अठरा
दुर्दैवी पाहुणे
अगदी
त्याच वेळेस,
जेव्हा मेहनती अकाउन्टेन्ट टैक्सीने निघून लिहिणा-या सूटशी जाऊन
भिडणार होता, कीएवहून मॉस्कोला येणा-या ट्रेनच्या आरामशीर,
स्लीपर कोच नम्बर 9 मधून अन्य प्रवाश्यांबरोबर हातांत एक लहानशी
फाइबरची सूटकेस घेऊन मॉस्को स्टेशनवर एक सज्जन प्रवासी उतरला. हा प्रवासी दुसरा-तिसरा
कुणी नसून स्वर्गवासी बेर्लिओज़चा मामा, कीएवच्या भूतपूर्व
इन्स्टीट्यूट रोडवर राहणारा अर्थशास्त्री-नियोजक, मैक्समिलियन
अन्द्रेयेविच पप्लाव्स्की होता. मैक्समिलियन अन्द्रेयेविचच्या मॉस्कोला येण्याचं
कारण तो टेलिग्राम होता, जो त्याला परवा संध्याकाळी मिळाला
होता आणि ज्याच्यांत लिहिलं होतं:
“मला
आत्ता-इतक्यांतच ट्रामगाडीने चिरडलंय पत्रियार्शी जवळ. अंतिम संस्कार शुक्रवारी
दुपारी तीन वाजता येऊन जा – बेर्लिओज़”
मैक्समिलियन
कीएवच्या हुशार लोकांपैकी एक समजला जायचा, आणि तो खरोखरंच हुशार होता.
पण अत्यन्त हुशार माणूसपण हा टेलिग्राम वाचून बुचकळ्यांतच पडेल. जर एखादा माणूस
स्वतःच तार पाठवतोय, की त्याला ट्रामगाडीने चिरडलंय, तर ह्याचा अर्थ असा झाला की तो जीवन्त आहे. पण मग अंतिम संस्कार कशाला?
किंवा त्याची परिस्थिति इतकी खराब आहे, की
त्याला आपल्या मृत्युची पूर्व सूचना मिळाली आहे? हे शक्य आहे,
पण वेळेबद्दलची माहिती विचित्र आहे : त्याला कसं कळलं की त्याचा
अंतिम संस्कार शुक्रवारी दुपारी तीन वाजता करण्यांत येणारे? फार
विचित्र टेलिग्राम आहे!
पण हुशार
माणसांना अश्यासाठीच हुशार म्हणतांत, की ते गुंतागुंतीच्या
परिस्थितीलासुद्धा सोडवतांत. अगदी सोपंय. चूक झालेली आहे आणि त्यामुळे अर्थ
बदललाय. हा शब्द ‘मला’ बेर्लिओज़च्या
जागेवर कोणच्यातरी दुस-या टेलिग्राममधून आलेला आहे, जो ह्या
वाक्याच्या शेवटी ‘बेर्लिओज़’ झालेला
आहे. अश्या प्रकारे वाचल्याने टेलिग्रामचा निरोप स्पष्ट होत होता, पण तो दुर्दैवी होता.
बायकोला
स्तब्ध करणा-या दुःखाची तीव्रता किंचित कमी झाल्यावर मैक्समिलियन अन्द्रेयेविच
लगेच मॉस्कोला जाण्याची तयारी करूं लागला.
मैक्समिलियन
अन्द्रेयेविचचं एक गुपित सांगावंच लागेल. ह्यांत काही शंकाच नाही, की
त्याला आपल्या बायकोच्या ह्या भाच्याच्या असमय आणि अचानक मृत्यूचं खूप दुःख झालं
होतं. पण एक व्यावहारिक व्यक्ति असल्यामुळे त्याला कळंत होतं, की अंतिम संस्कारांत त्याचं हजर राहणं आवश्यक नव्हतं. तरीसुद्धा
मैक्समिलियन अन्द्रेयेविचला लवकरंच मॉस्कोला पोहोचायचं होतं. कारण काय होतं?
कारण एकंच होतं – फ्लैट! मॉस्कोत फ्लैट? ही
अत्यंत महत्वाची गोष्ट होती. माहीत नाही कां मैक्समिलियन अन्नद्रेयेविचला कीएव
आवडंत नव्हतं1 आणि मॉस्कोला जाऊन राहण्याचा विचार त्याला काही
दिवसांपासून इतका सतावंत होता, की त्याची रात्रीची झोप उडाली
होती. आता त्याला वसन्त ऋतूत द्नेप्रला येत असलेला पूर उल्हासित करंत नव्हता,
जेव्हां खालच्या बेटांना बुडवंत ती क्षितिजाशी एकरूप होऊन जायची.
आता त्याला प्रिन्स व्लादीमिरच्या स्मारकापासून सुरू होणारं प्राकृतिक दृश्य बघून
आनंद होत नव्हता. व्लादीमिर पहाडावर जाणा-या विटांच्या
रस्त्यावर वसन्त ऋतूत नाचणारे उन्हाचे ठिपके बघून तो खूश नव्हता होत. ह्या
सगळ्याचा त्याला कंटाळ आला होता, त्याला फक्त एकंच गोष्ट हवी
होती – मॉस्कोला स्थित्यंतर करणं.
त्याने
इन्स्टीट्यूट रोडच्या आपल्या फ्लैटला मॉस्कोच्या एखाद्या छोट्या फ्लैटशी
बदलण्यासाठी वर्तमान पत्रांत जाहिराती दिल्या, पण काही परिणाम नाही झाला.
असल्या प्रस्तावासाठी कोणीही तयार नव्हतं आणि समजा चुकून कुणी भेटला, तरी त्याची मागणी खूपंच विचित्र असायची.
ह्या टेलिग्रामने
मैक्समिलियन अन्द्रेयेविचला चकितंच केलं. हा तो क्षण होता, ज्याला
गमावणं अक्षम्य ठरलं असतं. व्यावहारिक लोकांना कळतं की असे अवसर घडी-घडी येत
नसतात.
थोडक्यांत म्हणजे, कोणत्याही
भानगडीशिवाय मॉस्कोच्या भाच्याचा सादोवाया स्ट्रीटवर असलेला फ्लैट वारसाहक्काने
मिळवतां येणार होता. हो, हे गुंतागुंतीचं होतं, फारंच गुंतागुंतीचं, पण कसंही करून हा गुंता
सोडवायचांच होता. अनुभवी मैक्समिलियन अन्द्रेयेविचला माहीत होतं, की ह्या दिशेने पहिलं आणि अनिवार्य पाऊल होतं : लवकरांत लवकर, कसंही करून, मृत भाच्याच्या तीन खोल्यांच्या
फ्लैटमधे जाऊन थांबणं आणि तिथे आपलं नाव नोंदवणं, भले ही
थोड्याच काळासाठी कां नसो.
शुक्रवारी दुपारी
मैक्समिलियन अन्द्रेयेविच सादोवायाच्या बिल्डिंग नंबर 302च्या त्या खोलीत शिरला, जिथे
हाउसिंग कमिटीचं ऑफिस होतं.
एका चिंचोळ्या
खोलींत,
जिच्या भिंतीवर नदींत बुडालेल्या व्यक्तींना कसं पुनर्जीवित करता
येईल, हे चित्रांच्या माध्यमाने दाखवणारा एक जुना चार्ट
लटकंत होता – लाकडी टेबलामागे उत्तेजित डोळ्यांने इकडे-तिकडे
बघंत असलेला, दाढी वाढवलेला, मध्यम
वयाचा एक माणूस अगदी एकटा बसला होता.
“मी कमिटीच्या
प्रमुखाला भेटू शकतो कां?” अर्थशास्त्री-नियोजकाने आपली
सूटकेस जवळच्याच खुर्चीवर ठेवून, हैट काढंत अत्यंत सभ्यतेने
विचारलं.
असं वाटलं, की
ह्या साधारण प्रश्नाने त्या माणसाला खूप उद्विग्न केलंय. त्याचा चेहरा विवर्ण
झाला. उत्तेजनेने डोळ्यांच्या कोप-यांतून इकडे-तिकडे बघंत तो पुटपुटला की प्रमुख
नाहीये.
“तो काय आपल्या फ्लैटमधे आहे?” पप्लाव्स्कीने विचारलं, “मला जरूरी काम आहे.”
“तो काय आपल्या फ्लैटमधे आहे?” पप्लाव्स्कीने विचारलं, “मला जरूरी काम आहे.”
बसलेल्या माणसाने
पुन्हां विसंगत उत्तर दिलं. पण तरीही हे कळंत होतं, की प्रमुख आपल्या घरी
नाहीये.
“केव्हां येणार आहे?”
ह्या प्रश्नाचं
त्या बसलेल्या माणसाने काहींच उत्तर नाही दिलं आणि डोळ्यांत दुःखाचा भाव आणंत तो
खिडकीच्या बाहेर पाहूं लागला.
“ओ हो!” चतुर
असलेल्या पप्लाव्स्कीने स्वतःशीच म्हटलं आणि तो सेक्रेटरीबद्दल विचारूं लागला.
मानसिक तणावामुले
त्या माणसाचा चेहरा लाल झाला. त्याने पुन्हां मरतुकड्या आवाजांत सांगितलं, की
सेक्रेटरी सुद्धा नाही...सेक्रेटरी आजारी आहे...”
“ओह हो!”
पप्लाव्स्कीने पुन्हां स्वतःशीच म्हटलं आणि विचारलं, “पण कमिटीत कोणी तरी असेलंच
ना?”
“ मी आहे,” अशक्त आवाजांत त्या माणसाने म्हटलं.
“बघा,” पप्लाव्स्कीने जोर देत म्हटलं, “मी आपल्या भाच्याचा,
मृत बेर्लिओज़चा, एकुलता एक वारस आहे. जसं
तुम्हाला माहीत आहे, तो पत्रियार्शीजवळ मरून गेला, आणि नियमांप्रमाणे मला त्याच्या फ्लैट, जो तुमच्या
ह्या बिल्डिंगमधे 50 नंबरवर आहे, वारसाहक्काने मिळायला
पाहिजे...”
“मला काहीच माहीत
नाही,
मित्रा,” त्याला मधेच टोकंत तो माणूस अत्यंत
वेदनेने म्हणाला.
“पण, माफ
करा,” खणखणीत आवाजांत पप्लाव्स्की म्हणाला, “तुम्ही हाउसिंग कमिटीचे सदस्य आहांत, आणि तुमचं
कर्तव्य...”
तेवढ्यांत खोलीत
एक माणूस घुसला. त्याला बघतांच टेबलाच्या मागे बसलेल्या माणसाच्या चेहरा फिक्का
पडला.
“तुम्ही कमिटीचे
सदस्य पित्नाझ्को आहांत?’
“हो,” मुश्किलीने ऐकू आलं.
येणा-याने त्या
माणसाच्या कानांत काहीतरी सांगितलं, ज्याने तो घाबरून खुर्चीवरून उठला
आणि काहीच क्षणांत त्या रिकाम्या खोलीत पप्लाव्स्की एकटाच उरला.
‘ओह,
काय कटकट आहे! हे जरूरी होतं का, की ते
सगळेच्या सगळे एकदमंच...,’ पप्लाव्स्की निराश होऊन विचार करू
लागला आणि तो सिमेन्टचं अंगण पार करून फ्लैट नं. 50कडे धावला.
अर्थशास्त्री-नियोजकाने
घण्टी वाजवल्याबरोबर दार उघडलं आणी मैक्समिलियन अन्द्रेयेविच अंधा-या
प्रवेश-कक्षांत घुसला. त्याला ह्या गोष्टीचं आश्चर्य वाटलं की दार कुणी उघडलं? प्रवेश-कक्षांत
फक्त एका जाड्या-जुड्या बोक्या शिवाय, जो एका खुर्चीवर बसला
होता, दुसरं कुणीही नव्हतं.
मैक्समिलियन
अन्द्रेयेविचने खोकलून पायांचा आवाज केला, तेव्हां कुठे स्टडी रूमच
दार उघडलं आणि करोव्येव बाहेर आला. मैक्समिलियन अन्द्रेयेविचने आपल्या
गरिमेप्रमाणे वाकून त्याचं अभिवादन केलं आणि म्हणाला, “माझ
नाव पप्लाव्स्की आहे. मी मामा...”
त्याने आपलं
वाक्य पूर्ण सुद्धां केल नव्हतं, की करोव्येवने खिशांतून घाणेरडा
रुमाल काढला, त्यांत नाकासकट आपला चेहरा लपवला आणि रडायला
लागला.
“...मृतक
बेर्लिओज़चा...”
“काय म्हणता, काय
म्हणता,” करोव्येव रुमाल दूर करून त्याला टोकंत म्हणाला,
“तुम्हांला बघितल्याबरोबर मी समजलो, की
तुम्हीं तेच आहांत!” त्याचा चेहरा अश्रूंनी भिजला आणि तो बारीक आवाजांत ओरडंत
राहिला, “कित्ती मोट्ठं दुःख आहे नं? हे
सगळं काय होतंय? आँ?”
“ट्रामगाडीने
चिरडून टाकलं?”
पप्लाव्स्कीने फुसफुसंत विचारलं.
“अगदी पूर्ण
चकनाचूर करून टाकलं,” करोव्येव ओरडला आणी त्याच्या चष्म्याच्या
खालून अश्रूंची धार वाहू लागली, “अगदी आर-पार झाली. मी तर
तिथेच होतो, विश्वास ठेवा – खट्! डोकं तिकडे! उजवा पाय – टक्
दोन भाग! डावा – टक् दोन भागांत! असं करतांत ह्या ट्रामगाड्या!” जास्त सहन करूं
शकला नाही करोव्येव! तो आरसा लावलेल्या भिंतीत नाक खुपसून हुंदके देत थरथरू लागला.
बेर्लिओज़चा मामा
ह्या अपरिचित माणसाच्या अश्या वागण्याने क्षुब्ध झाला. ‘असं
म्हणतांत की ह्या काळांत सहृदय व्यक्ती नसतात!’ असा विचार
करता-करता त्याच्या डोळ्यातूनसुद्धां धार वाहू लागली. पण लगेच मनांत संशयाचं वादळ
उठलं, एक दुष्ट विचार त्याच्या मनाला डसू लागला, की कुठे हा संवेदनशील प्राणी बेर्लिओज़च्या घरांत घुसून हा फ्लैट गिळंकृत
करण्याच्या विचारांत तर नाहीये ना, कारण की अश्या घटना पण
झालेल्या आहेत.
“माफ करा, तुम्ही
काय माझ्या स्वर्गीय मीशाचे मित्र होते?” त्याने बाहीने आपला
कोरडा डावा डोळा पुसंत विचारलं, उजव्या डोळ्याने तो दुःखाने
पछाडलेल्या करोव्येवच्या चेह-याचे भाव वाचायचा प्रयत्न करंत होता. पण तो इतक्या
जो-याने रडंत होता की “टक्क दोन तुकडे!” सोडून काही समजतंच नव्ह्तं. बराचं वेळ रडून झाल्यावर शेवटी करोव्येव भिंतीपासून दूर झाला आणि म्हणाला,
“नाही, आणखी सहन नाही करूं शकंत! जाऊन
वलेरीनचे तीनशे थेंब घेतो!” आणि पप्लाव्स्कीकडे आपला रडका चेहरा करून म्हणाला,
“अश्या असतांत ह्या ट्रामगाड्या!”
“माफ़ करा, मला
टेलिग्राम तुम्हीं पाठवला होता?” हा रडका माणूस कोण असूं
शकतो, ह्या जटिल कोड्यावर डोकं खपवंत मैक्समिलियन
अन्द्रेयेविचने विचारलं.
“त्याने!”
करोव्येवने बोक्याकडे बोट दाखवंत म्हटलं.
पप्लाव्स्कीचे
डोळे विस्फारले. त्याला वाटलं, की त्याच्या ऐकण्यांत काही तरी चूक
झालीये.
“नाहीं, आता
माझ्यांत हिम्मत नाहीये,” नाक फुरफुरंत करोव्येव बोलत राहिला,
“मला सारखं आठवतंय : पायांवर चाक, एक एक चाक
दहा-दहा मणाचे...टक्! जातो, जाऊन झोपण्याचा प्रयत्न करतो,
झोप लागली तर विसरून जाईन, आणि तो
प्रवेश-कक्षांतून चालला गेला.
आता बोक्याने
हालचाल केली,
त्याने खुर्चीवरून उडी मारली, मागच्या पायांवर
उभा राहिला, समोरचे पंजे कमरेवर ठेवले आणि आपलं तोंड उघडून
म्हणाला, “हो, मीच टेलिग्राम पाठवला
होता, मग?”
मैक्समिलियन
अन्द्रेयेविचचं डोकं गरगरू लागलं, हात-पाय सुन्न झाले, त्याच्या हातांतून सूटकेस पडली आणि तो बोक्याच्या समोरच्या खुर्चीवर बसूनंच
गेला.
“मी कदाचित
रशियनमधेच विचारतोय,” बोक्याने गंभीरतेने म्हटलं, “पुढे काय?”
पण पप्लाव्स्कीने
काही उत्तर नाही दिलं.
“पासपोर्ट!2”
बोका गुरगुरला आणी त्याने आपला गुबगुबीत पंजा पुढे केला.
पप्लाव्स्कीला
बोक्याच्या अंगा-यासारख्या दोन डोळ्यांशिवाय दुसरं काहीही दिसंत नव्हतं. त्याने पट्कन सु-यासारखा खिशातून पासपोर्ट काढून बोक्यासमोर
धरला. बोक्याने ड्रेसिंग टेबलवर ठेवलेला काळ्या फ्रेमचा चष्मा उचलला, चष्मा
लावला, ज्याने तो आणखीनंच विचित्र दिसूं लागला आणि त्याने
हात नाचवंत पप्लाव्स्कीच्या थडथड उडंत असलेल्या हातातून पासपोर्ट हिसकावून घेतला.
‘विचित्र
गोष्ट आहे: मी बेशुद्ध होऊं की नाही?’ पप्लाव्स्कीने विचार
केला. दुरून करोव्येवची हालचाल ऐकूं येत होती. सगळी खोली वलेरीनच्या वासाने भरून
गेली होती, त्यांतच अत्तर आणि आणखी कोणचातरी मळमळ आणणारा वासपण
मिसळून गेला होता.
“हा पासपोर्ट
कुणी दिलांय?”
बोक्याने वाचंत विचारलं. उत्तर नाही आलं.
“चारशे बारा
नम्बरच्या ऑफिसने...” उल्ट्या धरलेल्या पासपोर्टवरून हात फिरवंत बोका पुटपुटला, “हो – नक्कीच! मला हे पासपोर्ट ऑफिस माहितीये! तिथे वाट्टेल त्याला
पासपोर्ट देऊन टाकतांत! आणि मी, तुमच्यासारख्याला, नक्कीच पासपोर्ट नसता दिला! कोणत्याही परिस्थितीत नसता दिला! तुमच्या
तोंडाकडे बघतांच एकदम नाही म्हणालो असतो!” बोक्याला इतका राग आला, की त्याने पासपोर्ट जमिनीवर फेकून दिला. “अंतिम-संस्काराच्या वेळेस तुमची
उपस्थिती निरस्त करण्यांत येत आहे,” बोका ऑफिसरच्या थाटांत
बोलंत राहिला, “जा, आपल्या शहरांत परंत
जा!” आणि दाराकडे बघून फिस्कारला, “अजाजेलो!”
त्याने
बोलावल्यावर एक ठेंगणा, लंगडंत चालणारा, काळा
घट्ट कोट घातलेला, कमरेंत बांधलेल्या पट्ट्यांत चाकू खोचलेला,
लाल केस असलेला, एक पिवळा सुळा बाहेर आलेला,
उजव्या डोळ्यांत फूल पडलेला माणूस प्रवेश कक्षांत आला.
पप्लाव्स्कीचा दम
घुटू लागला,
तो खुर्चीतून उठला आणि छातीवर हात ठेवून अडखळला.
“अज़ाज़ेलो, घेऊन
जा,” बोक्याने हुकूम दिला आणि खोलीतून बाहेर निघून गेला.
“पप्लाव्स्की,” आगंतुकाने हळूच अनुनासिक स्वरांत म्हटलं, “अपेक्षा
आहे, की तुम्हांला सगळ समजलंय?”
पप्लाव्स्कीने
मान हलवली.
“लगेच कीएवला
परंत जा,”
अज़ाज़ेलोने आपलं बोलणं चालू ठेवलं, “तिथे
पाण्याहूनही शांत, गवताहूनही लहान होऊन बैस आणि मॉस्कोच्या
कोणत्याही फ्लैटचं स्वप्नसुद्धां पाहू नको, कळलं?”
तो ठेंगणा, ज्याने
पप्लाव्स्कीच्या मनांत आपल्या सुळ्याने, चाकूने आणि वाकड्या
डोळ्याने भयानक दहशत भरली होती, अर्थशास्त्रीच्या फक्त
खांद्यापर्यंतच पोहोचंत होता, पण खूप चपळतेने आणि
व्यवस्थितपणे हालचाल करंत होता.
सगळ्यांत आधी
त्याने पासपोर्ट उचलून मैक्समिलियन अन्द्रेयेविचच्या हातांत दिला, जो
त्याने आपल्या मरतुकड्या हाताने परंत घेतला. मग अज़ाज़ेलो नावाच्या ह्या माणसाने एका
हाताने त्याची सूटकेस उचलली आणी दुस-या हाताने दार उघडून बेर्लिओज़च्या मामाला हात
धरून पाय-यांपर्यंत घेऊन गेला. पप्लाव्स्की भिंतीला चिटकला. कोणत्याही किल्ली
शिवाय अज़ाज़ेलोने सूटकेस उघडली आणि तिच्यातूंन एक पाय असलेली फ्राइड कोंबडी काढली,
जी तेलाने भिजलेल्या कागदांत बांधलेली होती. त्याने कोंबडी जमिनीवर
ठेवली. मग दोन जोडी अंतर्वस्त्र काढले, दाढी करायचा उस्तरा
काढला, एक पुस्तक आणि एक चामड्याची ‘केस’
सुद्धां काढली आणि कोंबडीला सोडून बाकी सगळं सामान पायाने पाय-यांवर
ढकलून दिलं, मग रिकामी सूटकेसपण तिथेंच फेकून दिली. तिच्या
खाली पडण्याच्या आवाजावरून कळंत होतं, की तिचं झाकण तुटून
वेगळं झालेलं आहे.
मग लाल केसांच्या
त्या सैतानाने कोंबडीला पाय धरून उचललं आणि त्यानेंच पप्लाव्स्कीच्या मानेवर
इतक्या जोराने प्रहार केला की कोंबडीचं शरीर वेगळं झालं आणि पाय अज़ाज़ेलोच्या
हातांत राहिला. “अब्लोन्स्कीच्या घरांत सगळं उलट-पुलंट झालं3,” महान लेखक टॉल्स्टॉयने अश्या परिस्थितीचं वर्णन करताना लिहिलं होतं. अगदी
असंच त्याने आताही म्हटलं असतं. हो, पलाव्स्कीच्या
डोळ्यांसमोर सगळं गड्ड-मड्ड झालं. त्याच्या डोळ्यांसमोर विजेची एक रेघ चमकली,
जिच्या मागे-मागे जणु काळा नाग तरंगंत गेला, ज्याने
मेच्या त्या दुपारी निमिष मात्रासाठी अंधार केला आणि पप्लाव्स्की खाली पाय-यांवर
तरंगतंच गेला, हातांत पासपोर्ट पकडून. पाय-यांच्या वळणावर
येता-येता त्याच्या पायाने खिडकीचा काच खणकन् फुटला आणि तो पायरीवर बसलेला आढळला.
त्याच्याच बरोबर तरंगत होती ती बिनपायाची कोंबडी, जी आणखी
पुढे निघून गेली आणि पाय-यांच्या खोलांत पडली. वर थांबलेल्या अज़ाज़ेलोने कोंबडीचा
पाय स्वच्छ करून आपल्या खिशांत टाकला, मग तो फ्लैटमधे परंत
चालला गेला आणि दार धाड्कन बंद झालं. ह्याच वेळेस खालून सतर्क पावलांचा आवाज ऐकू
आला.
आणखी एक मजला
खाली धावल्यावर पप्लाव्स्की तिथेंच पडलेल्या लाकडी बेंचवर बसला आणि तेव्हां कुठे
त्याने श्वास घेतला.
एक मध्यम उंचीचा
माणूस,
खूपंच विचित्रसा, दुर्मुखलेल्या चेह-याचा,
टसरचा जुना सूट घातलेला, हिरवी रिबिन लावलेली
कडक हैट घालून पाय-या चढंत होता. पप्लाव्स्कीला बघून तो त्याच्याजवळ थांबला.
“महाशय, कृपा
करून सांगा, की फ्लैट नं. 50 कुठे आहे,” त्या माणसाने दुःखी आवाजांत विचारलं.
“वर,” पप्लाव्स्कीने पट्कन उत्तर दिलं.
“खूप खूप धन्यवाद, महाशय,”
तसल्यांच निराश आवाजांत सांगून तो माणूस वर चढला, आणि पप्लाव्स्की उठला आणि धावंत खाली जाऊ लागला.
आता प्रश्न हा
उद्भवतो,
की मैक्सिमिलियन अन्द्रेयेविच काय पोलिस स्टेशनवर रिपोर्ट
करण्यासाठी जात होता, की त्याच्यावर दिवसा ढवळ्या हल्ला
झालेला आहे? नाही, कोणत्याही परिस्थितीत
नाही, हे आम्ही ठामपणे सांगू शकतो. पोलिस स्टेशनवर जाऊन हे
सांगणं की चश्मा लावलेल्या बोक्याने त्याचं पासपोर्ट वाचलं आणि मग घट्ट कोट
घातलेल्या माणसाने चाकूने...नाही, मित्रांनो, मैक्समिलियन खरोखरंच समजदार माणूस होता.
आत्ता पर्यंत तो
खाली पोहोचला होता. त्याच्या अगदी समोर होता गोडाउनच्या आत जाण्याचं दार. ह्या
दाराचा काच तुटलेला होता. पप्लाव्स्कीलने पासपोर्ट खिशांत लपवलं आणि वरून
फेकलेल्या आपल्या वस्तू सापडतील, ह्या आशेने इकडे तिकडे बघू लागला.
पण त्यांचं कुठे नामोनिशान नव्हतं. पप्लाव्स्कीला
स्वतःवरंच आश्चर्यदेखील झालं, की त्याला हरवलेल्या
वस्तूंच दुःख कां नाही होत आहे. आता त्याच्या डोक्यांत एक वेगळाच मनोरंजक आणि
लुभावणारा विचार ठाण मांडून बसला होता: ह्या दुस-या व्यक्तीवर त्या फ्लैटमधे काय
होईल? बरोबरंच आहे : ज्या अर्थी त्याने विचारलं होतं,
की तो फ्लैट कुठे आहे, त्या अर्थी असा अर्थ
निघतो, की तो तिथे पहिल्यांदा चाललाय. कदाचित तो त्या
चाण्डाल-चौकडीच्या हातांत पडणारेय, जी फ्लैट नं. 50मधे घुसून
गेली होती. पप्लाव्स्कीला वाटंत होतं, की तो माणूस लवकरंच
तिथून बाहेर निघेल. कोणत्याच भाच्याच्या कोणच्याही अंतिम संस्कारांत जाण्याबद्दल
आता मैक्समिलियन अन्द्रेयेविच विचारसुद्धां करंत नव्हता आणि कीएवला जाणारी गाडी
सुटायला अजून बरांच अवकाश होता. अर्थशास्त्री इकडे-तिकडे बघून गोडाउनमधे घुसून
गेला. तेवढ्यांत दूर, वरून, दार बंद
व्हायचा आवाज आला. ‘आता तो आत घुसला!’ पप्लाव्स्कीच्या
हृदयाची धडधड क्षणभारासाठी जणू एकदम थांबली. गोडाउनमधे बराच गारठा होता. उंदरांचा
आणि जोड्यांचा घाण वास येत होता. मैक्समिलियन अन्द्रेयेविच लाकडाच्या एका
ओंडक्यावर बसून वाट पाहू लागला. ही जागा अगदी बरोबर होती, इथून
सहाव्या सेक्शनचं दार दिसंत होतं.
पण कीएवच्या
माणसाला अपेक्षेपेक्षा जास्त वाट बघावी लागली. पाय-या न जाणे कां रिकाम्या होत्या.
आरामांत सगळं ऐकू येत होतं. शेवटी पाचव्या मजल्याचं दार धाड्कन बंद झालं.
पप्लाव्स्कीच्या हृदयाची धडधड थांबली. ‘हो, त्याच्या
पायांचा आवाज आहे. खाली येतोय.’ ह्या फ्लैटच्या अगदी खाली
असलेल्या चौथ्या मजल्यावरच्या फ्लैटचं दार उघडलं. पावलांचा आवाज थांबला. एका बाईचा
आवाज...दुःखी व्यक्तीचा आवाज...हो, हा त्याचाचं आवाज
आहे...कदाचित असं काहीसं म्हणंत होता, “सोड, येशू ख्रिस्तासाठी...” पप्लाव्स्कीचा कान तुटलेल्या काचेला चिटकला. ह्या
कानाने ऐकला एका बाईच्या हसण्याचा आवाज, लवकर-लवकर खाली
येणा-या पावलांचा निडर आवाज; आणि त्या बाईच्या पाठीची झलक
दिसली. हातांत रेक्ज़िनचा हिरवा पर्स धरून ती बाई मुख्य दारांतून निघून अंगणांत
गेली आणि त्या व्यक्तीच्या पावलांचा आवाज पुन्हां येऊ लागला. “आश्चर्य आहे. तो परंत
फ्लैटमधे चाललाय. कुठे तोसुद्धा ह्या चौकडीतलाच तर नाही? हो,
परंत जातोय. पुन्हा वरचं दार उघडलं, आणखी वाट
पाहूं या...”
ह्यावेळेस थोडी
कमी वाट बघावी लागली. दाराचा आवाज. पावलांची चाहूल. पावलांचा आवाज
थांबला. एक घाबरलेली किंचाळी. मांजरीची म्याऊ-म्याऊ. चाहूल लवकर-लवकर, थांबत-थांबत, खाली, खाली,
खाली!
पप्लाव्स्कीचं
ध्येय पूर्ण झालं. घडी-घडी क्रॉसच चिन्ह बनवंत आणि काही-काही पुटपुटंत तो दुर्दैवी
माणूस जणु उडतंच आला, बिन टोपीचा, चेह-यावर
वेडेपणाचा भाव, टकल्या डोक्यावर खरचटल्याच्या खुणा आणि पैन्ट
पूर्ण ओली. तो घाबरून बाहेरच्या दाराचं हैण्डल फिरवू लागला, भीतिमुळे
हे सुद्धां विसरला की दार बाहेरच्या बाजूला उघडतं की आतल्या बाजूला. शेवटी दार
उघडलंच आणि तो बाहेर, अंगणाच्या उन्हांत उडंत आला.
तर, फ्लैटचा
तपास पूर्ण झाला होता, आपल्या मृत भाच्याबद्दल, त्याच्या फ्लैटबद्दल जराही विचार न करतां मैक्समिलियन अन्द्रेयेविच त्या
धोक्याबद्दल विचार करून थरथरू लागला, जो त्याच्यावर आला
असता. तो फक्त : “समजलं! सगळं समजलं!” येवढंच बडबडंत बाहेर कम्पाउण्डमधे पळाला.
काही मिनिटांनी एक ट्रॉली-बस अर्थशास्त्री-नियोजकाला कीएवला जाणा-या रेल्वे स्टेशनकडे
घेऊन गेली.
जोपर्यंत
अर्थशास्त्री खाली गोडाउनमधे बसला होता, त्या ठेंगण्या माणसाबरोबर
अत्यंत दुर्दैवी घटना घडली. तो ठेंगणा माणूस वेराइटीमधे रेस्टॉरेन्ट चालवायचा आणि
त्याचं नाव होतं अन्द्रेइ फोकिच सोकव. जोपर्यंत वेराइटीत विचारपूस होत होती,
अन्द्रेइ फोकिच त्या सगळ्या पासून दूरंच राहिला, फक्त एक गोष्ट विचार करण्यासारखी होती, ती अशी,
की तो नेहमीपेक्षां जास्तंच दुःखी दिसू लागल आणि त्याने पत्रवाहक
कार्पोवला हे पण विचारलं की तो जादुगार कुठे थांबलाय.
अश्या प्रकारे, अर्थशास्त्रीला
विचारून रेस्टॉरेन्टवाला पाचव्या मजल्यावर पोहोचला आणि त्याने फ्लैट नं, 50ची घंटी वाजवली.
दार लगेच उघडलं, पण
थोडसं थरथरंत, थोडसं अडखळंत रेस्टॉरेन्टवाला लगेच आत नाही
घुसला. गोष्टंच तशी होती. दार उघडणारी एक मुलगी होती – जिने लेसच्या एप्रनशिवाय
आणखी काहीच घातलं नव्हतं, डोक्यावर पांढरा टोप होता. हो,
पायांत सोनेरी जोडे होते. मुलीची शरीरयष्टी, तिचे
नाकडोळे चांगले होते, फक्त एक गोष्ट खटकंत होती, तिच्या मानेवर एक लालसर जखमेची खूण होती
“घण्टी वाजवलीच
आहे तर या!” मुलीने रेस्टॉरेन्टवाल्यावर आपले हिरवंट,
निर्लज्ज डोळे रोखून म्हटलं.
अन्द्रेइ फोकिचचं
तोंड उघडंच राहिलं, तो डोळ्यांची उघडझाप करंत, टोपी काढून प्रवेश-कक्षांत आला. इतक्यात तिथे ठेवलेला टेलिफोन खणखणला. ती
निर्लज्ज मोलकरीण एक पाय खुर्चीवर ठेवून टेलिफोनचा रिसीवर उचलून म्हणाली, “हैलो!”
रेस्टॉरेन्टवाल्याला
कळंत नव्हतं,
की आपली दृष्टी कुठे फिरवावी, एका पायावरून
दुस-या पायावर आपलं शरीर हलवंत तो विचार करंत होता: ‘काय
मोलकरीण आहे ह्या परदेश्याची! छिः, कित्ती किळसवाणी!’
आणि ह्या किळसवाण्या वस्तूपासून स्वतःला वाचविण्यासाठी तो
इकडे-तिकडे बघू लागला.
हा मोठा, किंचित
अंधारा प्रवेश कक्ष विचित्र-विचित्र वस्तूंनी आणि कपड्यांनी भरलेला होता.
खुर्चीच्या पाठीवर लाल लाइनिंग असलेला एक दफन-झगा होता. ड्रेसिंग
टेबलाच्या छोट्याश्या स्टूलवर सोनेरी मुठेची एक लाम्ब तलवार ठेवली होती. चांदीच्या
मुठी असलेल्या तीन तलवारी कोप-यांत एखाद्या छतरी किंवा छडी सारख्या उभ्या होत्या
आणि रेन्डियरच्या शिंगांवर गरुडाचे पंख असलेले शिरस्त्राण टांगलेले होते.
“हो,” मोलकरीण फोनवर बोलंत होती, “काय? सामंत मायकेल? ऐकतेय. हो! कलाकार महोदय आज घरीच
आहेत. हो, तुम्हांला भेटून त्यांना आनंद होईल. हो, पाहुणे...चोगा किंवा काळा कोट. काय? रात्री बारा
वाजता.” बोलणं संपवून तिने रिसीवर जागेवर ठेवला आणि रेस्टॉरेन्टवाल्याकडे वळली,
“तुम्हीं कां आलांत?”
“मला नागरिक
कलाकाराला भेटायचे आहे.”
“काय? खुद्द
त्यांना?”
“हो, त्यांनाच,”
रेस्टॉरेन्टवाल्याने रडक्या आवाजांत म्हटलं.
“विचारते,” मुलगी बुचकळ्यांत पडून म्हणाली आणि मृत बेर्लिओज़च्या खोलीचं दार थोडंसं
उघडून म्हणाली, “सरदार, एक ठेंगणा
माणूस आलाय, जो म्हणतोय की त्याला महोदयांना भेटायचंय.”
“येऊं दे,” खोलीच्या आतून करोव्येवचा फाटका आवाज़ आला.
“जा, ड्राइंगरूममधे
चालले जा,” मुलीने इतक्या सहज म्हटलं, जणु
तिने पूर्ण कपडे घातलेयंत, आणि ड्राइंगरूमचं दार उघडून
प्रवेश कक्षांतून बाहेर निघून गेली.
तिथे जाताना, जिथे
जायला त्याला सांग़ितलं होतं, हॉटेलवाला आपल्या कामाबद्दल
विसरूनंच गेला, इतकं आश्चर्य त्याला ही खोली बघून झालं.
मोट्ठ्या-मोट्ठ्या खिडक्यांच्या रंगीत काचांमधून (ही होती कोणताही मागमूस न ठेवतां
हरवलेल्या जवाहि-याच्या बायकोची कल्पना) खोलीत एक विचित्र-सा प्रकाश येत होता,
जो साधारणपणे चर्च मधल्या प्रकाशासारखा होता. जुन्या भव्य शेकोटींत
वसंत ऋतूचा गरम दिवस असून सुद्धा आग जळंत होती. पण तरीही खोलीत जरा सुद्धां गरम
नव्हतं वाटंत, उलट आगंतुकाला कबरेंत असल्यासारख्या गारठ्याने
आणि थंडीने वेढून घेतलं. शेकोटीसमोर वाघाच्या कातड्यावर प्रेमाने ज्वाळांकडे बघंत
काळा बोका बसला होता. एक टेबलसुद्धां होतं, ज्याच्यावर नज़र
पडतांच देवभीरू रेस्टॉरेन्टवाला थरथरला. टेबलावर चर्चमधे असलेले किमखाब होते.
किमखाबावर ढेरपोट्या, बुरशी लागलेल्या आणि धुळीने माखलेल्या
अनेक बाटल्या पडल्या होत्या. बाटल्यांच्या मधे एक प्लेट होती जिला बघतांक्षणींच
कळंत होतं की ती ख-या सोन्याची आहे. शेकोटीजवळ ठेंग़णा, लाल
केस असलेला, कमरेत चाकू खोचलेला माणूस स्टीलच्या लांब
तलवारीवर टोचून मांसाचे तुकडे भाजंत होता, आणि आगीत त्याचा
रस थेंब-थेंब करंत पडंत होता आणि चिमणीतून धूर बाहेर निघंत होता. खोलींत भाजंत
असलेल्या मांसाचाच नाही तर आणखीही कोणचातरी सुगंध पसरला होता, अत्तर आणि लोभानचा मिश्रित सुगंध, ज्यामुळे
रेस्टॉरेन्टवाल्याच्या (ज्याने वर्तमान पत्रांत बेर्लिओज़च्या दुर्दैवी मृत्यु आणि
त्याच्या राहण्याच्या जागेबद्दल वाचलं होतं) मनांत एक विचार आला की कुठे
बेर्लिओज़साठी चर्चमधे करण्यांत येणारी पनिखीदा4 सर्विस इथेंच तर नाही
करण्यांत आली, पण ह्या विचाराला विसंगत समजून त्याने
डोक्यांतून काढून टाकलं.
थक्क झालेल्या
रेस्टॉरेन्टवाल्याला अचानक एक भारी-भरकम आवाज ऐकू आला, “बोला, मी तुमच्यासाठी काय करू शकतो?”
आता
रेस्टॉरेन्टवाल्याने अंधारांत बसलेल्या त्याला ओळखलं, ज्याची
त्याला गरंज होती.
काळ्या जादूचा
विशेषज्ञ एका खूप मोठ्या, कमी उंचीच्या पलंगावर बसला होता,
ज्यावर ब-याच उश्या पडल्या होत्या. रेस्टॉरेन्टवाल्याला असं वाटलं
की त्या कलाकाराच्या अंगावर फक्त काळे अंतर्वस्त्र आणि काळे टोकदार जोडेच होते.
“मी,” रडक्या आवाजांत रेस्टॉरेन्टवाला म्हणाला, “वेराइटी
थियेटरच्या रेस्टॉरेन्टचा प्रमुख आहे...”
कलाकाराने
बहुमूल्य खड्यांच्या अंगठ्या असलेला आपला हात पुढे केला, जणु
त्याला रेस्टॉरेन्टवाल्याचं तोंड बंद करायचंय, आणि उत्तेजित
होत म्हणाला, “नाही, नाही, नाही! पुढे एकही शब्द नाही! कोणत्याच परिस्थितीत आणि कधीच नाही! तुमच्या
रेस्टॉरेन्टचा एकही पदार्थ मी तोंडांत ठेवूं शकंत नाही! काल, आदरणीय महोदय, मी तुमच्या काउंटरच्या जवळून गेलो
होतो आणि आतापर्यंत ना तर तिथली स्टर्जन विसरूं शकलोय, ना ही
मेंढीच्या दुधाचं ‘चीज़’! माझ्या
लाडक्या! चीज़ हिरव्या रंगाचं नसतं, तुम्हांला कोणी तरी
बुद्धू बनवलंय. ते तर पांढरं असायला पाहिजे. आणि, हो,
चहा? बस गटाराचं पाणी! मी स्वतःच्या डोळ्यांनी
पाहिलं की एका गबाळ्या मुलीने बादलीभर पाणी तुमच्या समोवारमधे ओतलं, जेव्हां की समोवार चहा देतंच होते. नाहीं, लाडक्या,
हे अशक्य आहे!”
“माफ करा...”
अचानक झालेल्या ह्या हल्ल्याने चकित होऊन अन्द्रेइ फोकिच म्हणाला, “मी ह्या कामासाठी नाही आलो, आणि स्टर्जनचं इथे काही
काम नाहीये...”
“काम कसं नाहीये, जर
ती सडलेली असेल तर?”
“स्टर्जन दुस-या
श्रेणीच्या ताजेपणाची पाठवली होती,” रेस्टॉरेन्टवाल्याने खुलासा केला.
“माझ्या लाडक्या, हा
मूर्खपणा आहे!”
“मूर्खपणा कसा?”
“दुस-या श्रेणीचं
ताजेपण – हाच मूर्खपणा आहे! ताजेपणा बस एकचं असतो – प्रथम श्रेणीचा, तोच
अंतिम श्रेणीचा पण असायला हवा. आणि जर स्टर्जन दुस-या श्रेणीची आहे, तर ह्याचा अर्थ असा झाला, की ती शिळी आहे!”
“मी माफी मागतो,” रेस्टॉरेन्टवाल्याने पुन्हां बोलायचा प्रयत्न केला. त्याला कळंत नव्हतं की
ह्या हल्ल्याला कसं थांबवावं.
“तुम्हांला माफी
नाही मिळू शकंत,”
त्याने ठामपणे म्हटलं.
“मी ह्या
कामासाठी नव्हतो आलो!” एकदम वैतागून रेस्टॉरेन्टवाल्याने म्हटलं.
“ह्या कामासाठी
नाही?”
परदेशी जादुगाराला खूप आश्चर्य झालं, “तर मग
अशी कोणची गोष्ट असू शकते, जिने तुम्हांला माझ्यापर्यंत
खेचून आणलंय? जर मी विसरलो नाहीये, तर
तुमच्या व्यवसायाशी संबंधित मी फक्त एकाच महिलेला ओळखत होतो, ते पण फार-फार पूर्वी, जेव्हां तुम्हीं ह्या जगांत
आलेसुद्धां नव्हते. चला, ठीकाय, मला
आनंद झाला. अजाजेलो! रेसटॉरेन्ट प्रमुखाला बसण्यासाठी स्टूल सरकंव.”
मांस भाजंत
असलेल्या माणसाने आपल्या सुळ्याने रेस्टॉरेन्टवाल्याला घाबरवंत हळूच ओकवृक्षाचं एक
स्टूल त्याच्याकडे सरकवलं. बसण्यासाठी खोलीत दुसरं काही नव्हतंच.
रेस्टॉरेन्टवाल्याने
म्हटलं,
“खूप आभारी आहे,” आणि तो स्टूलवर बसला.
बसताक्षणीच
स्टूलचा मागचा पाय चर्रर् र्... करंत लगेच तुटला आणि रेस्टॉरेन्टवाला विव्हळंत
अत्यंत पीडेने धप्पकन् फरशीवर आदळला. पडता-पडता त्याच्या दुस-या पायाने दुस-या
स्टूलला धक्का दिला, जो त्याच्या समोर ठेवलेला होता आणि त्याच्या
पैण्टवर रेड वाइनचा पूर्ण ग्लास सांडला जो त्या स्टूलवर ठेवला होता.
कलाकार उद्गारला, “ओह! तुम्हांला लागलं तर नाही?”
अज़ाज़ेलोने
रेस्टॉरेन्टवाल्याला उठण्यास मदत केली आणि त्याला बसायला आणखी एक स्टूल दिला.
रेस्टॉरेन्टवाल्याने दुःखी आवाजांत पैण्ट काढून तिला शेकोटीसमोर वाळवण्याचा
यजमानाचा सल्ला नाकारला आणि अत्यंत अस्वस्थपणे ओल्या कपड्यांत दुस-या स्टूलवर
संभाळून बसला.
“मला खाली बसायला
आवडतं,”
कलाकाराने बोलायला सुरुवात केली, “अश्या
खालच्या जागेवरून पडायची तेवढी भीति नसते. हो, तर आपण
स्टर्जनवर थांबलो होतो? माझ्या लाडक्या! ताज़ं, ताज़ं आणि ताज़ं...हेच प्रत्येक हॉटेलवाल्याचं ध्येय असलं पाहिजे. हो,
घ्या, स्वाद बघा...”
लगेच शेकोटीच्या
लाल उजेडात रेस्टॉरेन्टवाल्यासमोर तलवार चमकली, आणि अज़ाज़ेलोने सोन्याच्या
प्लेटमधे वाफ़ निघत असलेला मांसाचा तुकडा ठेवला, त्यावर
लिंबाचा रस पिळला, आणि दोन दात असलेला सोन्याचा फोर्क ठेवून
प्लेट रेस्टॉरेन्टवाल्यासमोर केली.
“आभारी
आहे...मी...”
“नाही, नाही,
खा.”
रेस्टॉरेन्टवाल्याने
शिष्ठाचारवश तुकडा तोंडात टाकला आणि त्याला लगेच कळलं, की
तो खरोखरंच एका खूपंच ताज्या आणि फारंच स्वादिष्ट पदार्थाचा स्वाद घेतोय. पण तो
रसाळ, सुगंधित मांसाचा तुकडा चोखता-चोखता रेस्टॉरेन्टवाला पुन्हां
एकदा पडता-पडता वाचला. बाजूच्या खोलीतून एक मोट्ठा काळा पक्षी उडंत आला आणि रेस्टॉरेन्टवाल्याच्या
टकल्या डोक्याला आपल्या पंखाने दाबून निघून गेला. ‘अरे देवा!’ घाबरंट, जसे सगळेच हॉटेलवाले असतात, अन्द्रेइ फोकिच ने विचार केला...’काय फ्लैट आहे!’
“वाइनचा एक पैग? पांढरी,
लाल? दिवसाच्या ह्या वेळेस तुम्हांला कोणच्या
देशाची वाइन घ्यायला आवडेल?”
“आभारी
आहे...मी...”
“ मूर्खपणा! तर
मग फाशांचा खेळ खेळू या? की तुम्हांला दुसरा कोणचा खेळ आवडतो? दमीनो, पत्ते?”
“खेळंत नाही,” रेस्टॉरेन्टवाला आता थकला होता.
“वाईट गोष्ट आहे,” यजमान बोलणं संपवंत म्हणाला, “ठीकाय, तुमची मर्जी, पण असे माणसं अत्यंत धूर्त असतात जे
दारू, जुगार, सुंदर महिलांची संगत आणि
जेवताना वार्तालाप करण्यापासून स्वतःला दूर ठेवतात. असे लोकं या तर एखाद्या गंभीर
आजाराने ग्रस्त असतात, किंवा आजूबाजूच्या लोकांशी घृणा
करतात. हे पण खरं आहे, की ह्याला अपवाद असूं शकतात. कधी-कधी
तर माझ्या बरोबर उत्सवाच्या टेबलाशी अत्यंत धूर्त लोक बसलेले असायचे!...तर,
सांगा तुमचं काय काम आहे?”
“काल तुम्हीं
बरेंच चमत्कार दाखवलेत...”
“मी?” जादुगार आश्चर्याने म्हणाला, “दया करा. मी तर असलं
काही करंत नसतो!”
“चूक झाली,” रेस्टॉरेन्टवाल्याने लगेच म्हटलं, “हो, तो काळ्या जादूचा खेळ...”
“हो, ओह,
हो, हो! माझ्या लाडक्या, मी तुला खरी गोष्ट सांगून टाकतो: मी काही कलाकार-बिलाकार नाहीये. मला तर
फक्त मॉस्कोवासियांना एकत्र बघायचं होतं आणि ह्यासाठी सर्वोत्तम जागा म्हणजे
थियेटरंच होती. हे बघा, माझ्या सहयोग्याने...” त्याने
बोक्याकडे खूण करंत म्हटलं, “सगळा तमाशा आयोजित केला होता,
मी तर फक्त बसल्या-बसल्या मॉस्कोवासियांना बघत होतो. पण असे त्रस्त
नका होऊं, आणि मला सांगा, की त्या ‘शो’ची अशी कोणती गोष्ट होती, जिच्यासाठी
तुम्हीं इथे आले?”
“जर तुम्हीं
बघितलं असतं,
की ‘शो’च्या दरम्यान
छतातून कागद उडून खाली येत होते,” रेस्टॉरेन्टवाल्याने आपला
आवाज़ खाली करून, घाबरून इकडे-तिकडे बघितलं, “ – आणि त्यांना सगळ्यांनी उचलून घेतलं, मग एक तरुण
माझ्याकडे रेस्टॉरेन्टमधे आला, मला दहा रूबल्सची एक नोट दिली
आणि मी त्याला चिल्लर परंत केली...साडे आठ रूबल्स...मग दुसरा आला.”
“तरुण?”
“नाही, मोठा
माणूस, मग तिसरा, चौथा...मी सगळ्यांना
चिल्लर देत होतो. आणि आज, जेव्हां आपला कैश-बॉक्स बघू लागलो,
तर काय पाहतो – नोटांच्या ऐवजी होते कागदांचे तुकडे! रेस्टॉरेन्टला
एकशे नऊ रूबल्सचा भुरदण्ड बसला.”
“ओय, ओय,
ओय!” जादुगाराने सहानुभूति दाखवली, “त्यांना काय
खरे नोट वाटले? मला विश्वास आहे की त्यांनी मुद्दाम तसं नसेल
केलं.”
रेस्टॉरेन्टवाल्याने
दुःखी चेहरा करून वाकड्या डोळ्यांने इकडे-तिकडे पाहिलं, पण
बोलला काहीच नाही.
“ते बदमाश होते
कां?”
जादुगाराने उत्सुकतेने पाहुण्याला विचारलं, “मॉस्कोवासियांमधे
बदमाशसुद्धां आहेत कां?”
ह्या प्रश्नाच्या
उत्तरांत रेस्टॉरेन्टवाला इतक्या कटुतेने हसला की काही शंकाच नाही उरली : हो, मॉस्कोत
बदमाशसुद्धा आहेत.
“खूप नीचतेची
गोष्ट आहे!” वोलान्द उत्तेजित होऊन म्हणाला, “तुम्हीं एक गरीब व्यक्ति आहांत...
तुम्ही काय – खरंच गरीब आहांत?’
रेस्टॉरेन्टवाल्याने
मान झुकवली,
स्पष्ट होतं की तो गरीब आहे.
“तुमच्याकडे किती
पैसा आहे?”
प्रश्न खूपंच
सहृदयतेने विचारलेला होता, पण होता तर असभ्यंच.
रेस्टॉरेन्टवाला संकोचला.
“दोनशे
एकोणपन्नास हजार रूबल्स, बैंकेच्या पाच खात्यांत,” बाजूच्या खोलीतून चिरचिरा आवाज आला., “आणि घरांत
फरशी खाली दहा-दहा रूबल्सच्या दोनशे स्वर्ण मुद्रा आहेत.”
रेस्टॉरेन्टवाला
आपल्या स्टूलवर जणु चिटकून गेला.
“ही तर काही मोठी
रकम नाहीये,”
वोलान्दने सहनुभूतीने आपल्या पाहुण्याला म्हटलं, “तसं पाहिलं तर तुम्हाला तिची गरजही नाहीये. तुम्हीं केव्हां मरणार आहे?”
आता तर
रेस्टॉरेन्टवाला काळजीत पडला.
“हे ना तर कोणाला
माहीत आहे आणि ना ही कोणाचा ह्याच्याशी संबंध आहे.”
“हो, कोणालांच
माहीत नाहीये,” तोच घृणित आवाज खोलीतून ऐकू आला, “विचार कर, न्यूटनची बाइनोमियल थ्योरम! हा ठीक नऊ
महिन्यांनी पुढच्या फेब्रुवारीत लिवरच्या कैन्सरने फर्स्ट मॉस्को युनिवर्सिटीच्या
हॉस्पिटलच्या चौथ्या नंबरच्या वार्ड मधे मरेल.”
रेस्टॉरेन्टवाल्याचा
चेहरा पिवळा पडला.
“नऊ महीने,” वोलान्दने विचारांत पडंत म्हटलं, “दोनशे एकोणपन्नास...ह्याचा
अर्थ झाला, की दर महिन्यांत सुमारे सत्तावीस हजार? थोडे कमीच आहे, पण साध्या-सुध्या जगण्यासाठी भरपूर
आहेत. शिवाय ह्या स्वर्ण मुद्रा सुद्धां आहेत ना.”
“...सोन्याच्या
नाण्यांचा काहीही उपयोग होणार नाहीये,” पुन्हां तोच आवाज आला, ज्याने रेस्टॉरेन्टवाल्याची छाती बर्फासारखी गार पडली, “अंद्रेइ फोकिचच्या मृत्युनंतर लवकरंच ती बिल्डिंग पाडली जाईल आणि स्वर्ण
मुद्रा सरकारी बैंकेत जमा होतील.”
“मी
तर तुम्हांला दवाखान्यांत भरती व्हायचा सल्ला नाही देणार,” कलाकार
पुढे म्हणाला, “वार्डमधल्या आशाहीन आजा-यांचे विव्हळणे,
ओरडणे ऐकंत मरण्यांत काही अर्थ नाहीये. ह्या सत्तावीस हजारांनी
उत्सव कां न साजरा करावा आणि मग विष पिऊन ‘दुस-या लोकांत’
वास्तव्य करावं, संगीताच्या मधुर स्वर लहरी
ऐकंत, मदमस्त सुंदर मुली आणि साहसी मित्रांच्या गराड्यांत?”
रेस्टॉरेन्टवाला
स्तब्ध बसून राहिला आणि जणू एकदम म्हातारा झाला. त्याच्या डोळ्यांच्या चारीकडे
काळे वर्तुळं पडले, गाल खोल गेले आणि खालचा जबडा लटकून गेला.
“आपण तर कल्पनेंत
हरवलो,”
यजमान उद्गारला, “कामाबद्दल बोलूं या.
तुमच्याकडे आहेत का ते कागदाचे तुकडे? दाखवा.”
रेस्टॉरेन्टवाल्याने
क्षुब्ध होत खिशांतून कागदांत बांधलेली गड्डी काढली आणि तिला उघडतांच जणु दगड झाला, तिथे
खरोखरंच दहा-दहाचे नोट होते.
“माझ्या लाडक्या, तू
खरोखरंच आजारी आहे,” वोलान्दने खांदे उचकावंत म्हटलं.
रेस्टॉरेन्टवाला
भयानकपणे हसंत स्टूलवरून उठला.
“आणि,” तो पुन्हां चीं-चीं करू लागला,” आणि जर ते
पुन्हां...”
“हूँ,” कलाकार विचार करू लागला, “तर पुन्हां आमच्याकडे या.
कृपा होईल! तुम्हांला भेटून खूप आनंद झाला.”
तेवढ्यांत
करोव्येव त्या खोलीतून उडी मारून बाहेर आला, तो रेस्टॉरेन्टवाल्याचा हात
पकडून आवेशाने हलवू लागला आणि घडी-घडी अन्द्रेइ फोकिचला सांगू लागला, की त्यांच्या तर्फे सगळ्यांना नमस्कार सांगावा. रेस्टॉरेन्टवाला काहीही न
समजता प्रवेश कक्षाकडे जाऊ लागला.
“हैला, सोडून
ये!” करोव्येव किंचाळला.
पुन्हां तीच
निर्लज्ज लाल केस असलेली वस्त्रहीन मुलगी प्रवेश कक्षांत होती. रेस्टॉरेन्टवाला
स्वतःला आक्रसून घेत दारातून निघाला, तो पुटपुटला, “गुडबाय!” आणि दारुड्यासारखा चालू लागला. थोडा खाली गेल्यावर तो थांबला,
पाय-यांवर बसून गेला, कागदांत बांधलेले नोट
काढून बघू लागला, ते सुरक्षित होते.
तेवढ्यांत ह्या
मजल्यावर असलेल्या फ्लैटच्या दारातून हिरवा पर्स घेतलेली बाई निघाली.
पाय-यांवर बसून
नोटांकडे बघंत असलेल्या ह्या माणसाकडे बघून तिने स्मित केलं आणि म्हणाली, “आमची पण काय बिल्डिंग आहे! हा सकाळी-सकाळी पिऊन बसलाय...पाय-यांचा काच
पुन्हां फुटला आहे,”
लक्षपूर्वक
रेस्टॉरेन्टवाल्याकडे बघंत ती पुढे म्हणाली, “हे, तुझे
नोट अण्डे तर नाही न देणारेय! थोडेशे मलाचं दिले असते! आँ?”
“मला सोड, येशू
साठी,” रेस्टॉरेन्टवाला घाबरून पैसे लपवूं लागला. ती बाई
खो-खो करंत हसंत सुटली, “तुला केसाळ सैतान घेऊन जावो! मी तर
गंमत करंत होते...” आणि ती खाली चालली गेली.
रेस्टॉरेन्टवाला
हळू-हळू उठला. आपली हैट नीट करण्यासाठी त्याने हात वर नेला. तेव्हांच
त्याला कळलं की डोक्यावर हैटंच नाहीये. परंत तिथेंच जायच्या विचाराने त्याला धडकी
भरली, पण हैटसाठी दुःख होत होतं. थोडा विचार करून तो परंत
गेला आणि त्याने घण्टी वाजवली.
“आता आणखी काय
पाहिजे?”
त्या दुष्ट हैलाने विचारलं.
“मी आपली हैट
विसरलो...” रेस्टॉरेन्टवाला आपल्या टकल्या डोक्यांत बोटं गडवंत कुजबुजला. हैला
वळली. रेस्टॉरेन्टवाला कल्पनेंत तिच्यावर थुंकला आणि त्याने डोळे बंद केले.
जेव्हां त्याने डोळे उघडले तेव्हां हैलाने त्याला त्याची हैट आणि काळ्या मुठीची
तलवार दिली.
“ही माझी नाहीये,” तो तलवार दूर करंत आणि पट्कन हैट घालंत पुटपुटला.
“तुम्हीं काय
बिना तलवारीचे आले होते?” हैलाला आश्चर्य वाटलं.
रेस्टॉरेन्टवाला
काहीतरी कुजबुजंत लगेच खाली धावला. माहीत नाही कां, त्याच्या डोक्याला
विचित्रसा भास होत होता आणि हैट मधे खूप गरम वाटंत होतं; त्याने
हैट काढली आणि भीतीने उडी मारून हळूंच किंचाळला. त्याच्या हातांत मखमली टोप होता,
कोंबडीच्या घाणेरड्या पंखांने सजवलेला. रेस्टॉरेन्टवाल्याने क्रॉसची
खूण बनवली. तेवढ्यातंच ते मखमल म्याऊँ-म्याऊँ करू लागलं, छोट्याश्या
काळ्या पिल्लांत परिवर्तित झालं आणि पुन्हां अंद्रेइ फोकिचच्या डोक्यावर उडीमारून
त्याच्या टकलाला आपल्या नखांनी खरचटू लागलं. रानटीपणाने किंचाळंत रेस्टॉरेन्टवाला
खाली पळूं लागला आणि मांजरीचं पिल्लू त्याच्या डोक्यावरून पडून वर पळालं.
मोकळ्या हवेंत
आल्यावर रेस्टॉरेन्टवाला तीरासारखा मुख्य द्वाराकडे लपकला आणि त्याने नेहमीसाठी
त्या सैतानी फ्लैट नंबर 302ला राम-राम ठोकला.
सगळ्यांना
माहितीये की त्याच्यासोबत पुढे काय घडलं. कोप-यावर पोहोचून त्याने रानटीपणाने
इकडे-तिकडे पाहिलं, जणु काही तरी शोधतोय. एक मिनिटानंतर तो रस्त्याच्या
दुस-या बाजूला असलेल्या औषधाच्या दुकानांत होता. जसंच त्याने विचारलं, “कृपा करून मला हे सांगा...” – तशीच काउन्टरच्या मागे उभी असलेली मुलगी
ओरडली, “नागरिक! तुमचं तर सम्पूर्ण डोकं खरचटलंय!...”
पाच मिनिटांत
रेस्टॉरेन्टवाल्याचं डोकं बैण्डेजमधे बांधलं गेलं. त्याने माहिती काढली की
लिवरच्या रोगांचे सगळ्यांत जास्त मानलेले विशेषज्ञ आहेत प्रोफेसर बर्नार्ड्स्की
आणि कूज़्मिन. त्यांच्यापैकी जवळ कोण आहे, हे विचारल्यावर माहीत झालं
की कूज़्मिन, बस एक घर सोडून असलेल्या छोट्याश्या पांढ-या
बंगल्यांत राहतो. तो आनंदाने वेडांच झाला आणि दोनंच मिनिटांत तो त्या बंगल्यांत
होता. हे घर फार जुनं होतं, पण खूप खूप आरामशीर होतं.
रेस्टॉरेन्टवाल्याला आठवलं की पहिले त्याची गाठ पडली एका म्हाता-या आयाशी, जिने त्याची हैट घेण्यासाठी हात पुढे केला, पण हैट
नव्हतीच, म्हणून नर्स तोंड हलवंत कुठे तरी निघून गेली.
तिच्या जागेवर
कमानीच्या खाली,
आरश्याजवळ एक मध्यम वयाची महिला दिसली, जिने
लगेच म्हटलं की डॉक्टरकडे एकोणीस तारखेच्या आधी वेळ नाहीये. रेस्टॉरेन्टवाल्याने
पट्कन ठरवलं की काय करायला हवं. विझंत असलेल्या नजरेने त्यानी कमानीच्या पलिकडे
पाहिलं, जिथे एका प्रवेश-कक्षासारख्या खोलींत तीन माणसं वाट
पाहात होते आणि तो कुजबुजला:
“मी मरणाच्या
दारांत आहे...”
त्या महिलेने
अविश्वासाने रेस्टॉरेन्टवाल्याच्या पट्ट्या बांधलेल्या डोक्याकडे पाहिलं आणि
किंचित बिचकंत म्हणाली, “ओह, असं आहे...” आणि
तिने त्याला कमानीच्या पुढे जाऊ दिलं.
इतक्यांत समोरचं
दार उघडलं आणि त्यांत सोनेरी फ्रेमचा चष्मा चमकला, एप्रन घातलेली महिला
म्हणाली, “नागरिक हो, हा पेशन्ट आधी
जाईल.”
रेस्टॉरेन्टवाला
इकडे तिकडे बघूं सुद्धां नाही शकला, की तो कूज़्मिन समोर आढळला. ह्या
लांबट खोलीत कोणतीच भयानक, विचित्र आणि दवाखान्यासारखी गोष्ट
नव्हती.
“काय झालंय?” गोड आवाजांत कूज़्मिनने विचारलं आणि उत्सुकतेने पट्ट्या बांधलेल्या
डोक्याकडे बघू लागला.
“आत्ताच
विश्वसनीय लोकांकडून ऐकून आलोय,” रेस्टॉरेन्टवाल्याने रानटीपणाने
भिंतीवर लावलेल्या एका ग्रुप फोटोकडे बघंत म्हटलं, “की
येत्या फेब्रुवारीत मी लिवरच्या कैन्सरने मरणार आहे. विनंती करतो की हे थांबवा!”
प्रोफेसर कूज़्मिन
जसा बसला होता,
तसांच खुर्चीच्या आरामशीर पाठीला टेकला.
“माफ करा, मला
समजंत नाहीये... तुम्ही...डॉक्टरकडे गेले होते? तुमच्या
डोक्याला पट्ट्या कां बांधल्या आहेत?”
“कसला डॉक्टर? कुठला
डॉक्टर?...जर तुम्ही त्या डॉक्टरला बघितलं असतं!” त्याने
दातांची किटकिट केली, “डोक्याकडे लक्ष नका देऊ, त्याचा इथे काही संबंध नाहीये,” रेस्टॉरेन्टवाल्याने
उत्तर दिलं, “डोक्यावर थुंका, त्याची
इथे गरज नाहीये. लिवरचा कैन्सर, थांबवा, प्लीज़!”
“पण हे तुम्हाला
कोणी सांग़ितलं?”
“त्याच्यावर
विश्वास ठेवा,”
रेस्टॉरेन्टवाला वैतागून म्हणाला, “त्याला
माहीत आहे!”
“मला काहीही कळंत
नाहीये,”
खांदे उचकावंत डॉक्टरने आपली खुर्ची टेबलापासून दूर सरकवली, आणि म्हणाला, “त्याला कसं कळलं की तुम्ही केव्हां
मरणार आहे? विशेषकरून, तेव्हां,
जेव्हां तो डॉक्टर नाहीये?”
“चार नम्बरच्या
वार्ड मधे,”
रेस्टॉरेन्टवाला म्हणाला.
आता प्रोफेसरने
आपल्या पेशन्टकडे पाहिलं, त्याच्या डोक्याकडे पाहिलं आणि
त्याच्या ओल्या पैण्टकडे बघंत विचार करू लागला, “ह्यांचीच
कमी होती! पागल!” त्याने विचारलं, “तुम्हीं वोद्का पीता नं?”
“मी तिला कधी
हातसुद्धां लावला नाहीये,” रेस्टॉरेन्टवाल्याने उत्तर दिलं.
एका मिनिटानंतर
तो बिनकपड्यांचा,
थंडगार रेक्ज़िन लावलेल्या लांब टेबलवर पडला होता, आणि डॉक्टर त्याचं पोट दाबंत होता. सांगावं लागेल की रेस्टॉरेन्टवाला
बरांच खूश झाला. प्रोफेसरने ठामपणे सांगितलं की आत्ता, कमीत
कमी ह्या क्षणाला, रेस्टॉरेन्टवाल्याच्या शरीरांत कैन्सरचं
कोणतंही लक्षण नाहीये, पण जर असं आहे...म्हणजे, जर त्याला आशंका आहे आणि कोण्या वैदूने त्याला भीति दाखवलीय, तर सगळ्या टेस्ट्स करवून घेणं उत्तम होईल...प्रोफेसरने एका चिट्ठीवर
काहीतरी लिहिलं, हे समजावण्यासाठी की कुठे जावं लागेल,
काय न्यावं लागेल. शिवाय आणखीही एक चिट्ठी लिहिली प्रोफेसर बूरेला
जो न्यूरोपैथोलोजिस्ट होता. रेस्टॉरेन्टवाल्याला सांगण्यांत आलं की त्याची मानसिक
अवस्था खूप बिघडलेली आहे.
“तुम्हांला किती
द्यायचे,
प्रोफेसर?” हळुवार आणि थरथरत्या आवाजांत
रेस्टॉरेन्टवाल्याने आपल्या खिशांतून नोटांचं पैकेट काढंत विचारलं.
“तुम्हाला वाटतील
तेवढे,”
प्रोफेसर रुक्षतेने उत्तर दिलं.
रेस्टॉरेन्टवाल्याने
तीस रूबल्स काढून टेबलावर ठेवले, मग अप्रत्याशितपणे, जणू मांजरासारख्या हातांची हालचाल करंत त्यांच्या वर खणखणीत नाण्यांचा
वर्तमान पत्रांत गुंडाळलेला ढेर ठेवून दिला.
“हे काय आहे?” कूज़्मिनने मिशांवर ताव देत विचारलं.
“संकोच नका करू, नागरिक
प्रोफेसर,” रेस्टॉरेन्टवाला कुजबुजला, “तुम्हाला विनंती करतो – कैन्सरला थांबवून द्या!”
“लगेच आपलं सोनं
उचला,”
प्रोफेसरने स्वाभिमानपूर्वक म्हटलं, “तुम्हीं
आपल्या डोक्याकडे लक्ष द्या, ते जास्त चांगल होईल. उद्यांच
यूरिन-टेस्ट करवून घ्या, जास्त चहा नका पिऊ आणि मीठ बिल्कुल
नका खाऊ.”
“सूपमधे सुद्धां
नाही?”
रेस्टॉरेन्टवाल्याने विचारलं.
“कशातंच नाही,” कूज़्मिनने हुकूम दिला.
“ए..ख...”
रेस्टॉरेन्टवाला निराशेने उद्गारला, प्रेमाने प्रोफेसरकडे बघंत त्याने
सोन्याची नाणी उचलली आणि न वळतां मागे दाराकडे सरकू लागला.
त्या दिवशी
प्रोफेसरकडे जास्त पेशन्ट्स नव्हते आणि संध्याकाळ पर्यंट शेवटचा पेशन्टसुद्धां
चालला गेला. एप्रन काढताना प्रोफेसरने तिकडे बघितलं जिथे रेस्टॉरेन्टवाला नोट
ठेवून गेला होता,
आणि बघतो काय, की तिथे एकही नोट नाहीये,
उलट ‘अब्राऊ दूर्सो’ वाइनचे
तीन लेबल्स पडले आहेत.
“सैतान जाणे हा
काय प्रकार आहे!” एप्रनचा कोपरा ज़मीनीला लावंत कागदाच्या तुकड्यांना हातात घेत
कूज़्मिन बडबडला – “तो फक्त पागलंच नव्हता, पण बदमाशसुद्धां होता! पण
मला समजंत नाहीये, की त्याला माझ्याकडून कशाची अपेक्षा होती?
यूरिन-टेस्ट साठी सिफारिश पत्र? ओह! तो माझा
ओवरकोट घेऊन गेला!” तसाच एका हातांत एप्रन घातलेला तो बाहेरून प्रवेश कक्षाकडे
गेला आणि ओरडला, “क्सेनिया निकितीश्ना! बघा, सगळे ओवरकोट सुरक्षित आहेत ना?”
त्याला कळलं की
सगळे ओवरकोट सुरक्षित आहेत. पण जेव्हां प्रोफेसर एप्रन काढून
परंत टेबलाजवळ आला तर त्याची नजर थबकली आणि तो पुतळ्यासारखा झाला. त्या जागेवर,
जिथे बाटलीचे लेबल्स पडलेले होते, एक लहानसं
काळं, घाणेरडं मांजरीच पिल्लू समोर पडलेल्या प्लेट मधून दूध
पीत होतं.
“हे काय आहे, काही
कळेल का? हे तर...” त्याला जाणीव होत होती की डोकं गार पडंत
चाललय.
प्रोफेसरची हल्की
आणि असहाय किंचाळी ऐकून क्सेनिया निकितीश्ना धावंत आली आणि त्याला सांत्वना देऊ
लागली,
असं सांगून की कदाचित कोणीतरी पेशन्ट मांजरीचं पिल्लू सोडून गेलाय,
प्रोफेसरांकडे बरेचदां असं होतं.
“कदाचित गरीब
असेल,”
क्सेनिया निकितीश्नाने समजावलं, “आणि
आपल्याकडे नक्कीच...”
ते विचार करूं
लागले की ह्या पिल्लाला कोणी फेकून दिलं असेल. दोघांना पोटांत अल्सर असलेल्या म्हातारीचा
संशय आला.
“नक्की, तीच,”
क्सेनिया निकितीश्नाने म्हटलं, “ तिने असा
विचार केला असेल, की मला तर मरायचंच आहे, आणि तिला मांजराच्या पिल्लावर दया आली असेल.”
“पण, विचार
करा,” कूज़्मिन ओरडला, “मग दूध!
तेसुद्धां बरोबर आणलं? प्लेटपण?”
“तिने पाकिटांत दूध
आणलं असेल,
इथे येऊन प्लेटमधे टाकून दिलं,” क्सेनिया
निकितीश्नाने समजावलं.
“काहीही कारण कां
न असो,
ह्या मांजराच्या पिल्लाला आणि प्लेटला इथून काढा,” कूज़्मिनने म्हटलं आणि तो क्सेनिया निकितीश्नाबरोबर दारापर्यंत आला.
जेव्हां परंत आला तर चित्र अगदीच बदललेलं होतं.
खुंटीवर एप्रन
टांगताना,
प्रोफेसरने हसण्याचा आवाज ऐकला; त्याने बाहेर
बघितलं, आणि स्पष्ट आहे, दगडासारखा
झाला. अंगणांत फक्त शर्ट घातलेली एक बाई समोरच्या वराण्ड्याकडे पळंत होती.
प्रोफेसरला माहीत होतं, की ती मारिया अलेक्सान्द्रोव्ना
होती. खिदळण्याचा आवाज एका तरुणाचा होता.
“काय आहे हे?” कूज़्मिनने तिटका-याने म्हटलं.
तेवढ्यंत
भिंतीच्या मागे,
प्रोफेसरच्या मुलीच्या खोलींत पियानोवर ‘अलिलुय्या...’
गाणं वाजू लागलं, आणि प्रोफेसरच्या पाठीमागे
चिमणीची किलबिल ऐकूं आली. तो वळला, आणि बघतो काय, की टेबलवर एक लट्ठ चिमणी फुदकंत होती.
‘हूँ...चुपचाप...’
प्रोफेसरने विचार केला, ‘जेव्हां मी
खिडकीपासून दूर झालो, तेव्हां ही उडून खोलीत आलीय. सगळं ठीक
आहे,’ प्रोफेसरने स्वतःला समजावलं, पण
त्याला वाटंत होतं, की सगळं ठीक नाहीये. सगळंच गडबड आहे,
ह्याच चिमणीमुळे. तिच्याकडे लक्ष देऊन बघताना प्रोफेसरला वाटलं की
ही साधारण चिमणी नाहीये. ती दुष्ट चिमणी डाव्या पायावर वाकून पडंत होती, पंखांची फडफड करंत होती, मान वळवंत होती – म्हणजे
पियानोवरच्या गाण्यावर फॉक्सट्रॉट करंत होती, जणु दारूच्या
गुत्त्यांत कुणी दारुडा असतो. शक्य तेवढी बदमाशी करंत होती, निलाजरेपणाने
प्रोफेसरकडे बघंत डोळा मारंत होती. कूज़्मिनचा हात टेलिफोनवर पडला आणि तो आपला
सहपाठी बूरे ह्याला फोन करूं लागला, हे विचारायला, की साठ वर्षाच्या वयांत अश्या चिमण्यांचा काय अर्थ असतो, विशेषकरून तेव्हां, जेव्हां डोकं अचानक गरगरू लागतं?
येवढ्यांत चिमणी
मोट्ठ्या शाईच्य दौतीवर बसून गेली, जी प्रोफेसरला कुणी तरी भेट दिली
होती, त्यांत घाण करून टाकली (मी गंमत नाही करंत), मग वर उडून हवेंत तरंगली, एका झटक्यांत सन् 1894मधे
युनिवर्सिटीहून निघालेल्या स्नातकांच्या ग्रुप फोटोवर आपल्या, जणू लोखंडासारख्या चोचेने प्रहार केला. फोटोचा काच अगदी चूर-चूर झाला आणि
मग ती खिडकीच्या बाहेर उडून गेली. प्रोफेसरने टेलिफोनचा नंबर बदलून दिला आणि
बूरेच्या ऐवजी ‘जळू-ब्यूरो’5ला फोन करून सांगून टाकलं, “मी प्रोफेसर कूज़्मिन
बोलतोय. माझ्या घरी लगेच जळू पाठवून द्या.”
रिसीवर ठेवून
जसांच तो मागे वळला, प्रोफेसरला पुन्हां धक्काच बसला. टेबलाच्या
मागे नर्ससारखा स्कार्फ़ डोक्यावर बांधलेली एक महिला हातांत बैग घेऊन बसली होती,
जिच्यावर लिहिलं होतं, ‘जळू’. तिच्या तोंडाकडे बघतांच प्रोफेसर किंचाळला. तो एका पुरुषाचा चेहरा होता,
वाकडा, तोंडातून निघून कानापर्यंत जाणारा एक
दात होता. त्या महिलेचे डोळे निर्जीव होते.
“हे पैशे मी ठेवून
घेते,”
पुरुषी आवाजांत ती नर्स म्हणाली, “इथे पडून
राहण्यांत काही अर्थ नाही”. मग तिने पक्ष्यांसारख्या हाताने ते लेबल्स उचलून घेतले
आणि हवेंत विलीन होऊं लागली.
दोन घण्टे झाले, प्रोफेसर
आपल्या शयन-कक्षांत पलंगावर बसला होता. त्याच्या भुवयांवर, कानांच्या
मागे, मानेवर जळू चिकटले होते. कूज़्मिनच्या पायांजवळ,
जे जाड्या रेशमी ब्लैंकेटखाली होते म्हातारा, पांढ-या
मिश्या असलेला प्रोफेसर बूरे बसला होता. तो अत्यंत सहानुभूतिने कूज़्मिनकडे बघंत
होता आणि त्याला धीर देत होता, की हा सगळा निव्वळ मूर्खपणा
आहे. खिडकीतून रात्र डोकावंत होती.
मॉस्कोत त्या
रात्री आणखी काय-काय विचित्र आणि भयानक घटना घडल्या, आम्हांला माहीत नाही आणि
आम्हांला माहिती सुद्धां करून घ्यायची नाही, कारण की
आम्हांला ह्या सत्यकथेच्या दुस-या भागांत जायचंय.
माझ्या बरोबर या, वाचकगण!
*********
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें