सतरा
एक भानगडींचा दिवस
शुक्रवारी सकाळी, म्हणजे त्या
दुर्दैवी ‘शो’च्या दुस-या दिवशी, वेराइटी थियेटरचे सगळे उपस्थित कर्मचारी – अकाउन्टेन्ट
वसीलि स्तेपानोविच लस्तोच्किन, दोन कैशियर्स, तीन टाइपिस्ट मुली, दोघी तिकिटं देणा-या, चपरासी, पडदा उघडणारे आणि
झाडू मारणारे – म्हणजे सगळेंच, जे उपस्थित होते आपल्या सीटच्या ऐवजी सादोवाया
रस्त्याकडे उघडण्या-या खिडक्यांच्या चौकटींवर बसून बघंत होते, की वेराइटीच्या
भिंतीपलीकडे काय चाललंय. वेराइटीच्या भिंतीच्याखाली हज्जारो लोकांची दोन ओळींची
रांग होती, जिचा दुसरा कोपरा दूर, कुठे तरी कुद्रिन्स्काया चौकावर संपंत होता. दोन्हीं
ओळींच्या सुरुवातीला मॉस्कोच्या थियेटर जगताचे कमीत कमी 20-25 प्रसिद्ध व्यक्ति
होते.
ह्या लांब ओळी ब-याच उत्तेजित वाटंत होत्या; येणा-या-जाणा-या लोकांचं लक्ष आपसूकंच तिथे होणा-या
वार्तालापाकडे आकर्षित होत होतं. ते सगळे कालच्या त्या जादूच्या अप्रतिम ‘शो’ बद्दल गरमागरम
चर्चा करंत होते. ह्याच गोष्टींनी अकाउन्टेन्ट वसीलि स्तेपानोविचसुद्धां घाबरला
होता. काल तो थियेटरमधे नव्हता. गेट-कीपर देव जाणे काय सांगंत होते...आणि हेपण की ‘शो’च्या नंतर काही
भद्र महिला अभद्र अवस्थेंत रस्त्यावर धावंत होत्या...आणि असंच काही तरी. लाजाळू
आणि शांत स्वभावाचा वसीलि स्तेपानोविच ह्या सगळ्या गोष्टी ऐकतांना फक्त डोळ्यांची
फडफड करंत होता, त्याला कळंत नव्हंत की काय केलं पाहिजे, पण काही न काही
करणं तर भागंच होतं नं, कारण ह्या वेळेस वेराइटीत उपस्थित असलेल्या
कर्मचा-यांमधे तोच एक वरिष्ट अधिकारी होता.
दहा वाजता-वाजता टिकिट घेण्या-यांची लाइन इतकी लाम्ब झाली की ह्याची माहिती
पोलिसला सुद्धां झाली; आश्चर्यजनक तत्परतेने पायदळ आणि अश्वारोही तुकड्या
तिथे पाठवण्यांत आल्या, ज्यांनी ह्या ओळींमधे थोडंफार अनुशासन ठेवलं. पण
जवळ-जवळ एक किलोमीटर लांब हा अनुशासित नाग काही कमी मनोरंजक नव्हता, ज्याने
सादोवायावर लोकांना चकित केलं होतं.
ही तर होती वेराइटीच्या बाहेरची परिस्थिति, पण आतलं वातावरणसुद्धां काही आनंदी नव्हतं. सकाळपासूनंच लिखादेयेव, रीम्स्की, कैश ऑफ़िस, टिकिट-खिडकी आणी वारेनूखाच्या कैबिन्समधे टेलिफोनच्या घंट्या वाजू
लागल्या. आधी तर वसीलि स्तेपानोविच आणि
टिकिट-विक्रेता मुलीने आणि गेटकीपर्सने टेलिफोनवर विचारंत असलेल्या प्रश्नांची
उत्तरं दिली, पण थोड्याच वेळाने
त्यांने तिकडे लक्षंच देणं बंद केलं;
कारण की
त्यांच्याजवळ ह्या प्रश्नांचे काही उत्तरंच नव्हते, की
लिखोदेयेव, वारेनूखा आणि रीम्स्की कुठे आहेत. पहिले
त्यांनी सांगितलं, की ‘लिखादेयेव आपल्या फ्लैटमधे आहे,’ पण
तिकडून उत्तर आलं की त्यांनी फ्लैटवर फोन केलेला आहे, तिथे त्यांना असं सांगण्यांत आलं, की
लिखादेयेव वेराइटीत आहे.
एका घाबरलेल्या महिलेने फोनवर मागणी केली, की तिला रीम्स्कीचा पत्ता सांगण्यांत यावा, जेव्हां तिला
सल्ला दिला, की तिने रीम्स्कीच्या पत्नीला फोन करावा, तर टेलिफोनचं रिसीवर हुंदके देतं म्हणालं, की तीच
रीम्स्कीची पत्नी आहे आणि तिच्या नव-याचा काही पत्तांच नाहीये. काहीतरी विचित्रंच घडू
लागलं. झाडू लावणा-या बाईनी सगळ्यांना सांगून टाकलं, की जेव्हां ती फिनडाइरेक्टरच्या कैबिनमधे साफ-सफाई
करायला गेली, तेव्हां तिने बघितलं की कैबिनचं दार सताड उघडं आहे, सगळे लाइट्स चालू
आहेत, बगिच्याकडे उघडणा-या खिडकीचा काच तुटलेला आहे, खुर्ची जमिनीवर पडलेली आहे आणि कैबिनमधे कुणीच नाहीये.
दहा वाजल्यानंतर मैडम रीम्स्काया तीरासारखी वेराइटीत घुसली. ती रडंत होती
आणि हात चोळंत होती. वसीलि स्तेपानोविच पूर्णपणे गडबडून गेला, त्याला समजंत
नव्हतं की तिला काय सल्ला द्यावा.
साडे दहा वाजता पोलिस आली. त्यांने पहिलाच तर्कसंगत प्रश्न विचारला, “नागरिकांनो हे
काय चाललंय? झालं काय आहे?”
घाबरलेल्या, विवर्ण झालेल्या वसीलि स्तेपानोविचला पुढे करून सगळे
मागे झाले. सगळं काही खरं खरं सांगावंच लागलं आणि स्वीकार करावं लागलं की
वेराइटीचे सगळे प्रशासनिक अधिकारी – डाइरेक्टर, फिनडाइरेक्टर आणि एडमिनिस्ट्रेटर माहीत नाही कुठे गायब
झालेयंत; कालच्या कार्यक्रमानंतर सूत्रधाराला मानसिक चिकित्सालयांत पाठवण्यांत आलंय
आणि हे, की कालचा ‘शो’ खूपंच लज्जास्पद होता.
हुंदके देत रडणा-या मैडम रीम्स्कीला जितकं शक्य होतं, तितकं समजावून
घरी पाठवलं आणि खूप उत्सुकतेने झाडू मारणा-या बाईला विचारण्यांत आलं, की तिने
फिनडाइरेक्टरच्या कैबिनला कोणच्या अवस्थेत पाहिलं होतं. सगळ्या कर्मचा-यांना
आपल्या-आपल्या जागेवर जाऊन काम करायला सांगितलं. थोड्याच वेळांत तीक्ष्ण कानांच्या, सुदृढ, सिगरेटच्या
राखेच्या रंगाच्या, तीक्ष्ण नजर असलेल्या कुत्र्याला घेऊन तपास करणारी टीम
आली. वेराइटीच्या कर्मचा-यांची कुजबुज सुरू झाली की हा कुत्रा कुणी साधारण कुत्रा
नसून सुप्रसिद्ध डिटेक्टिव कुत्रा तुज़्बुबेन आहे. खरं म्हणजे तो तोच होता.
त्याच्या हालचाली बघून लोक दंग झाले. फिनडाइरेक्टरच्या कैबिनमधे घुसल्याबरोबर
त्याने आपले तीक्ष्ण, पिवळे दात दाखवंत गुरगुरणं सुरूं केलं. मग तो पोटावर
लोळला आणि डोळ्यांत वेदना आणि रानटीपणाचा भाव आणून तुटलेल्या खिडकीजवळ सरकला.
आपल्या भीतिवर नियंत्रण ठेवंत त्याने खिडकीच्या चौकटीवर उडी मारली आणि आपलं
तीक्ष्ण मुस्कट वर करून रागाने आणि बेभानपणे किंचाळू लागला. तो खिडकीतून दूर
व्हायला तयार नव्हता, गुरगुरंत होता, थरथरंत होता आणि खाली उडी मारायच्या बेतात होता.
कुत्र्याला कैबिनमधून बाहेर आणून कॉरीडोरमधे सोडलं, जिथून तो प्रवेश
द्वारातून बाहेर निघून रस्त्यावर आला आणि आपल्या बरोबर धावंत असलेल्या
पोलिसवाल्यांना टैक्सी-स्टैण्ड पर्यंत घेऊन आला. इथे आल्यावर त्याच्या तपासाचा माग
हरवला. ह्याच्यानंतर तुज़्बुबेनला परंत नेण्यांत आलं. तपास-टीम वारेनूखाच्या
कैबिनमधे बसली. इथेंच त्यांनी वेराइटीच्या त्या सगळ्या कर्मचा-यांना एक-एक करून
बोलावलं, जे कालच्या ‘शो’ला उपस्थित होते. तपास-टीमला प्रत्येक पावलावर
अप्रत्याशित विघ्नांचा सामना करावा लागंत होता. तपासाचं काम घडी-घडी ठप्प होत
होतं.
“जाहिराती होत्या?”
होत्या तर खरं. पण रात्रीच्या रात्री त्यांच्यावर नवीन जाहिराती चिटकवल्या
होत्या आणि आतां काहीही करा, एक सुद्धां जाहिरात उपलब्ध नव्हती. जादुगार आला कुठून
होता? पण त्याला ओळखंत कोण होतं! त्याच्याशी काही अनुबंधतर केला असेल नं?
“केलाच असेल,” घाबरलेल्या वसीलि स्तेपानोविचने उत्तर दिलं.
“जर केला असेल तर तो अकाउन्टेन्टच्या विभागांतूनंच गेला असेल ना?”
“जायलांच हवा होता,” आणखी जास्त व्यथित होत वसीलि स्तेपानोविचने म्हटलं.
“मग तो कुठेय?”
“नाहीये,” अकाउन्टेन्टने हात हलवंत आणि जास्तंच विवर्ण होत उत्तर
दिलं. आणि खरंच, त्या अनुबंधाचा कुठेच पत्ता नव्हता; ना तर अकाउन्ट्स
डिपार्टमेन्टमधे, ना फिनडाइरेक्टरच्या कैबिनमधे, ना लिखोदेयेवकडे
आणि वारेनूखाच्या टेबलवर सुद्धां नाही.
ह्या जादुगाराचं नाव काय होतं? वसीलि स्तेपानोविचला माहीत नाही, तो कालच्या ‘शो’ला आलांच नव्हता.
गेट कीपर्सला माहीत नाही, टिकिट विक्रेताने डोक्यावर जोर दिला, विचार करू लागली, विचार करू लागली
आणि शेवटी म्हणाली, “वो...कदाचित, वोलान्द.”
पण, कदाचित वोलान्द नसेलही? कदाचित वोलान्द नसेल? कदाचित, फोलान्द असेल.”
विचारपूस केल्यावर कळलं की परदेशी टूरिस्ट-ब्यूरोमधे अश्या कोणत्याच
जादुगाराबद्दल काहीच माहिती नव्हती, ज्याचं नाव वोलान्द असेल किंवा फोलान्द असेल.
कुरियर-बॉय कार्पोवने सांगितलं की कदाचित हा जादुगार लिखोदेयेवच्या फ्लैटमधे
थांबला होता. लगेच सगळे लोक तिथे पोहोचले. तिथे कुणी जादुगार नव्हतांच. लिखोदेयेव
स्वतःसुद्धां नव्हता. मोलकरीण ग्रून्या नव्हती; आणि ती कुठे गायब झाली, ह्याबद्दल कोणीच काहीही सांगू शकलं नाहीं. हाउसिंग
सोसाइटीचा प्रेसिडेण्ट निकानोर इवानोविच नव्हता, प्रोलेझ्नेवसुद्धां नव्हता.
काही तरी विचित्रसं झालं होतं: सगळेच उच्च प्रशासनिक अधिकारी गायब झाले होते; काल एक
विचित्र-सा, लाजिरवाणा ‘शो’ झाला होता, आणि कोणी, कोणाच्या सांगण्यावरून त्याचं आयोजन केलं होतं – माहीत
नाही.
ह्याच गडबडींत दुपार झाली, जेव्हां तिकिट-खिडकी उघडणार होती. पण आता तो प्रश्नंच
नव्हता. वेराइटीच्या प्रवेश द्वारावर एक मोट्ठं नोटिस लावण्यांत आलं : “आजचा ‘शो’ रद्द करण्यांत
येत आहे.” बाहेर असलेल्या रांगेत असंतोष पसरला, पण काही वेळ बाचा-बाची केल्यावर ती रांग तुटूं लागली.
सुमारे तासभरानंतर सादोवायावर तिचा मागमूसदेखील उरला नाही. तपास-टीमसुद्धां कोण्या
दुस-या ठिकाण्यावर आपला तपास सुरूं ठेवायला निघून गेली. चौकीदारांशिवाय बाकी
सगळ्या कर्मचा-यांची सुट्टी करण्यांत आली. वेराइटीच गेट बंद करण्यांत आलं.
अकाउन्टेन्ट वसीलि स्तेपानोविचला लगेच दोन कामं करायचे होते. पहिलं हे, की
मनोरंजन-कमिटीत जाऊन कालच्या ‘शो’ बद्दल रिपोर्ट करायची होती; आणि दुसरं, कालच्या ‘शो’तून प्राप्त झालेली 21,711 रूबल्सची धनराशी कमिटीच्या फायनान्स सेक्शनमधे
जाऊन जमा करायची होती.
व्यवस्थित आणि आज्ञाकारी वसीलि स्तेपानोविचने वर्तमानपत्राच्या कागदांत
नोटांचे बण्डल गुंडाळले, त्यावर एक दोरी बांधली, त्याला बैगमधे ठेवलं आणि दिलेल्या निर्देशांनुसार बस
किंवा ट्रामच्या ऐवजी टैक्सी स्टैण्डवर गेला.
तिथे उभ्या असलेल्या तीन टैक्सी चालकांनी हातांत फुगलेली बैग घेऊन लवकर-लवकर
येणा-या प्रवाश्याला बघितलं, तिघंचे तिघं माहीत नाही कां, रागाने
त्याच्याकडे पाहंत आपल्या गाड्या घेऊन पसार झाले.
त्यांच्या ह्या वागणुकीमुळे स्तंभित होऊन अकाउन्टेन्ट बराच वेळ हा विचार
करंत पुतळ्यासारखा उभांच राहिला की ह्याच्या अर्थ काय असूं शकतो!
तीन मिनिटांने एक रिकामी टैक्सी येताना दिसली, चालकाने प्रवाश्याला बघून तोंड वाकडं केलं.
“टैक्सी रिकामी आहे कां?” आश्चर्याने खाकरंत वसीलि स्तेपानोविचने विचारलं.
“आधी पैसे दाखवं,” रागावलेल्या ड्राइवरने त्याच्याकडे न बघतांच म्हटलं.
वसीलि स्तेपानोविच आणखीनंच बुचकळ्यांत पडला आणि त्याने ती बहुमूल्य बैग
बगलेंत दाबून दहा रूबल्सचा एक नोट काढून ड्राइवरला दाखवला.
“नाही जाणार!” त्याने तुसडेपणाने उत्तर दिलं.
“माफ करा...” अकाउन्टेन्ट म्हणणार होता, पण ड्राइवरने त्याला मधेच टोकंत विचारलं, “तीन रूबल्सचे नोट
आहे?”
अकाउन्टेन्ट स्तब्ध झाला. त्याने तीन रूबल्सचे दोन नोट काढून ड्राइवरला
दाखवले.
“बसा,” तो ओरडला आणि त्याने मीटर इतक्या जो-याने फिरवलं, की ते तुटतां-तुटतां राहिलं, “चला!”
“चिल्लर नाहीये कां?” अकाउन्टेन्टने हळुवारपणे विचारलं.
“पूर्ण खिसा भरलाय चिल्लरने!” ड्राइवर गरजला आणि समोरच्या छोट्याश्या
आरश्यांत त्याचे रक्तासारखे लाल डोळे दिसले, “हे तिस-यांदा झालंय आज माझ्यासोबत. इतरांबरोबरसुद्धां
असंच झालं. कोण्या एका डुकराच्या पिल्लाने दहाची नोट दिली आणि मी त्याला चिल्लर
परंत दिली – साडे चार रूबल...उतरून गेला, बदमाश! पाच मिनिटांनी बघतो काय, की दहाच्या
नोटेऐवजी आहे, नरज़ानच्या बाटलीचं लेबल! ड्राइवरने काही न छापता
येण्यासारख्या शिव्या हासडल्या. दुस-यांदा झालं ज़ुब्रास्काच्या पुढे. दहाची नोट!
तीन रूबलची चिल्लर परंत केली. चालला गेला! मी आपल्या पर्समधे हात घातला -गप् - एक मधमाशी माझ्या बोटाला चावली! आणि दहाची नोट नाहीये!
ओ...ह!” ड्राइवरने पुन्हां काही न छापण्यासारख्या शिव्या दिल्या, “काल ह्या
वेराइटीमधे (असभ्य शब्द) कोण्या एका सरड्याच्या पिल्लाने दहाच्या नोटांचा जादू
दाखवला होता (असभ्य शिवी).”
अकाउन्टेन्टची वाचांच बंद झाली. त्याने काही कसमसंत असं दाखवलं, जणु तो
पहिल्यांदाच ‘वेराइटी’ हा शब्द ऐकतोय, आणि विचार करूं लागला : ‘तर अशी गोष्ट आहे, भोगा...’
आपल्या गंतव्यावर पोहोचल्यावर टैक्सी-ड्राइवरला व्यवस्थित पैसे देऊन
अकाउन्टेन्ट मनोरंजन कमिटीच्या बिल्डिंगमधे घुसला आणि कॉरीडोरमधून कमिटीच्या
प्रमुखाच्या ऑफिसकडे चालू लागला आणि त्याला लगेच जाणवलं की तो चुकीच्या वेळेवर
आलाय. मनोरंजन कमिटीच्या ऑफिसमधे भयानक गोंधळ माजला होता. अकाउन्टेन्टच्या जवळून
एक पत्रवाहक मुलगी धावंतच गेली, तिच्या डोक्यावरचा रूमाल सुटलेला होता आणि डोळे
विस्फारले होते.
“नाही, नाही, नाही, माय डियर्स!” माहीत नाही, कुणाकडे बघंत ती
ओरडली, “कोट आणि पैन्ट तर तीच आहे, पण कोटाच्या आत कुणीच नाहीये!”
ती धावंत जाऊन एका दारामागे लपली आणि तिच्या मागोमाग कप-बश्या फुटण्याचे
आवाज ऐकूं येऊं लागले. सेक्रेटरीच्या कैबिनमधून अकाउन्टेन्टचा परिचित, कमिटीच्या
पहिल्या सेक्टरचा प्रमुख वादळासारखा धावंत बाहेर आला, पण तो इतका घाबरलेला होता, की आपल्या अकाउन्टेन्ट मित्रालासुद्धां ओळखू नाही शकला, आणि तो पण
कुठेतरी लपून गेला.
ह्या सगळ्याला घाबरून अकाउन्टेन्ट सेक्रेटरीच्या कैबिनपर्यंत पोहोचला, जे
कमिटी-प्रमुखाच्या ऑफिसचे प्रवेश-कक्षंच होतं, इथे आल्यावर जणु त्याच्यावर वज्राघातंच झाला.
ऑफिसच्या बंद दरवाज्याच्या मागे आवाज गरजंत होता, हा आवाज निःसंदेह कमिटी-प्रमुख – म्हणजे प्रोखोर
पेत्रोविचचा होता. ‘कोणाला तरी रागावताहेत कां?”
घाबरलेल्या अकाउन्टेन्टने विचार केला, पण खोलींत वाकून
पाहिल्यावर वेगळंच दृश्य दिसलं: चामड्याच्या खुर्चीच्या पाठीला डोकं टेकवून, खूपंच विव्हळंत, हातांत ओला रुमाल
धरून खोलीच्या मध्यापर्यंत पाय पसरून प्रोखोर पेत्रोविचची सुंदर सेक्रेटरी आन्ना
रिचार्दोव्ना पडली होती.
आन्ना रिचार्दोव्नाच्या पूर्ण हनुवटीवर लिप्स्टिक पसरली होती, आणि पापण्यांवरून
गुलाबी कोमल गालांवर मस्कराच्या काळा धारा वाहत होत्या.
कोणालातरी आंत येताना पाहून आन्ना रिचार्दोव्नाने उडीच मारली, ती अकाउन्टेन्टचा
कोट पकडून त्याला बिलगली आणि किंचाळू लागली, “अरे देवा! कमीत कमी एक तरी बहाद्दर निघाला! सगळे पळून
गेले, सगळ्यांनी विश्वासघात केला! चल, चल, त्याच्याजवळ चलूं! मला समजंत नाहीये, की काय करायला
हवं!” आणि रडंट-रडंत ती अकाउन्टेन्टला खेचंत खोलीच्या आत घेऊन गेली.
खोलींत घुसल्याबरोबर अकाउन्टेन्टच्या हातातून बैग सुटून खाली पडली आणि
त्याचे विचार गड्ड-मड्ड झाले. आता हे तर सांगावंच लागेल की असं कां झालं.
एका मोट्ठ्या राइटिंग टेबलामागे, ज्याच्यावर एक भली मोट्ठी शाईची दौत ठेवलेली होती, रिकामा सूट बसला
होता आणि शाईत न बुडवतां, म्हणजेच कोरड्या पेन ने कागदावर काहीतरी लिहीत होता.
सूटच्या सोबत टायपण होता, कोटाच्या खिश्यातून बॉलपेन डोकावंत होता, पण कॉलरच्या वर
मानंच नव्हती, डोकंसुद्धां नव्हतं; तसंच कोटाच्या बाह्यांमधून मनगटपण दिसंत नव्हते. सूट
कामांत गुंतला होता आणि त्याचं चारीकडे चाललेल्या धुमाकूळाकडे बिल्कुल लक्ष
नव्हतं. कोणाच्यातरी येण्याची चाहूल लागतांच कोटाने खुर्चीत काही हालचाल केली आणि
कॉलरच्यावर अकाउन्टेन्टला परिचित असलेला प्रोखोर पेत्रोविचचा आवाज घुमला:
“काय झालंय? दारावर लिहिलंय न की आत्ता कोणालाच भेटू शकंत नाही!”
सुंदर सेक्रेटरीने एक हुंदका दिला आणि हात चोळंत ओरडली, “बघतांय नं? तो नाहीये!
नाहीये! त्याला परंत आणा, परंत आणा!”
आता दारांतून कुणी डोकावलं, ओरडलं आणि छूमंतर झालं. अकाउन्टेन्टला भास झाला की
त्याचे पाय थरथरताहेत आणि तो खुर्चीच्या कोप-यावर बसून गेला, पण तो आपली बैग
उचलायला नाही विसरला. आन्ना रिचार्दोव्ना अकाउन्नटेट अकाउन्टेन्टच्या आजूबाजूला
उड्या मारंत होती. ती त्याचा कोट धरून किंचाळली, “जेव्हां तो सैतानाची शप्पथ घ्यायचा, मी त्याला नेहमी
थांबवायची! आता स्वतःच सैतान झालाय!”
आता ती टेबलाजवळ धावली आणि आपल्या गोड सुरेल आवाजांत, जो रडण्यामुळे
किंचित जाड झाला होता, विचारायला लागली, “प्रोशा! तू कुठे आहेस?”
“कोण ‘प्रोशा’?” सूटने खुर्चीत आणखीनंच खचंत जो-याने विचारलं.
“नाही ओळखंत! मला नाही ओळखंत! तुम्हांला कळतंय?”
सेक्रेटरी रडू लागली.
“कृपा करून ऑफिसमधे रडू नका,” सूट आता चिडला होता. त्याने ठराव लिहिण्यासाठी
बाह्यांनी को-या कागदांचा गट्ठा आपल्याकडे ओढला.
“नाही, नाही बघवंत मला हे सगळं!” असं म्हणून आन्ना
रिचार्दोव्ना रडतंच सेक्रेटरीच्या कैबिनकडे पळाली, तिच्या मागे अकाउन्टेन्टसुद्धां बंदुकीतून सुटलेल्या
गोळीसारखा धावला.
“कल्पना करा, मी बसलेय,” उद्विग्न आन्ना रिचार्दोव्ना अकाउन्टेन्टचा हात धरून
सांगू लागली, “आणि खोलीत आला एक बोका – काळा, हृष्ट-पुष्ट, जणु बोका नसून
हिप्पोपोटेमस होता तो. मी त्याला ‘शुक् शुक्!’ केलं. तो बाहेर पळून गेला, मग खोलीत घुसला बोक्यासारख्या चेह-याचा एक लट्ठ माणूस
आणि म्हणाला, “तर, मैडम, तुम्हीं पाहुण्यांना ‘शुक् शुक्!’ म्हणता?” तो निर्लज्ज सरळ प्रोखोर पेत्रोविचकडे धावला. मी ओरडंत
होते: “वेड लागलंय कां?” आणि तो दुष्ट सरंळ खोलीत घुसून प्रोखोर पेत्रोविचच्या
समोरच्या खुर्चीत बसून गेला. आणि तो...सहृदय माणूस आहे, पण लवकर घाबरून जातो, तो भडकला! मी वाद नाही घालणार. बैलासारखा काम करणारा, लवकर चिडणारा, भडकला : “तुम्हीं
असे कसे सूचना न देता आत घुसले?” आणि तो धीट माणूस निलाजरेपणाने हसंत खुर्चीत जमून बसला
आणि म्हणाला, “मी कामाबद्दल बोलायला आलोय.” प्रोखोर पेत्रोविच रागाने
म्हणाला, “मी व्यस्त आहे!” आणि कल्पना करा – तो म्हणाला,
“तुम्हीं जराही व्यस्त नाहीये...” आँ? प्रोखोर
पेत्रोविचची सहनशक्ती संपली आणि तो ओरडला,
“ही काय कटकट आहे? ह्याला इथून घेऊन जा, आह, जर मला सैतानानंच नेलं असतं तर किती छान झालं असतं!”
आणि तो, कल्पना करा, हसून म्हणाला,
“सैतानाने नेलं असतं? हे तर होऊ शकतं!” आणि एकदम ‘झन्’ झालं, मी ओरडूपण नाही
शकले, बघते काय : तो नाहीये...तो...बोक्यासारख्या माणूस आणि हा...सूट इथे
बसलाय...हें...हें....हें!!!” आन्ना रिचार्दोव्नाचे ओठ, दात सगळे गड्ड मड्ड झाले आणि ती भें S S S करंत रडू लागली.
हुंदके थांबवून
तिने श्वास घेतला,
पण आणखीनंच काही अकल्पनीय बडबडू लागली:
“आणि लिहितोय, लिहितोय,
लिहितोच आहे! पागल होऊन जाईन! टेलिफोनवर गोष्टी करतोय! सूट! सगळे
पळून गेले, सश्यांसारखे!”
अकाउन्टेन्ट
नुसता उभा होता आणि थरथरंत होता. पण शेवटी भाग्यानेच त्याला ह्यातून सोडवलं.
सेक्रेटरीच्या कैबिनमधे शांतपणे, व्यस्त भावाने पोलिस घुसले...दोन
पोलिस वाले. त्यांना बघून सेक्रेटरी आणखीनंच जो-याने रडू लागली. ती रडंत होती आणि
प्रमुखाच्या ऑफिसकडे हात दाखवंत होती.
“रडायचं नसतं, नागरिक,
रडू नका,” पहिला पोलिसवाला शांतपणे म्हणाला.
अकाउन्टेन्टला समजलं, की त्याची इथे काही गरज नाहीये आणि तो
खोलीच्या बाहेर सटकला, एका मिनिटानंतर तो मोकळ्या हवेंत
श्वास घेत होता. त्याच्या डोक्यांत झण्-झण् होत होती. ह्या झणझणाटांत गेट कीपरने
बोक्याबद्दल सांगितलेल्या गोष्टी तरंगंत होत्या, ज्याने
कालच्या ‘शो’मधे भाग घेतला होता. ‘ओ...हो...हो! कुठे तो आमचांच बोका तर नव्हता?’
जेव्हां
कमिटीच्या ऑफिसमधे काम नाही झालं, तेव्हां सभ्य वसीलि स्तेपानोविचने
तिच्या दुस-या शाखेंत जायचा विचार केला, जी वगान्स्कोव्स्की चौरस्त्यावर
होती. स्वतःला काहीसं संयत करण्याच्या दृष्टीने तो पायीच तिथपर्यंत गेला.
मनोरंजन कमिटीची
ही शहरातली शाखा रस्त्यापासून आत असलेल्या एका जुन्या, पापुद्रे
निघंत असलेल्या महालांत होती, जो आपल्या वेस्टीब्यूल मधल्या लाल
ग्रेनाइटच्या स्तंभांसाठी प्रसिद्ध होता.
पण आज आगंतुक
स्तंभांमुळे नाही,
पण त्यांच्या खाली होत असलेल्या गडबडीने हैराण होत होते. काही
आगंतुक टेबलाच्या मागे बसलेल्या एका महिलेजवळ उभे होते, जी
एका टेबलावर काही मनोरंजक साहित्य ठेवून विकंत होती. ह्या क्षणी ती दर्शकांना
काहीच दाखवंत नव्हती आणि नुसती रडंत होती. आगंतुकांच्या प्रश्नांना नुसते हात
हालवून उत्तर देत होती; आणि त्याच वेळेस वरती, खाली, कोप-यांतून, सगळ्याच
विभागांत जवळ-जवळ वीस टेलिफोन्स वाजंत होते.
थोडंसं रडून, ती
महिला एकदम थरथरली आणि उन्मादाने किंचाळली, “पुन्हां तेच!”
आणि ती थरथरत्या आवाजांत तार सप्तकांत गाऊ लागली:
सुन्दर
सागर पवित्र बायकाल...1
पाय-यांवरून खाली
उतरंत असलेला पत्रवाहक न जाणे कुणाला मुक्के दाखवंत ह्या महिलेबरोबर जाड्या, कुंद
आवाजांत गाऊ लागला:
सुंदर
जहाज बैरेल सिस्कोची!...2
ह्या दोन
आवाजांमधे आणखी आवाजही मिसळूं लागले. हळू हळू हे समूहगान सम्पूर्ण इमारतीत घुमूं
लागलं. जवळच्याच रूम नंबर 6 मधे, जिथे अकाउन्ट्स-कन्ट्रोलर सेक्शन
होतं, कोणाचातरी जाड, भसाडा आवाज
वेगळांच ऐकूं येत होता. टेलिफोनच्या घंट्या जणु ह्या कोरसला पार्श्व संगीत देत
होत्या.
हेय्, बार्गुज़िन3...खेळ
लाटांशी!...
पत्रवाहक पाय-यांवर गरजला.
मुलीच्या
चेह-यावर अश्रू ओघळले, तिने दात मिटण्याचा प्रयत्न केला, पण तिचं तोंड आपणहूनंच उघडलं आणि ती सगळ्यांत उंच स्वरांत गाऊ लागली.
जर, तरुण
असता जवळपास!
चुपचाप असलेल्या आगंतुकांना ह्या गोष्टीचं
आश्चर्य होत होतं,
की वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेले असूनसुद्धा सगळेच कर्मचारी अश्या
प्रकारे गात होते, जणु ते एका समूहांत उभे आहेत आणि सगळेंच
कोणच्यातरी अदृश्य निर्देशकाकडे बघंत गात होते – जसे त्याच्या निर्देशांच पालन
करताहेत.
वगान्स्कोव्स्की
चौरस्त्यावरून जाणारे लोक त्या बिल्डिंगच्या प्रवेश द्वाराजवळ थबकायचे आणि तिथल्या
प्रसन्न आणि उल्लसित वातावरणावर आश्चर्य करंत निघून जायचे.
पहिलं पद
संपल्यावर गाणं अचानक थांबलं, जणु निर्देशकाच्या छडीने त्यांना
एकदम थांबवलं असावं. पत्रवाहक बडबडला आणि माहीत नाही कुठे लपून गेला. तेवढ्यांत
प्रवेश द्वार उघडलं आणि त्यांतून समर-कोट घातलेला, ज्याच्या
खालून पांढ-या गाउनचे कोपरे दिसंत होते, एक व्यक्ति प्रकट
झाला, त्याच्याबरोबर आला पोलिसवाला.
“काही तरी करा, डॉकटर,
विनंती करते...” मुलगी उन्मादाने ओरडली.
मनोरंजन
कमिटीच्या शाखेचा सेक्रेटरी धावंत पाय-यांवर आला आणि स्पष्ट दिसंत होतं, की
तो अपमान आणि लाजेने लाल होत अडखळंत बोलूं लागला:
“बघताय न डॉक्टर, कदाचित
ही सामूहिक सम्मोहनाची घटना आहे...म्हणॉओन, आवश्यक आहे...”
तो आपलं वाक्य पूर्णसुद्धां करू शकला नाही, की त्याच्या
शब्दांनी घात केला आणि तो अचानक गाऊ लागला:
शील्का
आणि नेरचिन्स्क4...
“मूर्ख!” मुलगी
ओरडली तर खरं,
पण हे नाही कळलं की ती कोणावर राग काढतेय, आणि
पुढे काही म्हणायच्या ऐवजी ती सुद्धां एक उंच तान घेऊन शील्का आणि नेरचिन्स्कची
प्रशंसा करंत गाऊ लागली.
“स्वतःवर ताबा
ठेवा! गाण बंद करा!” डॉक्टर सेक्रेटरीकडे वळला.
स्पष्ट होतं, की
सेक्रेटरी स्वतःसुद्धा हे गाण थांबवण्यासाठी कोणतीही किंमत मोजायला तयार होता,
पण गाण थांबवण्याच्या ऐवजी तो स्वतःपण जोरजोराने गात राहिला आणि
ह्या समूहगानाबरोबर त्या चौरस्त्यावरून जाणा-या-येणा-यांना सांगत होता, की रानांत कोणत्याही श्वापदाने त्याच्यावर हल्ला नाही केला आणि शिका-यांची
गोळी त्याला स्पर्श नाही करूं शकली!
हे पद संपल्याबरोबर
डॉक्टरने मुलीच्या तोंडांत औषधाचे काही थेंब टाकले आणि मग तो सेक्रेटरी आणि इतर
कर्मचा-यांना औषध पाजण्यासाठी धावला.
“माफ करा, मैडम,”
वसीलि स्तेपानोविचने अचानक मुलीला विचारलं, “तुमच्या
इथे काळा बोका तर नव्हता आला?”
“कुठला बोका? कसला
बोका?” रागांत मुलगी ओरडली, “गाढव
बसलाय आमच्या ऑफ़िसमधे, गाढव!” आणि पुढे म्हणाली, “ऐकतोय, तर ऐकू दे! मी सगळं सांगून टाकेन.” आणि तिने
खरंच सगळं सांगून टाकलं.
झालं असं होतं, की
मनोरंजन-कमिटीच्या ह्या शाखेच्या प्रमुखाला, ज्याने
“हॉबी-क्लासेस”चा सत्यानाश करून टाकला होता (मुलीच्या शब्दांत) वेगवेगळ्या मनोरंजक
कार्यक्रमांशी संबंधित क्लब्स बनवायचा शौक चढला.
“प्रशासनाच्या
डोळ्यांत धूळ झोकली!” मुलगी गरजली.
ह्या वर्षांत
त्याने लेरमन्तोव5-अध्ययन क्लब, बुद्धिबळ, तलवार, पिंग-पाँग आणि घोडेस्वारी शिकण्यासाठी क्लब्स
बनवले. उन्हांळा येता-येता पर्वतारोहण आणि नौकाचालनाचेही क्लब्स बनवण्याची धमकी
दिली.
“आणि आज, लंच-टाइम
मधे तो आत आला, आणि आपल्याबरोबर एका घाणेरड्या माणसाला हात
धरून आणलं,” मुलगी सांगंत होती, “माहीत
नाही तो कुठून आला होता – चौकड्याची पैन्ट घातलेला, तुटका
चश्मा, आणि... थोबाड असं की त्याचं वर्णनंच करूं शकंत नाही!”
आणि ह्या आगंतुकाची, मुलीच्या
म्हणण्याप्रमाणे, लंच करंत असलेल्या सगळ्या कर्मचा-यांशी असं
सांगून ओळख दिली की तो कोरस आयोजित करण्याच्या कलेचा विशेषज्ञ आहे.
संभावित
पर्वतारोहणाच्या चाहत्यांचे चेहरे पडले, पण प्रमुखाने लगेच सर्वांची
समजूत घातली. तो विशेषज्ञ विनोद करंत होता, हसंत होता आणि
शपथेवर सांगंत होता की कोरससाठी खूपंच कमी वेळ लागतो, आणि
त्याचे फायदे खूप आहेत.
मुलीच्या
सांगण्याप्रमाणे सगळ्यांत आधी उड्या मारल्या ह्या ऑफिसचे सगळ्यांत मोट्ठे ‘चमचे’,
फानोव आणि कसार्चुकने,
हे सांगून की ते सगळ्यांत
आधी आपलं नाव देताहेत. आता बाकीच्या लोकांना कळून चुकलं की ह्या क्लबला थांबवणं
कठीण आहे, म्हणून सगळ्यांने आपले-आपले नाव दिले. हे ठरवलं की
गाण्याची प्रैक्टिस दुपारी लंच-टाइममधे होईल, कारण बाकीचा
सगळा वेळ लेरमन्तोव आणि तलवारींसाठी ठेवलेला होता. प्रमुखाने हे दाखवण्यासाठी की
त्यालासुद्धा स्वरांच ज्ञान आहे, गायला सुरुवात केली आणि
पुढे सगळं जणु स्वप्नांतच घडलं, चौकटीवाला विशेषज्ञ गरजला:
“सा-रे-ग-म!”
गाण्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी अलमा-यांच्या मागे लपलेल्या लोकांना खेचून-खेचून
बाहेर काढलं. त्याने कसार्चुकला सांगितलं की त्याची स्वराची पकडं छान आहे; दात
दाखवंत सगळ्यांना म्हाता-या संगीतज्ञाचा आदर करायला सांगितलं, मग बोटांवर ट्यूनिंग-फोर्कने खट्-खट् करंत वायलिन वादकाला ‘सुंन्दर सागर’ वाजवायला सांगितलं.
वायलिन झंकारलं, सगळेच
वाद्य वाजू लागले...खूप सुरेखपणे. चौकटीवाला खरोखरंच आपल्या कलेंत निष्णात होता.
पहिले कडवे पूर्ण झाले. तेव्हां तो विशेषज्ञ एका मिनिटासाठी क्षमा मागून जो
गेला...तो गायबंच झाला. सगळ्यांना वाटलं, की तो खरंच एका
मिनिटाने परंत येईल. पण दहा मिनिटं झाली तरी तो परंत नाही आला. सगळे खूश झाले,
की तो पळून गेला.
आणि अचानक
सगळ्यांनी दुसरे कडवे गायला सुरुवात केली. कसार्चुक, ज्याला जरासुद्धा स्वरांच
ज्ञान नव्हतं, पण ज्याचा आवाज खूप उंच होता, सगळ्यांच नेतृत्व करंत होता. गाणं पूर्ण झालं.
विशेषज्ञाचा पत्ताच नव्हता! सगळे आपापल्या जागेवर आले, पण
कोणीही बसू शकलं नाही, कारण सगळेंच आपल्या इच्छेविरुद्ध
गातंच राहिले. थांबणं शक्यंच नव्हतं! तीन
मिनिट चूप राहायचे, पुन्हा गाऊ लागायचे! चूप राहायचे – गाऊ
लागायचे! तेव्हां सगळ्यांना समजलं की काहीतरी गडबड झालीये. ऑफिसचा प्रमुख तोंड
लपवून आपल्या खोलींत लपून बसला.
मुलीची गोष्ट
पूर्ण झाली. औषधाचा तिच्यावर काहीही परिणाम झालेला नव्हता.
जवळ जवळ पंधरा
मिनिटांने वगान्स्कोव्स्की चौकांत तीन ट्रक्स आले, त्यांत प्रमुखासह ऑफिसच्या
सगळ्या कर्मचा-यांना कोंबण्यांत आलं.
जसांच पहिला ट्रक
निघायच्या तयारीत होता, आणि तो ऑफिसच्या कम्पाउण्डमधून बाहेर निघून
चौकांत आला, सगळ्यांच
कर्मचा-यांनी, जे एक दुस-याच्या खांद्यावर हात ठेवून उभे
होते, आपापले तोंड उघडले आणि सम्पूर्ण चौकांत ते लोकप्रिय
गाण घुमूं लागलं. दुस-या ट्रकने ह्याला साथ दिली आणि तिस-याने पण. तसेच जात
राहिले. रस्त्यावरून जाणारे लोक ह्या ट्रक्सवर नजर टाकायचे आणि निघून जायचे. त्यांना
वाटलं, की ही कदाचित एखादी पिकनिक पार्टी आहे, जी शहराच्या बाहेर जातेय. खरं म्हणजे ते शहराच्या बाहेरंच जात होते,
पण पिकनिकवर जात नसून प्रोफेसर स्त्राविन्स्कीच्या मनोरुग्णालयांत.
अर्ध्या तासानंतर
पूर्णपणे मतिहीन अकाउन्टेन्ट मनोरंजन ऑफिसच्या वित्तीय शाखेत पोहोचला, ह्या
आशेने की सरकारी रकमेपासून त्याला मुक्ति मिळेल.
आधीच्या
अनुभवावरून बरंच काही शिकून अत्यंत सतर्कतेने त्याने त्या लांबोळ्या हॉलमधे
डोकावून पाहिलं,
जिथे सोनेरी अक्षर असलेल्या मातकट काचांच्यामागे कर्मचारी बसले
होते. इथे अकाउन्टेन्टला कोणत्याही प्रकारच्या गडबडीचे लक्षण नाही दिसले.
एका अनुशासित
ऑफिससारखंच वातावरण होतं.
वसीलि
स्तेपानोविचने त्या खिडकींत डोकं घुसवलं, जिच्यावर लिहिलं होतं ‘धनराशी जमा करा’, आणि तिथे बसलेल्या अपरिचित
कर्मचा-याचं अभिवादन करून त्याने पैसे जमा करण्याचा फॉर्म मागितला.
“तुम्हांला कां
पाहिजे?”
खिडकीवाल्या कर्मचा-याने विचारलं.
अकाउन्टेन्ट
गोंधळला.
“मला रक्कम जमा
करायचीय,
मी वेराइटीतून आलोय.”
“एक मिनिट,” कर्मचा-याने उत्तर दिलं आणि लगेच जाळीने खिडकींत असलेलं भोक बंद करून
टाकलं.
“कमाल आहे!”
अकाउन्टेन्टने विचार केला. त्याला आश्चर्य वाटणं स्वाभाविकंच होतं. जीवनांत
पहिल्यांदाच त्याचा समोर अशी परिस्थिती उद्भवली होती. सगळ्यांनाच माहितीये कि पैसे
घेणं किती कठीण आहे: हज्जार विघ्न येऊं शकतात.
शेवटी जाळी
उघडली. आणि अकाउन्टेन्ट खिडकीकडे बघूं लागला.
“तुमच्याकडे काय
खूप मोठी रकम आहे?”
कर्मचा-याने विचारलं.
“एकवीस हजार
सातशे अकरा रूबल्स.”
“ओहो!” कर्मचारी
न जाणे कां उपहासाने म्हणाला आणि त्याने अकाउन्टेन्टकडे हिरवा फॉर्म सरकावला.
अकाउन्टेन्टला हा फॉर्म चांगलाच माहीत होता. त्याने लवकरंच तो भरला आणि बैगेंत
ठेवलेल्या पैकेटची दोरी सोडू लागला. जेव्हां त्याने पैकेट उघडलं, त्याक्षणीच
त्याच्या डोळ्यांसमोर पूर्ण खोली गरगर फिरू लागली. त्याची तब्येत बिघडली. तो
पीडेने बरळूं लागला.
त्याच्यासमोर
परदेशी नोट फडकंत होते, ह्यांत होते : कैनेडियन डॉलर्स, ब्रिटिश पौण्ड्स, हॉलैण्दचे गुल्देन, लात्वियाचे लाट्स, एस्तोनियाचे क्रोन...
“हा तोच आहे, वेराइटीच्या
शैतानांपैकी एक” – मूक झालेल्या अकाउन्टेन्टच्या डोक्यावर जाडा-भसाडा आवाज घुमला.
आणि वसीलि स्तेपानोविचला त्याचक्षणी अटक झाली.
********
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें