मंगलवार, 22 अगस्त 2017

मास्टर आणि मार्गारीटा - 10


दहा


याल्टाच्या बातम्या



जेव्हां निकानोर इवानोविचच्या घरी ही दुर्दैवी घटना घडंत होती, अगदी तेव्हांच बिल्डिंग नंबर 302 पासून थोड्यांच अंतरावर, त्यांच सादोवाया स्ट्रीटवर असलेल्या वेराइटी थियेटरच्या फिनडाइरेक्टर रीम्स्कीच्या कैबिनमधे दोन माणसं होते : स्वतः रीम्स्की आणि वेराइटीचा एडमिनिस्ट्रेटर वारेनूखा1 .
थियेटरच्या दुस-या मजल्यावर असलेल्या ह्या मोट्ठ्या कैबिनच्या दोन खिडक्या सादोवाया स्ट्रीटवर उघडायच्या, आणि एक, जी फिनडाइरेक्टरच्या पाठीमागे होती, वेराइटीच्या वसन्तोद्यानांत उघडंत होती, जिथे शीतल रेस्टॉरेन्ट्स, शूटिंग गैलरी आणि थियटरचा खुला मंच होता. कैबिनमधे लिहिण्याच्या मोठ्या टेबलासमोर भिंतीवर टांगलेल्या जुन्या पोस्टर्सचा मोठा ढीग होता, एका छोट्या टेबलवर पाण्याचा जग ठेवलेला होता, चार खुर्च्या पडल्या होत्या आणि एका कोप-यांत एका जुन्या शोच धुळीने माखलेलं मॉडल सुद्धा होतं. आणि स्पष्टंच आहे की ह्या व्यतिरिक्त कैबिनमधे एक घाणेरडा, रंग उडालेला, अज्वलनशील छोटा-सा कैश बॉक्सपण होता – रीम्स्कीच्या डावीकडे, टेबलाच्या बाजूला.
टेबलाशी बसलेला रीम्स्की सकाळ पासूनंच रागांत होता, तर, ह्याच्या उलंट वारेनूखा खूप प्रसन्न आणि उत्साही दिसंत होता. बस, फक्त त्याच्या ऊर्जेच्या, प्रसन्नतेच्या सदुपयोगाचा सध्यां काही मार्ग दिसंत नव्हता.
आतां वारेनूखा फुकट टिकिटं मागणा-यांपासून लपून फिनडाइरेक्टरच्या कैबिनमधे बसला होता. हे फुकटे त्याचं जगणं कठिण करून टाकायचे, विशेषकरून नवा प्रोग्राम व्हायच्या सुमारास. आज, संयोगाने, असांच दिवस होता.
जशींच टेलिफोनची घण्टी वाजली, वारेनूखाने रिसीवर उचलला आणि खोटं बोलायला लागला, “कोणाला बालावूं? वारेनूखाला? तो नाहीये, थियेटरच्या बाहेर गेलाय.”
“तू एकदां पुन्हां लिखादेयेवला फोन करं, प्लीज़,” रीम्स्कीने त्रासून म्हटलं.
“तो घरी नाहीये. मी आधीच कार्पोवला पाठवलं होतं. फ्लैटमधे कोणीच नाहीये.”
“सैतानंच जाणे काय भानगड आहे,” रीम्स्की केल्कुलेटरकडे बघंत म्हणाला.
दार उघडलं आणि एका पोराने इतक्यातंच छापलेल्या जाहिरातींच मोट्ठं बण्डल खेचंत आंत आणलं. हिरव्या कागदावर मोठ्या-मोठ्या लाल-लाल अक्षरांमधे छापलं होतं:

पहा,
आज आणि दररोज
वेराइटींत अतिरिक्त शो,

प्रोफेसर वोलान्द

काळ्या जादूचे प्रयोग

आणि

त्याचे सम्पूर्ण रहस्योद्घाटन !

वारेनूखाने प्रसन्नतेने थोडं दूर सरकून मॉडेलवर टाकलेले हे पोस्टर्स बघितले आणि पोराला लगेच सगळे पोस्टर्स चारीकडे लावण्याचा हुकूम दिला. 
“खूप सुन्दर आहे, डोळ्यांत भरतंय,” वारेनूखा पोरगा निघून गेल्यावर म्हणाला.
“आणि मला हा विचार बिल्कुल नाही आवडला!” शिंगाची फ्रेम असलेल्या आपल्या चष्म्यांतून खाऊ की गिळू दृष्टीने पोस्टर्सकडे बघंत रीम्स्की म्हणाला, “मला तर आश्चर्य वाटतंय की त्याला ह्या शोची परवानगी मिळाली कशी!”
“नाही, ग्रिगोरी दानिलोविच, असं नका म्हणूं; ही एक विचारपूर्वक केलेली चाल आहे. सगळं रहस्यतर ह्या रहस्योद्घाटनांत आहे.”
“माहीत नाही, काहींच माहीत नाही; काही बिंग-विंग नाहीये, आणि तो नेहमी असलेंच अफलातून विचार मांडत असतो. कमीतकमी, त्याने ह्या जादुगाराला एकदां दाखवलं तरी असतं! कमीतकमी तू तरी त्याला बघितलं असतं? हे सगळं तो कुठे शिकलाय, सैतानंच जाणे!”
असं कळलं की वारेनूखानेपण रीम्स्कीसारखंच जादुगाराला पाह्यलं नव्हतं. काल स्त्योपा वेड्या सारखा’ (रीम्स्कीच्या शब्दांत) फिनडाइरेक्टरकडे धावंत-पळंत आला, हातांत एक अनुबंध घेऊन, आणि लगेच पैसे देण्यासाठी गळ घातली. आणि हा जादुगार, माहीत नाही, कुठे होता, स्त्योपाला सोडून त्याला आणखी कुणीही बघितलं नव्हतं.
रीम्स्कीने घड्याळ काढून बघितलं – दोन वाजून पाच मिनिटं झाले होते, आणि तो अगदीच वैतागून गेला. बरोबरंच होतं. लिखादेयेवने सुमारे अकरा वाजतां फोन करून सांगितलं होतं की अर्ध्या तासांत वेराइटीला पोहोचतोय, पण तो नाही आला; वरून आपल्या फ्लैटमधून सुद्धां गायब झालाय!
“माझं काम खोळंबलंय!” रीम्स्की विव्हळंत हस्ताक्षर न केलेल्या कागदांच्या फाइलमधे बोट गडवंत म्हणाला.
“कुठे तो बेर्लिओज़सारखा ट्रामच्या खालीतर नाही आला?” वारेनूखाने टेलिफोनचा रिसीवर कानाला लावंत म्हटलं, ज्याच्यातून सारखे खोल, आशाहीन आवाज येत होते.
“किती चांगलं झालं असतं जर...” रीम्स्कीने हळू आवाजांत दात खात म्हटले.
तेवढ्यांत कैबिनमधे युनिफॉर्मचे जैकेट आणि काळा स्कर्ट, डोक्यावर कैप आणि पायांत चपला असलेली एक महिला आली. आपल्या बेल्टला लटकलेल्या छोट्याश्या पर्समधून तिने एक पांढरा चौकोर लिफाफा आणि नोटबुक काढली आणि विचारलं, “इथे वेराइटी कोण आहे? तुमच्यासाठी सुपर लाइटनिंग2 टेलिग्राम आहे, सही करा!”    
वारेनूखाने त्या महिलेच्या नोटबुकमधे पक्ष्यांसारखी सही केली आणि ती बाहेर जातांच लिफाफा उघडला.
टेलिग्राम वाचून तो डोळ्यांची उघडझाप करूं लागला आणि त्याने लिफाफा रीम्स्कीपुढे केला.
टेलिग्राममधे लिहिलं होतं : “याल्टा मॉस्को. वेराइटी. आज साडे अकरा वाजता नाइटशर्ट आणि पैन्ट मधे, जोडे न घातलेला, भु-या केसांचा पागल लिखादेयेव स्वतःला वेराइटीचा डाइरेक्टर सांगत असताना सापडला. याल्टाच्या गुप्तचर विभागाला टेलिग्राम पाठवा : डाइरेक्टर लिखादेयेव कुठे आहे.”   
“नमस्कार, काय म्हणता राव!” रीम्स्की विस्मयाने म्हणाला, “आणखी एक कमाल!”
“तोतया द्मित्री3, वारेनूखाने म्हटलं आणि टेलिफोनच्या रिसीवरमधे सांगू लागला, “टेलिग्राफ़ ऑफिस? वेराइटी अकाउन्ट. सुपर लाइटनिंग टेलिग्राम घ्या...तुम्हीं ऐकताय नं? ‘याल्टा, गुप्तचर विभाग...डाइरेक्टर लिखादेयेव मॉस्कोत फिनडाइरेक्टर रीम्स्की...”     
याल्टाच्या खोटारड्याबद्दल ही बातमी ऐकूनसुद्धां वारेनूखा टेलिफोनवर स्त्योपाला शक्यता असलेल्या सगळ्या ठिकाणांवर शोधायचा प्रयत्न करंत होता, आणि स्पष्टंच आहे, की कुठेच सफल नाही झाला. तो विचारंच करंत होता की आता कुठे फोन करावा, येवढ्यांत तीच महिला, जी पहिला टेलिग्राम घेऊन आली होती, पुन्हां प्रकट झाली. तिने आणखी एक लिफाफा वारेनूखाच्या हातांत दिला. पट्कन लिफाफा उघडून टेलिग्राम वाचल्यावर वारेनूखाच्या तोंडातून शिट्टीचा आवाज निघाला.
“आता आणखी काय आहे?” रीम्स्कीने घाबरंत, थरथरंत विचारलं.
वारेनूखाने चुपचाप त्याच्याकडे टेलिग्राम दिला. फिनडाइरेक्टरने वाचलं : “विनंती विश्वास करा याल्टांत फेकलं सम्मोहन वोलान्द गुप्तचरला टेलिग्राम करा पुष्टि करा लिखादेयेवची.”
रीम्स्की आणि वारेनूखाने एकमेकांना डोके भिडवून पुन्हां टेलिग्राम वाचला आणि दुस-यांदा वाचल्यावर एकमेकांकडे एकटक बघू लागले.
“नागरिक हो!” ती महिला संतापली, “सही करा, नंतर वाटेल तितकं गप्प राहा! मला टेलिग्राम्स वाटायलापण जायचं आहे.”
वारेनूखाने टेलिग्रामवरून नजर न काढतां वाकडी-तिकडी सही केली, आणि ती महिला चालली गेली.
“तुझ्याशीतर तो सुमारे अकरा वाजतां बोलला होता नं?” एडमिनिस्ट्रेटरने पूर्ण अविश्वासाने विचारलं.
“हो, मला तर गम्मतंच वाटतेय,” रीम्स्की कर्कश स्वरांत ओरडला, “बोलला असेल किंवा नसेल; पण ह्या वेळेस तो याल्टांत असूंच शकंत नाही! हे हास्यास्पद आहे!”
“तो प्यालेला आहे...” वारेनूखा म्हणाला.
“कोण प्यालेला आहे?” रीम्स्कीने विचारलं आणि दोघं पुन्हां एकमेकाकडे बघू लागले.
ह्यांत काही शंकाच नव्हती, की याल्टाहून कोण्या खोटारड्याने किंवा वेड्यानेच टेलिग्राम पाठवला होता : पण आश्चर्य ह्या गोष्टीचं होतं, की याल्टाचा हा रहस्यमय माणूस वोलान्दला कसं ओळखतो, जो फक्त कालंच मॉस्कोला आलाय? त्याला लिखादेयेव आणि वोलान्दच्या संबंधाबद्दल कसं कळलंय?
“सम्मोहन,” वारेनूखाने त्या टेलिग्राममधे छापलेला शब्द पुन्हां उच्चारला, “त्याला वोलान्दबद्दल कसं काय माहीत झालं?” त्याने पापण्यांची फडफड केली आणि एकदम निर्णयात्मक स्वरांत ओरडला, “ओह, नाही! मूर्खपणा, मूर्खपणा, मूर्खपणा!”
हा वोलान्द, सैतान त्याला घेऊन जाओ, थांबला कुठेय?” रीम्स्कीने विचारलं.
वारेनूखाने लगेच इनटूरिस्ट ब्यूरोला फोन केला आणि रीम्स्कीला आश्चर्याचा प्रचण्ड धक्का देत म्हणाला, की वोलान्द लिखादेयेवच्या फ्लैटमधे थांबलाय. नंतर त्याने तिथे फोन केला आणि टेलिफोनमधून त्याला खोल-खोल सिग्नल्संच ऐकूं येत राहिले. सिग्नल्सच्या मधून-मधून कुठून तरी दुरून एक जाडा, निराश, रडका आवाज़ गात असल्यासारखं ऐकूं आलं : “...खडकांत माझा विसावा...4” आणि वारेनूखाने ठरवलं की टेलिफोनचा तारेंत कुठून तरी रेडिओ शोचे आवाज़ मिसळलेंत.
“फ्लैट मधून काही आवाज नाहीये,” वारेनूखाने रिसीवर परंत ठेवंत म्हटलं, “पुन्हां फोन करून बघतो...”
तो आपलं वाक्य पूर्ण करायच्या आतंच दारांत तीच महिला प्रकट झाली आणि दोघं, रीम्स्की आणि वारेनूखा, तिच्या स्वागतासाथी उठून उभे राहिले आणि आतां त्या महिलेने पांढ-याच्या ऐवजी एक काळा कागद काढला.
“आता हे बरंच मजेदार होत चाललंय,” लवकर लवकर जाणा-या महिलेकडे बघंत वारेनूखा कुजबुजला. रीम्स्कीने पट्कन तो कागद घेतला होता.
फोटोग्राफिक पेपरच्या काळ्या पार्श्वभूमिवर काळ्या ओळी स्पष्ट दिसंत होत्या.
“प्रमाणित करण्यासाठी माझं अक्षर, माझ्या हस्ताक्षराची टेलिग्रामने पुष्टि करा, वोलान्दवर गुप्त नजर ठेवा – लिखादेयेव.”
थियेटरच्या आपल्या वीस वर्षाच्या नौकरींत वारेनूखाने बरेच चमत्कार पाहिले होते, पण ह्या वेळेस त्याला असं वाटलं की त्याची मति गुंग होत चाललीय आणि तो काहीच नाही म्हणूं शकला, त्याच्या तोंडातून फक्त येवढंच निघालं, “हे अशक्य आहे!”
पण रीम्स्कीने असं नाही केलं. तो उठला, आणि दार उघडून बाहेर स्टूलवर बसलेल्या रिसेप्शनिस्टला म्हणाला, “पोस्टमैन शिवाय आणखी कुणाला आंत नको येऊं देऊं!” आणि त्याने आतून कुलूप लावून घेतलं.     
मग त्याने टेबलावरून कागदांचा गट्ठा उचलला आणि लक्ष देऊन फोटोग्राफमधे लिहिलेल्या, स्त्योपाच्या डावीकडे झुकलेल्या मोठ्या मोठ्या अक्षरांना फ़ाइल्समधे लिहिलेल्या त्याच्या निर्णयांशी आणि हस्ताक्षरांशी मिळवून बघूं लागला. वारेनूखा टेबलवर जवळ-जवळ पालथा झाला आणि रीम्स्कीच्या गालावर गरम श्वास सोडूं लागला.
शेवटी फिनडाइरेक्टरने दृढतेने सांगितलं, “हे त्याचंच अक्षर आहे.” आणि वारेनूखा जणु त्याच्या प्रतिध्वनिसारखा उत्तरला:
“त्याचंच आहे.”
रीम्स्कीच्या चेह-याकडे बघून त्यांत झालेले बदल पाहून वारेनूखा चकित झाला. आधीच कृश असलेला फिनडाइरेक्टर आणखीनंच कृश झाला होता, आणखीनंच म्हातारा झाला होता. शिंगाच्या चष्म्याने झाकलेल्या त्याच्या डोळ्यांमधे नेहमीचं बोचरेपण नव्हतं. त्यांच्यांत दिसंत होते काळजी आणि दुःख.
वारेनूखाने ते सगळं केलं, जे विकट परिस्थितीत सापडलेला एक माणूस करतो. तो कैबिनमधे दोनदा धावला, दोनदा सुळावर चढवल्या सारखे हात वर केले, पिवळ्या-पिवळ्या पाण्याचा पूर्ण ग्लास पिऊन टाकला आणि विस्मयाने म्हणाला, “समजंत नाहीये! नाही स-म-जं-त!”
पण रीम्स्की खिडकीकडे बघून खूप ताणांत काही तरी विचार करंत होता. फिनडाइरेक्टरची परिस्थिती खूप कठीण झाली होती. ह्या असाधारण घटनांसाठी जवाबदार असलेले साधारण कारणं स्पष्ट करणे जरूरी होतं.
डोळे बारीक करंत फिनडाइरेक्टरने नाइटशर्ट आणि जोडे न घातलेल्या स्त्योपाची कल्पना केली, जो आज सुमारे साडे अकरा वाजतां कोणच्या तरी अकल्पनीय अतिशीघ्रगामी विमानांत चढंत होता आणि तोच स्त्योपा तेवढ्यांत वाजता मोजे घालून याल्टाच्या विमानतळावर उभा होता...सैतानंच जाणे हे काय होतंय!
कदाचित स्त्योपाने आपल्या फ्लैटमधून त्याला फोनंच नसेल केला? नाही, तो स्त्योपांच होता. तो काय स्त्योपाचा आवाज नाही ओळखंत? जरी आज स्त्योपा त्याच्याशी बोलला नसेल, तरीही काल, संध्याकाळी, आपल्या कैबिनमधून तेच फालतू अनुबंध-पत्र घेऊन आला होता आणि फिनडाइरेक्टरला आपल्या छिचोरपणाने मनःस्ताप देऊन गेला होता. पण थियेटरमधे काही न कळवतां तो एकदम गेला कसा? ट्रेनने असो, किंवा विमानाने? जर काल संध्याकाळी तो विमानाने जरी गेला असला, तरीही आज दुपारपर्यंत याल्टाला निश्चितंच नाही पोहोचूं शकंत; की पोहोचला असेल?
“इथून याल्टा किती दूर आहे?” रीम्स्कीने विचारलं.
वारेनूखाने धावपळ थांबवली आणि गरजला, “सगळा विचार केला! ट्रेनने गेलं तर इथून सेवस्तोपोल पर्यंत एक हजार पाचशे किलोमीटर्स, याल्टापर्यंत आणखी आठशे किलोमीटर्स जोडून घ्या, पण विमानाने निश्चितंच थोडं कमी आहे.”
हूँ...हो...ट्रेनने जाण्याचा प्रश्नंच नाहीये. मग कसं? फाइटर प्लेनने? बिनजोड्याच्या स्त्योपाला कोण फाइटर प्लेनमधे बसूं देईल? कदाचित, त्याने याल्टाला पोहोचल्यावर जोडे काढले असावेत? तरीही तोच प्रश्न : कां? आणि जोडे घालून फाइटर प्लेन मधे...पण फाइटर प्लेनचा प्रश्नंच कुठे येतोय? बातमी तर ही आहे, की तो गुप्तचर पोलिसकडे साडे अकरा वाजतां आला, आणि मॉस्कोत माझ्याशी बोलंत होता टेलिफोनवर...घ्या...आणि रीम्स्कीच्या डोळ्यांसमोर स्वतःच्या घडाळीचं डायल दिसूं लागलं...त्याला आठवली घडाळ्याच्या काट्यांची स्थिति. खतरनाक! ती वेळ होती अकरा वाजून वीस मिनिट. ह्याचा अर्थ काय झाला? असं समजां, की जरी माझ्याशी बोलल्यावर लगेच स्त्योपा विमानतळावर पळाला आणि जवळ जवळ पाच मिनिटांनी त्यांत बसला, तरीपण...अविश्वसनीय..., निष्कर्ष हा निघतो, की विमानाने फक्त पाच मिनिटांत एक हजारापेक्षा जास्त किलोमीटर्स पार केलेत? म्हणजे एका तासांत 12,000 किलोमीटर्सच्या वेगाने विमान उडंत होतं! हे तर अशक्यंच आहे, म्हणूनंच तो याल्टांत नाहीये.
मग काय शक्यता आहे? सम्मोहन? पृथ्वीवर अशी कोणतीच सम्मोहन शक्ति नाहीये, जी एखाद्या माणसाला हज्जारो किलोमीटर्स दूर फेकून देईल! कदाचित त्याला भ्रम झाला असेल की तो याल्टांत आहे! त्याला तर कदाचित स्वप्नं पडतंय, पण काय याल्टाच्या गुप्तचर पोलिसलासुद्धा स्वप्नंच पडतंय! नाही...माफ़ करा, असं नसतं!...पण टेलिग्रामतर ते तिथूनंच पाठवताहेत?
फिनडाइरेक्टचा चेहरा भीतीने विवर्ण झाला. ह्याच वेळेस दाराचं हैण्डल बाहेरून फिरवलं, मुरगळलं जात होतं आणि ओरडणा-या रिसेप्शनिस्टचा आवाज ऐकूं येत होता:
“नाही! नाही जाऊ देणार! वाटलं तर मला मारून टाका! ज़रूरी मीटिंग चाललीये!”
रीम्स्कीने स्वतःवर जमेल तितका ताबा ठेवंत टेलिफोन उचलला आणि म्हणाला, “याल्टासाठी सुपर-अर्जेंट कॉल द्या.”
“शाबास!” वारेनूखा अर्थपूर्ण हास्य करंत उद्गारला.
पण याल्टाला कॉल लागलांच नाही. रीम्स्कीने टेलिफोनचं रिसीवर ठेवलं आणि म्हणाला, “काय पीडा आहे, लाइन बिघडली आहे.”
स्पष्ट होतं की लाइनच्या बिघाडाने त्याला खूपंच उद्विग्न केलं आणि विचार करायला भाग पाडलं. थोडा वेळ विचार करून त्याने एका हातांत पुन्हां रिसीवर उचलला आणि दुस-या हाताने त्यांत जे बोलंत होता, ते लिहूं लागला:
“सुपर लाइटनिंग टेलिग्राम घ्या. वेराइटी. हो. याल्टा. गुप्तचर पोलिस. हो. “आज सुमारे साडे अकरा वाजतां लिखादेयेव माझ्याशी मॉस्कोत फोनवर बोलला. त्यानंतर तो ड्यूटीवर नाही आला, टेलिफोनवर त्याला धुंडू नाही शकले. निर्दिष्ट कलाकारावर नजर ठेवण्याचा बंदोबस्त करतोय. हस्ताक्षर सत्यापित करतोय. फिनडाइरेक्टर रीम्स्की.”
“”खूप हुशारीचं काम केलंय !” वारेनूखा ने विचार केला, पण तो पूर्णपणे विचार नाही करूं शकला; कारण त्याच्या डोक्यांत एक विचार चमकला, “वेडेपणा आहे! तो याल्टांत असूंच नाही शकंत!”
येवढ्यांत रीम्स्कीने असं केलं की सगळे टेलिग्राम्स आणि त्याने स्वतः पाठवलेल्या टेलिग्रामची कॉपी व्यवस्थित ठेवून त्यांना एका लिफ़ाफ्यांत घातलं, लिफाफा बंद केला, त्याच्यावर काही शब्द लिहिले आणि वारेनूखाकडे देत म्हणाला, “ताबडतोब, इवान सावेल्येविच, स्वतः जा. त्यांनाच5 निर्णय घेऊ दे.”
ही खरोखरंच बुद्धिमानीचं काम आहे,” वारेनूखाने विचार केला आणि लिफाफ्याला आपल्या ब्रीफकेसमधे लपवून ठेवलं. मग त्याने एक शेवटचा प्रयत्न करण्यासाठी स्त्योपाच्या फ्लैटचा नंबर फिरवला. रिसीवरमधून येणारे आवाज ऐकले आणि अत्यंत प्रसन्नतेने आणि रहस्यपूर्ण ढंगाने डोळा मारला, आणि तोंड वेंगाडलं. रीम्स्कीने त्याच्याकडे मान वळवली.
“मी कलाकार वोलान्दशी बोलूं शकतो कां
?” अत्यंत गोड आवाजांत वारेनूखाने विचारलं.
“ते व्यस्त आहेत,: रिसीवरमधून खणखणीत आवाज उत्तरला, “कोण बोलतंय?”
“वेराइटीचा एडमिनिस्ट्रेटर, वारेनूखा.”        
“इवान सावेल्येविच?” रिसीवर आनंदाने ओरडला, “तुमचा आवाज ऐकून खूप आनंद झाला! तुमची तब्येत कशी आहे?”
धन्यवाद!” वारेनूखा आश्चर्याने उत्तरला, “मी कोणाशी बोलतोय?”
“सहायक! त्यांचा सहायक आणि दुभाष्या करोव्येव.” रिसीवर खिदळला, “मी तुमचा सेवेंत हजर आहे, प्रिय इवान सावेल्येविच! माझ्यासाठी काही काम असेल तर निःसंकोच सांगा. ठीकाय?”
“माफ़ करा, स्तिपान बग्दानोविच सध्यां घरी नाहीत का?”
“ओह, नाहीये! नाहीये!” रिसीवर ओरडला, “चालले गेले.”
“कुठे?”
“शहराच्या बाहेर, मोटरमधे हिंडायला!”
“क्...काय? हि...हिंडायला? आणि ते परत केव्हां येणारेत?”
“म्हणंत होते की मोकळ्या हवेंत थोडा श्वास घेऊन लवकरंच येईन!”
“असं आहे...” वारेनूखा त्रासून म्हणाला, “थैन्क्स! कृपा करून वोलान्द महाशयांना सांगा, की त्यांचा शोआज कार्यक्रमाच्या तिस-या भागांत आहे.”
“ठीक आहे. असं कसं! निश्चितंच. लगेच. ज़रूर. सांगेन,” रिसीवरमधून तुटक-तुटक उत्तर आलं.
“शुभेच्छा,” वारेनूखा आश्चर्याने म्हणाला.
“कृपा करून माझ्याकडूनपण,” रिसीवर म्हणाला. “सर्वश्रेष्ठ हार्दिक शुभेच्छा घ्या! सफलतेसाठी. शांति आणि सुखासाठी. सगळ्यांचसाठी!”
“बघितलंस, नक्कीचं! मी आधीच सांगितलं होतं!” एडमिनिस्ट्रेटर संतापाने म्हणाला, “काही याल्टा-वाल्टाला नाहीं गेला, तो गेला आहे कारमधे हिंडायला!”
“जर असं असेल, तर...” फिनडाइरेक्टर रागाने लाल झाला. “हा तर डुक्करपणा आहे, ज्याला काही नावंच नाहीये!”
“आठवलं! आठवलंय! पूश्किनोमधे याल्टानावांच बारउघडलंय! सगळं स्पष्ट आहे! तो तिथे गेला, पिऊन तर्र झाला आणि आता तिथून टेलिग्राम्स पाठवतोय!”
“हे अतीच झालंय!” आपला गाल कुस्करंत रीम्स्की म्हणाला आणि त्याच्या डोळ्यांतून रागाच्या ठिणग्या निघूं लागल्या, “हे हिंडणं-फिरणं त्याला खूप महागांत पडेल!”
पण त्याचा आवेश लगेच कमी झाला आणि तो अविश्वासाने म्हणाला, “पण, असं कसं, गुप्तचर पोलिस...”
“फालतूपणा आहे! ही सगळी त्यानेच केलेली गंमत आहे,” एडमिनिस्ट्रेटर मधेच त्याला टोकंत म्हणाला, “तर, हा लिफाफा घेऊन जाऊं?”
पुन्हां दार उघडलं आणि पुन्हां अवतीर्ण झाली तीच...ती!माहीत नाही कां अत्यंत विषादाने रीम्स्कीने विचार केला आणि ते दोघं आत येणा-या महिला पोस्टमैनच्या स्वागतासाठी उभे राहिले.
आता टेलिग्राममधे लिहिलं होतं:
सत्यापन करण्यासाठी धन्यवाद, लगेच पाचशे पाठवा गुप्तचर पोलिसला. उद्या मॉस्कोसाठी विमानांत बसेन – लिखादेयेव.
“तो पागल झालांय...” पस्त होत वारेनूखा म्हणाला.
रीम्स्कीने चाव्यांची खणखण करंत अज्वलनशील कैश बॉक्समधून पैसे काढले, पाचशे रूबल्स मोजले, घण्टी वाजवली, एका कर्मचा-याला ते रूबल्स दिले आणि त्याला टेलिग्राफ ऑफिसमधे पाठवलं.
“माफ करा, ग्रिगोरी दानिलोविच,” स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास न ठेवतां वारेनूखाने म्हटलं, “माझ्या मते तुम्हीं उगीचंच पैसे वाया घालवताय!”
“ते परंत मिळतील,” रीम्स्कीने हळूंच म्हटलं, “त्याला ह्या पिकनिकबद्दल व्यवस्थित उत्तर द्यावं लागेल,” आणि ब्रीफकेसकडे बोट दाखवंत वारेनूखाला म्हटलं, “तू जा. इवान सावेल्येविच, उशीर नको करूं.”
वारेनूखा ब्रीफकेस घेऊन कैबिनच्या बाहेर धावला. तो खाली उतरला आणि टिकिट-खिडकी समोर आज पर्यंतची सर्वांत लाम्ब रांग बघून टिकिट-खिडकीवर बसलेल्या मुलीकडे गेला. मुलीने सांगितलं की आणखी तास भरांत हाउसफुल होण्याची शक्यता आहे, कारण की जसंच नवीन पोस्टर लावलं, लोकं लाटे सारखे धावत आले. त्याने मुलीला हॉलमधे समोरच्या लाइनींत आणि बॉक्समधे तीस सर्वांत चांगल्या सीट्स राखून ठेवायला सांगितल्या आणि शोसाठी फुकट पासमागणा-यांना कटवंत आपल्या ऑफिसमधे लपला, कारण की त्याला टोपी घ्यायची होती. तेवढ्यांत टेलिफोन किंचाळला.
“यस!”
“इवान सावेल्येविच?” रिसीवरमधून किळसवाणा, जाडा-सा आवाज आला.
“ते थियेटरमधे नाहीयेत!” वारेनूखा ओरडणारंच होतां की रिसीवरने त्याला मधेच थांबवलं, “वेडेपणा करूं नकोस, इवान सावेल्येविच; आणि ऐकं, हे टेलिग्राम्स कुठेही नको नेऊं आणि कुणाला दाखवूंसुद्धां नको!”
“कोण बोलतंय?” वारेनूखा गरजला, “हा वेडेपणा बंद करा, नागरिक! तुम्हांला लगेच हुडकून काढतील! तुम्हीं कोणच्या नंबरवरून बोलतांय?”
“वारेनूखा,” तोच भयंकर आवाज म्हणाला, “तुला रशियन भाषा कळंत नाही कां? हे टेलिग्राम्स कुठेही घेऊन जाऊं नकोस.”
“ओह, तुम्हीं ऐकणार नाही?” एडमिनिस्ट्रेटर वेडापिसा झाला, “बघूनंच घ्या! तुम्हांला ह्याची किंमत मोजावी लागेल!” आणि त्याने एखादी धमकीसुद्धां दिली, पण मग एकदम चुप झाला, कारण की त्याला वाटलं, की त्याचा आवाज कोणी ऐकतंच नाहीये.
त्याच्या ऑफिस-रूम मधे एकदम अंधार झाला. वारेनूखा बाहेर धावला. आपल्यामागून दार धाडकन् बंद केलं आणि बाजूच्या रस्त्याने वसंतोद्यानाकडे पळाला.
एड्मिनिस्ट्रेटर खूपंच उत्तेजित आणि उत्साहाने थबथबलेला होता. ह्या वात्रट टेलिफोन कॉलनंतर त्याच्या मनांत थोडीशी सुद्धा शंका उरली नाही, की ही गुंडांची टोळी फालतूचे चाळे करतेय, आणि ह्याच चाळ्यांचा लिखादेयेवच्या गायब होण्याशी संबंध होता. ह्या दुराचा-यांचं बिंग फोडण्याची तीव्र इच्छा एडमिनिस्ट्रेटरला अस्वस्थ करंत होती. आणि कितीही विचित्र वाटंत असलं तरी त्याच्या मनांत एक प्रसन्नतेचा आभास तरळूं लागला. असं अनेकदां होतं, जेव्हां एखाद्या माणसाला आकर्षणाचे केंद्र व्हायचे असते, एखादी सनसनाटीची बातमी कुठेतरी पोहोचवायंची असते.
वसंतोद्यानांत हवा एड्मिनिस्ट्रेटरच्या चेह-याला मारंत होती आणि त्याच्या डोळ्यांत धूळ टाकंत होती; जणु त्याच्या रस्ता अडवतेय, त्याला चेतावनी देतेय. दुस-या मजल्यावर कोणचीतरी खिडकी धडाम् वाजली, तिची काच फुटतां-फुटतां वाचली. लिण्डन आणि मैपल वृक्षांचे शेंडे एक विचित्रसा, भयानकसा आवाज करंत होते. मधेच उजेड, मधेच अंधार होत होता. एडमिनिस्ट्रेटरने डोळे चोळून बघितलं की मॉस्कोच्या आकाशांत पिवळ्या किनारीचं एक वादळं गरजंत पुढे वाढतंय. कुठेतरी विजेचा कडकडाट होत होता.
कितीही घाईंत असला, तरीही वारेनूखाच्या मनांत एकाएकी एका सेकंदासाठी जाऊन बघण्याची तीव्र इच्छा झाली, की मैकेनिकने लैम्पवर जाळी लावलीयं की नाही.
शूटिंग गैलरीच्या जवळून जाताना वारेनूखा लिलीच्या दाट झुडुपांपर्यंत पोहोचला, ज्यांच्यामधे निळ्या रंगाचं टॉयलेट होतं. मैकेनिक सधलेला कारीगर होता. पुरुष कक्षांत लैम्पने धातूची जाळी घालून घेतली होती, पण एडमिनिस्ट्रेटरला ह्या गोष्टीचं फार दुःख झालं की दाटून येणा-या अंधारांत सुद्धां स्पष्ट दिसंत होतं की सगळ्या भिंतींवर कोळश्याने आणि पेन्सिलीने काहीतरी लिहिलेलं होतं.
“आता ही काय भानगड आहे...” एडमिनिस्ट्रेटरने तोंड उघडलंच होतं की त्याला आपल्या मागे गुरगुरणारा आवाज ऐकूं आला, “इवान सावेल्येविच, तुम्हींच आहांत नं?”
वारेनूखा थरथरला. तो वळला आणि त्याने आपल्या मागे एका लट्ठ्या बुटक्याला पाहिलं, कदाचित बोक्यासारखा आकार होता त्याचा.
“हो, मीच आहे,” वारेनूखाने उर्मटपणे उत्तर दिलं.
“फार-फार आनंद झाला...” चीं-चीं करंत बोक्यासारखा लट्ठ्या म्हणाला आणि त्याने एकदम वळून वारेनूखाच्या कानावर इतकी जोरदार थप्पड मारली की एडमिनिस्ट्रेटरच्या डोक्यावरची टोपी उडून कमोडच्या भोकांत जाऊन अशी गायब झाली, जसे गाढवाच्या डोक्यावरून शिंग.
लट्ठ्याच्या थप्पंडने टॉयलेटमधे असा उजेड झाला, जणु वीज चमकलीय, वीज कडकडण्याचा आवाजपण आला. मग पुन्हां एकदा उजेड झाला आणि वारेनूखासमोर आणखी एक माणूस अवतरला – छोटासा, पण खेळाडूसारखे खांदे असलेला, आगीसारखे लाल केस असलेला, एका डोळ्यांत फूल पडलेला, तोंडातून एक तीक्ष्ण दात बाहेर निघंत असलेला. ह्या दुस-याने एडमिनिस्ट्रेटरच्या दुस-या कानावर थप्पड ठेवून दिली. ह्याला प्रतिसाद म्हणून आकाशांत पुन्हां वीज कडकडली आणि टॉयलेटच्या लाकडाच्या छप्परवर मुसळधार पाऊस पडूं लागला.
“काय करतोस, मित्रा,” वेडावलेला एडमिनिस्ट्रेटर कुजबुजंत म्हणणार होता, पण तेव्हांच त्याला वाटलं, की सार्वजनिक प्रसाधन-कक्षांत एका निःशस्त्र माणसावर हल्ला करणा-या गुंडांसाठी मित्रहा शब्द योग्य नाहीये, आणि त्याने भसाड्या आवाजांत म्हणायचा प्रयत्न केला : “नाग...” पण तेव्हांच एक तिसरी भयानक थप्पड, न जाणे कुठून पडली की त्याच्या नाकांतून रक्त निघून कोटाच्या बाहीवर सांडलं.
“तुझ्या ब्रीफकेसमधे काय आहे बांडगुळा!” बोक्या सारखा लट्ठ्या तीक्षण आवाजांत ओरडला, “टेलिग्राम्स? आणि तुला टेलिफोनवर चेतावनी दिली होती नं, की त्यांना कुठेही नेऊं नकोस? सांगितलं होतं की नाही? मी तुलांच विचारतोय!”
“दिली होती चे-ता-वनी-वनी...” एडमिनिस्ट्रेटरचा दम घुटंत होता.
“तरीही तू धावलांस? ब्रीफकेस इकडे दे, गोचिड्या!” त्याच विषारी आवाजांत, जो टेलिफोनवर ऐकला होता, दुसरा ओरडला आणि त्याने वारेनूखाच्या थरथरत्या हातांतून ब्रीफकेस हिसकावून घेतली.
आणि त्या दोघांनी एडमिस्ट्रेटरच्या बाह्या पकडल्या, त्याला उद्यानांतून ढकलून सादोवाया स्ट्रीटवर घेऊन गेले. वादळ थैमान घालंत होतं. रस्त्याच्या बाजूच्या नालींत पाणी साँय-साँय करंत होतं, फेस उसळंत लाटा उंच –उंच उठंत होत्या, छप्परांवरून पाणी पाइप्सवर प्रहार करंत होतं, रस्त्यांवर फेसाळ पाणी धावंत होतं. सादोवाया वरून सगळ्यांच जीवित वस्तू वाहून गेल्या होत्या. इवान सावेल्येविचला वाचवणारं कुणीच नव्हतं. मातकट पाण्यांतून उड्या मारंत, कडकडणा-या विजेच्या प्रकाशांत न्हायलेले ते डाकू एका सेकंदांत अर्धमेल्या एडमिनिस्ट्रेटरला बिल्डिंग नं. 302 पर्यंत घेऊन आले, तिच्या प्रवेश द्वाराकडे वळले, जिथे  आपले स्टॉकिंग्स आणि जोडे हातांत पकडून दोन बाया भिंतीला टेकून उभ्या होत्या. मग ते सहाव्या प्रवेश द्वारांत घुसले. मति गुंग झालेल्या वारेनूखाला पाचव्या मजल्यावर नेलं आणि चांगल्यांच माहीत असलेल्या स्त्योपा लिखादेयेवच्या अंधा-या खोलींत फरशीवर धाडकन् टाकून दिलं.
आता दोन्हीं डाकू गायब झाले आणी त्याजागेवर प्रकट झाली एकदम निर्वस्त्र मुलगी – लाल केस असलेली, फास्फोरससारख्या चमकणा-या डोळ्यांची.
वारेनूखा समजून चुकला, की आता त्याच्याबरोबर सर्वांत भयंकर घटना होणार आहे आणि तो विव्हळून भिंतीकडे सरकला. मुलगी त्याच्याजवळ गेली आणि तिने आपले पंजे त्याच्या खांद्यांमधे रुतवले. वारेनूखाचे केस उभे राहिले, कारण की ओल्या, थंडगार कोटमधून सुद्धां त्याला कळलं, की हे पंजे त्याच्या कोटापेक्षांही जास्त थंड आहेत, ते बर्फासारखे गार आहेत.
“ये, तुझं चुम्बन घेते,” मुलगी प्रेमाने म्हणाली आणि वारेनूखाच्या अगदी डोळ्यांसमोर ते चमकणारे डोळे प्रज्वलित झाले. वारेनूखाची शुद्ध हरपली, त्याला चुम्बनाचा अनुभवसुद्धां नाही घेता आला.


******

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें