सोळा
मृत्युदण्ड
बाल्ड-माउन्टेनच्या
मागे सूर्यास्त होऊ लागला होता आणि ह्या
माउन्टेनभोवती दुहेरी सुरक्षा पंक्तींचा घेरा पडला होता.
ती अश्वारोही
तुकडी,
जिने दुपारी न्यायाधीशाचा मार्ग अडवला होता, वेगाने
शहराच्या हेब्रोन गेटकडे जात होती. तिच्यासाठी रस्ता आधीच मोकळा करण्यांत आला
होता. कप्पादोसिया पायदळ तुकडीचे सैनिक लोकांना, खेचरांना
आणि उंटांना रस्त्याच्या दोन्हीं बाजूंना ढकलंत होते आणि ही तुकडी धूळ उडवंत त्या
ठिकाणी पोहोचली, जिथे दोन रस्ते मिळंत होते: दक्षिणी मार्ग
जो बेथलहम शहराकडे जात होता, आणि उत्तर-पश्चिमी मार्ग,
जो याफाकडे जात होता. अश्वारोही तुकडी उत्तर-पश्चिमी मार्गाकडे
धावली. त्याच कप्पादोसियाचे सैनिक रस्त्याच्या दोन्हीकडे विखुरले होते, आणि त्यांनी वेळेवरंच उत्सवासाठी येर्शलाइमला जाणा-या सगळ्या काफल्यांना
रस्त्यावरून दूर केलेलं होतं. रस्त्याच्या दोन्हीकडे कप्पादोसियन सैनिकांच्या मागे
भक्तांची गर्दी उभी होती; ते गवतावर गाडलेल्या आपल्या
पट्ट्या-पट्ट्यांच्या तंबूंमधून बाहेर आले होते. एक किलोमीटर गेल्यावर ह्या
तुकडीने विद्युत वेगाने जाणा-या तुकडीलासुद्धां मागे सोडलं. आणखी एक किलोमीटर
गेल्यावर ती बाल्ड-माउण्न्टेनच्या पायथ्याशी पोहोचली. इथे पोहोचल्यावर तिने
चुटकीसरशी माउन्टेनला चारीकडून वेढा घातला, फक्त याफाकडून
येण्यासाठी थोडीशी जागा सोडली.
काही वेळाने ह्या
तुकडीच्या मागे-मागे आणखी एक तुकडी तिथे आली. पहाडावर जवळ-जवळ एक फर्लांग चढून ती
सुद्धां मुकुटाच्या आकारांत माउन्टेनवर विखुरली.
शेवटी मार्क
क्रिसोबोयेवच्या नेतृत्वात ‘सेन्चुरी’ तिथे
पोहोचली. रस्त्याच्या दोन्हीं बाजूला दोन-दोनच्या पंक्तीत सैनिक चालंत होते.
त्यांच्यामधे गुप्तचर तुकडीबरोबर गाडीवर तिन्हीं कैदी होते, ज्यांच्या
गळ्यांत पांढरे तक्ते लटकले होते. प्रत्येक तक्त्यावर अरबी आणि ग्रीक भाषेंत
लिहिलं होतं ‘दरोडेखोर आणि क्रांतिकारी’. कैद्यांच्या गाडीमागे होत्या दुस-या गाड्या, ज्यांच्यावर
ठेवले होते वध-स्तम्भ, दोरखण्ड, फावडे,
बादल्या आणि कु-हाडी. ह्या गाड्यांमधे सवार होते सहा वधिक. त्यांच्यामागे घोड्यांवर जात होते अश्वारोही तुकडीचा प्रमुख मार्क,
येर्शलाइमच्या मंदिर-सुरक्षा तुकडीचा नायक आणि टोप घातलेला तो माणूस,
ज्याच्याशी पिलात महालाच्या अंधा-या खोलीत काही क्षण बोलला होता.
सगळ्यांत शेवटी होती सैनिकांची श्रृंखला आणि त्यांच्या मागे-मागे जवळ-जवळ दोन हजार
उत्सुक लोकांची गर्दी चालंत होती. भीषण नारकीय उष्णतेला न घाबरतां हे लोक हे
मनोरंजक दृश्य बघायला जात होते.
शहरातल्या उत्सुक
लोकांच्या गर्दीत आता उत्सुक भक्तांची गर्दीपण मिसळली, ज्यांना
बिना काही अडथळ्याचे मिरवणुकीच्या अगदी मागे येऊं दिलं होतं. उद्घोषकांचे बारीक
आवाज घडी-घडी तेच सांगत होते, जे दुपारी पिलातने म्हटले
होते. ह्या आवाजाबरोबर सगळे पुढे वाढंत होते, बाल्ड-माउन्टेनकडे.
अश्वारोही
तुकडीने दुस-या घे-यापर्यंत सगळ्यांना जाऊ दिलं, पण वरच्या तुकडीने फक्त
त्यांनाच पुढे जाऊं दिलं, ज्यांचा म्रुत्युदण्डाशी संबंध
होता, आणि मग विद्युत गतिने गर्दीला माउन्टेनच्या चारीकडे
ढकलून दिलं. आता गर्दीतले लोकं वरून पायदळ सैनिकांच्या आणि खालून अश्वारोही
तुकडीच्या मधे फसले होते. मृत्युदण्डाच्या प्रक्रियेला ते पायदळ सैनिकांच्या
मधून-मधून बघूं शकंत होते.
मिरवणुकीला
बाल्ड-माउन्टेनवर चढून तीन घंट्यापेक्षा जास्त लोटले होते. सूर्य बाल्ड-माउन्टेनच्या
खाली जाऊं लागला होता, पण उष्णता अजूनही असहनीय होती. दोन्हीं
पंक्तीतील सैनिक ह्या उष्णतेने तडफडंत होते, कंटाळून गेले
होते आणि मनांतल्या मनांत तिन्हीं दरोडेखोरांना शिव्या देत-देत त्यांना लवकरंच मरण
यावं अशी कामना करंत होते.
अश्वारोही
तुकडीचा छोटा-सा नायक घामाने लथपथ झाला होता. त्याचा पांढरा शर्ट पाठीवर काळा झाला
होता. तो माउन्टेनच्या खालच्या भागांत सारखा फिरंत होता. तो पहिल्या तुकडीच्या जवळ
पाण्याने भरलेल्या चामड्याच्या मशकेजवळ जायचा आणि तिच्यातूंन थोडं-थोडं पाणी घेऊन घोटभर
प्यायचा आणि आपल्या पगडीला ओलं करून घ्यायचा. ह्याने थोडंसं बरं वाटायचं. तो
पुन्हां त्या धुळीने भरलेल्या रस्त्यावर फिरू लागायचा, जो
माउन्टेनच्या वर जात होता. त्याची लांब तलवार त्याच्या चामड्याच्या जोड्यांना
सारखी लागंत होती. नायक आपल्या सैनिकांना सहनशक्तीचं उदाहरण द्यायचा प्रयत्न करंत
होता, पण त्यांची कीव येऊन त्याने जमिनीवर इकडे तिकडे
गाडलेल्या खांबांवर आपले पांढरे कोट पसरून तम्बू बनवण्याची आज्ञा दिली. ह्या
तम्बूंच्या सावलीत सीरियन्स निर्मम सूर्यापासून स्वतःच रक्षण करंत होते. मशका
बघतां-बघतां रिकाम्या होत होत्या. अनेक तुकड्यांचे सैनिक पाळी-पाळीने मल्बेरीच्या
वाळक्या झाडांखाली असलेल्या त्या गढूळ झ-याजवळ पाणी प्यायला येत होते, जो आता ह्या सैतानी उन्हांत आपल्या शेवटच्या घटका मोजंत होता. तिथेंच,
अस्थिर सावलीखाली कंटाळलेले साईसपण
आपल्या शांत घोड्यांना धरून उभे होते.
सैनिकांचा थकवा
आणि दरोडेखोरांना ते देत असलेल्या शिव्या समजंत होत्या. न्यायाधीशाची भीति, की
मृत्युदण्डाच्या वेळेस तो घृणा करंत असलेल्या येर्शलाइम शहरांत दंगा होऊं शकतो,
निराधार ठरली होती. जेव्हां मृत्युदण्डानंतरचा चौथा घण्टा चालू होता,
तेव्हां पायदळ सैनिक आणि अश्वारोही सैनिकांच्या दोन्हीं सुरक्षा
पंक्तींच्या मधे, आशंका असूनसुद्धां एकही माणूस शिल्लक
नव्हता. सूर्याच्या उष्णतेने गर्दीला होरपळल्यानंतर तिला परंत येर्शलाइमला पाठवून
दोलं होतं. तिथे फक्त न जाणे कोणाचे दोन कुत्रे उरले होते, जे
माहीत नाही कसे माउन्टेनवर पोहोचले होते. ते पण गर्मीने बेचैन होते आणि जीभ बाहेर
काढून धापा टाकंत होते, त्या हिरव्या पालींकडे लक्ष न देतां,
ज्यांच्यावर ह्या भीषण गर्मीचा काहींच असर नव्हता, आणि ज्या दगडांच्या आणि काटेरी झुडुपांच्या मधे आरामांत फिरंत होत्या.
कैद्यांना सोडवण्याचा
कोणीही प्रयत्न नाही केला, सैनिकांनी गच्च भरलेल्या
येर्शलाइममधेही नाही आणि घेराबंद बाल्ड-माउन्टेनवरसुद्धां नाही; आणि गर्दी शहराकडे परतू लागली, कारण की मृत्युदण्ड
बघणं येवढं मनोरंजक नव्हतं, आणि शहरांत संध्याकाळी साज-या
होणा-या ईस्टरच्या सणाची तयारी धामधुमीने चालू होती.
रोमन सैनिकांची
वरची पंक्ति अश्वारोही सैनिकांपेक्षा जास्त वैतागली होती. क्रिसोबोयने फक्त येवढंच
केलं,
की सैनिकांना शिरस्त्राणाऐवजी पाण्यांत भिजवलेली पांढरी पगडी
बांधायची परवानगी दिली होती – पण त्याने सैनिकांना भाले धरून तिथेच उभं राहायला
सांगितलं होतं. तो स्वतःसुद्धा पांढरी, पाण्यांत न भिजवलेली
पगडी घालून फाशी देणा-यांपासून थोडांच दूर फिरंत होता. त्याने आपल्या शर्टावरून
वाघाचे तोंड असलेले चांदीचे मेडल्स पण नव्हते काढले, पायांतील
कवच, तलवार, खंजीरसुद्धां नव्हते
काढले. सूर्याचे किरण सरळ क्रिसोबोयवर पडंत होते. त्याच्यावर तर काही असर होत
नव्हता, पण मेडल्सच्या वाघांकडे बघणं अशक्य होतं.
त्यांच्यातून निघंत असलेली उकळत्या चांदीची चमक डोळ्यांना जणु गिळून टाकंत होती.
क्रिसोबोयच्या विद्रूप चेह-यावर थकवा किंवा अप्रसन्नता – काहीही दिसंत नव्हतं,
आणि असं वाटंत होतं जणु हा भीमकाय सेन्चुरियन पूर्ण दिवस, पूर्ण रात्र, आणखी एक दिवस, म्हणजे
जेवढे पाहिजे तेवढे दिवस असांच चालंत राहू शकतो. असांच चालू-फिरू शकतो तांबा जडवलेल्या
भारी-भरकम पट्ट्यावर हात ठेऊन; असांच गंभीरतेने कधी वध
स्तंभावर लटकलेल्या कैद्यांकडे, किंवा श्रृंखलाबद्ध
सैनिकांकडे बघंत, तसांच उदासीनतेने जोड्याच्या टोकाने
पायांखाली आलेले, काळानुसार पांढरे पडलेले हाडांचे तुकडे आणि
लहान-लहान दगड दूर सरकवंत.
टोप घातलेला तो
माणूस वध-स्तंभांपासून काही दूर एका तिपाईवर बसला होता. तो आनंदी वाटंत होता, जरी
तो काही हालचाल करंत नव्हता, तरी कधी-कधी कंटाळल्यामुळे रेती
खुरचटंत होता.
आम्ही सांगितलंय
की पायदळ सैनिकांच्या वेढ्याच्या बाहेर एकसुद्धा माणूस नव्हता, पण
हे पूर्णपणे सत्य नाहीये. एक माणूस तर होता तिथे, पण तो
सगळ्यांना दिसंत नव्हता. तो त्या बाजूला नव्हता, जिथून माउन्टेनवर
जाण्यासाठी मोकळा रस्ता होता, आणि जिथून मृत्युदण्डाचं दृश्य
स्पष्ट दिसूं शकंत होतं. तो होता उत्तरी कोप-यावर, तिथे,
जिथून माउन्टेनवर चढणं कठीण होतं; जमीन
उबड-खाबड होती; जिथे खिंडारं आणि फटी होत्या; जिथे एका अरुंद फटींत, कसातरी जगण्यांचा प्रयत्न
करंत आकाशाने श्राप दिलेल्या कोरड्या पृथ्वीवर अंजीराचं एक मरगळलेलं झाड उभं होतं.
ह्याच सावली
नसलेल्या झाडाखाली हा एकटा दर्शक जमून बसला होता. मृत्युदण्डाशी त्याला काही
देणं-घेणं नव्हतं. पण तो म्रुत्युदण्डाच्या सुरुवातीपासूनच, म्हणजे
चार तासांपासून तिथेच होता. हे खरं आहे की मृत्युदण्ड बघण्यासाठी त्याने सर्वांत
खराब जागा निवडली होती. इथूनसुद्धां वध-स्तम्भ दिसंत होते; सैनिकांच्या
वेढ्याच्या पलिकडे सेन्चुरियनच्या छातीवरचे दोन चमकंत असलेले बिंदु दिसंत होते.
येवढंच पुरे होतं ह्या माणसासाठी ज्याला कुणाचाही त्रास नको होता आणि जो
सर्वांपासून लपण्याचा प्रयत्न करंत होता.
पण चार
तासांपूर्वी,
मृत्युदण्डाच्या सुरुवातीला, हा माणूस असं
काही करंत होता, की त्याच्याकडे कोणाचंही लक्ष जाऊं शकंत
होतं, कदाचित म्हणूनंच आता त्याने आपला पवित्रा बदलला होता
आणि आता तो एकटा होता.
तेव्हां, जशीच
मिरवणूक माउन्टेनच्या वरती पोहोचली, तो, गोंधळलेला, तिथे आला, जसं
उशीरा येणारा माणूस करतो. तो मुश्किलीने श्वास घेत होता आणि चालंत नसून धावंत
होता. त्याला माउन्टेनच्या वरती जायचं होतं, तो लोकांना
धक्के मारंत होता, पण जेव्हां त्याने बघितलं की सैनिकांचा वेढा
इतरांप्रमाणे त्याच्याही समोर पडलेला आहे, तेव्हां त्याने
चेतावनी देणा-या घोषणांकडे लक्ष न देतां, वेढ्यांत घुसून वर,
वध-स्तंभांच्या अगदी जवळ जायचा बालिश प्रयत्न केला, जिथे कैद्यांना गाडीतूंन उतरवलं होतं. ह्याच्यासाठी त्याच्या छातीवर
भाल्याच्या दुस-या टोकाचा मार बसला आणि तो उडी मारून सैनिकांपासून दूर झाला,
तो ओरडला, पण वेदनेमुळे नव्हे तर निराशेमुळे.
भाला मारणा-या सैनिकाकडे त्याने धुंद आणि उदासीन नजरेने पाहिलं, जणु त्याला शारीरिक पीडेची जाणीवंच नव्हती.
खोकंत, धापा
टाकंत, छाती पकडून तो माउन्टेनच्या मागच्या बाजूला धावला,
ह्या आशेने, की उत्तरी भागांत त्याला आत जायला
एखादी फट सापडेल. पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता. वेढा बंद झाला होता. आणि
वेदनेने विद्रूप झालेल्या चेह-याच्या त्या माणसाला गाड्यांच्या जवळ जायचा आपला
विचार बदलावा लागला, ज्यांच्यातून आता वध-स्तम्भ उतरवंत
होते. ह्या प्रयत्नांनी त्याला काही प्राप्त होण्यासारखं नव्हतं, फक्त तो पकडला जाऊ शकंत होता. आजच्या दिवशी जेलखान्यांत बंद राहण्याचा
त्याचा उद्देश्य नव्हता.
म्हणून तो
मागच्या भागाकडे चालला गेला, जिथे बरीच शांतता होती. तिथे
त्याला कोणी त्रास देऊं शकंत नव्हतं.
आता हा काळ्या
दाढीवाला,
ऊन आणि अनिद्रेने लाल आणि जळजळणा-या डोळ्यांनी बघंत असलेला माणूस
एका खडकावर बसून दुःखी होत होता. तो उसासे भरंत होता आणि सतत भटकण्यामुळे जीर्ण
आणि निळ्यापासून मातकट झालेला आपला कोट सरकवून भाल्याने जखमी झालेली, घाणेरडा घाम वाहत असलेली छाती उघडी करायचा; कधी
असहनीय वेदनेने आकाशाकडे डोळे करून त्या तीन गिद्धांचा मागोवा घ्यायचा, जे लवकरंच प्राप्त होणा-या जेवणाच्या आशेने चक्कर लावंत होते; किंवा पिवळ्या झालेल्या जमिनीकडे बघायचा जिथे कुत्र्याचं अर्ध सडलेलं शरीर
पडलं होतं, आणि ज्याच्या चारीकडे पाली धावंत होत्या.
त्या माणसाची
वेदना इतकी जास्त होती, की कधी-कधी तो स्वतःशीच बडबडूं लागायचा.
“ओह, कित्ती
मूर्ख आहे मी!” तो खडकावर मागे-पुढे झुलंत आणि नखांनी आपली काळी छाती खाजवंत
बडबडला, “मूर्ख, मूर्ख बाई, कायर! माणूस नाहीं, मुरदाड आहे!”
त्याने चुप होऊन
मान खाली केली आणि लाकड्याच्या सुरईतून पाणी प्यायला, पाणे
प्यायलावर त्याला थोडी हुशारी वाटली. आता तो कोटाच्याखाली लपलेल्या चाकूला हात
लावून पहायचा, किंवा खडकावर आपल्या समोर लेखणी आणि दौतीच्या
बाजूला पडलेल्या चर्मपत्राला हात लावायचा.
ह्या ताडपत्रावर
लिहिलेलं होतं:
“काळ धावतोय, आणि
मी, लेवी मैथ्यू बाल्ड माउन्टेनवर आहे, मृत्यु अजून आली नाहीये!”
पुढे लिहिलं
होतं:
“सूर्य अस्त
होतोय,
अजून अंत नाही.”
आता लेवी
मैथ्यूने हताश होऊन लिहिलं:
“अरे देवा!
त्याला इतकं का छळतो आहेस? त्याला लवकर मुक्ति दे.”
येवढं लिहून तो पुन्हा
विव्हळला आणि आपली छाती खाजवूं लागला.
लेवीच्या
निराशेचे कारण ते दुर्भाग्य होतं, ज्याने त्याला आणि येशुआला जखडून
ठेवलं होतं. तो आपल्या चुकीवरपण पस्तावंत होता. परवा दुपारी येशुआ आणि लेवी येर्शलाइमच्या
जवळ बेथनींत एका माळ्याकडे थांबले होते, जो येशुआच्या उपदेशांनी
बरांच प्रभावित होता. सम्पूर्ण सकाळ दोन्हीं पाहुणे बगीच्याच्या कामांत यजमानाची
मदत करंत होते आणि ते संध्याकाळी येर्शलाइमला जाणार होते. पण काय माहीत कां,
येशुआ लवकरंच एकटाच निघून गेला, असं सांगून की
त्याला शहरामधे जरूरी काम आहे. बस, हीच पहिली चूक होती लेवी
मैथ्यूची. त्याने येशुआला एकट्याला कां जाऊं दिलं!
मैथ्यू
संध्याकाळीसुद्धां येर्शलाइमला नाही जाऊ शकला. त्याच्या पूर्ण अंगाला भयानक खाज
सुटली. त्याला खूप ताप आला. शरीर जणु आगींत होरपळंत होतं, दात
किटकिटंत होते, प्रत्येक क्षणाला तो पाणी मागंत होता,
त्याला हलतांसुद्धा येत नव्हतं. तो माळ्याच्या पडवींत घातलेल्या
बिछान्यावर पडला होता. शुक्रवारी सकाळीच त्याचा डोळा उघडूं शकला, जेव्हां त्याचा आजार त्याला तितक्याचं आश्चर्यजनक रीत्या सोडून गेला,
जसां तो आला होता. जरी त्याला अशक्तपणा वाटंत होता, त्याचे पाय अडखळंत होते, तरीही भावी दुर्भाग्याच्या
आशंकेने ग्रस्त तो माळ्याच्या घरून निघून येर्शलाइमला गेला. तिथे त्याने बघितलं,
की त्याची भीति खरी होती. अनर्थ घडलेला होता. लेवी जाऊन गर्दीत उभा
राहिला. त्याने न्यायाधीशाला मृत्युदण्डाची घोषणा करताना ऐकलं.
जेव्हां
अभियुक्तांना बाल्ड-माउन्टेनवर नेत होते, तेव्हां लेवी मैथ्यू उत्सुक
लोकांच्या गर्दीबरोबर धावत होता. तो येशुआला कळवायचा प्रयत्न करंत होता, की तो, म्हणजे लेवी, इथेच आहे,
त्याच्याजवळ, त्याने अंतिम यात्रेंतसुद्धां
त्याची सोबंत सोडली नाहीये. तो प्रार्थना करतोय की येशुआची पीडा लवकरांत लवकर
संपली पाहिजे, त्याला लवकर मरण आलं पाहिजे. पण येशुआची नजर
दूर, जिथे त्याला नेत होते, तिकडे
लागली होती, त्याने लेवीला बघितलंच नाही.
जेव्हां ही
मिरवणूक अर्धा मील पुढे गेली, तेव्हांच मैथ्यूच्या डोक्यांत,
ज्याला सैनिक-श्रृंखलेच्या अगदी जवळचे लोक धक्के मारंत होते,
एक साधा-सरळ, पण अफलातूनी विचार चमकला. तो
स्वतःवरंच चरफडला, की हा विचार त्याच्या डोक्यांत आधी कां
नाही आला. सैनिकांची श्रृंखला दाट नव्हती. दोन-दोन सैनिकांच्यामधे थोडीशी जागा
होती. जर हुशारीने काम केलं तर तो त्यांच्यामधून निसटून कैद्यांच्या गाडीपर्यंत येशुआकडे
जाऊं शकतो. तेव्हां येशुआच्या पीडेचा अंत होऊन जाईल.
बस, एक
क्षणंच पुरेसा आहे येशुआच्या पाठींत सुरा भोसकून हे सांगायला की, ‘येशुआ! मी तुला मुक्ति देऊन स्वतःसुद्धा तुझ्याजवळ येतोय! मी, मैथ्यू, तुझा एकुलता एक आणि विश्वसनीय शिष्य!’
आणि जर आणखी एक क्षण मिळाला, तर
स्वतःलासुद्धां त्याच चाकूने मारता येईल; वध-स्तंभाच्या
यातनांपासून सुटण्यासाठी लेवीला, जो भूतपूर्व कर-संग्राहक
होता, ह्या शेवटच्या गोष्टीचं इतकं महत्व नव्हतं. कसं मरावं,
ह्याबाबत तो उदासीन होता. त्याला फक्त हीच काळजी होती की येशुआला,
ज्याने कधीच कोणाचंही वाईट केलं नव्हतं, लगेच
यातनांपासून मुक्ति मिळावी.
योजनातर खूप
चांगली होती पण त्यांत एक खामी होती – ती अशी, की लेवीकडे चाकू नव्हता.
त्याच्याकडे एकसुद्धां पैसा नव्हता.
स्वतःवरंच चिडंत
लेवी गर्दीतून निघून शहराकडे धावला. त्याच्या जळजळत्या डोक्यांत फक्त एकंच गरम
विचार होता की शहरातून कसांतरी एक चाकू मिळवून लगेच मिरवणुकींत परत यायचं.
तो शहराच्या
महाद्वारापर्यंत पोहोचला, आतमधे प्रवेश करणा-या अनेक
कारवांच्यामधून आपल्या डावीकडे एक ब्रेडचं दुकान बघितलं. धापा टाकणा-या लेवीने
स्वतःला सांभाळंत दुकानांत घुसून विक्रेत्याचं अभिवादन केलं. त्याला अलमारीच्या
वरती ठेवलेली ब्रेड देण्याची विनंती केली, जी त्याला आवडली
होती. जशीचं विक्रेता मुलगी ब्रेड काढण्यासाठी मागे गेली, त्याने
पट्कन तीक्ष्ण धारीचा ब्रेड कापायचा चाकू उचलला आणि दुकानांतून पळाला. काही
मिनिटातंच तो याफाच्या रस्त्यावर होता. पण मिरवणूक आता दिसंत नव्हती. तो धावंत
होता. मधून-मधून अडखळून जमिनीवर पडंत होता, काही वेळ निश्चल
पडून, दीर्घ श्वास घ्यायचा. येर्शलाइमकडे जाणारे लोक त्याला
बघून आश्चर्य करंत होते. तो पडला राहून ऐकंत होता, की त्याचं
हृदय किती जोराने धडधड करतंय, फक्त छातींतंच नाही, पण डोक्यांत आणि कानांत सुद्धा. थोडा वेळ श्वास घेऊन तो पुन्हां पळूं
लागायचा, पण आता – हळू हळू. जेव्हां त्याने धुळीचे लोट उडवंत
जाणारी मिरवणूक बघितली, तेव्हां तो माउन्टेनच्या जवळ
पोहोचलेला होता.
“अरे देवा...”
लेवी विव्हळला. त्याला कळंत होतं, की उशीर झालाय. आणि त्याला उशीर
झालांच होता.
मृत्युदण्डाला
चार तास झाले तेव्हां लेवीची वेदना आपल्या चरम सीमेवर पोहोचली. तो निरर्थक बडबड
करूं लागला. खडकावरून उठून त्याने उगीचंच आता निरर्थक झालेल्या चाकूने जमिनीवर
आघात केला,
अंजीरच्या झाडाला लात मारली, पाणी फेकून दिलं,
डोक्यावरचा टोप काढून फेकला आणि आपले विरळ केस पकडून तो स्वतःलाच
प्रताडित करूं लागला.
तो स्वतःला
शिव्या-शाप देत होता, गुरगुर करंत होता, थुंकंत
होता आणि आपल्या आई-वडिलांनापण शिव्या देत होता, की त्यांने
कसल्या मूर्खाला जन्म दिलांय.
जेव्हां त्याने
पाहिलं की शिव्या-शापाचा काहीच असर होत नाहीये आणि त्यांने ह्या खदखदंत असलेल्या
भट्टीत काहीही बदलणार नाहीये, तेव्हां त्याने आपल्या वाळक्या
हातांच्या मुठी वळून सूर्याकडे ताणल्या, जो हळू-हळू खाली
गडगडंत होता, लाम्ब-लाम्ब सावल्या सोडंत भूमध्य सागरांत
पडण्यासाठी, आणि देवाकडे लवकरंच काही चमत्कार करण्याची मागणी
केली की. त्याने मागणी केली की देवाने लगेच येशुआकडे मृत्युला पाठवावे.
डोळे उघडून
त्याने बघितलं की माउन्टेनवर सगळं अगदी तसंच आहे, फक्त सेन्चुरियन मार्कच्या छातीवरचे
धगधगणारे डाग आता विजले होते. सूर्य वध-स्तंभांवर लटकवलेल्या कैद्यांच्या पाठीत,
ज्यांचे तोंड येर्शलाइमकडे होते, आपले किरण
टोचंत होता. तेव्हां लेवी ओरडला:
“मी तुला श्राप
देतो,
देवा!”
भसाड्या आवाजांत
तो ओरडला की ईश्वर अन्यायी आहे आणि आता तो त्याच्यावर विश्वास नाही ठेवणार.
“तू बहिरा आहेस!”
लेवी ओरडला,
“जर बहिरा नसतास तर माझी प्रार्थना ऐकून त्याला लगेच मारून टाकलं
असतं.”
डोळे मिटून लेवी
आकाशांतून वीज पडण्याची वाट पाहू लागला, जी त्याच्यावरसुद्धां पडली
असती, पण असं काहीच झाल नाही, आणि,
पापण्या न उघडतां तो आकाशाकडे तोंड करून विषारी आणि अपमानजनक शब्द
बोलंत राहिला. आपल्या सम्पूर्ण निराशेबद्दल सांगितल्यानंतर तो इतर धर्मांबद्दल आणि
देवी-देवतांबद्दल सांगू लागला. हो, दुस-या देवाने कधीच असं
होऊं दिलं नसतं, की येशुआसारखा माणूस वध-स्तंभावर लटकताना
सूर्याच्या किरणांनी होरपळून जाईल.
“मीच चुकलो!”
भसाड्या आवाजांत लेवी ओरडला, “तू दुष्टांचा देव आहेस!
मंदिरांमधे होत असलेल्या होम-हवनाच्या धुराने तुझे डोळे बंद केले आहेत कां,
की तुझ्या कानांना फक्त भक्तांची प्रशंसाच ऐकूं येते? तू सर्वशक्तिमान नाहीस! तू काळा देव आहे, दरोडेखोरांचा
देव, त्यांचा रक्षक, त्यांची आत्मा;
मी तुला श्राप देतो!”
तेवढ्यांत
भूतपूर्व कर-संग्राहकाच्या चेह-यावर काही तरी सरसर झाली, पायांच्या
खालीपण काहीतरी सरकलं. पुन्हां एकदा सरसर झाली. तेव्हां त्याने डोळे उघडून पाहिलं,
की सगळंच, त्याच्या शापामुळे किंवा काही अन्य
कारणाने, बदलून गेलंय. सूर्य समुद्रांत पोहोचायच्या आधीच
गायब झालेला होता, ज्याच्यांत तो दर संध्याकाळी बुडायचा,
त्याला गिळून पश्चिमेकडून आकाशांत एक भयानक ढग निडरतेने पुढे वाढंत
होतं. त्याची किनार पांढ-या फेसासारखी होती, काळ्या
आवरणांतून घडी-घडी पिवळी चमक दिसंत होती. ढग गरजलं, त्याच्यांतून
थोड्या-थोड्या वेळाने अग्निशलाका निघूं लागल्या. याफाच्या रस्त्यावर, मरगळलेल्या हिन्नोम घाटीत भक्तांच्या तंबूंवर, जे
अचानक ह्या वादळाच्या तडाख्यांत सापडले होते, धुळीचे लोट
उठंत होते. लेवी गप्प झाला. तो समजण्याचा प्रयत्न करंत होता, की येर्शलाइमला झाकणारं हे वादळ काय दुर्दैवी येशुआचं नशीब बदलेल कां. तो
त्या अग्निशलाकांकडे बघून प्रार्थना करूं लागला, की येशुआच्या
वधंस्तंभावर वीज पडू दे. आकाशाच्या स्वच्छ भागाकडे बघंत, जिथपर्यंत
अजून वादळ नव्हतं पोहोचलं, आणि जिथे वादळापासून स्वतःला
वाचविण्यासाठी गिधाडे एका पंखावर गिरक्या घेत होती, लेवी
पश्चात्ताप करूं लागला, की त्याने श्राप देण्यांत इतकी घाई
कां केली, आता देव त्याची प्रार्थना बिल्कुल नाही ऐकणार.
लेवीने
माउन्टेनच्या पायथ्यांवर नजर ताकली : जिथे आधी अश्वारोही उभे होते, तिथे
आता बरंच काही बदललं होतं. उंचीवरून लेवीला स्पष्ट दिसंत होतं, की सैनिकांनी कसे पट्कन जमिनीत गाडलेले भाले उखडले, आपल्या
अंगावर कोट पांघरले, साईस कसे काळ्या घोड्यांची लगाम खेचून
रस्त्यावर सरपंट धावताहेत. स्पष्ट होतं की सेना परतंत होती. लेवीने उडणा-या धुळीपासून
वाचवण्यासाठी हातांनी चेहरा झाकून घेतला. तो विचार करूं लागला, की अश्वारोही तुकडीच्या परतण्याचा अर्थ काय असूं शकतो? त्याने नजर वर केली तर बघितलं की लाल रंगाचा फौजी कोट घातलेली एक आकृति
वधस्थळाकडे जाते आहे. आणि तेव्हां चांगल्या परिणामाच्या अपेक्षेने भूतपूर्व
कर-संग्राहकाचं मन थोडं शांत झालं.
मृत्युदण्डानंतरच्या
पाचव्या तासांत माउन्टेनवर चढणारा व्यक्ति होता सेना-कमाण्डर, जो
येर्शलाइमहून आपल्या सहायकाबरोबर येत होता. क्रिसोबोयने खूण करतांच सैनिकांची
श्रृंखला मोकळी झाली आणि सेंचुरियनने ट्रिब्यूनला सलामी दिली. कमाण्डरने
क्रिसोबोयला एकीकडे बोलावून पुटपुटंत काहीतरी सांगितलं. सेंचुरियनने त्याला
पुन्हां सलामी दिली. तो वधिकांकडे गेला जे वध-स्तंभांजवळंच दगडांवर बसले होते.
ट्रिब्यून पुढे येऊन तिपाईवर बसलेल्या माणसाकडे आला. त्या माणसाने उठून त्याचे
हार्दिक स्वागत केले. ट्रिब्यूनने त्याला हळूंच काहीतरी सांगितलं आणि ते
वध-स्तंभांकडे आले. आता त्यांच्याबरोबर मंदिराच्या सुरक्षा कमिटीचा प्रमुख पण
होता.
क्रिसोबोयने वध-स्तंभांजवळ
पडलेल्या पोते-यांकडे तिरप्या नजरेने पाहिलं, जे काही वेळा पूर्वी
अपराध्यांची पोषाक होते आणि ज्यांना घेण्यासाठी वधिकांनी नकार दिला होता.
क्रिसोबोयने दोन वधिकांना बोलावून आज्ञा दिली, “माझ्या मागे
या!”
जवळच्या
वध-स्तंभावरून भसाड्या आवाजांत निरर्थक गाण ऐकूं येत होतं. त्याच्यावर लटकावलेला
गेस्तास माश्यांमुळे आणि सूर्यामुळे मृत्युदण्डानंतर तीन तासांतच वेडा झाला होता.
आता तो द्राक्षांबद्दल गाण म्हणंत होता. पण पगडीने झाकलेल्या आपल्या डोक्याला तो
मधून-मधून हलवंत होता, तेव्हां आळसावलेल्या माश्या त्याच्या
चेह-यावरून उडून जायच्या आणि पुन्हां येऊन तिथेंच बसायच्या.
दुस-या
वध-स्तंभावरचा दिसमास अन्य दोघांपेक्षा जास्त तडफडंत होता, कारण
की त्याची शुद्ध हरपली नव्हती, कानांनी खांद्यांवर मारता
यावं ह्यासाठी तो घडी-घडी आपलं डोकं हलवंत होता, कधी उजवीकडे,
तर कधी डावीकडे.
ह्या दोघांपेक्षा
जास्त सुखी होता येशुआ. पहिल्याच तासांत त्याला गुंगी येऊ लागली, तो
पगडी सुटलेलं आपलं डोकं लटकावून शुद्ध हरवून बसला. माश्यांनी पूर्णपणे त्याचा
चेहरा झाकून टाकला. आता त्याचा चेहरा काळ्या वळवळणा-या पदार्थाने झाकलेला वाटंत
होता. पोटावर, काखेंत, छातीवर
जाड्या-जाड्या घोडमाश्या बसून त्याच्या उघडं, पिवळं अंग
चोखंत होत्या.
टोप घातलेल्या
व्यक्तीच्या हुकुमानुसार एका वधिकाने भाला उचलला आणि दुस-याने वध-स्तंभाजवळ बादली
आणि स्पंजचा तुकडा आणला. पहिल्या वधिकाने भाला उंच करून येशुआच्या दोन्हीं हातांत
टोचला,
जे क्रॉसच्या दोन्हीं टोकांवर दोराने बांधलेले होते. कृश शरीर,
ज्याच्या बरगड्या दिसंत होत्या, किंचित शहारलं.
वधिकाने भाल्याचं टोक पोटावर फिरवल. तेव्हां येशुआने डोकं उचललं, माश्या भिणभिण करंत उडून गेल्या. लटकलेल्या येशुआचा माश्या चावल्याने
सुजलेला चेहरा दिसला; तरंगंत असलेल्या डोळ्यांचा हा चेहरा
ओळखू येत नव्हता.
पापण्या उघडून
हा-नोस्त्रीने खाली बघितलं. त्याचे स्वच्छ डोळे मलूल झाले होते.
“हा-नोस्त्री”, वधिक
म्हणाला.
हा-नोस्त्रीने
सुजलेल्या ओठांची किंचित हालचाल करंत दरोडेखोरांसारख्या भसाड्या आवाजांत विचारलं,
“तुला काय पाहिजे? माझ्याकडे
कशाला आलायंस?”
“पी!” वधिक
म्हणाला आणि पाण्यांत बुडवलेला स्पंजचा तुकडा भाल्याच्या टोकावर सवार होऊन
येशुआच्या ओठांजवळ पोहोचला. त्याच्या डोळ्यांत थोडीशी चमक आली, तो
अत्यंत अधीरतेने ते पाणी चोखू लागला. जवळच्या वध-स्तंभावरून दिसमासचा आवाज ऐकूं
आला:
“हा अन्याय आहे!
मी पण तसलांच दरोडेखोर आहे, जसा हा आहे.”
दिसमासने सरळ
व्हायचा प्रयत्न केला, पण तो हलूं नाही शकला. दोराच्या वलयांने
त्याच्या हातांना तीन ठिकाणी वध-स्तंभाशी जखडून ठेवलं होतं. त्याने पोट ताणलं,
नखांनी वध-स्तंभाला पकडलं आणि रागाने येशुआच्या वध-स्तंभाकडे आपलं
डोकं फिरवलं.
धुळीच्या वादळानी
त्या जागेला झाकून टाकलं, गाढ अंधार पसरला. जेव्हां धूळ उडून
गेली तेव्हां सेंचुरियन ओरडला:
“दुस-या
स्तंभावर, चुप रहा!”
दिसमास चुप झाला. येशुआने पाण्यांत बुडवलेल्या
स्पंजपासून दूर होऊन मोठ्या प्रयत्नाने गोड आणि विश्वासपूर्ण आवाजांत बोलण्याचा
प्रयत्न केला,
पण आवाज घरघरंतच निघाला. तो वधिकाला म्हणाला,
“त्यालासुद्धां
पाणी पाज.”
अंधार वाढंतंच
होता. ढगांनी अर्ध आकाश झाकून टाकलं होतं. येर्शलाइमकडे वाढंत येणारे पांढरे, उकळते
ढग काळ्या ओलसर अग्निशलाकांनी नटलेल्या घनघोर काळ्या ढगांच नेतृत्व करंत होते.
माउन्टेनच्या
अगदी वर वीज कडाडली. वधिकाने भाल्याच्या टोकावरून स्पंज काढून घेतलं.
“महामहिमच्या
महानतेचे गुण गा!” त्याने घोषणा केली आणि हळूच भाला येशुआच्या छातीत खुपसला. तो
थरथरला आणि पुटपुटला, “महामहिम...”
त्याच्या पोटावर
रक्ताची धार वाहू लागली. खालचा जबडा थरथरला आणि त्याचं डोकं कलंडलं.
वीज दुस-यांदा
कडकडली,
वधिकाने दिसमासला पाणी पाजलं आणि तेच शब्द म्हटले:
“महामहिमचे गुण
गा!” आणि त्यालापण मारून टाकलं.
मतिहीन झालेला
गेस्तास वधिकाला आपल्या जवळ बघतांच घाबरून ओरडला, पण जसांच त्याच्या ओठांना
ओला स्पर्श जाणवला, त्याने विव्हळून पाणी चोखायला सुरुवात
केली. काही क्षणांनी त्याच शरीर पण लटकू लागल, जितकं दोरखण्ड
असल्या मुळे लटकूं शकंत होतं.
टोपवाला माणूस
वधिक आणि सेन्चुरियनच्या मागे-मागे चालला होता आणि त्याच्या मागे होता मंदिराच्या
सुरक्षा दलाचा नायक. पहिल्या स्तम्भाजवळ थांबून टोपवाल्या माणसाने लक्षपूर्वक
येशुआच्या लहुलुहान शरीराकडे बघून त्याच्या टाचांना आपल्या पांढ-या हातांनी स्पर्श
केला आणि आपल्या बरोबरच्या माणसांना म्हणाला:
“मेला.”
हीच क्रिया
दुस-या दोन्हीं वधस्तंभाजवळही झाली.
ह्याच्यानंतर
ट्रिब्यूनने सेन्चुरियनला खूण केली आणि ते मंदिराच्या सुरक्षा-दलाचा नायक आणि
टोपवाल्या माणसाबरोबर माउन्टेनवरून खाली उतरूं लागले. अर्धवट अंधार झाला, विजा
जणु आकाशाला चिरू लागल्या. त्यांतून अचानक आगीचा लोळ उठला
आणि सेन्चुरियनची किंकाळी, “घेरा काढा!” त्या गर्जनेत विरून
गेली. आनंदी सैनिक आपले टोप घालंत माउन्टेनवरून खाली धावले. अंधाराने येर्शलाइमला
पूर्णपणे झाकून टाकलं.
मुसळधार पावसाने
सेंचुरियनला अर्ध्या रस्त्यांत झोडपलं. पाउस इतका प्रचण्ड होता, की
खाली पळणा-या सैनिकांना पकडण्यासाठी पाण्याच्या खळखळत्या धारा वाहू लागल्या. सैनिक
ओल्या मातीवर घसरूं लागले, पडू लागले. ते मुख्य मार्गावर
पोहोचण्याचा प्रयत्न करंत होते, जिथे खळखळत्या पाण्यांत
तार-तार भिजलेली अश्वारोही तुकडी येर्शलाइमला चालली होती. काही मिनिटांनी वादळ,
पाणी आणि अग्नीच्या तांडवात माउन्टेनवर फक्त एकंच माणूस उरला होता.
तो उगीचंच चोरलेला चाकू सांभाळंत, निसरड्या जागांपासून
स्वतःला वाचवंत, शक्य तो आधार शोधंत, कधी-कधी
गुडघ्यांवर रांगत वध-स्तम्भांकडे जाऊं लागला. कधी तो अंधारांत पूर्णपणे लुप्त
व्हायचा, तर कधी विजेचा प्रकाश त्याला आलोकित करून जायचा. वध-स्तंभांच्या
जवळ पोहोचल्यावर त्याने आपला लथपथ झालेला कोट काढून फेकला, फक्त
एका शर्टांत तो येशुआच्या पायांना बिलगला. त्याने सगळ्या
दो-या कापल्या, खालच्या क्रॉसवर चढला, येशुआच्या
शरीराचं आलिंगन करंत त्याचे दोन्ही हात मोकळे केले. येशुआचं ओलं, नग्न शरीर लेवीला बरोबर घेऊन जमिनीवर पडलं. लेवी त्याला आपल्या खांद्यांवर
उचलणारंच होता, तेवढ्यांत एका विचाराने त्याला थांबवलं.
त्याने तिथेच, पाण्यांत बुडालेल्या जमिनीवर त्या शरीराला
सोडलं आणि अडखळंत, घसरंत बाकीच्या दोन वध-स्तंभांकडे गेला.
त्याने त्यांचे दोरपण कापले आणि आणखी दोन मृत शरीर जमीनीवर कोसळले.
आणखी काही
क्षणानंतर माउन्टेनच्या शिखरावर उरले होते फक्त तेच दोन मृत शरीर आणि तीन रिकामे
वध-स्तम्भ. पाणी ह्या शरीरांवर जोरांत प्रहार करंत त्यांना उलटं-पालटं करंत होतं.
ह्या वेळेस
माउन्टेनवर ना तर लेवी होता, ना येशुआचं शरीर.
********