वीस
अजाजेलोचं क्रीम
संध्याकाळच्या
स्वच्छ आकाशांत लटकलेला चंद्र मैपल वृक्षाच्या फांद्यांमधून दिसंत होता. लिण्डन आणि अकासियाची झाडं बगीचाच्या
जमिनीवर वाकड्या-तिकड्या रेघा आणि ठिपके बनवंत होती. तीन पट असलेली खिडकी, जिचे पडदे बंद होते, विजेच्या
बेफाम प्रकाशांत न्हाऊन गेली होती. मार्गारीटा निकोलायेव्नाच्या शयनकक्षांत सगळेच दिवे
जळंत होते आणि खोलीतल्या पसा-याला उजागर करंत होते. पलंगावर, ब्लैन्केटच्या वरती मोजे, स्टॉकिंग्ज़ आणि अंतर्वस्त्र विखुरले होते. उतरवून
टाकलेले अंतर्वस्त्र वैतागाने चिरडलेल्या सिगारेटच्या पाकिटाजवळ फेकले होते. जोडे
पलंगाजवळच्या छोट्याश्या तिपाईवर अर्धवट प्यायलेल्या कॉफीच्या कपाजवळ आणि
ऐशट्रेच्या बाजूला,
ज्यांत अर्धवंट ओढलेल्या
सिगारेटचं थोटूक पडलेलं होतं,
ठेवले होते. खुर्चीच्या
पाठीवर संध्याकाळी घालायचा काळा पोषाक लटकंत होता. खोलीत वेगवेगळ्या अत्तरांचा
सुगन्ध भरला होता,
आणि त्यातंच मिसळला होता, जळत्या इस्त्रीचा वास.
मार्गारीटा
निकोलायेव्ना आरश्यासमोर फक्त एक बेदिंग गाऊन घालून बसली होती, ज्याला नग्न शरीरावर असंच टाकलं होतं, पायांत स्वेडचे काळे जोडे होते. घड्याळ असलेलं
सोन्याचं ब्रेसलेट मार्गारीटा निकोलायेव्नाच्या समोर अजाजेलोने दिलेल्या डबीजवळ
पडलं होतं आणि मार्गारीटा निकोलायेव्ना घडाळ्यावरून नजर दूर करंत नव्हती. मधूनंच
तिला वाटायचं की घड्याळ तुटलंय आणि काटे पुढे सरकतंच नाहीये. पण ते सरकंत होते, हो,
खूपंच हळू, आणि शेवटी मोठा काटा नऊ वाजून एकोणतीस मिनिटावर आलांच. मार्गारीटाचं हृदय जो-याने धडधडले, तिला डबी एकदम उचलतां आली नाही. स्वतःवर ताबा ठेवंत
तिने डबी उघडली आणि पाहिलं की त्यांत पिवळं, चिक्कण
क्रीम होतं. तिला वाटलं की त्यातूंन दलदली चिखलाचा वास येतोय. बोटाच्या टोकाने
मार्गारीटाने थोडंसं क्रीम काढून तळहातावर ठेवलं, आता
त्यातून दलदली गवताचा आणि जंगलाचा तीव्र वास येऊं लागला. ती हाताने कपाळावर आणि
गालांवर क्रीम चोळू लागली. क्रीम खूप लवकर-लवकर चोळलं जात होतं, मार्गारीटाला असं वाटलं, की
लगेच त्याची वाफसुद्धां होते आहे. थोडा वेळ चोळल्यावर मार्गारीटाने आरशांत बघितलं
आणि तिच्या हातातली डबी सुटून घड्याळ्यावर पडली. घड्याळीची काच तडकली.
मार्गारीटाने पट्कन डोळे बंद केले. मग तिने पुन्हां स्वतःला आरशांत बघितलं आणि खो
खो करंत हसू लागली.
कोप-यांवर
पातळ होत जाणा-या तिच्या भुवया क्रीममुळे जाड्या-जाड्या कमानीसारख्या होऊन
हिरव्या-हिरव्या डोळ्यांवर बसल्या होत्या. पातळशी उभंट सुरकुती, जी तेव्हां, ऑक्टोबरमधे, मास्टर गायब झाल्यावर, नाकाजवळ
दिसूं लागली होती,
आता बिल्कुल दिसंत
नव्हती. कानशिलांजवळच्या पिवळ्या सावल्यासुद्धां लुप्त झाल्या होत्या, आणि डोळ्यांच्या कोप-यांवर पडलेली जाळीपण आता नव्हती.
गालांची त्वचा गुलाबी झाली होती. कपाळ नितळ आणि पांढरं शुभ्र झालं होतं, केस विखुरले होते.
तीस
वर्षाच्या मार्गारीटाकडे आरश्यांतून बघंत होती काळ्या, कुरळ्या
केसांची, दात दाखवंत खोखो हसणारी एक वीस वर्षांची मुलगी.
हसणं
संपवून मार्गारीटाने एका झटक्यांत गाउन फेकून दिला आणि आपल्या सम्पूर्ण अंगावर
भरभर क्रीम चोळूं लागली. शरीर गुलाबी होऊन चमकू लागलं. मग, जणु कुणीतरी डोक्यांत टोचलेली सुई बाहेर काढून फेकून
दिली. तिच्या कानशिलांचं दुखणं थांबलं,
जे संध्याकाळी, अलेक्सान्द्रोव्स्की पार्क मधल्या भेटीनंतर सुरू झालं
होतं. हातापायांचे स्नायू बळकट झाले,
मग मार्गारीटाचं शरीर
अगदी हल्कं झालं.
तिने
उसळी मारली आणि पलंगापासून किंचित वर हवेंत तरंगू लागली. मग, जसं कुणीतरी तिला खाली खेचू लागलं आणि ती खाली आली.
“काय
क्रीम आहे! काय क्रीम आहे!” मार्गारीटा खुर्चीत बसंत म्हणाली.
ह्या लेपामुळे तिच्यां फक्त बाह्य रूपातंच बदल नव्हता झाला. आता तिच्या
सम्पूर्ण अस्तित्वांत, शरीराच्या प्रत्येक अणु-रेणूत आनन्द उसळंत होता, ज्याचा तिला
क्षणोक्षणी अनुभव होत होता, हा आनन्द जणु बुडबुड्यांच्या रूपांत तिच्या अंगातून
बाहेर येत होता. मार्गारीटाला जाणीव झाली की ती मुक्त झालीये, सगळ्या बंधनांतून
मुक्त. शिवाय, तिला हे सुद्धां समजलं, की ‘ते’ झाले आहे, ज्याची जाणीव तिला सकाळी झाली होती, आणि आता ती हे
सुन्दर घर आणि आपलं पूर्वायुष्य कायमचं सोडणार होती. पण ह्या पूर्वायुष्यातून एक विचार तिचा पिच्छा
पुरवंत होता, तो हा, की एक शेवटचं कर्तव्य पूर्ण करायचंय, हे नवीन, विचित्र, ‘वर’ हवेंत खेचणारं ‘काहीतरी’ होण्यापूर्वी.
आणि ती, तश्याच, निर्वस्त्र अवस्थेत, शयनगृहामधून हवेंत तरंगत-उतरंत नव-याच्या स्टडी रूममधे
पोहोचली आणि टेबल लैम्प लावून टेबलाकडे वळली. समोर पडलेल्या राइटिंग-पैडमधून एक
पान फाडून त्यावर पेन्सिलने मोठ्या-मोठ्या अक्षरांत लिहिलं:
“मला माफ कर आणि
शक्य तितक्या लवकर विसरून जा. मी नेहमीसाठी तुला सोडून जात आहे. मला शोधायचा
प्रयत्न नको करू, त्याने काहीही होणार नाहीये. सततच्या दुःखामुळे आणि आपदांमुळे मी चेटकी
झालेय. आता मी निघतेय. गुडबाय! मार्गारीटा.”
एकदम हलक्या मनाने मार्गारीटा हवेंत तरंगंत आपल्या शयनगृहांत आली आणि तिच्या
पाठोपाठ धावंत आली अनेक वस्तूंनी डवरलेली नताशा. आणि ह्या सगळ्या वस्तू –
हैंगर्सवर टांगलेले अनेक पोषाक, लेसवाले रुमाल, निळे रेशमी जोडे, आणि बेल्ट - सगळं जमिनीवर विखुरलं. आणि नताशा रिकाम्या हातांनी
टाळ्या वाजवूं लागली.
“काय, छान आहे नं?” बसक्या, जाड्या आवाजांत
मार्गारीटा निकोलायेव्ना ओरडली.
“हे असं काय आहे?” नताशा मागे सरकंत कुजबुजली, “हे तुम्हीं कसं करताय, मार्गारीटा निकोलायेव्ना?’
“हा क्रीमचा कमाल आहे! क्रीम, क्रीम!” मार्गारीटाने आरश्याकडे वळंत सोनेरी डबीकडे
बोट दाखवंत उत्तर दिलं.
नताशा जमिनीवर पडलेल्या चुरगळलेल्या ड्रेसबद्दल विसरून आरश्याकडे धावली आणि
उत्तेजित डोळ्यांनी अधाशीपणे डबीत शिल्लक उरलेल्या क्रीमकडे बघू लागली. तिचे ओठ
काहीतरी पुटपुटले. ती पुन्हां मार्गारीटाकडे वळली आणि काहीश्या आदराने म्हणाली:
“त्वचा – तर!
त्वचा, हँ? मार्गारीटा निकोलायेव्ना तुमची त्वचा तर चमकतेय!” पण लगेच तिला आठवण झाली, ती खाली पडलेल्या
ड्रेसकडे वळली आणि तिला उचलून झटकू लागली.
“फेक! फेक!” मार्गारीटा ओरडली, “जाऊं दे खड्ड्यांत, फेक! नाही, थांब, तू घे ते, माझी आठवण म्हणून. सांगतेय, माझी आठवण म्हणून ठेव ते. जे काही खोलींत आहे, ते सगळं घेऊन घे.”
नताशा जणु अर्धवेडी झाली. तिने स्तब्ध होऊन मार्गारीटाकडे पाहिलं, मग तिच्या मानेंत
हात घालून तिचं चुम्बन घेत ओरडू लागली:
“मुलायम! चमकतेय! नरम! भुवया, ओह, भुवया!”
“हे सगळे बोळे घेऊन घे, सगळ्या सेन्ट्सच्या बाटल्या घेऊन घे आणि आपल्या पेटींत
लपवून टाक,” मार्गारीटा ओरडली, “पण महागड्या वस्तू नको घेऊ, नाहीतर तुझ्यावर चोरीचा आळ येईल.”
नताशाने जे हातात येईल ते पिशवीत टाकलं – ड्रेसेस, जोडे, स्टॉकिंग्ज़, अंतर्वस्त्र...आणि
ती शयनगृहांतून बाहेर पळाली.
तेवढ्यांत गल्लीच्या दुस-या बाजूने कुठून तरी, उघड्या खिडकीतून गरजंत, जोरदार वाल्ट्ज़चा आवाज तरंगंत आत आला आणि गेटकडे येणा-या कारचा आवाजपण ऐकूं आला.
“आता अजाजेलो फोन करेल!” मार्गारीटाने ते संगीत ऐकंत म्हटलं, “तो नक्की फोन
करेल! आणि तो परदेशीसुद्धां बिल्कुल धोकादायक नाहीये, हो, आता मला कळतंय, की तो बिल्कुल धोकादायक नाहीये!”
गेटपासून दूर जाताना कारचा हल्ला होत होता. गेट वाजलं आणि पायवाटेच्या
फरशीवर पावलांची चाहूल ऐकू आली.
‘हा निकोलाय
इवानोविच आहे, पावलांच्या आवाजाने कळतंय,’
मार्गारीटाने विचार केला, ‘जातां-जातां काहीतरी मजेदार गम्मत करायला पाहिजे.’
मार्गारीटाने पडदा बाजूला केला आणि गुडघ्यांवर हात बांधून खिडकीच्या चौकटींत
तिरपी होऊन बसली. चंद्राचा प्रकाश उजवीकडून तिच्यावर पडंत होता. मार्गारीटाने
चंद्राकडे चेहरा उचलला आणि विचारांत गढल्यासारखे काव्यात्मक भाव चेह-यावर आणले.
आणखी एक दोनदां पावलांची खट्खट् झाली आणि मग एकदम थांबली. आणखी थोडा वेळ मुग्ध
होऊन चंद्राकडे आणि शालीनता दाखविण्यासाठी श्वास घेऊन मार्गारीटाने बगिच्याकडे
तोंड वळविले आणि तिथे तिला खरोखरंच दिसला निकोलाय इवानोविच, जो ह्याच
बिल्डिंगच्या तळमजल्यावर राहात होता. चंद्राचा प्रकाश निकोलाय इवानोविचला चिंब
करंत होता. तो बाकावर बसला होता, आणि स्पष्ट होतं, की अचानकंच त्याच्यावर धपकन् बसला होता. त्याच्या
डोळ्यांवरचा चष्मा किंचित खाली घरंगळला होता आणि त्याने आपली ब्रीफकेस पायांत घट्ट
दाबून ठेवली होती.
“आs s s निकोलाय इवानोविच,” दुःखी आवाजांत
मार्गारीटा म्हणाली, “गुड ईवनिंग! तुम्हीं मीटिंगवरून येताहांत कां?”
ह्यावर निकोलाय इवानोविचने काहीच उत्तर दिलं नाही.
“आणि मी,” मार्गारीटा बगिच्यांत आणखीनंच ओणवून म्हणाली, “बसले आहे एकटी, बघताहांत नं, कंटाळले आहे, चंद्राकडे बघतेय
आणि वाल्ट्ज़ ऐकतेय.”
मार्गारीटाने डावा हात कानशिलावर नेत केसांची बट सावरली, मग संतापून
म्हणाली:
“ही असभ्यता आहे, निकोलाय इवानोविच! शेवटी मी एक महिला आहे! काहीही
म्हणा, जेव्हां तुमच्याशी कुणी बोलतंय, तेव्हां उत्तर न देणं म्हणजे नुसता आडमुठेपणा आहे!”
निकोलाय इवानोविच, ज्याच्या भु-या जैकेटचं एक एक बटन चंद्राच्या
प्रकाशांत चमकंत होतं, आणि टोकदार पांढ-या दाढीचा एक एक केस प्रकाशांत चिंब
झाला होता, अचानक रानटीपणाने हसला. तो बाकावरून उठला आणि घाबरून, हैट काढण्याऐवजी
ब्रीफकेस हलवूं लागला आणि पाय वाकवले, जणू धपकन् मांडी घालून खाली बसतोय.
“ओह, निकोलाय इवानोविच, तुम्हीं कित्ती कंटाळवाणे नमुने आहांत,” मार्गारीटा बोलंत
राहिली, “खरं म्हणजे, तुम्हां सर्वांचा मला इतका कंटाळ आलाय, की सांगू नाही
शकंत, आणि मला इतका आनन्द होतोय, की मी तुमच्यापासून दूर चाललेय! जा तुम्हीं मसणांत!”
येवढ्यांत मार्गारीटा निकोलायेव्नाच्या मागे, शयनगृहांत टेलिफिन वाजूं लागला. मार्गारीटाने
खिडकीच्या चौकटीवरून उडी मारली आणि निकोलाय इवानोविचबद्दल विसरून तिने पट्कन
टेलिफोनचा रिसीवर उचलला.
“अजाजेलो बोलतोय,” रिसीवरमधून आवाज आला.
“लाडक्या, लाडक्या अजाजेलो!” मार्गारीटा किंचाळली.
“वेळ झालीय! उडून बाहेर या,” रिसीवरमधे अजाजेलो म्हणाला, आणि त्याच्या आवाजावरून कळंत होतं, की मार्गारीटाची
ही प्रामाणिक, प्रसन्न किंचाळी त्याला आवडली होती, “जेव्हां गेटवरून
उडाल, तेव्हां ओरडून म्हणा, “अदृश्य! अदृश्य!” मग शहरावर उडा, म्हणजे सवय होईल, आणि नंतर
दक्षिणेकडे, शहराच्या बाहेर, आणि सरंळ नदीवर, तुमची वाट बघतायेत!”
मार्गारीटाने रिसीवर टांगून दिला, आणि तेवढ्यांत बाजूच्या खोलीतून कोणचीतरी लाकडी वस्तू
धडपडंत येऊन दारावर ठक्-ठक् करूं लागली. मार्गारीटाने दार उघडलं आणि फरशी स्वच्छ
करायचा ब्रश, केसांची बाजू वर करून नाचंत-नाचंत शयनगृहांत आला.
आपल्या टोकाने त्याने फरशीवर ताल दिला, आडवा झाला आणि खिडकीकडे झेप घेतली. अति उत्तेजनेने
मार्गारीटा किंचाळंत सुटली आणि उडी मारून ब्रशवर बसून गेली. आता ब्रश-स्वाराला
आठवण आली, की ह्या धावपळींत ती कपडे घालणंच विसरलीये. तिने झटकन् पलंगावर उडी मारली
आनि हाताला लागेल ते उचलले. हा एक निळा शर्ट होता, त्याला कसंतरी अंगावर टाकून ती खिडकीतून बाहेर उडाली.
आणि बगिच्यावर वाल्ट्ज़चा आवाज आणखीनंच जोरांत येऊं लागला.
खिडकीतून मार्गारीटाने खाली झेप घेतली आणि तिला बाकावर बसलेला निकोलाय इवानोविच
दिसला. तो जणू बाकाला खिळला होता आणि वेड्यासारखा वरती राहणा-यांच्या शयनगृहातून येणा-या
किंचाळ्या आणि आदळ-आपट ऐकंत होता.
“गुडबाय, निकोलाय इवानोविच!” निकोलाय इवानोविचसमोर नाचंत-नाचंत, वाल्ट्ज़च्या आवाजावर
मात करंत मार्गारीटा ओरडली.
तो धापा टाकंत बाकावर रांगू लागला, त्याला आपल्या पंजांनी धरून आणि ब्रीफकेसला जमिनीवर आपटंत.
“गुडबाय नेहमीसाठी! मी उडून चाललेय!” मार्गारीटाने वाल्ट्ज़च्या आवाजापेक्षाही
जोरांत ओरडून म्हटलं. तेवढ्यांत तिला वाटलं, की शर्टची काही गरंज नाहीये, आणि दुष्टपणे हसंत
तिने शर्टाने निकोलाय इवानोविचचं डोकं झाकून टाकलं. काहीच न दिसल्यामुळे निकोलाय इवानोविच
बाकावरून पायवाटेवर कोसळला.
मार्गारीटाने मागे वळून शेवटचं त्या घराकडे पाहिलं, जिथे इतके दिवस तिने
दुःख सोसलं होतं, आणि तिला ज्वाळांमधे नताशाचा आश्चर्यचकित चेहरा दिसला.
“गुडबाय नताशा!” मार्गारीटा ओरडली आणी तिने ब्रशला खेचलं, “अदृश्य, अदृश्य!” आणखीनंच
जोराने ती ओरडली आणि चेह-याला घासणा-या मैपलच्या फांद्यांमधून, गेटवरून उडून ती गल्लींत
शिरली. तिच्या मागोमाग पूर्णपणे वेडावणारे वाल्ट्ज़-संगीतसुद्धां उडंत होतं.
********
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें