ही गोष्ट तुलापण
चांगलीच माहीत आहे.” काही वेळ शांत राहून वोलान्द पुढे म्हणाला, “तू त्याला
आपल्याबरोबर प्रकाशांत का नेत नाहीस?”
“त्याची प्रकाशाची पात्रता नाहीये, त्याची शांतीची
पात्रता आहे,” लेवीने दुःखाने म्हटलं.
“सांगून दे, की काम होऊन जाईल,”
वोलान्दने उत्तर देऊन पुढे म्हटलं, “तू लगेच इथून
निघून जा,” त्याच्या डोळ्यांत निखारे चमकू लागले.
“तो विनंती करतोय, की जिने त्याच्यावर प्रेम केलं आणि त्याच्यासाठी दुःख
सोसलं, तिला पण तुमची शरण मिळावी,” लेवी पहिल्यांदा वोलान्दशी याचनेच्या स्वरांत बोलला.
“तुझ्याशिवाय तर आम्हांला ही गोष्ट समजलीच नसती. आता
नीघ!”
ह्यानंतर लेवी मैथ्यू गायब झाला, आणि वोलान्दने
अजाज़ेलोला जवळ बोलावून आज्ञा दिली:
“उडून त्यांच्याकडे जा, आणि सगळं व्यवस्थित करून ये.”
अजाज़ेलो छतावरून चालला गेला आणि वोलान्द एकटा राहिला.
पण थोड्यांच वेळासाठी. छतावर कोणाच्यातरी पावलांची चाहूल आणि काही प्रसन्न आवाज
ऐकूं आले, आणि वोलान्दच्या समोर आले करोव्येव आणि बेगेमोत. आता त्या जाड्याच्या हातांत
स्टोव नव्हता, त्याच्या अंगावर कित्तीतरी वस्तूंच ओझं होतं. बगलेत
दाबलेलं होतं सोनेरी फ्रेममध्ये जडवलेलं एक सुरेख लैण्डस्केप, बाहीवर टांगला
होता एका स्वयंपाक्याचा अर्धवट जळलेला एप्रन; दुस-या हातांत त्याने अक्खी सेल्मन पकडली होती – चामडी
आणि शेपटीसहित. करोव्येव आणि बेगेमोतच्या अंगातून जळका वास येत होता. बेगेमोतचा
चेहरा धुराने काळा झाला होता. त्याची टोपी अर्धवट जळून गेली होती.
“सैल्यूट, मालक,” ह्या मस्त जोडीने ओरडून अभिवादन केलं आणि बेगेमोतने
सेल्मन हालवली.
“खूप छान,” वोलान्द म्हणाला.
बेगेमोत आनंदाने आणि उत्तेजनेने म्हणाला, “मालक, कल्पना करा, ते मला दरोडेखोर
समजले!”
“तुझ्याकडे जे
सामान आहे,” वोलान्दने लैण्डस्केपकडे बघंत म्हटलं, “त्यावरून तू दरोडेखोरंच आहे.”
“तुम्हीं विश्वास करा, मालक...” बेगेमोत भावविह्वल आवाजांत सांगू लागला.
“नाही, नाहीं करंत,”
वोलान्दने संक्षिप्त उत्तर दिलं.
“मालक, मी शप्पथ घेऊन सांगतो, की जे शक्य होतं, ते वाचवण्यासाठी मी फार शौर्य दाखवलं. पण फक्त येवढंच
वाचवूं शकलो.”
“तू खरं-खरं सांग, की ग्रिबोयेदोव कसं जळालं?”
करोव्येव आणि बेगेमोत, दोघांनी हात हालवले आणि डोळे वर करून आकाशाकडे बघूं
लागले. मग बेगेमोर ओरडला, “खोटं नाही बोलंत! आम्ही चुपचाप आणि शांततेने खात
होतो...”
“आणि अचानक – त्राख, त्राख!” करोव्येवने पुष्टी केली, “गोळ्या चालू
लागल्या! भीतीने वेडे होऊन मी आणि बेगेमोत बाहेर पळालो; ते आमच्या मागे येत होते; आम्हीं तिमिर्याज़ेवच्या2 दिशेने धावलो!”
बेगेमोत मधेंच टपकला, “पण कर्तव्याचा भावनेने आमच्या भीतीवर जय मिळवला आणि
आम्हीं परंत आलो!”
“आह, तुम्हीं परंत गेलेत?”
वोलान्दने म्हटलं, “हूँ, तरीच! म्हणूनंच पूर्ण इमारत भस्म झाली.”
“अगदी भस्म!” करोव्येवने दुःखाने म्हटलं, “खरंच अगदी
पूर्णची पूर्ण! मालक, तुम्हीं एकदम बरोबर बोललात. फक्त धगधगते कोळसे!”
बेगेमोत सांगू लागला, “मी सम्मेलन कक्षाकडे धावलो, तोच ज्यांत स्तम्भ आहेत, हा विचार करून की एखादी बहुमूल्य वस्तू वाचवता येईल.
आह, मालक! जर मला बायको असती, तर तिच्या वीसवेळा विधवा व्हायचा धोका होता! पण, सौभाग्याने, मालक, माझं लग्नंच नाही
झालंय; आणि मी तुम्हांला स्पष्टंच सांगतो – मी सुखी आहे, की मी विवाहित नाहीये! आह, मालक! काय एका
अविवाहित आनंदाच्या ऐवजी कोणी भानगडींच बन्धन स्वीकारू शकतो!”
“पुन्हां सुरूं झाला मूर्खपणा,” वोलान्दने शेरा
मारला.
“ऐकतोय आणि पुढे सांगतो,”
बोक्याने उत्तर दिलं, “हो, तर हे लैण्डस्केप. त्या हॉलमधून आणखी काही बाहेर काढणं
शक्य नव्हतं, ज्वाळा माझा चेहरा भाजंत होत्या. मी खाली स्टोअरकडे
पळालो, आणि हा मासा वाचवला. किचनमधे धावलो, हा एप्रन वाचवला. मला वाटतं, मालक, की जे शक्य होतं, ते सर्व मी केलं, पण तुमच्या
चेह-यावरच्या व्यंगात्मक भावाचं कारण मला समजंत नाहीये.”
“आणि जेव्हां तू धावपळ करंत होता, तेव्हां करोव्येव
काय करंत होता?”
“मी आग विझवणा-यांची मदत करंत होतो, मालक,” करोव्येव आपल्या
फाटलेल्या पैन्टकडे खूण करंत म्हणाला.
“ओह! जर असं आहे, तर मग नवीन बिल्डिंग बनवावी लागेल.”
“ती बनेल, मालक,” करोव्येव म्हणाला, “मी खात्रीपूर्वक सांगतो.”
“ठीक आहे, तर मग मी कामना करतो, की ती आधीच्या बिल्डिंगपेक्षा जास्त चांगली असेल,” वोलान्दने
म्हटलं.
“असंच होईल, मालक!” करोव्येव म्हणाला.
बोका म्हणाला, “माझ्यावर विश्वास ठेवा, मी खरोखरचा पैगम्बर आहे.”
“बरं, आम्ही आलोय, मालक,” करोव्येव म्हणाला, “आणि तुमच्या हुकुमाची वाट बघतोय.”
वोलान्द आपल्या स्टूलवरून उठून नक्षीदार खांब असलेल्या
कठड्याकडे गेला आणि बरांच वेळ चुपचाप आपल्या टोळीकडे पाठ करून, दूर कुठेतरी बघंत
राहिला. मग तो कठड्यापासून दूर होऊन परंत आपल्या स्टूलवर बसला आणि म्हणाला, “काही हुकुम
नाहीये – तुम्हीं लोकांनी शक्य ते सगळं केलं आणि सध्यां मला तुमच्या सेवेची गरंज
नाहीये. तुम्ही लोक आराम करूं शकता. वादळ येणारेय; शेवटचं वादळ, ते सगळं काम पूर्ण करेल; आणि मग आपण निघू.”
“ठीकाय, मालक,” दोन्हीं जोकरांनी उत्तर दिलं आणि ते छताच्या मध्यवर्ती
गुम्बदाच्या मागे कुठेतरी लपले.
वादळ, ज्याच्याबद्दल वोलान्दने म्हटलं होतं, क्षितिजावर उठूं
लागल होतं. पश्चिमेकडून एक काळं ढग उठलं, ज्याने सूर्याला अर्ध कापून टाकलं. मग त्याने त्याला
पूर्णपणे झाकून घेतलं. छतावर चांगलं वाटायला लागलं. आणखी थोड्या वेळाने अंधार होऊ
लागला.
पश्चिमेकडून येणा-या ह्या अंधाराने त्या सम्पूर्ण
शहराला झाकून टाकलं, पुल आणि महाल गायब झाले. सगळं अदृश्य झालं, जणु त्याचं कधी
अस्तित्वंच नव्हत. सम्पूर्ण आकाशांत आगीची एक लकेर धावंत होती. मग शहरावर कडकड
करंत वीज पडली. दुस-यांदा विजेच्या कडकडाटानंतर मुसळधार पाऊस सुरू झाला, त्या अंधारांत
वोलान्द अदृश्य झाला.
**********
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें