मंगलवार, 1 अगस्त 2017

मास्टर आणि मार्गारीटा - 04


        चार



पाठलाग


स्त्रियांच्या उन्मत्त किंकाळ्या शांत झाल्या, कानांना भेदत जाणा-या पोलिसच्या शिट्ट्या ऐकूं आल्या. दोन एम्बुलेन्स गाड्या घेऊन गेल्या : एक शिरा-वेगळे धड आणि छाटलेलं डोकं शवागारांत; दुसरी काचाच्या तुकड्यांने जखमी झालेल्या सुंदर ट्रामचालिकेला. पांढरे कपडेवाल्या चौकीदारांनी विखुरलेले काचेचे तुकडे गोळा करून टाकले आणि रक्ताच्या डागांवर वाळू टाकून दिली आणि इवान निकोलायेविच चक्र दरवाज्याकडे पळतां पळतां बेंच वर कोसळला आणि तसांच पडून राहिला.
त्याने बरेंचदां उठण्याचा प्रयत्न केला, पण पाय काही ऐकायलांच तयार नव्हते – बिज़्दोम्नीला पक्षाघातासारखं काहीतरी झालं होतं.
पहिलीच कर्णकटु किंचाळी ऐकून तो चक्र दरवाज्याकडे धावला होता आणि त्याने डोक्याला रस्त्यावर गडगडताना बघितलं होतं. हे बघून त्याला जणु वेडंच लागलं आणि तो बेंचवर कोसळला आणि आपल्याच हाताला इतका कडकडून चावला, की रक्त निघूं लागलं. वेड्या जर्मन बद्दल तो अगदी विसरून गेला होता. फक्त एकंच गोष्ट समजण्याचा प्रयत्न करंत होता की, आत्ता – इतक्यांत तो बेर्लिओज़शी बोलंत होता, आणि एका मिनिटानंतर – डोकं...
उत्तेजित लोकं आश्चर्य प्रकट करंत कवीच्या समोरून आळीत धावत होते, पण इवान निकोलायेविच त्यांच्या शब्दांना ग्रहण करण्याच्या मनःस्थितीत नव्हता.
अप्रत्याशितपणे त्याच्या समोर दोन बायका एकमेकींवर आदळल्या आणि त्यांच्यातली एक, सरळ केस आणि तीक्ष्ण नाक असलेली, कवीच्या बिल्कुल कानांत दुसरीवर ओरडली, “अन्नूश्का, आपली अन्नूश्का! सादोवाया स्ट्रीटची! हे तिचंच काम आहे! तिने किराण्याच्या दुकानांतून सनफ्लॉवर ऑइल विकंत घेतलं, एक लिटर, पण बाटली चक्र दरवाज्याला आदळून फुटली, सगळा स्कर्ट तेलांत भिजला...ओफ, कित्ती ओरडंत होती, ओरडंत होती. आणि तो बिचारा गरीब, कदाचित त्या तेलावरून घसरला आणि रुळांवर जाऊन पडला...”त्या बाईच्या ह्या उन्मत्त आरडा-ओरडीतून इवान निकोलायेविचच्या अस्त-व्यस्त डोक्यांत फक्त एक शब्द घुसला : “ अन्नूश्का...”
“अन्नूश्का...अन्नूश्का?” तो स्वतःशीच पुटपुटला, आणि उत्तेजनेने इकडे-तिकडे बघूं लागला, काही तरी आठवतंय, काय? काय आहे?”
अन्नूश्काशब्दाला सनफ्लॉवर ऑइलहा शब्द जोडला गेला, आणि मग न जाणे कां पोंती पिलात. पिलातला त्याने डोक्यांतून काढून टाकलं आणि अन्नूश्कापासून सुरूं झालेली साखळी पुढे वाढवायचा प्रयत्न करूं लागला. ही साखळी लवकरंच पूर्ण झाली आणि तिचं दुसरं टोक वेड्या प्रोफेसरपर्यंत पोहोचलं.
ओह, चूक झाली! त्याने बरोबरंच सांगितलं होतं की मीटिंग होणारंच नाही, कारण की अन्नूश्काने तेल सांडलंय. आणि बघा, आता मीटिंग होऊंच शकंत नाही! हे तर काहीच नाही : त्याने चक्क सांगितलं होतं, की एक महिला बेर्लिओज़चं डोकं कापेल! हो, हो! महिलांच तर ट्राम चालवंत होती! हे सगळं काय आहे? आँ?      
ह्यांत काही शंकांच नाही उरली, की त्या रहस्यमय कन्सल्टेन्टला बेर्लिओज़च्या दुर्दैवी मृत्युचं सम्पूर्ण विवरण चांगलंच माहीत होतं. कविच्या डोक्यांत दोन विचार चमकून गेले. पहिला : तो वेडातर अजिबातंच नाहीये! हा फक्त मूर्खपणा आहे!” आणि दुसरा : “हे त्याचंच पूर्वनियोजित षडयंत्र तर नव्हतं!”
पण विचारायची परवानगी द्या, की कसं?!
हरकंत नाही! आम्हीं शोधून काढूं!”
महत्प्रयासाने इवान निकोलायेविच बेंचवरून उठला आणि परंत वृक्षांच्या आळीकडे जाऊं लागला, जिथे थोड्या वेळा पूर्वी तो प्रोफेसरशी बोलंत होता. बघितलं, की तो तिथून हललेला नाहीये.
ब्रोन्नाया स्ट्रीटवर लाइट्स लागले होते, पत्रियार्शीच्या पाण्यांत सोनेरी चंद्र चमकंत होता आणि चंद्राच्या भ्रामक प्रकाशांत इवान निकोलायेविचने बघितलं की तो उभा आहे आणि आता त्याच्या बगलेत छडी नसून तलवार होती.
कॉयर मास्टर, चौकटीवाला-लम्बू प्रोफेसरच्या शेजारी त्या जागेवर बसला होता, जेथे काही वेळापूर्वी इवान निकोलायेविच बसला होता. आता त्याच्या नाकावर एक अनावश्यक चश्मा होता ज्यांत एक काच बिल्कुलंच नव्हता आणि दुसरा तडकलेला होता. ह्या चष्म्या मुळे चौकटीवाले महाशय आतां आणखीनंच किळसवाणे वाटंत होते. त्याहूनही जास्त, जेव्हां त्यांनी बेर्लिओज़ला ट्रामचा रस्ता दाखवला होता.
थंडगार होतं चालल्या हृदयानी इवान प्रोफेसरजवळ पोहोचला आणि त्याच्या चेह-याकडे लक्ष देऊन बघितल्यावर ह्या निष्कर्षावर पोहोचला की ह्या चेह-यावर वेडेपणाचं कोणचंही लक्षण आधीसुद्धां नव्हतं आणि आतासुद्धां नाहीये.
“खरं-खरं सांगा, तुम्हीं कोण आहांत?” इवानने पडेल आवाजांत विचारलं.
परदेशी वळला आणि त्याने इवानवर अशी नजर टाकली, जणु त्याला पहिल्यांदाच बघतोय. मग तोंड वेडावून म्हणाला, “समजलं नाई...रशियन बोलणं...”
“ह्यांना समजंत नाहीये.” त्याच्या जवळंच बसलेला कॉयर मास्टर मधेंच टपकला, खरं तर त्याला कुणीही प्रोफेसरच्या शब्दांना समजावून सांगण्याची विनंती केलेली नव्हती.
“नाटक नका करूं!” इवान गरजला आणि त्याला आपल्या टाळूंत गारवा जाणवूं लागला, “आत्तां तर तुम्हीं इतकी चांगली रशियन बोलत होतां. तुम्हीं जर्मन ही नाहीये, आणि प्रोफेसरसुद्धां नाहीये! तुम्हीं हत्यारे आणि गुप्तचर आहांत. डॉक्यूमेन्ट्स!” रागांत येऊन इवान ओरडला.
रहस्यमय प्रोफेसरने आपल्या वाकड्या तोंडाला आणखीनंच वाकडं करंत खांदे उचकावले.               
“महाशय!” घाणेरडा लम्बू पुन्हां मधेच टपकला, “तुम्हीं पर्यटकाला कशाला त्रास देताय? ह्याच्यासाठी तुम्हांला कठोर शासन होईल!” आणि त्या संदेहास्पद प्रोफेसरने भोळा चेहरा केला आणि वळून इवानपासून दूर जाऊ लागला.
इवानला वाटलं की त्याचा धीर सुटंत चाललाय, दीर्घ श्वास घेऊन तो लम्बूला म्हणाला, “ऐ महाशय, ह्या गुन्हेगाराला पकडायला माझी मदत करा! तुम्हांला हे केलंच पाहिजे.”
लम्बू पटकन् उठला आणि उडीमारून गरजला, “कोण गुन्हेगार? कुठेय? परदेशी गुन्हेगार?” लम्बूचे डोळे आनंदाने मटकू लागले, “हा? जर हा गुन्हेगार आहे, तर सगळ्यांत आधी आपल्याला ज़ो-याने ओरडले पाहिजे : चौकीदार! नाहीतर तो पळून जाईल. चला, बरोबर ओरडूं, एकदम!” आणि लम्बूने आपला जबडा उघडला.
गोंधळलेल्या इवानने त्या मसक-या लम्बूचं म्हणणं ऐकून ज़ोराने आवाज लावला चौकीदार!पण लम्बूचं फक्त तोंडच उघडं होतं, त्यातूंन आवाजंच नाही निघाला.
इवानच्या एकट्या, कर्कश किंकाळीचा काही विशेष परिणाम नाही झाला. दोन सुंदरश्या मुलींचे लक्ष त्याने अवश्य वेधून घेतले, आणि इवानने त्यांच्या तोंडून ऐकलं, “दारुड्या!”
“म्हणजे, तू त्याच्या बरोबर आहेस?” इवान उत्तेजनेने ओरडला, “तुम्हीं काय माझी चेष्टा करतांहात? सोडा मला!”
इवान उजवीकडे वाकला आणि लम्बूपण उजवीच कडे वाकला, इवान डावीकडे तर त्या दुष्टानेपण तसंच केलं.
“तू मुद्दाम माझ्या पायांमधे कां अडमडतोयंस?” जनावरासारखा ओरडला इवान, “थांब, मी तुलांच पोलिसकडे देतो.”
इवानने त्या दुरात्म्याला कॉलरने पकडायचा प्रयत्न केला पण त्याचा झोकंच गेला. त्याच्या हातांत काहीच आलं नाही. लम्बू जणु पृथ्वींत गडप झाला होता.
इवान धापा टाकूं लागला, त्याने इकडे तिकडे बघितलं आणि थोड्यांच अंतरावर त्याला परदेशी दिसला. तो पत्रियार्शीच्या कोप-याकडे असलेल्या गेटजवळ पोहोचला होता. तो एकटा नव्हता, रहस्यमय आणि खतरनाक लम्बूपण त्याच्याजवळ पोहोचला होता. येवढंच पुरे नव्हतं : ह्या मंडळींत एक तिसरापण होता – माहीत नाही कुठून टपकलेला एक बोका, डुक्करासारखा विशाल, कावळ्या किंवा काजळासारखा काळा, अति साहसी अश्वारोह्याच्या मिशांसारख्या मिशा असलेला. हे तिघे कुटिल पत्रियार्शीच्या दिशेने जात होते. बोका आपल्या मागच्या पायांवर चालंत होता.
इवान ह्या पाप्यांच्या मागे धावला, पण त्याला कळून चुकलं की त्यांना पकडणं अशक्य आहे. तिघे कुटिल एका निमिषांत कोप-यावर पोहोचून दुस-यांच क्षणी स्पिरिदोनव्कावर आढळले. इवानने आपला वेग कितीही वाढवला, तरी त्यांच्यामधलं अंतर कमी नव्हतं होत. कवीला कळलंच नाही, की तो केव्हां स्पिरिदोनव्का स्ट्रीट पासून निकीत्स्की गेटपर्यंत पोहोचला. इथे आल्यावर परिस्थिति आणखीनंच विकट झाली. इथे खूब गर्दी होती. त्यांच्या नादांत इवान कोण्या दुस-याच नागरिकावर आदळला, ज्याच्यामुळे त्याला खूप बोलणी खावी लागली. आतां दुष्टांनी दरोडेखोरांसारखी चलाखी केली – ते इकडे-तिकडे विखुरले.
लम्बू चपळतेने चालंत अर्बात चौकाकडे जाणा-या बसमधे चढून गेला. अश्याप्रकारे तो तिथून निसटला. त्यांच्यापैकी एक हातांतून निघाल्यावर इवानने बोक्याकडे आपलं लक्ष केंद्रित केलं. तो विचित्र बोका ट्रामगाडीच्या फुटबोर्डवर चढून गेला आणि निर्लज्जासारखा धक्का मारून एका ओरडणा-या महिलेला आपल्या जागेवरून ढकलून त्याने दण्डा पकडला, आणि महिला कण्डक्टरला दमटपणामुळे उघडलेल्या खिडकींतून दहा कोपेकचं नाणं देऊं लागला. बोक्याचं असं वर्तन पाहून इवान इतका चकित झाला, की जवळच्यांच किराणा दुकानाला जणुं चिटकूनंच गेला आणि महिला कण्डक्टरचं वर्तन पाहून तर त्याची परिस्थिति आणखीनंच शोचनीय झाली.
तिने ट्राममधे घुसंत येणा-या बोक्याकडे फक्त बघितलं आणि रागाने थरथरंत म्हणाली, “मांजरी नाही! मांजरीबरोबर नाही! खाली उतर, नाहीतर पोलिसाला बोलवीन!”
आश्चर्याची गोष्ट ही होती की वास्तविकतेची जाणीव ना तर महिला कंडक्टरला होती, ना ही प्रवाश्यांना : बोका ट्रामगाडींत घुसला होता ही तर अर्धीच काळजीची गोष्ट होती, विचित्र गोष्ट तर ही होती, की हा बोका तिकिटाचे पैसे देत होता! हा बोका न केवळ पैसेवाला होता, पण अनुशासनप्रियसुद्धां होता. महिला कण्डक्टरची पहिलींच आरोळी ऐकून त्याने पुढे जाणं थांबवलं आणि फुटबोर्डवरून उतरून ट्रामच्या थांब्यावर बसून गेला. तो आपल्या मिशा ह्या दहा कोपेकच्या नाण्यानी स्वच्छ करंत होता, पण कण्डक्टरने घंटी वाजवल्यानंतर जशीच ट्राम चालू लागली, बोक्याने पण तेंच केलं, जे ट्राममधून खाली उतरवलेला माणूस करतो, ज्याला त्यांच ट्रामने जाणं अति आवश्यक असतं. बोक्याने ट्रामच्या तिन्हीं डब्यांना जाऊं दिलं. मग शेवटच्या डब्याच्या मागच्या कमानीवर उडीमारून आपल्या पंज्यांनी बाहेर निघालेली एक नळी धरून घेतली आणि निघाला ट्राम बरोबर, अशा प्रकारे त्याने पैसे देखील वाचवले.                     
ह्या घाणेरड्या बोक्याच्या मागे लागून इवानने त्या तिघांमधल्या मुख्य – प्रोफेसरला जवळ जवळ गमावलंच होतं. पण, सौभाग्याने, तो कुठेच सटकला नव्हता. इवानने त्याच्या राखाडी टोपीला बल्शाया निकीत्स्काया, किंवा गेर्त्सेन स्ट्रीटच्या सुरुवातीला बघितलं. निमिषमात्रांत इवानही तेथेंच होता. पण सफलता नाहींच मिळाली. कवीने आपला वेग वाढवला. मग तो येणा-या जाणा-यांना धक्के मारंत धावूं सुद्धां लागला पण एक सेंटीमीटर सुद्धां प्रोफेसरच्या जवळ पोहोचूं नाही शकला.
इवान कितीही वैतागलेला असला तरी तो ज्या अलौकिक वेगाने प्रोफेसरचा पाठलाग करंत होता, त्याने स्वतःच चकित होता. वीस सेकंद सुद्धां झाले नसतील की इवान निकोलायेविच निकीत्स्की गेटमधून विजेच्या प्रकाशांत जगमगणा-या अर्बात चौकांत पोहोचला होता. काही क्षणांत वाकड्या तिकड्या फुटपाथांची एक अंधारी गल्ली आली, जिथे इवान निकोलायेविचने अडखळून आपल्या गुडघ्याला इजा करून घेतली. मग – एक जगमगणारा भव्य रस्ता, क्रोपोत्किना स्ट्रीट, मग पुन्हां गल्ली, नंतर अस्ताझेन्का स्ट्रीट, पुन्हां एक गल्ली, आळसावलेली, घाणेरडी आणि मंद प्रकाश असलेली, इथे आल्यावर इवान निकोलायेविचच्या दृष्टीतूंन शेवटी तो निसटलांच, ज्याची त्याला इतकी गरज होती, प्रोफेसर हरवला.
इवान निकोलायेविच घाबरला, पण फक्त थोडाच वेळ, कारण की त्याला एकदम आभास झाला की प्रोफेसर 13नम्बरच्या बिल्डिंगच्या 47 नंबरच्या फ्लैटमधेच आहे.
प्रवेशद्वारांतून वेगाने आत जाऊन इवान निकोलायेविच दुस-या मजल्यावर चढला. त्याने पटकन तो फ्लैट शोधून लगेच घण्टी वाजवली. काही वेळाने एका पाच वर्षाच्या मुलीने दार उघडलं आणि काहीही न विचारता कुठेतरी चालली गेली.
रिकाम्या-रिकाम्या प्रवेश कक्षांत एक खूपंच कमी प्रकाशाचा छोटा सा बल्ब घाणीमुळे काळ्या झालेल्या छताला लटकंत होता, भिंतीवर टायर्स नसलेली एक सायकल टांगलेली होती, एक खूप मोठी पेटी होती, ज्यावर लोखण्डाच्या पट्ट्या ठोकल्या होता. एका शेल्फ मधे हैंगरवर हिवाळ्यांत घालायची लांब कानांची टोपी होती, जिचे लांब-लांब कान खाली लटकंत होते. एका दाराच्या मागून एका माणसाचा मोट्ठा आवाज ऐकू येत होता, बहुधा तो रागाने काव्यात्मक भाषेत किंचाळत असावा.                 
ह्या अनोळखी वातावरणांत इवान निकोलायेविच जरासुद्धां घाबरला नाही. तो सरंळ कॉरीडोरकडे धावला, असा विचार करून की तो नक्कीच बाथरूममधे लपला आहे. कॉरीडोरमधे अंधार होता. भिंतीवर धडकंत-धडकंत इवानला एका दाराच्या खालून येणारी प्रकाशाची क्षीण किरण दिसली, त्याने चाचपडंत दाराचं हैण्डल शोधलं आणि सम्पूर्ण शक्तिनिशी त्याला घुमवलं. दार फट्कन उघडलं. इवान बाथरूम मधेच घुसला होता. त्याला वाटलं की आता भाग्य त्याचा साथ देत आहे.
पण भाग्यांने तेवढा साथ नाही दिला, जेवढा द्यायला पाहिजे होता. इवानच्या अंगावर ओलं गरंम वारं आलं आणि बॉयलरमधे पेटलेल्या कोळशाच्या प्रकाशांत त्याने भिंतीवर टांगलेले मोठाले तसराळे बघितले. बाथटबपण दिसला, ज्यांत मीनाकारी तुटल्याने जिथे तिथे भयंकर काळे डाग दिसंत होते. ह्या टबमधे साबणाच्या फेसाने सम्पूर्णपणे झाकलेली एक नग्न स्त्री हातांत स्क्रबर घेऊन उभी होती.
तिने आपल्या साबण लागलेल्या डोळ्यांना किंचित किलकिलं करून, हातांनी चाचपडंत आत घुसलेल्या इवानला पाहिलं आणि त्या सैतानी प्रकाशांत तिने इवानला ओळखलं नाही. तिने हळूंच, पण आनंदाने म्हटलं, “किर्यूश्का! वेडेपणा बंद कर! वेड लागलंय का?...फ्योदोर इवानिच इतक्यांत येतीलंच. पट्कन इथून निघून जा!” आणि तिने हातांतला स्क्रबर इवानवर भिरकावला.
स्पष्ट होतं की चूक झाली होती, आणि सगळा दोष निश्चितंच इवान निकोलायेविचचांच होता. तरीही तो हे स्वीकार करायला तयार नव्हता. भर्त्सनेच्या स्वरांत तो ओरडला, “आह, दुराचारिणी!...” आणि मग माहीत नाही कां, तो किचनमधे पोहोचला. तिथे कोणीच नव्हतं. शेगड्या ठेवायच्या स्लैबवर मंद प्रकाशांत जवळ जवळ दहा प्राइमस स्टोव चुपचाप उभे होते1 . चंद्राची एक किरण धुळीने माखलेल्या, कित्येक वर्षांत न धुतलेल्या खिडकीतूंन कशीतरी आत येऊन त्या कोप-याला प्रकाशित करंत होती, जिथे धूळ आणि जाळ्यांनी माखलेली येशूची सुळावर टांगलेली प्रतिमा लटकंत होती, प्रतिमेच्या बॉक्सच्या मागून दोन मेणबत्यांचे2 टोक दिसंत होते. मोठ्या प्रतिमेच्या खाली एक छोटी, कागदाची प्रतिमा होती.
कोणालांच कळलं नाही, की इवान कोणच्या विचाराने पछाडला गेला, पण मागच्या चोर दरवाज्याकडे पळायच्या आधी त्याने ह्या मेणबत्त्यांपैकी एक उचलून घेतली. कागदाच्या येशूच्या प्रतिमेलासुद्धां आपल्या जवळ ठेवलं. ह्या वस्तू घेऊन काहीतरी पुटपुटंत त्याने त्या अनोळखी क्वार्टरमधून पलायन केलं, बाथरूममधे त्याने जे काही पाहिलं होतं, त्याने उद्विग्न होऊन इवान अंदाज लावायचा प्रयत्न करंत होता की हा निर्ल्लज्ज किर्यूश्का कोण बरं असेल आणि ती लांब कानांची घाणेरडी टोपी कुठे त्याचीच तर नव्हती.
निर्मनुष्य, उदास गल्लींत येऊन कवीने पळपुट्याला शोधण्यासाठी चारीकडे बघितलं, पण त्याचा कुठे पत्तांच नव्हता. तेव्हां इवानने दृढतेने स्वतःशीच म्हटलं:
तो नक्कीच मॉस्को नदीवर आहे! मार्च!”
इवान निकोलायेविचला विचारायला पाहिजे होतं की कोणच्या कारणामुळे तो असा विचार करंत होता, की प्रोफेसर मॉस्को नदीवरंच असला पाहिजे, दुसरीकडे कुट्ठेच नाहीं. पण दुःखाची गोष्ट ही आहे, की असं विचारणारं कुणीच नव्हतं, ती घाणेरडी गल्ली अगदी निर्मनुष्य होती.
अत्यंत कमी वेळांत इवान निकोलायेविच मॉस्को नदीच्या एम्फिथियेटरच्या3 पाय-यांजवळ दिसंत होता. इवान निकोलायेविचने आपले कपडे काढले आणि एका सहृदय दाढीवाल्याकडे ठेवले. पांढरा ढीला-ढाला शर्ट घातलेला तो म्हातारा आपल्या चुरगळलेल्या बुटांजवळ बसून स्वतःच वळलेली सिगरेट पीत होता. हातांना हालवंत, ज्याने थोडं गार वाटावं, इवानने एका पक्ष्यासारखा पाण्यांत सूर मारला. पाणी इतकं गार होतं, की त्याचा श्वास गुदमरायला लागला. त्याच्या डोक्यांत विचार आला की तो कदाचित पाण्याच्या वर कधीच परतणार नाही. पण तो उसळून वर आला, त्याचे डोळे भीतिने गोल झाले होते, आणि धापा टाकंत इवान निकोलायेविचने नदीच्या काठावर लागलेल्या फानूसांच्या तिरक्या, तुटक्या-फुटक्या प्रकाशांत, पेट्रोलचा वास येत असलेल्या पाण्यांत पोहणं सुरूं केलं.                  
जेव्हां ओल्या अंगाने पाय-या चढून त्या ठिकाणी पोहोंचला, जिथे त्याने दाढीवाल्याजवंळ आपले कपडे ठेवले होते, तेव्हां त्याने बघितलं की त्याच्या कपड्यांबरोबरंच दाढीवालासुद्धां गायब झालांय. अगदी त्याच जागेवर, जिथे त्याचे कपडे ठेवले होते, फक्त पट्ट्यापट्ट्यांची लांब चड्डी, फाटलेला शर्ट, मेणबती, येशूची प्रतिमा आणि काड्यापेटी पडली आहे. किंचित रागाने, दूर कोणालातरी मुक्के दाखवंत इवानने ते सगळं उचलून घेतलं.
आतां दोन प्रकारचे विचार त्याला वैताग आणंत होते : पहिला हा की त्याचं मॉसोलितचं परिचय-पत्र, जे तो नेहमी स्वतःजवळ बाळगांयचा, गायब झालं होत; दुसरा विचार हा, की ह्या अवस्थेत तो मॉस्कोच्या रस्त्यांवर कसा बिनधास्त हिण्डू शकंत होता? चला, कमींत कमी चड्डी तरी आहे...कोणाला ह्याने काय फरक पडणारेय, पण कुठे भानगड व्हायला नको.
त्याने गुडघ्यांपर्यंत येत असणा-या लांब चड्डीच्या खालच्या गुंड्या तोडल्या, असा विचार केला, की अशाने चड्डी उन्हांळ्यांत घालायच्या पैंट सारखी दिसूं लागेल, मग त्याने येशूची प्रतिमा, मेणबत्ती आणि काड्यापेटी उचलली आणि स्वतःला बजावलं की, ‘ग्रिबोयेदोवला जाऊं या! तो खात्रीने तेथेंच असला पाहिजे.
शहरावर संध्याकाळची मस्ती पसरली होती. धूळ उडवंत, साखळ्यांची खडखड करंत, एकामागून एक ट्रक्स जात होते, मागच्या भागांत हात पाय पसरून, पोत्यांवर काही लोक पाठीवर लोळले होते. सगळ्या खिडक्या उघड्या होत्या. प्रत्येका खिडकींत नारंगी रंगाच्या शेडखाली लैम्प्स जळंत होते. सगळ्या खिडक्यांतून, सगळ्या दारांमधून, सगळ्या कोप-यांवरून, सगळ्या गोदामांतून, भूमिगत रस्त्यांवरून आणि अंगणांतून येव्गेनी अनेगिनचं एक गाणं ऐकूं येत होतं.
इवान निकोलायेविचची भीति खरीच ठरली : येणारे जाणारे लोक लक्ष देऊन त्याच्याकडे बघायचे आणि तोंड फिरवून घ्यायचे. म्हणून त्याने मुख्य रस्ता सोडून गल्या-बोळांमधून जाण्याचं ठरवलं. तिथे ह्या गोष्टीची संभावना कमी होती, की लोक बिन बुटांच्या आणि उन्हाळ्यांत घालायच्या चड्डीतल्या माणसाला पाहून बोलून-बोलून टोचतील.
इवानने तसंच केलं. तो अर्बातच्या रहस्यमय गल्ल्यांच्या जाळ्यांत घुसला. तो भिंतींना लागून लागून चालंत होता. भीतीने इकडे-तिकडे बघायचा, प्रवेश द्वारांत लपायचा, ट्रैफिक लाइट पासून दूर आणि राजनयिकांच्या भव्य घरांपासून स्वतःला वाचवंत चालला होता.
ह्या सगळ्या कष्टप्रद यात्रेंत, माहीत नाही कां, सगळीकडे ऐकू येणारा ऑर्केस्ट्राचा आवाज त्याचा पिच्छांच सोडंत नव्हता, ज्यांत एक जाडा आवाज तात्यानाबद्दल आपलं प्रेम प्रकट करंत गात होता.


**********

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें