रविवार, 29 अक्टूबर 2017

मास्टर आणि मार्गारीटा - 23



तेवीस



सैतानाचा शानदार नृत्योत्सव



अर्धरात्र होत आली होती, म्हणून घाई करणं भाग होतं. मार्गारीटाला अंधुकपणे काही तरी दिसलं. तिला मेणबत्त्यांच्या प्रकाशाची आणि हीरे-जवाहरातांच्या टबची अंधुक आठवण राहिली. जेव्हां मार्गारीटा टबमधे उतरली, तेव्हां हैला आणि तिच्या मदतीस असलेल्या नताशाने एका गरम, दाट आणि लाल द्रवाने तिला अंघोळ घातली. मार्गारीटाने ओठांवर खारटपणा अनुभवला आणि तिला कळलं की तिला रक्ताने अंघोळ घालताहेत. ह्या रक्तिम स्नानानंतर जे द्रव तिच्यावर ओतण्यांत आलं, ते होतं – दाट, पारदर्शी, गुलाबी. ह्या गुलाबाच्या तेलाने मार्गारीटाचं डोकं गरगरू लागलं. मग तिला एका क्रिस्टलच्या कोचावर झोपवून तिचं शरीर कोणच्यातरी मोठ्या-मोठ्या, हिरव्या-हिरव्या पानांनी तोपर्यंत घासलं गेलं, जोपर्यंत ते चमकायला नाही लागलं. आता बोका पण आत शिरला आणि मदत करूं लागला. तो मार्गारीटाच्या पायांजवळ बसला आणि तिचे पंजे अश्याप्रकारे चोळू लागला,, जणू रस्त्यावर बसून जोडे स्वच्छ करतोय. मार्गारीटाला लक्षांत नाहीये, की तिच्या पायांत गुलाबाच्या पाकळ्यांचे जोडे कुणी घातले आणि ह्या जोड्यांवर आपणहूनंच सोनेरी लेस कशी लागली. एका शक्तीने मार्गारीटाला खेचंत आणूक आरश्यासमोर उभं केलं. तिच्या केसांत ही-यांचा शाहीमुकुट चमकला. माहीत नाही कुठून करोव्येव पण आला आणि त्याने मार्गारीटाच्या गळ्यांत एक अण्डाकार फ्रेममधे जडलेली, वजनदार चेनला लटकलेली, काळ्या, कुरळ्या केसाच्या कुत्र्याची आकृति घातली. ह्या आभूषणाने महाराणीवर बरंच ओझं टाकलं. चेन तिच्या गळ्याला बोचू लागली आणि कुत्र्याच्या आकृतिमुळे तिला पुढे वाकावं लागलं. पण ह्या चेनमुळे जो त्रास तिला होत होता, त्याचा पुरस्कार पण मार्गारीटाला लगेच प्राप्त झाला. हा पुरस्कार म्हणजे – तो सम्मान होता, जो आता करोव्येव आणि बेगेमोत तिला देत होते.
“काही नाही, काही नाही, काही नाही!” करोव्येव स्नानगृहाच्या दाराजवळ पुटपुटला, “काही उपाय नाहीये, हे ज़रूरी आहे, खूपंच ज़रूरी आहे. महाराणी, तुम्हांला एक शेवटचा सल्ला द्यायची परवानगी द्या. पाहुण्यांमधे वेगवेगळे प्रकार असतील, ओह, खूपंच वेगवेगळे, पण कोणाहीबद्दल, महाराणी मार्गो, पूर्वाग्रह नका ठेवूं! जर तुम्हांला कोणी आवडला नाही...तरीही, मला कळतंय, की तुम्ही चेह-यावर तसं दाखवणार नाही...नाही, नाही, ह्याबद्दल विचार सुद्धां करायला नको! त्याच्या लगेच, त्याच क्षणी, लक्षांत येईल. त्याच्यावर ममता दाखवावी लागेल, ममता दाखवावी लागेल, महाराणी. नृत्योत्सवाच्या होस्टेसला ह्याच्यासाठी शंभर पटीने पुरस्कृत करण्यांत येईल! आणि हो – कुणालाही सोडू नका. कमीत कमी एक स्मित, जर बोलायला वेळ नसेल तर, कमीत कमी हळूच डोक्याने खूण, जे काही शक्य असेल, पण कुणाचीही उपेक्षा करूं नका, नाहीतर ते म्लान होतील...”
आता मार्गारीटा करोव्येव आणि बेगेमोतबरोबर स्नानगृहातून सम्पूर्ण अंधारांत आली.
“मी, मी,” बोका कुजबुजला, “मी खूण करेन!”
“कर!” करोव्येवने अंधारांतून उत्तर दिलं.
“नृत्योत्सव!” बोक्याची कर्कश किंचाळी ऐकूं आली, आणि मार्गारीटाने लगेच किंचाळून काही क्षणांसाठी आपले डोळे बंद करून घेतले. नृत्योत्सव जणू प्रकाश पुंज घेऊन तिच्यावर आदळला, आणि बरोबर घेऊन आला हल्ला आणि सुगन्ध. करोव्येवचा हात धरून चालणा-या मार्गारीटाने स्वतःला एका उष्णकटिबन्धीय जंगलांत बघितलं. लाल मानेचे, हिरव्या शेपट्या असलेले पोपट वृक्षवल्लींना चिटकंत होते, त्यांच्यावर उड्या मारंत होते आणि ओरडून-ओरडून म्हणंत होते : “मी प्रसन्न आहे!” पण जंगल लवकरंच संपलं त्याच्या ओलसर, कोंदटपणाच्या जागेवर आला नृत्योत्सवाचा शीतल हॉल, ज्यांत पिवळ्या, चमचमणा-या स्तंभांच्या रांगा होत्या. हा हॉलसुद्धां जंगलासारखाच रिकामा होता, फक्त स्तंभांच्या जवळ डोक्यावर चांदीच्या पट्ट्या बांधलेले, निर्वस्त्र नीग्रो पुतळ्यांसारखे उभे होते. मार्गारीटाच्या आपल्या ताफ्यासह, ज्यांत न जाणे कुठून अजाजेलो पण मिसळला होता, प्रवेश करतांच उत्तेजनेने त्यांचे चेहरे मातकट भुरे झाले. आता करोव्येवने मार्गारीटाचा हात सोडला आणि पुटपुटला : “सरळ ट्यूलिप्सकडे!”
पांढ-या ट्यूलिप्सची एक लहान भिंत मार्गारीटाच्या समोर प्रकट झाली, तिच्या मागे छोट्या-छोट्या शेड्समधे अनेक दिवे आणि त्यांच्या मागे फ्रॉक-कोट्स घातलेल्या पाहुण्यांची पांढरी छाती आणि काळे खांदे. तेव्हां मार्गारीटा समजली की नृत्योत्सवांत आवाज कुठून येत होते. तिच्यावर वर्षाव झाला तुतारीच्या स्वराचा, आणि त्याहून वेगळा प्रकट झालेला वॉयलिनचा स्वर तिच्या शरीरावर असा तरंग़ू लागला, जणु रक्तवाहिन्यांमधे वाहणारं रक्त. जवळ-जवळ दीडशे लोकांचा ऑर्केस्ट्रा पोलोनोइसवाजवंत होता.
फ्रॉककोट घालून ऑर्केस्ट्राच्या समोर उभा असलेला माणूस मार्गारीटाला बघतांच निस्तेज झाला, त्याने स्मित केलं आणि हाताच्या एका झटक्याने सम्पूर्ण ऑर्केस्ट्राला उभं केलं. क्षणभरासाठीही संगीत न थांबवतां ऑर्केस्ट्राने उभ्या-उभ्या स्वरलहरींनी मार्गारीटाचं अभिवादन केलं. तो माणूस वळला आणि त्याने खाली वाकून, हात पसरून अभिवादन केलं, आणि मार्गारीटानेपण स्मित हास्य करंत त्याच्याकडे बघंत हात हलवला.
“नाही, येवढं पुरेसं नाहीये, पुरेसं नाहीये,” करोव्येव कुजबुजला, “तो रात्रभर झोपणारा नाहीये. ओरडून त्याला म्हणा : “स्वागत आहे, वाल्ट्ज़ सम्राट!”1
मार्गारीटाने ओरडून तसंच म्हटलं आणि तिला आश्चर्य वाटलं की घंट्यांची किणकिण असलेला तिचा आवाज, सम्पूर्ण ऑर्केस्ट्रावर तरंगला. तो माणूस आनंदाने थरथरला आणि त्याने डावा हात छातीवर ठेवला, उजव्या हाताने पांढरी छडी ऑर्केस्ट्रासमोर फिरवंत राहिला.
“हे पण कमीच आहे, पुरेसं नाहीये,” करोव्येव पुन्हां कुजबुजला, “डावीकडे बघा, पहिल्या ओळींतल्या वॉयलिन वादकांकडे, आणि अश्याप्रकारे डोकं हलवा, की प्रत्येक वादकाला असं वाटेल, की तुम्हीं त्याला ओळखलंय. इथे फक्त जगांतील ख्यातनाम व्यक्तीच आहेत. आधी ह्याला, जो पहिल्या बोर्डवर आहे – तो व्यूताम2 आहे. हो, … खूप छान!...आता पुढे!”
“हा संचालक कोण आहे?” मार्गारीटाने उडताना विचारलं.
“योहान स्ट्रॉस,” बोका ओरडला, “आणि जर ह्या आधी, दुस-या कोणत्याही नृत्योत्सवांत असा ऑर्केस्ट्रा वाजला असेल, तर मला कटिबन्धीय जंगलांत झाडाला उल्टा टांगून द्या! मीच त्याला आमंत्रित केलं होतं! आणि लक्ष द्या, एकसुद्धां आजारी नाही पडला, एकानेही नाही म्हटलं नाही.”
पुढच्या हॉलमधे स्तंभांच्या रांगा नव्हत्या. त्याऐवजी एकीकडे लाल, गुलाबी, दुधासारख्या शुभ्र गुलाबांच्या भिंती, आणि दुसरीकडे - जापानी टेरी-कॅमेलायसची भिंत. ह्या भिंतींच्या मधल्या जागेंत फवा-यांमधून फसफस करंत तीन तलावांमधे शैम्पेनचे बुडबुडे उडंत होते; ज्यांत एक होती – पारदर्शी जांभळी, दुसरी – माणिक (लाल), आणि तिसरी – बिलौरी. त्यांच्या जवळून डोक्यावर लाल पट्टी बांधलेले नीग्रो जात-येत होते, जे चांदीच्या मग्सने ह्या तलावांमधून शैम्पेन काढून-काढून चपट्या प्याल्यांमधे भरंत होते. गुलाबाच्या भिंतीत एक मोकळी जागा होती, जिथून लाल, स्वॅलोटेल कोट घातलेला एक माणूस दिसंत होता. त्याच्या समोर अविरत हल्ला होत होता – जॉज़ संगीताचा. ह्या संचालकाने जसंच मार्गारीटाला बघितलं, तो तिच्यासमोर इतका वाकला, की त्याचे हात जमिनीला स्पर्श करूं लागले. मग तो सरळ उभा राहिला आणि कर्कश आवाजांत ओरडला, “अल्लीलुइया!”
त्याने आपल्या गुडघ्यावर हात मारला – एक, मग हाताने क्रॉस करंत दुस-यावर – दोन! सगळ्यांत शेवटच्या संगीतज्ञाची प्लेट घेतली आणि एका स्तंभावर मारली.
तिथून हवेंत तरंगत मार्गारीटाने बघितलं की हा उत्साही जॉज़ निर्देशक, पोलोनोईसच्या आवाजाशी संघर्ष करंत, जो मार्गारीटाच्या पाठीकडून येत होता, संगीतज्ञांच्या डोक्यावर आपली झांज मारतोय आणि ते हास्यास्पद भीतीने खाली बसताहेत.                             
शेवटी ते त्या चौकापर्यंत आले, जिथे मार्गारीटाच्या अंदाजाप्रमाने ती अंधारांत लैम्प घेऊन येणा-या करोव्येवला भेटली होती. आता ह्या चौकांत प्रकाशामुळे डोळे दिपंत होते, जो द्राक्षाच्या आकाराच्या झुंबरांमधून येत होता.
मार्गारीटाला तिथेंच थांबवण्यांत आलं आणि तिच्या डाव्या हाताच्या खाली एक लहानसा नीलमणीचा स्तंभ प्रकट झाला.
“जर फारंच त्रास व्हायला लागला, तर ह्याच्यावर हात ठेवूं शकता,” करोव्येव कुजबुजला.
कोण्या काळ्या माणसाने मार्गारीटाच्या पायांजवळ एक उशी सरकवली, जिच्यावर सोन्याच्या तारांनी एका झब-या कुत्र्याचं चित्र काढलं होतं. तिच्यावर तिने कुण्याच्यातरी हातांच्या साहाय्याने गुडघा वाकवून आपला उजवा पाय ठेवला.
मार्गारीटाने इकडे-तिकडे बघायचा प्रयत्न केला. तिच्या जवळ करोव्येव आणि अजाजेलो उत्सवाच्या मुद्रेत उभे होते, ज्यांना बघून मार्गारीटाला अबादोनाची अंधुकशी आठवण आली. पाठीत गार लहर धावली, तर मार्गारीटाने वळून बघितलं, तिच्यामागे संगमरमरी भिंतीवरून दारूचा झरा वाहंत येऊन बर्फाच्या तलावांत पडतोय. डाव्या पायाजवळ तिला किंचित ऊब जाणवली, हा बेगेमोत होता.
मार्गारीटा उंचीवर होती, तिच्या पायांच्या खालून एक भव्य शिडी खाली जात होती. शिडी गालिच्याने झाकलेली होती. खाली, खूप दूर, जणू मार्गारीटा दुर्बिणीच्या उलट्या टोकातून बघंत होती, एक खूप मोठा हॉल होता. हॉलमधे एक भव्य फायरप्लेस (शेकोटी) होती, जिच्या गार, अंधा-या जबड्यांत आरामांत पाच टनांचा ट्रक सामावूं शकला असता. डोळ्यांत खुपणा-या प्रकाशाने आलोकित हा हॉल आणि शिडी रिकामे होते. आता ब-याच दुरून तुतारीचा आवाज मार्गारीटापर्यंत पोहोचंत होता. अश्या प्रकारे स्तब्ध, ते सगळे, एक मिनिट उभे राहिले.
“पाहुणे कुठे आहेत?” मार्गारीटाने करोव्येवला विचारलं.
“येतील, महाराणी, येतील, इतक्यांतच येतील. त्यांची जरासुद्धा कमतरता नाही भासणार. आणि इथे त्यांचं स्वागत करण्यापेक्षां मला जंगलांत लाकडं कापण जास्त आवडलं असतं.”
“लाकड तोडण्याबद्दल काय बोलतोयंस,” बडबड्या बोक्या म्हणाला, “मी तर ट्रामगाडीमधे कण्डक्टरची नौकरीसुद्धा केली असती, पण ह्या कामापेक्षां जास्त वाईट जगांत दुसरं कोणतंही काम नाहीये!”
“सगळं काही आधीच तयार असलं पाहिजे, महाराणी,” करोव्येवने बिघडलेल्या दुर्बिणींत एका डोळ्याने बघंत समजावलं.
“ह्यापेक्षा वाईट आणखी काही नसतं, की पहिलाच पाहुणा विचार करूं लागेल, की त्याला काय करायला पाहिजे, आणी त्याची वैध पत्नी त्याला टोमणा मारेल, की ते सगळ्यांत आधी कां आले. असल्या नृत्योत्सवांना घाणेरड्या नालीतंच फेकून द्यायला पाहिजे, महाराणी!”
“अगदी नालीत,” बोक्याने दुजोरा दिला.
“अर्ध-रात्र व्हायला दहा सेकंदापेक्षांसुद्धा कमी वेळ आहे,” करोव्येवने म्हटलं, “बस, इतक्यातंच सुरू होईल.”
मार्गारीटाला हे दहा सेकंद खूप मोट्ठे वाटले. ते, कदाचित, संपूनपण गेले आणि काहीही झालं नाही. पण तेवढ्यातंच खाली भव्य फायरप्लेसमधून काहीतरी आवाज आला. त्यांतून एक वध-स्तम्भ उसळून बाहेर पडला, ज्याच्यावर एक अर्धवट सडलेलं कंकाल जोरजोराने झुलंत होतं. ते कंकाल दोरीतून सुटून खाली पडलं, जमिनीवर आदळलं आणी त्यांतून फ्रॉक-कोट घातलेला, काळ्या केसांचा, चमचमीत जोडे घातलेला सुरेख तरुण उडी मारून बाहेर निघाला. फायरप्लेसमधून एक अर्धवट सडकं ताबूत बाहेर आलं. त्याचं झाकण उघडलं आणि त्यातून आणखी एक कंकाल बाहेर निघालं. सुरेख तरुणाने शूरपणाने  त्याच्याकडे उडी मारली आणि आपला हात वाकवून पुढे केला. दुसरं कंकाल एका निर्वस्त्र चपळ महिलेत परिवर्तित झालं, तिने काळे जोडे घातले होते. तिच्या डोक्यावर काळे पंख खुपसलेले होते. मग ते दोघं, महिला आणि पुरुष, वर शिडीकडे धावले.
“सगळ्यांत आधी!” करोव्येव उद्गारला, “श्रीमान जैक3 आपल्या अर्धांगिनीबरोबर! महाराणी, तुमच्यासमोर येताहेत, जगांतील सर्वाधिक मजेदार व्यक्ती. एक वस्ताद बनावट नोटा छापणारे; सरकारशी विश्वासघात करणारे, पण एक कुशल किमयागार. ह्यांना प्रसिद्धी मिळाली ह्यासाठी,” करोव्येव मार्गारीटाच्या कानांत कुजबुजला, “की ह्यांनी महाराजांच्या प्रेमिकेला विष दिलं होतं. असं सगळ्यांबरोबर नाही होत! बघा, किती सुरेख आहेत!”
विवर्ण झालेल्या मार्गारीटाने, तोंड उघडून, खाली बघितलं आणि तिला दिसलं की तो वधस्तम्भ आणि ताबूत हॉलच्या बाजूच्या छोट्याश्या पैसेजमधे लुप्त झाले.
“मी अत्यंत प्रसन्न आहे!” बोका वर चढंत असलेल्या श्रीमान जैकच्या चेह-याच्या एकदम समोर तोंड करून गरजला.
तेवढ्यांत फायरप्लेसमधून डोकं नसलेलं छाटलेल्या हाताचं एक कंकाल निघालं, जमिनीवर आदळलं आणि फ्रॉककोट घातलेल्या पुरुषांत परिवर्तित झालं.
येवढ्यांत श्रीमान जैकची अर्धांगिनी मार्गारीटाच्या समोर आली होती आणि एक गुडघा टेकून मार्गारीटाच्या गुडघ्याचं चुम्बन घेत होती.
“महाराणी...” श्रीमान जैकची अर्धांगिनी कुजबुजली.
“महाराणी अत्यंत प्रसन्न आहेत!” करोव्येव ओरडला.
“महाराणी...” सुन्दर तरुण श्रीमान जैक हळुवारपणे म्हणाला.
“आम्ही सगळे भाव विभोर आहोंत,” बोका किंचाळला.
येवढ्यांत अजाजेलोचे ते तरुण सहकारी निर्जीव, पण स्वागतपूर्ण स्मित करंत श्रीमान जैक आणि त्याच्या अर्धांगिनीभोवती गराडा घालून त्यांना नीग्रोंने हातांत धरलेल्या शैम्पेनच्या प्याल्यांजवळ घेऊन गेले होते. शिडीवरून एकुलता एक फ्रॉककोटवाला धावंत येत होता.
“ग्राफ़ रॉबर्ट4,” करोव्येवने कुजबुजंत मार्गारीटाला सांगितलं, “पहिल्यासारखाच मजेदार आहे. लक्ष द्या, महाराणी, किती हास्यास्पद गोष्ट आहे, अगदीच उल्टी : हा सम्राज्ञीचा प्रियकर होता आणि ह्याने आपल्या बायकोला विष देऊन टाकलं.”      
“आम्ही अत्यंत प्रसन्न आहोत, ग्राफ,” बेगेमोत ओरडून म्हणाला.
फायरप्लेसमधून धडपडंत, तुटंत-फुटंत एकानंतर एक तीन ताबूत निघाले, त्यांच्यानंतर निघाला काळा कोट घातलेला एक माणूस, ज्याला काळ्या जबड्यातून त्याच्या मागेमागे येणा-याने पाठीवर सुरा मारला. खालून एक दबकी किंचाळी आली. फायरप्लेसमधून जवळ-जवळ पूर्णपणे क्षत-विक्षत प्रेत निघालं. मार्गारीटाने डोळे मिटून घेतले आणि लगेच एका हाताने तिच्या नाकाजवळ मिठाची लहानशी कुप्पी सरकावली. मार्गारीटाला वाटलं, की तो नताशाचा हात होता. शिडी हळू-हळू भरूं लागली होती. आता जवळ-जवळ प्रत्येक पायरीवर, दुरून एक सारखे दिसणारे, फ्रॉककोट घातलेले पुरुष आणि त्यांच्याबरोबर निर्वस्त्र महिला होत्या, ज्या फक्त आपल्या केसांत खोचलेल्या पंखांमुळे आणि जोड्यांच्या रंगांमुळेच वेगळ्या भासंत होत्या.
मार्गारीटाच्या जवळ आली, लंगडंत असलेली, डाव्या पायांत एक विचित्र लाकडी जोडा घातलेली, ‘ननसारख्या झुकलेल्या डोळ्यांची, कृश, नम्र आणि माहीत नाही कां गळ्यांत हिरवी पट्टी बांधलेली एक महिला.     
“कित्ती हिरवी आहे?” मार्गारीटाने यंत्रवत् विचारलं.
“सगळ्यांत मोहक आणि प्रतिष्ठित महिला,” करोव्येव कुजबुजला, “आपल्या समोर प्रस्तुत करतो : मैडम तोफ़ाना5, जी नैपल्सच्या मनमोहक तरुणींमधे आणि पालेर्मोच्या महिलांमधे अत्यंत लोकप्रिय होती, विशेषकरून त्या महिलांमधे, ज्या आपल्या नव-यांना कंटाळल्या होत्या. महाराणी, असं होऊं शकतं कां, की कोणाला आपल्या नव-याचा वीट येतो?”
“हो,” मार्गारीटाने खोल आवाजांत उत्तर दिलं, त्याबरोबरंच ती दोन फ्रॉककोटवाल्यांचं स्वागतसुद्धा करंत होती, जे एकामागून एक तिच्या हाताचं आणि गुडघ्याचं चुम्बन घेत होते.
“तर ही,” करोव्येव मार्गारीटाच्या कानांत कुजबुजला आणि त्याबरोबरंच ओरडला, “ ड्यूक, शैम्पेनचा एक ग्लास! मी भाव-विभोर आहे! तर, ही मैडम तोफ़ाना ह्या दुर्दैवी महिलांशी जवळीक साधून त्यांना लहान-लहान कुप्यांमधे कोणचंतरी द्रव विकायची. बायको हे द्रव नव-याच्या सूपमधे ओतायची. तो ते सूप खायचा. प्रेम दाखवण्याबद्दल बायकोचे आभार मानायचा आणि त्याला खूप ताजं आणि छान वाटायचं. ही गोष्ट वेगळीये की काही तासानंतर त्याला खूप तहान लागायची. मग तो बिछान्यावर पडायचा आणि एक दिवसानंतर ती नैपल्सची सुंदरी, जिने आपल्या नव-याला सूप पाजलं होतं, मुक्त व्हायची, जणु वसंत ऋतूची हवा.”        
“आणि तिच्या पायांत हे काय आहे?” मार्गारीटाने विचारलं. ती त्या पाहुण्यांसमोरसुद्धां हात पुढे करंत राहिली, जे मैडम तोफ़ानाला मागे सोडंत येत होते, “आणि तिच्या मानेवर ही हिरवंळ कशाला आहे? मान तुटलीये कां?”
“मी अत्यंत प्रसन्न आहे, सामन्त!” करोव्येव ओरडला आणि तेव्हांच त्याने मार्गारीटालापण उत्तर दिलं, “सुरेख मान आहे, पण जेलमधे तिच्याबरोबर काहीतरी गडबड झाली. तिच्या पायावर, महाराणी स्पैनिश बूट6 आहे, आणि ही पट्टी अश्यासाठी, की जेव्हां जेलवाल्यांना कळलं की जवळ-जवळ पाचशे नव-यांनी नैपल्स आणि पालेर्मो नेहमीसाठी सोडलंय, तेव्हां त्यांने चिडून मैडम तोफानाचा गळांच दाबला.”
“मी कित्ती भाग्यवान आहे, सावळी महाराणी, की मला हे सौभाग्य लाभलं.” तोफाना ने ननसारख्या स्टाइलमधे गुडघ्यावर वाकायचा प्रयत्न करंत म्हटलं. स्पैनिश बूट तिच्या ह्या कामांत अडथळा आणंत होता. करोव्येव आणि बेगेमोतने तिला उठायला मदत केली.
“मी अति प्रसन्न आहे,” मार्गारीटाने इतरांकडे हात पुढे करंत तिला म्हटलं.
आता तर शिडीवर खालून येणा-यांची रांगचं लागली. मार्गारीटा हात वर करंत होती आणि खाली करंत होती, आणि दात दाखवंत स्मित करंत पाहुण्यांच स्वागत करंत होती. जिन्यांमधल्या सपाट जागेवर हवेत सारखी भुणभुण भरून गेली होती; मार्गारीटा ज्या नृत्य हॉल्सला सोडून आली होती, तिथून समुद्राच्या लाटांसारख संगीत ऐकूं येत होतं.
आणि ही...कंटाळवाणी बाई,” आता करोव्येव कुजबुजायच्या ऐवजी मोठ्याने म्हणाला, कारण की त्याला माहीत होतं, की ह्या हल्ल्यांत त्याचा आवाज लोकांना ऐकू येणार नाही, “हिला नृत्योत्सवांच वेड आहे, पण नेहमी आपल्या रुमालाबद्दल फिर्याद करण्याचाच विचार करत असते.”
मार्गारीटाने नजरेने त्या बाईला शोधलं, जिच्याकडे करोव्येवने खूण केली होती. ही एक वीस वर्षाची अद्वितीय सुन्दरी होती. तिच्या डोळ्यांत खूपंच बेचैनी आणि लोचंटपणा दिसंत होता.
“कसला रुमाल?” मार्गारीटाने विचारलं.
“तिच्यासाठी एक सेविका नेमलीये,” करोव्येवने स्पष्ट केलं, “आणि ती मागच्या तीस वर्षांपासून हिच्या लहानश्या टेबलवर रात्री छोटासा रुमाल ठेवून देते. जशींच ही सकाळी उठते, हिला तो रुमाल दिसतो. हिने त्याला चुलींत टाकलं, नदींत फेकलं, पण त्याने काहीही झालं नाही.”
“कसला रुमाल?” हात वर करंत आणि खाली आणंत मार्गारीटान कुजबुजली.
“निळ्या किनारीचा रुमाल. गोष्ट अशी आहे, की जेव्हां ही रेस्टॉरेन्टमधे काम करायची, तेव्हां मालकाने हिला खाली तळघरांत बोलावलं, आणि नऊ महिन्यांनी हिने एका बाळाला जन्म देला. त्याला जंगलांत घेऊन गेली आणि त्याच्या तोंडांत रुमाल खुपसला. मग बाळाला जमिनींत पुरून टाकलं. न्यायालयांत तिने सांगितलं, की तिच्याजवळ बाळाचं पोट भरण्यासाठी काहीच नव्हतं.”
“आणि ह्या रेस्टॉरेन्टचा मालक कुठे आहे?” मार्गारीटाने विचारलं.
“महाराणी,” अचानक खालून बोका ओरडला, “मला तुम्हांला एक विचारायची परवानगी द्या : इथे मालकाचं काय काम आहे? त्याने तर जंगलांत बाळाचा गळा नाही दाबला.”
मार्गारीटाने स्मित हास्य करंत आणि उजवा हात हालवंत, डाव्या हाताचे तीक्ष्ण नखं बेगेमोतच्या कानांत घुसवले आणि कुजबुजंत म्हणाली, “तू, डुक्कर कुठला, पुन्हां जर का दुस-यांच्या बोलण्यांत टपकला, तर...”
 
बेगेमोतने नृत्योत्सवासाठी बेसु-या अश्या आवाजांत चीं-चीं केलं आणि चिडक्या आवाजांत म्हणाला:
“महाराणीकान सुजून जाईल...मी सुजलेल्या कानाने नृत्योत्सवाची मजा कां घालवूं?- मी तर न्यायसंगतंच बोललो होतो...न्यायाच्या दृष्टीने...गप्प बसेन, गप्प बसेन...समजा की मी बोका नसून मासा आहे, पण माझा कान तर सोडा.”
मार्गारीटाने कान सोडून दिला आणि तिच्यासमोर याचनेचा भाव असलेले उदास डोळे आले.
“मी भाग्यशाली आहे, होस्टेस महाराणी, की तुम्हीं मला पौर्णिमेच्या ह्या शानदार नृत्योत्सवांत आमंत्रित केलं.”
“आणि मलासुद्धां,” मार्गारीटाने उत्तर दिलं, “तुम्हांला भेटून आनंद झालांय. खूप आनंद झालांय. तुम्हांला शैम्पेन घ्यायला आवडेल कां?”
“तुम्हीं काय करतांय, महाराणी?!” करोव्येव आवाज न करता वेड्यासारखा, मार्गारीटाच्या कानांत कुजबुजला, “ट्रैफिक थांबून जाईल.”
“मला आवडेल,” त्या बाईने याचनेसारख्या स्वरांत म्हटलं, आणि एकदम यंत्रवत् म्हणू लागली : - फ्रीडा, फ्रीडा, फ्रीडा7! माझ नाव फ्रीडा आहे, महाराणी!”
“तर आज तू शुद्ध हरपेपर्यंत पी, फ्रीडा, आणि कोणत्याच गोष्टीची काळजी करू नको,” मार्गारीटाने म्हटलं.
फ्रीडाने आपले दोन्हीं हात मार्गारीटाच्या पुढे केले, पण करोव्येव आणि बेगेमोतने अगदी अलगदपणे तिचे हात आपल्या हातांत घेतले, आणि ती गर्दीत हरवली.
आता खालून जणु माणसांची भिंतंच वर येत होती, जणु ते त्या चौकावर हल्ला करण्यासाठी सरसावंत होते, जिथे मार्गारीटा उभी होती. बायकांचे नग्न शरीरं फ्रॉककोट घातलेल्या माणसांच्या मधून-मधून वर चढंत होते. मार्गारीटाकडे तरंगत येत होते सावळे, गोरे, कॉफीच्या रंगाचे आणि एकदम काळे शरीर. लाल, काळ्या, बदामी, सोनेरी, अळशीसारख्या केसांत चमकंत होते, तरंगत होते – अनेक बहुमूल्य खड्यांमधून निघणारे रंगीबिरंगी प्रकाश-किरण. त्यांच्या छातीवर हीरे-जवाहिरांत असे दमकंत होते, जणु कुणी माणसांच्या ह्या पुढे वाढंत असणा-या जमावावर प्रकाशाचे थेंब शिंपडलेयंत. आता मार्गारीटाला दर सेकंदाला आपल्या गुडघ्यावर कुणाच्यातरी ओठांचा स्पर्श जाणवंत होता, दर सेकंदाला ती आपला हात चुम्बनासाठी पुढे करंत होती. तिच्या चेह-याने जणु प्रसन्न-स्वागताचा मुखवटांच घातला होता.
“मी फार प्रसन्न आहे,” करोव्येव एका सुरांत गात होता, “आम्हीं प्रसन्न आहोत...महाराणी प्रसन्न आहेत...”
“महाराणी प्रसन्न आहेत,” अनुनासिक स्वरांत पाठीमागून अजाजेलो भुणभुणायचा.
“मी प्रसन्न आहे!” बोका ओरडायचा.
“मार्क्वेज़8,” करोव्येव बडबडला, “हिने आपल्या वडिलांना, दोन भावांना आणि दोन बहिणींना संपत्तिसाठी विष दिलं होतं...महाराणी प्रसन्न आहेत. मैडम मीन्किन9 आह, कित्ती छान आहे! थोडी नर्वस ज़रूर आहे. मोलकरणीच्या चेह-याला केस कुरळे करण्याच्या क्लिपने कां भाजायचं होतं! अश्या परिस्थितीत सुराच खुपसतांत! महाराणी प्रसन्न आहेत! महाराणी, एक सेकंद, लक्ष द्या : सम्राट रुदोल्फ़10, सम्मोहक आणि कीमियाकार. आणखी एक अलकीमी – सुळावर चढवलं होतं. ओह, हीच ती! ओह, हिचं कित्ती सुरेख वेश्यालय होतं स्त्रासबुर्गमधे! आम्ही प्रसन्न आहोत! मॉस्कोची ड्रेसमेकर11! तिच्या अलौकिक कल्पनाशक्तिसाठी आम्हांला ती खूप आवडते. ती एक हॉटेल चालवायची आणि तिने एक धोकादायक, हास्यास्पद काम केलं होतं : भिंतीत दोन भोकं केले होते...”
“बायकांना कळलं नाही?” मार्गारीटाने विचारलं.
प्रत्येकीला माहीत होतं, महाराणी,” करोव्येव म्हणाला, “मी प्रसन्न आहे! हा वीस वर्षाचा तरुण लहानपणापासूनंच आपल्या कल्पनाशक्तीसाठी प्रसिद्ध होता. हा विचारक आणि आश्चर्यजनक माणूस होता. एक मुलगी त्याच्यावर प्रेम करंत होती, पण ह्याने तिला वेश्यालयांत विकून टाकलं.”
खालून जणु एका नदीचा प्रवाहंच येत होता, जिचा शेवटंच दिसंत नव्हता. हिचं उद्गमस्थळ, ते अवाढव्य फायरप्लेस तिच्यांत निरंतर भरणाच टाकंत होतं. अश्या प्रकारे एक तास गेला आणि दुसरा चालू होता. आता मार्गारीटाला जाणवलं की तिची चेन पहिल्यापेक्षा जास्त जड झालीये. हातालापण काहीतरी विचित्रसं जाणवंत होतं. आता दर वेळेला हात उचलायच्या आधी तिच्या चेह-यावर वळ पडूं लागले. करोव्येवच्या मनोरंजक गोष्टी आता तिचं लक्ष वेधंत नव्हत्या. तिरप्या डोळ्यांचे मंगोल चेहरे, काळे चेहरे, गोरे चेहरे निरर्थक झाले; कधी-कधी ते एकमेकांत मिसळून जायचे आणि त्यांच्या मधली हवा थरथरंत वाहू लागायची. मार्गारीटाचा उजवा हात अचानक दुखूं लागला, त्यांत जणु कोणी सुई गडवंत होतं; आणि दात मिटून तिने आपल्या जवळ ठेवलेल्या स्तंभावर कोपर टेकवलं. एक विचित्र आवाज...जणु पक्ष्यांचे पंख फडफडताहेत, आता मागच्या हॉलमधून येत होता. पूर्णपणे कळलं की तिथे पाहुणे नृत्य करताहेत आणि मार्गारीटाला वाटलं, की ह्या विशाल हॉलच्या मजबूत संगमरमरी भिंती, मोजाइकची आणि क्रिस्टलची फरशीपण एका लयींत धडधड करताहेत.
मार्गारीटाला ना तर गेयस सीज़र कलिगुलांत12 काही उत्सुकता शिल्लक होती, आणि मेसालिनां13 सुद्धां तिचं लक्ष वेधंत नव्हती. आता ती कोणत्याही राजा, किंवा ड्यूक, किंवा सरदार, किंवा आत्मघाती, किंवा विष देणा-यांत रस घेत नव्हती. त्यांची सगळ्यांची नावं तिच्या डोकांत गड्ड-मड्ड झाली, चेहरे एकमेकांत मिसळले. तिच्या डोक्यांत फक्त एकंच दुःखी चेहरा शिल्लक उरला, अगदी ज्वाळांसारख्या दाढीने सजलेला माल्यूता स्कुरातोवचा14 चेहरा. मार्गारीटाचे पाय थरथरंत होते. प्रत्येक क्षणाला तिला भीति वाटंत होती की डोळ्यांतून अश्रू वाहूं लागतील. सगळ्यांत जास्त दुखंत होता तिचा उजवा गुडघा, ज्याचं अतिथी चुम्बन घेत होते. नताशाच्या हाताने किती तरी वेळा ह्या गुडघ्याला कोणत्यातरी सुगंधित द्रवाचा हळुवार लेप लावला होता तरीही तो सुजला होता, त्याची त्वचा निळी पडली होती. तिसरा तास संपता-संपता मार्गारीटाने अगदीच असहाय, कोमेजल्या नजरेने खाली बघितलं आणि आनंदाने थरथरली: पाहुण्यांची रांग पुष्कळंच लहान झाली होती.
“नृत्य-समारोहांचे नियम सगळीकडे एकसारखेच असतात, महाराणी,” करोव्येव कुजबुजला, “आता ही लाट खाली पडायला लागलीये. मला विश्वास आहे, की शेवटचे काही क्षणसुद्धां आपण सहन करूं. हे ब्रोकेनचे काही भटके लोक आहेत. ते नेहमी शेवटीच येतांत. हो, हे तेच आहेत. दोन दारुडे वेताळ...बस? ओह, नाही, एक आणखीन आहे; नाही, दोघं15 आहेत!”
दोन शेवटचे पाहुणे पाय-या चढंत होते.
“हो, हा तर कुणी नवा आहे.” करोव्येवने लेन्समधे बघंत म्हटलं, “ओह, हो, हो, एकदा अजाज़ेलो त्याला भेटला होता आणि कोन्याक पिता-पिता त्याने सल्ला दिला होता, की एका विशिष्ठ माणसाचा, ज्याच्या रहस्योद्घाटनाची त्याला भीती होती, काटा कसा काढला पाहिजे. त्याने आपल्या मित्राला, जो नेहमी त्याच्यावर अवलम्बून राहायचा, खोलीच्या भिंतींवर विषाचा शिडकाव करण्याचा हुकूम दिला...”      
“त्याचं नाव काय आहे?” मार्गारीटाने विचारलं.
“ओह, खरं म्हणजे अजून ते मलाही माहीत नाही,” करोव्येवने उत्तर दिलं, “अजाज़ेलोला विचारावं लागेल.”
“आणि त्याच्याबरोबर कोण आहे?”
“तोच, त्याचा आज्ञाकारी सेवक. मी प्रसन्न आहे!” करोव्येव शेवटच्या दोघांचं स्वागत करंत ओरडला.
शिडी रिकामी झाली. सावधगिरी बाळगंत त्यांनी आणखी दोन मिनिट वाट पाहिली, पण फायरप्लेसमधून आणखी कोणी बाहेर नाही आलं.
एका सेकंदानंतर मार्गारीटा माहीत नाही कशी, त्याच खोलींत पोहोचली जिथे स्नानगृह होतं आणि तिथे हातापाय प्रचण्ड दुखंत असल्यामुळे ती रडंत-रडंत फरशीवर लोळून गेली. पण हैला आणि नताशाने तिला धीर देत पुन्हां रक्ताने स्नान घातलं, पुन्हां तिच्या शरीराला चोळलं आणि मार्गारीटाच्या जीवांत जीव आला.     
“आणखीन एकदा, महाराणी मार्गो,” जवळंच प्रकट झालेला करोव्येव म्हणाला, “सगळ्या हॉल्समधे जावं लागेल, ज्याने सम्माननीय पाहुण्यांना दुर्लक्षित केल्यासारखं वाटू नये.”
आणि मार्गारीटा पुन्हां स्नानगृहातून उडाली. ट्यूलिप्सच्या भिंतीजवळच्या मंचावर, जिथे संगीत-सम्राटाचं वाल्ट्ज़ वाजंत होतं, आता वानर-जॉज़ सुरूं होतं. विशालकाय, केसाळ कल्ले असलेला गुरिल्ला, हातांत तुतारी घेऊन मोठ्या कष्टाने नृत्य करंत ऑर्केस्ट्राचं संचालन करंत होता. ओरांग उटांग एका ओळींत बसले होते आणि चकचकीत तुता-या वाजवंत होते. त्यांच्या खांद्यांवर हातांत हार्मोनियम घेऊन प्रसन्न चिम्पांजी बसले होते. दोन, सिंहासारखी दाढी असलेले वनमानुषासारखे माकड पियानो वाजवंत होते, पण लंगूरांच्या, विशालकाय मैण्ड्रिल्सच्या आणि लहानग्या मार्मोसेट्सच्या हातांत असलेल्या सेक्सोफोन, वायलिन आणि ड्रम्सच्या हल्ल्यांत त्यांचा आवाज ऐकूं येत नव्हता. काचेच्या फरशीवर असंख्य जोड्या आपल्या चपळ आणि सुरेख नृत्याने आश्चर्यचकित करंत होत्या. त्या एकाच दिशेंत वळायच्या, एखाद्या भिंतीसारख्या चालायच्या, जणु आपल्या रस्त्यांतून सगळं काही बाजूला करतील. नृत्य करणा-या जोडप्यांच्या डोक्यांवर सजीव मखमली फुलपाखरू उडंत होते, छतामधून फुलांचा पाऊस पडंत होता. जेव्हां वीज बंद व्हायची, तेव्हां स्तंभांच्या टोकांवर असंख्य काजवे चमकू लागायचे आणि हवेंत दलदली-दिवे तरंगू लागायचे.
मग मार्गारीटा एक विशाल तलाव असलेल्या हॉलमधे आली, ज्याच्या चारीकडे स्तंभांची रांग होती. विशालकाय काळा नेपच्यून आपल्या जबड्यातून गुलाबपाणी फेकंत होता. तलावातून मदमस्त करणारा शैम्पेनचा सुगंध येत होता. इथे एक वेगळीच प्रसन्नता दिसंत होती. बायका खिदळंत आपले जोडे फेकून द्यायच्या आणि पर्स आपल्या मित्राकडे किंवा नीग्रोच्या हातांत ठेवायच्या, जे टॉवेल्स घेऊन पळंत येत होते, आणि किंचाळी मारंत पक्ष्यासारख्या पाण्यांत उडी मारायच्या. फेसाळ लाटा वर यायच्या. ह्या मोट्ठ्या तलावाचा क्रिस्टलचा तळसुद्धा खाली असलेल्या प्रकाशाने आलोकित होत होता, आणि त्यांत पोहंत असलेले चांदी सारखे शरीरं दिसंत होते. तलावांतून बायका पूर्णपणे मदमस्त होऊन बाहेर पडायच्या. त्यांचं खिदळणं स्तंभांमधून घुमंत होतं, जसं सार्वजनिक स्नानगृहांत असतं.
ह्या सगळ्या गोंधळांत फक्त एक पूर्णपणे झिंगलेला चेहरा लक्षांत राहिला – भावहीन डोळ्यांचा, पण ह्या भावहीनतेतूनसुद्धां जणु विनंती करंत असलेला; आणि फक्त एकंच शब्द लक्षांत राहिला – फ्रीडा’! दारुच्या वासाने मार्गारीटाचं डोकं भणभणू लागलं. तिला तिथून निघून जावसं वाटलं, पण तेवढ्यांतच बोक्याच्या एका करामातीने तिला थांबवून ठेवलं. बेगेमोतने नेपच्यूनच्या जबड्याजवळ जाऊन काही तरी केलं, ज्याने फुसफुसकरंत हल्ला करंत असलेली, बेफ़ाम करणारी शैम्पेनची धार बंद झाली. नेपच्यून आता एका खेळकर, फेसाळ द्रवाच्या ऐवजी एक गडद पिवळी धार फेकू लागला.
बायका किंचाळल्या, ‘कोन्याक!आणि त्या उड्या मारून तलावापासून दूर जाऊन स्तंभांच्या मागे चालल्या गेल्या. काही क्षणांतच तलाव पूर्ण भरून गेला आणि बोका हवेंत तीन कोल्यांट्या मारून, शिगोशीग  भरलेल्या कोन्याकमधे पडला. तो बाहेर निघाला – फुरफुर करंत – टायची गाठ सुटलेली होती, मिशांचा सोनेरी रंग गायब झाला होता, त्याची दुर्बिणसुद्धां हरवली होती. बेगेमोतसारखंच करण्याचा प्रयत्न केला फक्त एकाने, त्याच ड्रेसमेकरने आणि तिच्या एक अनोळखी मुलेट्टो (संकरित रक्ताच्या – अनु.) तरुण मित्राने. हे दोघं कोन्याकच्या दिशेने धावले, पण तेवढ्यांत करोव्येवने मार्गारीटाचा हात धरला आणि ते आंघोळ करणा-यांना सोडून निघून गेले.
मार्गारीटाला वाटलं, जणु ती कुठेतरी उडंत चाललीये, जिथे विशाल दगडांच्या तलावांत शिंपल्यांचे पहाड होते. मग ती त्या काचेच्या फरशीवरून उडाली, जिच्याखाली जणु नरकातल्या ज्वाळांसारख्या भट्ट्या पेटल्या होत्या, ज्यांच्या मधून फिरंत होते सैतानासारखे पांढरे आचारी. मग आणखी कुठे, कुठे, हे समजण्याची शक्ति आता ती गमावून बसली होती; जिथे काळ्या, अंधा-या गोदामांमधे कसलेतरी दिवे जळंत होते, जिथे मुली धगधगत्या शेगड्यांवरून गरमागरम माँस प्लेट्स मधे ठेवून देत होत्या; जिथे तिच्या स्वास्थ्यासाठी मोठाले पेग्स प्यायलेजात होते. मग तिने बघितले पांढरे अस्वल, जे स्टेजवर हार्मोनियम वाजवंत कमारीन्स्की16 डान्स करंत होते. मग बघितलं जादुगार सलमान्द्राला17,जो आगीतसुद्धां जळूं शकंत नव्हता; आणि तिची शक्ती पुन्हां क्षीण होऊं लागली.
“बस, शेवटची फेरी,” करोव्येव दिलगिरीने कुजबुजला, “आणि मग आपली सुट्टी.”
करोव्येवसोबंत ती पुन्हां नृत्याच्या हॉलमधे आली, जिथे पाहुणे आता नृत्य नव्हते करंत, ते स्तम्भांच्या अधे-मधे उभे होते. हॉलचा मध्य भाग रिकामा सोडलेला होता. मार्गारीटाला आठवंत नाही, की तिला ह्या रिकाम्या भागांत प्रकट झालेल्या मंचावर चढण्यास कुणी मदत केली. जेव्हां ती वर चढली, तेव्हां दूर कुठे तरी अर्ध-रात्रीचे घण्टे वाजले, जी तिच्या मते केव्हांच संपायला हवी होती. शेवटच्या घंट्याला पाहुण्यांच्या गर्दीत शांतता पसरली. तेव्हां मार्गारीटाने पुन्हां वोलान्दला बघितलं. तो अबादोना, अजाज़ेलो आणि अबादोना सारख्या दिसणा-या काही काळ्या तरुणांबरोबर येत होता. आता मार्गारीटाने पाहिलं की तिच्यासाठी बनवलेल्या स्टेजच्या समोरंच आणखी एक स्टेज होता – वोलान्दसाठी. पण तो त्याच्यावर नाही चढला. मार्गारीटाला ह्या गोष्टीचसुद्धां आश्चर्य वाटलं, की वोलान्द नृत्योत्सवाच्या ह्या अंतिम महान चरणांत तसाच आला होता, जसा तो आपल्या शयनकक्षांत होता. त्याच्या खांद्यांवर तोच घाणेरडा, डाग पडलेला गाउन18 लोंबकळंत होता, पायांत तेच चुरगळलेले जोडे होते. वोलान्दच्या हातांत होती उघडी तलवार, पण ह्या तलवारीचा उपयोग तो चालतांना आधार देणा-या काठीसारखा करंत होता. लंगडंत येताना वोलान्द त्याच्यासाठी बनवलेल्या स्टेजच्या जवळ थांबला आणि लगेच अजाज़ेलो त्याच्यासमोर हातांत एक प्लेट घेऊन आला. ह्या प्लेटमधे एका माणसाचं कापलेलं डोकं होतं, ज्याचे समोरचे दात तुटले होते. हॉलमधे नीरव शांतता होती, जिला फक्त एकदा एका अजबश्या घण्टीच्या आवाजाने भंग केलं, जी प्रवेशद्वारावर लागलेली असते.
“मिखाइल अलेक्सान्द्रोविच,” वोलान्द हळूच त्या डोक्याकडे वळला, आणि तेव्हां मेलेल्या माणसाच्या पापण्या उघडल्या. थरथर कापंत मार्गारीटाने बघितले निर्जीव चेह-यावर जिवन्त, विचारांत गढलेले, पीडा झेलणारे डोळे. “सगळं अगदी तस्संच झालं, खरंय ना?” वोलान्द डोक्याच्या डोळ्यांमधे डोकावंत पुढे म्हणाला, “डोकं कापलं एका महिलेने, मीटिंग झालींच नाही, आणि मी तुमच्या फ्लैटमधे राहतोय. हे प्रमाण आहे आणि प्रमाण- जगातील सर्वांत हट्टी गोष्ट आहे. पण आपल्याला आतां पुढच्या गोष्टीबद्दल कुतूहल आहे, त्या दुर्घटनेंत नाही, जी घडून गेलेली आहे. तुम्हीं नेहमी जोरजोरांत ह्या सिद्धांताचं प्रतिपादन करंता आला आहांत, की डोकं कापल्यानंतर जीवन संपुष्टांत येतं, ते राख बनून अस्तित्वहीन होऊन जातं. मला आपल्या सगळ्या पाहुण्यांच्या उपस्थितीत तुम्हांला हे सांगताना आनंद होतोय, माझे पाहुणे कोण्या दुस-याच सिद्धंताचे प्रमाण असले तरी, की तुमचा सिद्धांत भक्कम आणि बुद्धिमत्तापूर्ण आहे. पण, जसं सर्वविदित आहे, सगळ्या सिद्धांतांच एक दुस-यामुळेच अस्तित्व आहे. ह्यांच्यापैकी एक आहे, की प्रत्येकाला त्याच्या विश्वासानुसारंच19 फळ मिळतं. हो, असंच होईल! तुम्हीं अस्तित्वहीन व्हाल, आणि मला त्या प्याल्यांतून - ज्यांत तुम्हीं परिवर्तित होणार आहे – अस्तित्वासाठी पिताना आनन्द होईल.”
वोलान्दने तलवार उचलली. तेवढ्यांत डोक्याच्या पापण्या विझून काळ्या झाल्या आणि वाळून गेल्या, मग तुकडे-तुकडे होऊन विखुरल्या; डोळे गायब झाले आणि मार्गारीटाला लवकरंच दिसली पिवळंट, पाचूचे डोळे आणि मोत्याचे दात असलेली, सोन्याच्या आधारावर ठेवलेली कवटी. कवटीच झाकण झटक्याने उघडलं.
“अगदी ह्याच क्षणी, मालक,” करोव्येवने वोलान्दची प्रश्नार्थक दृष्टी बघून म्हटलं, “तो तुमच्या समोर येईल. ह्या कबरीसारख्या शांततेत मी त्याच्या चकचकीत जोड्यांची करकर आणि त्या प्याल्याची किणकिण, जो त्याने शेवटचा टेबलवर ठेवला होता, आपल्या जीवनाची शेवटची शैम्पेन पिऊन. हा घ्या, तो आलाय.”
हॉलमधे वोलान्दकडे एक नवा, एकटा पाहुणा येताना दिसला. वरून तो इतर पुरुष पाहुण्यांहून वेगळा नव्हता, फक्त एक गोष्ट सोडली तर : पाहुणा घाबरल्यामुळे अडखळंत होता, जे दुरूनही दिसंत होतं. त्याचे गाल लाल झाले होते, डोळे भीतियुक्त चंचलतेने पळंत होते. पाहुणा स्तम्भित झाला होता, आणि ते स्वाभाविकंच होतं ; त्याला इथली प्रत्येक गोष्ट आश्चर्यचकित करंत होती, विशेषकरून वोलान्दची वेशभूषा.
पण पाहुण्याचं स्वागंत अत्यंत प्रेमाने केलं गेलं.
“ओह, प्रिय सामन्त मायकेल,” स्वागतपूर्ण हास्य करंत वोलान्द पाहुण्याकडे वळला, ज्याचे डोळे आतापर्यंत कपाळावर चढले होते, “तुमचा परिचय देताना मला आनन्द होतोय,” वोलान्दने आता पाहुण्यांकडे वळून म्हटलं, “आदरणीय सामन्त मायकेल, जे मनोरंजन समितींत परदेशी पर्यटकांना राजधानीच्या दर्शनीय स्थळांची ओळख करून देतात.”
आता मार्गारीटा घाबरली, कारण की तिने ह्या मायकेलला ओळखलं होतं. तिने त्याला मॉस्कोच्या थियेटर्स आणि हॉटेल्समधे अनेकदा बघितलेलं होतं. कदाचित...’, मार्गारीटाने विचार केला, ‘हा सुद्धां मरून गेलाय?’ पण तेवढ्यांतच सगळ स्पष्ट झालं. “प्रिय सामन्त,” वोलान्दने प्रसन्नतेने स्मित करंत आपलं बोलणं चालू ठेवलं, “इतके मुग्ध झाले, की मॉस्कोत माझ्या आगमानाबद्दल कळल्यावर त्यांनी लगेच मला फोन केला आणि आपली सेवा प्रदान करण्याचा, म्हणजेच मॉस्कोच्या दर्शनीय स्थळाना भेट देण्याबद्दल, प्रस्ताव ठेवला. बरोबरंच आहे, मला त्यांना इथे आमंत्रित करण्यांत आनंदच झालाय.”
“तर, सामंत महाशय,” एकदम जवळीक दाखवंत वोलान्दने आपला आवाज खाली केला आणि म्हणाला, “तुमच्या असीम उत्सुकतेबद्दल अफवा पसरताहेत. असं ऐकलंय की तुमची उत्सुकता आणि बडबड्या स्वभाव लोकांचं लक्ष वेधताहेत. शिवाय काही दुष्ट लोक हेसुद्धां म्हणू लागले आहेत, की तुम्हीं एजेण्ट आणि हेर आहांत. शिवाय हा अंदाज़पण लावण्यांत येतोय की ह्या सगळ्या गोष्टींमुळे महिन्याभरांत तुमचा दुर्दैवी अंत होणार आहे. तर, तुम्हांला ह्या कंटाळवाण्या प्रतीक्षेपासून वाचवण्यासाठी आम्हीं विचार केला, की तुमची मदत करावी. तुम्हीं माझ्याकडे येऊन माझ्याशी बोलून काही ऐकण्याची-बघण्याची इच्छा प्रकट केली होती, त्याच गोष्टीचा फायदा आम्हीं घेतलाय.”
सामंतचा चेहरा अबादोनापेक्षाही पिवळा पडला. मग एक आश्चर्याची गोष्ट झाली. अबादोनाने सामंताच्यासमोर उभे राहून एका क्षणासाठी आपला चश्मा काढला. ह्याच वेळी अजाज़ेलोच्या हातांत काहीतरी चमकलं, टाळी वाजल्यासारखा आवाज झाला आणि सामंत खाली जमिनीवर पडू लागला. त्याच्या छातीतून लाल रक्ताचा फवारा निघून त्याच्या स्टार्च लावलेल्या शर्टाला आणि जैकेटला भिजवूं लागला. करोव्येवने ह्या उसळत्या धारेखाली कवटीचा प्याला ठेवला आणि भरल्यावर वोलान्दला दिला. आतापर्यंत सामन्तचं निर्जीव शरीर फरशीवर पडून गेलं होतं.
“तुमच्या स्वास्थ्यासाठी, मित्रांनो,” वोलान्दने हळूच म्हटलं आणि प्याला उचलून ओठांकडे नेला.
तेवढ्यांत एक अद्भुत परिवर्तन झालं. डाग़ असलेला गाउन आणि चुरगळलेले जोडे गायब झाले. वोलान्द एका काळ्या पोषाकांत दिसला, कम्बरेंत स्टीलची तलवार लटकवून. तो लगेच मार्गारीटाच्या जवळ आला आणि तिच्याजवळ प्याला आणंत अधिकारपूर्ण स्वरांत म्हणाला, “पी!”
मार्गारीटाचं डोकं गरगरलं, ती अडखळू लागली, पण आतांपर्यंत प्याला तिच्या ओठांजवळ पोहोचला होता, आणि काही आवाज, कोणाचे – ती ओळखू नाही शकली, तिच्या दोन्हीं कानांत सांगंत होते : “घाबरूं नका, महाराणी...घाबरू नका, महाराणी, रक्त केव्हांच जमिनीत गेलंय. आणि, तिथे, जिथे ते सांडलं होतं, द्राक्षाचे वेल उगवले आहेत.”
मार्गारीटाने डोळे न उघडतां एक घोट घेतला आणि तिच्या नसांमधे एक गोड लाट तरंगली, कानांत घण्ट्या वाजू लागल्या. तिला वाटलं, की कानांना बधिर करणारे कोंबडे ओरडताहेत. दूर कुठेतरी मार्च-पास्टचं संगीत वाजतंय. पाहुण्यांचे झुण्ड आपला आकार हरवूं लागले : फ्रॉककोट घातलेले पुरुष आणि बायका कंकालांमधे परिवर्तित होऊन विखुरले. मार्गारीटाच्या डोळ्यांसमोर त्या हॉलवर कीड पसरू लागली, कबरीसारखा कुजकंट वास पसरला. स्तम्भ विखुरले, दिवे विझले, सगळंच गुंडाळलं गेलं; फवारे, ट्यूलिप्स, इतर फुलं – काहीही शिल्लक उरलं नाही. फक्त तेवढंच शिल्लक होतं, जितकं आधी होतं – जवाहि-याच्या बायकोचा साधा-सा ड्राइंगरूम, आणि त्याच्या अर्धवट उघड्या दारांतून डोकावंत असलेला प्रकाशाचा एक पट्टा. ह्याच अर्धवट उघड्या दारांत प्रविष्ट झाली मार्गारीटा.


**********

मंगलवार, 24 अक्टूबर 2017

मास्टर आणि मार्गारीटा - 22



 बावीस


मेणबत्त्यांच्या प्रकाशांत

                                      
उंचावर उडणा-या कारची सतंत होत असलेली घर-घर जणु मार्गारीटासाठी अंगाई-गीत गात होती आणि चंद्राचा प्रकाश तिला हल्कीशी ऊब देत होता. डोळे बंद करून चेह-यावर येणा-या वा-याचा आनंद लुटंत ती काहीशा विषादाने त्या अनोळखी नदीच्या काठाबद्दल विचार करंत होती, ज्याला ती मागे सोडून आली होती आणि ज्याला कदाचित पुढे कधीच बघणार नव्हती. संध्याकाळच्या सगळ्या जादुई करामाती आणि आश्चर्यजनक घटनांहून गेल्यावर तिला काहीसा अन्दाज तर आला होता, की तिला कुणाकडे नेण्यांत येत आहे, पण ती जरासुद्धां घाबरली नाही. ह्या आशेने, की तिथे तिला आपलं हरपलेलं सुख मिळेल, तिला निर्भय केलं होतं. पण ह्या सुखाबद्दल कारमधे बसून जास्त वेळ विचार करतां आला नाही. कदाचित कावळा आपल्या कामांत अतिशय दक्ष होता, किंवा कार मस्त होती, पण लवकरंच मार्गारीटाने डोळे उघडून बघितलं तर तिला जंगलाच्या अंधाराऐवजी दिसला मॉस्कोच्या प्रकाशाचा सळसळंता समुद्र. काळ्या पक्षी-ड्राइवरने उडतां-उडतांच पुढचं उजवं चाक काढलं आणि नंतर एका नीरव कब्रस्तानांत, जे दरगामीलवा  भागांत होतं, कारला खाली उतरवलं. चुपचाप बसलेल्या मार्गारीटाला आपल्या ब्रशसकट एका थडग्याजवळ उतरवून कावळ्याने कार सुरू केली. तिला कब्रस्तानच्या मागे असलेल्या खड्ड्यांत ढकलून दिलं. कार ह्या खड्ड्यांत पडून विस्फोट करंत नष्ट झाली. कावळ्याने सम्मानाने सलाम केला, चाकावर बसला आणि त्याच्यासकट उडून गेला.
तेवढ्यांत एका स्मारकाच्यामागून काळा रेनकोट दिसला. चंद्राच्या प्रकाशांत एक दात चमकला आणि मार्गारीटाने अजाजेलोला ओळखलं. त्याने खुणेने मार्गारीटाला ब्रशवर बसण्यास सांगितलं आणि स्वतः उडी मारून लांब दांड्यावर बसला, दोघांने जूSS करंत झेप घेतली आणि कुणाच्याच नजरेंत न पडतां काही क्षणांतच सादोवाया स्ट्रीटच्या बिल्डिंग नं. 302बीच्या जवळ उतरले.
जेव्हां बगलेंत ब्रश आणि दांडा दाबून सहप्रवासी कोप-यावर पोहोचले, तेव्हां मार्गारीटाने एका थकलेल्या माणसाला पाहिलं, त्याने टोपी आणि उंच-उंच जोडे घातले होते. कदाचित तो कुणाची तरी वाट बघंत होता. मार्गारीटा आणि अजाजेलो कितीही हळू चालंत होते, तरीही त्या माणसाला त्यांच्या पावलांचा आवाज आलांच आणि तो उत्सुकतेने वळला, हे न कळल्यामुळे, की हा आवाज कुठून येत आहे.
दुस-या, जवळ-जवळ पहिल्यासारख्यांच माणसाला ते भेटले सहाव्या प्रवेश द्वाराजवळ. पुन्हां तीच पुनरावृत्ति. पावलांचा आवाज...माणूस वैतागून वळला आणि त्याच्या कपाळावर आठ्या चढल्या. जेव्हां दार उघडून पुन्हां बंद झालं, तेव्हां तो ह्या अदृश्य घुसणा-यांच्या मागे-मागे बघू लागला, ही गोष्ट वेगळी आहे, की त्याला काहीच दिसलं नाही.
तिसरा, जो दुस-याचीच प्रतिकृति होता, आणि कदाचित पहिल्याचीसुद्धां, तिस-या मजल्याच्या प्रवेश द्वाराजवळ पहारा देत होता. तो खूपंच उग्र अशी सिगरेट ओढंत होता. त्याच्या जवळून जाताना मार्गारीटाला खोकला आला. सिगरेट ओढणारा आपल्या बेंचवरून असा उडाला, जणु त्याला कोणी बारीक सुई टोचलीय, त्याने वैतागून इकडे-तिकडे बघायला सुरुवात केली, कठड्याकडे गेला, खाली बघितलं. येवढ्यांत मार्गारीटा आपल्या सोबत्याबरोबर फ्लैट नं. 50वर येऊन पोहोचली होती. घंटी नाही वाजवली. अजाजेलोने आवाज न करतां आपल्या चावीने दार उघडलं.
सर्वप्रथम मार्गारीटा ज्या गोष्टीने दचकली, तो होता - तेथे असलेला अंधार. काहींच दिसंत नव्हतं, जणु काही ती जमिनीच्या खाली आली होती, आणि मार्गारीटाने घाबरून अजाजेलोचा कोट पकडला, ज्याने ती अडखळूं नये. पण मग हळू-हळू दुरून, कुठून तरी वरून, एक प्रकाश किरण चमकली, आणि हळू-हळू जवंळ येऊं लागली. चालतां-चालतां अजाजेलोने मार्गारीटाच्या बगलेंत दबलेला ब्रश काढून टाकला, जो आवाज न करतां अंधारांत लुप्त झाला. आता ते काहीश्या रुंद-रुंद पाय-यांवर चढूं लागले, मार्गारीटाला असं वाटलं, की ह्या पाय-या कधींच संपणार नाहीत. तिला अचम्बा वाटला, की मॉस्कोच्या एका साधारण फ्लैटच्या लहानश्या प्रवेश कक्षांत अश्या असाधारण, अदृश्य, पण तरीही जाणवंत असलेल्या, अंतहीन ह्या पाय-या आल्यांत तरी कुठून? पण तेव्हांच हे वर चढणं थांबलं आणि मार्गारीटाला कळलं, की ती लैण्डिंगवर उभी आहे. तो प्रकाश जवंळ-जवंळ येत गेला आणि त्याच्या उजेडांत एका माणसाचा चेहरा दिसला; माणूस उंच आणि काळा होता, त्याने हातांत हा लैम्प धरला होता. ते दुर्दैवी प्राणी, जे दुर्भाग्याने ह्या काही दिवसांत त्याच्या मार्गांत अडमडले होते, ह्या मंद प्रकाशांतपण त्याला ओळखू शकले असते. हा करोव्येव होता, तोच फागोतसुद्धां होता.
हे खरं आहे, की करोव्येवचं रूप खूपंच बदललं होतं. फडफडणारी ज्योत तुटक्या चष्म्यावर नाही, ज्याला केव्हांच कच-याच्या डब्यांत फेकून द्यायला हवं होतं, परन्तु एक काच असलेल्या चष्म्यावर पडंत होती. हा काचपण तडकलेलाच होता. त्याच्या काळ्या रंगामागचं कारण होतं तो फ्रॉक-कोट, जो त्याने घातला होता. फक्त छातीवर पांढरा रंग होता.
जादुगार, कॉयर-मास्टर, सम्मोहक, अनुवादक आणि असं बरंच काही-काही होता हा करोव्येव, सैतानालांच माहीत. करोव्येवने वाकून मार्गारीटाचं अभिवादन केलं आणि हवेंत लैम्पला फिरवून तिला आपल्या मागे यायला सांगितलं. अजाजेलो गायब झाला.
फारंच विचित्र संध्याकाळ आहे,’ मार्गारीटाने विचार केला, ‘मला काहीही अपेक्षित होतं, फक्त हे सोडून: ह्यांच्याकडे वीज गेलीये का? पण सर्वांत जास्त आश्चर्य वाटतंय, ते ह्या जागेच्या आकार-प्रकाराचं! मॉस्कोच्या फ्लैटमधे येवढं सगळं कसं सामावूं शकतं? अशक्यंच आहे!
 करोव्येवच्या मेणबत्तीचा प्रकाश कितीही मंद असला तरी मार्गारीटा समजून गेली, की ती एका असीमित हॉलमधे आहे, ज्यांत मोठ्या-मोठ्या खांबांची रांग आहे – काळी-काळी आणि प्रथमदर्शनी अंतहीन वाटणारी. एका दिवाणाजवळ करोव्येव थांबला, त्याने आपली मेणबत्ती एका स्टूलवर ठेऊन दिली. त्याने खुणेने मार्गारीटाला बसायला सांगितलं आणि स्वतः तिच्या जवळंच एखाद्या चित्रासारखा स्टूलवर कोपर टेकवून जणु थिजून गेला. 
“मला स्वतःचा परिचय देण्याची परवानगी द्यावी,” करोव्येव खणखणला, “करोव्येव. तुम्हांला आश्चर्य होतं आहे नं, की वीज नाहीये? बचंत करताहेत, कदाचित, तुम्हीं विचार करंत असाल नं? नाही, नाही, नाही! असं असल्यास, कोणत्याही खाटिकाला, किंवा त्यांच्यापैकी कुणालाही, ज्यांना थोड्यांच वेळांत तुमच्या पायांशी डोकं टेकवायचं सौभाग्य लाभणार आहे, ह्याच स्टूलवर माझं मुंडकं छाटायला सांगा. हे तर आमच्या मालकांना विजेचा प्रकाश आवडंत नाही, म्हणून दिवे आम्हीं शेवटी, अगदी शेवटी लावणार आहोत. तेव्हां त्यांत जरासुद्धां कपात होणार नाही. हो, प्रकाश थोडा कमीच असला, तर चांगलं राहील...”           
मार्गारीटाला करोव्येव आवडला. त्याच्या खडखडणा-या आवाजाने तिला बरांच धीर आला.
“नाही,” मार्गारीटाने उत्तर दिलं, “सगळ्यांत जास्त आश्चर्य मला ह्या गोष्टीचं होत आहे, की इथे इतकं सगळं आलंच कस?” तिने हात फिरवून त्या मोठ्ठ्या हॉलकडे इंगित केलं.
करोव्येव गोडसं हसला, ज्याने त्याच्या नाकाजवळ सावल्या तरंगल्या.
“हे तर फार सोपं आहे!” त्याने उत्तर दिलं, “ज्यांना पाचव्या आयामाबद्दल माहिती आहे, त्यांच्यासाठी कोणत्याही जागेला मनासारखा आकार देणं काही कठीण नाही. आदरणीय महोदया, कित्तीही मोठा! मी...” करोव्येव बडबडंत राहिला, “काही अश्या लोकांना ओळखतो, ज्यांना पाचव्या तर काय, पण कोणत्याच आयामाबद्दल काहीही माहिती नाहीये, तरीसुद्धां त्यांनी आपल्या जागेला मोठं करण्याचे फार सुरेख उद्योग केलेत. उदाहरणार्थ, एका नागरिकाला, माझ्या माहितीप्रमाणे, ‘ज़िम्ल्यानी वालमधे तीन खोल्यांचा फ्लैट मिळाला. कोणत्याच पाचव्या-बिचव्या आयामाचा वापंर न करतां, ज्यामुळे डोकं भणभणू लागतं, त्याने पटकन त्याला चार खोल्यांचा करून टाकला. एका खोलींत मधे पार्टीशन उभं करून, दोन भागांत विभागलं.
“ह्या मोठ्या फ्लैटच्या ऐवजी त्याने मॉस्कोच्या दोन वेगळ्या-वेगळ्या भागांत दोन स्वतंत्र फ्लैट्स घेतले – एक तीन खोल्यांचा आणि एक दोन खोल्यांचा. आता त्याच्याकडे झाल्यात पाच खोल्या. तीन खोल्यांच्या फ्लैटच्या ऐवजी त्याने आतां दोन-दोन खोल्यांचे दोन फ्लैट्स घेतले, आणि तुम्हीं बघितलंत ना, की तो सहा खोल्यांचा मालक झाला, जे मॉस्कोच्या वेगवेगळ्या भागांत विखुरले होते. आता तो आपला शेवटचा आणि अत्यंत शानदार कारनामा करायला निघाला : वर्तमानपत्रांत जाहिरात देऊन, की मॉस्कोच्या वेगवेगळ्या भागांत विखुरलेल्या सहा खोल्यांच्या ऐवजी ज़िम्ल्यानी वालवर त्याला एक पाच खोल्यांचा फ्लैट हवाय, पण तेव्हांच काही कारणांमुळे, ज्यांच्यावर त्याचे काही नियंत्रण नव्हते, त्याची गतिविधी अचानकंच थांबली. कदाचित, अजूनही त्याच्याजवळ एखादी खोली असेल, पण मी तुम्हांला नक्की सांगतो, की ती मॉस्कोमधे नाहीये. बघा, काय कमालीचा चालबाज आहे, आणि तुम्हीं अजूनही पाचव्या आयामाबद्दल विचार करताय!”
खरं म्हणजे मार्गारीटा पाचव्या आयामाबद्दल जरासुद्धां विचार करंत नव्हती, पण करोव्येव अजूनही त्याच विषयावर बोलंत होता. पण फ्लैटवाल्याची गोष्ट ऐकून ती खदखदून हसली.
करोव्येव बोलंत होता, “चला, कामाबद्दल बोलूं या, कामाबद्दल, मार्गारीटा निकोलायेव्ना. तुम्हीं खूप हुशार महिला आहांत, आणि, निःसंदेह, तुम्हीं समजल्या आहांत, की आमचे मालक कोण आहेत.”
मार्गारीटाच्या हृदयांत धस्स् झालं. तिने डोकं हलवलं.
“तेच, तेच तर...” करोव्येव म्हणाला, “आम्हीं सगळे जण लपवा-छपवी आणि रहस्यांचे शत्रू आहोत. आमचे मालक दरवर्षी एका बॉलचं (नृत्योत्सवाचं) आयोजन करतात. ह्याला वसन्त पौर्णिमेचा, किंवा शतनृप नृत्योत्सव म्हणतांत. इतके लोक!” आता करोव्येवने गालावर हात ठेवला, जणु त्याच्या दात दुखंत आहे, “जाऊं द्या, मी आशा करतो, की तुम्हांला स्वतःलापण विश्वास होईल. तर, प्रश्न असा आहे, की आमचे मालक ब्रह्मचारी आहेत, जसं की तुम्हांला स्वतःला कळलंच असेल, पण होस्टेस तर असायलाच हवी न. करोव्येवने हात हलवंत म्हटलं, “तुम्हांला माहीतंच आहे, की होस्टेसशिवाय...”
मार्गारीटा एक-एक शब्द लक्ष देऊन ऐकंत होती : तिला हृदयाच्या खाली गारवा जाणवंत होता; सुखाच्या कल्पनेनं तिचं डोकं गरगरंत होतं.
“अशी प्रथा आहे,” करोव्येव पुढे म्हणाला, “की नृत्योत्सवाच्या होस्टेसचं नाव मार्गारीटांच असायला हवं, ही झाली पहिली गोष्ट; आणि दुसरी अशी, की ती स्थानीयंच असली पाहिजे आणि जसं तुम्हीं बघतांच आहांत, आम्ही नेहमी प्रवास करंत असतो आणि सध्या मॉस्कोत आहोत. मॉस्कोमधे आम्हांला एकशे एकवीस मार्गारीटा भेटल्यांत, पण विश्वास करा,” करोव्येव आपल्या मांडीवर हात मारंत म्हणाला, “एक सुद्धां ह्या लायकीची नाही निघाली. आता शेवटी, सौभाग्याने...”
करोव्येव पुढे वाकंत अर्थपूर्ण ढंगाने हसला, मार्गारीटाला पुन्हां हृदयाच्या खाली गारवा जाणवला.
“थोडक्यांत...तुम्हीं ही जवाबदारी नाकारणार तर नाही?”
“नाही नाकारणार,” मार्गारीटाने दृढतेने उत्तर दिलं.
“शंकांच नाही!: करोव्येवने म्हटलं आणि लैम्प उंचावून म्हणाला, “कृपा करून माझ्या मागे-मागे या.”
ते खांबांच्या रांगेमधून आणखी एका हॉलमधे पोहोचले, जिथे न जाणे कां, लिंबाचा वास येत होता, जिथे काहीतरी खुसफुस होत होती आणि मार्गारीटाच्या डोक्याला काहीतरी स्पर्श करून निघून गेलं. मार्गारीटा थरथरली.
“घाबरू नका,” खूप प्रेमाने करोव्येवने मार्गारीटाचा हात धरून तिला धीर दिला, “बेगेमोतची हल्की-फुल्की खोडी आहे, आणखी काही नाही. मी तुम्हांला सल्ला देण्याचं धाडस करतो, मार्गारीटा निकोलायेव्ना, की कधीही, कुणालाही घाबरूं नका. हा मूर्खपणा आहे. नृत्योत्सव खूप शानदार असेल. मी तुमच्यापासून काहीही लपवणार नाही. आपण अश्या लोकांना बघणार आहोत, जे आपल्या काळांत अत्यंत शक्तिशाली शासक होते. पण जेव्हां मी हा विचार करतो, की त्या महान शक्तीपुढे, जिच्या सेवेंत मी असतो, त्यांचं सामर्थ्य किती क्षुद्र आहे, तेव्हां मला हसू येतं, दुःख पण होतं – आणि हो, तुमच्या रक्तवाहिन्यांमधेसुद्धां तर राजसी रक्त आहे.”
“राजसी रक्त?” मार्गारीटा घाबरून करोव्येवला बिलगून विचारूं लागली.
“ओह, महाराणी,” करोव्येवने हसंत-खेळंत म्हटलं, “रक्ताशी संबंधित प्रश्न, जगातील सर्वांत जटिल प्रश्न आहेत! जर कुण्या पणजीआजीला विचारलं, विशेषकरून त्यांना, ज्या आपल्या नम्रतेसाठी प्रसिद्ध होत्या, तर  बरेंचसे आश्चर्यजनक रहस्य उघडकीस येतील, आदरणीय मार्गारीटा निकोलायेव्ना! ह्या संदर्भात बोलताना जर मी व्यवस्थित फेटलेल्या पत्त्यांच्या गड्डीच उदाहरण दिलं तर ते चूक नाही ठरणार. काही गोष्टी अश्या असतात की ज्या शहरांच्या आणि राज्यांच्या सीमा जुमानत नाहीत. मी ह्या गोष्टीकडे लक्ष वेधेन : सोळाव्या शतकांत झालेल्या कुण्या फ्रेंच महाराणीला जर कुणी सांगेल, की तिच्या सुंदर ग्रेट ग्रॅण्ड ग्रॅण्ड ग्रॅण्ड नातीचा अनेक वर्षांनंतर हात धरून मी मॉस्कोच्या नृत्योत्सवांत घेऊन येईन, तर, विचार करा, की तिला किती आश्चर्य होईल. बघा आपण आलोय!”
आता करोव्येवने आपल्या हातांतला लैम्प विझवला आणि तो त्याच्या हातांतून गायब झाला. मार्गारीटाने एका अंधा-या दाराखालून येणारा उजेडाचा पट्टा बघितला. ह्या दारावर करोव्येवने हळूच टक्-टक् केलं. मार्गारीटा इतकी उत्तेजित झाली, की तिचे दात किटकिटू लागले आणि पाठीच्या मणक्यांत थंडगार लाट धावली. दार उघडलं. खोली लहानंच होती, मार्गारीटाला ओक वृक्षाचा एक चौडा पलंग दिसला, ज्याच्यावर घाणेरड्या आणि चोळामोळा झालेल्या चादरी आणि उश्या होत्या. पलंगाच्या समोर ओकचंच कोरीव काम केलेल्या पायांचं टेबल होतं, ज्याच्यावर पक्ष्यांच्या अणकुचीदार पंजांच्या आकाराचा घरट्यासारखा लैम्प होता. ह्या सात सोनेरी पंज्यांमधे1 जाड्या-जाड्या मेणबत्त्या जळंत होत्या. शिवाय टेबलावर बुद्धिबळाचा एक पटसुद्धां ठेवलेला होता – गोट्यांसकट, ज्या खूपंच कौशल्याने बनवल्या होत्या. छोट्याश्या गालिच्यावर छोटासा बाक पडला होता. एकीकडे टेबल होतं, ज्याच्यावर एक सोन्याचं भांडं आणि लैम्प होता. ह्या लैम्पच्या फांद्या सापाच्या आकाराच्या होत्या. खोलीत गंधक आणि डिंकाचा वास होता, मेणबत्त्यांमुळे पडणा-या सावल्या क्रॉसप्रमाणे एकमेकाला छेदत होत्या.
तेथे उपस्थित असलेल्या लोकांपैकी मार्गारीटाने पट्कन अजाजेलोला ओळखलं, ज्याने फ्रॉक कोट घातला होता आणि पलंगाच्या उश्याशी उभा होता. नीट-नेटका अजाजेलो त्या डाकूसारखा बिल्कुल नव्हता दिसंत, ज्याला पहिल्यांदा मार्गारीटाने अलेक्सान्द्रोव्स्की पार्कमधे बघितलं होतं. त्याने अगदी स्टाईलमधे मार्गारीटाचं अभिवादन केलं.
वेराइटीच्या सम्माननीय रेस्टॉरेन्टवाल्याला बुचकळ्यांत टाकणारी निर्वस्त्र डाकीण, तीच हैला, जिला नशिबानेच थियेटरमधल्या त्या विचित्र कार्यक्रमाच्या रात्री कोंबड्याच्या आरवण्याने घाबरवून टाकलं होतं, पलंगाच्याजवळ जमिनीवर अंथरलेल्या गालिच्यावर बसली होती आणि एका भांड्यांत काहीतरी हालवंत होती, ज्यांतून गंधकाची वाफ निघंत होती.
ह्यांच्याशिवाय त्या खोलीत बुद्धिबळाच्या टेबलासमोर तिपाईवर एक अवाढव्य बोका बसला होता, ज्याने आपल्या पंजात बुद्धिबळाच्या राजाला पकडलं होतं.
हैलाने उठून मार्गारीटाचं अभिवादन केलं. तसेच बोक्यानेपण तिपाईवरून उडी मारून केलं, मागचा उजवा पंजा फिरवंत त्याने राजाला खाली टाकलं आणि त्याच्या मागे-मागे पलंगाखाली घुसला.
मेणबत्त्यांच्या मंद प्रकाशांत भीतीने अर्धमेली झालेली मार्गारीटा हे सगळं बघंत होती. तिची नजर पलंगाकडे वळली, ज्याच्यावर बसला होता तो, ज्याला थोड्याच वेळापूर्वी पत्रियार्शीवर बिचा-या इवानने ठामपणे सांगितलं होतं, की सैतानाचं अस्तित्वंच नाहीय. हेच अस्तित्वहीन अस्तित्व पलंगावर बसलेलं होतं.
दोन डोळे मार्गारीटाच्या चेह-यावर स्थिर झाले – उजव्या डोळ्याची सोनेरी चमक कुणाच्याही हृदयांत खोलवर प्रवेश करूं शकंत होती, आणि डावा डोळा होता काळा आणि रिकामा, जणु सुईचं भोक होतं, जणु एका अंधा-या अंतहीन विहिरीचं तोंड. वोलान्दचा चेहरा एका बाजूने वाकडा होता, तोंडाची उजवी कड खाली खेचलेली होती, वर टकलं होत गेलेल्या कपाळावर दाट रेघा होत्या, ज्या भिवयांच्या समान्तर होत्या. त्याच्या चेह-याची कातडी जणू उन्हांत नेहमीसाठी भाजली होती.
वोलान्द पलंगावर पसरून बसला होता. त्याने घाणेरडा, डाग पडलेला आणि खांद्यावर ठिगंळ लावलेला फक्त एक लांब नाइट गाउन घातला होता. एक उघडा पाय त्याने स्वतःखाली दुमडून घेतला होता आणि दुसरा पाय पसरला होता. ह्याच काळ्या पायाचा गुडघा वाफ निघंत असलेल्या उटण्याने हैला स्वच्छ करंत होती.
मार्गारीटाने वोलान्दच्या उघड्या, केस नसलेल्या चिकण्या छातीवर उत्तम कलाकुसरीने बनवलेला, सोन्याच्या साखळीमधे अडकलेला काळ्या दगडाचा भुंगा2 बघितला, ज्याच्या पाठीवर काहीतरी लिहिलेलं होतं. वोलान्दच्या शेजारी पलंगावर एक विचित्र गोल ठेवला होता, जो अगदी सजीव वाटंत होता, आणि ज्यावर एकीकडून सूर्याचा प्रकाश पडंत होता.  
काही क्षण शांततेत गेले. हा मला पारखतोय,’ मार्गारीटाने विचार केला आणि आपल्या इच्छा शक्तीने तिने स्वतःच्या थरथरणा-या पायांना काबूत केलं.
शेवटी वोलान्दने तोंड उघडलं. तो हसला, ज्याने त्याच्या चमकणा-या डोळ्यांतून जणु ज्वाळा निघू लागल्या, “स्वागत आहे, महाराणी, आणि मी आपल्या ह्या घरच्या पोषाकाबद्दल क्षमाप्रार्थी आहे.”
वोलान्द इतक्या खालच्या स्वरांत बोलंत होता, की काही शब्द तर अगदी घरघरल्यासारखे वाटंत होते.
वोलान्दने पलंगावरून लांब तलवार उचलली, डोकं खाली करून तिची नोक पलंगाखाली घुसवली आणि म्हणाला:
“बाहेर ये! खेळ संपला, पाहुणे आलेत.”
“कोणत्याही परिस्थितींत नाही,” उत्तेजनेने करोव्येव मार्गारीटा निकोलायेव्नाच्या कानांत प्रॉम्प्टिंग करंत ओरडला.
“कोणत्याही परिस्थितींत नाही...” मार्गारीटा बोलूं लागली.
“महाशय...” करोव्येवने कानांत म्हटलं.
“कोणत्याही परिस्थितीत नाही, महाशय,” मार्गारीटाने स्वतःवर नियंत्रण ठेवंत हसून, पण स्पष्ट आवाजांत म्हटलं, आणि ती पुढे म्हणाली, “मी विनंती करतेय, की कृपा करून खेळ बंद नका करूं. मला वाटतंय की बुद्धिबळाशी संबंधित मासिकं जर ह्या खेळाला छापतील, तर चांगले पैसे देतील.”
अजाजेलो हळूच सहमति दर्शवंत भिणभिणला आणि वोलान्द मार्गारीटाकडे बघून जणु स्वतःशीच बोलला, “हो, करोव्येव खरंच सांगतोय! पत्त्यांची गड्डी किती चांगल्या प्रकारे फेटली आहे! रक्त!”
त्याने हात पुढे केला आणि मार्गारीटाला आपल्याजवंळ बोलावलं. ती पुढे आली. तिच्या उघड्या तळपायांना फरशीची जाणीव नव्हती होत. वोलान्दने आपला जड, दगडासारखा, पण गरम हात मार्गारीटाच्या खांद्यावर ठेवला, आणि तिला स्वतःजवळ खेचून आपल्याजवंळ पलंगावर बसवलं.
“हो, तर तुम्हीं जर इतक्या सम्मोहक आणि सहृदय आहांत,” तो म्हणाला, “आणि, मी हीच अपेक्षा केली होती, तर मग कोणत्याही प्रस्तावनेशिवाय आणि आडंबराशिवाय बोलूं या...” तो पुन्हां वाकला आणि पलंगाच्या खाली बघंत ओरडला, “पलंगाखालची ही सर्कस किती वेळ चालणार आहे? बाहेर नीघ, माथेफिरू हैन्स3!”
“घोडा सापडंत नाहीये,” दबक्या आणि कृत्रिम आवाजांत पलंगाखालून बोका उत्तरला, “माहीत नाही, उड्या मारंत कुठेतरी निघून गेला आणि त्याच्या जागेवर बेडूकंच दिसतोय.”
“तुला असं तर नाही न वाटंत, की तू एखाद्या जत्रेत आहेस?” रागावण्याचं नाटक करंत वोलान्दने विचारलं, “पलंगाखाली काही बेडूक-बीडूक नाहींये! ह्या फालतू गोष्टी तू वेराइटीसाठीच राहूं दे. जर तू लगेच बाहेर नाही निघाला, तर आम्हीं समजू, की तू हार कबूल केलीयेस, बेशरम, पळपुट्या!”
“कोणत्याच परिस्थितीत नाही, मालक!” बोका गुरगुरला आणि लगेच पलंगाखालून बाहेर आला, त्याच्या पंजात घोडा होता.
“ह्यांना भेट...” वोलान्द म्हणणारंच होता. पण त्याने आपलं वाक्य अर्धवंट सोडंत म्हटलं, “नाही, मी ह्या जोकराकडे नाही बघू शकंत. बघा, पलंगाच्याखाली त्याने आपला काय अवतार केलाय.”
येवढ्यांत धुळीने माखलेल्या बोक्याने मागच्या पंजांवर उभं राहून मार्गारीटाचं अभिवादन केलं होतं. आता बोक्याच्या गळ्यांत पांढरा बो-टाय लोंबकळंत होता, आणि छातीवर एका पट्ट्याला लेडीज-दुरबीण लटकंत होती. शिवाय बोक्याच्या मिश्यापण सोनेरी झाल्या होत्या.
“हा काय प्रकार आहे!” चकित होऊन वोलान्द म्हणाला, “तू मिशा सोनेरी कां केल्यास? आणि तुला टायची गरजंच कां पडली, जर तू पैन्टंच घातलेली नाहीये?”
“बोक्याला पैन्टची गरंज नाहीये, मालक,” बोक्याने अगदी सभ्यतेने उत्तर दिलं, “तुम्हीं आता मला जोडे घालायला तर नाही नं सांगणार? जोडे घातलेला बोका फक्त परीकथांमधेच असतो! पण तुम्हीं कधी नृत्योत्सवांत कुणालाही बिना टायचं बघितलंय कां? मला जोकर नाही व्हायचंय आणि कुणी मला मानगुटीला धरून बाहेर काढावे, अशी पण माझी इच्छा नाहीये! प्रत्येक माणूस स्वतःला सजवतोच, जे शक्य असेल त्यानेच! हेच दुरबिणीबद्दलसुद्धां मला सांगायचंय, महोदय!”
“पण मिशा?...”
“मला कळंत नाहीये,” बोक्याने रुक्षतेने विरोध केला, “आज दाढी करताना अजाजेलो आणि करोव्येवने पांढरी पावडर फासली, ती सोनेरीपेक्षा चांगली कशी काय आहे? मी पण आपल्या मिशांना पावडर फासली, बस्स! हो, जर मी दाढी करंत असतो तर गोष्ट वेगळी होती! दाढीवाला बोका...हा म्हणजे चावंटपणाच झाला असता, ही गोष्ट मला हजारदां मान्य आहे. पण सर्वसाधारणपणे,” बोक्याने रुसंत म्हटलं, “मी बघतोय की माझ्याबद्दल काही पूर्वाग्रह आहेत, आणि आता माझ्यापुढे एक गंभीर प्रश्न आहे, की मी नृत्योत्सवांत जावं किंवा नाही? तुमचं काय म्हणणं आहे, मालक?”
आणि बोक्याने अपमानित होऊन इतकं वेडं-वाकडं तोंड केलं, की जणु एका क्षणांत तो जोराने रडू लागेल.
“ओह, बदमाश, बदमाश,” डोकं हलवंत वोलान्द उद्गारला, “नेहमी, जेव्हां तो हरणार असतो, तेव्हां अशी बडबड करतो, जणु कोणी सडकछाप गुंडा आहे. पट्कन खाली बस आणि ही बडबड बंद कर.”
“मी बसून जातो,” बसता-बसता बोका म्हणाला,”पण, शेवटच्या शे-याचा विरोध करतो. माझं कथन बिल्कुल बडबड नाहीये, जसं तुम्हीं एका महिलेच्या उपस्थितीत म्हटलंय, ह्याच्या उलंट, सुंदर शब्दांत सांगितलेला एक तर्क आहे, ज्याची तारीफ फक्त असे विद्वान करूं शकतात, जसे सेक्स्त एम्पिरिक, मार्त्सिआन कापेल्ला4 आणि स्वतः अरिस्टोटलसुद्धां त्याचं अगदी बरोबर मूल्यांकन करतात.”      
“राजाला शह,” वोलान्दने म्हटलं.
“आनंदाने, आनंदाने,” बोका म्हणाला आणि तो दुरबिणीने बुद्धिबळाच्या पटाकडे बघूं लागला.
“तर आता,” वोलांद मार्गारीटाकडे वळला, “आपल्या टीमचा परिचय तुम्हांला देतो. हा, मूर्खाचे सोंग करणारा बोका – बेगेमोत आहे. अजाजेलो आणि करोव्येवला तुम्हीं भेटल्याच आहांत. ही आहे माझी सेविका, हैला! चुस्त, समजदार आणि असं कोणतंच काम नाहीये, जे ही करूं शकंत नाही.”
मार्गारीटाकडे आपल्या हिरव्या डोळ्यांनी बघंत सुंदरी हैला हसली आणि ती आपल्या मालकाच्या गुडघ्यावर उटणं चोळतंच होती.
“बस, येवढेच आहेत,” वोलान्द म्हणाला. तो वेदनेने किंचित थरथरला, जेव्हां हैलाने ब-याच जोराने त्याचा गुडघा दाबला, “तुम्हीं बघितलं ना, की टीम लहानशी आहे, संमिश्र प्रकाराची, आणि साधी-सरंळ आहे.” तो गप्प झाला आणि आपल्यासमोर पडलेल्या ग्लोबला फिरवूं लागला, जो इतका सुरेख होता, की त्यांत दिसंत असलेल्या निळ्या समुद्रांत लाटा सुद्धां उसळताना दिसंत होत्या आणि ग्लोबच्या ध्रुवाची टोपी अगदी खरोखरची, बर्फाची वाटंत होती.     
येवढ्यांत बुद्धिबळाच्या पटावर धुमाकूळ सुरूं झाला. पूर्णपणे घाबरलेला, त्रस्त झालेला पांढरा डगला घातलेला राजा आपल्या खाण्यांत धाव-पळ करंत होता, हताश होऊन हात वर करंत उड्या मारंत होता. तीन पांढरे प्यादे घाबरून त्या बिशपकडे बघंत होते, जो तलवार फिरवंत तिकडे खूण करंत होता, जिथे शेजारच्या काळ्या आणि पांढ-या खाण्यांत वोलान्दचे काळे स्वार दिसंत होते, जे दोन चपळ, खाण्यांना खुरांनी खोदंत असलेल्या घोड्यांवर स्वार होते.
मार्गारीटाला खूप मनोरंजक वाटंत होतं. हे बघून तिला धक्काच बसला, की ह्या सगळ्या गोट्या जीवन्त होत्या.
बोक्याने डोळ्यांवरून दुर्बिण काढली आणि हळूंच आपल्या राजाच्या पाठीवर एक धप्पा दिला. त्याने शरमेने आपले तोंड हातांमधे लपवलं.
“परिस्थिती वाईट आहे, लाडक्या बेगेमोत,” करोव्येवने हळूंच, पण विषारी आवाजांत म्हटलं.
“परिस्थिती वाईट आहे, पण एकदम निराशाजनक नाहीये,” बेगेमोतने उत्तर दिलं, “आणि, मला पूर्ण विश्वास आहे, की शेवटी मीच जिंकणारेय. बस, परिस्थितीचं नीट आकलन केलं पाहिजे.”
त्याने अत्यंत गंमतशीरपणे परिस्थितीच आकलन करायला सुरुवात केली. विचित्र-विचित्र प्रकाराने तोंड वेंगाडंत तो राजाला डोळा मारंत होता.
“काहीही उपयोग होणार नाही,” करोव्येवने शेरा मारला.
“आँय!” बेगेमोत ओरडला, “मिट्ठू उडून गेलेंत, जसं मी आधीच म्हटलं होतं!”
खरोखरंच, दूर, कुठेतरी दूर, हज्जारों पंखांची फडफड ऐकूं आली. करोव्येव आणि अजाजेलो बाहेर पळाले.
“आणि, तू, आपल्या नृत्योत्सवाच्या नख-यांसह चुलींत जा!” वोलान्द आपल्या ग्लोबवरून नजर न काढतां म्हणाला.
जसेच करोव्येव आणि बेगेमोत दृष्टीआड झाले, बेगेमोत आपल्या राजाला आणखीनंच जोरांत डोळा मारूं लागला. पांढरा राज अखेर समजला की त्याच्याकडून काय अपेक्षा करतायेत. त्याने आपला डगला काढून आपल्या खाण्यावर फेकून दिला आणि पट सोडून पळून गेला. बिशपने राजाचा फेकलेला डगला घालून घेतला आणि राजाच्या ठिकाणी उभा राहिला. करोव्येव आणि अजाजेलो परंत आले.
“खोटं, नेहमीप्रमाणे,” अजाजेलो बेगेमोतला स्पर्श करंत फिर्यादीच्या सुरांत म्हणाला.
“मला ऐकूं आलं होतं,” बोक्याने उत्तर दिलं.
“तर, हे किती वेळ चालणारेय?” वोलान्दने विचारलं, “शह राजाला!”
“मला कदाचित बरोबर ऐकूं नाही आलं, मालक,” बोक्याने उत्तर दिलं, “राजाला शह मिळालेली नाहीये, आणि मिळूंसुद्धां नाही शकंत.”
“मी पुन्हां सांगतोय, राजाला शह आहे!”
“मालक,” खोट्या-खोट्या उद्वेगाने बोक्याने म्हटलं, “तुम्हीं कदाचित खूप थकले आहांत. राजाला शह नाहीये.”
“राजा G-2 नंबरच्या घरांत आहे,” पटाकडे न बघतां वोलान्दने म्हटलं.
“मालिक, मला भीति वाटतेय,” बोका आक्रोश करंत म्हणाला, “ह्या घरांत राजा नाहीये.”
“हा काय प्रकार आहे?” वोलान्दने अविश्वासाने विचारलं आणि पटाकडे बघूं लागला, जिथे राजाच्या जागेवर उभ्या असलेल्या बिशपने हातांत तोंड लपवलं होतं.
“ओह, तू, हलकट,” वोलान्दने विचारमग्न होत म्हटलं.
“मालक, मी पुन्हां तर्काचा आधार घेतोय,” बोका छातीवर हात ठेवून म्हणाला, “जर खेळणारा म्हणंत असेल, की राजाला शह मिळालेली आहे आणि ह्या दरम्यान राजांच पटावर नसेल, तर त्याला शह नाही म्हणतां येणार!”
“तू हार स्वीकारतोयंस, किंवा नाही?” वोलान्द भयंकर आवाजांत ओरडला.
“कृपा करून विचार करूं द्या,” बोक्याने शांतपणे उत्तर दिलं, आणि टेबलवर कोपरं टेकवले, हातांनी कान बंद केले आणि विचार करूं लागला. तो बराच वेळ विचार करंत होता आणि शेवटी त्याने म्हटलं, “हार स्वीकारतोय.”
“ह्या आडमुठ्या कच-याला मारून टाका,” अजाजेलो पुटपुटला.
“हो, हार स्वीकारतोय,” बोका म्हणाला, “पण हार फक्त अशासाठी स्वीकारतोय, कारण की कुढणा-यांचे बोचरे शब्द ऐकंत खेळूं नाही शकंत!” तो उठला, आणि बुद्धिबळाच्या गोट्या आपणहून पेटीत चालल्या गेल्या.
“हैला, वेळ झालीय,” वोलान्दने म्हटलं आणी हैला खोलींतून गायब झाली.
“पाय दुखतोय, आणि हा नृत्योत्सव येऊन ठेपलाय.” वोलान्द पुढे म्हणाला.
“मला परवानगी द्या,” मार्गारीटाने हळूंच विनंती केली.
वोलान्दने एकटक तिच्याकडे बघितलं आणि आपला गुडघा तिच्यापुढे केला. लाव्यासारखा गरम लेप हात भाजंत होता, पण मार्गारीटा चेह-यावर आठी न आणतां हळू-हळू त्याला गुडघ्यावर चोळू लागली.
“माझे मित्र म्हणतांत की हे सांध्यांचं दुखणं (रुमेटिज़्म) आहे,” मार्गारीटावरून नजर न काढतां वोलान्द म्हणाला, “पण मला शंका आहे की माझ्या गुडघ्याचं हे दुखणं त्या सुन्दर मायाविनीची आठवण आहे, जिच्या प्रेमात मी सन् 1571मधे माउन्ट ब्रोकेन्सवर5 सैतानी-विभागांत असताना पडलो होतो.”
“ओह, हे शक्य आहे कां?” मार्गारीटाने विचारलं.
“मूर्खपणा! तीनशे वर्षानंतर ते आपणहूनंच जाईल. मला कितीतरी औषधं सुचवलीत, पण मी आपल्या जुन्या काळातल्या आजीबाईच्या बटव्याचा उपयोग करतो. माझी आजी काही अत्यंत करामाती जड्या-बुट्या देऊन गेलीये! बरं, सांगा, तुम्हांला काही त्रास तर नाहीये? कदाचित असं एखादं दुःख, जे तुमच्या हृदयाला टोचतंय? कदाचित एखादी हताशा?”
“नाही, महोदय, असं काहीच नाहीये,” हुशार मार्गारीटाने उत्तर दिलं, “आणि आता, जेव्हां मी तुमच्या जवळ आहे, मला खूपंच चांगलं वाटतंय.”
“रक्त...फार मोठी गोष्ट आहे...” माहीत नाही, कशाने आनंदित होऊन वोलान्द बोलंत होता. तो पुढे म्हणाला, “मी बघतोय, की माझा हा ग्लोब तुम्हांला बरांच आवडलाय.”
“ओह, हो, मी अशी वस्तू कधीच बघितलेली नाहीये.”
“चांगली वस्तू आहे. मला, खरं विचाराल तर, रेडिओच्या बातम्या आवडंत नाहीत. ह्या बातम्या मुलींच वाचतात, आणी त्या जागेची नावं बरोबर नाही वाचंत. शिवाय, प्रत्येक तीन मुलींमधे एक मुलगी बोबडं बोलते, जणु काही मुद्दामच अश्या मुलींना निवडण्यांत येतं. माझा ग्लोब कितीतरी पटींनी सोइस्कर आहे, विशेषकरून अश्यासाठी, की मला सगळ्या घटनांची अगदी बरोब्बर माहिती हवीय. उदाहरणार्थ, हे बघा, भूमंडळाचा हा भाग, ज्याच्या किना-यापाशी समुद्र आहे? बघा, तो आगीच्या ज्वाळांनी वेढलाय. तिथे युद्ध सुरूं झालंय. पण थोडं जवळून बघितलं तर आणखी तपशीलसुद्धां बघूं शकाल.”
मार्गारीटा ग्लोबकडे झुकली आणि तिने बघितलं की पृथ्वीचा तो तुकडा मोठा होत गेला, त्यावर अनेक रंग दिसू लागले आणि तो उठावदर्शी, अद्भुत नकाशांत परिवर्तित झाला. नंतर तिने नदीची पातळशी धारपण पाहिली आणि तिच्याजवळ तिला दिसली एक वस्ती. ते घर, जे एखाद्या छोट्या दाण्यासारखं होतं, मोठं होत गेलं आणि आगपेटीयेवढं मोठ झालं. अचानक त्या घराची छत आवाज न करतां काळ्या धुराबरोबर वर उडाली आणि भिंती पडून गेल्या, त्या दोन मजली इमारतीचं काहीसुद्धां शिल्लक नाही उरलं, फक्त त्या छोट्याश्या ढेराला सोडून, ज्यांतून काळा धूर निघंत होता. आणखी जवळून बघितल्यावर मार्गारीटाने एका लहानश्या बाईची आकृति पाहिली, जी जमिनीवर लोळली होती, तिच्या जवळ रक्ताच्या थारोळ्यांत एक लहानसं मूल हात पसरून पडलं होतं.
“बस, येवढंच,” स्मित करंत वोलान्दने म्हटलं, “तो पाप नाही करूं शकला. अबादोनाच्या6 कामांत कोणतीच चूक नसते.”
“मला त्याबाजूला असायला नाही आवडणार, ज्याच्या विरुद्ध अबादोना आहे,” मार्गारीटा म्हणाली, “तो कुणाच्या बाजूला आहे?”
“जेवढं जास्त मी तुमच्याशी बोलतोय,” प्रेमाने वोलान्द म्हणाला, “तेवढांच मला विश्वास होतोय, की तुम्हीं एक हुशार महिला आहांत. मी तुमच्या प्रश्नाचं समाधान करेन. तो क्वचितंच निष्पक्ष वाटतो, आणि दोन्हीं पीडित बाजूंबद्दल त्याला सहानुभूति आहे. म्हणून दोन्हीं बाजूंचे परिणाम एकसारखेच असतांत. अबादोना!” वोलान्दने हळूंच म्हटलं, आनि भिंतीतून काळा चष्मा लावलेला एक बारीक माणूस बाहेर आला. ह्या चष्म्याचा मार्गारीटावर इतका दाट परिणाम झाला की ती एकदम किंचाळली आणि तिने वोलान्दच्या पायांत आपला चेहरा लपवला.
“आह, पुरे, पुरे,” वोलान्द ओरडला, “आजकालचे लोक किती घाबरंट आहेत,” त्याने हळूच मार्गारीटाच्या पाठीवर थोपटलं, ज्याने तिच्या शरीरांत झणझण झाली, “तुम्हीं बघितलंय ना, की त्याने चष्मा लावलाय. शिवाय, आज पर्यंत असं कधीच झालं नाही, आणि होणारही नाही, की अबादोना वेळेच्या आधी कुणासमोर प्रकंट झालाय. आणि, मग, मी तर आहेच ना. तुम्हीं माझ्या पाहुण्या आहांत! मी तर फक्त तुम्हांला दाखवंत होतो.”
अबादोना चुपचाप उभा होता.
“असं शक्य आहे का, की तो एका क्षणासाठी आपला चष्मा काढेल?” मार्गारीटाने वोलान्दला बिलगंत विचारलं, पण आता ती उत्सुकतेने थरथरंत होती.
“हे शक्य नाही,” वोलान्दने गंभीरतेने म्हटलं आणि त्याने अबादोनाला हाताने खूण केली. तो लुप्त झाला. “तुला काय म्हणायचंय अजाजेलो?”
“महाशय, मला सांगण्याची परवानगी द्यावी, - इथे दोन बाहेरची माणसं आलीयेत : एक सुन्दरी, जी खिदळंत विनंती करतेय की तिला तिच्या मालकिणीजवळ असू द्यावं, आणि तिच्याबरोबर आहे, क्षमा करा, तिचं डुक्कर.”
“ह्या सुन्दर बायासुद्धां विचित्रपणांच करतांत,” वोलान्दने शेरा मारला.
“ती नताशा आहे, नताशा,” मार्गारीटा उद्गारली.
“ठीकाय, तिला आपल्या मालकिणीजवळ असू दे, आणि डुकराला आचा-यांकडे घेऊन जा!”   
“कापून टाकतील?” मार्गारीटाने घाबरून विचारलं. “दया करा, महोदय, तो निकोलाय इवानोविच आहे, जो आमच्या खालच्या मजल्यावरचा शेजारी आहे. इथे काही तरी गफ़लत झालीये, त्याच्यावर क्रीम चोपडण्यांत आलं होतं...”
“शांत राहा,” वोलान्द म्हणाला, “कोण कापतंय त्याला? त्याला तिथेच आचा-यांबरोबर बसूं द्या, आणखी काही नाही! तुम्हांला पण कळतंच असेल की मी त्याला नृत्योत्सवांत तर नाही बोलावूं शकंत!”
“ठीक आहे...” अजाजेलो म्हणाला आणि त्याने पुढे सांगितलं, “अर्ध रात्र होत आलीये, मालक.”
“ओह, ठीकाय,” वोलान्द मार्गारीटाकडे वळला, “तर, मी तुम्हांला विनंती करतोय! आधीच तुमचे आभार मानतो! गोंधळून जाऊं नका आणि कशालांच भिऊं नका. पाण्याशिवाय दुसरं काहीही पिऊं नका, नाहीतर तुम्हीं अडखळू लागाल आणि तुम्हांला त्रास होईल. तर, जाऊं या!”
मार्गारीटा गालिच्यावरून उठली आणि तेव्हांच दारांत प्रकट झाला करोव्येव.


********