चोवीस
मास्टर परत येतो
वोलान्दच्या शयनगृहांत सगळं अगदी तसंच होतं, जसं नृत्य–समारोहाच्या आधी होतं. फक्त एक गाउन घातलेला
वोलान्द पलंगावर बसला होता, फक्त आता हैला त्याच्या पायाला लेप लावंत नव्हती, ती टेबलावर, जिथे आधी
बुद्धिबळाचा खेळ चालला होता, जेवंत होती. करोव्येव आणि अजाज़ेलो फ्रॉककोट उतरवून
टेबलाजवळ बसले होते आणि त्यांच्या जवळ बोका विराजमान होता, ज्याला अजूनही
आपली बो-टाय काढायची नव्हती, जी आतापर्यंत घाणेरडं पोतेरं झालेली होती. मार्गारीटा
अडखळंत टेबलाजवळ गेली आणि त्याचा आधार घेऊन उभी राहिली. तेव्हां वोलान्दने तिला खुणेने
आपल्या जवळ बोलावलं, जसं तेव्हां केलं होतं, आणि आपल्याजवळ बसायला सांगितलं.
“तर, तुम्हांला खूप
त्रास दिला?” वोलान्दने विचारलं.
“ओह, नाही, महाशय,” मार्गारीटाने खूपंच हळू आवाजांत उत्तर दिलं.
“शानदार ड्रिन्क,” बोक्याने म्हटलं आणि एक पारदर्शक द्रव प्याल्यांत
टाकून मार्गारीटाला दिलं.
“ही वोद्का आहे कां?” थकलेल्या आवाजांत मार्गारीटाने विचारलं.
बोक्याला अपमान वाटला आणि तो खुर्चीवर उसळला.
“माफ़ करा, महाराणी,” तो भसाड्या आवाजांत म्हणाला, “मी भद्र महिलेला
वोद्का देण्याची हिंमत तरी करूं शकतो कां? हे नुसतं स्प्रिट आहे.”
मार्गारीटाने स्मित करंत प्याला दूर करण्याचा प्रयत्न केला.
“निःसंकोच पिऊन टाका,” वोलान्दने म्हटलं.
मार्गारीटाने लगेच प्याला हातांत घेतला.
“हैला, बस,” वोलान्दने आज्ञा दिली आणि मार्गारीटाला समजावूं लागला, “पौर्णिमेची रात्र
– उत्सवाची रात्र असते. ह्या रात्री मी आपल्या घनिष्ठ मित्र आणि सेवकांबरोबर डिनर
घेतो. तर, आता कसं वाटतंय तुम्हांला? हा थकवणारा नृत्योत्सव कसा वाटला?”
“अद्भुत!” बोका किरकिरला, “सगळे मुग्ध आहेत, प्रसन्न आहेत, आभारी आहेत! कित्ती नीटनेटकेपणा, बुद्धिमत्ता, योग्यता आणि
मोहकता!”
वोलान्दने चुपचाप प्याला उचलला आणि मार्गारीटाच्या प्याल्याला लावला.
मार्गारीटा चुपचाप पिऊन गेली, हा विचार करंत. की ती लगेच त्या स्प्रिटमुळे मरून
जाईल. पण काहीही वाईट नाही घडलं. तिच्या पोटांत जीवनाची ऊब सळसळली, डोक्याला हल्कासा
झटका बसला आणि तिची शक्ती परंत आली, जणु ती एका दीर्घ, स्फूर्ति देणा-या झोपेतून उठली असावी, आणि तिला प्रचण्ड
भूक देखील लागली. हे आठवल्यावर, की तिने काल सकाळपासून काहीच खाल्लेलं नाहीये, भूक आणखीनंच
खवळली. तिने ताबडतोब मास्यावर हात मारला.
बेगेमोतने अनन्नासचा तुकडा कापला, त्याच्यावर तिखट-मीठ लावून खाऊन टाकला, मग त्याने दुसरा
प्याला अशाप्रकारे भरला, की सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या.
दुसरा प्याला प्यायलावर मार्गारीटाला वाटलं की झुंबरांमधे लागलेल्या
मेणबत्त्या जास्त तीव्र प्रकाश देताहेत. शेकोटीच्या ज्वाळापण प्रखर झाल्याहेत. पण
तिला प्यायल्यासारखं नव्हतं वाटत. आपल्या पांढ-या शुभ्र दातांनी मांसाचा तुकडा
कापंत मार्गारीटा त्यांतून टपकंत असलेला रससुद्धां चोखंत होती, त्याबरोबरंच ती
हे पण बघंत होती की बेगेमोत कसा मास्यावर चटणी लावतोय.
“तू त्याच्यावर द्राक्षसुद्धां ठेव,”
हैलाने बोक्याच्या कंबरेत बोटं गडवंत हळूंच म्हटलं.
“कृपा करून मला शिकवूं नका,” बेगेमोतने उत्तर दिलं, “डाइनिंग टेबलाशी बसलो आहे, त्रास नका देऊं, बसूं द्या!”
“ओह, कित्ती छान वाटतं असं जेवणं, शेकोटीजवळ बसून आपल्या लोकांबरोबर,” करोव्येव
चिरचिरला.
“नाही, फ़ागोत,” बोक्याने प्रतिवाद केला, “नृत्योत्सवाची आपलीच भव्यता आणि शान असते.”
“काही शान-बीन नाहीये, आणि भव्यतापण नाही, आणि त्या मूर्ख अस्वल, आणि वाघांच्या कल्लोळाने माझ्या डोक्यांत, बस माइग्रेनंच
व्हायचं शिल्लक होतं,” वोलान्द म्हणाला.
“मी ऐकतोय, महाशय,” बोका म्हणाला, “जर तुम्हांला असं वाटंत असेल, की भव्यतेसारखी
काहीच गोष्ट नव्हती, तर मी लगेच तुमच्या ‘हो ला हो’ म्हणेन.”
“बघ, तू!” वोलान्द ने प्रत्युत्तरांत म्हटलं.
“मी तर गम्मत करंत होतो,” बोका सलोख्याने म्हणाला, “आणि वाघांचं म्हणाल तर, मी त्यांना तळण्यासाठी पाठवून देईन.”
“वाघांना खात नसतात,” हैला म्हणाली.
“तुम्हीं असं म्हणता? तर मग, कृपा करून ऐका,”
बोका म्हणाला आणि प्रसन्नतेने कपाळावर आठ्या आणंत
सांगू लागला, की एकदा तो कसा बरोब्बर एकोणवीस1 दिवस वाळवंटात
अडकला होता आणि ह्या काळांत त्याने फक्त त्याच वाघाचं मांस खाल्लं, ज्याला त्याने
स्वतःच मारलं होतं. सगळे ही माहिती लक्ष देऊन ऐकंत होते, पण जेव्हां
बेगेमोतने आपली गोष्ट संपवली, तेव्हां सगळे एका सुरांत उद्गारले, “बकवास! बकवास!”
“आणि सर्वांत मजेदार गोष्ट ही आहे,”
वोलान्द ने म्हटलं, “की ही बकवास सुरुवातीपासून शेवटपर्यन्त फक्त खोटी आणि
खोटीच आहे.”
“ओह, इतकं खोटं आहे?” बोका खिदळला. सगळ्यांना वाटलं, की आता तो विरोध
करेल, पण त्याने फक्त येवढंच म्हटलं, “इतिहासंच निर्णय करेल.”
“आणि, सांगा तर खरं,” मार्गोने वोद्काच्या नंतर उत्साहाचा अनुभव करंत
अजाज़ेलोला विचारलं, “तुम्हीं त्या भूतपूर्व सामन्ताला काय गोळी मारली होती?”
“स्पष्टंच आहे,” अजाज़ेलोने उत्तर दिलं, “त्याला कसं नसतं मारलं? त्याला तर गोळी मारायलाच हवी होती.”
“मी इतकी घाबरून गेले होते!” मार्गारीटा उद्गारली, “हे सगळं इतकं
आकस्मिक झालं!”
“ह्यांत आकस्मिक होण्यासारखं काहीच नाहीये,”
अजाज़ेलोने प्रतिवाद केला.
करोव्येव रडक्या आवाजांत म्हणाला, “कोणी घाबरणार कसं नाही! माझ्यापण नसा ताणल्या गेल्या
होत्या. बुख! धम्! सामन्त कुशीवर!”
“मीसुद्धां बस उन्मादाच्या अवस्थेलाच पोहोचलो होतो,” बोक्याने
कैवियरचा चमचा चाटंत जोडलं.
“मला ही गोष्ट नाही कळली,” मार्गारीटा म्हणाली, आणि तिच्या डोळ्यांत क्रिस्टलमधून निघंत असलेले सोनेरी
तारे चमकू लागले, “की काय बाहेर कुठेही संगीताचा किंवा ह्या नृत्योत्सवांत
होत असलेल्या कल्लोळाचा जरासुद्धा आवाज नाही ऐकू आला?”
“बिल्कुलच ऐकूं नाही आला, महाराणी,” करोव्येवने समजावून सांगितलं, “हे अशांच
पद्धतीने करायचं असतं, की काहीही ऐकूं येता कामा नये. ही फार विचारपूर्वक
करायची बाब आहे.”
“हो, ठीकाय, ठीकाय...नाही तर पाय-यांवर बसलेला तो माणूस...जेव्हां
मी आणि अजाज़ेलो चालंत होतो...आणि तो दुसरा, प्रवेशद्वाराजवळचा...मला वाटतं की तुमच्या फ्लैटवर नजर
ठेवली जात आहे.”
“बरोबर आहे, अगदी बरोबर आहे!” करोव्येव ओरडला, “बरोबर आहे, प्रिय मार्गारीटा
निकोलायेव्ना! तुम्हीं माझ्या संशयाची पुष्टीच करताय. हो, तो फ्लैटवर नजर
ठेवंत होता. मी तर त्याला कुणी दारूडा किंवा विसरभोळा विद्वान किंवा प्रेमवीर
समजणार होतो, पण नाही, नाही! काहीतरी माझ्या काळजांत टोचंत होतं. आह, तो फ्लैटवर नजर
ठेवून होता! आणि तो दुसरा, प्रवेशद्वाराजवळचासुद्धां! आणि शिडीच्या वळणावर जो उभा
होता, तो सुद्धां!”
“आणि जर तुम्हांला पकडायला आले तर?”
मार्गारीटाने विचारलं.
“जरूर येतील, मोहक महाराणी, जरूर येतील!” करोव्येवने उत्तर दिलं, “माझं मन सांगतंय
की येतील; इतक्यांत नाही, पण योग्य वेळेवर जरूर टपकतील. पण मला वाटतं की काहीही
मजेदार होणार नाही.”
“ओह, मी कित्ती घाबरले होते, जेव्हां तो सामन्त खाली पडला,” मार्गारीटाने
म्हटलं, जिला अजून पर्यंत त्या हत्येची भीती वाटंत होती. तिने जीवनांत पहिल्यांदाच
कुणाची हत्या होताना बघितली होती, “कदाचित, तुम्हीं खूप छान गोळी चालवता?”
“असंच समजा,” अजाजेलोने उत्तर दिलं.
“किती पावलांवरून?” मार्गारीटाने अजाज़ेलोला अस्पष्टसा प्रश्न विचारला.
“ते अवलंबून असतं, की कसं,” अजाजेलोने तर्कसंगत उत्तर दिलं, “समालोचक
लातून्स्कीच्या आरश्यावर हातोडा घेऊन धावणं वेगळी गोष्ट आहे, आणि त्याच्याचं
हृदयावर गोळी चालवणं - एकदम वेगळी.”
“हृदयांत,” मार्गारीटा उद्गारली. माहीत नाही कां, तिने आपल्या
हृदयावर हात ठेवला, “हृदयांत!” तिने हळूंच पुन्हां म्हटलं.
“हा समालोचक लातून्स्की कोण आहे?” वोलान्दने मार्गारीटाकडे डोळे बारीक करून बघंत
विचारलं.
अजाज़ेलो, करोव्येव आणि बेगेमोतने लाजून डोळे खाली केले.
मार्गारीटाने लाल पडंत उत्तर दिलं, “आहे असा एक समालोचक. आज संध्याकाळी मी त्याच्या
फ्लैटमधे तोडफोड केली होती.”
“काय म्हणतां! पण कां?”
“त्याने, महाशय, एका मास्टरला मारून टाकलंय.”
“पण तुम्हांला स्वत:ला त्रास घ्यायची काय गरज होती?” वोलान्दने
विचारलं.
“मला परवानगी द्या, महोदय,” बोका उडी मारंत आनंदाने ओरडला.
“तू बस रे,” अजाज़ेलो उभा राहात गुरगुरला, “मी स्वतःच
इतक्यात जाऊन येतो...”
“नाही!” मार्गारीटा म्हणाली, “नाही, मी विनंती करते, महाशय, की ह्याची गरंज नाहीये.”
“ठीक आहे, तुम्हांला वाटेल तसं, वाटेल तसं,” वोलान्दने म्हटलं आणि अजाजेलो परंत आपल्या जागेवर बसून
गेला.
“तर, आपण कुठे होतो, बहुमूल्य महाराणी मार्गो?”
करोव्येवने विचारलं, “ओह, हो – हृदय. हृदयांतच
लागेल.” करोव्येवने आपल्या लांब बोटाने अजाजेलोकडे खूण करंत म्हटलं, “इच्छेनुसार, हृदयाच्या
कोणत्याही भागांत, वर किंवा खाली, कुठेही.”
मार्गारीटाला लगेच समजलं नाही, पण समजतांच ती आश्चर्याने ओरडली, “पण ते सगळे तर
बंद असतांत नं!”
“प्रिय महाराणी,” करोव्येव गरजंत म्हणाला, “हाच तर कमाल आहे की ते सगळे बंद आहेत! हीच तर विशेष
गोष्ट आहे! उघड्या वस्तूवर तर कोणीही नेम धरू शकतो!”
करोव्येवने टेबलाच्या खणांतून इस्पीकची सत्ती काढली, तिला
मार्गारीटाच्या समोर आणून बोटाने कोणत्याही एक पॉइंट निवडायला सांगितलं.
मार्गारीटाने उजवीकडच्या वरच्या चिन्हावर बोट ठेवलं. हैलाने तो पत्ता उशीच्या खाली
लपवला आणि ओरडून सांगितलं, “तयार आहे!”
अजाज़ेलोने, जो उशीपासून तोंड फिरवून बसला होता, आपल्या
फ्रॉककोटच्या पैन्टच्या खिश्यातून काळी स्वचालित पिस्तौल काढली, तिची नळी
खांद्यावर ठेवली आणि न वळतां गोळी मारली, ज्यामुळे मार्गारीटाच्या हृदयांत भयमिश्रित
प्रसन्नतेची लाट धावली. गोळी लागलेल्या उशीच्या खालून सत्ती बाहेर काढली गेली.
मार्गारीटाने सांगितलेल्या खुणेच्या आरपार गोळी निघून गेली होती.
“जेव्हां तुमच्या हातांत रिवॉल्वर असेल, तेव्हां मी कधीच तुम्हांला भेटणार नाही,” अजाज़ेलोकडे
तिरप्या नजरेने बघंट मार्गारीटा नखरेलपणाने म्हणाली. तिला ते सगळे लोक आवडायचे, जे काही खूप
चांगलं, अजबसं करून टाकायचे.
“बहुमूल्य महाराणी,” करोव्येव चिरचिरला, “मी तर कोणालांच त्याला भेटण्याचा सल्ला नाही देणार, मग त्याच्या
हातांत पिस्तौल असो किंवा नसो! हे भूतपूर्व कॉयर मास्टर आणी अग्रगायकाचं वचन आहे, की त्याला भेटणा-याचं
कोणीही अभिनंदन करणार नाही.”
ह्या गोळी चालवण्याच्या प्रसंगाच्या वेळेस बोका तोंड फुगवून बसला होता. आता
त्याने घोषणा केली, “मी ह्या सत्तीचं रेकॉर्ड तोडणार!” प्रत्युत्तरांत
अजाज़ेलोने ओरडून काहीतरी म्हटलं. पण बोका हट्टी होता आणि त्याने एक नाही, तर दोन-दोन
पिस्तुलांची मागणी केली. अजाज़ेलोने पैन्टच्या मागच्या खिशांतून दुसरं रिवॉल्वर
काढलं आणि त्याला पहिल्या पिस्तौलबरोबर, काहीशा तिरस्काराने तोंड बनवंत शेखीखोर बोक्यापुढे सरकावलं.
आता सत्तीवर दोन पॉइन्ट्स ठरवले गेले. बोक्याने उशीकडून तोंड फिरवलं आणि बरांच वेळ
तयारी करंत राहिला. मार्गारीटा कानांमधे बोट घालून त्या घुबडाकडे बघंत बसली, जो फायरप्लेसच्या
वरच्या फळीवर बसून डुलक्या घेत होता. बोक्याने दोन्हीं रिवॉल्वर्सने गोळ्या
चालवल्या, ज्याच्यानंतर हैला लगेच ओरडली. मेलेलं घुबड फायरप्लेसवरून खाली पडलं होतं
आणि चूर-चूर झालेलं घड्याळ थांबून गेलं होतं. हैलाने, जिचा एक हात रक्तबंबाळ झाला होता ओरडंत बोक्याचं कातडं
पकडलं, आणि तो, प्रत्युत्तरांत तिचे केस ओढू लागला. ते दोघं एका
चेंडूसारखे फरशीवर लोळूं लागले. टेबलवरून एक प्याला पडून फुटला.
“ह्या वेड्या चेटकिणीला माझ्यापासून दूर करा!” बोका चिरचिरंत होता, आणि हैलाच्या
हातांतून सुटण्याचा प्रयत्न करंत होता, जी त्याच्यावर चढून गेली होती. भांडणा-यांना वेगळं
करण्यांत आलं. करोव्येवने हैलाच्या ज़ख्मी बोटावर फूक मारली आणि ती लगेच बरी झाली.
“माझ्या जवळपास लोकं बोलंत असतील तर मला नेम नाही धरतां येत!” बोका ओरडला
आणि आपलं चामडं ठीक करूं लागला, ज्याचा पाठीकडचा फरचा एक मोट्ठा झुपका सरकून गेला
होता.
“मी पैज लावतो,” वोलान्दने स्मित करंत मार्गारीटाला म्हटलं, “की त्याने हे असं
मुद्दामहूनच केलंय. त्याचा नेम चांगलाच आहे.”
हैलाने बोक्याशी दोस्ती करून घेतली, आणि हे प्रदर्शित करण्यासाठी त्यांनी एकमेकाचं चुम्बन
घेतलं. उशीच्या खालून पत्ता काढून बघितला गेला. अजाजेलोने मारलेल्या
चिन्हाव्यतिरिक्त आणखी कुठेच कोणतंही चिन्ह नव्हतं.
“असं शक्यच नाहीये,” बोक्याने ठामपणे म्हटलं आणि झुम्बराच्या प्रकाशांत
लक्ष देऊन पत्ता बघितला. हसंत-खेळंत जेवण चाललं होतं. झुम्बरांच्या मेणबत्त्या
वितळंत चालल्या होत्या. शेकोटीचा कोरडा सुगंध खोलींत पसरंत होता. पोटभर जेवल्यावर
मार्गारीटाला एक सुखद अनुभूति होत होती. ती बघंत राहिली, की कसे
अजाज़ेलोच्या सिगारातूंन धुराचे वलय निघताहेत, ज्यांना बोका तलवारीच्या नोकेने पकडण्याचा प्रयत्न
करतो आहे. हे कळंत असूनही, की बराच उशीर झाला आहे, तिला कुठेही जावसं वाटंत नव्हतं. कदाचित सकाळचे सहा
वाजले असावेत.
ह्या शांततेचा फायदा घेत मार्गारीटाने नम्रपणे वोलान्दला म्हटलं, “आता मला परवानगी
द्या, माझी वेळ झालीये...उशीर झालांय.”
“तुम्हांला कसली घाई आहे?” वोलान्दने प्रेमाने, पण किंचित रुक्षतेने विचारलं. बाकी सगळे चुपचापंच
राहिले, असं दाखवंत, की ते सिगारच्या वलयांच्या खेळांत मग्न आहेत.
“हो, वेळ झालीय,” हे सगळं बघून मार्गारीटाने किंचित ओशाळून म्हटलं आणि
ती वळली, जणु आपला गाउन किंवा रेनकोट शोधतेय. स्वतःच्या नग्नतेचा तिला अचानक संकोच
वाटला. ती टेबलावरून उठली. वोलान्दने चुपचाप आपला घाणेरडा, डाग असलेला
हाउसकोट उचलला आणि करोव्येवने तो मार्गारीटाच्या खांद्यावर घातला.
“आभारी आहे, महाशय,” मार्गारीटाने हळूच म्हटलं आणि प्रश्नार्थक नजरेने
वोलान्दकडे बघूं लागली. उत्तरादाखल त्याने अत्यंत शालीनतेने आणि उदासीनतेने स्मित
केलं. मार्गारीटाच्या हृदयाला जणु दुःखाच्या काळ्या ढगांने झाकून टाकलं. तिला
वाटलं की तिला फसवलं गेलंय. नृत्योत्सावासाठी अर्पित केलेल्या तिच्या सेवेचं ना तर
तिला कोणतं पारितोषक मिळणार होतं, ना ही कोणी तिला इथे थांबवणार होतं. त्याच बरोबर तिला
हे पण माहीत होतं, की ती इथून कुठेच जाऊं शकंत नव्हती. एक विचार तिच्या
मनाला शिवून गेला, की कुठे पुन्हां आपल्या आलीशान घरांतच न जावं लागो.
आणि, ती उदास झाली. आपणहूनंच निर्ल्लज्जासारखं त्याबद्दल विचारावं कां, ज्याचा सल्ला
अजाज़ेलोने अलेक्सान्द्रोव्स्की पार्कमधे दिला होता? नाही, कोणत्याही परिस्थितीत नाही – तिने स्वतःला बजावलं.
“तुम्हांला शुभेच्छा, महाशय,” तिने म्हटले, आणि मनांतल्या मनांत विचार करूं लागली, ‘बस, इथून निघून तर
जाऊ, मग नदीत जीव देऊन टाकेन.”
“बसा तर खरं,” अचानक वोलान्दने आज्ञा दिली. मार्गारीटाच्या चेह-याचा
रंग बदलला, आणि ती बसली.
“कदाचित, जातां-जातां मला काही सांगायचंय?” वोलान्दने
विचारलं.
“नाही, काहीच नाही, महाशय,” मार्गारीटाने स्वाभिमानपूर्वक म्हटलं, “बस, हेच, की जर तुम्हांला
अजूनही माझी गरंज असेल तर मी आनंदाने तुमच्या आज्ञेचं पालन करेन. नृत्योत्सवांत मी
जराही नाही थकले आणि मला खूप मजा आली. म्हणजे की, जर तो आणखीही चालला असता, तरी मी हज्जारों सुळावर टांगलेल्या आणि मारेक-यांसमोर
चुम्बन घेण्यासाठी आनन्दाने आपला गुडघा पुढे केला असतां,” मार्गारीटाने
वोलान्दकडे जणु पडद्यांतून पाहिलं, तिच्या डोळ्यांत अश्रू दाटले होते.
“बरोब्बर आहे! तुम्हीं एकदम बरोब्बर बोलताय!” वोलान्द भयंकर आवाजांत ओरडला, “असंच असायला
पाहिजे!”
“असंच असायला पाहिजे!” त्याचे सहयोगी जणु प्रतिध्वनीसारखे उद्गारले.
“आम्हीं तुमची पारख करंत होतो,” वोलान्द म्हणंत राहिला, “कधीही, काहीही मागू नका, काहीही नाही, विशेषकरून त्यांच्याकडून, जे तुमच्याहून शक्तिशाली आहेत. ते स्वतःच प्रस्ताव
मांडतील आणि आपणहूनंच सगळं देतील! बसून जा, स्वाभिमानी महिला!” वोलान्दने मार्गारीटाच्या
खांद्यांवरून भारी-भरकम हाउसकोट खेचून टाकला. ती पुन्हां त्याच्याजवळ पलंगावर
बसलेली आढळली, “तर, मार्गो,” वोलान्दने आपला आवाज सौम्य करंत म्हटलं, “आज तुम्हीं
माझ्यासाठी होस्टेसम्हणून काम केलं, त्याच्यासाठी तुम्हांला काय पाहिजे? नग्नावस्थेंत
नृत्योत्सवाचं संचालन करण्यासाठी तुम्हांला काय पाहिजे? आपल्या गुडघ्याची काय किंमत लावतांय? माझ्या
पाहुण्यांमुळे, ज्यांना तुम्हीं आत्ताच सुळावर टांगलेले आणि मारेकरी
म्हटलं, तुमचा काय तोटा झालांय? सांगा! आता अगदी निःसंकोचपणे सांगा, कारण की प्रस्ताव
मी मांडलाय.”
मार्गारीटाचं हृदय जोराने धडधडलं, एक दीर्घ श्वास घेऊन ती काही विचार करूं लागली.
“बोला, बेधडक सांगा!” वोलान्दने तिला प्रोत्साहित केलं, “स्वतःच्या
विचारशक्तीवर, कल्पनाशक्तीवर जोर द्या, तिला उत्तेजना द्या! फक्त त्या लुच्च्या, इतिहासांत जमा
सामन्ताच्या हत्येच्या वेळेस हजर राहिल्याबद्दलंच कोणालाही बक्षीस मिळालं पाहिजे, आणि जर ती
व्यक्ति एखादी महिला असेल, तर उत्तमच. तर?”
मार्गारीटाचा वरचा श्वास वर आणि खालचा खाली राहिला. ती ठरवलेल्या उत्तम
शब्दांत आपले मनोगत मांडणारंच होती की अचानक तिचा चेहरा विवर्ण झाला, तिचं तोंड उघडंच
राहिलं, डोळे बाहेर आले. “फ्रीडा! फ्रीडा! फ्रीडा!” – कोणाचातरी विनंती करंत असलेला
आवाज कानांत घुमूं लागला. “माझं नाव फ्रीडा आहे!” आणि मार्गारीटा अडखळंत बोलली, “हो, काय मी एका
गोष्टीसाठी विनंती करू शकते?”
“मागा, मागा, माझ्या लाडक्या,”
वोलान्दने उत्तर दिलं, जणु तो काही समजंत असल्यासारखा हसला. “एका गोष्टीची
मागणी करा!”
आह, कित्ती सफ़ाई आणि स्पष्टतेने वोलान्दने ज़ोर देऊन मार्गारीटाच्याच शब्दाची
पुनरावृत्ति केली होती, “एक गोष्ट!”
मार्गारीटाने पुन्हां श्वास घेतला आणि म्हणाली, “माझी इच्छा आहे, की फ्रीडाला तो रुमाल देणं थांबवण्यांत यावं, ज्याने तिने
आपल्या मुलाचा दम घोटला होता.”
बोक्याने आकाशाकडे बघितलं आणि जोराने श्वास घेतला, पण काही बोलला
नाही. कदाचित त्याला नृत्योत्सवांत पिरगळलेल्या कानाची आठवण आली असावी.
“ही गोष्ट लक्षांत घेतां, की त्या मूर्ख मुलीकडून काही लाच मिळणार नाहीये – तसं, हे तुमच्या
सम्राज्ञीपदाच्या गरिमेविरुद्ध आहे, म्हणा – मला कळंत नाहीये, की काय करावं. फक्त एकंच गोष्ट करता येण्यासारखी आहे –
माझ्या शयनगृहाच्या सगळ्या भेगा बोळ्यांनी बंद करव्यांत.”
“तुम्हीं कशाबद्दल बोलताय, महाशय?” मार्गारीटाने हे असंबद्ध शब्द ऐकून आश्चर्याने
विचारलं.
“मी तुमच्याशी पूर्णपणे सहमत आहे, मालक,” बोका मधेच टपकला, “अगदी बोळ्यांनीच,”
आणि त्याने उत्तेजनेने टेबलवर पंजा मारला.
“मी सहृदयतेबद्दल बोलतोय,” वोलान्दने आपला लाल-लाल डोळा मार्गारीटावरून न हलवता, आपले शब्द
समजावले, “कधी-कधी एकदम अप्रत्याशितपणे आणि घाबरंत-घाबरंत ती बारीकश्या भेगेंतून घुसून
येते, म्हणूनंच मी बोळ्यांबद्दल बोलंत होतो.”
“मी पण त्याबद्दलंच बोलंत होतो,” बोक्याने मार्गारीटापासून दूर होत आपल्या गुलाबी क्रीम
लावलेल्या तीक्ष्ण कानांना पंज्यांने झाकंत शेरा मारला.
“पळ इथून,” वोलान्द त्याला म्हणाला.
“मी अजून कॉफी नाही प्यायलोय,” बोक्याने उत्तर दिलं, “मग मी कसा जाणार, मालक, उत्सवाच्या रात्री पाहुण्यांना दोन प्रकारांमधे वाटणं
योग्य आहे का? पहिले प्रथम श्रेणीचे, आणि दुसरे, जसं त्या निराश, माथेफिरू रेस्टॉरेन्टवाल्याने सांगितलं होतं – दुस-या
श्रेणीचं ताजेपण?”
“गप्प बस,” वोलान्दने त्याला हुकुम दिला आणि मार्गारीटाकडे वळून
म्हणाला, “तुम्हीं, असं वाटतं, की खूप दयाळु आहांत? उच्च सिद्धांत असलेल्या?”
“नाही,” मार्गारीटाने ठासून म्हटलं, “मला माहितीये, की तुम्हांला सगळं स्पष्टंच सांगितलं पाहिजे, आणि मी तुम्हांला
अगदी खरं-खरं सांगतेय : मी एक उथळ विचारांची, भटकलेली बाई आहे. मी फ्रीडाबद्दल तुम्हांला ह्यासाठी
विनंती केली होती, कारण की निष्काळजीपणाने मी तिला दाट अपेक्षा देऊन
बसलेय. ती वाट पाहतेय, महाशय; तिला माझ्या सामर्थ्यांत विश्वास आहे. जर तिला धोका
दिला तर मी फार भयानक परिस्थितीत अडकेन. मला आयुष्यभर शांतता नाही लाभणार. काहीच
उपाय नाहीये, जे व्हायचं होतं, ते होऊन गेलं.”
“आह,” वोलान्द म्हणाला, “आता मला समजतंय.”
“तर, तुम्ही हे कराल?” मार्गारीटाने हळूच विचारलं.
“बिल्कुल नाही,” वोलान्दने उत्तर दिलं, “गोष्ट अशी आहे, महाराणी, की इथे एक छोटीशी गडबड झालीये. प्रत्येक भूताला किंवा
चेटकिणीला स्वतःच आपलं-आपलं काम करावं लागतं. ही गोष्ट वेगळी आहे, की आमचं सामर्थ्य
खूपंच जास्त आहे; काही जागरूक लोक जेवढं समजतात, त्याहूनही
कित्येक पटींनी जास्त...”
“हो, खूप, खूप जास्त,” बोका स्वतःला थांबवू नाही शकला. त्याला, स्पष्टंच होतं, की ह्या
सामर्थ्यावर गर्व होता.
“चूप,” तुला सैतान घेऊन जावो!” वोलान्दने त्याला म्हटलं आणि मार्गारीटाकडे बघंत पुढे
म्हणाला, “ पण ते केल्याने काय फायदा, जे कुणा दुस-या शक्तीला करायचं असतं? तर, मी हे करणार
नाहीं, आणि तुम्हीं स्वतःच हे कराल.”
“आणि, माझ्याच्याने ते होईल कां?”
अजाज़ेलोने व्यंगपूर्वक आपला तिरपा डोळा मार्गारीटावर रोखला आणि, चुपचाप आपलं लाल
डोकं झटकून हसला.
“हो, करा नं, काय कटकट आहे!” वोलान्द बडबडला आणि, ग्लोबला फिरवून
त्यांत काहीतरी बघूं लागला. स्पष्ट होतं, की तो मार्गारीटाशी बोलतांना काही आणखीसुद्धां करंत
होता.
“तर, फ्रीडा,” करोव्येव कानांत कुजबुजला.
“फ्रीडा!” कर्कश आवाजांत मार्गारीटा ओरडली.
फट्कन दार उघडलं आणि अव्यवस्थित, नग्न फ्रीडा सुजलेल्या डोळ्यांनी धावंत खोलीत आली, तिचा कैफ़
पूर्णपणे उतरलेला होता, तिने येतांच मार्गारीटाकडे हात केले. मार्गारीटा राजसी
थाटांत म्हणाली, “तुला क्षमा प्रदान करण्यांत येत आहे. आता तुला तो
रुमाल देण्यांत येणार नाही.”
फ्रीडाचा हुंदका ऐकू आला, ती ज़मिनीवर पडून क्रॉसच्या मुद्रेंत मार्गारीटासमोर
पसरली, वोलान्दने आपला हात झटकला, आणि फ्रीडा गायब झाली.
“धन्यवाद, मला निरोप द्या,”
मार्गारीटाने म्हटलं आणि ती उठू लागली.
“तर, बेगेमोत,” वोलान्द ने बोलायला सुरुवात केली, “उत्सवाच्या
रात्री एका अव्यावहारिक माणसाच्या वागण्यावर लक्ष नाही देणार,” तो मार्गारीटाकडे
वळला, “तर, हे धरलं नाही जाणार, कारण की मी काहीच केलेलं नाहीये. तुम्हांला स्वतःसाठी
काय हवंय?”
शांतता पसरली, जिला मार्गारीटाच्या कानांत कुजबुजंत करोव्येवने भंग
केलं, “बहुमूल्य सम्राज्ञी, ह्यावेळेस मी असा सल्ला देईन की तुम्हीं अक्कल वापरा!
कुठे सौभाग्य हातांतून निसटून न जावो!”
“माझी इच्छा आहे की आत्ता, ह्याच क्षणी माझा प्रियतम मास्टर मला परंत देण्यांत
यावा,” मार्गारीटाने म्हटलं आणि तिच्या चेह-याच्या रेषा थरथरू लागल्या.
तेवढ्यात खोलीत प्रचण्ड वा-याचा झोत घुसला, ज्याने मेणबत्त्यांची ज्योत आडवी झाली, खिडकीचा जाड पडदा
उघडून गेला, खिडकी फट्कन उघडली आणि दूर उंचावर पूर्ण; सकाळचा नसून, अर्धरात्रीचा चंद्र दिसला. खिडकीच्या चौकटीतून फरशीवर
रात्रीच्या प्रकाशाचा हिरवंट रुमाल आत शिरला, त्या प्रकाशांत प्रकट झाला इवानूश्काचा रात्रीचा
पाहुणा, जो स्वतःला मास्टर म्हणायचा. तो हॉस्पिटलच्या रुग़्णांच्या वेशभूषेंत होता –
गाउन, जोडे आणि काळी टोपी, जी तो स्वतःपासून कधीच दूर करंत नसे. दाढी वाढलेला
त्याचा चेहरा विकृत हावभावांनी थरथरंत होता. त्याने वेड्यासारखं घाबरंत मेणबत्त्यांच्या
प्रकाशाकडे पाहिलं. चंद्राचा प्रकाश त्याच्या अवती-भवती जणु उफ़ाळून येत होता.
मार्गारीटाने लगेच त्याला ओळखलं, ती कण्हली आणि हात नाचवंत धावंतंच त्याच्या जवळ आली.
तिने त्याच्या कपाळाचं चुम्बन घेतलं, ओठांचं चुम्बन घेतलं, त्याच्या खडबडीत गालावर आपला गाल घासला, आणि इतका वेळ
थोपवून धरलेले अश्रू अगणित धारांनी तिच्या चेह-याला भिजवू लागले. ती फक्त एकंच
शब्द घोकंत होती : “तू...तू...तू!”
मास्टर तिला दूर ढकलंत म्हणाला, “रडू नकोस, मार्गो, मला दुःखी नको करू, मी खूप आजारी आहे.” त्याने खिडकीची चौखट हातांनी पकडली, जणु त्याला लगेच
उडी मारून पळून जायचंय. बसलेल्या लोकांना बघून त्याने दात खाल्ले आणि ओरडला, “मला भीती वाटतेय, मार्गो! मला
पुन्हां भ्रम झालांय!”
हुंदक्यांनी मार्गारीटाचा श्वास कोंडू लागला, ती एक-एक शब्दावर जोर देत म्हणाली, “नाही, नाही, नाही, कोणत्याच
गोष्टीला घाबरू नको! मी तुझ्याबरोबर आहे न!”
करोव्येवने हळूच, चुपचाप मास्टरकडे खुर्ची सरकवली आणी तो खुर्चीत बसून
गेला, आणि मार्गारीटा गुडघे टेकून रुग्णाला बिलगली आणि शांत झाली. आपल्या ह्या
उत्तेजनेंत तिला कळलंही नाही, की केव्हां तिच्या नग्न शरीराला काळ्या रेशमी गाउनने
झाकलं. रुग्णाने मान खाली केली आणि आजारी, निराश डोळ्यांने जमिनीकडे बघूं लागला.
“हो,” थोड्या शांततेनंतर वोलान्द म्हणाला, “ह्याला खूपंच त्रास दिलाय.” त्याने करोव्येवला आज्ञा
दिली, “माझ्या शिलेदारा, ह्या माणसाला प्यायला काहीतरी दे.”
मार्गारीटाने थरथरत्या आवाजांत मास्टरची विनवणी केली, “पिऊन टाक, पिऊन टाक! तू
घाबरतोयंस कां? नाही,नाही, माझ्यावर विश्वास ठेव, हे तुझी मदत करतील.”
रुग्णाने प्याला घेतला आणि त्यांत असलेलं पेय पिऊन टाकलं, पण त्याचा हात
थरथरंत होता आणि रिकामा प्याला त्याच्या पायाजवळ पडून फुटला.
“शुभ शकुन आहे! शुभ शकुन आहे!” करोव्येव मार्गारीटाच्या कानांत कुजबुजला, “बघा, त्याची शुद्ध परंत
येत आहे!”
खरंच, रुग्णाच्या नजरेंत आता तेवढा रानटीपणा नव्हता.
“मार्गो, ही तूंच आहेस कां?”
चंद्राच्या पाहुण्याने विचारलं.
“शंकाच नाही, ही मीच आहे,”
मार्गारीटाने उत्तर दिलं.
“आणखी!” वोलान्दने आज्ञा दिली.
दुसरा प्याला संपवल्यावर मास्टरच्या डोळ्यातील चमक आणि त्याची हुशारी परंत
आली.
“आता ही गोष्ट काही औरंच आहे,” वोलान्दने डोळे बारीक करंत म्हटलं, “चला, आता बोलूं या.
तुम्हीं कोण आहांत?”
“आता मी कोणीच नाहीये,” मास्टरने उत्तर दिलं आणि एक गूढ हास्य त्याच्या
चेह-यावर पसरलं.
“आता तुम्हीं कुठून आलांत?”
“वेड्यांच्या दवाखान्यांतून. मी...मानसिक रुग्ण आहे,” आगंतुकाने उत्तर
दिलं.
मार्गारीटाला हे शब्द सहन नाही झाले आणि ती पुन्हां रडूं लागली. मग डोळे
पुसून ती ओरडली, “कित्ती भयानक शब्द आहेत! भयानक! हा मास्टर आहे, महाशय, मी तुम्हांला
सांगतेय. त्याला बरं करा, त्याची ह्यासाठी पात्रता आहे.”
“तुम्हांला
माहितीये का, की तुम्हीं कोणाशी बोलताय?”
वोलान्दने आगंतुकाला विचारलं, “कोणाकडे आले
आहांत?”
“माहीत आहे,” मास्टरने उत्तर दिलं, “वेड्यांच्या दवाखान्यांत माझा शेजारी होता तो मुलगा, इवान बिज़्दोम्नी.
त्याने मला तुमच्याबद्दल सांगितलं होतं.”
“काय म्हणतां, काय म्हणतां!”
वोलान्द म्हणाला, “मला पत्रियार्शी तलावावर ह्या तरुणाला भेटायचं सौभाग्य
प्राप्त झालं होतं, त्याने तर माझी बुद्धीच कुंठित केली, असं म्हणून, की मी नाहींच
आहे! पण तुम्हांला तर विश्वास आहे ना, की हा खरंच मीच आहे?”
“ विश्वास करावांच लागेल,” आगंतुक म्हणाला, “पण जास्त चांगलं हेंच राहील, की तुम्हांला
दिवास्वप्नाचा, भ्रमाचा
चमत्कार म्हणून स्वीकार करावं. माफ करा,”
किंचित थांबून मास्टर म्हणाला.
“तर काय, जर हे चांगलं आहे, तर असंच करा,”
वोलान्दने सहृदयतेने उत्तर दिलं.
“नाही, नाही,” मार्गारीटा घाबरून म्हणाली आणि तिने मास्टरचा खांदा
पकडून त्याला हलवलं, “शुद्धीवर ये! तुझ्यासमोर खरोखरंच तोच आहे!”
बोका इथेपण मधेच अडमडला, “आणि, मी तर खरोखरंच भ्रमासारखा आहे. चांदण्या रात्रींत
माझ्या आकारा-प्रकाराकडे लक्ष द्या,” बोका चंद्राच्या प्रकाशांत सरकला आणि तो काही बोलणारंच
होता, की त्याला गप्प राहण्यास सांगण्यांत आलं आणि तेव्हां तो येवढं म्हणून, की “बरं, बरं, गप्प राहीन! मी मौन
भ्रम होऊन जाईन!” चुप झाला.
“बरं, हे तर सांगा की मार्गारीटा तुम्हांला मास्टर कां म्हणते?” वोलान्दने
विचारलं.
तो हसला आणि म्हणाला, “ही दुर्बलता क्षमा करण्याजोगी आहे. हिचे त्या
कादम्बरीबद्दल फार उच्च विचार आहेत, जी मी लिहिली होती.”
“कशाबद्दल आहे कादम्बरी?”
“पोंती पिलातबद्दल.”
तेवढ्यांत मेणबत्त्यांची ज्योत पुन्हां उसळून, फडफडून, प्रखर झाली, टेबलावर ठेवलेली भांडी हलूं लागली, वोलान्द गडगडंत
हसला, पण त्याने ह्या गडगडाटाने कुणाला ना तर घाबरवलं, ना आश्चर्यचकित केलं. बेगेमोतने माहीत नाही कां, टाळ्या वाजवल्या.
“कशाबद्दल, कशाबद्दल? कोणाबद्दल?” वोलान्दने हसणं थांबवंत विचारलं, “आता घ्या? ही खरोखरंच आश्चर्यांत
टाकणारी गोष्ट आहे! तुम्हांला दुसरा कोणचा विषय नाही मिळाला? आणा, बघू,” वोलान्दने आपल्या
हात समोर केला.
“क्षमा करा, मला असं करतां येणार नाही,”
मास्टरने उत्तर दिलं, “कारण की मी तिला शेकोटीत जाळून टाकलंय.”
“माफ़ करा, माझ्या ह्या गोष्टीवर विश्वास नाही,” वोलान्द म्हणाला, “असं शक्यंच
नाहीये. हस्तलिखितं कधीच जळंत नसतात 2.” तो बेगेमोतकडे वळला आणि
म्हणाला, “अरे, बेगेमोत, कादम्बरी इकडे दे.”
बोका पट्टकन खुर्चीवरून उसळला, आणि सगळ्यांनी बघितलं, की तो पाण्डुलिपींच्या एका मोठ्ठ्या ढीगावर बसला आहे.
सगळ्यांत वरचं हस्तलिखित त्याने वाकून अभिवादन करंत वोलान्दकडे दिलं. मार्गारीटा
थरथरली आणि किंचाळली, घाबरल्यामुळे तिच्या डोळ्यांत पुन्हां अश्रूंनी गर्दी
केली.
“हेच आहे, हस्तलिखित! हेच आहे!”
ती वोलान्दसमोर वाकली आणि प्रसन्नतेने म्हणाली, “सर्वशक्तिमान! सर्व शक्तिमान!”
वोलान्दने ते हस्तलिखित हातांत घेतलं, आलटून-पालटून पाहिलं आणि त्याला ठेवून दिलं आणि चुपचाप, न हसता मास्टरकडे
बघू लागला. पण तो न जाणे कां दुःखांत आणि बेचैनीत खुर्चीवरून उठला, आणि दूर
चंद्राकडे बघंत, हात नाचवंत थरथरंत बडबडू लागला.
“रात्री, चंद्राच्या प्रकाशांतसुद्धां मला चैन नाहीये. मला कां
इतकं छळलंय? अरे देवा, देवा...”
मार्गारीटा रुग्णाच्या गाउनला धरून त्याला बिलगली. ती सुद्धां दुःखांत बुडून
अश्रुपूर्ण आवाजांत म्हणाली, “अरे देवा, तुझ्यावर औषधाचा असर कां नाही होत आहे?”
“काही हरकत नाही, काही हरकत नाही, काही हरकत नाही,”
करोव्येव मास्टरच्या जवळ जांत कुजबुजला, “काही हरकंत
नाही...आणखी एक प्याला, आणि मीसुद्धां तुमच्याबरोबर घेईन.”
आणि प्याला लपाछिपी खेळंत चंद्राच्या प्रकाशांत चमकला आणि ह्या प्याल्याने
आपलं काम केलं. मास्टरला परंत त्याच्या जागेवर बसवलं, रुग्णाचा चेहरा शांत झाला.
“हुँ, आता सगळं समजलंय,” वोलान्दने म्हटलं आणि आपल्या मधल्या बोटाने
हस्तलिखितावर टकटक करूं लागला.
“एकदम स्पष्ट आहे,” बोक्याने पुष्टी केली, तो आपलं मौन भ्रम
बनून राहण्याचं वचन विसरला होता.
“आता ह्या कारस्थानाची मुख्य कडी मी स्पष्ट बघूं शकतो. तुझं काय म्हणणं आहे, अजाज़ेलो?” तो चुपचाप
असलेल्या अजाज़ेलोकडे वळला.
“मी म्हणतोय,” तो दबक्या आवाजांत म्हणाला, “की तुला बुडवणं चांगलं राहील.”
“दया कर, अजाज़ेलो,” बोक्याने त्याला उत्तर दिलं, “माझ्या मालकाला
असं करण्याचा सल्ला नको देऊं. . विश्वास कर की जर मी दररोज रात्री तुझ्याकडे असेच
चंद्राचे कपडे घालून आलो असतो, जसे ह्या गरीब बिचा-या मास्टरने घातलेयंत, तुला खुणा केल्या
असत्या, तुला आपल्याकडे बोलावलं असतं, तर, हे अजाज़ेलो, तुला कसं वाटलं असतं?”
“तर, मार्गारीटा,” वोलान्दने गोष्टींच सूत्र आपल्या हातांत घेत विचारलं, “सांगा बरं, की तुमची काय
इच्छा आहे?”
मार्गारीटाचे डोळे मोट्ठे-मोट्ठे झाले. तिने वोलान्दला विनंती केली, “मला त्याच्याशी
बोलूं द्याल कां?”
वोलान्दने डोकं हलवून ‘हो’ म्हटलं, तर मार्गारीटाने मास्टरच्या कानाला चिटकून कुजबुजंत
काही तरी म्हटलं. स्पष्ट ऐकूं आलं की मास्टरने म्हटलं, “नाही. खूप उशीर झालाय. मला जीवनांत ह्याच्याशिवाय आता
काही नको की तू माझ्यासमोर राहावं. पण मी तुला पुन्हां सल्ला देतो की मला सोडून
दे. माझ्याबरोबर तुझंपण नुक्सान होईल.”
“नाही, नाही सोडणार,”
मार्गारीटाने उत्तर दिलं आणि ती वोलान्दकडे वळली, “मी प्रार्थना करते
की आम्हांला पुन्हां अर्बातच्या त्याच घरांत पाठवावं; टेबलावर लैम्प जळंत असावा आणि सगळं काही अगदी तस्संच
व्हावं, जसं आधी होतं.”
आता मास्टर हसला आणि मार्गारीटाचा कुरळ्या केसांचा चेहरा आपल्या हातांमधे
धरून म्हणाला:
“आह, ह्या गरीब बाईच्या गोष्टींकडे लक्ष नका देऊं, महाशय! त्या घरांत केव्हांपासूनंच कोणी दुसरा माणूस
राहतोय, आणि असं कधी होत नसतं, की सगळं तसंच व्हावं, जसं आधी होतं.” त्याने आपला गाल मार्गारीटाच्या
डोक्यावर ठेवला आणि तिला आपल्या बाहुपाशांत घेतलं, आणि बडबडू लागला, “
बिचारी, बिचारी...”
“तुम्हीं म्हणतां, की नाही होऊं शकंत?”
वोलान्दने म्हटलं, “हे बरोबर आहे, पण आम्ही प्रयत्न करूं...” आणि तो म्हणाला, “अजाज़ेलो!”
तेवढ्यांत छतांतून खाली कोसळला एक घाबरलेला आणि बावरलेला नागरिक, ज्याने फक्त
अंतर्वस्त्र घातले होते , पण त्याच्या हातांत, न जाणे कां एक सूटकेस होती आणि डोक्यावर होती टोपी. तो
माणूस भीतीने थरथरंत होता आणि तो धपकन् खाली बसला.
“मोगारिच?” अजाज़ेलोने त्या आकाशांतून टपकलेल्या प्राण्याला
विचारलं.
“अलोइज़ी मोगारिच3,” त्याने थरथरंत उत्तर दिलं.
“तुम्हीं तेच आहांत न, ज्याने ह्या माणसाच्या कादम्बरीबद्दल लिहिलेला
लातून्स्कीचा लेख वाचून ह्याची असं सांगून फिर्याद केली की त्याने अवैध साहित्य
आपल्या घरांत लपवून ठेवलंय?” अजाज़ेलोने विचारलं.
नव्या नागरिकाचं शरीर निळं पडलं आणि त्याच्या डोळ्यांतून पश्चात्तापाचे
अश्रू वाहू लागले.
“तुम्हाला ह्याच्या खोल्यांमधे जायचं होतं?”
अजाज़ेलोने शक्य तेवढी सहृदयता दाखवंत विचारलं.
रागावलेल्या बोक्याची गुरगुर खोलींत ऐकूं आली आणि मार्गारीटाने कर्कश
आवाजांत म्हटलं, “बघून घे! चेटकिणीला बघून घे!” आणि ती अलोइज़ी
मोगारिचच्या चेह-यावर आपले नखं गडवूं लागली. एकंच कल्लोळ माजला.
“काय करतेयस?” मास्टर दुःख आणि वेदनेने किंचाळला, “मार्गो, स्वतःला कलंकित
नको करू!”
“मी विरोध करतो, हे कलंकित करणारं कृत्य नाहीये,” बोका गरजला.
करोव्येवने मार्गारीटाला मागे ओढलं.
“मी बाथरूम बनवलं,” दात किटकिटंत रक्तबंबाळ मोगारिच म्हणाला आणि भीतीने
काही दुसरंच बोलूं लागला, “एक वेळा रंग... सल्फ्युरिक एसिड...”
“चला, बरंच आहे की बाथरूम बनवलं,” अजाज़ेलोने त्याचं समर्थन करंत म्हटलं, “त्याला अंघोळ
करायलाच पाहिजे!” आणि ओरडला, “चालता हो!”
तेव्हां मोगारिच उलटा लटकूं लागला आणि एका झटक्यांत वोलान्दच्या शयन
गृहाच्या उघड्या खिडकीतून बाहेर फेकला गेला.
मास्टरचे डोळे उघडेच राहिले, तो कुजबुजला, “पण हे त्या कारीगरीपेक्षां जास्त नीटनेटकं आहे, ज्याच्याबद्दल
इवानने सांगितलं होतं!” पूर्णपणे स्तंभित झालेला तो डोळे गरगर फिरवंत होता आणि
शेवटी त्याने बोक्याला म्हटलं, “माफ करा...हे तू...हे तुम्हीं...” तो थबकला, हे ठरवूं नाही
शकला, की बोक्याला ‘तू’ म्हणायला पाहिजे, किंवा ‘तुम्हीं’, “तुम्हीं तेच बोके आहांत का, जे ट्रामगाडीत बसले होते?”
“मीच आहे,” खूश होऊन बोक्याने पुष्टी केली आणि पुढे म्हणाला, “मला हे ऐकून खूप
आनन्द झाला की तुम्हीं बोक्याशीपण इतक्या सौजन्याने वागता. बोक्यांना न जाणे कां
नेहमी ‘तू’ म्हणूनंच संबोधित करतात, तसं एकाही बोक्याने कोणाचबरोबर ‘ब्रुदरशॅफ्ट’4ची प्रतिज्ञा नाही घेतलीये.”
“मला न जाणे कां, असं वाटतंय की तुम्हीं एकदम बोके नाही आहांत,” मास्टरने
दुविधेने उत्तर दिलं आणि त्याने घाबरंत-घाबरंत वोलान्दला म्हटलं, “मला कोणत्याही
परिस्थितीत हॉस्पिटलचे लोक पकडून घेऊन जातील.”
“असे कसे गेऊन जातील!” करोव्येवने त्याला धीर देत म्हटलं, आणि त्याच्या
हातांत काही कागद आणि काही पुस्तकं दिसले, “हे तुमच्या आजाराचे केस-पेपर्स आहे?”
“हो.”
करोव्येवने आजाराचे केस-पेपर्स शेकोटीत झोकून टाकले.
“कागद-पत्र नाही, तर माणूसही नाही,”
संतुष्ट होऊन करोव्येव म्हणाला, “आणि हे तुमच्या
घरमालकाशी संबंधित कागद पत्र आहे?”
“हो...आँ...”
“ह्यांत कोणाचं नाव लिहिलंय? अलोइज़ी मोगारिच?”
करोव्येवने त्या पुस्तिकेच्या पानावर फूक मारली, “फू!...तो नाहीये, नीट बघा – तो
नव्हतांच. जर घरमालकाला आश्चर्य वाटलं, तर त्याला सांगा, की त्याला अलोइज़ीबद्दल स्वप्न पडलं होतं. मोगारिच? कोण मोगारिच? कोणीच मोगारीच
कधी नव्हतांच.” लगेच ती पुस्तिका धूर बनून करोव्येवच्या हातांतून उडून गेली, “आणि आता ती
पुस्तिका आहे घरमालकाच्या टेबलाच्या खणांत.”
“तुम्हीं बरोबर म्हणतांय,” मास्टरने करोव्येवच्या हाताच्या कौशल्याने अचंभित होत
म्हटलं, “की जर कागदपत्र नाहीत, तर माणूसपण नाहीये. म्हणूनंच तर मीसुद्धां नाहीये, माझ्याकडे कोणतंच
परिचय पत्र वगैरे नाहीये.”
“माफ करा,” करोव्येव ओरडला, “हे खरोखरंच सम्मोहन आहे, हे राहिले तुमचे पेपर्स,”
आणि करोव्येवने मास्टरला परिचय पत्र दिलं. मग त्याने
इकडे तिकडे बघितलं आणि खूप प्रेमाने कुजबुजंत मार्गारीटाला म्हटलं, “आणि हा घ्या
तुमचा खजिना, मार्गारीटा निकोलायेव्ना,”
आणि त्याने मार्गारीटाला कोप-यांवर काळपट झालेलं
हस्तलिखित, वाळलेला गुलाब, फोटो, आणि विशेष काळजीने बैंकेचं पासबुक दिलं, “दहा हजार, जे तुम्हीं जमा
केले होते, मार्गारीटा निकोलायेव्ना! आम्हांला परक्या वस्तू नकोत.”
“माझे पंजेच झडून जातील, जर मी परक्या वस्तूला हात लावला तर,” बोका सूटकेसवर
नाचंत नखरे करंत म्हणाला. तो सूटकेसवर नाचंत होता, जेणे करून त्या दुर्दैवी कादम्बरीच्या हस्तलिखिताच्या
सगळ्या प्रति सूटकेसमधे नीट सामावतील.
“आणि तुमचं परिचय पत्रसुद्धां – हे घ्या,”
करोव्येवने मर्गारीटाला कागदपत्र देत म्हटलं. आणि मग
वोलान्दकडे वळून आदराने म्हणाला, “सगळं झालं, मालक!”
“नाही, सगळं नाही झालं,”
वोलान्दने आपल्या ग्लोबवरून नजर काढंत म्हटलं, “माझ्या प्रिय
महाराणी, तुमच्या मंडळींना कुठे पाठवायला सांगाल? मला तर त्यांची गरज नाहीये.”
आता उघड्या दारातून धावंत नताशा आत आली, तशीच वस्त्रहीन, हात नाचवंत; ओरडून मार्गारीटाला म्हणाली, “खूश राहा, मार्गारीटा
निकोलायेव्ना!” तिने डोकं वाकवून मास्टरचं अभिवादन केलं आणि पुन्हां मार्गारीटाकडे
वळून म्हणाली, “मला तर माहीत होतं, की तुम्हीं कुठे जायच्या!”
“मोलकरणींना सगळं माहीत असतं,” बोक्याने शेरा मारला आणि अर्थपूर्ण ढंगाने पंजा हालवंत
म्हणाला, “असा विचार करणं चुकीचं आहे, की त्या आंधळ्या असतात.”
“तुझी काय इच्छा आहे, नताशा?” मार्गारीटाने विचारलं, “त्या आलिशान घरांत परंत चालली जा.”
“माझ्या लाडके, मार्गारीटा निकोलायेव्ना,” नताशाने विनंती करंत म्हटलं आणि ती गुडघ्यांवर उभी राहिली, “ह्यांना सांगा,” तिने वोलान्दकडे तिरप्या नजरेने बघितलं, “की मला चेटकीणंच राहू द्यावे. मला पुन्हां ते आलिशान भवन नको. मी ना तर इंजीनियरशी, ना मैकेनिकशी लग्न करणारेय! काल नृत्योत्सवांत श्रीमान जैकने माझ्यासमोर लग्नाचा प्रस्ताव मांडला,” नताशाने आपली मूठ उघडून सोन्याचे काही सिक्के दाखवले.
“माझ्या लाडके, मार्गारीटा निकोलायेव्ना,” नताशाने विनंती करंत म्हटलं आणि ती गुडघ्यांवर उभी राहिली, “ह्यांना सांगा,” तिने वोलान्दकडे तिरप्या नजरेने बघितलं, “की मला चेटकीणंच राहू द्यावे. मला पुन्हां ते आलिशान भवन नको. मी ना तर इंजीनियरशी, ना मैकेनिकशी लग्न करणारेय! काल नृत्योत्सवांत श्रीमान जैकने माझ्यासमोर लग्नाचा प्रस्ताव मांडला,” नताशाने आपली मूठ उघडून सोन्याचे काही सिक्के दाखवले.
मार्गारीटाने प्रश्नार्थक नजरेने वोलान्दकडे पाहिलं. त्याने डोकं हालवलं.
तेव्हां नताशा मार्गारीटाच्या खांद्यावर वाकली आणि जो-याने तिचं चुम्बन घेऊन
आनंदाने ओरडंत खिडकीतून बाहेर उडून गेली.
नताशाच्या जागेवर आता निकोलाय इवानोविच दिसला. तो आपल्या मानव रूपांत परतला
होता, पण अत्यंत दुःखी आणि निराश वाटंत होता.
“ह्यांना तर मी खूप आनंदाने येथून जाऊं देईन,”
वोलान्दने तिरस्काराने निकोलाय इवानोविचकडे बघंत
म्हटलं, “खूपंच आनन्दाने, कारण की ह्यांची इथे काही गरज नाहीये.”
“मी विनंती करतो, की कृपा करून मला एक सर्टिफिकेट द्यावे,” रागांत इकडे
तिकडे बघंत आणि दृढतेने निकोलाय इवानोविच म्हणाला,
“हे स्पष्ट करंत, की कालचा दिवस कुठे घालवला.”
“कशासाठी?” बोक्याने गंभीरतेने विचारलं.
“पोलिसांना आणि बायकोला दाखवण्यासाठी,”
निकोलाय इवानोविचने दृढतापूर्वक म्हटलं.
“साधारणपणे, आम्ही सर्टिफिकेट्स देत नाही,” बोका आठ्या घालंत
म्हणाला, “पण तुमच्यासाठी देऊन देऊं.”
आणि निकोलाय इवानोविचला काही कळण्यापूर्वी, निर्वस्त्र हैला टाइपराइटरवर बसून गेली, आणि बोका तिला
डिक्टेशन देऊं लागला, “प्रमाणित करण्यांत येतं, की ह्या प्रमाणपत्राचे धारक निकोलाय इवानोविचने उक्त
रात्र सैतानाच्या नृत्योत्सवांत घालवली, जिथे त्याला एका वाहनाच्या रूपांत नेण्यांत आलं
होतं...हैला, कोष्ठक लाव! कोष्ठकांत लिही ‘डुक्कर’. हस्ताक्षर –
बेगेमोत.”
“आणि तारीख?” निकोलाय इवानोविच कुरबुरला.
“तारीख नाही टाकणार, तारीख टाकल्याने प्रमाण पत्र बेकार होऊन जाईल,” बोका म्हणाला.
त्याने कागद हालवला, कुठून तरी सील आणली, तिच्यावर पद्धतशीरपणे फूक मारली, तिला कागदावर
मारलं आणि कागद निकोलाय इवानोविचकडे सरकावला. ह्याच्यानंतर निकोलाय इवानोविच
काहीही खूण न सोडतां गायब झाला. त्याच्या जागेवर प्रकट झाला एक नवीन, अप्रत्याशित
व्यक्ति.
“आता हे आणखी कोण आलं?” वोलान्दने हाताने मेणबत्तीच्या प्रकाशाने स्वतःला
वाचवंत झटक्याने विचारलं.
वारेनूखाने डोकं हालवलं, दीर्घ श्वास घेऊन म्हणाला, “मला परंत पाठवून द्या. मी पिशाच नाही होऊं शकलो. त्या
वेळेस मी हैलाबरोबर रीम्स्कीला मृत्युच्या मुखांत जवळ-जवळ लोटलंच होतं! पण मी रक्त
पिपासू नाहीये. मला सोडून द्या.”
“ही काय बडबड आहे?” वोलान्दने कपाळावर आठ्या टाकंत विचारलं, “ही रीम्स्की कोण
आहे? काय गडबड आहे?”
“तुम्हीं काळजी नका करू, मालक,” आजाज़ेलोने म्हटलं आणि वारेनूखाकडे वळला, “टेलिफोनवर गुण्डागर्दी
करूं नकोस. टेलिफोनवर खोटं नको बोलूस, कळलं? पुन्हां कधी तर
असं करणार नाहीस?”
वारेनूखाला आनंदाने वेड लागलं. त्याचा चेहरा चमकू लागला. तो मनांत येईल ते
बडबडू लागला, “खरंच...मी, म्हणजे मला म्हणायचंय, महा...आत्ता लंच नंतर...” वारेनूखाने हृदयावर हात
ठेवून याचनेच्या भावाने अजाज़ेलोकडे पाहिलं.
“ठीक आह,. घरी जा!” त्याने उत्तर दिलं आणि वारेनूखा हवेंत
विरघळला.”
आता मला ह्यांच्यासोबत एकटं सोडा,”
वोलान्दने मास्टर आणि मार्गारीटाकडे खूण करंत आज्ञा
दिली.
वोलान्दच्या आज्ञेचं लगेच पालन झालं. काही वेळ शांत राहिल्यावर वोलान्द
मास्टरकडे वळला.
“तर, अर्बातच्या तळघरांतल्या खोलींत? आणि लिहिणार कोण? आणि स्वप्नं? प्रेरणा?”
आता माझ्याकडे कोणतही स्वप्न नाहीये, प्रेरणापण नाहीये,”
मास्टरने उत्तर दिलं, “मला आता कशातंच रस नाहीये, फक्त हिला सोडून,”
त्याने पुन्हां मार्गारीटाच्या डोक्यावर हात ठेवला, “त्यांनी मला
पूर्णपणे तोडून टाकलंय, मी कंटाळलोय आणि मला परंत तळघरांत जायचंय.”
“आणि तुमची कादम्बरी, पिलात?”
“मला घृणा झालीये त्या कादम्बरीची,”
मास्टरने उत्तर दिलं, “तिच्यामुळे मला खूप दुःख झेलावं लागलंय.”
“मी तुझ्यासमोर हात जोडते,” मार्गारीटा दुःखी होऊन म्हणाली, “असं नको म्हणू.
तू मला कां सतावतोय? तुला चांगलंच माहीत आहे, की तुझ्या ह्या कामांत मी आपलं सम्पूर्ण जीवन समर्पित
केलंय.” मार्गारीटाने आता वोलान्दकडे वळून म्हटलं, “तुम्हीं त्याचं म्हणणं नका ऐकूं, महाशय! हा फार
दुःखी आहे.”
“पण काहीतरी तर लिहावंच लागेल नं?”
वोलान्दने म्हटलं, “जर तुम्हीं न्यायाधीशाबद्दल लिहिलेलं आहे, तर कमींत कमी
ह्या अलोइज़ीबद्दलंच लिहा...”
मास्टर हसला.
“ते तर लाप्शोन्निकोवा छापणार नाही आणि तो मजेदार पण नाहीये.”
“पण तुम्हीं जगणार कसे? भीक मागावी लागू शकते.”
“आनन्दाने, आनन्दाने,” मास्टरने म्हटलं आणि मार्गारीटाला खेचून आपल्या
बाहुपाशांत घेतलं, “ही समजून जाईल आणि माझ्यापासून दूर चालली जाईल...”
“मला असं नाही वाटंत,” वोलान्द तोंडातल्या तोंडांत पुटपुटला आणि पुढे म्हणाला, “पोंती पिलातचा
इतिहास लिहिणारा माणूस तळघरांत जाईल, फक्त लैम्पजवळ बसण्यासाठी आणि उपाशी मरण्यासाठी?”
मास्टरपासून दूर होत मार्गारीटा रागाने म्हणाली, “मी जे शक्य होतं, ते सगळं केलं. आणि मी त्याच्या कानांत सगळ्यांत आकर्षक
वस्तूबद्दलसुद्धां सांगितलं, पण ह्याने नाही म्हटलं.”
“जे तुम्हीं त्याच्या कानांत कुजबुजलांत, ते मला माहितीये,”
वोलान्दने प्रतिवाद करंत म्हटलं, “पण ते
तुमच्यापेक्षां जास्त आकर्षक नाहीये. मी तुम्हांला सांगतोय,” हसून तो
मास्टरला म्हणाला, “ की तुमची कादम्बरी तुमच्यासाठी अनेक आश्चर्य आणेल.”
“ही तर दुःखाची गोष्ट आहे,” मास्टरने उत्तर दिलं.
“नाही, नाही ही दुःखाची गोष्ट नाहीये,” वोलान्द म्हणाला, “आता कोणतीच दुःख़द
घटना होणार नाही. तर...मार्गारीटा निकोलायेव्ना, सगळं करून झालंय. तुम्हांला माझ्याबद्दल काही तक्रार
आहे?”
“काय म्हणतांय, महाशय!”
“तर, हे घ्या, माझी आठवण म्हणून...” वोलान्दने म्हटलं आणि उशीखालून
एक लहानशी हीरे जडलेली सोन्याची नाल काढली.
“नाही, नाही, नाही, हे कशाला!”
“माझ्याशी हुज्जत घालणार आहांत कां?”
स्मित करंत वोलान्दने विचारलं.
मार्गारीटाने ही भेट रुमालांत गाठ बांधून ठेवली, कारण की तिच्या कोटाला खिसाच नव्हता. मग तिला एका
गोष्टीचं आश्चर्य वाटलं. तिने खिडकीच्या बाहेर चंद्राकडे पाहिलं आणि म्हटलं, “एक गोष्ट मला
कळंत नाहीये...रात्र अर्धीची अर्धीच आहे. कदाचित ब-याच आधी सकाळ व्हायला हवी होती?”
“सणाच्या रात्रीला काही वेळ ताणून ठेवणं चांगलं वाटतं!” वोलान्दने उत्तर
दिलं, “तर, आता मी तुम्हांला शुभकामना देतो!”
मार्गारीटाने दोन्ही हात प्रार्थनेच्या मुद्रेत वोलान्दकडे केले, पण त्याच्याजवळ
जायचं साहस करूं शकली नाही आणि हळूंच म्हणाली,
“गुडबाय! गुडबाय!”
“पुन्हां भेटूं,” वोलान्दने उत्तर दिलं.
आणि काळा कोट घातलेली मार्गारीटा आणि दवाखान्याच्या कपड्यांत मास्टर
जवाहि-याच्या बायकोच्या फ्लैटच्या प्रवेश कक्षांतून निघाले, जिथे मेणबत्ती जळंत
होती, आणि जिथे वोलान्दची मंडळी त्यांची वाट बघंत होती. जेव्हां प्रवेश कक्षांतून
बाहेर निघूं लागले, तर हैलाने सूटकेस उचलली, जिच्यांत कादम्बरी होती आणि मार्गारीटाची लहानशी दौलंत
होती. बोका हैलाची मदत करंत होता. फ्लैटच्या दारावर करोव्येवने वाकून अभिवादन केलं
आणि तो गायब झाला. बाकीचे लोक जिन्यापर्यंत सोडायला आले. जिना रिकामा
होता. जेव्हां ते तिस-या मजल्याचं वळंण पार करंत होते, तेव्हां हल्कासा खट्चा आवाज करंत काहीतरी पडलं. पण
तिकडे कुणीच लक्ष दिलं नाही. सहाव्या नंबरच्या प्रवेशद्वाराजवळ येऊन अजाज़ेलोने फूक
मारली. ते बाहेर अंगणांत आले, जिथे चंद्राचा प्रकाश नव्हता येत, त्यांना पोर्चमधे
एक माणूस दिसला. तो जोडे आणि टोपी घालून आरामाने झोपला होता. जवळंच एक मोट्ठी काळी
कार उभी होती, जिचे दिवे विझलेले होते. समोरच्या आरशांत एका
कावळ्याची आकृति दिसंत होती.
ते कारमधे बसणारंच होते, तेवढ्यांत मार्गारीटाने घाबरून हळूच म्हटलं, “अरे देवा, नाल हरवली!”
“गाडींत बसा,” अजाज़ेलोने म्हटलं, “आणि माझी वाट बघा. मी लगेच परंत येतो. बघतो की काय
गडबड आहे.” आणि तो प्रवेशद्वारांतून आत गेला.
झालं असं होतं, की मास्टर आणि मार्गारीटाच्या आपल्या मित्रांबरोबर
निघण्याच्या थोडं आधी फ्लैट नं. 48मधून, जो जवाहि-याच्या बायकोच्या फ्लैटच्या अगदी खाली होता, एक वाळकी, चिप्पड बाई
हातांत एक भांडं आणि पर्स घेऊन बाहेर जिन्यावर आली. ही तीच अन्नूश्का होती, जिने बुधवारी, बेर्लिओज़च्या
दुर्दैवाने सूर्यमुखीचं तेल फिरत्या फाटकाजवळ सांडलं होतं.
कोणालांच माहीत नव्हतं, आणि कदाचित कधीच माहीत होणार नाही, की मॉस्कोत ही
बाई काय करंत होती, आणि कशी जगंत होती. तिच्याबद्दल फक्त येवढंच ठाऊक होतं, की ती दररोज भांडं
घेऊन, किंवा पर्स घेऊन. किंवा दोन्ही घेऊन तेलाच्या दुकानांत, किंवा बाजारांत, किंवा त्या
बिल्डिंगच्या प्रवेशद्वाराजवळ, जिच्यांत ती राहायची, किंवा जिन्यावर दिसायची; पण बहुतकरून ती दिसायची फ्लैट नं. 48च्या किचनमधे, जिथे ती राहात
होती. शिवाय हे पण सगळ्यांना माहीत होतं, की ती जिथेपण असायची, किंवा प्रकट व्हायची – तिथे लगेच काहीतरी गडबड व्हायची, आणि हे पण, की लोकांनी तिचं
नाव ‘प्लेग’ ठेवलं होतं.
‘प्लेग’ – अन्नूश्का माहीत
नाही कां सकाळी खूप लवकर उठायची, आणि आज, न जाणे कां, जणु कोण्या अज्ञात शक्तीने तिला झुंजुमुंजू होण्यापूर्वीच
बारा वाजून गेल्यावर थोड्यांच वेळांत उठवलं होतं. दारांत किल्ली फिरली, अन्नूश्काचं आधी
नाक आणि नंतर सम्पूर्ण शरीर बाहेर निघालं आणि आपल्यामागे दार खेचून बाहेर निघणारंच
होती, की वरच्या मजल्याचं दार वाजलं. कोणीतरी गडगडंत खाली आलं आणि अन्नूश्काला
टक्कर मारंत तिला इतक्या जोराने धक्का मारला, की तिचं डोकं भिंतीवर आपटलं.
“हे नुसत्या चड्डींत सैतान तुला कुठे नेतोय?”
आपलं डोकं धरून अन्नूश्का गरजली. चड्डी घातलेला माणूस
हातांत सूटकेस पकडून आणि डोक्यावर टोपी घालून, मिटलेल्या डोळ्यांनी रानटी, झोपाळू आवाजांत म्हणाला:
“बॉयलर! सल्फ्यूरिक एसिड! फक्त रंग रंगोटीतंच किती खर्च झाला!” आणि
रडंत-रडंत भुणभुणला, “निघून जा!” आता तो पुन्हां जो-याने फेकला गेला, पण पुढे नाही, पाय-यांवर
खालीसुद्धां नाहीं, पण – वर, तिकडे, जिथे अर्थशास्त्री-संयोजकाच्या पायाने फुटलेला खिडकीचा
काच होता, आणि ह्या खिडकीतून उल्टा लटकंत तो तीरासारखा बाहेर फेकला गेला. अन्नूश्का
आपल्या डोक्याला बसलेल्या माराबद्दल विसरून गेली. ती पोटावर लोळली आणि खिडकीच्या
बाहेर डोकं काढून अंगणांत बघू लागली, तिला वाटलं होतं, की उजेडांत तिला रस्त्यावर सूटकेसवाल्या माणसाचं क्षत-विक्षत
शरीर बघायला मिळेल. पण अंगणांत आणि रस्त्यावर काहींच नव्हतं.
बस, येवढ्यावरंच समाधान करावं लागलं, की तो विचित्र, झोपेंत असलेला प्राणी पक्ष्यासारखा, काहीही मागमूस न
ठेवतां घरांतून उडून गेला. अन्नूश्काने क्रॉसचं चिन्ह बनवंत विचार केला, “हो, खरोखरंच कमालीचा
आहे फ्लैट नंबर पन्नास! लोकं उगाचंच नाही म्हणंत! अजब आहे हा फ्लैट! फ्लैट आहे की
भुताटकी!”
तिने येवढांच विचार केला होता, तेवढ्यांत वरच्या मजल्यावरचं दार पुन्हां उघडलं आणि
दुस-यांदा कोणीतरी धावंत खाली आलं. अन्नूश्का भिंतीला चिटकली. तिने बघितलं, की कोणी तरी
सम्माननीय, दाढीवाला, पण थोडा-थोडा डुकरासारखा चेहरा असलेला माणूस
अन्नूश्काच्या बाजूने तीरासारखा गेला, आणि पहिल्या माणसासारखांच तो पण खिडकीच्या मार्गाने
बाहेर फेकला गेला. तसांच जमिनीवर क्षत-विक्षत न होता. अन्नूश्का विसरूनंच गेली, की ती कशासाठी
बाहेर निघाली होती, आणि ती तशीच क्रॉसचं चिन्ह बनवंत पाय-यांवर उभी राहून
“ओह...ओह” करंत स्वतःशीच गोष्टी करूं लागली.
तिस-यांदा निघाला, बिना दाढीचा, गोल, चिकण्या चेह-याचा, कोट घातलेला माणूस; तो पळंत पळंत आला आणि अगदी तस्साच खिडकीतून बाहेर
गेला.
अन्नूश्काबद्दल हे सांगावं लागेल, की ती फार जिज्ञासू होती. हे बघण्यासाठी, की आता काय-काय
नवीन चमत्कार होणार आहेत, तिने थोडा वेळ तिथेच थांबण्याचा निश्चय केला. वरचा
दरवाजा पुन्हां उघडला आणि ह्यावेळेस एक पूर्ण झुण्डच पाय-या उतरूं लागला, धावंत नाही, पण साधारण
माणसांसारखा. अन्नूश्का धावंतच खिडकीपासून दूर झाली, ती खाली आपल्या फ्लैटपर्यंत उतरली, फट्कन दार उघडून
त्याच्या मागे लपली, आणि दाराच्या फटीला उत्सुकतेने भरलेला तिचा डोळा
चिकटला.
कोणी एक आजा-यासारखा, किंवा आजारी नसलेला पण अजब, पांढरा-फट्क, वाढलेली दाढी असलेला, काळी टोपी आणि गाउनसारखं काहीतरी घातलेला डगमगत्या
पावलांनी खाली उतरंत होता. अर्धवट अंधारांत अन्नूश्काने बघितलं, की त्याला
सांभाळंत नेत होती एक महिला, जिने काळसर गाउन घातला होता, कदाचित त्या
महिलेचे पाय अनवाणी होते, किंवा तिने एखादे पारदर्शी, परदेशी, फाटके जोडे घातले होते. छिः छिः! जोड्यांचं काय! पण
बाई तर नग्न आहे! हो, त्या गाउनने तिने आपल्या शरीराला नुसतंच झाकलेलं होतं!
‘फ्लैट आहे की भुताटकी!’ अन्नूश्काचं ह्रदय प्रसन्न होतं, की उद्या
शेजा-यांना सांगण्यासाठी तिच्याजवळ बरांच माल-मसाला आहे.
ह्या विचित्र पोषाकवाल्या महिलेच्या मागे होती एक सम्पूर्ण निर्वस्त्र महिला, तिने हातांत
सूटकेस धरली होती, त्या सूटकेसच्या बरोबर-बरोबर चालला होता एक विशालकाय
बोका. अनूश्का डोळे चोळून बघंत होती, तिच्या तोंडातून किंकाळी निघतां-निघतां राहिली.
ह्या झुण्डाच्या शेवटी होता कमी उंचीच परदेशी, तो किंचित लंगडून चालंत होता, त्याचा एक डोळा
तिरपा होता, त्याने पांढरं जैकेट घातलं होतं, टाय लावला होता, पण त्याने कोट नव्हता घातला. ही सगळी मंडळी
अन्नूश्काच्या जवळून जाऊं लागली. तेवढ्यांत खट्कन काहीतरी जमिनीवर पडलं. हा अंदाज़
लावून की पायांचे आवाज दूर जात आहेत, अन्नूश्का सापासारखी रांगून बाहेर आली. भांडं भिंतीजवळ
ठेऊन ती पोटावर लोळून फरशीवर हाताने शोधूं लागली. तिच्या हाताला लागला एक रुमाल, ज्यांत कोणचीतरी
वजनदार वस्तू बांधलेली होती. रुमालांत बांधलेया वस्तूला बघितल्यावर अन्नूश्काचे
डोळे विस्फारून माथ्यावर चढले! अन्नूश्काने ती वस्तू डोळ्यांच्या जवळ आणली; आता तिचे डोळे
लांडग्यासारखे चमकू लागले. तिच्या डोक्यांत एक वादळ साँय-साँय करू लागलं, ‘मला काही माहीत
नाही! मी काहींच बघितलं नाही!...भाच्याकडे? किंवा ह्याचे तुकडे-तुकडे करावेत...हिरेतर उखडून काढता
येतील...आणि एक-एक करून...एक पेत्रोव्कांत, दुसरा स्मोलेन्स्कला...आणि – मी काही नाही बघितलं, मला काहीही माहीत
नाही!’
अन्नूश्काने ती वस्तू आपल्या शर्टाच्या आंत छातीजवळ लपवली. भांडं उचलून
रांगंत ती आपल्या फ्लैटमधे घुसणारंच होती, की तिच्यासमोर प्रकट झाला, सैतानच जाणे, तो कुठून आला होता, तोच पांढरं जैकेट, कोट न घातलेला आणि हळूंच कुजबुजंत म्हणाला, “रुमाल आणि नाल
काढ.”
“कसला रुमाल, कसली नाल?” अन्नूश्काने कृत्रिमतेने विचारलं. “माला काही
रुमाल-बिमाल माहीत नाही, नागरिक, तू प्यायला आहेस कां?”
पांढ-या जैकेटवाल्याने आपल्या बसच्या ब्रेक्ससारख्या मजबूत आणि तश्यांच
थंडगार बोटांनी काहीही न म्हणतां अन्नूश्काचा गळा अशाप्रकारे दाबला, की तिच्या छातींत
हवा जायची एकदम थांबली. अन्नूश्काच्या हातांतून भांडं खाली पडलं. थोडा वेळ
अन्नूश्काला हवा न देता जखडून, पांढ-या जैकेटवाल्या परदेशी माणसाने तिच्या मानेवरून
बोटं काढली. मोकळ्या हवेंत श्वास घेऊन अन्नूश्काने स्मित केलं.
“ओह, नाल,” ती म्हणाली, “ही घ्या! तर ही तुमची नाल आहे? मी बघितलं की
रुमालांत काहीतरी बांधलेलं आहे...मी मुद्दामंच उचललं, म्हणजे दुसरा कोणी न उचलून घेवो, आणि मग, शोधंत बसा!”
रुमाल आणि नाल घेऊन परदेशी माणूस तिचं वाकून-वाकून अभिवादन करूं लागला. तिचा
हात आपल्या हातांत घेऊन तो परदेशी उच्चारांत तिला घडी-घडी धन्यवाद देऊं लागला.
“मी तुमचा फार आभारी आहे! कोणाची तरी आठवण असल्यामुळे मला ही नाल अत्यंत
प्रिय आहे. हिला सांभाळून ठेवण्याबद्दल मला तुम्हांला दोनशे रुबल्स देण्याची
परवानगी द्या.” आणि त्याने लगेच आपल्या खिश्यांतून पैसे काढून अन्नूश्काच्या
हातांत ठेवले.
ती बेसुध होऊन हसू लागली आणि ओरडून म्हणाली, “ओह, मी ह्रदयपूर्वक तुमची आभारी आहे! धन्यवाद! धन्यवाद!”
तो बिनधास्त परदेशी एकांच उडींत पूर्ण जिना उतरून गेला, पण दिसेनासा
होण्यापूर्वी तो खालून स्पष्टपणे ओरडला, “तू म्हातारडी चेटकीण, जर पुन्हां दुस-याच्या वस्तूला हात जरी लावशील, तर तिला
पोलिसांत नेऊन दे, स्वतःच्या छातीशी लपवून नको ठेवूं!”
ह्या सगळ्या कल्लोळाने आणि गडबडीने सुन्न होऊन अन्नूश्का काही वेळ यंत्रवत्त
ओरडतंच राहिली, ‘धन्यवाद! धन्यवाद! धन्यवाद!” पण तो परदेशी केव्हांच
गायब झाला होता.
अंगणांत आता कार तैयार होती. मार्गारीटाला वोलान्दची भेट परंत देऊन अजाज़ेलो
त्यांना निरोप देऊं लागला. त्याने विचारलं, की तिला बसायला त्रास तर नाही होत आहे. हैलाने
मार्गारीटाचं प्रदीर्घ चुम्बन घेतलं. बोका तिच्या हाताजवळ लोळून गेला. निरोप
देणा-यांने हात हलवंत एका कोप-यांत निश्चल पडलेल्या मास्टरला निरोप दिला, ड्राइवर कावळ्याकडे
बघून हात हलवला आणि लगेच हवेंत विरघळून गेले. त्यांनी पाय-यांवरून जाण्याची तसदी
नाही घेतली. कावळ्याने लाइट्स लावले आणि मेल्यासारख्या पडलेल्या माणसाच्या बाजूने
प्रवेशद्वारांतून कार बाहेर काढली. आणि मोट्ठ्या काळ्या कारचे दिवे गजबजलेल्या आणि
हल्लागुल्ला असलेल्या सादोवायाच्या दिव्यांत मिसळून गेले.
एका तासानंतर अर्बातच्या एका गल्लीतल्या तळघरांत असलेल्या त्या छोट्याश्या
घराच्या समोरच्या खोलींत सगळं काही अगदी तस्संच होतं, जसं मागच्या वर्षीच्या हिवाळ्यांतल्या त्या भयानक
रात्रीच्या आधी असायचं. मखलमी टेबलक्लॉथने झाकलेल्या टेबलवर शेड असलेला लैम्प जळंत
होता, जवळंच फ्लॉवरपॉट लिलीच्या फुलांनी सजलेला होता, मार्गारीटा चुपचाप बसून आनंदाने आणि सहन केलेल्या
दुःखामुळे रडंत होती. ज्वाळांमधे काळं झालेलं हस्तलिखित तिच्यासमोर पडलं होतं, जवळंच सम्पूर्ण, शाबूत
हस्तलिखितांचा एक उंच ढीग पण होता. जवळच्या सोफ्यावर हॉस्पिटलच्या गाउनमधेच मास्टर
गाढ निद्रेत होता. त्याचा श्वास निःशब्द होता.
मनसोक्त रडून झाल्यावर मार्गारीटाने शाबूत हस्तलिखित उचललं. तिने तो भाग शोधला, जो क्रेमलिन वॉलजवळ
अजाज़ेलोशी भेट व्हायच्या आधी ती वाचंत होती. मार्गारीटाला झोप नव्हती येत. तिने हस्तलिखित
इतक्या प्रेमाने कुरवाळलं, जणु आपल्या मांजरीला कुरवाळतेय. त्याला हातांत घेऊन आलटून-पालटून
बघू लागली, कधी ती पहिलं पान बघायची, तर कधी शेवटचं. अचानक एका भयानक विचाराने तिला आवळलं, की हे सगळं नुसतं
जादू आहे, की आत्ता हस्तलिखितं गायब होऊन जातील, की डोळे उघडल्यावर ती स्वतःच्या शयनकक्षांत असेल आणि तिला
शेकोटी पेटवण्यासाठी उठावं लागेल. पण ही तिच्या कष्टांची, दीर्घ यातनामय दुःखांची
प्रतिध्वनीमात्र होती. काहीही गायब नाही झालं, महाशक्तिमान वोलान्द खरोखरंच सर्वशक्तिमान होता, आणि मार्गारीटा कित्ती
तरी वेळ, कदाचित सकाळ होईपर्यंत हस्तलिखिताची पानं गोंजारंत राहिली, तन्मयतेने बघंत राहिली, मुके घेत राहिली, आणि घडी-घडी वाचंत
राहिली:
“भूमध्य
सागरांतून आलेल्या अंधाराने न्यायाधीशाच्या घृणेचे पात्र असलेल्या त्या शहराला
वेढून टाकलं...हो,
अंधार...”
*************
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें