एकवीस
उड्डाण
अदृश्य आणि
मुक्त! अदृश्य आणि मुक्त! आपल्या गल्लीवर उड्डाण केल्यानंतर मार्गारीटा ह्या
गल्लीला काटकोनावर छेदंत जाणा-या एका दुस-या गल्लीत आली. केरोसिनच्या दुकानाचे
तिरपे दार असलेली,
ठिकठिकाणी दुरुस्त केलेली, खड्डे असलेली,
वाकडी-तिकडी आणि लांब गल्ली, जिथे पेल्यांमधे
केरोसिन आणि कुप्यांमधे कीडे-माकोडे मारण्याचं औषधं विकलं जायच, तिने एका क्षणांत पार केली. तेवढ्यांत तिला असं वाटलं, की पूर्णपणे अदृश्य आणि मुक्त असूनही ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवे,
की कोणच्या गोष्टींचा आनन्द लुटायला हवा. एखाद्या चमत्कारामुळेंच ती
अचानक थबकली आणि गल्लीच्या कोप-यांत उभ्या असलेल्या तिरप्या, जुन्या लैम्प पोस्टला धडक देऊन मरता-मरता वाचली. त्याच्यापासून दूर वळून
तिने ब्रशला घट्ट पकडून घेतले. आता ती फुटपाथवर लटकणा-या विजेच्या तारांपासून आणि
साइनबोर्ड्स पासून स्वतःला वाचवंत किंचित मंद गतिने उडंत होती.
तिसरी गल्ली थेट
अर्बातकडे जात होती. इथे पोहोचेपर्यंत मार्गारीटाला ब्रशवर पूर्णपणे कन्ट्रोल
करतां येऊं लागला,
तिला कळलं की ब्रश तिची लहानशी हालचालसुद्धां समजतोयं, पायाच्या किंवा हाताच्या किंचितश्या स्पर्शाचे सुद्धां पालन करतोय;
आणि हे पण की शहराच्या वरून उडताना तिला खूपंच सावध राहावे लागणार
आहे, धिंगा-मस्ती करणं बरोबर नाहीये. तिला हे पण कळलं होतं
की रस्त्यावर जात-येत असलेल्या लोकांना ही उडन-परी दिसंत नाहीये. कोणीही डोकं वर
करून बघितलं नाही, ‘बघा! बघा!’ असं
ओरडलं नाही; बाजूला झालं नाही, शिट्टी वाजवली
नाही, बेशुद्ध पडलं नाही, दुष्टपणाने
अट्टाहास केला नाही.
मार्गारीटा
चुपचाप उडंत होती – खूपंच हळू, ब-यांच खाली...जवळ-जवळ दुस-या
मजल्याच्या उंचीवर. पण इतकं हळू उडंत असतानासुद्धा, झगमगणा-या
अर्बातवर येता-येता, ती किंचित इकडे-तिकडे झालीच, आणि तिने खांद्याने एका चमचमणा-या तबकडीला, जिच्यावर
बाणाचं चिन्ह होतं, ठोसा मारलांच. ह्याने मार्गारीटाला राग
आला. तिने आपल्या आज्ञाकारी ब्रशला पकडलं आणि थोडीशी बाजूला झाली, मग तिने त्या तबकडीवर हल्ला केला आणि ब्रशच्या दांड्याने तिचे तुकडे-तुकडे
करून टाकले. काचेचे तुकडे खळकन् खाली विखुरले, येणारे-जाणारे
तिथेंच थबकले. कुठून तरी शिट्टीचा आवाज आला. हे अनावश्यक काम पूर्ण करून
मार्गारीटा मोठ्याने हसू लागली. ‘अर्बातवर खूप सावंध राहायला
पाहिजे,’ मार्गारीटाने विचार केला, ‘इथे
सगळंच इतकं गुंतागुंतीचं आहे की काही समजणंच कठीण आहे!” तिने तारांच्या मधून
उडायचा प्रयत्न केला. मार्गारीटाच्या खाली ट्रॉलीबसेसचे, बसेसचे
आणि कार्सचे छप्परं तरंगंत होते; वरून तिला असं वाटंत होतं,
की फुटपाथांवर जणु टोप्यांच्या नद्या वाहताहेत. ह्या नद्यांतून
अधून-मधून काही वेगळ्या होऊन रात्रीच्या जगमगणा-या दुकानांच्या जबड्यांमधे सामावंत
होत्या. ‘ओह, काय गुंतागुत आहे!’
रागांत मार्गारीटाने विचार केला, ‘इथे वळणं
अशक्य आहे. अर्बात पार केल्यावर ती आणखी उंचीवर उडू लागली, चवथ्या
मजल्यापर्यंत, आणि कोप-यांत असलेल्या थियेटरच्या झगमगणा-या
बिल्डिंगच्या बाजूने होत-होत उंच-उंच घरं असलेल्या एका अरुंद गल्लीत शिरली. ह्या
घरांच्या खिडक्या उघड्या होत्या आणि सगळ्या खिडक्यांतून रेडिओचा आवाज ऐकू येत
होता. मार्गारीटा उत्सुकतेने एका खिडकीतूंन आत डोकावली. तिला कॉमन-किचन दिसलं.
स्लैबवर दोन स्टोव्ह गरजंत होते, त्यांच्याजवळ दोन बाया
उभ्या होत्या, हातांत पळ्या घेऊन, एकमेकींशी
भांडंत.
“आपल्या मागे बाथरूमचा लाइट बंद करावा, पेलागेया पेत्रोव्ना, मी तुम्हांला सांगून ठेवते,”
त्या दोघींपैकी एक बाई म्हणाली, जिच्या समोरच्या
भांड्यातून उकळंत असलेल्या सारातून वाफ निघंत होती,
“नाहीतर आम्हीं तुम्हाला येथून काढून टाकू!”
“तुम्हींतर जश्या खूSSप चांगल्या आहांत,”
दुसरीने उत्तर दिलं.
“तुम्हीं दोघीही चांगल्या आहांत,” मार्गारीटाने खिडकीतून किचनमधे येत म्हटले. भांडणा-या
दोघींनी आवाजाच्या दिशेने बघितलं आणि आपल्या हातांतल्या घाणेरड्या पळ्यांसकट जणु
थिजून गेल्या. मार्गारीटाने हळूच त्यांच्यामधून हात पुढे करून किल्ल्या फिरवल्या
आणि दोन्हीं स्टोव्स विझवून टाकले. बाया ‘ईSSS!’ म्हणंत किंचाळल्या आणि त्यांचे तोंडं उघडेच राहिले. पण
मार्गारीटा किचनमधे कंटाळली होती आणि ती परंत उडून गल्लींत आली.
ह्या गल्लीच्या शेवटी एका आठ मजली इमारतीने तिचं लक्ष वेधून घेतलं.
मार्गारीटा खाली उतरली आणि जमिनीवर पोहोचल्यावर तिने पाहिलं की इमारतीचा दर्शनी
भाग काळ्या संगमरमरचा होता, दार चौडं होतं, त्यांत बसवलेल्या काचेतून दरबानाच्या कोटाच्या गुंड्या
आणि सोनेरी रिबिन लावलेली टोपी दिसंत होती, आणि दारावर सोनेरी अक्षरांनी लिहिलं होतं “ड्रामलिट
हाउस”.
मार्गारीटा त्या अक्षरांकडे बघंत विचार करूं लागली की ड्रामलिटचा अर्थ काय
असूं शकतो. ब्रशला बगलेंत दाबून, दरबानाला दाराने धक्का देत मार्गारीटा आत शिरूं लागली
आणि तिची नजर लिफ्टजवळ लावलेल्या काळ्या बोर्डवर पडली, ज्यांवर पांढ-या अक्षरांत त्या बिल्डिंगमधे राहणा-या
लोकांची नावं फ्लैटनंबरसकट लिहिलेली होती. सर्वांत वर लिहिलेलं होतं “नाटककार आणि
साहित्यकारांचे आवास गृह”. ज्यामुळे मार्गारीटाच्या तोंडून हल्कीशी किंचाळी
निघाली. ती वर हवेंत उडाली आणि लवकर-लवकर बोर्डवर लिहिलेली नावं वाचू लागली :
खूस्तोव, द्वुब्रात्स्की, क्वान्त, बेस्कूद्निकोव, लातून्स्की...
‘लातून्स्की!’ मार्गारीटा
भुणभुणली, “लातून्स्की! हो, हा तोच आहे! ह्यानेंच मास्टरला मारून टाकलंय!”
दारावर उभा असलेला दरबान आश्चर्याने डोळे फिरवंत, उचकून-उचकून त्या काळ्या बोर्डकडे बघूं लागला, हे जाणण्यासाठी
की ह्या बोर्डवर लिहिलेली ती नावं एकदमंच कां आणि कशी भुणभुणू लागली.
तोपर्यंत मार्गारीटा एका उत्तेजनेंत घोकंत पाय-यांवर उडू लागली होती:
“लातून्स्की – चौ-यांशी! लातून्स्की – चौ-यांशी!...
हा, डावीकडे – 82, उजवीकडे – 83, आणखी वर डावीकडे – 84, हाच! ही राहिली त्याची नेमप्लेट – ‘ओ. लातून्स्की.”
मार्गारीटाने ब्रशवरून उडी मारली, आणि तिच्या गरम टाचांना फरशीचा हवा-हवासा गारवा
जाणवला. मार्गारीटाने घंटी वाजवली, एकदा, दोनदा...पण कुणीच दार नाही उघडलं. मार्गारीटा पूर्ण
ताकदीनिशी घंटीचं बटन दाबंत होती आणि लातून्स्कीच्या घरांत होणारी घणघण ऐकंत होती.
हो, आठव्या मजल्याच्या फ्लैट नं. 84मधे राहणारा माणूस जीवनाच्या शेवटच्या घटकेपर्यंत
मॉसोलितच्या प्रेसिडेन्टचा आभारी राहणार होता, कारण की बेर्लिओज़ ट्रामगाडीखाली आला होता, आणि अशासाठी पण, की त्याच्या
प्रीत्यर्थ शोकसभा आजंच संध्याकाळी ठेवली होती. लातून्स्कीचे ग्रह खूपंच चांगले
होते – म्हणूनंच त्याची मार्गारीटाशी भेट नाही झाली, जी ह्या शुक्रवारी चेटकीण झालेली होती.
कुणीच दार नाही उघडलं.
तेव्हां मार्गारीटा भरधाव वेगाने खाली येऊं लागली; मज़ले मोजंत-मोजंत
ती खाली पोहोचून रस्त्यावर आली. बाहेर येऊन तिने पुन्हां एकदां सगळे मज़ले मोजले, हे निश्चित
करण्यासाठी, की लातून्स्कीच्या फ्लैटच्या खिडक्या कोणत्या आहेत. निश्चितंच ह्या, कोप-यांतल्या पाच
अंधा-या खिडक्या होत्या. त्यांच्याकडे नीट बघून मार्गारीटा पुन्हां वर उडाली आणि
काही क्षणातंच उघड्या खिडकीतून अंधा-या खोलीत आली, जिथे फक्त चंद्राच्या प्रकाशामुळेच थोडासा उजेड होता.
ह्या रुपेरी पट्ट्यावर धावंत जाऊन तिने दिव्याचं बटन शोधलं. एका मिनिटांतंच पूर्ण
फ्लैटमधे प्रकाश पसरला. ब्रश कोप-यांत उभा राहिला. मार्गारीटाने व्यवस्थितपणे बघून
घेतलं, की घरांत कुणीच नाहीये, आणि मग
पाय-यांकडे जाणारं दार उघडून बघूं लागली, की तिथे नेमप्लेट आहे किंवा नाही. नेमप्लेट तिथेंच
होती, मार्गारीटा तिकडे गेली, जिथे तिला जायचं होतं.
हो, असं म्हणतांत की आजही आलोचक लातून्स्की त्या भयानक संध्याकाळच्या आठवणीने
थरथरूं लागतो आणि आजसुद्धां बेर्लिओज़चं नाव मोठ्या आदराने घेतो. आम्हांला काहीच
माहीत नाही, की ह्या संध्याकाळी आणखी काय काय भयानक आणि काळे कारनामे घडले असते –
जेव्हां किचनमधून बाहेर आली, तेव्हां मार्गारीटाच्या हातांत एक वजनदार हातोडा होता.
निर्वस्त्र आणि अदृश्य उडनपरी स्वतःवर ताबा ठेऊन होती आणि स्वतःला समजावंत
होती; तिचे हात मात्र अत्यंत अधीरतेने शिवशिवंत होते. तन्मयतेने लक्ष्य साधून
मार्गारीटाने पियानोच्या पट्ट्या तोडून टाकल्या आणि पूर्ण फ्लैटभर पहिला यातनामय
आवाज घुमला. निर्जीव, निर्दोष, लाकडी पेटीत जखडलेला बेक्केरचा पियानो कण्हत होता. कीबोर्ड
कोसळला, पट्ट्या चारीकडे उडूं लागल्या. त्या वाद्याचा आवाज घुमंत होता, कण्हंत होता, घरघरंत होता, वाजंत होता. हातोड्याच्या माराने बन्दुकीच्या गोळीसारखा
आवाज करंत वरचं चकचकीत झाकंण सुद्धा उडून गेलं. लवकर-लवकर दीर्घ श्वास घेत
मार्गारीटाने सगळे तार खेचून हातोड्याने त्यांचा चेंदामेंदा करून टाकला. शेवटी
अगदी थकून थोडा दम घेण्यासाठी ती खुर्चीवर लवंडली.
बाथरूममधे पाणी पूर्ण वेगाने वाहंत होतं आणि किचनमधेसुद्धां. ‘कदाचित पाणी
फरशीवर आलंय,’ मार्गारीटाने विचार केला आणि पुढे म्हणाली:
‘बसण्यांत काही
अर्थ नाहीये.’
पाण्याची धार किचनमधून कॉरीडोरमधे धाऊ लागली होती. अनवाणी पायांनी पाण्यांत
छपछप करंत मार्गारीटा किचनमधून बादल्या भरून-भरून आलोचकाच्या स्टडीरूममधे आणंत
होती आणि टेबलाच्या खणांमधे ओतंत होती. मग हातोड्याने ह्या खोलीतल्या अलमारीचे दार
तोडल्यानंतर ती बेडरूमकडे धावली. आरसा लावलेली अलमारी तोडून झाल्यावर तिने आतून
आलोचकाचा सूट खेचून त्याला बाथरूमच्या पाण्यांत बुडवून टाकलं. बेडरूमच्या नरम, सुरेख, गुबगुबीत
डबल-बेडवर शाईची पूर्ण दौत उलटून दिली, जी तिने स्टडीरूममधून उचलून आणली होती. ह्या
विनाशलीलेने तिला फार आनंद होत होता, तरीही तिला वाटंत होतं, की हे तर काहींच नाहीये. म्हणून ती जे दिसेल, ते तोडंत होती.
पियानोच्या खोलीतले सगळे फ्लॉवर पॉट्स तोडून टाकले. मग ती लगेच किचनमधून चाकू आणून
बेडरूममधे घुसली आणि सगळ्या चादरी कापून टाकल्या, फ्रेम केलेले फोटो फोडून टाकले.
तिला थकवा जाणवंत नव्हता, फक्त शरीरातून घामाच्या धारा वाहत होत्या.
ह्याच वेळी लातून्स्कीच्या खालच्या, फ्लैट नं 82मधे नाटककार क्वान्तची मोलकरीण चहा पीत
होती; तिला काहींच कळंत नव्हतं की वरच्या फ्लैटमधून हा धावपळीचा, ठकठकीचा आवाज कां
येतोय. जेव्हां तिने डोकं वर करून छताकडे पाहिलं तर तिच्या डोळ्यादेखंत छताचा रंग
पांढ-याहून मळकट निळा झाला. हा मळकंट निळा डाग हळू-हळू मोठा होऊं लागला आणि त्यावर
थेंब दिसूं लागले. आश्चर्य करंत दोन मिनिट ती तशीच बसून राहिली; तोपर्यंत वरच्या
छतातून अगदी खरोखरचा पाऊस फरशीवर पडू लागला. आता ती गर्रकन उठली आणि तिने धारेच्या
खाली एक भांडं ठेवलं, पण त्याने काहीच फायदा नाही झाला, कारण की पाऊस आता
गैसच्या शेगडीवर, भांड्यांच्या टेबलवरसुद्धां पडू लागला होता. तेव्हां
क्वान्तची मोलकरीण ओरडंत फ्लैटमधून बाहेर आली आणी पाय-यांवर धाऊ लागली...लगेच
लातून्स्कीच्या फ्लैटमधे घंट्या वाजू लागल्या.
“बस, घंट्या वाजताहेत, आता निघावं,”
मार्गारीटाने म्हटलं. ती ब्रशवर बसली आणि बाहेरून
येणारा आवाज ऐकू लागली, जो ओरडंत होता, “उघंड, उघंड! दूस्या उघंड! तुमच्याकडे काय पाणी वाहतंय? आमच्या घरी पूर
आलाय.”
मार्गारीटा एक मीटर वर उठली आणि तिने झुंबरावंर प्रहार केला. दोन बल्ब्स
फुटले, चारीकडे काचेचे तुकडे विखुरले. आता बाहेरची आरडा-ओरंड थांबली होती, पाय-यांवर धमधम
ऐकूं येत होती. मार्गारीटा तरंगंत खिडकीच्या बाहेर आली आणि तिने हातोड्याने
खिडकीच्या काचेवर हल्का प्रहार केला. तो चूर चूर झाला. संगमरमरी भिंतीवर काचेचा
चुरा घरंगळला. मार्गारीटा दुस-या खिडकीकडे आली. खाली फुटपाथवर लोक धावंत होते.
खाली उभ्या असलेल्या दोन मोटारींपैकी एकीचा हॉर्न वाजला आणि ती निघाली.
लातून्स्कीच्या खिडक्यांचा सत्यानाश केल्यावर मार्गारीटा शेजारच्या फ्लैटकडे
तरंगली. आता हातोड्याचा आवाज लवकर-लवकर येऊं लागला, गल्ली आवाजांनी आणि खणखणाटाने भरून गेली. पहिल्या
प्रवेशद्वारातूंन दरबान धावंत बाहेर आला, त्याने वर बघितलं, थोडा वरमला: स्पष्टंच होतं, त्याला कळलंच नाही की करावं काय. त्याने तोंडांत
शिट्टी खुपसली आणि लागोपाठ फुंकू लागला. ह्या शिट्टीच्या आवाजाने चिडून
मार्गारीटाने आठव्या मजल्याची शेवटची खिडकी फोडून टाकली, आता ती सातव्या
मजल्यावर आली आणि इथे पण काचा फोडू लागली.
काचेच्या दारांमागे बरांच वेळ काहीच काम न केल्याने आळसावलेला दरबान पूर्ण
ताकदीने शिट्टी फुंकंत होता, जणु काही तो मार्गारीटाच्या मागेमागेच होता. एका
खिडकीपासून दुस-या खिडकीपर्यंत तिच्या पोहोचण्याच्या घटनारहित वेळेंत तो श्वास
घेऊन घ्यायचा, आणि मार्गारीटाच्या प्रत्येक प्रहारा बरोबर गाल फुगवून
शिट्टी फुंकायचा आणि जणु काही रात्रीच्या हवेला थेट आकाशापर्यंत पोहोचवायचा.
त्याच्या प्रयत्नांना मार्गारीटाच्या साहाय्याने खूपंच यश मिळालं.
बिल्डिंगमधे दहशत पसरली. खिडक्यांच्या शाबूत असलेल्या काचा निमिषमात्रांत चूर-चूर
व्हायच्या. त्यांत लोकांचे चेहरे दिसायचे आणि पट्कन गायब व्हायचे. उघडलेल्या
खिडक्या झट्कन बंद व्हायच्या. समोरच्या इमारतींत, खिडक्यांमधील प्रकाशाच्या पार्श्वभूमीवर काळ्या
सावल्या दिसायच्या, त्या समजण्याचा प्रयत्न करंत होत्या, की उगीचंच ‘ड्रामलिट’च्या नवीन
इमारतींत खिडक्यांच्या काचा कां फुटंत आहेत.
गल्लीमधे लोक ‘ड्रामलिट’कडे पळंत होते, आणि तिच्या आंत काहीही कारण नसताना पाय-यांवर धावंत
असलेल्या लोकांची गर्दी होती. क्वान्तची मोलकरीण पाय-यांवर धावणा-या लोकांना
ओरडून-ओरडून सांगंत होती. की त्यांच्या फ्लैटमधे वरून पाण्याची धार लागली होती, तिचा साथ
देण्यासाठी खूस्तोवची मोलकरीणपण आली, जो क्वान्तच्या अगदी खाली, फ्लैट नं. 80मधे राहायचा. खूस्तोवच्या फ्लैटमधे छतातून
पाणी आलं, किचनमधे आणि बाथरूममधे. शेवटी क्वान्तच्या किचनच्या छताचा एक मोठा तुकडांच
खाली पडला. चीनीचे सगळे घाण भांडे चक्काचूर झाले, आणि नंतर मुसळधार पाणी पडू लागलं, लटकंत असलेल्या
प्लास्टरमधून पाणी असं पडंत होतं, जणु बादल्या भरून-भरून ओतताहेत. मग पहिल्या
प्रवेशद्वाराजवळ आरडा-ओरडा सुरूं झाला. चवथ्या मजल्यावर मार्गारीटा शेवटच्या
आधीच्या खिडकींत डोकावली आणि तिला असं दिसलं की एक माणूस घाबरून गैस-मास्क घालंत
आहे. त्याच्या खिडकीवर हातोडा मारून मार्गारीटाने त्याला आणखीनंच घाबरवलं, आणि तो खोलीतून
गायब झाला.
हा भयंकर हल्ला अचानकंच बंद झाला. तिस-या मजल्यावर उतरून मार्गारीटाने हलका
काळा पडदा लावलेल्या शेवटच्या खिडकींत डोकावून बघितलं. खोलींत एक मरगळलेला, शेड असलेला लैम्प
जळंत होता. छोट्याश्या पलंगावर जाळीच्या आंत एक चार वर्षाचा मुलगा बसला होता आणि भीतीने
ऐकंत होता. खोलींत कोणीच मोठा माणूस नव्हता. स्पष्टंच होतं की सगळे फ्लैटच्या
बाहेर पळून गेले होते.
“काचा फुटताहेत,” मुलगा म्हणाला आणि त्याने हाक मारली, “मम्मी!”
कुणीच उत्तर दिलं नाही, तेव्हां तो म्हणाला, “मम्मी मला भीती वाटतेय.”
मार्गारीटाने पडदा सरकवला आणि उडून खोलींत आली.
“मला भीति वाटतेय,” मुलगा थरथरंत पुन्हां म्हणाला.
“भिऊं नको, भिऊं नकोस बाळा,”
मार्गारीटाने वा-यामुळे भसाड्या झालेल्या गुन्हेगार आवाजाला
कोमल बनवंत म्हटलं, “हे बदमाश मुलं काचा फोडंत होते.”
“गलोलने?” मुलाचं थरथरणं थांबलं होतं.
“हो, गलोलने, गलोलने,” मार्गारीटाने जोर देऊन म्हटलं, “आता तू झोपून जा, बरं!”
“हा सीन्तिक असेल,” मुलगा म्हणाला, “त्याच्याकडे गलोल आहे.”
“हो, तोच आहे, तोच तर आहे!”
मुलाने आश्चर्याने एका कोप-याकडे बघितलं आणि म्हणाला, “आणि, तू कुठे आहेस, आण्टी?”
“मी नाहीये,” मार्गारीटाने उत्तर दिलं,
“मी तुझ्या स्वप्नांत येईन.”
“मला असंच वाटलं,”
मुलगा म्हणाला.
“तू लोळ बघूं,” मार्गारीटाने हुकूम सोडला, “गालाखाली हात ठेव, तू मला स्वप्नांत बघूं शकशील.”
“ये, ये, स्वप्नांत ये,” मुलाने तिचं म्हणणं ऐकलं आणि लगेचा गालाखाली हात ठेवून
लोळून गेला.
“मी तुला गोष्ट सांगेन,” मार्गारीटाने म्हटलं आणि आपला गरंम हात मुलाच्या
लहान-लहान केस असलेल्या डोक्यावर ठेवला, “पृथ्वीवर एक आण्टी राहायची. तिला काही मूल-बाळ नव्हतं, आणि जीवनांत
जरापण आनन्द नव्हता. आधीतर ती खूप रडायची, पण मग एकदम दुष्टंच झाली...” मार्गारीटा गप्प झाली.
तिने हात काढून घेतला. मुलगा झोपला होता.
मार्गारीटाने चुपचाप हातोडा खिडकीच्या चौकटीवर ठेवला आणि खिडकीतून बाहेर
उडून गेली. बिल्डिंगच्याजवळ हलकल्लोळ माजला होता. काचेच्या तुकड्यांनी पूर्णपणे
झाकलेल्या फुटपाथवर लोक ओरडंत-ओरडंत पळंत होते. त्यांच्यांत काही पोलिसवाले पण
दिसंत होते. अचानक कर्कश घण्टा वाजूं लागली आणि अर्बातच्या दिशेने लाल रंगाची, शिडी लावलेली
अग्निशामक गाडी गल्लींत येऊन ठेपली...
पुढच्या गोष्टींमधे मार्गारीटाला रस नव्हता. तारांच्या जाळापासून स्वतःला
वाचविण्यासाठी तिने ब्रश घट्ट धरून ठेवला आणि एका क्षणांत त्या दुर्दैवी
बिल्डिंगपासून दूर उडू लागली. तिच्या
खालची गल्ली तिरपी होऊन मागे राहिली. तिच्याऐवजी मार्गारीटाच्या पायांखाली आली
काही छप्परं, त्यांना विभक्त करणारे, एक दुस-याला छेदंत जाणारे रस्ते. बघतां-बघतां हे सगळं
एकीकडे राहिलं आणि अग्निशलाका एकमेकाच्या जवळ येत गेल्या आणी एकमेकांत मिसळंत गेल्या.
मार्गारीटाने आणखी एक उडी मारली आणि छतांचं हे जाळं जणु जमिनींत गडंप झालं, त्यांच्या ठिकाणी
दिसलं एक तळं, ज्यांत दिसंत होता थरथरणारा प्रकाश. हे तळं अचानक उभं
राहू लागलं आणि मार्गारीटाच्या डोक्यावर आलं. आता तिच्या पायांखाली चंद्र चमकंत
होता. मार्गारीटाला जाणवलं की ती उल्टी झालीये, आणि तिने लगेच स्वतःला पुन्हां सामान्य स्थितींत आणलं.
तिने मागे वळून पाहिलं तेव्हां तळं गायब झालेलं होतं आणि तिथे, तिच्या मागे फक्त
क्षितिजाचा गुलाबी प्रकाश उरला होता. तो देखील क्षणभरांत गायब झाला. मार्गारीटाने
पाहिलं की आता ती, आपल्या वर, डावीकडे, तिच्याबरोबर उडणा-या चंद्रासोबंत एकटीच आहे.
मार्गारीटाचे केस आधींच उभे राहिले होते, आणि चंद्राचा शीळ घालणारा प्रकाश तिला न्हाऊं घालंत
होता. हे बघितल्यावर की खाली प्रकाशाच्या दोन ओळी, दोन रेषांमधे परिवर्तित होताहेत, मार्गारीटा समजून
चुकली की ती आश्चर्यजनक वेगाने उडतेय, आणि त्याहूनही आश्चर्याची गोष्ट ही, की ती जरासुद्धां
थकंत नाहीये.
काही क्षणांनी खाली, पृथ्वीवरच्या अंधारांत विजेच्या रोशनाईचं एक नवीन तळं
दिसलं, जे उडनपरीच्या पायांखालून सरकून गेलं, पण लगेच गोल-गोल फिरून जमिनींत गडप झालं. काही वेळाने
- पुन्हां अगदी तसंच दृश्य!
“शहर! शहर!” मार्गारीटा ओरडली.
त्यानंतर तिला दोन किंवा तीन वेळा खाली, मंद प्रकाशांत चमकणा-या, उघड्या, काळ्या म्यानींत असलेल्या अरुंद तलवारी दिसल्या, ती समजली की ह्या
नद्या आहेत.
डोकं वर, डावीकडे फिरवंत उडनपरी हे बघून खूश होत होती, की चंद्र तिच्या
वर-वर चालतोय, वेड्यासारखा, परंत मॉस्कोकडे, आणि त्याबरोबरंच तो आपल्या जागी थांबंत देखील आहे, ज्यामुळे त्यांत
एक रहस्यमय काळी आकृति दिसंत आहे – कदाचित अजगर किंवा कुबडा घोडा, जो आपली छोटीशी
मान वळवून मागे, मॉस्कोच्या दिशेने बघतोय.
आता मार्गारीटाने विचार केला, की ती उगीचंच ब्रशला येवढ्या वेगाने हाकंतेय. अश्याने
तिला कितीतरी वस्तूंकडे लक्ष देऊन बघणं आणि उड्डाणाचा आनंद घेणं जमंत नाहीये. जणु
काही कुणी तरी तिला सांगंत होतं, की तिथे, जिकडे ती उडून चाललीये, कुणीतरी तिची वाट बघतीलंच आणि तिला ह्या अफाट उंचीला
आणि वेगाला कंटाळण्याचं काही कारण नाहीये.
मार्गारीटाने ब्रशचा केसांचा भाग खाली वाकवला, ज्याने त्याची शेपूट वर गेली. आपला वेग खूपंच कमी करंत
ती थेट जमिनीकडे झेपावली. ही घसरण, जशी उडणा-या मशिनींत होते, तिला आवडली. पृथ्वी जणु उठून तिला भेटायला येत होती, आणि
आतापर्यंतच्या तिच्या आकारहीन, काळ्या पदरांत ह्या चांदण्या रात्रींत अनेक रहस्यपूर्ण, सुंदर वस्तू दिसू
लागल्या. पृथ्वी तिच्या जवळ येत होती आणि मार्गारीटाचं डोकं हिरव्या-हिरव्या
जंगलांच्या सुगंधाने घुमूं लागलं. मार्गारीटा दंवबिंदूंनी झाकलेल्या हिरव्यागार
मैदानावर पसरलेल्या धुक्यांतून जात होती; मग ती एका तळ्यावरून गेली. मार्गारीटाच्या खाली बेडूक
एका सुरांत गात होते आणि दूर कुठेतरी हृदयाला विह्वळ करणारी एक आगगाडी हल्ला करंत
होती. मार्गारीटाने लवकरंच तिला बघितलं. ती हवेंत ठिणग्या सोडंत अळीसारखी हळू-हळू
रांगंत होती. तिला पार केल्यावर मार्गारीटा आणखी एका जलाशयावरून गेली, ज्यांत चंद्र
तरंगंत होता, भव्य मैपल वृक्षांच्या शिखरांना पायांने दाबंत, ती अजून थोडी
खाली आली.
मार्गारीटाला कापल्या जाणा-या वा-याचा जोरदार आवाज जवळ येत असलेला जाणवला. हळू
हळू ह्या आवाजांत तीव्र वेगाने उडंत असलेल्या एखाद्या रॉकेटसारखा आवाज आणि एका
बाईच्या खळखळून हसण्याचा आवाज मिसळला. मार्गारीटाने तोंड फिरवून पाहिलं तर तिला
दिसलं, की तिच्या जवळ एक काळी क्लिष्ट वस्तू येत आहे. मार्गारीटाच्या जवळ
येतां-येतां ती वस्तू स्पष्ट दिसू लागली. कुणीतरी कोणत्यातरी वस्तूवर सवार होऊन
उडंत असलेलं दृष्टीस पडलं. शेवटी ते अगदी स्पष्ट दिसूं लागलं : आपला वेग कमी करून
मार्गारीटाला नताशाने पकडलंच.
ती सम्पूर्ण नग्न, हवेंत उडणा-या मोकळ्या केसांची परवा न करतां एका
जाड्या डुकरावर बसून उडंत होती, ज्याने आपल्या पुढच्या पंजांमधे एक ब्रीफकेस धरली होती
आणि चंद्राच्या प्रकाशांत मधून-मधून चमकणारा त्याचा चश्मा, जो नाकावरून खाली
घसरला होता, डुकराच्या बरोबर, दोरीने बांधलेला उडंत होता आणि टोपी घडी-घडी डोळ्यांवर
घसरंत होती. नीट बघितल्यावर मार्गारीटाला कळलं की हा तर निकोलाय इवानोविच आहे, आणि मग तिचं
गडगडाटी हास्य जंगलांत घुमूं लागलं, जे नताशाच्या खळखळत्या हास्यांत मिसळून गेलं.
“नताशा!” मार्गारीटा कर्कश आवाजांत ओरडली, “तू क्रीम लावलंस?”
“माझी लाडकी!” आपल्या भसाड्या आवाजाने झोपलेल्या लिंडन-वनाला हलवंत नताशा
उत्तरली, “माझी फ्रेंच राणी, मी तर ह्याच्या टकल्या डोक्यावर सुद्धां चोपडलं, ह्याच्या!”
“राजकुमारी!” भसाड्या आवाजांत आपल्या स्वाराला उड्या मारंत नेत डुक्कर
अश्रूभरल्या आवाजांत ओरडला.
“माझी लाडकी! मार्गारीटा निकोलायेव्ना!” मार्गारीटाच्या जवळ येत नताशा ओरडली, “मी कबूल करतेय, की क्रीम घेतलं
होतं. आम्हांला पण जगण्याची आणि उडण्याची इच्छा होते! मला क्षमा करा, माझी सरकार, पण मी परंत जाणार
नाही, कोणत्याच परिस्थितींत नाही जाणार! ओह, हे मस्त आहे, मार्गारीटा निकोलायेव्ना! माझ्यासमोर लग्नाचा प्रस्ताव
ठेवला,” नताशाने त्या वैतागलेल्या डुकराच्या खांद्यात बोट खुपसंत म्हटलं, “लग्नाचा
प्रस्ताव! तू मला कोणत्या नावाने बोलावलंस, हँ?” ती डुकराच्या कानाजवळ झुकंत बोलली.
“देवी,” तो भुणभुणला, “मी येवढ्या वेगाने नाही उडूं शकंत! मी आपले महत्वपूर्ण
कागदपत्र हरवून बसेन. नतालिया प्रकोफेव्ना, मी विरोध करतोय.”
“तू आणि तुझे कागदपत्र…नरकांत जा!” विकट हास्य करंत नताशा ओरडली.
“हे काय, नतालिया प्रकोफेव्ना!” आपलं बोलणं कुणी ऐकलं तर!”
डुक्कर तिची मनधरणी करंत डरकाळला.
मार्गारीटाच्या बाजूला उड्या मारंत नताशा हसंत-हसंत तिला सांगू लागली, की मार्गारीटा
निकोलायेव्ना गेटवरून उडाल्यावर त्या घरांत काय-काय झालं.
नताशाने कबूल केलं, की भेट मिळालेल्या कोणत्याही वस्तूला हात लावायच्या ऐवजी
तिने आपले कपडे काढून फेकले आणि क्रीमकडे धावली, तिने ताबडतोब आपल्या अंगाला क्रीम फासलं. आतां
तिच्याबरोबर अगदी तेंच झालं, जे तिच्या मालकिणीबरोबर झालं होतं. जेव्हां नताशा
आनंदाने खिदळंत आरशांत आपलं जादुई सौंदर्य न्याहाळंत होती, तेवढ्यांतच दार
उघडलं आणि नताशाच्या समोर निकोलाय इवानोविच प्रकट झाला. तो खूपंच उत्तेजित वाटंत
होता, हातांत आपल्या ब्रीफकेस आणि टोपीबरोबर त्याने मार्गारीटा निकोलायेव्नाचा
शर्टपण धरलेला होता. नताशाला बघतांच निकोलाय इवानोविचची जीभंच खिळली. स्वतःला
थोडसं संयत करून, खेकड्यासारख्या लाल झालेल्या निकोलाय इवानोविचने
सांगितलं की खाली पडलेला शर्ट उचलून स्वतःच परंत देणं त्याला आपलं कर्तव्यंच
वाटलं....
“काय बोललास, दुष्ट!” खिदळंत नताशा सांगंत होती, “काय...काय
म्हणाला, काय काय आणा-भाका घेतल्या! कसे माझ्या हातांत पैसे खुपसले! म्हणे, की क्लाव्दिया पेत्रोव्नाला
काSSही कळणार नाही. काय, मी खोटं सांगतेय कां?”
नताशा डुकरावर ओरडली आणि त्याने वैतागाने डोकं हलवलं.
शयन कक्षांत दंगा-मस्ती करणा-या नताशाने निकोलाय इवानोविचवरदेखील क्रीम
चोपडलं आणि तिला आश्चर्याचा धक्कांच बसला. खालच्या मजल्यावर राहणा-या सम्माननीय
नागरिकाचा चेहरा पाच कोपेकच्या नाण्यासारखा झाला आणि त्याचे हातपाय पंजांसारखे
झाल्रे. स्वतःला आरशांत बघितल्याबरोबर निकोलाय इवानोविच अत्यंत हताश होऊन
रानटीपणाने ओरडू लागला, पण आता खूपंच उशीर झाला होता. काही क्षणातंच तो आपल्या
स्वाराला घेऊन मॉस्कोपासून दूर, सैतान जाणे कुठेतरी उडंत चालला होता, दुःखाने तो हुंदके देत होता.
“मी आपल्या सामान्य स्वरूपाला परंत करण्याची मागणी करतो!” अचानक चिडून, विनवणीसारख्या
स्वरांत डुक्कर भिणभिणलं, “मी कोणत्याही नियमाविरुद्ध असलेल्या मीटिंगमधे उडून
जाणार नाहीये! मार्गारीटा निकोलायेव्ना, तुम्हांला तुमच्या मोलकरणीला खाली उतरवावंच लागेल.”
“आह, तर आता मी तुझ्यासाठी मोलकरीण झाले? मोलकरीण?” नताशा डुकराचा कान पिळंत ओरडली, “आणि तेव्हां, मी देवी होते? तू मला कसं
बोलावलं होतं?”
“शुक्रतारा! वीनस!” डुक्कर मनधरणी करंत म्हणाला. आता ते दगडांच्यामधून कलकल करणा-या नदीवरून उडंत होते
आणि त्याचे पंजे अक्रोडाच्या फांद्यांना घासंत गेले.
“वीनस! वीनस!” नताशाने एक हात कमरेवर ठेवंत आणि दुसरा चंद्राकडे उंचावून म्हटलं, “मार्गारीटा!
महाराणी! माझ्यासाठी विनंती करा, की मला डाकीणंच राहू द्यावं. तुमच्यासाठी काहीही अशक्य
नाहीये, तुम्हांला शक्ति मिळाली आहे!”
मार्गारीटाने उत्तर दिलं, “बरं, मी वचन देते!”
“धन्यवाद!” नताशा ओरडून म्हणाली आणि ती पुन्हां काहीशा विषण्णतेने आणि
जोराने ओरडली, “हेय! हेय! लौकर!
लैकर! आणखी लौकर!’ तिने आपल्या टाचांने बिनडोक उड्यांमुळे निमुळती झालेली
डुकराची कम्बर घट्ट पकडली, तो इतक्या जोराने डरकाळला की हवा पुन्हां झणझणली.
क्षणभरांत नताशा पुढे निघून एका काळ्या ठिबक्यांत परिवर्तित झाली आणि पुन्हां
दिसेनाशी झाली. तिच्या उड्डाणाचा हल्ला-गुल्लापण हळू-हळू कमी झाला.
मार्गारीटा पहिल्यासारखीच हळू-हळू निर्जन आणि अनोळखी जागेवर उडंत राहिली, टेकड्यांच्यावर, जिथे अजस्त्र
मैपल वृक्षांच्या मधल्या जागेंत गोल-गोल गोटे विखुरले होते, उडताना
मार्गारीटा विचार करंत होती, की ती कदाचित मॉस्कोहून ब-यांच दूर आली आहे. ब्रश आतां
मैपल वृक्षांच्या शिखरांवर न उडतां, त्यांच्या बुंध्यांच्यामधून उडंत होता, जे चंद्राच्या
प्रकाशांत एकीकडून रुपेरी दिसंत होते. उडनपरीची सावली जमिनीवर समोरच्या बाजूला
पडंत होती – चंद्र आता मार्गारीटाच्या पाठीला आलोकित करंत होता.
मार्गारीटाला असा आभास झाला की जवळंच कुठेतरी पाणी आहे आणि तिने असा अंदाज
बांधला की तिचे गंतव्य आतां जवळंच आहे. मैपलची झाडं दूर सरकंत गेली आणि मार्गारीटा
हळू-हळू एका पांढ-या उंचवट्याकडे हवेंत तरंगून गेली. ह्या उंचवट्याच्या मागे, खाली, सावलीत होती एक
नदी. उंचवट्याला लगडलेल्या झुडुपांवर धुकं लटकंत होतं, पण नदीचा दुसरा काठ समतल, खोलगट होता. तिथे, झाडांच्या एकुलत्या एका समूहाखाली अलावांत आग जळंत
होती आणि काही चालत्या-फिरत्या आकृत्या दिसंत होत्या. मार्गारीटाला असं वाटलं, की तिथून एक
सुरेल, प्रसन्न संगीत ऐकूं येत आहे. ह्याच्यापुढे, जिथवर नजर जात होती, चांदीसारख्या चमचमणा-या मैदानावर वस्ती किंवा राहत्या
घरांचे नामो-निशाण नव्हते.
मार्गारीटाने उंचवट्याच्या खाली उडी मारली आणि पट्कन पाण्याजवंळ उतरली. ह्या हवाई-सफ़रीनंतर पाण्याने तिचं
स्वागत केलं. ब्रशला दूर फेकून तिने पाण्यांत सूर मारला. तिचं
हल्कं-फुल्कं शरीर तीरासारखं पाण्यांत शिरलं आणि वर उसळलेलं पाणी जवळ-जवळ
चंद्रापर्यंत पोहोचलं. पाणी कोमंट होतं, जसं स्नानगृहांत असतं आणि पाण्यातूंन वर येऊन
मार्गारीटा रात्रीच्या एकांतात त्या नदींत पोहंत राहिली.
मार्गारीटाच्या जवळपास कुणी नव्हतं, पण थोड्या दूरवर झुडुपांच्यामागेसुद्धां कुणाच्यातरी
पोहण्याचा आवाज येत होता.
मार्गारीटा धावून किना-यावर आली. पोहोण्यामुळे तिचं शरीर जणु जळंत होतं, पण तिला
जरासुद्धां थकवा जाणवंत नव्हता, आणि ती आनंदाने ओल्या-ओल्या गवतांत नाचंत होती. एकदम
तिने नाचणं बंद केलं आणि ती सावध झाली. पाण्यांत हातपाय चालवण्याचा आवाज जवळ येत
होता. मग विलोच्या झुडुपांच्या मागून, पूर्ण नग्न, एक जाड्या बाहेर आला. त्याच्या डोक्यावर मागच्या
बाजूला झुकलेली काळी रेशमी टोपी होती. त्याच्या टाचा चिखलाने माखलेल्या होत्या.
असं वाटंत होतं, की पोहोणा-याने जणु काळे जोडेच घातलेयत. ज्याप्रकारे
त्याला धाप लागली होती आणि उचक्या येत होत्या, त्याने स्पष्ट होतं की तो भरपूर प्यायलेला होता. नंतर
ही गोष्ट आणखीनंच स्पष्ट झाली, कारण की नदीच्या पाण्यांतूनदेखील कन्याकचा वास येऊं
लागला होता.
मार्गारीटाकडे दृष्टी गेल्यावर जाड्या तिच्याकडे एकाग्रतेने बघूं लागला, आणि मग लगेच
आनंदाने किंचाळला, “हे काय? मी काय तिलांच बघतो आहे? क्लोदीना, ही तूच तर आहे, आनन्दी विधवा? तू पण इथे?” आता तो हस्तांदोलनासाठी पुढे सरकला.
मार्गारीटा मागे सरकली आणि शालीनतेने म्हणाली, “चुलींत जा! इथे कुणी क्लोदीना-ब्लोदीना नाहीये! जरा
लक्ष दे की तू कुणाशी बोलतो आहेस,” आणि क्षणभर थांबून तिने एक मोट्ठी न छापण्यायोग्य शिवी
हासडली. ह्याचा त्या थिल्लर जाड्यावर गंभीर परिणाम झाला.
“ओय!” तो हळुवारपणे उद्गारला
आणि थरथरला, “विशाल हृदया, दैदीप्यमान महाराणी मार्गो! मला क्षमा करा! मी चुकलोच.
पण हा सगळा दोष कन्याकचा आहे, मसणांत जावो!” जाड्या एका गुडघ्यावर बसला आणि टोपी
काढून अभिवादन करंत बडबडू लागला. रशियन वाक्यांमधे फ्रेंच वाक्यांची भेसळ करंत तो
पैरिसला झालेल्या आपल्या मित्राच्या – हेस्सारच्या लग्नांत झालेल्या रक्तपाताबद्दल बडबडू लागला, तो कन्याकबद्दल
आणि स्वतःच्या भयंकर चुकीबद्दलसुद्धां बोलला, ज्यामुळे त्याला लाजिरवाणं झालंय.
“तू आधी पैन्ट घातली असती, डुकराच्या पिल्ला,”
मार्गारीटा थोडं शांत होत म्हणाली.
जाड्याने हसून दात दाखवले, मार्गारीटा चिडंत नाहीये, हे बघून तो मोठ्या उत्साहाने सांगू लागला, की त्याच्याकडे
पैन्ट नाहीये, कारण की विसरभोळेपणामुळे तो तिला एनिसेइ नदीच्या
काठावरंच सोडून आलाय, जिथे ह्याच्याआधी तो पोहंत होता, पण आता तो उडून
तिथे जाईल, कारण की ती जवळंच आहे आणि पैन्ट घालून घेईल. मग हुकुमाचं पालन करंत तो
मागे-मागे सरकंत गेला आणि तो पर्यंत सरकंत गेला, जो पर्यंत पाण्यांत नाही पडला. पण पडतां-पडतांसुद्धां
लहान-लहान कल्ले असलेल्या चेह-यावर उल्हास आणि समर्पणाचं हास्य होतं.
मार्गारीटाने एक कर्कश शिटी वाजवली आणि उडून येत असलेल्या ब्रशवर बसून
नदीच्या दुस-या काठाकडे उडाली. येथे टेकडीची सावली पडंत नव्हती. चंद्राच्या
प्रकाशांत सम्पूर्ण किनारा चमचमंत होता.
मार्गारीटाने ओल्या गवतावर पाय ठेवल्याबरोबर विलो वृक्षांच्या खालचं संगीत
तीव्र झालं आणि अलावातूंन ठिणग्या निघू लागल्या. नाजुक, गुबगुबीत कर्णफुलांनी नटलेल्या विलो वृक्षांच्या
फांद्यांखाली, ज्या प्रकाशांत स्पष्ट दिसंत होत्या, दोन रागांमधे
फुग-या चेह-याचे बेडूक बसले होते आणि लाकडी नळ्यांनी फुंकून-फुंकून परेड-म्यूज़िक
वाजवंत होते. विलो वृक्षांच्या फांद्यांवर ह्या संगीतकारांचे नोट्स टांगले होते
आणि बेडकांच्या डोक्यांवर अलावातल्या ज्वाळांचा प्रकाश नाचंत होता.
हे संगीत मार्गारीटाच्या सम्मानाप्रीत्यर्थ होतं. तिचं भव्य स्वागत केलं गेलं. पारदर्शी जलप-यांनी
नदीच्या वर आपलं गोल-नृत्य थांबवून झाडांच्या फांद्या हलवंत मार्गारीटाच स्वागत केलं.
त्या निर्मनुष्य हिरव्या काठावर त्यांचं अभिवादन घुमूं लागलं. निर्वस्त्र चेटकिणी विलो-वृक्षांच्या
मागून उड्या मारंत येऊन एका ओळींत उभ्या राहिल्या आणि राजसी ढंगाने वाकून अभिवादन करूं
लागल्या. कुणी एक, शेळीसारखा पाय असलेला, उडून तिच्या हाताला झोंबला. त्याने गवतावर रेशमी गलीचा
पसरला, विचारूं लागला की महाराणीने नदींत व्यवस्थितपणे स्नान केलं किंवा नाही, आणि थोडी विश्रांती
घेण्यासाठी विनवूं लागला.
मार्गारीटाने तसंच केलं. शेळीसारख्या पायवाल्याने शैम्पेनचा चषक तिच्यासमोर केला, एक घोट घेतल्याबरोबर
तिला हृदयांत ऊब जाणवली. हे विचारल्यावर, की नताशा कुठेय, उत्तर मिळालं, की नताशाने आधीच स्नान उरकून घेतलं, आणि आपल्या डुकराबरोबर
ती मॉस्कोला गेली आहे, हा निरोप देण्यासाठी की मार्गारीटा लौकरंच येते आहे. ती
तिचा श्रृंगार करण्यांत मदत करणारेय.
मार्गारीटा विलो-वृक्षांच्या खाली विश्रांती घेत असताना एक घटना घडली. हवेंत
एक शिट्टी तरंगली आणि एक काळंकुट्ट शरीर हात-पाय झटकंत पाण्यांत पडलं. काही क्षणांतच
मार्गारीटाच्यासमोर तोच कल्ले असलेला जाड्या प्रकट झाला, जो इतक्या असभ्यतेने
तिच्यासमोर प्रकट झाला होता. स्पष्टंच दिसंत होतं की तो एनिसेइपर्यंत जाऊन परतला होता, कारण की आता तो फ्रॉक-कोट
घालून तैयार होता, पण डोक्यापासून पायांपर्यंत ओला होता. कन्याकनेच त्याला
दुस-यांदा फसवलं होतं. बाहेर येता-येता तो पुन्हां पाण्यांत पडला होता, पण ह्या दुखद प्रसंगात
सुद्धां त्याच्या चेह-यावरचं हसू कायम होतं. त्याला स्मित करणा-या मार्गारीटाने जवळ
येऊं दिलं.
आता सगळे उठून उभे राहिले. जलप-यांनी आपलं नृत्य आटोपलं आणि त्या चंद्राच्या
प्रकाशांत विलीन झाल्या. शेळीसारख्या पायवाल्याने मार्गारीटाला विचारलं की ती कोणत्या
वाहनावर बसून नदीवर आलीय: आणि हे कळल्यावर की ती ब्रशवर बसून आली होती, तो म्हणाला, “ओह, ते काही आरामशीर नाहीये,” आणि त्याने क्षणांत
कोणच्यातरी दोन ठोकळ्यांना जोडून एक रहस्यपूर्ण टेलिफोन बनवला आणि हुकूम दिला, की लगेच कार पाठवण्यांत
यावी. हे लवकरंच झालं. काठावर एक शानदार उघडी कार आली. फक्त ड्राइवरच्या जागेवर साधारण
ड्राइवरच्या ऐवजी एक काळा, लांब नाकाचा, रेक्जिनची हैट आणि हातमोजे घातलेला कावळा होता, नदीचा काठ नीरव झाला.
चंद्राच्या प्रकाशांत दूर उडंत जाणा-या डाकिणी वितळून गेल्या. अलाव विझला. भु-या राखेने
कोळश्यांना झाकून घेतलं.
कल्लेवाल्या आणि शेळीसारख्या पायवाल्याने मार्गारीटाला कारमधे बसवलं आणि ती चौड्या
सीटवर पसरली. कार किंचाळली, उसळली आणि चंद्रापर्यंत वर उठली, नदीचा काठ गायब झाला, नदी लुप्त झाली. मार्गारीटा मॉस्कोकडे
येऊं लागली.
********
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें