शनिवार, 19 अगस्त 2017

मास्टर आणि मार्गारीटा - 09


नऊ



करोव्येवच्या युक्त्या



निकानोर इवानोविच बसोय, मॉस्कोच्या सादोवाया स्ट्रीटवर असलेल्या 302 बी नम्बरच्या बिल्डिंगच्या हाउसिंग सोसाइटीचे1 प्रमुख, बुधवार आणि गुरूवारच्यामधल्या रात्री खूप उद्विग्न होते आणि अनेक भानगडींमधे अडकले होते. ही तीच बिल्डिंग आहे, जिथे स्वर्गीय बेर्लिओज़ राहत होता.
तुम्हांला आठवतंच असेल, की मध्यरात्रीच्या सुमारास एक कमिटी, ज्यांत झेल्दीबिन होता, त्या बिल्डिंगमधे आली. निकानोर इवानोविचला बोलावून बेर्लिओज़च्या मृत्युची सूचना दिली आणि त्याच्याबरोबर 50 नम्बरच्या फ्लैटमधे गेले.
तिथे मृत व्यक्तीच्या वस्तू आणि त्याची हस्तलिखितं सील केली. ह्या वेळेस तिथे काम करणारी मुलगी ग्रून्या नव्हती, आणि छिचोर स्तिपान बग्दानोविचसुद्धां नव्हता. कमिटीने निकानोर इवानोविचला सांगितलं की मृत व्यक्तीची हस्तलिखितं ते तपासासाठी नेताहेत; त्याचं घर म्हणजे तीन खोल्या (ज्यांत जवाहि-याच्या बायकोचं स्टडी रूम, ड्राइंग रूम आणि डाइनिंग रूम होतं) हाउसिंग सोसाइटीच्या ताब्यांत राहतील, आणि मृत व्यक्तीच्या वस्तू, त्याच्या जवळच्या नातेवाइकांचा पत्ता लागेपर्यंत, ह्याच बिल्डिंगमधे सुरक्षितपणे ठेवल्या जातील.
बेर्लिओज़च्या मृत्युची बातमी पूर्ण बिल्डिंगमधे अद्भुत गतिने पसरली. गुरुवारी सकाळी सात वाजेपासूनंच बसोयच्या टेलिफोनची घंटी सारखी वाजूं लागली. लोकं स्वतः अर्ज घेऊन येऊं लागले, हे सिद्ध करण्यासाठी की मृतकाच्या राहत्या घरावर त्यांचाच हक्क आहे. दोन तासांत निकानोर इवानोविचकडे असे 32 अर्ज आले.
ह्या अर्जांमधे काय नव्हतं लिहिलं : विनंती होती, धमकी होती, अटी होत्या, आमिष होतं, स्वतःच्या खर्चाने डागडुजी करण्याबद्दल लिहिलं होतं, जागा कमी पडंत असल्याचं रडगाणं होतं आणि दरोडेखोरांसोबत एकाच घरांत राहण्याच्या अशक्यतेबद्दल लिहिले होते. ह्या अर्जांमधे डोळ्यांत पाणी आणणारं वर्णन होतं : कोटाच्या खिशांतून पैसे गायब व्हायचं फ्लैट नं 31मधे, फ्लैट न मिळाल्यास दोन माणसांचा आत्महत्या करण्याचा निश्चय आणि एक अवैध गर्भ असल्याची स्वीकृतिपण होती.
निकानोर इवानोविचला त्याच्या फ्लैटच्या प्रवेश कक्षांत बोलावण्यांत आलं, त्याची बाही पकडून कुजबुजंत,  डोळे मिचकावंत वचन देण्यांत आलं, की त्याला आपल्या विभिन्न कर्जांमधून मुक्ती मिळेल.
हा मानसिक छळ जवंळ जवंळ दुपारी एक वाजेपर्यंत चालला होता, जोपर्यंत निकानोर इवानोविच आपला फ्लैट सोडून हाउसिंग सोसाइटीच्या ऑफ़िसमधे पळून गेला. पण जेव्हां त्याने पाहिलं की इथे सुद्धां लोकं त्याची वाट बघताहेत, तेव्हां तो तिथूनसुद्धां पळून गेला; कसांतरी पिच्छा पुरवणा-या लोकांपासून लपंत-छपंत, जे सिमेन्टच्या अंगणांत त्याचा पाठलाग करंत होते, तो सहाव्या प्रवेश द्वारांत लपला आणि लिफ्टने पाचव्या मजल्यावर पोहोचला, जिथे हा शापित फ्लैट नं. 50 होता.
थोडा श्वास घेऊन, घामाने डबडबलेल्या निकानोर इवानोविचने फ्लैटची घंटी वाजवली, पण कुणींच दार उघडलं नाही. त्याने पुन्हां-पुन्हां घण्टी वाजवली आणि रागांत बडबडायला सुरुवात केली. तरीही कोणीच दार नाही उघडलं. निकानोर इवानोविचचा धीर सुटंत होता. त्याने आपल्या खिशांतून डुप्लिकेट चाव्यांचा गुच्छा काढला आणि आधिकारिक भावाने दार उघडून आंत गेला.
“ऐ, काम वाली!” अंधा-या कॉरीडोरमधे निकानोर इवानोविच ओरडला, “काय नाव आहे? ग्रून्या? तू नाहीये कां?”
कोणीच उत्तर दिलं नाही.
तेव्हां निकानोर इवानोविचने स्टडी रूमच्या दाराची सील तोडली, आपल्या ब्रीफकेसमधून एक छोटाशी फोल्डिंग फुटपट्टी काढली आणि स्टडी रूममधे घुसला.
घुसायला तर तो घुसून गेला, पण दारावरंच विस्फारलेल्या डोळ्यांनी उभाच राहिला, आणि वरून थरथरूंसुद्धां लागला.
मृतकाच्या लिहिण्याच्या टेबलाशी एक अनोळखी माणूस बसला होता, चौकटीचा कोट घातलेला एक लम्बू, त्याने जॉकी सारखी टोपी घातली होती आणि दोरीचा चष्मा लावला होता...हो, एका शब्दांत, तोच.
“तुम्हीं कोण आहांत, श्रीमान?” निकानोर इवानोविचने घाबरंत विचारलं.
“ब्बा! निकानोर इवानोविच...” अकस्मात् प्रकट झालेला नागरिक चिरक्या आवाजांत ओरडला आणि त्याने उत्साहाने अचानक प्रमुखाशी हस्तांदोलन केलं, ह्या स्वागताने निकानोर इवानोविच जरापण खूश नाही झाला.
“माफ करा,” तो साशंकतेने म्हणाला, “तुम्हीं कोण? तुम्हीं कोणी शासकीय अधिकारी आहांत कां?”
“ओफ, निकानोर इवानोविच!” अनोळखी माणूस हसंत उद्गारला, “शासकीय आणि अशासकीय काय असतं? हे तर ह्या गोष्टीवर अवलम्बून आहे, की तुम्हीं एखाद्या गोष्टीकडे कोणत्या नजरेने बघतांय; हे परिस्थितिजन्य आणि ब-यांच अटींवर अवलम्बून आहे. आज मी एक अशासकीय अधिकारी आहे, आणि उद्या, शासकीय! ह्याच्या उलंटसुद्धां असूं शकतं, निकानोर इवानोविच, आणि काय-काय नाहीं होऊं शकंत!”    
ह्या तर्काने हाउसिंग सोसाइटीच्या प्रमुखाचं जरासुद्धा समाधान नाही झालं. मुळांत शंकेखोर असल्यामुळे त्याने अंदाज लावला की त्याच्यासमोर बडबड करंत उभा असलेला हा माणूस  नक्कीच अशासकीय असला पाहिजे आणि त्याचबरोबर रिकामटेकडा आणि बढाईखोर सुद्धां आहे.
“तुम्हीं आहांत कोण? तुमचं आडनाव काय आहे?” प्रमुखाने गंभीर होत विचारलं आणि तो अनोळखी माणसाजवळ जाऊ लागला.
“माझं आडनाव...” प्रमुखाच्या गंभीरतेने जराही न घाबरतां तो नागरिक म्हणाला, “समजा, करोव्येव. तुम्हीं काही खाणार कां, निकानोर इवानोविच? अगदी नि:संकोच! हँ?”
“माफ करा,” काहीशा अभद्रतेने निकानोर इवानोविच उत्तरला, “इथे खाण्यांची काय गरंज आहे! (हे स्वीकार करावंच लागेल, जरी चांगलं वाटंत नसलं तरी, की निकानोर इवानोविच स्वभावाने काहीसा उद्धट होता.) मृतकाच्या अर्ध्या भागाला गिळंकृत करण्याची परवानगी नाहीये! तुम्हीं इथे काय करतांय?”
“तुम्ही बसा तर खरं, निकानोर इवानोविच, बिल्कुल घाबरूं नका...” तो नागरिक जराही न घाबरतां डरकाळला आणि त्याने प्रमुखाकडे खुर्ची सरकावली.
निकानोर इवानोविच रागाने लाल झाला, त्याने खुर्ची ढकलून दिली आणि जो-याने विचारलं, “तुम्हीं आहांत कोण?”
“मी, जसं तुम्हीं बघतांय, ह्या फ्लैटमधे राहायला आलेल्या खास परदेशी पाहुण्याचा दुभाष्या आहे,” स्वतःला करोव्येव म्हणवणा-या त्या व्यक्तीने आपला परिचय दिला आणि घाणेरड्या जोड्याच्या टाचेने टक्-टक् करूं लागला.
निकानोर इवानोविचने तोंड उघडलं. ह्या फ्लैटमधे एखाद्या परदेशी माणसाचं असणं, तेसुद्धां दुभाष्याबरोबर, त्याच्यासाठी विचित्र होतं, म्हणून त्याने आणखी स्पष्टीकरण मागितलं.
दुभाष्याने आनंदाने सांगितलं की परदेशी कलाकार मिस्टर वोलान्दला वेराइटी थियेटरचे डाइरेक्टर स्तिपान बग्दानोविच लिखादेयेवने त्यांच्या ह्या परदेशी दौ-याच्या दरम्यान, जो सुमारे एका आठवड्याचा आहे, ह्याचं फ्लैटमधे राहण्याचं आमंत्रण दिलंय. ह्याबद्दल त्याने कालंच निकानोर इवानोविचला पत्र लिहून परदेशी पाहुण्याला एका आठवड्यासाठी राहायची परवानगी देण्याची विनंती केली होती, कारण स्वतः लिखादेयेव याल्टाला जाणार होते.                                       
“त्याने मला काहीही लिहिलेलं नाहीये,” प्रमुख विस्मयाने म्हणाला.
“तुम्हीं आपल्या ब्रीफकेसमधे जरा बघां तरी, निकानोर इवानोविच,” करोव्येवने गोड आवाजांत म्हटले.
निकानोर इवानोविचने खांदे उचकावले, ब्रीफकेस उघडली आणि त्याला लिखादेयेवचं पत्र मिळालं.
“ह्याचाबद्दल मी विसरलो कसां?” विस्फ़ारलेल्या डोळ्यांनी त्या लिफाफ्याकडे बघंत निकानोर इवानोविच बडबडला.
“होतं, होतं, निकानोर इवानोविच,” करोव्येव फाटक्या आवाजांत ओरडला, “विसरभोळेपणा, विसरभोळेपणा आणि थकवा आणि वाढलेलं ब्लड प्रेशर, माझ्या प्रिय मित्रा, निकानोर इवानोविच! मी पण भयंकर विसराळू आहे. दारूच्या एका पैगसोबंत मी तुम्हांला माझ्या जीवनाच्या काही घटना सांगेन, तर तुम्हीं हसता-हसता लोट पोट होऊन जाल!”
“लिखादेयेव याल्टाला केव्हां जाणार आहे?”
“ते तर निघून गेले, निघून गेले!” दुभाष्या ओरडला, “ते कारमधे भटकंत असतील! सैतानंच जाणे की ते कुठे आहेत.” आणि दुभाष्याने एक हात असा हलवला, जणु पवनचक्कीचा पंख आहे.
निकानोर इवानोविचने म्हटलं, “त्या परदेशी पाहुण्याला माझं स्वतः भेटणं फार जरूरी आहे.”
दुभाष्याने चक्क नाही म्हटलं, “हे अशक्य आहे. तो कामांत आहे, बोक्याला ट्रेनिंग देतोय.”
“तुम्हांला वाटलं तर बोक्याला दाखवूं शकतो,” करोव्येवने प्रस्ताव ठेवला.
आतां निकानोर इवानोविचने नाही म्हटलं, तेव्हां दुभाष्याने प्रमुखासमोर एक झणझणीत प्रस्ताव मांडला, “असं आहे, की वोलान्द महाशय कोणत्याही परिस्थितींत हॉटेलमधे राहणार नाहीयेत, आणि त्यांना मोठ्या जागेंत राहायची सवय आहे, तर प्रमुख त्यांना एका आठवड्यासाठी, म्हणजे त्यांचा मॉस्कोचा कार्यक्रम आटोपेपर्यंत, हा सम्पूर्ण फ्लैट वापरण्याची, म्हणजेच मृत व्यक्तीच्या खोल्यांचा उपयोग करण्याची परवानगी देतील कां? मृतकाला तर ह्याने काही फरक नाही पडणार.” शिट्टीसारख्या आवाजांत करोव्येव पुटपुटला, “हे तर तुम्हांलापण पटेलंच, निकानोर इवानोविच, त्याला फ्लैटची काही गरज नाहीये नं?”
निकानोर इवानोविचने क्षीण प्रतिकार करंत म्हटलं की परदेशी लोकांना मेट्रोपोलमधे राहावं लागतं, न की कोणाच्या खाजगी फ्लैटमधे...”
“मी स्वतःच सांगतोय नं, की तो चक्रम आहे... सैतानंच जाणे तो कोण आहे?” करोव्येव फुसफुस करंत म्हणाला, “पण त्याला नकोय! त्याला हॉटेल आवडतंच नाही! इथे बसतांत हे परदेशी!” करोव्येवने आपल्या मानेवर बोट खुपसंत मोठ्या आत्मीयतेने म्हटलं, “विश्वास ठेवा, प्राण खाऊन टाकतांत! येतांत...आणि हेरगिरीसाठी तरी येतांत, डाकिणीच्या औलादासारखे , किंवा आपल्या नख-यांनी डोकं खाऊन टाकतांत : हे आवडंत नाही, ते आवडंत नाही!...आणि तुम्हांला तर निकानोर खूपंच फायदा आहे. पैशांच्या बाबतींत तो पुढे-मागे नाही बघणार,” करोव्येवने डोळ्यांच्या कोप-यांतून इकडे-तिकडे बघंत म्हटलं आणि मग प्रमुखाच्या कानांत कुजबुजला, “करोडपति आहे!”
दुभाष्याच्या प्रस्तावांत एक व्यावहारिक अर्थ लपलेला होता. प्रस्ताव बरांच भारी होता, पण दुभाष्याच्या सांगण्याची लकब तेवढी भारी नव्हती; काही तरी संदेहास्पद होतं त्याचा बोलण्याच्या लकबींत, त्याचा कपड्यांमधे, त्याच्या त्या दयनीय चष्म्यांत. ह्यासगळ्यामुळे प्रमुखाच्या मानगुटीवर जणु एक अज्ञात भीति बसली होती; पण तरीही त्याने हा प्रस्ताव स्वीकार करण्याचा निर्णय घेतला. ह्यासाठी कारण हे होतं, की ही सोसाइटी तोट्यांत चालली होती. हिवाळ्याच्या आधी घरांना गरम ठेवण्यासाठी पेट्रोल विकंत घेणं आवश्यक होतं. त्याकरितां काय-काय करावं लागेल, माहीत नाही. परदेश्याच्या पैश्यांने हे काम सहजा-सहजी होऊन जाईल आणि बरंच काही शिल्लकपण उरेल. पण चतुर आणि सावधगिरी बाळगणा-या निकानोर इवानोविचने म्हटलं, की आधी त्याला ह्याबाबत इनटूरिस्ट-ब्यूरोंत विचारावं लागेल.         
“मी समजूं शकतो,” करोव्येव खिदळला, “न विचारतां कसं? विचारावंच लागेल, हा राहिला टेलिफोन, निकानोर इवानोविच, पट्कन बोलून घ्या! पैशांची काळजी नका करूं,” तो प्रमुखाला प्रवेश कक्षांत ठेवलेल्या टेलिफोनकडे नेत कुजबुजला, “त्याच्याकडून नाही तर कुणाकडून घेणार! जर तुम्हीं बघितलं असतं, की नीत्सेमधे त्याचा कित्ती शानदार बंगला आहे! पुढच्या उन्हांळ्यांत, जेव्हां तुम्हीं परदेश दौ-यावर जालं, तर नक्कीच जा बघायला – चकितंच व्हाल!”
इनटूरिस्ट ब्यूरोचं काम फोनवरंच अप्रत्याशितपणे आणि प्रमुखाला हैराण करणा-या शीघ्रतेने झालं. असं कळलं, की त्यांना आधीपासूनंच माहिती आहे, की वोलान्द महाशय लिखादेयेवच्या फ्लैटमधे राहणं पसंत करतील आणि त्यांना काहीच आपत्ति नाहीये.
“सुंदर, अति सुंदर!” करोव्येव आनंदाने ओरडला.
त्याच्या ह्या प्रसन्नतेने थोडं घाबरून प्रमुख म्हणाला, की हाउसिंग सोसाइटी एका आठवड्यासाठी फ्लैट नं. 50 कलाकार वोलान्दला भाड्याने द्यायला तयार आहे. भाडं राहील...निकानोर इवानोविचने थोडा विचार करून म्हटलं, “एका दिवसाचे 500 रूबल्स.”
आता करोव्येवने प्रमुखाला पूर्णपणे चित करून टाकलं. चोरा सारखा डोळा मारंत त्याने बेडरूमकडे बघितलं, जिथून लट्ठ बोक्याच्या हल्क्या पावलांचा आवाज़ येत होता, तो शिट्टी सारख्या आवाजांत म्हणाला, “म्हणजे, एका आठवड्यासाठी – 3500 रूबल्स?”
निकानोर इवानोविचला वाटलं, की आता तो म्हणेल, “कित्ती हावरे आहांत तुम्हीं, निकानोर इवानोविच!” पण करोव्येव एकदम वेगळंच बोलला, “ही पण काही रक्कम आहे! पाच मागा, तो देईल.”
विस्मित, स्तब्ध निकानोर इवानोविचला कळलंच नाही, की तो कसा मृतकाच्या टेबलाजवळ गेला, जिथे करोव्येवने पट्कन् आणि अगदी सहजपणे ह्या अनुबंधाच्या दोन प्रती तयार केल्या. मग, जणु तो हवेंत तरंगत त्यांना घेऊन बेडरूममधे गेला आणि परत आला; दोन्हीं प्रतींवर परदेशी कलाकाराची सही होती. प्रमुखानेपण अनुबंधावर हस्ताक्षर केलं. करोव्येवने पावती मागितली पाच...
“मोठ्या अक्षरांत, मोठ्या अक्षरांत, निकानोर इवानोविच...हजार रूबल्स...” आणि तो खूप विनोदशीरपणे म्हणाला, “एक, दोन, तीन...” आणि त्याने को-या करकरीत नोटांच्या पाच गड्ड्या प्रमुखाकडे सरकावल्या.
करोव्येवच्या चुटक्या आणि ताशे-यांबरोबर नोटांची मोजणी झाली, जसं : नोटांना मोजणं आवडतं’, ‘आपली नजर – खरं मापवगैरे.
पैसे मोजल्यावर प्रमुखाने आपल्या कागदपत्रांमधे नमूद करण्यासाठी परदेशी कलाकाराचं पासपोर्ट घेतलं, मग पासपोर्ट, पैसे आणि अनुबंध ब्रीफकेसमधे ठेवल्यावर तो थोडावेळ तिथेच घुटमळला आणि लाजंत लाजंत काही टिकिटं मागूं लागला...
“काय कमाल आहे!” करोव्येव किंचाळला, “तुम्हांला किती टिकिटं पाहिजेत, निकानोर इवानोविच, बारा, पंधरा?”
विस्मित प्रमुखाने स्पष्ट केलं, की त्याला फक्त दोनंच टिकिटं पाहिजेत, एक स्वतःसाठी आणि दुसरं आपल्या बायकोसाठी – पेलागेया अंतोनोव्नासाठी.
करोव्येवने लगेच एक नोटबुक काढलं आणि एका कागदावर पहिल्या रांगेत दोन माणसांसाठी एक चिट्ठी लिहून दिली. तो कागद दुभाष्याने उजव्या हाताने, हळूंच निकानोर इवानोविचच्या हातांत खुपसला आणि डाव्या हाताने प्रमुखाच्या दुस-या हातांत करकरीत नोटांचं जाडजूड बण्डल ठेवलं. त्या बण्डलवर नजर पडतांच निकानोर इवानोविच लाल झाला आणि त्याला आपल्यापासून दूर सारू लागला.
“असं नसतं,” तो बडबडला.
“मला काही ऐकायचं नाहीये,” करोव्येव अगदी त्याच्या कानांत कुजबुजला, “आमच्याकडे नसतं, परदेशांत असतं. तुम्हीं त्याच्या अपमान करतांय, निकानोर इवानोविच, हे चांगलं नाहीये. तुम्हीं काम केलंय...”
“खूप कडक तपासणी आणि कठोर शिक्षा होईल,” प्रमुख हळूंच म्हणाला आणि त्याने आपल्या डोळ्याच्या कोप-यांतून इकडे-तिकडे बघितलं.
“आणि प्रत्यक्षदर्शी कुठे आहेत?” करोव्येव दुस-या कानांत कुजबुजला, “मी तुम्हांला विचारतोय, कुठांय ते? तुम्हीं पण काहीतरीच बोलता!”
आणि मग, जसं नंतर प्रमुखाने स्पष्ट केलं, एक आश्चर्यकारक घटना घडली. नोटांच हे बण्डल स्वतःच त्याच्या ब्रीफकेसमधे घुसलं. त्याच्यानंतर थोडा अशक्त, थोडा पांगुळल्यासारखा असा निकानोर इवानोविच पाय-यांवर आला. त्याच्या डोक्यांत विचारांच काहूर माजलं होतं. तिथे नीत्सेतला बंगला फिरंत होता, आणि एक प्रशिक्षित बोका, आणि हा विचारसुद्धां की प्रत्यक्षदर्शी खरंच नव्हते, आणि हे पण की टिकिटं बघून पेलागेया अंतोनोव्नाला खूप आनंद होईल. हे सगळे विखुरलेले, पण आनंद देणारे विचार होते. पण तरीही त्याच्या मनांत खोलवर कुठेतरी जणु एक सुई गडंत होती. ही काळजीची पीडा होती. त्याबरोबरंच, तिथेंच पाय-यांवरंच प्रमुखाला ह्या विचाराने झोडंपलं, की तो दुभाष्या स्टडीरूम मधे कसा घुसला, जेव्हां की दार सीलबंद होतं! आणि त्याने, निकानोर इवानोविचने, ह्याबद्दल त्याला कां नाहीं विचारलं? थोडा वेळ तो पाय-यांकडे साण्डासारखा बघंत राहिला, पण मग त्याने ह्या विचाराला डोक्यातूंन काढून टाकायचं ठरवलं आणि निश्चय केला की फालतूच्या विचारांनी स्वतःला विचलित होऊं देणार नाही...
जसांच प्रमुख फ्लैटबाहेर पडला, बेडरूममधून एक जाडा आवाज आला, “मला हा निकानोर इवानोविच आवडला नाही. तो हावरंट आणि बेइमान आहे. असं होऊं शकेल कां, की तो पुन्हां येथे नाही येणार?”
“महाशय, तुम्हीं हुकूम करा!” कुठून तरी करोव्येवने उत्तर दिलं, पण थरथरत्या, बेसु-या आवाजांत नाही, तर स्पष्ट खणखणीत आवाजांत.
आणि लगेच त्या पापी दुभाष्याने प्रवेश कक्षांत येऊन टेलिफोनवर काही नम्बर फिरवून, काय माहीत कशाला, रहस्यमय आवाजांत म्हटलं, “हैलो! तुम्हांला हे सांगणं माझं कर्तव्य आहे, की सादोवाया स्ट्रीटच्या 302 नंबरच्या बिल्डिंगच्या हाउसिंग सोसाइटीचा प्रमुख बसोय विदेशी मुद्रेत2 लाच घेतो. ह्या क्षणी त्याच्या 35 नंबरच्या फ्लैटच्या शौचालयाच्या वेन्टिलेटरमधे वर्तमान पत्रांत गुण्डाळलेले चारशे डॉलर्स आहेत. मी ह्याच बिल्डिंगमधे अकरा नंबरच्या फ्लैटमधे राहणारा तिमोफेई क्वास्त्सोव बोलतोय. पण माझी विनंती आहे, की माझं नाव गुप्तंच राहू द्यावं. मला भीति आहे, की प्रमुख माझा सूड घेईल.
आणि त्या दुरात्म्याने टेलिफोनचं रिसीवर लटकवून दिलं.
फ्लैट नं. 50मधे आणखी काय झालं, हे तर माहीत नाही, हो, हे मात्र माहीत आहे, की निकानोर इवानोविचच्या घरी काय झालं. घरी पोहोचल्याबरोबर त्याने स्वतःला शौचालयांत बंद करून घेतलं आणि ब्रीफकेसमधून ते नोटांच बण्डल काढलं, जे दुभाष्याने त्याच्या हातांत ठेवलं होतं. त्याने पुन्हां एकदा मोजून खात्री करून घेतली, की बण्डलमधे चारशे रूबल्सच आहेत. हे बण्डल वर्तमान पत्रांत गुण्डाळून त्याला वेन्टिलेटरवर ठेऊन दिलं.
पाच मिनिटानंतर प्रमुख आपल्या छोट्याश्या डाइनिंगरूमच्या टेबलाशी बसला होता. बायकोने किचनमधून व्यवस्थित कापलेली हेरिंग आणली, जिला हिरव्या कांद्याने सजवलं होतं. निकानोर इवानोविच एक छोटा पैग बनवून प्यायला, दुसरा बनवला, प्यायला. फोर्कवर हेरिंगचे तीन तुकडे लावले...तेवढ्यांत घण्टी वाजली आणि पेलागेया अन्तोनोव्नाने वाफ निघंत असलेलं एक भांडं टेबलवर ठेवलं, ज्याला बघताक्षणीच कळंत होतं की ह्या दाट सूपच्या भांड्यात ते आहे, ज्याच्यापेक्षा जास्त स्वादिष्ट जगांत सम्पूर्ण जगांत काहीच नाहीये – मैरो बोन!
लाळ गिळंत निकानोर इवानोविच कुत्र्यासारखा ओरडला, “चुलींत जा! खाऊंसुद्धां नाही देत...कोणालाच घुसू नको देऊ...मी घरी नाहीये, बिल्कुल नाहीये! फ्लैटबद्दल विचारलं तर सांग की काळजी करूं नका, एका आठवड्यानंतर मीटिंग होईल...”
बायको प्रवेशद्वाराकडे धावली आणि निकानोर इवानोविचने वाफ निघंत असलेल्या भांड्यांतून चमचाने तिला काढलं, लांबीत चटकलेल्या मैरो बोनला. त्याच क्षणी डाइनिंग रूममधे दोन नागरिक घुसले, आणि त्यांच्याबरोबर माहीत नाही कां चेहरा पिवळा पडलेली पेलागेया अन्तोनोव्ना. त्या नागरिकांना बघतांच निकानोर इवानोविचसुद्धां पांढरा फ़टक पडला आणि उठून उभा राहिला.
“शौचालय कुठे?” पहिल्या नागरिकाने विचारलं, ज्याने पांढ-या रंगाचं जैकेट घातलं होतं.
डाइनिंग टेबलावर काहीतरी वाजलं (हा निकानोर इवानोविचच्या हातांतून सुटलेल्या चमच्याचा आवाज होता).
“इकडे, इकडे,” पेलागेया अन्तोनोव्ना पट्कन् म्हणाली.
आगंतुक लगेच कॉरीडोरकडे गेले.
“झालं काय आहे?” निकानोर इवानोविचने आगंतुकांच्या मागे मागे येत विचारलं, “आमच्या फ्लैटमधे काहीही आपत्तिजनक नाहीये...तुमचे आयडेन्टिटी कार्ड्स? माफ़ करा...”
पहिल्या आगंतुकाने चालता-चालता निकानोर इवानोविचला आपलं आयडेन्टिटी कार्ड दाखवलं आणि दुसरा त्याच क्षणी शौचालयांत कमोडवर उभा राहून आपला हात वेन्टिलेटरमधे घालताना दिसला. निकानोर इवानोविचच्या डोळ्यांसमोर अंधारी आली. वर्तमान पत्राचा कागद दूर सरकवला गेला, पण बण्डलमधे रूबल्स नसून काही अनोळखी नोट होते, निळे-निळे, हिरवे-हिरवे, ज्यांच्यावर एका म्हाता-याचं चित्र होतं. पण निकानोर इवानोविचला सगळं अस्पष्टंच दिसंत होतं, त्याच्या डोळ्यांसमोर काही गोल-गोल चट्टे तरंगत होते.
“वेन्टिलेटरमधे डॉलर्स आहेत,” पहिल्याने विचारमग्न होऊन म्हटलं आणि अत्यंत हळुवारपणे आणि प्रेमाने निकानोर इवानोविचला विचारलं, “हे पैकेट तुमचं आहे?”
“नाही!” निकानोर इवानोविच घाबरला, “शत्रूंनी फेकलं असेल!”
“होतं,” पहिल्याने सहमति दर्शवत मान हालवली, आणि पुन्हां हळुवारपणेच पुढे म्हणाला, “तरीही बाकीचे तर द्यावेंच लागतील.”
“माझ्याकडे नाहीयेत! देवाशप्पथ नाहीये, मी कधीही त्यांना हातांत सुद्धां नाही धरलं!” प्रमुख वैतागून ओरडला.
तो टेबलवर वाकला, खडखड करंत त्याचं ड्रावर काधलं, आणि त्यांतून ब्रीफकेस काढून काहीतरी असंबद्ध असं बडबडंत राहिला, “हे बघा, अनुबन्ध...तो सापाचं पिल्लू, दुभाष्या, फेकून गेलायकरोव्येव...चष्मा घातलांय!”
त्याने ब्रीफकेस उघडली, त्यांत बघितलं, हात टाकला आणि...त्याच्या चेहरा काळा ठिक्कर पडला आणि त्याने ब्रीफकेस सूपमधे फेकून दिली. ब्रीफकेसमधे काहीही नव्हतं : स्तिपानचं पत्र नव्हतं, अनुबंध नव्हतं, परदेशी कलाकाराचं पासपोर्ट नव्हतं, पैसे नव्हते, थियेटरचे टिकिटंसुद्धां नव्हते...काहीच नाही, फक्त ब्रीफकेसच्या आत लागलेलं कापडाचं अस्तर होतं.
“कॉम्रेड्स!” प्रमुख अनैसर्गिक आवाजांत ओरडला, “त्यांना पकडा! आमच्या बिल्डिंगमधे सैतानी ताकत घुसलीय!”
पण तेवढ्यांत पेलागेया अन्तोनोव्नाला न जाणे काय झालं, कारण ती हात हलवंत ओरडायला लागली, “कबूल करून घे इवानोविच! तुझ्यासाठी चांगलं होईल!”
निकानोर इवानोविचच्या डोळ्यांत रक्त उतरलं. तो बायकोच्या डोक्यावर मूठ उगारंत भसाड्या आवाजांत ओरडला, “ओफ, मूर्ख, पापीण!”
आता तो हवालदील होऊन खुर्चीवर पडला. स्पष्टंच होतं की त्याने नियतीसमोर हार पत्करली होती.
ह्याच वेळी प्रमुखाच्या फ्लैटच्या किल्लीच्या भोकाला कधी डोळा, तर कधी कान लावून तिमोफेइ कन्द्रात्येविच क्वास्त्सोव उत्सुकतेने चिटकून उभा होता.
पाचंच मिनिटांत अंगणांत उभ्या असलेल्या त्या बिल्डिंगमधे राहणा-यांनी बघितलं की हाउसिंग सोसाइटी प्रमुख दोन माणसांबरोबर निघून बिल्डिंगच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे जात होता. सगळ्यांनी बघितलं की निकानोर इवानोविचकडे लपवण्यासाठी तोंडंच नव्हतं; तो घसटंत चालला होता, दारुड्यासारखा, आणि काहीतरी बडबडंत होता.
ह्याच्या एक तासानंतर तो अनोळखी परदेशी पाहुणा फ्लैट नं. अकरामधे प्रकट झाला, अगदी तेव्हांच, जेव्हां तिमोफेइ कन्द्रात्येविच दुस-या लोकांना चघळून-चघळून सांगंत होता, की प्रमुखाला कसं पकडलं. अनोळखी माणसाने बोटाने तिमोफेइ कन्द्रात्येविचला किचनमधून प्रवेश कक्षांत बोलावलं. त्याला काहीतरी सांगितलं आणि त्याच्याचबरोबर कुठेतरी गायब झाला. 


*******

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें