रविवार, 10 सितंबर 2017

मास्टर आणि मार्गारीटा - 15



पंधरा
     

निकानोर इवानोविचचं स्वप्न



   हा अनुमान करणं कठीण नाहीये, की लाल चेह-याचा जाड्या, ज्याला हॉस्पिटलच्या 119नंबरच्या खोलींत आणलं होतं, निकानोर इवानोविच बसोय होता.
पण त्याला प्रोफेसर स्त्राविन्स्कीकडे लगेच नाही आणलं, काही वेळ दुस-या जागेंत1 ठेवून मग त्याला इथे पाठविण्यांत आलं.
ह्या दुस-या जागेबद्दल निकानोर इवानोविचला फारंच कमी आठवतंय. त्याला फक्त टेबल, अलमारी आणि सोफा – येवढंच लक्षांत होतं.
तिथे निकानोर इवानोविचला, ज्याला रक्त-दाब आणि मानसिक उत्तेजनेमुळे आपल्या डोळ्यांसमोर सगळंच अगदी अस्पष्ट दिसंत होतं, काही प्रश्न विचारण्यांत आले. पण हे संभाषण बरंच विचित्र आणि क्लिष्ट होतं, खरं म्हणजे त्यांतून काहीच निष्कर्ष नाही निघाला.
पहिलाच प्रश्न, जो त्याला विचारण्यांत आला, तो होता – “तुम्हीं, निकोलाय इवानोविच बसोय, सादोवायाच्या बिल्डिंग नंबर 302बी च्या हाउसिंग सोसाइटीचे प्रेसिडेण्ट आहांत?”
ह्यावर निकोलाय इवानोविचने भयंकर हास्य केलं आणि म्हणाला:
“मी निकानोर आहे, शंकाच नाही, निकानोर! पण मी प्रेसिडेण्ट कुठून झालो!”
“म्हणजे काय?” डोळे बारीक करून निकानोर इवानोविचला विचारण्यांत आलं.
“म्हणजे असं...” तो म्हणाला, “की जर मी प्रेसिडेण्ट आहे, तर मला लगेच समजायला पाहिजे होतं, की तो एक दुष्ट शक्ति आहे! नाहीं तर, हे सगळं काय आहे? चश्मा तुटलेला...फाटके कपडे घातलेला...तो कोण्या परदेशी पाहुण्याचा दुभाष्या कसा काय असूं शकतो?”
“कोणाबद्दल बोलतांय?” निकानोर इवानोविचला विचारण्यांत आलं.
“करोव्येव!” निकानोर इवानोविच ओरडला, “आमच्या बिल्डिंगच्या पन्नास नंबरच्या फ्लैटमधे घुसून गेलाय. लिहा: करोव्येव! त्याला लगेच पकडलं पाहिजे. लिहा: सहावं प्रवेश द्वार. तिथेच आहे तो.”
“डॉलर्स कुठून घेतले?” अत्यंत प्रेमाने निकानोर इवानोविचला विचारण्यांत आलं.
“सर्वशक्तिमान, सर्वव्यापी ईश्वर,” निकानोर इवानोविच म्हणाला, “सगळं बघतोय. आणि मला पण तिथेच जायचं आहे. मी डॉलर्सला कधी हात सुद्धां लावला नाही आणी मला शंकासुद्धां नाही आली, की हे कसले नोट आहेत! जर मी गुन्हा केला असेल, तर परमेश्वर मला शिक्षा देईल.” कधी आपला शर्ट खेचत, कधी त्याला ढीला करंत, कधी क्रॉसचं चिन्ह बनवंत भावपूर्ण स्वरांत निकानोर इवानोविच सांगंत गेला, “घेतले! घेतले, पण आपले सोवियत नोट घेतले! घेऊन सहीसुद्धां केली. वाद-विवाद नाही करंत; आमचा सेक्रेटरी प्रोलेझ्नेव पण चांगला माणूस आहे, खूपंच चांगला आहे! मी खुल्लम-खुल्ला सांगतोय की हाउसिंग सोसायटींत सगळे चोर आहेत. पण डॉलर्स मी नाही घेतले!”
जेव्हां त्याला म्हटलं, की वेडा असण्याचं नाटक करूं नको आणि सरंळ सांग की बाथरूमच्या वेन्टिलेटरमधे डॉलर्स कुठून आले, तेव्हां निकानोर इवानोविच गुडघ्यांवर बसून, तोंड उघडून मागे-पुढे हलूं लागला, जणु त्याला लाकडी फरशीच्या पट्ट्या गिळायच्या आहेत.
“तुम्हीं म्हणाल तर...” तो पुटपुटला, “मी माती खायला तयार आहे, हे सिद्ध करायला, की मी डॉलर्स नाही घेतले? आणि करोव्येव, तो तर सैतान आहे!”
सहनशक्तीचीसुद्धां एक सीमा असते. विचारपूस करणा-यांनी आता आपला आवाज उंच केला होता. ते चेतावनीसुद्धां देत होते, की आता निकानोर इवानोविचची माणसासारखं बोलायची वेळ आलेली आहे.
तेवढ्यांत ती सोफेवाली खोलीं निकानोर इवानोविचच्या घाबरलेल्या किंचाळीने भरून गेली, तो उडी मारून उभा राहिला होता, “बघा, बघा, तिथे आहे! अलमारीच्या मागे! बघा, कसां चिडवतोय! त्याचा चश्मा...पकडा! खोलींत पवित्र पाणी शिंपडा!”
निकानोर इवानोविचचा चेहरा फक्क झाला होता, थरथर कापंत तो हवेत क्रॉसच चिन्ह बनवंत होता. दाराजवळ धावंत जाऊन परंत येत होता, कोणचीतरी प्रार्थना बुदबुदंत होता आणि शेवटी फक्त असंबद्ध बडबड करूं लागला.
दिसंत होतं की निकानोर इवानोविचची मानसिक स्थिति वार्तालाप करण्यासारखी नव्हती. त्याला एका वेगळ्या खोलींत नेऊन बसवलं, जिथे तो थोडा शांत झाला. आता तो फक्त प्रार्थना करंत होता आणि अधून-मधून हुंदके देत होता.
सादोवाया स्ट्रीटवर गेले, फ्लैट नम्बर 50मधे एक टीम पाठवण्यांत आली, पण तिथे करोव्येव-बिरोव्येव किंवा त्याला ओळखणारा कुणीच नव्हता. तो फ्लैट, जिथे मृतक बेर्लिओज़ आणि याल्टाला गेलेला लिखादेयेव राहात होते, बिल्कुल रिकामा होता. खोलीतल्या अलमा-या सील केलेल्या होत्या आणि त्यांच्यावर मेणाची सील चुपचाप बसली होती. हे सगळं बघून सादोवायावरून परंत आले. त्यांच्याच बरोबर बिल्डिंगमधून वैतागलेला, घाबरलेला हाउसिंग सोसाइटीचा सेक्रेटरी प्रोलेझ्नेव होता.
संध्याकाळी निकानोर इवानोविचला स्त्राविन्स्कीच्या हॉस्पिटलमधे आणलं. तिथे त्याने इतका धुमाकूळ घातला, की स्त्राविन्स्कीच्या आज्ञेप्रमाणे त्याला झोपेचं इंजेक्शन द्यावं लागलं. अर्धी रात्र उलटल्यावर निकानोर इवानोविचचा डोळा लागला. तो 119नंबरच्या खोलींत झोपला होता आणि मधून-मधून विव्हळंत होता.
हळू-हळू त्याची झोप गाढ झाली. त्याने कुशी बदलणं आणि विव्हळणं बंद केलं. त्याचा श्वास एका लयीत चालू लागला; तेव्हां त्याला खोलींत एकटं राहू दिलं.
निकानोर इवानोविचने एक स्वप्न पाहिलं, जे स्पष्टपणे त्याच्या आजच्या दुःखाशी संबंधित होतं. त्याने बघितलं की सोनेरी तुता-या घेतलेले काही लोकं त्याला पकडून समारोहपूर्वक एका भव्य चमचमणा-या दाराकडे घेऊन चाललेत. ह्या दारापर्यंत येऊन त्याच्याबरोबर आलेल्या लोकांनी जणु त्याच्या सम्मानार्थ स्वागत गीत वाजवणं सुरूं केलं. तेवढ्यांत आकाशवाणी झाली:
“स्वागत आहे, निकानोर इवानोविच! डॉलर्स द्या!”
निकानोर इवानोविचने आश्चर्याने वर बघितलं, तिथे काळ्या रंगाचा लाउडस्पीकर लावलेला होता.
मग न जाणे कसा तो एका थियेटरमधे आला, जिथे सोनेरी छताला शानदार झुम्बर लटकले होते आणि भिंतीवर क्विन्क्वेट2 लैम्प्स लावले होते. सगळं अगदी तसंच होतं, जसं एका शानदार छोट्याशा थियेटरमधे असतं. स्टेजवर मखमली पडदा होता, दाट काळपट-लाल रंगाचा, सोनेरी तारे शिवलेला, प्रॉम्प्टिंग बॉक्स होता, दर्शकसुद्धां होते.
निकानोर इवानोविचला हे बघून आश्चर्य वाटलं की दर्शक एकाच वर्गाचे – पुरुष वर्गाचे होते, आणि सगळे माहीत नाही कां, दाढीवाले होते. त्याला ह्या गोष्टीचंसुद्धां आश्चर्य वाटलं की तिथे खुर्च्या नव्हत्या, सगळे फरशीवरंच बसले होते; फरशी मस्त पॉलिश केलेली, चिक्कण होती.
ह्या नवीन वातावरणाचा संकोच दूर सारून निकानोर इवानोविचसुद्धां इतरांसारखा, एका लाल दाढीवाल्या लट्ठ्या आणि एक फिक्कट चेह-याच्या बेढब नागरिकांच्या मधे फरशीवर मांडी घालून बसून गेला. कोणीही आगंतुकाकडे लक्ष नाही दिले.
इतक्यांत घंटीचा मंजुळ आवाज ऐकूं आला, हॉलचे लाइट्स बंद झाले, पडदा उघडला आणि स्टेजवर दिसलं एक टेबल आणि खुर्ची. टेबलावर ठेवली होती सोनेरी घण्टी. पार्श्वभूमिवर काळ्या रंगाचं मखमल लावलेलं होतं.
विंगमधून ईवनिंग जैकेट घातलेला, चिकण्या चेह-याचा, केसांचा व्यवस्थित भांग पाडलेला एक सुरेख तरुण कलाकार आला. दर्शकांमधे हालचाल झाली आणि सगळे स्टेजकडे बघूं लागले. कलाकार बॉक्सकडे आला आणि हात चोळूं लागला.
“बसले आहांत?”3 त्याने गोड, भारदस्त आवाजांत स्मित करंत दर्शकांना विचारलं.
“बसलोय, बसलोय...” अनेक जाड्या, बारीक आवाजांच्या समूहाने उत्तर दिलं.
“हुँ...” कलाकारा विचारांत गढल्यासारखा म्हणाला, “तुम्हीं कित्ती बोर झाला आहांत, मला काय माहीत नाहीये! दुसरे लोक रस्त्यांवर हिंडतांत, मौजमस्ती करतांत, वसंत ऋतूच्या सूर्याचा आनंद घेतात, आणि तुम्हीं इथे दमट हॉलमधे ज़मिनीवर पडले आहांत! हा कार्यक्रम काय इतका मनोरंजक आहे? जाऊं द्या, आपली-आपली आवंड असते,” कलाकार दार्शनिकासारखा बोलला.
मग त्याने आपला स्वर आणि बोलण्याची पद्धत बदलून प्रसन्नतेने जोरांत म्हटलं, “तर, कार्यक्रमाचे पुढील कलाकार आहेत – निकानोर इवानोविच बसोय, हाउसिंग सोसाइटीचे प्रेसिडेण्ट आणि संतुलित आहार भोजनालयाचे प्रमुख. निकानोर इवानोविच, या!”
दर्शकांने टाळ्या वाजवून सूत्रधाराला प्रतिसाद दिला. चकित निकानोर इवानोविचने विस्फारलेल्या डोळ्यांनी चारीकडे बघितलं, सूत्रधाराने आपल्या चेह-यावर येत असलेल्या उजेडाला हातांनी थांबवंत हॉलमधे बसलेल्या निकानोर इवानोविचला शोधून काढलं आणि खुणेने त्याला स्टेजवर यायला सांगितलं. निकानोर इवानोविचला कळलंसुद्धां नाही की तो कसा स्टेजवर पोहोचला.
त्याच्या डोळ्यांवर स्टेजच्या समोरून आणि खालून येणारा रंगीत बल्ब्सचा प्रकाश आदळला; ज्याच्यामुळे दर्शकांसमवेत हॉल अंधारांत गडप झाला.
“तर, निकानोर इवानोविच, एक उदाहरण प्रस्तुत करा,” युवा कलाकार मोठ्या प्रेमाने म्हणाला, “आणि डॉलर्स देऊन टाका.”
एकदम शांतता पसरली. निकानोर इवानोविचने दीर्घ श्वास घेऊन हळू आवाजांत म्हटलं:
देवाची शप्पथ घेऊन सांगतो की...”
पण तो हे शब्द पूर्णपणे म्हणूपण शकला नाही, की हॉलमधे “हाय...हाय...” चे आवाज यायला लागले. निकानोर इवानोविच गोंधळून गप्प झाला.
“तुमचं म्हणणं मला जेवढं कळलंय...” सूत्रधार म्हणाला, “त्याप्रमाणे तुम्ही देवाची शप्पथ घेऊन हे सांगणार होते, की तुमच्याकडे डॉलर्स नाहीयेत?” आणि त्याने सहानुभूतिने निकानोर इवानोविचकडे पाहिलं.
“अगदी बरोबर, माझ्याकडे नाहीयेत...” निकानोर इवानोविचने उत्तर दिलं.
“तर…” कलाकाराने विचारलं, “धृष्ठतेसाठी क्षमा करा, त्या फ्लैटच्या शौचालयांत 400 डॉलर्स कुठून आले, ज्यांत फक्त तुम्हीं आपल्या बायकोबरोबर राहता?”
“जादूचे असतील!” अंधारांत कोणीतरी उपहासाने टिप्पणी केली.
“अगदी बरोबर...जादूचेच होते,” अत्यंत नम्रतेने निकानोर इवानोविच अंधा-या हॉलला, किंवा पब्लिकला संबोधित करंत म्हणाला, “सैतानी शक्ति, चौकटीचा शर्ट घातलेल्या दुभाष्याने ते फेकले आहेत.”
हॉलमधे पुन्हां अप्रसन्न कल्लोळ होऊं लागला, जेव्हां आवाज किंचित शांत झाले तेव्हां कलाकार म्हणाला, “बघा, कश्या-कश्या ला-फोन्तेनच्या गोष्टी मला ऐकाव्या लागतांत. 400 डॉलर्स फेकून गेला! आता तुम्हीं: इथे तुम्हीं सगळे डॉलर्सवाले आहांत! मी तुम्हांला विचारतो – ह्या गोष्टीवर विश्वास ठेवणे शक्य आहे कां?”
“आमच्याकडे काही डॉलर्स-बीलर्स नाहीयेत.” हॉलमधून काही आहत स्वर ऐकूं आले, “पण ह्या गोष्टीवर मात्र कोणीच विश्वास ठेवणार नाही.”
“ मी पूर्णपणे तुमच्याशी सहमत आहे,” कलाकार ठामपणे म्हणाला, “आणि मी तुम्हांला विचारतो: कोणची वस्तू फेकली जाऊं शकते?”
“लहान मूल!” हॉलमधे कोणीतरी ओरडलं.
“अगदी बरोबर,” सूत्रधार म्हणाला, “लहान मूल, निनावी पत्र, जाहिरात, खतरनाक कार वगैरे...वगैरे, पण चारशे डॉलर्स कोणीच नाही फेकणार, कारण जगांत असा मूर्ख कोणीच नाहीये,” निकानोर इवानोविचकडे बघून सूत्रधार निराशेने आणि त्याच्यावर ठपका ठेवंत म्हणाला, “तुम्हीं मला दुःखी केलंय निकानोर इवानोविच! मला तुमच्यावर खूप भरोसा होता. तर, हे, काही जमलं नाही.”
हॉलमधे निकानोर इवानोविचकडे बघंत लोक शिट्ट्या वाजवूं लागले.
“डॉलर्स आहेत त्याच्याकडे,” हॉलमधून बरेचसे आवाज आले, “अशांच लोकांमुळे प्रामाणिक लोकपण मारले जातात.”
“त्याच्यावर राग नका काढू,” सूत्रधार सौम्यपणे म्हणाला, “तो स्वीकार करेल,” आणि निकानोर इवानोविचकडे आपल्या निळ्या, अश्रूपूर्ण डोळ्यांनी बघंत पुढे म्हणाला, “तर, निकानोर इवानोविच, आपल्या जागेवर जा.”
ह्याच्यानंतर सूत्रधारने घण्टी वाजवून घोषणा केली, “मध्यांतर, दुष्टांनो!”
हादरलेला निकानोर इवानोविच, जो अप्रत्याशितपणे ह्या कार्यक्रमाचा एक भाग झालेला होता, माहीत नाही कसा, परंत फरशीवर आपल्या जागेवर पोहोचला. त्याने बघितलं, की हॉलमधे पूर्णपणे अंधार झालाय, भिंतीवर लाल चमकदार अक्षरं प्रकट होऊं लागले : डॉलर्स द्या!
थोड्या वेळाने पडदा पुन्हां उघडला आणि सूत्रधार म्हणाला, “सेर्गेइ गेरार्दोविच दुंचिल, कृपा करून स्टेजवर या.”
दुंचिल एक सहृदय, पण आजा-यासारखा, जवळ-जवळ पन्नास वर्षांचा माणूस होता.
“सेर्गेइ गेरार्दोविच,” सूत्रधार त्याला म्हणाला, “तुम्हीं इथे दीड महिन्यापासून आहांत, पण तरीही उरलेले डॉलर्स द्यायला तयार होत नाहीये, आणि देशाला परदेशी मुद्रेची भयंकर आवश्यकता आहे आणि ती तुमच्या काही कामाचीसुद्धां नाहीये. तरीही तुम्हीं आपलंच तुणतुणं वाजवताय. तुम्हीं तर समजदार आहांत. तुम्हांला सगळं कळतंय. तरीही माझ्याकडे येत नाहीये.”
“मी दिलगीर आहे, ह्या बाबतीत मी काहीही करूं शकंत नाही, कारण की माझ्याजवळ आत डॉलर्स खरंच नाहीयेत,” दुंचिलने शांतपणे सांगितलं.
“कमीत कमी हीरे-जवाहिरात तरी असतील?” कलाकाराने विचारलं.
“हीरे-जवाहिरातपण नाहीये.”
कलाकाराने मान खाली केली आणि किंचित विचार करून त्याने टाळी वाजवली. विंगमधून मध्यम वयाची, फैशनेबल कपडे घातलेली एक महिला आली. तिच्या कोटाला कॉलर नव्हती आणि टोपी, सुरेख, विणलेली होती. महिला किंचित उत्तेजित वाटंत होती, पण दुंचिलने निर्विकार भावाने तिच्याकडे पाहिलं.
“ही महिला कोण आहे?” सूत्रधाराने दुंचिलला विचारलं.
“ही माझी बायको आहे,” दुंचिलने मोठेपणाने म्हटलं आणि किंचित तिरस्काराने बायकोच्या लांब मानेकडे बघितलं.
“माफ़ करा, मैडम दुंचिल, आम्हीं तुम्हांला त्रास दिला,” सूत्रधार महिलेला म्हणाला, “मुद्दा हा आहे, की आम्हांला विचारायचं आहे, की तुमच्या नव-याकडे आणखी डॉलर्स आहेत कां?”
“त्याने तेव्हांच सगळं देऊन टाकलं होतं,” किंचित त्रासून मैडम दुंचिलने म्हटलं.
“जर असं आहे,” सूत्रधार म्हणाला, “तर आम्हांला लगेच सेर्गेइ गेरार्दोविचचा निरोप घ्यावा लागेल, काय करणार! सेर्गेइ देरार्दोविच, वाटलं तर तुम्हीं थियेटरमधून बाहेर जाऊ शकता...” सूत्रधारने शानदार अभिवादन केलं.
दुंचिल ऐटींत वळला आणि विंगकडे जाऊं लागला.
“एक मिनिट!” सूत्रधार त्याला थांबवंत म्हणाला, “जातां-जातां आमच्या कार्यक्रमाचा आणखी एक आइटम दाखवण्यांची परवानगी द्या,” आणि त्याने दुस-यांदा टाळी वाजवली.
मागचा काळा पडदा दूर झाला आणि नृत्याचा पोषाक घातलेली एक सुंदर, तरुण मुलगी हातांत सोनेरी ट्रे घेऊन स्टेजवर आली. ट्रेमधे रिबिनीने बांधलेली एक जाड गड्डी आणि हि-यांचा नेकलेस होता, ज्यांतून चारीकडे निळ्या, पिवळ्या आणि लाल ज्वाळा निघंत होत्या.
दुंचिलने एक पाय मागे घेतला आणि त्याचा चेहरा फक्क झाला. हॉलमधे स्तब्धता पसरली.
“अठरा हजार डॉलर्स आणि चाळीस हजार स्वर्ण मुद्रांचं नेकलेस,” कलाकाराने विजयी मुद्रेने म्हटलं, “लपवून ठेवलं होतं सेर्गेइ गेरार्दोविचने खारकोव शहरांत आपली प्रेयसी इडा हरक्युलोव्ना बोर्सच्या फ्लैटमधे, जिला भेटण्याचं सौभाग्य आम्हाला लाभलं आणि जी मोठ्या आनंदाने हा बेशकीमती, पण एकाच व्यक्तिसाठी निरर्थक खजिन्याला येथे घेऊन आली. खूप-खूप धन्यवाद, इडा हरक्युलोव्ना!”
सुन्दरीने स्मित करंत आपले दात दाखवले. तिच्या मखमली पापण्या थरथरल्या.
सूत्रधार दुंचिलला म्हणाला, “आणि तुमच्या गरिमामय मुखवट्यामागे लपलेला आहे एक हावरा कोळी, एक खतरनाक फसव्या आणि खोटारडा. आपल्या हट्टामुळे तुम्ही दीड महिना सगळ्यांना त्रास देत राहिले. आता सरळ घरी जा आणि तिथे तुमची बायको तुमच्यासाठी जो नर्क बनवेल, तीच तुमची शिक्षा आहे.”
दुंचिल कोलमडून पडणारंच होता की कोणाच्यातरी मजबूत हातांनी त्याला सावरलं. तेवढ्यांत समोरच्या पडद्याची घरघर ऐकूं आली आणि सगळे त्याच्यामागे लपले.
उन्मत्त टाळ्यांनी हॉल इतका हादरला की निकानोर इवानोविचला झुमरांतील प्रकाश उसळंत असल्यासारखा भासला, आणि जेव्हां समोरचा काळा पडदा दूर झाला तेव्हां स्टेजवर एकटा सूत्रधार होता. त्याने टाळ्यांच्या गडगडाची दुसरी फेरी थांबवत अभिवादन केलं आणि बोलूं लागला:
“दुंचिलच्या रूपांत आपल्यासमोर एका विशिष्ठ प्रकारच्या गाढवाने अभिनय केला होता. मी तुम्हांला कालंच सांगून टाकलं होतं की परदेशी चलन लपवण्यांत काहीही फायदा नाहीये. त्याचा उपयोग कोणीही, कधीही नाही करू शकंत, मी ठामपणे सांगतो. आता ह्या दुंचिललांच घ्या. त्याला लट्ठ पगाराची नौकरी आहे, कोणच्या गोष्टीची कमतरतापण नाहीये, त्याच्याकडे मस्त फ्लैट आहे, बायको आहे, सुरेख प्रेयसीदेखील आहे. तर मग, सुखा-समाधानाने राहण्याऐवजी ह्या सैतानाने हीरे-जवाहिरात आणि डॉलर्स लपवले. परिणाम काय झाला? सगळ्यांच्या समोर बिंग फुटलं. आणि कौटुम्बिक कलहाला सुद्धां आमंत्रण दिलं. तर, आणखी कोणाला द्यायचेत? कोणी आहे? तर, आता कार्यक्रमाचा पुढचा आइटम आहे – पूश्किनच्या “लोभी सरदार”4 च्या काही अंशांच प्रस्तुतिकरण. प्रस्तुत करताहेत प्रसिद्ध ड्रामा आर्टिस्ट कुरोलेसोव साव्वा पतापोविच, ज्यांना आम्हीं विशेष आग्रह करून इथे बोलावलंय.”
चपळ, गलेलट्ठ, चिकण्या चेह-याचा, लांब फ्रॉक कोट आणि पांढ-या टायमधे हा कुरोलेसोव पट्कन रंग़मंचावर आला.
काहीही प्रस्तावना न करतां, त्याने उदास चेह-यावर एक विशिष्ठ भाव आणून भुवया आकुंचित केल्या आणि सोनेरी घण्टीकडे बघंत नाटकी आवाजांत  म्हणाला, “जसा एक मस्त-मवाली लपाछिपी खेळण्या-या व्यभिचारिणीला भेटायची वाट बघतो...”5
आणि कुरोलेसोवने स्वतःबद्दल ब-यांच वाईट गोष्टी सांगितल्या. निकानोर इवानोविच ऐकंत होता, की कशी एक दुर्दैवी विधवा त्याच्यासमोर मुसळधार पावसांत गुडघे टेकून रडंत होती, पण कुरोलेसोवला दया नाही आली. स्वप्न बघेपर्यंत निकानोर इवानोविचला पूश्किनच्या रचनांबद्दल काहीही माहिती नव्हती पण तो पूश्किनला चांगलंच ओळखायचा आणि जवळ-जवळ रोजचं अश्या प्रकारे म्हणायचा, जसं : “आणि फ्लैटचं भाडं, काय पूश्किन6 देणारेय? किंवा “पाय-यांवरचा बल्ब, कदाचित पूश्किनने काढलांय?”; केरोसिन ऑइल, कदाचित पूश्किन विकंत आणेल?”    
पण आतां पूश्किनच्या एका रचनेशी परिचय झाल्यावर निकानोर इवानोविच उदास झाला. त्याच्या डोळ्यांसमोर पावसांत भिजंत, आपल्या अनाथ मुलांसोबंत गुडघे टेकणा-या महिलेचा चेहरा तरंगला. त्याच्या मनांत आलं : कमालीचा आहे हा कुरोलेसोवपण!
आणि तो, मोठमोठ्याने आपले दोष स्वीकार करून पश्चात्ताप करंत होता. शेवटी तर त्याने निकानोर इवानोविचला खूपंच गोंधळांत टाकलं, कारण की अचानक तो अश्या व्यक्तीशी वार्तालाप करूं लागला, जो स्टेजवर नव्हतांच. त्या व्यक्तीचं उत्तरपण स्वतःच देऊं लागला. कधी तो स्वतःला सम्राट’, तर कधी सामन्त’; कधी बाबा’, तर कधीबेटा’; कधी तुम्हीं’, तर कधी तूम्हणून संबोधित करंत होता.                 
निकानोर इवानोविचला फक्त एकंच गोष्ट समजली
, की कलाकार खूप वाईट प्रकारे मेला. त्याचे शेवटचे शब्द होते : “किल्ल्या! माझ्या किल्ल्या!” मग तो जमिनीवर पडला. भसाड्या आवाजांत रडंत-रडंत त्याने आपली टाय काढून टाकली.
मेल्यानंतर कुरोलेसोव उठला. आपल्या कपड्यांवरची धूळ झटकून त्याने दर्शकांचं अभिवादन केलं, आणि नाटकीपणाने हसंत, टाळ्यांच्या मंद आवाजांत, हळू-हळू दूर होत गेला.
सूत्रधार म्हणाला, “आत्तांच आपण साव्वा पतापोविचच्या झकास अभिनयांत “लोभी सरदार” बघितला. ह्या सरदाराला आशा होती, की त्याच्याजवंळ अप्सरा धावत येतील आणि काही सुखद चमत्कार होतील. पण, जसं तुम्हीं बघितलं, की असं काहीही नाही झालं. ना तर अप्सरा आल्या, ना कवींनी त्याच्या साठी प्रशंसात्मक गीत लिहिले; त्याच्यासाठी स्मारंकसुद्धां नाही बांधले; ह्या उलंट तो खूप दुर्दैवीपणाने मेला – हृदय बंद पडल्याने, आपल्या पेटीवर, जी डॉलर्स आणि हीरे-जवाहिरातांनी गच्च भरलेली होती, तो नरकांत गेला. मी चेतावनी देतो, की जर तुम्हींसुद्धां डॉलर्स परंत नाही केले, तर तुमचापण ह्यापेक्षांही वाईट, नाहीतर असांच अंत होईल!” माहीत नाही, हा पूश्किनच्या कवितेचा प्रभाव होता, की सूत्रधाराच्या भाषणाचा, पण हॉल मधून एक लाजरा आवाज आला, “मी डॉलर्स देतो.”
“कृपा करून स्टेजवर या!” सूत्रधाराने अंधा-या हॉलमधे लक्ष देऊन बघंत म्हटलं.
आणि रंगमंचावर दिसला पांढ-या केसांचा छोटा माणूस, ज्याच्या चेह-याकडे बघून असं वाटंत होतं, की त्याने जवळ-जवळ तीन आठवड्यांपासून दाढी नाही केलीय.
“माफ़ करा, तुमचं नाव सांगाल का?” सूत्रधारने विचारलं.
“कनाव्किन निकोलाइ!” आगंतुकाने लाजंत उत्तर दिलं.
“ओह
, खूप आनंद झाला नागरिक कनाव्किन, तर?”
“देतोय,” कनाव्किनने हळूच म्हटलं.
“किती?”
“एक हजार डॉलर्स आणि दहा रुबल्सच्या 20 स्वर्ण मुद्रा.”
“शाबाश! म्हणजे, जे काही तुमच्याजवळ आहे, ते सगळं?”
सूत्रधाराने सरळ कनाव्किनच्या डोळ्यांत पाहिलं. कनाव्किनला असा भास झाला, जणु ह्या डोळ्यांतून त्याच्या शरीराच्या आर-पार जाणारे किरण निघताहेत, जश्या एक्स-रे किरण असतांत. हॉलमधे लोक श्वाससुद्धा घेणं विसरले.
“मला विश्वास आहे!” एकदांच सूत्रधार म्हणाला आणि त्याने आपली नजर दूर केली, “पूर्ण विश्वास आहे! हे डोळे खोटं नाही बोलंत आहेत, मी तुम्हांला कित्तीदा संगितलंय की तुम्हीं सर्वांत मोठी चूक ही करता की, माणसाच्या डोळ्यांच महत्व लक्षांत नाही घेत. लक्षांत ठेवा, जीभ खोटं बोलूं शकते, पण डोळे – कधीच नाही! जेव्हां तुम्हाला एखादा अनपेक्षित प्रश्न विचारण्यांत येतो, तर तुम्हीं जरा सुद्धां विचलित नाही होत, एका क्षणांत स्वतःवर ताबा मिळवतां; सत्य लपवायला काय म्हणायचंय, हे ठरवून टाकतां; मोठ्या आत्मविश्वासाने उत्तर देता; तुमच्या चेह-यावरची एकही रेषा नाही थरथरंत – पण, आह, ह्या एका प्रश्नाने तुमच्या अंतर्मनांत जे वादळ उठलं होतं, ते उसळून डोळ्यांपर्यंत येऊन धडकतं. बस, मग, सगळंच संपतं! डोळे तुमचं रहस्य सांगून टाकतांत आणि तुम्हीं पकडले जाता!”
आवेशात इतकं भाषण दिल्यावर सूत्रधाराने खूप प्रेमाने कनाव्किनला विचारलं, “कुठे लपवलेत?”
“माझी आत्या परखोव्निकोवाकडे, प्रिचिस्तेन्कात...”
“ओह कुठे...थांब...क्लाव्दिया इलीनिच्नाकडे तर नाही?”
“हो!”     
“असं, हो, हो, हो! छोटसं घर? समोर छोटाशा बगीचा? माहितीये, माहितीये! तिथे कुठे लपवलेत?”
“कबाडखान्यांत, एनिमाच्या डब्ब्यांत...”
सूत्रधारने हात जोडले.
“असं कुठे बघितलंय?” त्याने अत्यंत हताश होऊन म्हटलं, “तिथे त्यांना ओल येईल, बुरशी लागेल! काय अश्या लोकांच्या हातांत डॉलर्स दिले पाहिजेत? हूँ? अगदी लहान मुलांसारखं वागणं...अरे देवा!”
कनाव्किन स्वतःपण समजून गेला की त्याने घाणेरड काम केलंय, ज्याची त्याला शिक्षा मिळालीये. त्याने मान खाली घातली.
“पैसे,” सूत्रधार पुढे म्हणाल्या, “सरकारी बैंकेत ठेवायला पाहिजे, त्यांच्यासाठी मुद्दाम बनवलेल्या कोरड्या आणि सुरक्षित खोल्यांमधे, आत्याबाईंच्या कबाडखान्यांत तर कधीच नाही. तिथे उंदीर त्यांना खाऊन टाकतील, कनाव्किन! तुम्हीं तर मान्यवर व्यक्ती आहांत.”
कनाव्किनला कळंत नव्हतं, की स्वतःला कुठे लपवावं, तो कोटाच्या कॉलरशी खेळंत राहिला.
“जाऊं द्या!” सूत्रधार किंचित नरम पडला, “जो आपल्या जुन्या सवयी सोडून देतो...” आणि मग अचानक  म्हणाला, “ हो, म्हणजे एकदमंच, ज्याने तिथे दुस-यांदा कार घेऊन जायला नको...ह्या आत्याकडे तिचे स्वतःचे डॉलर्सपण आहेत कां? हो?”
कनाव्किनला वाटलं नव्हतं की हे प्रकरण असं उलटेल, तो थरथरला. थियेटरमधे शांतता पसरली.
“ऐ कनाव्किन,” अतिशय प्रेमाने सूत्रधार म्हणाला, “मी तर ह्याची तारीफ केली होती. ह्याने तर उगाचंच गुंतागुंत वाढवली! हे चांगलं नाहीये, कनाव्किन! मी आतांच डोळ्यांबद्दल बोलंत होतो. मला विश्वास आहे, की आत्याबाईकडे आहेत, तर मग उगाचंच कां सतावतांय?”
“आहेत!” कनाव्किन एकदम ओरडला.
“शाबास!” सूत्रधार ओरडला.
“शाबास!” हॉल गरजला.
जेव्हां टाळ्या थोड्या थांबल्या, तेव्हां सूत्रधाराने कनाव्किनचं अभिनंदन केलं, त्याच्याशी हस्तांदोलन केलं, त्याला कारने घरी सोडायचा प्रस्ताव मांडला आणि एका अन्य व्यक्तीला त्याच कारमधे आत्याबाईला कार्यक्रमासाठी महिला थियेटरमधे आणण्याची आज्ञा दिली.    
“हो, मी विचारणार होतो की आत्याबाईंने सांगितलं नाही का, की तिने स्वतःचे डॉलर्स कुठे लपवून ठेवलेय?” सूत्रधाराने कनाव्किनला सिगरेट आणि तिला पेटवण्यासाठी काडी पुढे करंत म्हटलं. तो कश घेता-घेता निराशेने हसला.
“विश्वास करतो, विश्वास करतो,” दीर्घ श्वास घेऊन कलाकार म्हणाला, “ती म्हातारी भाच्याला तर काय, सैतानाला सुद्धां नाही सांगणार! चला, तिच्या हृदयांत मानवी भावना जागवण्याचा प्रयत्न करूं या. कदाचित तिच्या हृदयाचे सगळे तार सडले नसतील. ठीक आहे, कनाव्किन, शुभेच्छा!”
कनाव्किन आनंदाने आपल्या घरी निघून गेला. सूत्रधाराने पुन्हां विचारलं की आणखी कोणाला डॉलर्स द्यायचेत कां, पण हॉल शांतच राहिला.
“अरे देवा, विचित्र लोक आहेत!” खांदे उचकावून सूत्रधार म्हणाला आणि पडद्याने त्याला लपवून टाकलं.
लाइट्स बंद झाले, थोडा वेळ अंधार राहिला आणि अंधारांत कुठून तरी दुरून एक उदास स्वर ऐकूं आला:
सोन्याचे ढेर पडलेत तिथे, आणि ते सगळे आहेत माझे! 7
मग कुठून तरी दोनदा टाळ्यांचा आवाज आला.
“महिला थियेटरमधे कोणी महिला डॉलर्स देते आहे,” अचानक निकानोर इवानोविचच्या बाजूला बसलेला लाल दाढीवाला म्हणाला आणि दीर्घ श्वास घेऊन म्हणाला, “ओह, जर माझ्याकडे हंस नसते! भल्या माणसा, माझ्याकडे लिआनोज़वमधे फायटर हंस आहेत. माझ्या शिवाय ते मरून जातील. पक्षी नाजुक आहे, फायटर आहे, त्याला उडायचंय...ओह, जर हंस नसते! पूश्किनच्या गोष्टीने कोणी माझं समाधान नाही करूं शकंत,” त्याने पुन्हा दीर्घ श्वास घेतला.
तेवढ्यांत हॉलमधे प्रखर प्रकाश झाला. निकानोर इवानोविचला स्वप्न पडलं, की हॉलच्या सगळ्या दारांतून पांढरे कपडे घातलेले, हातांमधे पळ्या घेतलेले स्वयंपाकी आत येतायंत. त्यांने सूपचं पातेलं आणि काळ्या ब्रेडची मोट्ठी ट्रे खेचंत आत आणली. दर्शकांमधे आनंदाची लाट पसरली. स्वयंपाकी खूप चपळतेने थियेटरमधे फिरून-फिरून ब्रेड आणि बाउल्समधे सूप टाकून दर्शकांना देत होते.
“खा, मित्रांनो!” ते ओरडंत होते, “आणि लपवलेले डॉलर्स देऊन टाका, उगाचंच इथे कशाला बसून आहांत? हे फालतू अन्न कोण खाईल. घरी जा, मस्त खा-प्या!”
“तू, काका, इथे कां बसलांय?” लाल मानेचा एक जाडा स्वयंपाकी एकुलतं एक कोबीचं पान तरंगंत असलेल्या सूपचं बाउल देतां-देता निकानोर इवानोविचला विचारू लागला.
“नाहीं1 नाही! माझ्याकडे नाहीये!” खूप भयानक आवाजांत निकानोर इवानोविचने उत्तर दिलं, “समजायचा प्रयत्न कर, खरंच नाहीयेत!”
“नाहीयेत?” स्वयंपाकीसुद्धां गरजला, “नाहीयेत?” बायकांसारख्या बारीक आवाजांत त्याने पुचकारंत विचारलं.
“नाहीं, नाहीं,” तो हळू-हळू बडबडंत-बडबडंत सहायक डॉक्टर प्रास्कोव्या फ्योदोरोव्नाच्या रूपांत परिवर्तित झाला.
ती विव्हळणा-या निकानोर इवानोविचच्या खांद्यावर हात फिरवंत होती. तेव्हां स्वयंपाकी धूर होऊन उडून गेले आणि पडदेवालं थियेटरसुद्धां गायब झालं. निकानोर इवानोविचने डबडबलेल्या नेत्रांनी हॉस्पिटलची आपली खोली बघितली. बघितले पांढरे कपडे घातलेले दोन व्यक्ती. हे स्वयंपाकी नव्हते जे इथे-तिथे आपलं नाक खुपसंत होते, हे डॉक्टर होते. त्यांच्या बरोबर होती प्रास्कोव्या फ्योदोरोव्ना, हातांत सूपचं बाउल नाही, पण जाळीने झाकलेली इंजेक्शनच्या सिरींजची प्लेट धरून.
“ही काय थट्टा आहे!” निकानोर इवानोविच खूप कटुतेने म्हणाला, जेव्हां त्याला इंजेक्शन दिलं जात होतं, “माझ्याकडे नाहीयेत, नाहीयेत! पूश्किनलांच त्यांना डॉलर्स देऊ द्या...नाहीयेत!”
“नाहीये, नाहीये,” त्याला पुचकारंत सहृदय प्रास्कोव्या फ्योदोरोव्ना म्हणाली.”नाही तर नाही, काही हरकत नाही!”
इंजेक्शन दिल्यानंतर निकानोर इवानोविचला थोडं हल्कं वाटलं. तो लगेच गाढ झोपून गेला.
पण त्याच्या किंचाळ्यांने 120नंबरच्या खोलीत उत्तेजना पसरली, जिथे पेशन्ट उठून बसला आणि आपलं डोकं शोधू लागला. 118नंबरच्या खोलीत मास्टर उत्तेजित होऊन निराशेने चंद्राकडे बघंत हात चोळू लागला. त्याला आठवली होती आपल्या जीवनातली शेवटची शरदाची रात्र, दाराच्या खालून खोलीत प्रवेश करणारी उजेडाची किरण आणि विस्कटलेले केस.
118नंबरच्या बाल्कनीतून ही उत्तेजना इवानकडे पोहोचली. तो उठून बसला आणि रडू लागला.
पण डॉकटरने लवकरंच ह्या उत्तेजित, दुःखी माणसांना शांत केलं. ते पुन्हां झोपी गेले. सगळ्यांत शेवटी झोपला इवान, जेव्हां नदीच्या पाण्यावर सकाळ होऊं लागली होती. औषध घेतल्यावर एका शांत लाटेने त्याला झाकलं. त्याचं शरीर शिथिल झालं. त्याला डुलकी येऊं लागली. तो झोपला. शेवटचा आवाज जो त्याने ऐकला, तो जंगलांत चिमण्यांच्या किलबिलीचा होता. पण लवकरंच सगळं शांत झालं. तो स्वप्न पाहू लागला, की बाल्ड माउन्टेनच्या मागे सूर्य अस्तंगत होऊ लागलाय आणि माउन्टेनभोवती दुहेरी सुरक्षा पंक्तींचा घेरा आहे...


**********

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें