आठ
प्रोफेसर आणि कविमधे युद्ध
अगदी तेव्हांच जेव्हां याल्टांत शुद्ध
स्त्योपाला सोडून चालली होती, म्हणजे जवळजवळ साडे अकरा वाजतां,
ती इवान निकोलायेविच बिज़्दोम्नीकडे परतली, जो
एका दीर्घ आणि शांत निद्रेतून तेव्हांच उठला होता. थोडा वेळ तर तो विचार करंत होता,
की ह्या चमचमीत सुरेख टेबल ठेवलेल्या, पांढ-या
भिंती असलेल्या, आणि पांढरे पडदे असलेल्या अनोळखी खोलीत तो
कसा काय आला, ज्यांच्या बाहेर त्याला सूर्याचा प्रकाश जाणवंत
होता.
इवानने डोक्याला झटका देऊन
बघितलं की दुखंत नाहीये आणि तेवढ्यांत त्याला आठवलं, की तो
दवाखान्यांत आहे. ह्या विचाराने बेर्लिओज़च्या मृत्यूची आठवण करून दिली : पण आज
ह्या आठवणीने त्याला जास्त धक्का नाही बसला. गाढ झोप झाल्यामुळे इवान थोडा शांत
झाला होता. आता तो शांत डोक्याने स्पष्टपणे विचार करूं शकंत होता. स्वच्छ, नरम, मऊ बिछान्यावर काही वेळ निश्चल पडून राहिल्यावर
इवान ने जवळंच घण्टीचं बटन बघितलं. उगीचंच वस्तूंना हात लावायच्या सवयीने इवानने
बटन दाबलं. त्याला काही आवाज येण्याची, किंवा कोणीतरी
येण्याची अपेक्षा होती, पण ह्याच्या अगदी उलटंच झालं.
इवानच्या पायथ्याशी बसवलेल्या एका मातकट सिलिंडरमधे प्रकाश झाला आणि त्यावर चमकते
अक्षरं प्रकट झाले, “पेय”. थोडा वेळ स्थिर राहिल्यावर हा
सिलिंडर गरगर फिरूं लागला आणि “नर्स” हा शब्द दिसेपर्यंत फिरंत होता. ह्या हुशार सिलिंडरने इवानला हैराण केलं. “नर्स”च्या नंतर आता सिलिंडरवर
“डॉक्टरला बोलवां” हे वाक्य आलेलं होतं.
“हूँ”... इवान विचार करूं
लागला की ह्या खोडकर सिलिंडरचं काय करायला हवं.
शेवटी त्याला मार्ग
सापडलांच. जसंच इवानने “सहायक डॉक्टर” शब्द आल्याबरोबर दुस-यांदा बटन दाबलं,
तो थांबला. त्यांतील लाइट विजला आणि खोलीत पांढरा एप्रन घातलेल्या
एका सहृदय महिलेने प्रवेश केला. तिने इवानला म्हटलं, “नमस्ते!”
इवानने उत्तर नाही दिलं,
कारणं की ह्या परिस्थितींत त्याला हे “नमस्ते” म्हणजे विचित्रंच
वाटलं. खरंच होतं – एका स्वस्थ्य माणसाला दवाखान्यांत फेकून दिलं होतं आणि असं
दाखवतांयेत की हे बरोबरंच होतं.
त्या महिलेने चेह-यावरून
सहानुभूतिचा भाव ढळूं दिला नाही आणि एक बटन दाबून खिडकीचे पडदे दूर सारले.
खोलीच्या फरशीला लागत असलेल्या चौड्या आणि हलक्या जाळींतून सूर्य खोलींत डोकावला.
जाळीच्या मागे एक बाल्कनी दिसली, तिच्या मागे वळंण
घेत असलेल्या नदीचा किनारा आणि नदीच्या दुस-या किना-यावर पाइन वृक्षांच प्रसन्न
वाटणारं जंगल.
“कृपा करून स्नान करून
घ्या,” महिलेने म्हटलं आणि तिच्या हातांच्या खालची
भिंत सरकली, जिच्यामागे सर्व सामग्रीने सुसज्जित स्नानगृह
आणि शौचालय दिसलं.
जरी इवानने ठरवलं होतं,
की तो ह्या महिलेशी बोलणार नाही, तरी
स्नानगृहांत नळातूंन येत असलेल्या पाण्याच्या प्रचण्ड धारेला बघून तो स्वतःवर ताबा
नाही ठेवूं शकला आणि उपहासाने म्हणाला, “काय थाट आहे! जणु मेट्रोपोलमधे
आहे!”
“ओह,
नाही,” महिला गर्वाने म्हणाली, “त्याच्यापेक्षांही जास्त चांगलं आहे, अश्या प्रकारचं
साहित्यतंर परदेशांतसुद्धां कुठे मिळणार नाही; वैज्ञानिक आणि
डॉक्टर मुद्दाम आमचं हॉस्पिटल बघायला येतांत. दररोज पंधरा टूरिस्ट्स, परदेशी,
येतांत.”
‘परदेशी
टूरिस्ट’ शब्द ऐकतांच इवानला कालच्या कन्सल्टेन्टची आठवण
झाली. त्याच्या डोळ्यासमोर धुकं पसरलं. तिरप्या डोळ्यांनी बघंत त्याने म्हटलं,
“परदेशी टूरिस्ट...कित्ती डोक्यावर चढवतां तुम्हीं परदेशी
टूरिस्ट्सला! त्यांच्यांत कितीतरी प्रकारचे लोक असतांत. काल मी अशांच एका
टूरिस्टला भेटलो होतो, आणि नसती कटकट उत्पन्न झाली.”
आणि तो पिंती पिलातबद्दल सांगणारंच होता, पण
त्याने स्वतःला थांबवलं, हे समजून, की ह्या महिलेला ह्या सगळ्या भानगडीशी काहींच घेणं-देणं नाहीये; ती त्याची मदत तर करूंच नाही शकणार.
आंघोळ झाल्यावर इवानला ते
सगळं देण्यांत आलं, ज्याची आंघोळीनंतर एका
पुरुषाला आवश्यकता असते : इस्तरी केलेला शर्ट, अंतर्वस्त्र, मोजे...पण हे तर काहीच नाही, त्या महिलेने अलमारीचं
दार उघडून दाखवलं आणी विचारलं, “काय घालणार, गाऊन की पायजमा?”
जबर्दस्ती ह्या नव्या
आवासांत कैद झालेला इवान महिलेच्या बिनधास्तपणाने घाबरला,
त्याने तिला जवळ-जवळ ढकलून दिलं आणि चुपचाप घडी घातलेल्या
पायजम्यांच्या गड्डींत बोट घुसवलं.
नंतर इवान निकोलायेविचला
रिकाम्या आणि निःशब्द कॉरीडोरमधून एका खूप मोठ्या खोलींत नेण्यांत आलं. इवानने,
ज्याने सगळ्या घटनांचा उपहासपूर्वक सामना करण्याचं ठरवलं होतं,
लगेच अलौकिक उपकरणांनी सज्ज ह्या खोलीला “फैक्टरी-किचन” हे नाव देऊन
टाकलं.
असं करण्यांचपण एक कारण
होतं. ह्या खोलीत अनेक लहान आणि मोठ्या अलमा-या होत्या,
ज्या चकचकीत, निकलच्या वेगवेगळ्या उपकरणांने
गच्च भरल्या होत्या. जटिल आकाराच्या काही खुर्च्या होत्या, चमकदार
शेड्स असलेले फुगरे-फुगरे लैम्पस, असंख्य बाटल्या, गैसचे बर्नर्स, विजेचे तार, आणि
अन्य अनेक असे उपकरण ज्यांच्याबद्दल कोणालाच माहिती नव्हती.
खोलींत आल्यावर इवानजवळ
तीन लोक आले – दोन महिला आणि एक पुरुष – सगळ्यांनी पांढरे कपडे घातले होते.
सगळ्यांत आधी त्याला कोप-यांत असलेल्या एका टेबलाजवळ नेण्यांत आलं,
स्पष्टंच होतं, की त्याला काही विचारणार होते.
इवानने आपल्या स्थितिचा विचार केला. त्याच्यासमोर तीन पर्याय होते. पहिला पर्याय
खूप मस्त वाटला : ह्या लैम्पस आणि चकाकणा-या वस्तूंवर तुटून पडायचं, त्यांचे तुकडे करायचे आणि अश्या प्रकारे त्याला बळजबरीने येथे थांबवून
घेतल्याबद्दल विरोध प्रकट करायचा. पण पण आजचा इवान कालच्या इवानपेक्षां खूप वेगळा
होता, म्हणून पहिला पर्याय त्याला संदेहास्पद वाटला : हे लोक
असा निष्कर्ष काढूं शकतात की तो एक धोकादायक मानसिक रोगी आहे. म्हणून इवानने हा
विचार डोक्यांतून काढून टाकला. दुसरा : लगेच पोंती पिलात आणि त्या कन्सल्टेन्टची
गोष्ट सुरूं करावी. पण कालच्या अनुभवाने हे सिद्ध झालं होतं, की ह्या गोष्टीवर एकतर कोणी विश्वासंच नाही ठेवणार किंवा अर्थाचा अनर्थ
काढला जाईल. म्हणून इवानने हा पर्याय पण सोडून दिला आणि तिस-या पर्यायाबद्दल विचार
करूं लागला : चुपचापंच रहायचं.
पूर्ण प्रकारे असं करणं
जमलं नाही आणि इच्छा नसतानासुद्धां काही प्रश्नांचे उत्तरं द्यावेच लागले,
थोडक्यांत असो किंवा कपाळावर आठ्या घालून.
इवानला त्याच्या
पूर्वीच्या आयुष्याबद्दल विचारण्यांत आलं, हे
सुद्धां की त्याला सुमारे पंधरा वर्षांपूर्वी स्कार्लेट-फीवर (जांभळा
संसर्गजन्य ताप – अनु.) कशामुळे आणि केव्हां झाला होत. इवानच्या उत्तरांनी एक
सम्पूर्ण पान भरल्यावर, ते उलटलं आणि पांढरे कपडे घातलेल्या
महिलेने इवानच्या नातेवाईकांबद्दल विचारपूस सुरूं केली. प्रश्नांची सरबत्तीच सुरूं
झाली : कोण मेलं, केव्हां, कशाने;
दारुड्या होता कां? गुप्त आजाराने ग्रस्त होता
कां…अश्यांच प्रकाराचं आणखीही बरंच काही. शेवटी पत्रियार्शी
पार्क मधे घडलेल्या कालच्या घटनेचं वर्णन करायला सांगण्यांत आलं, पण सगळं ऐकूनही कोणीच चकित झालं नाही, आणि पिलातच्या
गोष्टीनेपण त्यांना काहींच आश्चर्य नाही झालं.
आता त्या महिलेने इवानला
पुरुषाच्या ताब्यांत दिलं, आणि त्याने अगदीच
वेगळा पवित्रा घेतला.
त्याने इवानला काहीही
विचारलं नाही, त्याने इवानच्या शरीराचं तापमान
मोजलं, त्याची नाडी बघितली, इवानच्या
डोळ्यांत बघितलं, त्यांच्यांत लैम्पने प्रकाशाचा झोत फेकला.
आता पुरुषाच्या मदतीला दुसरी महिला पुढे आली; इवानच्या
कमरेंत काहीतरी घुसवलं, पण दुखलं नाही, त्याच्या छातीवर एका लहानश्या हातोड्याने काही चिन्ह बनवण्यांत आले.
हातोड्याने गुडघ्यांवर मारलं, ज्याने इवानचे पाय उडूं लागले,
बोटांत काही तरी घुसवून त्यांतून रक्त काढण्यांत आलं, कोपरांतपण काहीतरी घुसवलं, हातांत रबरी ब्रेसलेट्स
घालण्यांत आले.
इवान मनांतल्या मनांत
कटुतेने हसला आणि विचार करूं लागला की ह्या सगळ्याचा शेवट किती विचित्र आणि
मूर्खपणे होतोय. जरा विचार करा! कुठे तर तो सगळ्यांना त्या अनोळखी कन्सल्टेन्टपासून
संभावित धोक्याबद्दल सावध करणार होता, त्याला पकडायला
चालला होता आणि कुठे स्वतःच ह्या रहस्यमय खोलींत येऊन पोहोचलाय, आणि वलोग्दांत नेहमी दारूच्या नशेंत धुंद असणा-या,
आपल्या फ्योदर काकाबद्दल वेडेपणाच्या गोष्टी सांगू लागला. ओफ, हा मूर्खपणा सहन होत नाहीये!
शेवटी त्यांनी इवानला एकदाचं
सोडलं. त्याला पुन्हां आपल्या खोलीत नेण्यांत आलं, तिथे
त्याला ब्रेड-बटर, दोन हाफ़बॉयल्ड अण्डी आणि कॉफी देण्यांत
आली.
इवानने दिलेले सगळे पदार्थ
खाऊन-पिऊन टाकले, आणि त्याने ठरवलं की तो ह्या
हॉस्पिटलच्या प्रमुख डॉक्टरची वाट पाहील.
ह्याच प्रमुखाचं लक्ष स्वतःकडे खेचण्याची आणि त्याच्याकडून न्याय मिळविण्याची आशा
इवानला अजूनही होती.
हा प्रमुख त्याचं
ब्रेकफास्ट संपल्यावर थोड्यांच वेळांत प्रकट झाला. अप्रत्याशितपणे इवानच्या खोलीचं
दार उघडलं आणि पांढरे डगले घातलेले बरेंच लोक खोलीत आले. त्यांच्या पुढे-पुढे एखाद्या
एक्टर सारखी सफाचट दाढी केलेला, सुमारे पंचेचाळीस
वर्षाचा व्यक्ति चालंत होता. त्याचे डोळे सुंदर, पण तीक्ष्ण
होते आणि तो सज्जन वाटंत होता. टीमचे सगळे सदस्य त्याच्याकडे सन्मानाने आणि
लक्षपूर्वक बघंत होते, आणि त्याचं आगमन एखाद्या समारंभासारखं
वाटलं. ‘पोंती पिलात सारखा!’ - इवानच्या
डोक्यांत आलं.
खरोखरंच तो प्रमुख होता.
तो खुर्चीत बसला, बाकी सगळे उभेच राहिले.
“डॉक्टर स्त्राविन्स्की,”
आगंतुकाने इवानला आपला परिचय दिला आणि सहृदयतेने त्याच्याकडे
बघितलं.
“घ्या,
अलेक्सान्द्र निकोलायेविच,” एक नीटनेटक्या
दाढीवाला म्हणाला आणि त्याने प्रमुखाच्या हातांत वर-खाली, पुढे-मागे
लिहिलेला कागद दिला. ही इवानबद्दल माहिती होती.
‘पूर्ण
कथांच लिहून टाकली!’ इवानने विचार केला. प्रमुख अभ्यस्त
नजरेने तो कागद वाचंत “ओह...ओह...” पुटपुटंत होता. त्याचबरोबर चारीकडे उभ्या
असलेल्या लोकांशी एका कळत नसलेल्या भाषेंत काही वाक्य बोलला.
‘हासुद्धां
लैटिनमधे, पिलात सारखा, बोलतोय...’
निराशेने इवान विचार करूं लागला. पण तेवढ्यांत एक शब्द ऐकून तो चकित
झाला. हा शब्द होता “स्किज़ोफ्रेनिया’ – ओह, हेंच तर तो नीच परदेशी पत्रियार्शींत म्हणाला होता, त्याच
शब्दाची आता प्रोफेसर स्त्राविन्स्कीने पुनरावृत्ति केलीय.
‘हे
पण त्याला माहीत होतं!’ इवानने व्याकुळतेने विचार केला.
प्रमुखाची जणु सवंय होती, की जे काही त्याला सांगंत होते,
त्याच्याशी तो सहमत व्हायचा आणि त्यावर हर्ष प्रकट करंत म्हणायचा,
“फार छान, फार छान...”
“फार छान!”
स्त्राविन्स्की कागद परंत करताना कोणाला तरी म्हणाला आणी मग तो इवानकडे वळला, “तुम्हीं कवि आहांत?”
“हो, कवि
आहे,” इवानने खूप नैराश्याने उत्तर दिलं आणि त्याला
कवितेच्याप्रति एक अवर्णनीय घृणा वाटली. आपलीच कविता, जी
त्याला तोंडपाठ होती, अप्रिय वाटली.
चेह-यावर आठ्या
घालंत त्याने स्त्राविन्स्कीला विचारलं, “तुम्हीं प्रोफेसर आहांत?”
ह्यावर
स्त्राव्न्स्कीने नम्रतेने आणि आपलेपणाने डोकं हलवलं.
“आणि तुम्हीं –
इथले प्रमुख आहांत?” इवानने आपली गोष्ट सुरूं ठेवली.
स्त्राविन्स्कीने
ह्यावर डोकं हलवलं.
“मला तुमच्याशी
बोलायचंय,”
इवान निकोलायेविचने अर्थपूर्ण स्वरांत म्हटलं.
“मी पण
त्यासाठींच आलोय,”
स्त्राविन्स्कीने उत्तर दिलं.
इवानला वाटलं की
आतां योग्य वेळ आलीये, आणि तो म्हणाला, “मुद्दा
असा आहे, की मला पाग़ल ठरवून टाकलंय. कुणालांच माझं म्हणणं
ऐकायचं नाहीये...”
“ओह, नाही!
आम्हीं नीट लक्ष देऊन तुमचं म्हणणं ऐकू.” स्त्राविन्स्की अत्यंत गंभीरतेने,
त्याला सांत्वना देत असल्यासारखा, म्हणाला,
“आणि कोणत्याही परिस्थितींत तुम्हांला पागल ठरवूं देणार नाही.”
“तर, मग
नीट लक्ष देऊन ऐका, काल संध्याकाळी पत्रियार्शी तलावावर मी
एका रहस्यमय व्यक्तीला भेटलो, कदाचित परदेशी होता, ज्याला बेर्लिओज़च्या मृत्युबद्दल आधीच माहीत होतं आणि ज्याने स्वतः पोंती
पिलातला बघितलंय.”
सगळेजण पापणी
सुद्धां न हलवतां इवानचं म्हणणं ऐकंत होते.
“पिलातला? पिलात,
जो येशू ख्रिस्ताच्या काळांत होता!” डोळे बारीक करून इवानकडे बघंत
स्त्राविन्स्कीने विचारलं.
“तोच.”
“आहा!”
स्त्राविन्स्कीने म्हटलं, “आणि हा बेर्लिओज़ ट्रामगाडीखाली
मेला नं?”
“माझ्यांच
डोळ्यांसमोर काल पत्रियार्शीवर ट्रामखाली आला, ज्याच्याबद्दल ह्या रहस्यमय
व्यक्तिने...”
“पोंती पिलातच्या
ओळखीचा?”
स्त्राविन्स्कीने अत्यंत समजदारीने विचारलं.
“त्यानेच”, इवानने
ज़ोर देत स्त्राविन्स्कीचा अंदाज घेत म्हटलं, “त्यानेच आधीच
सांगून टाकलं होतं, की अन्नूश्काने सनफ्लॉवर ऑइल सांडलेलं
आहे...आणि तो त्याच ठिकाणी पाय घसरून पडला! तुम्हांला हे कसं वाटतंय?” इवानने रहस्यमय ढंगाने म्हटलं. त्याला आशा होती की त्याचा शब्दांचा चांगला
प्रभाव पडेल.
पण काहीही प्रभाव
नाही पडला आणि स्त्राविन्स्कीने पुढचा प्रश्न विचारला, “पण ही अन्नूश्का आहे कोण?”
ह्या प्रश्नाने
इवान थोडासा गोंधळला. त्याच्या कपाळावर आठी पडली. त्याने पडत्या आवाजांत म्हटलं, “अन्नूश्काचं इथे काही काम नाहीये. सैतान जाणे ती कोण आहे. सदोवायावर
राहणारी कोणी मूर्ख असेल. महत्वाचं हे आहे, की त्याला
आधीपासूनंच ह्या तेलाबद्दल माहीत होतं. तुम्हांला कळतंय ना?”
“चांगलंच कळतंय,”
स्त्राविन्स्कीने गंभीरतेने म्हटलं, आणि कविच्या गुडघ्यांना
हात लावंत म्हणाला, “ काळजी नका करूं आणि पुढे सांगा.”
“हो, सांगेन,”
इवानने स्त्राविन्स्कीच्यांच सुरांत म्हटलं. आपल्या कटु अनुभवावरून
त्याला समजलं होतं की त्याच्यासाठी गंभीरतांच जास्त चांगली आहे, “हो, तो...तो, भयानक
माणूस...खोट सांगतो की तो कन्सल्टेन्ट आहे, आणि काही असाधारण
शक्ति त्याच्या ताब्यांत आहेत...उदाहरणार्थ, त्याचा पिच्छा
करंत राहा पण त्याला पकडणं अशक्य आहे. त्याच्या बरोबर एक जोडीपण आहे, एक मस्त जोडी, अगदी अफलातून : एक लम्बू, तुटका चश्मा घातलेला; आणि त्याच्याशिवाय, एक मोट्ठा अकराळ-विकराळ बोका, जो ट्राममधे आपणहून
प्रवास करतो. ह्याच्या शिवाय...” इवान खूप उत्साहाने न थांबता बोलंत होता, “तो स्वतः पोंती पिलातच्या दालनांत होता, ह्यांत शंका
घेण्याचं काहींच कारण नाहीये. ही काय भानगड आहे? त्याला लगेच
पकडणं ज़रूरी आहे, नाही तर तो प्रचण्ड विनाश करेल.”
“म्हणूनंच
तुम्हीं म्हणतांय की त्याला पकडलं पाहिजे? तुमचं म्हणणं मी बरोबर
समजलोय नं?” स्त्राविन्स्कीने विचारलं.
‘हा
माणूस हुशार आहे,’ इवानने विचार केला, ‘स्वीकार करावं लागेल, की कधी-कधी बुद्धिजीवी लोकांत
सुद्धां बुद्धिमान लोकं सापडतांत. हे नाकारतं येणार नाही!’ आणि
त्याने उत्तर दिलं, “अगदी बरोबर! आणि मी ह्या गोष्टीवर जोर
कां नको देऊं? तुम्हीं स्वतःच समजू शकता! पण इथे मलांच
जबर्दस्ती थांबवून ठेवलंय, डोळ्यांत लैम्पचा उजेड खुपसतायंत,
बाथरूममधे आंघोळ घालतांत, फ्योदर काकाबद्दल
विचारतांत!...आणि ते तर फार पूर्वीपासून ह्या जगांत नाहीये! मी मागणी करतो की मला
लगेच सोडण्यांत यावे.”
“वाह! काय
म्हणता! अतिसुंदर!” स्त्राविन्स्की म्हणाला, “सगळं स्पष्ट झालंय. खरं
म्हणजे एका निरोगी माणसाला हॉस्पिटलमधे ठेवण्यांत काही अर्थंच नाहीये? ठीक आहे...मी तुम्हांला लगेच इथून जाऊ देईन, जर
तुम्हीं सांगाल, की तुम्हीं निरोगी आहे. सिद्ध करायची गरज
नाहीये, फक्त सांगा. तर, तुम्हीं
निरोगी आहांत?”
सम्पूर्ण शांतता
पसरली आणि ती लट्ठ महिला, जी सकाळी इवानची काळजी घेत होती,
प्रशंसापूर्ण नजरेने प्रोफेसरकडे बघायला लागली, आणि इवानला पुन्हां एकदां वाटलं, ‘खरंच बुद्धिमान
आहे!’
त्याला
प्रोफेसरचा प्रस्ताव आवडला, पण उत्तर देण्याआधी त्याने बरांच
वेळ विचार केला आणि मग कपाळावर आठ्या घालंत ठामपणे म्हणाला, “मी, निरोगी आहे.”
“सुंदर!”
स्त्राविन्स्कीच्या डोक्यावरंच ओझं जणु दूर झालं, “जर असं आहे, तर चला, सगळ्या गोष्टींवर तार्किक दृष्ट्या विचार
करूं या. तुमचा कालचा दिवसंच बघा,” तो वळला आणि त्याला लगेच
इवानशी संबंधित केस-पेपर देण्यांत आला. “त्या अनोळखी माणसाला शोधताना, जो स्वतःला पोंती पिलातचा परिचित म्हणतो, तुम्हीं
काय काय नाही केलं!” स्त्राविन्स्कीने आपली लांब बोटं वर करंत कधी इवानकडे तर कधी
कागदाकडे बघितलं, “आपल्या छातीवर क्रॉस आणि मूर्ति लटकवली.
बरोबर?”
“बरोबर,” इवानने तुसडेपणाने म्हटले.
“फ़ेन्सिंग पार
करताना आपला चेहरा जख्मी केला. बरोबर? विझलेली मेणबत्ती घेऊन
रेस्टॉरेन्टमधे घुसले, फक्त, फक्त
चड्डी घालून आणि कोणाला तरी मारलंसुद्धां. तुम्हांला हात-पाय बांधलेल्या अवस्थेंत
इथे आणलं. इथे आल्यावर तुम्हीं पोलिसला फोन करून गोळा-बारूद पाठवायला सांगितलं. मग
खिडकीतून उडी मारण्याचा प्रयत्न केला, बरोबर? आता प्रश्न हा आहे, की अश्याने कोणाला पकडणं शक्य
आहे कां? आणि जर तुम्हीं सामान्य आहांत, तर तुम्हीं स्वतःच म्हणाल : बिल्कुल नाही. तुम्हाला इथून जायचंय? खुशाल जा. पण फक्त येवढं विचारू द्या, की इथून तुम्हीं जाणार कुठे?”
“नक्कीच पोलिसांत,” इवान आतां थोडासा नरम पडला. प्रोफेसरच्या नजरेसमोर त्याला हरवल्यासारखं
वाटंत होतं.
“इथून सरंळ?”
‘हूँ.”
“आणि आपल्या
फ्लैटवर नाही जाणार?” स्त्राविन्नस्कीने लगेच विचारलं.
“तिथे जाण्यासाठी
वेळ नाहीये. जो पर्यंत मी फ्लैटवर जाईन, तो निसटून जाईल.”
“असं आहे! आणि
तुम्हीं पोलिसांना सांगणार काय आहे?”
“पोंती
पिलातबद्दल,”
इवान निकोलायेविचने म्हटलं आणि त्याच्या डोळ्यांसमोर अंधारी यायला
लागली.
“हूँ, अति
सुंदर!” स्त्राविन्स्की नम्रपणे उद्गारला आणि दाढीवाल्याकडे वळून म्हणाला, “फ्योदर वासिल्येविच, नागरिक बिज़्दोम्नीला शहरांत
जायला सुट्टी द्या. पण ही खोली अशीच राहू द्या. चादरीसुद्धां बदलूं नका, दोन तासांत नागरिक बिज़्दोम्नी परंत इथेच येतील. चला,
मग...” मग तो कविकडे वळून म्हणाला, “तुमच्या सफलतेची कामना
मी नाही करणार, कारण तुमच्या सफलतेंत मला तसूभरही विश्वास
नाहीये. आपण लौकरंच पुन्हां भेटूं!” आणि तो उठला. त्याच्या बरोबर आलेले लोकं
सुद्धां हालले.
“मी पुन्हां इथे
येईनंच कशाला?”
उत्तेजित होऊन इवानने विचारलं.
स्त्राविन्स्की
जणुं ह्याच प्रश्नाची वाट पाहत होता, तो लगेच पुन्हां बसला आणि म्हणाला,
“कारंण, की जसेंच तुम्हीं चड्डी घालून पोलिस
स्टेशनवर जाऊन म्हणाल की तुम्हीं पोंती पिलातला ओळखणा-या व्यक्तीला भेटला आहांत –
ते लगेच तुम्हांला इथे घेऊन येतील, आणि तुम्हीं पुन्हां
ह्याच खोलींत दिसाल.”
“इथे चड्डीचा काय
प्रश्न आहे?”
त्रस्त होऊन इवानने इकडे तिकडे बघंत विचारलं.
“मुख्य कारंण तर
असेल पोंती पिलात,
पण त्याच बरोबर चड्डी सुद्धां, कारंण की हे
सरकारी कपडे तर आम्हीं तुमच्या अंगावरून काढून घेऊं आणि तुम्हांला तुमचे कपडे परत
देऊं. तुम्हांला इथे फक्त चड्डींत आणलं होतं. वरून, तुम्हांला
तुमच्या फ्लैटमधेपण नाही जायचंय, तरी मी त्याबद्दल
विचारलंसुद्धां होतं. मग येते पिलातची गोष्ट...आणि तुमच्या विरुद्ध बनतं एक भक्कम
कारंण!”
आता इवान
निकोलायेविचला काही तरी झालं. त्याची इच्छा शक्ति जणु चूर-चूर झाली. त्याला वाटलं
की तो खूप अशक्त झालांय. त्याला कोणाच्यातरी सल्ल्याची गरंज आहे.
“मग काय करायला
हवं?”
आता त्याने नम्रतेने विचारलं.
“आता कसं!”
स्त्राविन्स्की म्हणाला, “आता तुम्हीं समजूतदारपणा दाखवतांय! आता मी तुम्हांला
सांगेन की तुमच्या बरोबर खरोखर काय घडलंय. काल कोणीतरी तुम्हांला पोंती पिलातची
गोष्ट सांगून खूप घाबरवलं आणि त्याच भीतिच्या प्रभावाखाली तुम्हीं शहरांत फिरंत
होते आणि पोंती पिलातबद्दल सांगत होते. स्वाभाविक आहे, की
तुम्हांला पागल समजण्यांत आलं. आतां तुमच्यासाठी हेंच चांगलं आहे, की तुम्हीं अगदी शांत राहा. म्हणूनंच तुमचं येथे राहणे आवश्यक आहे.”
“पण त्याला पकडणं
आवश्यक आहे!” इवान चिरचिरंत विनती करूं लागला.
“ठीक आहे, पण
त्यासाठी तुम्हींच कां धावपळ करावी? तुम्हीं एका कागदावर
ह्या व्यक्तीशी संबंधित सगळे आरोप आणि संदेह लिहून द्या. ह्याच्यापेक्षां आणखी
सोपा दुसरा मार्ग काय असूं शकतो की तुमच्या ह्या अर्जाला योग्य ठिकाणी पाठवून
द्यावे. जर तुम्हीं म्हणतां, तसा तो अपराधी आहे, तर ही भानगड लगेच संपेल. पण फक्त एक अट आहे ; आपल्या
मेंदूवर जोर नका टाकू आणि पोंती पिलातबद्दल शक्य तितका कमी विचार करा. सांगायला
काय कमी गोष्टी आहेत! सगळ्यांवर तर विश्वास नको ठेवायला.”
“समजलो!” इवान
दृढतेने म्हणाला,
“कृपा करून मला कागद आणि पेन द्या.”
“कागद आणि छोटी
पेन्सिल द्या...” स्त्राविन्स्कीने लट्ठ महिलेला सांगितलं. पुन्हां इवानला म्हणाला, “पण मी तुम्हांला हा सल्ला देईन की आज नका लिहूं.”
“नाही, नाही
आजंच, कोणत्याही परिस्थितींत आजंच,” इवान
उत्तेजनेने म्हणाला.
“बरं ठीक आहे. फक्त
आपल्या मेंदूवर ताण नका देऊं. आज शक्य नाही होणार, उद्यांच होईल.”
“तो पळून जाईल!”
“ओह, नाही,”
स्त्राविन्स्कीने दृढतेने प्रतिवाद करंत म्हटलं, “तो कुठे नाही जाणार, हा माझा शब्द आहे. आणि लक्षांत ठेवा,
इथे तुमची सर्व प्रकारे मदत करतील, जिच्याशिवाय
तुमचं कोणतंच काम होणार नाहीये. तुम्हीं ऐकताय नं?” एकदम रहस्यमय
आवाजांत स्त्राविन्स्कीने विचारलं आणि इवान निकोलायेविचचे दोन्हीं हात धरले. त्यांना
आपल्या हातांत घेऊन तो एकटक इवानच्या डोळ्यांत बघंत होता आणि म्हणंत होता, “इथे तुमची मदत करतील...तुम्हीं माझा आवाज ऐकतायं?” इथे
तुमची मदत करतील...इथे तुमची मदत करतील...तुम्हांला आराम मिळेल...इथे शांतता आहे...
इथे तुमची मदत करतील...”
इवान निकोलायेविचने
अप्रत्याशितपणे जांभई दिली, त्याच्या चेह-याचे भाव सौम्य व्हायला
लागले.
“हो, हो...”
तो हळूंच म्हणाला.
“हो, हे
छान आहे, सुन्दर!” आपल्या सवयीनुसार स्त्राविन्स्कीने बोलणं बंद
करताना म्हटलं आणि उठला, “गुड बाय!” त्याने इवानशी हस्तांदोलन
केलं आणि बाहेर निघताना दाढीवाल्याकडे वळून म्हणाला, “हो,
ऑक्सीजन देऊन बघा...आणि स्नान.”
काही क्षणानंतर इवानच्यासमोर
स्त्राविन्स्की नव्हता, आणि त्याचे चेलेपण नव्हते. खिडकीच्या जाळीच्या बाहेर,
वसन्त ऋतूच्या दुपारच्या प्रसन्न उन्हांत, नदीच्या
दुस-या किना-यावर पाइन वृक्षांच सुंदर जंगल चमकंत होतं.
********
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें