मंगलवार, 21 नवंबर 2017

मास्टर आणि मार्गारीटा - प्रस्तावना


प्रस्तावना


“नैनं दहति पावकः...” हेंच तर म्हटतोय प्रस्तुत कादम्बरीचं एक पात्र – वोलान्द हस्तलिखिताबद्दल, की “हस्तलिखितं जळंत नसतात”. हेच सत्य आहे, न केवळ आपल्या नायकाच्या हस्तलिखिताच्या संदर्भात, पण सम्पूर्ण कादम्बरीच्याही संदर्भात; जिला तिच्या लेखकाने – हताश, निराश, आहत मिखाइल बुल्गाकोवने खरोखरंच शेकोटीत झोकून दिलं होतं, आणि जिची पुनर्रचना फक्त त्याच्या स्मरणशक्तीमुळेच शक्य झाली होती.
मिखाइल बुल्गाकोवने तब्बल बारा वर्षांत ही कादम्बरी लिहिली आणि त्याच्या दुप्पट कालखण्ड सोवियत संघांत तिच्या प्रकाशनासाठी लागला. सन् 1967मधे जेव्हां कादम्बरी प्रकाशित झाली, तर ही न केवळ सोवियत, अपितु विश्वसाहित्यालापण नवं वळण देणारी ठरली. कदाचित तेव्हांपासूनंच हा आभास होऊं लागला होता, की सोवियत संघाच्या साहित्यिक, सामाजिक आणि राजनीतिक जीवनांत परिवर्तन येण्यांत आहे, जे खरोखरंच आलं सन् 1986-87पासून. ही कादम्बरी न केवळ बुल्गाकोवच्या, पण तत्कालीन सामाजिक जीवनाचं खरं खुरं चित्र प्रस्तुत करते.
जरी ही रचना केवळ सत्यावरंच आधारित आहे, तरीही तिला आश्चर्याच्या, रहस्यांच्या इतक्या वेष्टनांमधे गुण्डाळून प्रस्तुत केलेलं आहे, की ती यथार्थ कमी आणि कल्पना जास्त वाटते. बुल्गाकोवने लाचखोर, हावरंट, खोटारड्या लोकांच्या प्रति जराही दया-माया न बाळगतां त्यांना निर्दयतेने दंडित केलं आहे. पण हे सगळं वाचताना पाठक ना तर गंभीर होतो, ना दुःखी, त्याला रागसुद्धां येत नाही. साखरेच्या पुडीतून कडू औषध घेतल्याची जाणीव होते. मास्टर आणि मार्गारीटाच्या जीवनाचा सुखद शेवट एका गोड भावनेला जरूर जन्म देतो.
सन् 1891मधे वर्तमान उक्राइनच्या कीएव शहरांत जन्मलेले मिखाइल बुल्गाकोव व्यवसायाने डॉक्टर होते. रशियन क्रांतीच्यानंतर सन् 1921मधे मॉस्कोला येईपर्यंत त्यांने डॉक्टरीबरोबर लेखन कार्याचासुद्धां आरंभ केला. मॉस्कोत आल्यावर त्यांने स्वतःला पूर्णपणे लेखन कार्याला समर्पित केलं. अनेक नाटक आणि कादंब-यांच्या लेखकाने मॉस्कोंत आल्यावर वर्तमानपत्रांमधे विनोदी लेखांपासून आपल्या साहित्यिक कारकिर्दीचा आरंभ केला होता. त्याबरोबरंच अनेक गोष्टीपण लिहिल्या, ज्यांत ब-याच गोष्टी त्यांच्या डॉक्टरी व्यवसायातल्या आठवणींवर आधारित होत्या.
सन् 1921मधे पहिली कादम्बरी श्वेत गार्डप्रकाशित झाली. सन् 1924-26च्या कालखण्डांत त्यांने लघु कादम्ब-या दिआबलियादा(सैतानपणा) , ‘रोकावीये याइत्सा (दुर्भाग्यशाली अण्डे) आणि सबाच्ये सेर्द्त्से (श्वान-हृदय) लिहिल्या.                           
तत्कालीन सोवियत जीवनावर निर्ममतेने प्रहार केल्यामुळे त्यांच्यावर अत्याचार होऊं लागले. त्यांच्या नाटकांचं मंचन थांबवण्यांत आलं, ज्यांत प्रमुख होते ब्येग’ (पलायन), ज़ोयकिना क्वार्तीरा (ज़ोयाचा फ्लैट), द्नी तूर्बिनीख (तूर्बिन परिवाराचे शेवटचे दिवंस) आणि बग्रोवी अस्त्रोव’ (लाल द्वीप).
काही शुभचिंतकांनी त्यांना स्टालिनच्या स्तुतींत एक नाटक लिहायला सुचवलं, पण ह्या स्वाभिमानी लेखकाने ते मान्य नाही केलं आणि आपली दृष्टी गमावूनसुद्धां, अत्यंत कठीण अश्या आजाराला तोंड देत, त्यांने आपली महानतम कादम्बरी पूर्ण केली आणि सन् 1940 मधे ह्या जगाचा निरोप घेतला.    
बुल्गाकोवच्या ह्या कादम्बरीला भारतीय पाठकांसमोर प्रस्तुत करणं मला माझं कर्तव्यंच वाटलं आणि म्हणूनंच मी थेट रशियनमधून भाषांतर करून ह्या महान लेखकाला श्रद्धांजली देण्याचा प्रयत्न केला आहे. आधी हिंदींत ( सन् 1998, आणि मग 2016मधे) भाषांतर केल्यावर आत्ता सन् 2017-18मधे कादम्बरी मराठी वाचकांच्या समोर प्रस्तुत करतांना मनांत सम्मिश्र भावना दाटून आल्या आहेत. वाचक माझ्या ह्या प्रयासांत निहित भावनेला समजून घेतील अशी आशा करूं या!
अनुवादिकेने वाचकांना मिखाइल बुल्गाकोवच्या न केवळ रचनेचा, पण त्याच्या साहित्यिक विशेषतांचा, भाषा-शैलीचाही परिचय देण्याचा प्रयत्न केला आहे, म्हणून हा भावानुवाद नसून शब्दानुवाद करण्यांत आला आहे.
तत्कालीन मॉस्कोशी संबंधित प्रकरणांची शैली, प्राचीन येर्शलाइमशी संबंधित कथानकाच्या शैलीपेक्षा वेगळी आहे. ह्या भिन्नतेला कायम ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. यत्र-तत्र इंग्रजी शब्दसुद्धां वापरण्यांत आले आहेत, जे आपल्या भाषेंत सामावून गेले आहेत. कथानक इतकं सशक्त आहे, की आपण कादम्बरी पूर्ण केल्याशिवाय सोडणार नाही, अशी आशा आहे.

आ. चारुमति रामदास, हैदराबाद         


फ्लैपचा मजकूर :

बुल्गाकोवने मास्टर आणि मार्गारीटाची रचना सन् 1928मधे सुरू केली आणि कादम्बरी संपवली सन् 1940मधे, जेव्हां ते मृत्युशैयेवर होते, शेवटचे बदल करून त्यांनी डोळे मिटले... सोवियत संघात कादम्बरीचं प्रकाशन झालं सन् 1967 मधे आणि वर्तमान काळांत, जेव्हां बुल्गाकोवची लोकप्रियता दिवसे दिवस वाढतेंच आहे, त्यांच हे कथन सत्य सिद्ध होतं, की “हस्तलिखितं जळंत नसतात.”

मास्टर आणि मार्गारीटाच्या कथानकाचा संबंध आहे लेखकाच्या जीवनाशी आणि तत्कालीन समाजाशी. यथार्थ आणि कल्पना, पुरातन आणि नूतन, मानव आणि सैतान, देव आणि सैतान. मानव आणि देव, चांगलं आणि वाईट. अंधार आणि उजेडाचा मेळ करून लेखकानी अशी कादम्बरी रचली आहे, जिने आधुनिक रशियन साहित्यांत अमरत्व तर प्राप्त केलंच आहे, पण त्याला नवीन दिशासुद्धां दिलीये. सत्याला हास्य-व्यंग्य आणि विचित्रतेच्या वेष्टनांत गुण्डाळून प्रस्तुत केलेलं आहे, ज्याला उघडल्यावर साखर लावलेल्या कडू गोळीची अनुभूती होते.
पण इतक्या यातना सहन केलेल्या नायकाला लेखकाने जीवनाच्या शेवटी भरभरून आनंद दिला आणि एक संदेशसुद्धां दिला, की मानसिक यातनेचीसुद्धां एक पराकाष्ठा असते, शेवंट तर सुखदंच होत असतो.
बुल्गाकोव आणखी एक संदेश देतात, “कायरता एक अक्षम्य अपराध आहे,” कुणाला घाबरून सत्याला नाकारणा-यांना शांति लाभंत नाही.

मिखाइल बुल्गाकोव

  मिखाइल बुल्गाकोवचा जन्म सन् 1891मधे उक्राइनच्या कीएव शहरांत झाला. सन् 1916मधे डॉक्टर झाल्यावर जवळ-जवळ चार वर्ष ते दूर-दूरच्या गावांमधे प्रैक्टिस करंत होते. सन् 1920मधे डॉक्टरकी सोडून स्वतःला पूर्णपणे साहित्याला वाहून घेतलं. सन् 1921मधे मॉस्कोत आले आणि शेवटपर्यंत तिथेच राहिले.
साहित्यिक प्रवास सुरू झाला वर्तमान पत्रांत व्यंग लेखांनी. हळू हळू गोष्टी, नाटक आणि कादम्ब-यापण लिहिल्या.
काही प्रसिद्ध रचना आहेत:

कादम्बरी : बेलाया ग्वार्दिया (श्वेत गार्ड), झीज़्न गस्पदीना दमोल्येरा (मोल्येर महाशयाच जीवन), तेत्राल्नी रमान (थियेटरची भानगड).

लघु कादम्बरी:
सबाच्ये सेर्द्त्से (श्वान-हृदय), रोकावीये याइत्सा (दुर्भाग्यशाली अण्डे).

नाटक :
पस्लेद्नीये द्नी तूर्बिनिख (तूर्बिन परिवाराचे शेवटचे दिवस), बग्रोवी अस्त्रोव (लाल द्वीप), ज़ोयकिना क्वार्तीरा (ज़ोयाचा फ्लैट) इत्यादी...प्रत्येक रचनेंत एक नवीनंच शैली वापरून मिखाइल बुल्गाकोवने जे पण लिहिलं, ते त्यांच्या स्वतःच्या जीवनाचं आणि तत्कालीन सामाजिक, राजनैतिक आणि सांस्कृतिक जीवनाचं प्रतिबिम्बंच होतं. पूश्किन, गोगल आणि साल्तिकोव श्चेद्रिनच्या परंपरेला चालू ठेवून बुल्गाकोवने हास्य, व्यंग्य, कल्पनेचा माध्यमाने तत्कालीन घटनाक्रमावर कठोर प्रहार केलेला आहे, जे त्या काळांत अशक्य होतं. लक्ष देऊन त्यांच्या रचना वाचल्यात तर वाचक वास्तविक व्यक्ती, जागा आणि घटनांपर्यंत नक्कीच पोहोचू शकतो.

आकेळ्ळा चारुमति रामदास

सन् 1945मधे नागपुरांत जन्म; सन् 2010मधे इंग्रजी आणि परकीय भाषा विद्यापीठाच्या रशियन विभागातून सेवा निवृत्त.

थेट रशियन मधून हिंदीत अनेक रचनांचा अनुवाद केला आहे. मास्टर आणि मार्गारीटामराठीत पहिलाच प्रयत्न आहे.                 

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें