बावीस
मेणबत्त्यांच्या
प्रकाशांत
उंचावर उडणा-या कारची सतंत होत असलेली घर-घर जणु मार्गारीटासाठी अंगाई-गीत
गात होती आणि चंद्राचा प्रकाश तिला हल्कीशी ऊब देत होता. डोळे बंद करून चेह-यावर
येणा-या वा-याचा आनंद लुटंत ती काहीशा विषादाने त्या अनोळखी नदीच्या काठाबद्दल
विचार करंत होती, ज्याला ती मागे सोडून आली होती आणि ज्याला कदाचित पुढे
कधीच बघणार नव्हती. संध्याकाळच्या
सगळ्या जादुई करामाती आणि आश्चर्यजनक घटनांहून गेल्यावर तिला काहीसा अन्दाज तर आला
होता, की तिला कुणाकडे नेण्यांत येत आहे, पण ती जरासुद्धां घाबरली नाही. ह्या आशेने, की तिथे तिला
आपलं हरपलेलं सुख मिळेल, तिला निर्भय केलं होतं. पण ह्या सुखाबद्दल कारमधे बसून
जास्त वेळ विचार करतां आला नाही. कदाचित कावळा आपल्या कामांत अतिशय दक्ष होता, किंवा कार मस्त
होती, पण लवकरंच मार्गारीटाने डोळे उघडून बघितलं तर तिला जंगलाच्या अंधाराऐवजी
दिसला मॉस्कोच्या प्रकाशाचा सळसळंता समुद्र. काळ्या पक्षी-ड्राइवरने उडतां-उडतांच
पुढचं उजवं चाक काढलं आणि नंतर एका नीरव कब्रस्तानांत, जे दरगामीलवा भागांत होतं, कारला खाली उतरवलं. चुपचाप बसलेल्या मार्गारीटाला
आपल्या ब्रशसकट एका थडग्याजवळ उतरवून कावळ्याने कार सुरू केली. तिला कब्रस्तानच्या
मागे असलेल्या खड्ड्यांत ढकलून दिलं. कार ह्या खड्ड्यांत पडून विस्फोट करंत नष्ट
झाली. कावळ्याने सम्मानाने सलाम केला, चाकावर बसला आणि त्याच्यासकट उडून गेला.
तेवढ्यांत एका स्मारकाच्यामागून काळा रेनकोट दिसला. चंद्राच्या प्रकाशांत एक
दात चमकला आणि मार्गारीटाने अजाजेलोला ओळखलं. त्याने खुणेने मार्गारीटाला ब्रशवर
बसण्यास सांगितलं आणि स्वतः उडी मारून लांब दांड्यावर बसला, दोघांने जूSSम करंत झेप घेतली आणि कुणाच्याच नजरेंत न
पडतां काही क्षणांतच सादोवाया स्ट्रीटच्या बिल्डिंग नं. 302बीच्या जवळ उतरले.
जेव्हां बगलेंत ब्रश आणि दांडा दाबून सहप्रवासी कोप-यावर पोहोचले, तेव्हां
मार्गारीटाने एका थकलेल्या माणसाला पाहिलं, त्याने टोपी आणि उंच-उंच जोडे घातले होते. कदाचित तो
कुणाची तरी वाट बघंत होता. मार्गारीटा आणि अजाजेलो कितीही हळू चालंत होते, तरीही त्या माणसाला
त्यांच्या पावलांचा आवाज आलांच आणि तो उत्सुकतेने वळला, हे न कळल्यामुळे, की हा आवाज कुठून येत आहे.
दुस-या, जवळ-जवळ पहिल्यासारख्यांच माणसाला ते भेटले सहाव्या
प्रवेश द्वाराजवळ. पुन्हां तीच पुनरावृत्ति. पावलांचा आवाज...माणूस वैतागून वळला आणि
त्याच्या कपाळावर आठ्या चढल्या. जेव्हां दार उघडून पुन्हां बंद झालं, तेव्हां तो ह्या
अदृश्य घुसणा-यांच्या मागे-मागे बघू लागला, ही गोष्ट वेगळी आहे, की त्याला काहीच दिसलं नाही.
तिसरा, जो दुस-याचीच प्रतिकृति होता, आणि कदाचित
पहिल्याचीसुद्धां, तिस-या मजल्याच्या प्रवेश द्वाराजवळ पहारा देत होता.
तो खूपंच उग्र अशी सिगरेट ओढंत होता. त्याच्या जवळून जाताना मार्गारीटाला खोकला
आला. सिगरेट ओढणारा आपल्या बेंचवरून असा उडाला, जणु त्याला कोणी बारीक सुई टोचलीय, त्याने वैतागून
इकडे-तिकडे बघायला सुरुवात केली, कठड्याकडे गेला, खाली बघितलं. येवढ्यांत मार्गारीटा आपल्या
सोबत्याबरोबर फ्लैट नं. 50वर येऊन पोहोचली होती. घंटी नाही वाजवली. अजाजेलोने आवाज
न करतां आपल्या चावीने दार उघडलं.
सर्वप्रथम मार्गारीटा ज्या गोष्टीने दचकली, तो होता - तेथे असलेला अंधार. काहींच दिसंत नव्हतं, जणु काही ती
जमिनीच्या खाली आली होती, आणि मार्गारीटाने घाबरून अजाजेलोचा कोट पकडला, ज्याने ती अडखळूं
नये. पण मग हळू-हळू दुरून, कुठून तरी वरून, एक प्रकाश किरण चमकली, आणि हळू-हळू जवंळ येऊं लागली. चालतां-चालतां अजाजेलोने
मार्गारीटाच्या बगलेंत दबलेला ब्रश काढून टाकला, जो आवाज न करतां अंधारांत लुप्त झाला. आता ते काहीश्या
रुंद-रुंद पाय-यांवर चढूं लागले, मार्गारीटाला असं वाटलं, की ह्या पाय-या कधींच संपणार नाहीत. तिला अचम्बा वाटला, की मॉस्कोच्या
एका साधारण फ्लैटच्या लहानश्या प्रवेश कक्षांत अश्या असाधारण, अदृश्य, पण तरीही जाणवंत
असलेल्या, अंतहीन ह्या पाय-या आल्यांत तरी कुठून? पण तेव्हांच हे वर चढणं थांबलं आणि मार्गारीटाला कळलं, की ती लैण्डिंगवर
उभी आहे. तो प्रकाश जवंळ-जवंळ येत गेला आणि त्याच्या उजेडांत एका माणसाचा चेहरा
दिसला; माणूस उंच आणि काळा होता, त्याने हातांत हा लैम्प धरला होता. ते दुर्दैवी प्राणी, जे दुर्भाग्याने
ह्या काही दिवसांत त्याच्या मार्गांत अडमडले होते, ह्या मंद प्रकाशांतपण त्याला ओळखू शकले असते. हा
करोव्येव होता, तोच फागोतसुद्धां होता.
हे खरं आहे, की करोव्येवचं रूप खूपंच बदललं होतं. फडफडणारी ज्योत
तुटक्या चष्म्यावर नाही, ज्याला केव्हांच कच-याच्या डब्यांत फेकून द्यायला हवं
होतं, परन्तु एक काच असलेल्या चष्म्यावर पडंत होती. हा काचपण तडकलेलाच होता.
त्याच्या काळ्या रंगामागचं कारण होतं तो फ्रॉक-कोट, जो त्याने घातला होता. फक्त छातीवर पांढरा रंग होता.
जादुगार, कॉयर-मास्टर, सम्मोहक, अनुवादक आणि असं बरंच काही-काही होता हा करोव्येव, सैतानालांच
माहीत. करोव्येवने वाकून मार्गारीटाचं अभिवादन केलं आणि हवेंत लैम्पला फिरवून तिला
आपल्या मागे यायला सांगितलं. अजाजेलो गायब झाला.
‘फारंच विचित्र
संध्याकाळ आहे,’ मार्गारीटाने विचार केला, ‘मला काहीही अपेक्षित होतं, फक्त हे सोडून: ह्यांच्याकडे वीज गेलीये का? पण सर्वांत जास्त
आश्चर्य वाटतंय, ते ह्या जागेच्या आकार-प्रकाराचं! मॉस्कोच्या फ्लैटमधे
येवढं सगळं कसं सामावूं शकतं? अशक्यंच आहे!’
करोव्येवच्या मेणबत्तीचा प्रकाश
कितीही मंद असला तरी मार्गारीटा समजून गेली, की ती एका असीमित हॉलमधे आहे, ज्यांत
मोठ्या-मोठ्या खांबांची रांग आहे – काळी-काळी आणि प्रथमदर्शनी अंतहीन वाटणारी. एका
दिवाणाजवळ करोव्येव थांबला, त्याने आपली मेणबत्ती एका स्टूलवर ठेऊन दिली. त्याने
खुणेने मार्गारीटाला बसायला सांगितलं आणि स्वतः तिच्या जवळंच एखाद्या चित्रासारखा स्टूलवर
कोपर टेकवून जणु थिजून गेला.
“मला स्वतःचा परिचय देण्याची परवानगी द्यावी,”
करोव्येव खणखणला, “करोव्येव. तुम्हांला आश्चर्य होतं आहे नं, की वीज नाहीये? बचंत करताहेत, कदाचित, तुम्हीं विचार
करंत असाल नं? नाही, नाही, नाही! असं असल्यास, कोणत्याही खाटिकाला, किंवा त्यांच्यापैकी कुणालाही, ज्यांना थोड्यांच
वेळांत तुमच्या पायांशी डोकं टेकवायचं सौभाग्य लाभणार आहे, ह्याच स्टूलवर
माझं मुंडकं छाटायला सांगा. हे तर आमच्या मालकांना विजेचा प्रकाश आवडंत नाही, म्हणून दिवे
आम्हीं शेवटी, अगदी शेवटी लावणार आहोत. तेव्हां त्यांत जरासुद्धां
कपात होणार नाही. हो, प्रकाश थोडा कमीच असला, तर चांगलं राहील...”
मार्गारीटाला करोव्येव
आवडला. त्याच्या खडखडणा-या आवाजाने तिला बरांच धीर आला.
“नाही,”
मार्गारीटाने उत्तर दिलं, “सगळ्यांत जास्त
आश्चर्य मला ह्या गोष्टीचं होत आहे, की इथे इतकं सगळं आलंच
कस?” तिने हात फिरवून त्या मोठ्ठ्या हॉलकडे इंगित केलं.
करोव्येव गोडसं हसला,
ज्याने त्याच्या नाकाजवळ सावल्या तरंगल्या.
“हे तर फार सोपं आहे!”
त्याने उत्तर दिलं, “ज्यांना पाचव्या आयामाबद्दल
माहिती आहे, त्यांच्यासाठी कोणत्याही जागेला मनासारखा आकार
देणं काही कठीण नाही. आदरणीय महोदया, कित्तीही मोठा! मी...”
करोव्येव बडबडंत राहिला, “काही अश्या लोकांना ओळखतो, ज्यांना पाचव्या तर काय, पण कोणत्याच आयामाबद्दल
काहीही माहिती नाहीये, तरीसुद्धां त्यांनी आपल्या जागेला
मोठं करण्याचे फार सुरेख उद्योग केलेत. उदाहरणार्थ, एका
नागरिकाला, माझ्या माहितीप्रमाणे, ‘ज़िम्ल्यानी
वाल’मधे तीन खोल्यांचा फ्लैट मिळाला. कोणत्याच
पाचव्या-बिचव्या आयामाचा वापंर न करतां, ज्यामुळे डोकं भणभणू
लागतं, त्याने पटकन त्याला चार खोल्यांचा करून टाकला. एका
खोलींत मधे पार्टीशन उभं करून, दोन भागांत विभागलं.
“ह्या मोठ्या फ्लैटच्या
ऐवजी त्याने मॉस्कोच्या दोन वेगळ्या-वेगळ्या भागांत दोन स्वतंत्र फ्लैट्स घेतले –
एक तीन खोल्यांचा आणि एक दोन खोल्यांचा. आता त्याच्याकडे झाल्यात पाच खोल्या. तीन
खोल्यांच्या फ्लैटच्या ऐवजी त्याने आतां दोन-दोन खोल्यांचे दोन फ्लैट्स घेतले,
आणि तुम्हीं बघितलंत ना, की तो सहा खोल्यांचा
मालक झाला, जे मॉस्कोच्या वेगवेगळ्या भागांत विखुरले होते.
आता तो आपला शेवटचा आणि अत्यंत शानदार कारनामा करायला निघाला : वर्तमानपत्रांत
जाहिरात देऊन, की मॉस्कोच्या वेगवेगळ्या भागांत विखुरलेल्या
सहा खोल्यांच्या ऐवजी ‘ज़िम्ल्यानी वाल’वर
त्याला एक पाच खोल्यांचा फ्लैट हवाय, पण तेव्हांच काही
कारणांमुळे, ज्यांच्यावर त्याचे काही नियंत्रण नव्हते,
त्याची गतिविधी अचानकंच थांबली. कदाचित, अजूनही
त्याच्याजवळ एखादी खोली असेल, पण मी तुम्हांला नक्की सांगतो,
की ती मॉस्कोमधे नाहीये. बघा, काय कमालीचा
चालबाज आहे, आणि तुम्हीं अजूनही पाचव्या आयामाबद्दल विचार
करताय!”
खरं म्हणजे मार्गारीटा
पाचव्या आयामाबद्दल जरासुद्धां विचार करंत नव्हती, पण करोव्येव अजूनही त्याच
विषयावर बोलंत होता. पण फ्लैटवाल्याची गोष्ट ऐकून ती खदखदून हसली.
करोव्येव बोलंत होता,
“चला, कामाबद्दल बोलूं या, कामाबद्दल, मार्गारीटा निकोलायेव्ना. तुम्हीं खूप हुशार
महिला आहांत, आणि, निःसंदेह, तुम्हीं समजल्या आहांत, की आमचे मालक कोण आहेत.”
मार्गारीटाच्या हृदयांत
धस्स् झालं. तिने डोकं हलवलं.
“तेच, तेच तर...” करोव्येव
म्हणाला, “आम्हीं सगळे जण लपवा-छपवी आणि
रहस्यांचे शत्रू आहोत. आमचे मालक दरवर्षी एका बॉलचं (नृत्योत्सवाचं) आयोजन करतात.
ह्याला वसन्त पौर्णिमेचा, किंवा शतनृप नृत्योत्सव म्हणतांत.
इतके लोक!” आता करोव्येवने गालावर हात ठेवला, जणु त्याच्या
दात दुखंत आहे, “जाऊं द्या, मी आशा
करतो, की तुम्हांला स्वतःलापण विश्वास होईल. तर, प्रश्न असा आहे, की आमचे मालक ब्रह्मचारी आहेत,
जसं की तुम्हांला स्वतःला कळलंच असेल, पण होस्टेस तर असायलाच हवी न. करोव्येवने हात हलवंत म्हटलं, “तुम्हांला
माहीतंच आहे, की होस्टेसशिवाय...”
मार्गारीटा एक-एक शब्द
लक्ष देऊन ऐकंत होती : तिला हृदयाच्या खाली गारवा जाणवंत होता;
सुखाच्या कल्पनेनं तिचं डोकं गरगरंत होतं.
“अशी प्रथा आहे,”
करोव्येव पुढे म्हणाला, “की नृत्योत्सवाच्या होस्टेसचं नाव मार्गारीटांच असायला हवं, ही झाली पहिली
गोष्ट; आणि दुसरी अशी, की ती स्थानीयंच
असली पाहिजे आणि जसं तुम्हीं बघतांच आहांत, आम्ही नेहमी
प्रवास करंत असतो आणि सध्या मॉस्कोत आहोत. मॉस्कोमधे आम्हांला एकशे एकवीस
मार्गारीटा भेटल्यांत, पण विश्वास करा,” करोव्येव आपल्या मांडीवर हात मारंत म्हणाला, “एक
सुद्धां ह्या लायकीची नाही निघाली. आता शेवटी, सौभाग्याने...”
करोव्येव पुढे वाकंत
अर्थपूर्ण ढंगाने हसला, मार्गारीटाला पुन्हां
हृदयाच्या खाली गारवा जाणवला.
“थोडक्यांत...तुम्हीं ही
जवाबदारी नाकारणार तर नाही?”
“नाही नाकारणार,”
मार्गारीटाने दृढतेने उत्तर दिलं.
“शंकांच नाही!: करोव्येवने
म्हटलं आणि लैम्प उंचावून म्हणाला, “कृपा करून
माझ्या मागे-मागे या.”
ते खांबांच्या रांगेमधून
आणखी एका हॉलमधे पोहोचले, जिथे न जाणे कां,
लिंबाचा वास येत होता, जिथे काहीतरी खुसफुस
होत होती आणि मार्गारीटाच्या डोक्याला काहीतरी स्पर्श करून निघून गेलं. मार्गारीटा
थरथरली.
“घाबरू नका,”
खूप प्रेमाने करोव्येवने मार्गारीटाचा हात धरून तिला धीर दिला,
“बेगेमोतची हल्की-फुल्की खोडी आहे, आणखी काही
नाही. मी तुम्हांला सल्ला देण्याचं धाडस करतो, मार्गारीटा
निकोलायेव्ना, की कधीही, कुणालाही
घाबरूं नका. हा मूर्खपणा आहे. नृत्योत्सव खूप शानदार असेल. मी तुमच्यापासून काहीही
लपवणार नाही. आपण अश्या लोकांना बघणार आहोत, जे आपल्या
काळांत अत्यंत शक्तिशाली शासक होते. पण जेव्हां मी हा विचार करतो, की त्या महान शक्तीपुढे, जिच्या सेवेंत मी असतो,
त्यांचं सामर्थ्य किती क्षुद्र आहे, तेव्हां
मला हसू येतं, दुःख पण होतं – आणि हो, तुमच्या
रक्तवाहिन्यांमधेसुद्धां तर राजसी रक्त आहे.”
“राजसी रक्त?”
मार्गारीटा घाबरून करोव्येवला बिलगून विचारूं लागली.
“ओह,
महाराणी,” करोव्येवने हसंत-खेळंत म्हटलं,
“रक्ताशी संबंधित प्रश्न, जगातील सर्वांत जटिल
प्रश्न आहेत! जर कुण्या पणजीआजीला विचारलं, विशेषकरून
त्यांना, ज्या आपल्या नम्रतेसाठी प्रसिद्ध होत्या, तर बरेंचसे आश्चर्यजनक रहस्य
उघडकीस येतील, आदरणीय मार्गारीटा निकोलायेव्ना! ह्या
संदर्भात बोलताना जर मी व्यवस्थित फेटलेल्या पत्त्यांच्या गड्डीच उदाहरण दिलं तर
ते चूक नाही ठरणार. काही गोष्टी अश्या असतात की ज्या शहरांच्या आणि राज्यांच्या
सीमा जुमानत नाहीत. मी ह्या गोष्टीकडे लक्ष वेधेन : सोळाव्या शतकांत झालेल्या
कुण्या फ्रेंच महाराणीला जर कुणी सांगेल, की तिच्या सुंदर
ग्रेट ग्रॅण्ड ग्रॅण्ड ग्रॅण्ड नातीचा अनेक वर्षांनंतर हात धरून मी मॉस्कोच्या
नृत्योत्सवांत घेऊन येईन, तर, विचार
करा, की तिला किती आश्चर्य होईल. बघा आपण आलोय!”
आता करोव्येवने आपल्या
हातांतला लैम्प विझवला आणि तो त्याच्या हातांतून गायब झाला. मार्गारीटाने एका
अंधा-या दाराखालून येणारा उजेडाचा पट्टा बघितला. ह्या दारावर करोव्येवने हळूच
टक्-टक् केलं. मार्गारीटा इतकी उत्तेजित झाली, की तिचे
दात किटकिटू लागले आणि पाठीच्या मणक्यांत थंडगार लाट धावली. दार उघडलं. खोली
लहानंच होती, मार्गारीटाला ओक वृक्षाचा एक चौडा पलंग दिसला,
ज्याच्यावर घाणेरड्या आणि चोळामोळा झालेल्या चादरी आणि उश्या
होत्या. पलंगाच्या समोर ओकचंच कोरीव काम केलेल्या पायांचं टेबल होतं, ज्याच्यावर पक्ष्यांच्या अणकुचीदार पंजांच्या आकाराचा घरट्यासारखा लैम्प
होता. ह्या सात सोनेरी पंज्यांमधे1 जाड्या-जाड्या मेणबत्त्या जळंत
होत्या. शिवाय टेबलावर बुद्धिबळाचा एक पटसुद्धां ठेवलेला होता – गोट्यांसकट,
ज्या खूपंच कौशल्याने बनवल्या होत्या. छोट्याश्या गालिच्यावर छोटासा
बाक पडला होता. एकीकडे टेबल होतं, ज्याच्यावर एक सोन्याचं
भांडं आणि लैम्प होता. ह्या लैम्पच्या फांद्या सापाच्या आकाराच्या होत्या. खोलीत
गंधक आणि डिंकाचा वास होता, मेणबत्त्यांमुळे पडणा-या सावल्या
क्रॉसप्रमाणे एकमेकाला छेदत होत्या.
तेथे उपस्थित असलेल्या
लोकांपैकी मार्गारीटाने पट्कन अजाजेलोला ओळखलं, ज्याने
फ्रॉक कोट घातला होता आणि पलंगाच्या उश्याशी उभा होता. नीट-नेटका अजाजेलो त्या
डाकूसारखा बिल्कुल नव्हता दिसंत, ज्याला पहिल्यांदा
मार्गारीटाने अलेक्सान्द्रोव्स्की पार्कमधे बघितलं होतं. त्याने अगदी स्टाईलमधे
मार्गारीटाचं अभिवादन केलं.
वेराइटीच्या सम्माननीय
रेस्टॉरेन्टवाल्याला बुचकळ्यांत टाकणारी निर्वस्त्र डाकीण,
तीच हैला, जिला नशिबानेच थियेटरमधल्या त्या
विचित्र कार्यक्रमाच्या रात्री कोंबड्याच्या आरवण्याने घाबरवून टाकलं होतं,
पलंगाच्याजवळ जमिनीवर अंथरलेल्या गालिच्यावर बसली होती आणि एका
भांड्यांत काहीतरी हालवंत होती, ज्यांतून गंधकाची वाफ निघंत
होती.
ह्यांच्याशिवाय त्या खोलीत
बुद्धिबळाच्या टेबलासमोर तिपाईवर एक अवाढव्य बोका बसला होता,
ज्याने आपल्या पंजात बुद्धिबळाच्या राजाला पकडलं होतं.
हैलाने उठून मार्गारीटाचं
अभिवादन केलं. तसेच बोक्यानेपण तिपाईवरून उडी मारून केलं,
मागचा उजवा पंजा फिरवंत त्याने राजाला खाली टाकलं आणि त्याच्या
मागे-मागे पलंगाखाली घुसला.
मेणबत्त्यांच्या मंद
प्रकाशांत भीतीने अर्धमेली झालेली मार्गारीटा हे सगळं बघंत होती. तिची नजर
पलंगाकडे वळली, ज्याच्यावर बसला होता तो, ज्याला थोड्याच वेळापूर्वी पत्रियार्शीवर बिचा-या इवानने ठामपणे सांगितलं
होतं, की सैतानाचं अस्तित्वंच नाहीय. हेच अस्तित्वहीन
अस्तित्व पलंगावर बसलेलं होतं.
दोन डोळे मार्गारीटाच्या
चेह-यावर स्थिर झाले – उजव्या डोळ्याची सोनेरी चमक कुणाच्याही हृदयांत खोलवर
प्रवेश करूं शकंत होती, आणि डावा डोळा होता काळा आणि
रिकामा, जणु सुईचं भोक होतं, जणु एका
अंधा-या अंतहीन विहिरीचं तोंड. वोलान्दचा चेहरा एका बाजूने वाकडा होता, तोंडाची उजवी कड खाली खेचलेली होती, वर टकलं होत
गेलेल्या कपाळावर दाट रेघा होत्या, ज्या भिवयांच्या समान्तर
होत्या. त्याच्या चेह-याची कातडी जणू उन्हांत नेहमीसाठी भाजली होती.
वोलान्द पलंगावर पसरून
बसला होता. त्याने घाणेरडा, डाग पडलेला आणि खांद्यावर ठिगंळ लावलेला फक्त एक लांब नाइट गाउन घातला
होता. एक उघडा पाय त्याने स्वतःखाली दुमडून घेतला होता आणि दुसरा पाय पसरला होता.
ह्याच काळ्या पायाचा गुडघा वाफ निघंत असलेल्या उटण्याने हैला स्वच्छ करंत होती.
मार्गारीटाने वोलान्दच्या
उघड्या, केस नसलेल्या चिकण्या छातीवर उत्तम
कलाकुसरीने बनवलेला, सोन्याच्या साखळीमधे अडकलेला काळ्या
दगडाचा भुंगा2 बघितला, ज्याच्या पाठीवर काहीतरी
लिहिलेलं होतं. वोलान्दच्या शेजारी पलंगावर एक विचित्र गोल ठेवला होता, जो अगदी सजीव वाटंत होता, आणि ज्यावर एकीकडून
सूर्याचा प्रकाश पडंत होता.
काही क्षण शांततेत गेले. ‘हा मला पारखतोय,’ मार्गारीटाने विचार केला आणि आपल्या
इच्छा शक्तीने तिने स्वतःच्या थरथरणा-या पायांना काबूत केलं.
शेवटी वोलान्दने तोंड
उघडलं. तो हसला, ज्याने त्याच्या चमकणा-या
डोळ्यांतून जणु ज्वाळा निघू लागल्या, “स्वागत आहे, महाराणी, आणि मी आपल्या ह्या घरच्या पोषाकाबद्दल
क्षमाप्रार्थी आहे.”
वोलान्द इतक्या खालच्या
स्वरांत बोलंत होता, की काही शब्द तर अगदी
घरघरल्यासारखे वाटंत होते.
वोलान्दने पलंगावरून लांब
तलवार उचलली, डोकं खाली करून तिची नोक पलंगाखाली
घुसवली आणि म्हणाला:
“बाहेर ये! खेळ संपला,
पाहुणे आलेत.”
“कोणत्याही परिस्थितींत
नाही,” उत्तेजनेने करोव्येव मार्गारीटा
निकोलायेव्नाच्या कानांत प्रॉम्प्टिंग करंत ओरडला.
“कोणत्याही परिस्थितींत
नाही...” मार्गारीटा बोलूं लागली.
“महाशय...” करोव्येवने
कानांत म्हटलं.
“कोणत्याही परिस्थितीत
नाही, महाशय,” मार्गारीटाने
स्वतःवर नियंत्रण ठेवंत हसून, पण स्पष्ट आवाजांत म्हटलं,
आणि ती पुढे म्हणाली, “मी विनंती करतेय,
की कृपा करून खेळ बंद नका करूं. मला वाटतंय की बुद्धिबळाशी संबंधित
मासिकं जर ह्या खेळाला छापतील, तर चांगले पैसे देतील.”
अजाजेलो हळूच सहमति
दर्शवंत भिणभिणला आणि वोलान्द मार्गारीटाकडे बघून जणु स्वतःशीच बोलला,
“हो, करोव्येव खरंच सांगतोय! पत्त्यांची गड्डी
किती चांगल्या प्रकारे फेटली आहे! रक्त!”
त्याने हात पुढे केला आणि
मार्गारीटाला आपल्याजवंळ बोलावलं. ती पुढे आली. तिच्या उघड्या तळपायांना फरशीची
जाणीव नव्हती होत. वोलान्दने आपला जड, दगडासारखा,
पण गरम हात मार्गारीटाच्या खांद्यावर ठेवला, आणि
तिला स्वतःजवळ खेचून आपल्याजवंळ पलंगावर बसवलं.
“हो,
तर तुम्हीं जर इतक्या सम्मोहक आणि सहृदय आहांत,” तो म्हणाला, “आणि, मी हीच
अपेक्षा केली होती, तर मग कोणत्याही प्रस्तावनेशिवाय आणि
आडंबराशिवाय बोलूं या...” तो पुन्हां वाकला आणि पलंगाच्या खाली बघंत ओरडला,
“पलंगाखालची ही सर्कस किती वेळ चालणार आहे? बाहेर
नीघ, माथेफिरू हैन्स3!”
“घोडा सापडंत नाहीये,”
दबक्या आणि कृत्रिम आवाजांत पलंगाखालून बोका उत्तरला, “माहीत नाही, उड्या मारंत कुठेतरी निघून गेला आणि
त्याच्या जागेवर बेडूकंच दिसतोय.”
“तुला असं तर नाही न वाटंत, की तू एखाद्या जत्रेत आहेस?” रागावण्याचं नाटक करंत
वोलान्दने विचारलं, “पलंगाखाली काही बेडूक-बीडूक नाहींये!
ह्या फालतू गोष्टी तू वेराइटीसाठीच राहूं दे. जर तू लगेच बाहेर नाही निघाला,
तर आम्हीं समजू, की तू हार कबूल केलीयेस,
बेशरम, पळपुट्या!”
“कोणत्याच परिस्थितीत नाही,
मालक!” बोका गुरगुरला आणि लगेच पलंगाखालून बाहेर आला, त्याच्या पंजात घोडा होता.
“ह्यांना भेट...” वोलान्द
म्हणणारंच होता. पण त्याने आपलं वाक्य अर्धवंट सोडंत म्हटलं,
“नाही, मी ह्या जोकराकडे नाही बघू शकंत. बघा,
पलंगाच्याखाली त्याने आपला काय अवतार केलाय.”
येवढ्यांत धुळीने
माखलेल्या बोक्याने मागच्या पंजांवर उभं राहून मार्गारीटाचं अभिवादन केलं होतं.
आता बोक्याच्या गळ्यांत पांढरा बो-टाय लोंबकळंत होता,
आणि छातीवर एका पट्ट्याला लेडीज-दुरबीण लटकंत होती. शिवाय
बोक्याच्या मिश्यापण सोनेरी झाल्या होत्या.
“हा काय प्रकार आहे!” चकित
होऊन वोलान्द म्हणाला, “तू मिशा सोनेरी कां केल्यास?
आणि तुला टायची गरजंच कां पडली, जर तू पैन्टंच
घातलेली नाहीये?”
“बोक्याला पैन्टची गरंज
नाहीये, मालक,” बोक्याने
अगदी सभ्यतेने उत्तर दिलं, “तुम्हीं आता मला जोडे घालायला तर
नाही नं सांगणार? जोडे घातलेला बोका फक्त परीकथांमधेच असतो!
पण तुम्हीं कधी नृत्योत्सवांत कुणालाही बिना टायचं बघितलंय कां? मला जोकर नाही व्हायचंय आणि कुणी मला मानगुटीला धरून बाहेर काढावे,
अशी पण माझी इच्छा नाहीये! प्रत्येक माणूस स्वतःला सजवतोच, जे शक्य असेल त्यानेच! हेच दुरबिणीबद्दलसुद्धां मला सांगायचंय, महोदय!”
“पण मिशा?...”
“मला कळंत नाहीये,”
बोक्याने रुक्षतेने विरोध केला, “आज दाढी
करताना अजाजेलो आणि करोव्येवने पांढरी पावडर फासली, ती
सोनेरीपेक्षा चांगली कशी काय आहे? मी पण आपल्या मिशांना
पावडर फासली, बस्स! हो, जर मी दाढी
करंत असतो तर गोष्ट वेगळी होती! दाढीवाला बोका...हा म्हणजे चावंटपणाच झाला असता,
ही गोष्ट मला हजारदां मान्य आहे. पण सर्वसाधारणपणे,” बोक्याने रुसंत म्हटलं, “मी बघतोय की माझ्याबद्दल
काही पूर्वाग्रह आहेत, आणि आता माझ्यापुढे एक गंभीर प्रश्न
आहे, की मी नृत्योत्सवांत जावं किंवा नाही? तुमचं काय म्हणणं आहे, मालक?”
आणि बोक्याने अपमानित होऊन
इतकं वेडं-वाकडं तोंड केलं, की जणु एका
क्षणांत तो जोराने रडू लागेल.
“ओह,
बदमाश, बदमाश,” डोकं
हलवंत वोलान्द उद्गारला, “नेहमी, जेव्हां
तो हरणार असतो, तेव्हां अशी बडबड करतो, जणु कोणी सडकछाप गुंडा आहे. पट्कन खाली बस आणि ही बडबड बंद कर.”
“मी बसून जातो,”
बसता-बसता बोका म्हणाला,”पण, शेवटच्या शे-याचा विरोध करतो. माझं कथन बिल्कुल बडबड नाहीये, जसं तुम्हीं एका महिलेच्या उपस्थितीत म्हटलंय, ह्याच्या
उलंट, सुंदर शब्दांत सांगितलेला एक तर्क आहे, ज्याची तारीफ फक्त असे विद्वान करूं शकतात, जसे
सेक्स्त एम्पिरिक, मार्त्सिआन कापेल्ला4 आणि
स्वतः अरिस्टोटलसुद्धां त्याचं अगदी बरोबर मूल्यांकन करतात.”
“राजाला शह,”
वोलान्दने म्हटलं.
“आनंदाने,
आनंदाने,” बोका म्हणाला आणि तो दुरबिणीने
बुद्धिबळाच्या पटाकडे बघूं लागला.
“तर आता,”
वोलांद मार्गारीटाकडे वळला, “आपल्या टीमचा
परिचय तुम्हांला देतो. हा, मूर्खाचे सोंग करणारा बोका –
बेगेमोत आहे. अजाजेलो आणि करोव्येवला तुम्हीं भेटल्याच
आहांत. ही आहे माझी सेविका, हैला! चुस्त, समजदार आणि असं कोणतंच काम नाहीये, जे ही करूं शकंत
नाही.”
मार्गारीटाकडे आपल्या
हिरव्या डोळ्यांनी बघंत सुंदरी हैला हसली आणि ती आपल्या मालकाच्या गुडघ्यावर उटणं
चोळतंच होती.
“बस,
येवढेच आहेत,” वोलान्द म्हणाला. तो वेदनेने
किंचित थरथरला, जेव्हां हैलाने ब-याच जोराने त्याचा गुडघा
दाबला, “तुम्हीं बघितलं ना, की टीम
लहानशी आहे, संमिश्र प्रकाराची, आणि साधी-सरंळ
आहे.” तो गप्प झाला आणि आपल्यासमोर पडलेल्या ग्लोबला फिरवूं लागला, जो इतका सुरेख होता, की त्यांत दिसंत असलेल्या
निळ्या समुद्रांत लाटा सुद्धां उसळताना दिसंत होत्या आणि ग्लोबच्या ध्रुवाची टोपी
अगदी खरोखरची, बर्फाची वाटंत होती.
येवढ्यांत बुद्धिबळाच्या
पटावर धुमाकूळ सुरूं झाला. पूर्णपणे घाबरलेला, त्रस्त
झालेला पांढरा डगला घातलेला राजा आपल्या खाण्यांत धाव-पळ करंत होता, हताश होऊन हात वर करंत उड्या मारंत होता. तीन पांढरे प्यादे घाबरून त्या
बिशपकडे बघंत होते, जो तलवार फिरवंत तिकडे खूण करंत होता,
जिथे शेजारच्या काळ्या आणि पांढ-या खाण्यांत वोलान्दचे काळे स्वार
दिसंत होते, जे दोन चपळ, खाण्यांना
खुरांनी खोदंत असलेल्या घोड्यांवर स्वार होते.
मार्गारीटाला खूप मनोरंजक
वाटंत होतं. हे बघून तिला धक्काच बसला, की ह्या
सगळ्या गोट्या जीवन्त होत्या.
बोक्याने डोळ्यांवरून
दुर्बिण काढली आणि हळूंच आपल्या राजाच्या पाठीवर एक धप्पा दिला. त्याने शरमेने
आपले तोंड हातांमधे लपवलं.
“परिस्थिती वाईट आहे,
लाडक्या बेगेमोत,” करोव्येवने हळूंच, पण विषारी आवाजांत म्हटलं.
“परिस्थिती वाईट आहे,
पण एकदम निराशाजनक नाहीये,” बेगेमोतने उत्तर
दिलं, “आणि, मला पूर्ण विश्वास आहे,
की शेवटी मीच जिंकणारेय. बस, परिस्थितीचं नीट आकलन
केलं पाहिजे.”
त्याने अत्यंत गंमतशीरपणे
परिस्थितीच आकलन करायला सुरुवात केली. विचित्र-विचित्र प्रकाराने तोंड वेंगाडंत तो
राजाला डोळा मारंत होता.
“काहीही उपयोग होणार नाही,”
करोव्येवने शेरा मारला.
“आँय!” बेगेमोत ओरडला,
“मिट्ठू उडून गेलेंत, जसं मी आधीच म्हटलं
होतं!”
खरोखरंच,
दूर, कुठेतरी दूर, हज्जारों
पंखांची फडफड ऐकूं आली. करोव्येव आणि अजाजेलो बाहेर पळाले.
“आणि, तू,
आपल्या नृत्योत्सवाच्या नख-यांसह चुलींत जा!” वोलान्द आपल्या
ग्लोबवरून नजर न काढतां म्हणाला.
जसेच करोव्येव
आणि बेगेमोत दृष्टीआड झाले, बेगेमोत आपल्या राजाला आणखीनंच
जोरांत डोळा मारूं लागला. पांढरा राज अखेर समजला की त्याच्याकडून काय अपेक्षा करतायेत.
त्याने आपला डगला काढून आपल्या खाण्यावर फेकून दिला आणि पट सोडून पळून गेला.
बिशपने राजाचा फेकलेला डगला घालून घेतला आणि राजाच्या ठिकाणी उभा राहिला. करोव्येव
आणि अजाजेलो परंत आले.
“खोटं, नेहमीप्रमाणे,”
अजाजेलो बेगेमोतला स्पर्श करंत फिर्यादीच्या सुरांत म्हणाला.
“मला ऐकूं आलं
होतं,”
बोक्याने उत्तर दिलं.
“तर, हे
किती वेळ चालणारेय?” वोलान्दने विचारलं, “शह राजाला!”
“मला कदाचित
बरोबर ऐकूं नाही आलं, मालक,” बोक्याने उत्तर
दिलं, “राजाला शह मिळालेली नाहीये, आणि
मिळूंसुद्धां नाही शकंत.”
“मी पुन्हां
सांगतोय,
राजाला शह आहे!”
“मालक,” खोट्या-खोट्या उद्वेगाने बोक्याने म्हटलं, “तुम्हीं
कदाचित खूप थकले आहांत. राजाला शह नाहीये.”
“राजा G-2
नंबरच्या घरांत आहे,” पटाकडे न बघतां वोलान्दने म्हटलं.
“मालिक, मला
भीति वाटतेय,” बोका आक्रोश करंत म्हणाला, “ह्या घरांत राजा नाहीये.”
“हा काय प्रकार
आहे?”
वोलान्दने अविश्वासाने विचारलं आणि पटाकडे बघूं लागला, जिथे राजाच्या जागेवर उभ्या असलेल्या बिशपने हातांत तोंड लपवलं होतं.
“ओह, तू,
हलकट,” वोलान्दने विचारमग्न होत म्हटलं.
“मालक, मी
पुन्हां तर्काचा आधार घेतोय,” बोका छातीवर हात ठेवून म्हणाला,
“जर खेळणारा म्हणंत असेल, की राजाला शह
मिळालेली आहे आणि ह्या दरम्यान राजांच पटावर नसेल, तर त्याला
शह नाही म्हणतां येणार!”
“तू हार
स्वीकारतोयंस,
किंवा नाही?” वोलान्द भयंकर आवाजांत ओरडला.
“कृपा करून विचार
करूं द्या,”
बोक्याने शांतपणे उत्तर दिलं, आणि टेबलवर
कोपरं टेकवले, हातांनी कान बंद केले आणि विचार करूं लागला.
तो बराच वेळ विचार करंत होता आणि शेवटी त्याने म्हटलं, “हार
स्वीकारतोय.”
“ह्या आडमुठ्या
कच-याला मारून टाका,” अजाजेलो पुटपुटला.
“हो, हार
स्वीकारतोय,” बोका म्हणाला, “पण हार
फक्त अशासाठी स्वीकारतोय, कारण की कुढणा-यांचे बोचरे शब्द
ऐकंत खेळूं नाही शकंत!” तो उठला, आणि बुद्धिबळाच्या गोट्या
आपणहून पेटीत चालल्या गेल्या.
“हैला, वेळ
झालीय,” वोलान्दने म्हटलं आणी हैला खोलींतून गायब झाली.
“पाय दुखतोय, आणि
हा नृत्योत्सव येऊन ठेपलाय.” वोलान्द पुढे म्हणाला.
“मला परवानगी द्या,” मार्गारीटाने हळूंच विनंती केली.
वोलान्दने एकटक
तिच्याकडे बघितलं आणि आपला गुडघा तिच्यापुढे केला. लाव्यासारखा गरम लेप हात भाजंत
होता,
पण मार्गारीटा चेह-यावर आठी न आणतां हळू-हळू त्याला गुडघ्यावर चोळू
लागली.
“माझे मित्र
म्हणतांत की हे सांध्यांचं दुखणं (रुमेटिज़्म) आहे,” मार्गारीटावरून नजर न
काढतां वोलान्द म्हणाला, “पण मला शंका आहे की माझ्या
गुडघ्याचं हे दुखणं त्या सुन्दर मायाविनीची आठवण आहे, जिच्या
प्रेमात मी सन् 1571मधे माउन्ट ब्रोकेन्सवर5 सैतानी-विभागांत असताना
पडलो होतो.”
“ओह, हे
शक्य आहे कां?” मार्गारीटाने विचारलं.
“मूर्खपणा! तीनशे
वर्षानंतर ते आपणहूनंच जाईल. मला कितीतरी औषधं सुचवलीत, पण
मी आपल्या जुन्या काळातल्या आजीबाईच्या बटव्याचा उपयोग करतो. माझी आजी काही अत्यंत
करामाती जड्या-बुट्या देऊन गेलीये! बरं, सांगा, तुम्हांला काही त्रास तर नाहीये? कदाचित असं एखादं
दुःख, जे तुमच्या हृदयाला टोचतंय? कदाचित
एखादी हताशा?”
“नाही, महोदय,
असं काहीच नाहीये,” हुशार मार्गारीटाने उत्तर
दिलं, “आणि आता, जेव्हां मी तुमच्या
जवळ आहे, मला खूपंच चांगलं वाटतंय.”
“रक्त...फार मोठी
गोष्ट आहे...” माहीत नाही, कशाने आनंदित होऊन वोलान्द बोलंत
होता. तो पुढे म्हणाला, “मी बघतोय, की
माझा हा ग्लोब तुम्हांला बरांच आवडलाय.”
“ओह, हो,
मी अशी वस्तू कधीच बघितलेली नाहीये.”
“चांगली वस्तू
आहे. मला, खरं विचाराल तर, रेडिओच्या बातम्या आवडंत नाहीत.
ह्या बातम्या मुलींच वाचतात, आणी त्या जागेची नावं बरोबर
नाही वाचंत. शिवाय, प्रत्येक तीन मुलींमधे एक मुलगी बोबडं
बोलते, जणु काही मुद्दामच अश्या मुलींना निवडण्यांत येतं.
माझा ग्लोब कितीतरी पटींनी सोइस्कर आहे, विशेषकरून अश्यासाठी,
की मला सगळ्या घटनांची अगदी बरोब्बर माहिती हवीय. उदाहरणार्थ,
हे बघा, भूमंडळाचा हा भाग, ज्याच्या किना-यापाशी समुद्र आहे? बघा, तो आगीच्या ज्वाळांनी वेढलाय. तिथे युद्ध सुरूं झालंय. पण थोडं जवळून
बघितलं तर आणखी तपशीलसुद्धां बघूं शकाल.”
मार्गारीटा
ग्लोबकडे झुकली आणि तिने बघितलं की पृथ्वीचा तो तुकडा मोठा होत गेला, त्यावर
अनेक रंग दिसू लागले आणि तो उठावदर्शी, अद्भुत नकाशांत
परिवर्तित झाला. नंतर तिने नदीची पातळशी धारपण पाहिली आणि तिच्याजवळ तिला दिसली एक
वस्ती. ते घर, जे एखाद्या छोट्या दाण्यासारखं होतं, मोठं होत गेलं आणि आगपेटीयेवढं मोठ झालं. अचानक त्या घराची छत आवाज न
करतां काळ्या धुराबरोबर वर उडाली आणि भिंती पडून गेल्या, त्या
दोन मजली इमारतीचं काहीसुद्धां शिल्लक नाही उरलं, फक्त त्या
छोट्याश्या ढेराला सोडून, ज्यांतून काळा धूर निघंत होता.
आणखी जवळून बघितल्यावर मार्गारीटाने एका लहानश्या बाईची आकृति पाहिली, जी जमिनीवर लोळली होती, तिच्या जवळ रक्ताच्या
थारोळ्यांत एक लहानसं मूल हात पसरून पडलं होतं.
“बस, येवढंच,”
स्मित करंत वोलान्दने म्हटलं, “तो पाप नाही
करूं शकला. अबादोनाच्या6 कामांत कोणतीच चूक नसते.”
“मला त्याबाजूला
असायला नाही आवडणार, ज्याच्या विरुद्ध अबादोना आहे,” मार्गारीटा म्हणाली, “तो कुणाच्या बाजूला आहे?”
“जेवढं जास्त मी
तुमच्याशी बोलतोय,”
प्रेमाने वोलान्द म्हणाला, “तेवढांच मला
विश्वास होतोय, की तुम्हीं एक हुशार महिला आहांत. मी तुमच्या
प्रश्नाचं समाधान करेन. तो क्वचितंच निष्पक्ष वाटतो, आणि
दोन्हीं पीडित बाजूंबद्दल त्याला सहानुभूति आहे. म्हणून दोन्हीं बाजूंचे परिणाम
एकसारखेच असतांत. अबादोना!” वोलान्दने हळूंच म्हटलं, आनि
भिंतीतून काळा चष्मा लावलेला एक बारीक माणूस बाहेर आला. ह्या चष्म्याचा
मार्गारीटावर इतका दाट परिणाम झाला की ती एकदम किंचाळली आणि तिने वोलान्दच्या
पायांत आपला चेहरा लपवला.
“आह, पुरे,
पुरे,” वोलान्द ओरडला, “आजकालचे
लोक किती घाबरंट आहेत,” त्याने हळूच मार्गारीटाच्या पाठीवर
थोपटलं, ज्याने तिच्या शरीरांत झणझण झाली, “तुम्हीं बघितलंय ना, की त्याने चष्मा लावलाय. शिवाय,
आज पर्यंत असं कधीच झालं नाही, आणि होणारही
नाही, की अबादोना वेळेच्या आधी कुणासमोर प्रकंट झालाय. आणि,
मग, मी तर आहेच ना. तुम्हीं माझ्या पाहुण्या
आहांत! मी तर फक्त तुम्हांला दाखवंत होतो.”
अबादोना चुपचाप
उभा होता.
“असं शक्य आहे का, की
तो एका क्षणासाठी आपला चष्मा काढेल?” मार्गारीटाने वोलान्दला
बिलगंत विचारलं, पण आता ती उत्सुकतेने थरथरंत होती.
“हे शक्य नाही,” वोलान्दने गंभीरतेने म्हटलं आणि त्याने अबादोनाला हाताने खूण केली. तो
लुप्त झाला. “तुला काय म्हणायचंय अजाजेलो?”
“महाशय, मला
सांगण्याची परवानगी द्यावी, - इथे दोन बाहेरची माणसं आलीयेत
: एक सुन्दरी, जी खिदळंत विनंती करतेय की तिला तिच्या
मालकिणीजवळ असू द्यावं, आणि तिच्याबरोबर आहे, क्षमा करा, तिचं डुक्कर.”
“ह्या सुन्दर
बायासुद्धां विचित्रपणांच करतांत,” वोलान्दने शेरा मारला.
“ती नताशा आहे, नताशा,”
मार्गारीटा उद्गारली.
“ठीकाय, तिला
आपल्या मालकिणीजवळ असू दे, आणि डुकराला आचा-यांकडे घेऊन जा!”
“कापून टाकतील?” मार्गारीटाने घाबरून विचारलं. “दया करा, महोदय,
तो निकोलाय इवानोविच आहे, जो आमच्या खालच्या
मजल्यावरचा शेजारी आहे. इथे काही तरी गफ़लत झालीये, त्याच्यावर
क्रीम चोपडण्यांत आलं होतं...”
“शांत राहा,” वोलान्द म्हणाला, “कोण कापतंय त्याला? त्याला तिथेच आचा-यांबरोबर बसूं द्या, आणखी काही
नाही! तुम्हांला पण कळतंच असेल की मी त्याला नृत्योत्सवांत तर नाही बोलावूं शकंत!”
“ठीक आहे...”
अजाजेलो म्हणाला आणि त्याने पुढे सांगितलं, “अर्ध रात्र होत आलीये,
मालक.”
“ओह, ठीकाय,”
वोलान्द मार्गारीटाकडे वळला, “तर, मी तुम्हांला विनंती करतोय! आधीच तुमचे आभार मानतो! गोंधळून जाऊं नका आणि
कशालांच भिऊं नका. पाण्याशिवाय दुसरं काहीही पिऊं नका, नाहीतर
तुम्हीं अडखळू लागाल आणि तुम्हांला त्रास होईल. तर, जाऊं या!”
मार्गारीटा गालिच्यावरून
उठली आणि तेव्हांच दारांत प्रकट झाला करोव्येव.
********
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें