रविवार, 30 जुलाई 2017

मास्टर आणि मार्गारीटा - 03


         
                                       
तीन



सातवं प्रमाण


हो, सकाळचे जवळ-जवळ दहा वाजले होते, आदरणीय इवान निकोलायेविच,” प्रोफेसरने म्हटलं.
कवीने चेह-यावर हात फिरवला, जणु आतांच झोपेतूंन जागा झालांय. त्याने बघितलं की पत्रियार्शीवर अंधार झाला होता. 
तलावाचं पाणी काळं दिसंत होतं, आणि त्यांत एक छोटीशी नाव संथपणे जात होती. वल्ह्यांच्या आवाजाबरोबरच नावेंत बसलेल्या कुण्या महिलेचं हसणंसुद्धां ऐकू येत होतं. वृक्ष्यांच्या आळींत चौकाच्या तिन्हीं बाजूंना बेंचावर इकडे-तिकडे बसलेले लोकं दिसंत होते, फक्त त्या दिशेला सोडून, जिथे आपले मित्र वार्तालाप करंत होते.
मॉस्कोच्या वरचं आकाश जणु फिक्कंट झालं होतं. वरती पूर्ण चंद्र अगदी स्पष्ट दिसंत होता. चंद्र आता सोनेरी नसून पांढरा झाला होता. आतां श्वास घेणं सोपं झालं होतं. लिण्डन वृक्षांच्या खालचे आवाज पण संध्याकाळसारखेच मृदु, कोमल येत होते.
मला कळलंसुद्धां नाही, की त्याने एक सम्पूर्ण गोष्टंच गढलीयं?’ बिज़्दोम्नी आश्चर्याने विचार करू लागला – संध्याकाळपण झाली! असं पण असूं शकतं, की तो काही सांगतंच नव्हता आणि माझाच डोळा लागला, आणि ते सगळं मी स्वप्नांत पाहिलंय?’
पण हे तर मान्य करावंच लागेल की प्रोफेसरनेच हे सगळं सांगितलं होतं, नाहीतर असं तरी समजायंच की बेर्लिओज़लापण अगदी तेंच स्वप्न पडलंय, कारण की तो परदेशी पाहुण्याकडे एकटक बघंत म्हणंत होता, “जरी बाइबलच्या गोष्टींशी साम्य नसलं, तरी तुमची गोष्ट खूप रोचक होती, प्रोफेसर.”
क्षमा करा,” प्रोफेसरने सौजन्यतेने हसून म्हटलं, “तुम्हांलातर माहीतंच आहे, की बाइबलमधे जे काही लिहिलेलं आहे, तसं वास्तवांत कधी घडलंच नाहीये. आणि आपण जर बाइबलला ऐतिहासिक प्रमाण म्हणून स्वीकार केलं...” तो पुन्हां हसला. बेर्लिओज़ कावराबावरा झाला, कारण की जेव्हां ते ब्रोन्नाया स्ट्रीट पासून पत्रियार्शीकडे येत होते, तेव्हां अगदी हेंच त्याने बिज़्दोम्नीला सांगितले होते.           
बेर्लिओज़ने म्हटलं, “मुद्दा असा आहे की...माफ़ करा, ही गोष्टसुद्धां कोणीच प्रमाणित करूं शकणार नाही, की जे काही तुम्हीं आता सांगितलंय, ते पण खरंच घडलं असेल.”               
“ओह, नाही! ह्या गोष्टीला कोणीपण सत्य सिद्ध करूं शकेल!” प्रोफेसर ने तुटक-तुटक भाषेंत दृढ स्वरांत म्हटलं आणि अचानक दोन्हीं मित्रांना रहस्यपूर्ण ढंगाने आपल्याजवळ सरकायला सांगितलं. ते दोघं त्याच्याकडे वाकले. तो, आपल्या आवाजांत घडी घडी येणारा नाटकीपणा न दाखवतां, सरळ, सपाट स्वरांत म्हणाला, “गोष्ट अशी आहे, की...” प्रोफेसरने किंचित घाबरून इकडे तिकडे बघितलं आणि फुसफुसंत म्हणाला, “मी स्वतः त्यावेळेस तिथे उपस्थित होतो. पोंती पिलातबरोबर दालनांत होतो, उद्यानांतसुद्धां होतो, जेव्हां तो काइफाशी गोष्टी करंत होता, दगड्याच्या चौथ-यावरदेखील होतो, पण लपून, गुप्त वेषांत. म्हणून मी तुम्हांला विनंती करतो की ही गोष्ट स्वतःपुरतीच राहूं द्या, एकदम गुप्त, एकसुद्धां शब्द बाहेर नको यायला. श्-श्-श्!
शांतता पसरलीआणि भीतीने बेर्लिओज़चा चेहरा फिक्का पडला.
“तुम्हीं...तुम्हीं किती दिवसांपासून मॉस्कोत आहांत?” थरथरत्या आवाजांत त्याने विचारलं.
“मी तर आत्ताच, ह्याच क्षणी मॉस्कोला आलोय,” प्रोफेसरने गोंधळून उत्तर दिलं आणि तेव्हांच मित्रांनी त्याच्या डोळ्यांत बघितलं आणि त्यांची खात्री झाली की त्याचा डाव्या, हिरव्या डोळ्यांत वेडेपणाचे लक्षणं होते, आणि उजवा डोळा होता – भाव रहित, काळा आणि निर्जीव.
सगळं स्पष्ट आहे,’ बेर्लिओज त्रस्त झाला, ‘ हा एक पागल जर्मन आलेला आहे, किंवा पत्रियार्शीवर येऊन पागल झालांय. हीच आहे त्याची गोष्ट!
हो, खरोखरंच सगळंच स्पष्ट झालं होतं : स्वर्गवासी दार्शनिक काण्टसोबत केलेला विचित्र ब्रेकफास्ट, आणि सनफ्लॉवर-ऑइल आणि अन्नूश्काशी संबंधित वेडसर गोष्टी, आणि ती भविष्तवाणी की त्याचं डोकं कापलं जाणारेय, आणि अशाच अन्य गप्पा. प्रोफेसर नक्कीच मूर्ख होता.
बेर्लिओज़ने तेव्हांच मनामधे आराखडा बांधला की त्याला पुढे काय करायचंय. बेंचच्या पाठीला टेकतां टेकतां त्याने प्रोफेसरच्या मागून बिज़्दोम्नीकडे बघून डोळा मारला, की त्याच्या विरोध करूं नको, पण घाबरलेल्या कविला ह्या खाणाखुणा कळल्याचं नाही.
“हो, हो, हो...” बेर्लिओज़ने उत्तेजनेने म्हटलं, “हे सगळं संभव आहे. अगदी संभव आहे. पोंती पिलात, ते दालन, आणि ते सगळं...आणि तुम्हीं काय एकटेच आला आहांत की बायकोसुद्धां बरोबर आहे?”
“एकटा, एकटा, मी नेहमी एकटांच असतो...” किंचित कटुतेने प्रोफेसरने उत्तर दिलं.
“आणि, प्रोफेसर, तुमचं सामान कुठेय?” बेर्लिओज़ने लाडीगोडीने विचारलं, “हॉटेल मेट्रोपोलमधे?” तुम्हीं उतरलांत कुठे?”
“मी? कुठेच नाही...” त्या अर्धविक्षिप्त जर्मनने विषादपूर्वक आणि विचित्रपणे आपल्या हिरव्या डोळ्याने पत्रियार्शी तलावाकडे बघंत उत्तर दिलं.
“काय? आणि...तुम्हीं राहणार कुठे?”
“तुमच्या क्वार्टरमधे...” अचानक तो पागल म्हणाला आणि त्याने डोळा मारला.
“मी...मला आनंदंच होईल,” बेर्लिओज़ पुटपुटला, “पण, असं आहे, की माझ्याकडे तुमची गैरसोय होईल...आणि मेट्रोपोलमधे खूप शानदार खोल्या आहेत, ते पहिल्या श्रेणीचं हॉटेल आहे...”
“आणि, काय, सैतानसुद्धां नाहीये?” मानसिक रुग्णाने एकदम खुशीत येऊन बिज़्दोम्नीला विचारलं.
“सैतान सुद्धां...”
“त्याचा विरोध करूं नकोस...” प्रोफेसरच्या मागून तोंड वाकडं करंत बेर्लिओज़ फक्त ओठांनी पुटपुटला.
“काही सैतान-बैतान नाहीये!” ह्या सगळ्या नाटकाने चिडून इवान निकोलायेविचने ते सांगून टाकलं, जे त्याला सांगायला नको होतं, “काय कटकट आहे! तुम्हीं हा सगळा वेडेपणा बंद करा!”
ह्यावर पागल इतका प्रचण्ड हसला की त्याच्या डोक्यावरून लिण्डन वृक्षावर बसलेली चिमणी फडफडंत उडून गेली.
“आता, ही तर खूपंच मजेदार गोष्ट आहे!” हसतां-हसतां प्रोफेसरचं सगळं शरीर हलूं लागलं. “ही काय सवय आहे, काहींही विचारलं तरी नाहींच म्हणतोस!” त्याने एकदम हसणं थांबवलं, कदाचित छातीत दुखूं लागलं होतं, आणि, जसं मानसिक रोगांत साहजिकंच असतं, हसणं संपल्यावर लगेच दुस-या मनःस्थितींत पोहोचला – चिडला आणि गंभीरपणे ओरडला, “तर, तुमच्या मते, असं काही नसतंच?”
“शांति, शांति, शांति, प्रोफेसर,” बेर्लिओज़ने त्याला समजावलं. ह्या रोग्याला उत्तेजित अवस्थेत पाहून तो घाबरला, “तुम्हीं इथे एक मिनिट माझ्या मित्राबरोबर बसा, आणि मी कोप-यावर जाऊन एक फोन करून येतो, मग तुम्हांला जिथे जायचं असेल, तिथे आम्हीं सोडून येऊं. तुम्हीं तर इथे नवीन आहांत नं...”
तसं बघितलं तर बेर्लिओज़चा प्लान अगदी बरोबर होता : जवळच्या टेलिफोन बूथमधे जाऊन परदेशी पर्यटकांशी संबंधित कार्यालयांत हे सूचित करायचं होतं, की हा, परदेशांतून आलेला कन्सल्टेन्ट पत्रियार्शी पार्कमधे बसलाय आणि त्याची मानसिक स्थिति बरोबर नाहीये. म्हणून त्वरित काही उपाय योजना करावी, नाहीतर येथे काही अप्रिय घटना घडूं शकते.
“फोन करायचांय? करा,” मानसिक रुग्णाने उदासीने म्हटलं आणि अचानक भावपूर्ण स्वरांत विनती केली, “पण जाता-जाता तुम्हांला निवेदन करीन, की सैतानाच्या अस्तित्वावर विश्वास ठेवा! मी तुमच्याकडून कोणची मोठी वस्तु मागत नाहीये. लक्षांत ठेवा की सैतानाच्या अस्तित्वाबद्दल सातवं प्रमाण आहे, हे फार खात्रीदायक प्रमाण आहे! तुम्हांला लगेच त्याच्याबद्दल कळेल.”
“बरं, बरं...” खोटं खोटं प्रेम दाखवंत बेर्लिओज़ने म्हटलं आणि चिडलेल्या कवीकडे बघून त्याने डोळा मारला, ज्याच्या डोक्यांत ह्या पागल जर्मनवर लक्ष ठेवण्याचा विचार आलांच नव्हता. मग तो ब्रोन्नाया रस्ता आणि एर्मालायेव गल्लींच्या चौकाकडे असलेल्या निर्गम द्वाराकडे गेला. तो गेल्या बरोबर प्रोफेसर जणुं अगदी बरा झाला आणि त्याच्या चेह-यावर चमंक आली.
“मिखाइल अलेक्सांद्रोविच!” त्याने जात असलेल्या बेर्लिओज़ला ओरडून विचारलं.
तो थरथरला, मग त्याने मागे वळून पाहिलं आणि स्वतःला सांत्वना दिली की त्याचं नावसुद्धां प्रोफेसरने कुठल्यातरी समाचार पत्रांत वाचलं असेल. आणि प्रोफेसर दोन्ही हातांचा चम्बू करून ओरडंत होता, “तुमच्या काकांना कीएवला तार करून देऊं का?”
बेर्लिओज़च्या हृदयांत पुन्हां धक्क्ं झालं. ह्या वेड्याला कीएवच्या काकांबद्दल कसं माहीतीये? ह्याबद्दल तर कधीच, कोणच्याही वर्तमान पत्रांत लिहिलेलं नाहीये. ए हे...हे? बिज़दोम्नी खरंच तर नव्हता म्हणंत? पण त्याच्या जवळचे डॉक्यूमेन्ट्स? ओफ, किती रहस्यमय माणूस आहे. फोन करायलांच हवा! त्याची चांगली काढतील!”
आणि पुढे काहीही न ऐकतां बेर्लिओज़ पुढे धावला.
ब्रोन्नायाकडच्या बाहेर जाणा-या दरवाज्या जवळ बेंचवरून उठून सम्पादकाजवळ तोंच माणूस आला, जो तेव्हां सूर्याच्या प्रकाशांत दाट उष्णतेतून बनताना दिसला होता. फरक फक्त इतकांच होता, की आता तो हवेतून बनलेला नव्हे, तर साधारण माणसांसारखा ठोस दिसंत होता. दाटंत असलेल्या अंधारांत बेर्लिओज़ने स्पष्ट बघितलं, की त्याच्या मिश्या कोंबडीच्या पंखांसारख्या होत्या, डोळे छोटे-छोटे, उपहासाने भरलेले, थोडेसे दारुडे, आणि चौकटीची विजार इतकी वर केलेली होती की आतूंन घाणेरडे मोजे दिसंत होते.
मिखाइल अलेक्सांद्रोविच तिथेंच थबकला, पण त्याने असा विचार करून स्वतःची समजूत घातली, की फक्त एक विचित्र योगायोग आहे आणि ह्याबद्दल विचार करणं मूर्खपणा आहे.
“चक्रद्वार शोधतांय कां साहेब?” चिरक्या आवाजांत त्या लम्बूने विचारलं, “इकडे या! सरळ, आणि वाटेल तिथे निघून जा. सांगण्यासाठी तुमच्याकडून पाव लिटर साठी...हिशेब बरोब्बर...भूतपूर्व कॉयर मास्टरसाठी!” शरीराला वाकवंत ह्या प्राण्यानी अभिवादनाप्रीत्यर्थ आपली जॉकी-कैप काढून हातांत धरली.
बेर्लिओज़ कॉयर मास्टरची ही ढोंगी याचना ऐकण्यासाठी नाही थांबला, तो चक्रद्वाराकडे पळाला आणि हाताने त्याला धरलं. चक्रद्वार घुमवून तो रेल्वेचे रूळ पार करणारंच होता, की त्याच्या चेह-यावर लाल आणि पांढ-या रंगाचा प्रकाशझोत पडला: काचेच्या ट्रैफिक बोर्डवर लिहिलेले अक्षरं चमकूं लागले, “सावधान, ट्राम येत आहे!” आणि ही ट्राम त्याक्षणींच येऊन पोहोचली, एर्मलायेव गल्लीपासून नवीन टाकलेल्या रुळांवरून वळून, ब्रोन्नाया स्ट्रीटवर येतांच तिचा आंतील भाग प्रकाशाने भरून गेला, ब्रेकचा चीत्कार करंत ती थांबली.
खरं तर बेर्लिओज़ सुरक्षित जागेवरंच उभा होता, तरी पण सावध असावे, म्हणून वळून मागे जायला लागला. त्याने आपला हात चक्री दरवाज्यावर ठेवला आणि एक पाय मागे सरकवला. त्याच क्षणी त्याचा हात घसरला आणि सुटून गेला, पाय घसरला, जणु कडक बर्फावर घसरतोय. पाय घसरून  त्या छोट्याश्या दगडी रस्त्यावर पडला जो रुळापर्यंत जात होता, दुसरा पाय आपल्या जागेवरून फेकला गेला आणि बेर्लिओज़ रुळांवर पडला.
एखाद्या आधाराला पकडायच्या प्रयत्नांत बेर्लिओज़ पाठीवर पडला. त्याचं डोकं हळूच दगडी रस्त्यावर आपटलं आणि त्याची नजर आकाशाकडे गेली, पण उजवीकडे की डावीकडे, त्याला कळलं नाहीं, त्याला सोनेरी चंद्र दिसला. तो पट्कन एका कुशीवर वळला, फट्कन पायांना पोटाकडे घेतलं आणि वळतांक्षणीच स्वतःच्या अंगावर विलक्षण शक्तिने येत असलेला, भीतिने पांढरा फटक पडलेल्या एका महिलेचा चेहरा आणि तिची लाल टोपी त्याला दिसली. हा ट्राम चालिकेचा चेहरा होता. बेर्लिओज़ ओरडू नाही शकला, पण त्याच्या चारीकडे जमा झालेल्या महिलांच्या घाबरलेल्या किंचाळ्यांनी ती सम्पूर्ण स्ट्रीट हादरली. ट्रामचालिकेने पट्कन विजेचा ब्रेक लावला, त्यामुळे ट्राम गाडी जणु नाकावर जमीनीत घुसून गेली.
दुस-यांच क्षणी तिच्या खिडक्यांच्या काचा खणखणंत बाहेर पडू लागल्या. बेर्लिओज़च्या डोक्यांत एक विकट विचार चमकला – काय खरंच?’ तुकड्यांमधे विभक्त झालेला चंद्र आणखी एकदा, शेवटचांच झळकला आणि मग अंधार पसरला.     
ट्रामगाडीने बेर्लिओज़ला सम्पूर्णपणे झाकून घेतलं होतं. आणि पत्रियार्शीच्या आळीच्या जाळीखालून दगडी रस्त्यावर एक गोल-गोल, काळीशी वस्तू गडगडंत गेली, ती ब्रोन्नाया स्ट्रीटच्या फुटपाथवर उड्या मारंत गडगडू लागली.
हे बेर्लिओज़चं छाटलेलं डोकं होतं.


*******

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें