गुरुवार, 12 अक्टूबर 2017

मास्टर आणि मार्गारीटा - 19



भाग – 2




एकोणीस



मार्गारीटा



माझ्या मागे, वाचका! तुला कुणी सांगितलंय की जगांत खरं-खुरं, प्रामाणिक, शाश्वत प्रेम नाहीये? खोटारड्याची घाणेरडी जीभंच छाटली जाईल!

माझ्या मागे ये, माझ्या वाचका, फक्त माझ्याच मागे, आणि मी तुला असं प्रेम दाखवीन!
नाही! मास्टर चुकंत होता, जेव्हां तो त्या दिवशी मध्यरात्र उलटून गेल्यावर हॉस्पिटलमधे दुःखाने इवानूश्काला सांगत होता, की ती त्याला विसरली. हे शक्यंच नव्हते. ती निश्चितंच त्याला विसरली नव्हती.

आधी तर ते गुपित सांगतो, जे मास्टरला इवानूश्कासमोर सांगायची इच्छा नव्हती. त्याच्या प्रेयसीचं नाव होतं मार्गारीटा निकोलायेव्ना1. मास्टरने गरीब बिचा-या कवीला तिच्या बद्दल जेपण सांगितलं होतं, ते सगळं खरं होतं. त्याने आपल्या प्रेयसीच अगदी खरं-खुरं चित्र काढलं होतं. ती सुंदर होती आणि हुशारपण होती. त्याचबरोबर आणखी एक गोष्टही सांगतो – मी ठामपणे सांगू शकतो, की अनेक महिला आपलं जीवन मार्गारीटा निकोलायेव्नाच्या जीवनाशी बदलण्यासाठी काहीही द्यायला तयार झाल्या असत्या. अपत्य नसलेली तीस वर्षांची मार्गारीटा एका प्रख्यात विशेषज्ञाची बायको होती, ज्याने शासनासाठी एक खूपंच महत्वपूर्ण शोध लावला होता. तिचा नवरा तरुण, सुंदर, सहृदय, प्रामाणिक होता आणि आपल्या बायकोचा सम्मान करायचा. मार्गारीटा निकोलायेव्ना आपल्या नव-याबरोबर अर्बातच्या जवळ एका गल्लीत एका मोठ्या आलीशान घरांत राहायची. घराच्या चारीकडे सुरेख बाग होती. मन मोहून घेणारी जागा! जो पण इथे येईल तो हेच म्हणेल. ज्याला जायचं असेल, त्याने माझ्याकडे यावं, मी त्याला पत्ता सांगेन, वाट दाखवेन – ते घर अजूनही शाबूत आहे.

मार्गारीटा निकोलायेव्नाला पैशांची गरंज नव्हती. मार्गारीटा निकोलायेव्ना वाट्टेल ते विकंत घेऊं शकंत होती. तिच्या नव-याच्या परिचितांमधे मजेदार लोक होते. मार्गारीटा निकोलायेव्नाने कधीच स्टोव्हला हातसुद्धां लावला नव्हता. मार्गारीटा निकोलायेव्नाला कम्युनिटी फ्लैटमधे राह्ण्याचे धोके माहीत नव्हते. थोडक्यांत...ती सुखी होती कां? एका क्षणासाठीही नाही! तेव्हांपासून, जेव्हां एकोणीस वर्षाच्या वयांत तिचं लग्न झालं आणि ती ह्या घरांत आली, सुख म्हणजे काय असतं, हे तिला कळलंच नाही. अरे देवा! ह्या बाईला काय पाहिजे होतं?! पाहिजे काय होतं ह्या सुन्दरीला जिच्या डोळ्यांमधे सदा एक अनाकलनीय चमक असायची? ह्या भुवनमोहिनीची काय इच्छा होती, जी तिरप्या नेत्र कटाक्षाने घायाळ करायची आणि वसंत ऋतूंत लाजाळूच्या फुलांनी स्वतःला सजवायची? कळंत नाही. मला माहीत नाही. स्पष्ट होतं, तिने खरंच सांगितलं होतं. तिला पाहिजे होता तो – मास्टर, भव्य प्राचीन महाल नाही, स्वतंत्र बगीचा नाही, पैसे पण नाही. ती त्याच्यावर प्रेम करंत होती, तिने खरंच सांगितलं होतं.

मला, खरं सांगणा-या कथाकाराला, परक्या माणसालासुद्धां ह्या विचाराने खूप दुःख झालं, की मार्गारीटाने काय भोगलं असेल, जेव्हां दुस-या दिवशी ती मास्टरच्या घरी आली (सुदैवाने तिचं आपल्या नव-याशी बोलणं नव्हतं झालं, कारण की तो ठरलेल्या वेळेवर घरी परतला नव्हता), काय-काय सहन केलं असेल तिने, हे माहीत झाल्यावर, की मास्टर गायब झालांय.               

तिने त्याच्याबद्दल माहिती मिळविण्यासाठी सगळं केलं, पण तिला काहीच कळलं नाही. तेव्हां ती परंत आपल्या आलीशान घरांत परंत आली आणि पूर्वीप्रमाणे तिथेच राहू लागली.

“हो, हो, हो, तीच चूक!” मार्गारीटाने हिवाळ्यांत शेकोटीजवळ बसून ज्वाळांकडे बघंत म्हटलं, “त्या रात्री मी त्याच्याकडून परतंच कां आले? कां? हा तर मूर्खपणा आहे! मी वचन दिल्याप्रमाणे दुस-या दिवशी गेले होते, पण तोपर्यंत उशीर झाला होता. मी दुर्दैवी लेवी मैथ्यूसारखीच परंत आले, खूप उशीरा!
ह्या सगळ्या शब्दांना काही अर्थ नव्हता, कारण की जर ती खरंच त्या रात्री मास्टरकडे थांबलीही असती, तर काय बदललं असतं! ती काय त्याला वाचवूं शकली असती? आम्ही म्हटलं असतं, मूर्खपणा आहे! पण आम्ही त्या निराश बाईसमोर असं नाही म्हणणार.
ह्या दुःखांत मार्गारीटाने सम्पूर्ण हिवाळा घालवला आणि वसन्त ऋतु आला. त्याच दिवशी, शुक्रवारी, जेव्हां विचित्र प्रकारचा गोंधळ चालला होता, ज्याच्यामागे मॉस्कोत आलेल्या काळ्या जादूच्या जादुगाराचा हात होता; जेव्हां बेर्लिओज़च्या मामाला कीएवला परंत पाठवलेलं होतं, जेव्हां अकाउन्टेन्टला पकडलं होतं आणि कित्येक वेड्या-वाकड्या, अनाकलनीय घटना घडल्या होत्या, मार्गारीटा दुपारच्या सुमारास आपल्या शयन-कक्षांत उठली, जे तिच्या आलीशान घराच्या बुरूज असलेल्या भागांत होतं.
उठल्यावर मार्गारीटा रडली नाही, जसं बहुधा व्हायचं; कारण की ती ह्या पूर्वाभासाने जागी झाली होती, की आज काही न काही नक्की होणारेय. ह्या पूर्वाभासाला, हरवूं न देण्यासाठी, ती त्याला हृदयांत सांभाळंत गोंजारंत राहिली, दृढ करंत राहिली.
मला विश्वास आहे,” मार्गारीटा उत्साहाने कुजबुजली, “मला पूर्ण विश्वास आहे! काही न काही जरूर होईल! असं होऊंच नाही शकंत की काहीच नाही होणार, नाही तर मला इतकं दुःख कां झेलावं लागलं असतं? मला मान्य आहे की मी खोटं बोलंत होते, धोका देत होते आणि लोकांपासून लपून एक रहस्यमय जीवन जगंत होते, पण मला इतकी कठोर शिक्षां तर व्हायला नको...काही न काही तर ज़रूर होणारेय, कारण की असं असूच शकंत नाही, की एखादी गोष्ट निरंतर होतंच राहावी. शिवाय, माझं स्वप्न खरं होतं, मी ठामपणे सांगू शकते...
उन्हांत चमकणा-या लाल पडद्यांकडे बघंत, उतावीळपणे कपडे बदलताना आणि तीन आरशांच्या ड्रेसिंग टेबलासमोर आपले छोटे-छोटे कुरळे केस विंचरंत मार्गारीटा स्वतःशीच बोलंत होती.
त्या रात्री मार्गारीटाने पाहिलेलं स्वप्न अद्भुत होतं. गोष्ट अशी होती, की आपल्या दुःखाने ओथंबलेल्या हिवाळ्याच्या दिवसांत तिने कधीच मास्टरला स्वप्नांत पाहिलं नव्हतं. रात्री तो तिला सोडून द्यायचा आणि ती फक्त दिवसांच दुःखी व्हायची. आणि आतां तो स्वप्नांत सुद्धा आला.
मार्गारीटाने स्वप्नांत एक अनोळखी जागा पाहिली -  उदास, भयाण, आरंभिक वसंत ऋतूच्या ढगाळ आकाशाखाली. तिने बघितलं ते तुकड्यांच, उडतं आकाश आणि त्याच्या खाली चिमण्यांचा मौन थवा. एक ओबंड-धोबंड पुल, ज्याच्या खाली लहानशी मातकंट वसंती नदी; उदास, दयनीय, अर्धनग्न झाडं; एकुलतं एक मैपलचं झाड – झाडांच्या मधे, कोणच्यातरी फेन्सिंगच्या मागे, लाकडाचं घर, कदाचित – स्वयंपाकघर होतं, किंवा स्नानगृह, सैतानंच जाणे काय होतं ते! आजूबाजूला सगळं मरगळलेलं, निर्जीवसं इतकं उदास की पुलाच्या जवळच्या त्या मैपलच्या झाडाला लटकून जावसं वाटावं. ना तर वा-याची सळसळ, ना ढगाची सरसर, ना ही जीवनाचं एखादं चिन्ह. ही तर नरकासारखी जागा आहे जिवन्त माणसासाठी!
आणि विचार करा, त्या लाकडी घराचं दार उघडतं आणि त्यांतून निघाला – तो. बरांच दूर आहे, पण तोच होता. स्पष्ट दिसंत होता. कपडे इतके फाटलेले होते, की कळंत नव्हतं की त्याने काय घातलंय. केस विस्कटलेले, दाढी वाढलेली. डोळे आजा-यासारखे, उत्तेजित. हाताच्या खुणेने तिला बोलावंत होता. त्या निर्जीव वा-यांत तडफडणारी मार्गारीटा उंचसखल रस्त्यावर त्याच्याकडे धावली, आणि तेवढ्यांत तिची झोप उघडली.
“ह्या स्वप्नाचा दोन पैकी एकंच अर्थ असू शकतो,” मार्गारीटा निकोलायेव्ना स्वतःशीच तर्क करंत होती. “जर तो मेलेला आहे, आणि मला बोलवतोय, तर ह्याचा अर्थ असा झाला की तो माझ्यासाठी आलांय आणि मी लवकरंच मरणारेय. हे फार चांगलं होईल, कारण की तेव्हां माझ्या वेदनेचा अंत होऊन जाईल. जर तो जिवन्त आहे, तर ह्या स्वप्नाचा फक्त एकंच अर्थ आहे, तो मला स्वतःची आठवंण करून देतोय. त्याला म्हणायचंय की आम्ही पुन्हां भेटूं. हो, आम्ही भेटूच, फार लवकर.”
ह्याच उद्विग्न अवस्थेत मार्गारीटाने कपडे बदलले आणि स्वतःला विश्वास देत राहिली की सगळं ठीक-ठाक होणारेय. आणि अशा संधीचा फायदा घेतला पाहिजे. नवरा पूर्ण तीन दिवसांसाठी दौ-यावर गेलांय. हे तीन दिवस तिचे स्वतःचे आहेत, कोणीही तिला कशाहीबद्दल विचार करण्यापासून थांबवू शकणार नाही, त्याच्याबद्दल जो तिला आवडतो. वरच्या मजल्यावरच्या ह्या पाच खोल्या, हे पूर्ण घर, ज्याच्याबद्दल मॉस्कोच्या लाखों लोकांना ईर्ष्या वाटते, तिच्या पूर्ण ताब्यांत आहेत.
पण तीन दिवसांचे स्वातंत्र्य मिळाल्यावर मार्गारीटाने ह्या आलीशान फ्लैटमधली सर्वांत चांगली जागा नाही निवडली. चहा पिऊन झाल्यावर ती एका अंधा-या, खिडक्या नसलेल्या खोलींत गेली, जिथे सूटकेसेस आणि दोन मोट्ठ्या अलमा-यांमधे जुनं, रद्दी सामान ठेवलेलं होतं. उकिडवे बसून तिने पहिल्या अलमारीचा खालचा खण उघडला. रेशमी चिंध्यांच्या ढिगा-यातून तिने आपल्या जीवनातली एकुलती एक मौल्यवान वस्तू बाहेर काढली. मार्गारीटाच्या हातांत तपकिरी चामड्याचा एक जुना अल्बम होता, ज्यांत मास्टरचा फोटो होता, बैंकेचं पासबुक होतं, ज्यांत त्याच्या नावावर दहा हजार जमा होते; सिगरेटच्या चमचमीत कागदांत ठेवलेल्या वाळलेल्या गुलाबाच्या पाकळ्या होत्या, आणि टाइप केलेला मजकूर असलेल्या एका मोठ्या आकाराच्या रजिस्टरचा काही भाग, ज्याचा खालचा भाग जळून गेला होता.
ह्या खजिन्यासह आपल्या शयनगृहांत आल्यावर मार्गारीटा निकोलायेव्नाने तीन आरशांच्या ड्रेसिंग टेबलावर फोटो ठेवला आणी आपल्या गुडघ्यांवर अर्धवंट जळालेलं रजिस्टर ठेवून जवळ-जवळ तासभर बसून राहिली. ती रजिस्टरची पानं उलटंत होती आणि आगीतून शाबूत राहिलेला, आदी आणि अंत नसलेला मजकूर वाचंत होती: “...भूमध्य सागरांतून आलेल्या अंधाराने न्यायाधीशाच्या घृणेचे पात्र असलेल्या त्या शहराला वेढून टाकलं. मंदिराला भयानक अन्तोनियो बुरुजाशी2 जोडणारे लटकते-पुल लुप्त झाले, आकाशातून एका अथांगतेने येऊन अश्व-शर्यतीच्या मैदानावर स्थित पंखवाल्या देवतांच्या मूर्ती, तोपांसाठी बनवलेल्या भोकांसहित हसमनचा प्रासाद3बाजार, काफिले, सराय, गल्ल्या आणि तलाव...सगळ्यांना झाकून टाकलं. महान शहर येर्शलाइम हरवलं, जणू त्याचं कधी अस्तित्वंच नव्हतं....”
मार्गारीटाला पुढे वाचायचं होतं, पण पुढे, फक्त वाकड्या-तिकड्या काळ्या रेघांशिवाय काही नव्हतंच.
आपले अश्रू पुसंत मार्गारीटा निकोलायेव्नाने रजिस्टर ठेवून दिलं, ड्रेसिंग टेबलवर दोन्हीं कोपरं ठेवून, मास्टरच्या फोटोवरून नजर न काढतां, बरांच वेळ आरश्यांत प्रतिबिंबित होत राहिली. शेवटी अश्रू वाळले. मार्गारीटाने आपल्या खजिन्याला व्यवस्थितपणे सांभाळून ठेवलं. आणि काही मिनिटांनेच तो पुन्हां रेशमी चिंध्यांच्या आंत, अंधा-या खोलीच्या अलमारींत परंत गेला, आणि अंधा-या खोलीच कुलूप खट्कन बंद झालं.
मार्गारीटा निकोलायेव्नाने हिंडायला जाण्यासाठी प्रवेश कक्षांत येऊन कोट घातला. तिची सुंदर मोलकरीण नताशा विचारूं लागली की जेवणासाठी काय बनवायचे आणि काहीही कर’, असं उत्तर ऐकून, ती विरंगुळ्यासाठी मालकिणीसोबत गोष्टी करूं लागली. ती काही-बाही सांगंत होती, तिने असंपण सांगितलं की काल थियेटरमधे एका जादुगाराने असा जादू  दाखवला, की सगळे दंगंच झाले; त्याने सगळ्यांना परदेशी अत्तराच्या दोन-दोन कुप्प्या दिल्या आणि स्टॉकिंग्ज़सुद्धां फुकटांत दिल्या; आणि मग, जसांच तो शोसंपला आणि प्रेक्षक बाहेर निघाले, सगळं – फट् – सगळे जणं अगदी नंगे दिसायला लागले! मार्गारीटा निकोलायेव्ना प्रवेश कक्षांत आरश्यासमोर लोळूं लागली आणि पोट धरून हसंत राहिली.
“नताशा! तुला लाज नाही वाटंत?” मार्गारीटा निकोलायेव्नाने म्हटलं, “तू तर चांगली शिकलेली, समजदार मुलगी आहेस; लोक क्यूमधे उभ्या-उभ्या काही-बाही बोलंत असतांत आणि तू सुद्धां तेच बडबडते!”
नताशाचा चेहरा लाल झाला, तिने तावातावाने म्हटलं की कोणी खोटं नाही बोलंत आहे आणि आज तिने स्वतःसुद्धां अर्बातच्या डिपार्टमेन्टल स्टोअरमधे एका बाईला पाहिलं, जी स्टोअरमधे जोडे घालून आली होती आणि जशींच ती पैसे देऊं लागली, तिच्या पायांतले जोडे गायब झाले आणि ती फक्त स्टॉकिंग्ज़्समधेंच राहिली. तिचे डोळे विस्फारले! टाचेवर एक भोक होतं! आणि हे जोडेपण तिने त्याच शोमधे घेतले होते.”
“तशीच गेली?”
“तशीच गेली!” नताशा ओरडली आणि असं वाटून की मालकिणीला अजूनही विश्वास नाहीये, ती आणखीनंच लाल झाली, “हो, मार्गारीटा निकोलायेव्ना, काल रात्री पोलिसवाल्यांनी शंभर माणसांना पकडून नेलं. हा शोपाहून निघालेल्या बायका फक्त अंतर्वस्त्रांत त्वेर्स्काया रस्त्यावर धावंत होत्या!”
“हो, हे तर दार्याने सांगितलंय,” मार्गारीटा निकोलायेव्ना म्हणाली. “मी ब-याच दिवसांपासून बघतेय, की ती एक नंबरची खोटारडी आहे.”
हा गंमतशीर वार्तालाप नताशासाठी आश्चर्याने संपला. मार्गारीटा निकोलायेव्ना आपल्या शयन कक्षांत गेली आणि तिथून एक जोडी स्टॉकिंग्ज़ आणि यूडीकलोनची कुपी घेऊन परतली. नताशाला हे सांगून की तिलासुद्धां जादू दाखवायचांय, तिने दोन्हीं वस्तू तिला भेट देत म्हटलं की ती फक्त तिला हीच विनंती करतेय की फक्त स्टॉकिंग्ज़ घालून त्वेर्स्कायावर धावूं नको आणि दार्यावर विश्वास नको ठेवूं. एकमेकींचा मुका घेऊन मोलकरीण आणि मालकीण आपापल्या मार्गाला लागल्या.
ट्रॉलीबसच्या आरामशीर नरम सीटवर टेकून बसलेली मार्गारीटा निकोलायेव्ना अर्बातला जांत होती. कधी ती स्वतःच्या विचारांत हरवून जायची, तर कधी आपल्या समोर बसलेल्या दोन नागरिकांची कुजबूज ऐकायची.
आणि ते, ह्या भीतीने मधून मधून मान वळवून इकडे-तिकडे बघंत, की त्यांचं बोलणं कुणी ऐकंत तर नाहीये, कोणच्यातरी विचित्र घटनेबद्दल कुजबुजंत होते. गलेलट्ठ, डुकरासारखे मोठे मोठे डोळे असलेला, जो खिडकीच्या जवंळ बसला होता, अगदी हळू आवाजांत बोलंत होता. तो आपल्या बारक्या सहप्रवाश्याला सांगंत होता, की ताबूत काळ्या कपड्याने झाकावं लागलं...
“अशक्य,” सन्न झालेला बारका कुजबुजला, “असं तर कधीच ऐकलं नाही...मग झेल्दीबिनने काय केलं?”
ट्रॉलीबसच्या  एकसारख्या घरघराटांत खिडकीच्या जवळून काही शब्द ऐकूं आले:
“छापा...तपास...स्कैण्डल, बस, गूढ!”
ह्या असंबद्ध तुकड्यांना व्यवस्थित जोडून मार्गारीटा निकोलायेव्नाला समजलं की कुण्या मृत व्यक्तीचं – कोणाचं – त्यांनी नाव नव्हतं घेतलं, आज सकाळी ताबूतमधून डोकं चोरीला गेलंय. म्हणूनंच झेल्दीबिन इतका उद्विग्न आहे. ह्या लोकांचापण, जे ट्रॉलीबसमधे कुजबुजंत होते, बिनडोक्याच्या मृतकाशी काहीतरी संबंध आहे.
“फुलं विकंत घेता येतील कां?” बारक्याने काळजीने विचारलं, “तू म्हणतोय की अंतिम संस्कार दोन वाजता आहे?”
शेवटी मार्गारीटा निकोलायेव्ना त्यांचं बोलणं ऐकून कंटाळली. ही गूढ कुजबुज, ताबूताच्या आतून डोकं चोरी गेल्याची, तिला बेचैन करूं लागली, आणि हे बघून की आता तिला ट्रॉलीबसमधून उतरायचंय, तिला आनंद झाला.
काही मिनिटांनी मार्गारीटा निकोलायेव्ना क्रेमलिन-वॉलच्या खाली एका बेंचवर अश्या प्रकारे बसली होती, की तिला मानेझ4 हॉल दिसंत होता.
मार्गारीटाने चमकत्या सूर्याकडे डोळे बारीक करून पाहिलं, आजच्या आपल्या स्वप्नाची आठवण केली. तिला हेसुद्धां आठवलं की बरोब्बर वर्षभरापूर्वी आजच्याच दिवशी, ह्याच वेळेस, ह्याच बेंचवर ती त्याच्याबरोबर बसलेली होती आणि तिची काळी पर्स अगदी अशीच, तिच्या बाजूला पडलेली होती. आज तो तिच्याजवळ नव्हता, पण मार्गारीटा निकोलायेव्ना आपल्या विचारांत फक्त त्याच्याशीच बोलंत होती: “जर तुला निर्वासित केलं आहे, तर स्वतःबद्दल काही कळवंत कां नाहीयेस? लोकं आपल्या ठाव-ठिकाणा सांगतातंच की. आता तुझे माझ्यावर प्रेम नाहीये कां? नाहीं, न जाणे कां, ह्या गोष्टीवर माझा विश्वास नाही बसंत; म्हणजे, तुला निर्वासित केलं, आणि  तू मरून गेलास...तर, प्लीज़, मला सोडून दे, मला जगण्याचं स्वातंत्र्य दे, मोकळ्या वा-यांत श्वास घेऊं दे.” मार्गारीटा निकोलायेव्नाने स्वतःच त्याच्याकडून उत्तर दिलं, “तू स्वतंत्र आहेस...मी काय तुला पकडून बसलोय?” मग तिनेंच विरोध देखील केला, “नाहीं, हे कसलं  उत्तर आहे! नाही, तू माझ्या विचारांतूनसुद्धां दूर निघून जा, तेव्हां मी मुक्त होईन.”      
लोक मार्गारीटा निकोलायेव्नाच्या जवळून जात होते. एका पुरुषाने छान कपडे घातलेल्या, सुन्दर आणि एकट्या बाईकडे डोळ्याच्या कोप-यांतून बघितलं आणि तो किंचित खोकून त्याच बेंचच्या टोकाला बसला ज्याच्यावर मार्गारीटा निकोलायेव्ना बसली होती. धाडंस करून तो बोलूं लागला:
आज हवामान फारंच सुरेख आहे...”
पण मार्गारीटा निकोलायेव्नाने त्याच्याकडे इतक्या दुःखाने बघितलं, की तो उठून चालला गेला.
“हा होता, नमूना,’ मनांतल्या मनांत मार्गारीटाने त्याला सांगितलं, ज्याने तिचं सर्वस्व व्यापून टाकलं होतं, “मी ह्या माणसाला कां पिटाळून लावलं? मला कंटाळवाणं वाटंतय आणी ह्या प्रेमवीरामधे काहीही वेडं-बेंद्रं नव्हतं, फक्त तो फारंचशब्द किती मूर्खासारखा होता? मी इथे, ह्या भिंतीखाली एकटी, घुबडासारखी कां बसलेय? मी जीवनांतून बाहेर कां फेकले गेलेय?”
ती अगदी पार दुःखांत बुडून गेली आणि आपली शुद्धं हरपूं लागली. पण तेवढ्यांत अचानक तीच, सकाळची आशेची आणि उत्तेजनेची लाट तिच्या छातींत उसळ्या मारूं लागली. “हो, काही ना काही नक्कीच होणारेय!” त्याच लाटेने तिला दुस-यांदा धक्का दिला आणि तिला कळलं की ह्या लाटेत आवाज आहे. शहराच्या कल्लोळांत जवळ येत असलेल्या बैण्ड आणि तुता-यांचे आवाज ऐकूं आले.
सर्वांत पुढे दिसला बगीचाच्या जाळीजवळून जात असलेला अश्वारोही सैनिक, त्याच्या मागे तीन पायदळ सैनिक. मग हळू-हळू पुढे सरकणारा ट्रक, वादकांसह. मग हळू-हळू चालणारी उघडी, नवीन शव-गाडी, त्यांत पुष्पचक्रांनी झाकलेलं ताबूत, आणि चारी कोप-यांवर – चार उभी माणसं: तीन पुरुष, एक बाई. दुरूनसुद्धां मार्गारीटाला दिसलं, की ह्या अंत्य-संस्कार गाडींत उभ्या असलेल्या, मृतकाच्या अंत्ययात्रेबरोबर जाणा-या माणसांचे चेहरे अगदी विक्षिप्तासारखे दिसंत होते. मागच्या डाव्या कोप-यावर उभ्या असलेल्या बाईच्या चेह-यावर तर ही विक्षिप्तपणाची भावना अगदी स्पष्ट दिसंत होती. ह्या महिलेच्या गोब-या गालांना जणु आंतमधून काहीतरी रहस्य फुगवंत होतं आणि तिच्या भिरभिरणा-या डोळ्यांत द्वयर्थी ठिणग्या होत्या. असं वाटंत होतं, की आत्तां, इतक्यांतंच ही बाई मृतकाकडे बघून डोळा मारंत म्हणेल: “असं कधी बघितलंय कां? गूढ!” गाडीच्या मागे-मागे, हळू-हळू पायी चालणा-या जवळ-जवळ तीनशे लोकांचे चेहरेपण अश्याच विभ्रमांत दिसंत होते.        
मार्गारीटाने डोळ्यांनीच ह्या मिरवणुकीला निरोप दिला आणि दूर जात असलेल्या उदास तुर्की बैण्डचा आवाज ऐकंत, जो सारखा बूम्स, बूम्सकरंत होता, विचार करूं लागली : कित्ती विचित्र शवयात्रा आहे...आणि कित्ती पीडा आहे ह्या बूम्समधे! आह, खरंच, मी सैतानाकडे आपली आत्मासुद्धां  गहाण ठेवली असती, फक्त हे जाणून घेण्यासाठी की तो जिवन्त आहे किंवा नाही. आणि हो, हे माहीत करायला चांगलंच वाटेल की ह्या, असल्या विक्षिप्त चेह-यांनी कुणाला दफन करताहेत?’
“मिखाइल अलेक्सान्द्रोविच बेर्लिओज़ला,” तिच्याजवळंच एक अनुनासिक पुरुषी आवाज ऐकूं आला, “मॉसोलितच्या प्रेसिडेन्टला”
विस्मित मार्गारीटा वळली आणि तिने आपल्या बेंचवर एका नागरिकाला पाहिले, जो नक्कीच चुपचाप येऊन तिथे बसून गेला होता, जेव्हां मार्गारीटा शव-यात्रा बघण्यांत गुंग होती, कदाचित शेवटचा प्रश्न तिने आपल्या विसरभोळेपणामुळे मोठ्याने विचारला होता.
तोपर्यन्त शवयात्रा अधून-मधून थांबंत-थांबंत चालली होती, कदाचित सिग्नल्समुळे असेल.
“हो,” अनोळखी नागरिक पुढे म्हणाला, “त्यांची मानसिक अवस्था खूप विचित्र आहे. मृतकाला घेऊन तर जात आहेत, पण विचार करताहेत की त्याचं डोकं गेलं कुठे!”
“कसलं डोकं?” मार्गारीटाने ह्या अकस्मात् टपकलेल्या व्यक्तीकडे बघंत विचारलं...हा माणूस कमी उंचीचा, लाल केस असलेला होता, त्याचा एक दात बाहेर निघालेला होता; त्याने कलफ़ केलेला शर्ट, रेघा-रेघांचा छानसा सूट आणि चकचकीत चामड्याचे जोडे घातले होते. डोक्यावर कडक हैट होती. टाय भडक रंगाचा होता. आश्चर्याची गोष्ट ही होती, की ह्या नागरिकाच्या खिशांतून, जिथे साधारणपणे पुरुष रुमाल किंवा पेन ठेवतात, कोंबडीचं कुरतडलेलं हाड डोकावंत होतं.
“हो, असं आहे बघा,” लाल केसवाल्याने समजावले, “आज सकाळी ग्रिबोयेदोव हॉलमधे मृतकाचं डोकं ताबूतमधून पळवलंय.”
“असं कसं शक्य आहे?” मार्गारीटाने इच्छा नसतानासुद्धां विचारलं, तेव्हांच तिला ट्रॉलीबसमधे होत असलेली कुजबुज आठवली.
“सैतानंच जाणे कसं केलं!” लाल केसवाल्याने ऐसपैस उत्तर दिलं, “मला वाटतं की बेगेमोतला ह्याबद्दल विचारायला हवं. मोठ्या खुबीने पळवलंय. कित्ती मोट्ठं स्कैण्डल झालं! आणि मुख्य म्हणजे, हे कळलंच नाही, की कुणाला आणि कशासाठी पाहिजे होतं ते डोकं?”
मार्गारीटा निकोलायेव्ना स्वतःच्याच भानगडींत कितीही मग्न असली, तरीसुद्धां ती ह्या अनोळखी नागरिकाच्या बडबडीने एकदम दचकली.
“माफ़ करा!” अचानक ती उद्गारली, “कोणच्या बेर्लिओज़चं? हा तोच तर नाही. ज्याच्याबद्दल आज पेपरमधे...”
“तोच, तोच...”
“म्हणजे, हे सगळे साहित्यकार आहेत, जे ताबूताच्या मागे-मागे जात आहेत?” मार्गारीटाने विचारलं आणि तिने दात-ओठ खाल्ले.
“निश्चितंच, तेच आहेत!”
“आणि तुम्हीं त्यांना ओळखतां?”
“प्रत्येकाला,” लाल केसवाल्याने उत्तर दिलं.
“मला सांगा,” मार्गारीटाने गूढ आवाजांत विचारलं, “त्यांच्यांत समालोचक लातून्स्की आहे कां?”
“कसा नसणार?” लाल केसवाल्याने उत्तर दिलं, “तो बघा, चौथ्या ओळींत, कोप-यावर.”
“तो, भु-या केसांचा?” डोळे बारीक करंत मार्गारीटाने विचारलं.
“राखाडी रंगाच्या...बघा, त्याने डोळे आकाशाकडे उंचावलेय.”
“धर्मगुरूसारखा?”
“हो – हो!”
पुढे मार्गारीटाने काहीही विचारलं नाही, फक्त लातून्स्कीकडे बघंत राहिली.
“तुम्हीं, कदाचित,” स्मित करंत लाल केसवाल्याने म्हटलं, “ह्या लातून्स्कीचा द्वेष करतां?”
“मी आणखी कुणाचापण द्वेष करते,” दात खात मार्गारीटा म्हणाली, “पण हे सगळं सांगण्यांत मला काहीही रस नाही.”
येवढ्यांत शवयात्रा पुढे चालू लागली होती, पायी चालणा-या माणसांच्या मागे अनेक मोटर गाड्या होत्या.
“हो, ह्यांत रस घेण्यासारखं आहे तरी काय, मार्गारीटा निकोलायेव्ना!”
मार्गारीटा दचकली, “तुम्हीं मला ओळखतां?”
उत्तर देण्याऐवजी लाल केसवाल्याने हैट काढून अभिवादन केलं.
एकदम दरोडेखोरासारखा चेहरा आहे!मार्गारीटाने ह्या अचानक भेटलेल्या माणसाकडे बघंत विचार केला.
“पण मी तुम्हांला नाही ओळखंत,” मार्गारीटाने रुक्षपणे म्हटलं.
“तुम्हीं मला कश्या ओळखालं! पण मला तुमच्याकडे कामानिमित्त पाठवलंय.”
मार्गारीटाचा चेहरा पडला, ती एकदम मागे झाली.
“हे तुम्हीं आधीच सांगू शकंत होता,” ती म्हणाली, “पण तुम्हीं नाही नाही ती बडबंड करंत राहिले, कापून नेलेल्या डोक्याबद्दल! तुम्हीं मला अटक करणार आहांत कां?”
“तसं काही नाही,” लाल केसवाला उद्गारला, “ही काय पद्धत आहे : जर कुणी तुमच्याशी बोलूं लागलं, तर तो अटकंच करेल! तुमच्याशी फक्त काम आहे.”
“काही समजंत नाहीये, काय काम आहे?”
लाल केसवाल्याने इकडे-तिकडे बघंत गूढ आवाजांत म्हटलं, “आज संध्याकाळी तुम्हांला आमंत्रण देण्यासाठी मला पाठवलंय.”
“काय बरळतांय, कसलं आमंत्रण?”
“एका सम्माननीय परदेशी माणसाकडे,” लाल केसवाल्याने अर्थपूर्ण स्वरांत डोळे बारीक करंत म्हटलं.
मार्गारीटाला खूप राग आला.
“एका नवीनंच प्रकारचे लोक आले आहेत: रस्त्यावरचे दलाल,” तिने उठतां-उठतां म्हटलं.
“ह्या विशेषणासाठी धन्यवाद!” लाल केसवाला वाईट वाटून म्हणाला आणि मार्गारीटाला पाठीमागून शिवी देत म्हणाला, “मूर्ख!”
“नालायक!” तिने वळून उत्तर दिलं पण तेवढ्यांत आपल्या मागे लाल केसवाल्याचा आवाज ऐकला: 
 “...भूमध्य सागरांतून आलेल्या अंधाराने न्यायाधीशाच्या घृणेचे पात्र असलेल्या त्या शहराला वेढून टाकलं. मंदिराला भयानक अन्तोनियो बुरुजाशी जोडणारे लटकते-पुल लुप्त झाले, आकाशातून एका अथांगतेने येऊन अश्व-शर्यतीच्या मैदानावर स्थित पंखवाल्या देवतांच्या मूर्ती, तोपांसाठी बनवलेल्या भोकांसहित हसमनचा प्रासादबाजार, काफिले, सराय, गल्ल्या आणि तलाव...सगळ्यांना झाकून टाकलं. महान शहर येर्शलाइम हरवलं, जणू त्याचं कधी अस्तित्वंच नव्हतं....” अशीच तूं पण लुप्त होशील आपल्या जळक्या पुस्तकासह आणि वाळलेल्या गुलाबांसह! इथे बेंचवर एकटी बसून राहा आणि त्याची विनवणी करंत बस, की त्याने तुला मुक्त करावं, मोकळ्या वा-यांत श्वास घेऊं द्यावा, तुझ्या विचारांतून दूर होऊन जावे!”
पांढ-याफटक चेह-याने मार्गारीटा परंत बेंचकडे वळली. लाल केस वाल्याने डोळे बारीक करंत तिच्याकडे बघितलं.
“मला काही कळतंच नाहीये,” मार्गारीटा निकोलायेव्ना हळूंच म्हणाली, “ठीक आहे, कादम्बरीबद्दल तर तुम्हीं माहिती काढूं शकता...डोकावून, चुपचाप वाचून...नताशा फितूर झालीये? हो? पण माझ्या विचारांबद्दल तुम्हांला कसं कळलं?” वेदनेने कपाळ्यावर आठ्या आणंत ती पुढे म्हणाली, “मला सांगा, तुम्हीं आहांत तरी कोण? कोणत्या ऑफ़िसमधे काम करतां?”
“काय कटकट आहे.,” लाल केसवाला कुजबुजला आणि मोठ्याने म्हणाला, “माफ करा, मी तुम्हांला आधीच सांगितलंय, की मी कोणत्याही ऑफिसमधून नाही आलो! बसून जा!”
मार्गरीटाने चुपचाप त्याचं म्हणणं ऐकलं, पण बसतां-बसतां पुन्हां विचारलं, “तुम्हीं कोण आहांत?”
“ठीकाय, माझं नाव आहे अजाजेलो, पण ह्याने तुम्हांला काहीही कळणार नाही.”
“तुम्हीं मला सांगणार नाही का, की कादम्बरीबद्दल आणि माझ्या मनांतल्या विचारांबद्दल तुम्हांला कसं कळलं?”
“नाही सांगणार,” अजाजेलोने रुक्षतेने उत्तर दिलं.
“पण तुम्हांला त्याच्याबद्दल थोडं फार तरी माहीत आहे ना?” त्याची विनवणी करंत मार्गारीटा कुजबुजली.
“हो, चला, समजा, माहीत आहे.”
“मी विनंती करते: फक्त येवढं सांगा, की तो जिवंत आहे कां? मला छळूं नका!”
“हो, जिवंत आहे, जिवंत आहे,” अगदी मनांत नसल्यासारखा अजाजेलो म्हणाला.
“अरे देवा!!”
“कृपा करून रडणं-ओरडणं न करतां बोलूं या,” नाक वर चढवून अजाजेलो म्हणाला.
“ओह, माफ़ करा, माफ़ करा,” आता आज्ञाकारी आणि नम्र झालेली मार्गारीटा म्हणाली, “मी उगीचंच तुमच्यावर रागावले. पण हे तर तुम्हींसुद्धां स्वीकार कराल, की असं रस्त्यातंच एखाद्या बाईला आमंत्रित केलं तर...माझे काही पूर्वाग्रह नाहीत, पण विश्वास करा...” मार्गारीटा नाखुषीने हसली, “मी कधीही कोणत्याच परदेशी माणसाला भेटंत नाही आणि त्यांच्याशी बोलायचीसुद्धां माझी इच्छा नाहीये...आणि शिवाय, माझा नवरा... माझी कहाणी अशी आहे, की मी ज्याच्याबरोबर राहतेय, त्याच्यावर प्रेम करंत नाही. मला त्याच्याकडून फक्त चांगुलपणा आणि सहृदयतांच मिळालीये...”
ही असंबद्ध बडबड ऐकून अजाजेलो कंटाळलेल्या स्वरांत म्हणाला, “कृपा करून एक मिनिट चुप राहा.”
मार्गारीटा लहान मुलासारखी चूप झाली.
“मी तुम्हांला अश्या परदेशी माणसाकडे घेऊन जाणारेय, जो तुम्हांला जरासुद्धां इजा करणार नाही, आणि कोणत्याही चिटपाखरालासुद्धां ह्याबद्दल काहीच कळणार नाही. अगदी शब्द देतो.”
“त्याला माझी काय गरंज पडली?” चोरून बघंत मार्गारीटाने विचारलं.
“ते तुम्हांला नंतर कळेल.”
“कळलंय...मला स्वतःला त्याला समर्पित करावं लागेल,” विचारांत गुंतून मार्गारीटा म्हणाली.
अजाजेलो धृष्ठतेने हसला आणि म्हणाला, “जगातील कोणतीही स्त्री, मी पैजेवर सांगतो, ह्या गोष्टीचं स्वप्न बघंत असेल,” हसण्यामुळे अजाजेलोचं तोंड वाकडं झालं, “पण तुम्हांला निराश व्हावं लागेल, असं काहीही होणार नाही.”
“कसा आहे हा परदेशी!” त्रस्त होऊन मार्गारीटा इतक्या मोठ्याने उद्गारली, की येणारे-जाणारे तिच्याकडे वळून बघूं लागले, “आणि त्याच्याकडे जाण्यांत माझा काय हेतू असूं शकतो?”
अजाजेलो तिच्याकडे वाकून म्हणाला, “हेतू तर चांगलांच आहे...तुम्हीं संधीचा फायदा घेणार आहांत...”
“काय?” मार्गारीटा किंचाळली आणी तिचे डोळे गोल-गोल फिरूं लागले, “जर मी तुमच्या बोलण्याचा खरा अर्थ समजले आहे, तर तुम्हीं ह्या गोष्टीकडे इंगित करतांय की तिथे मला त्याच्याबद्दल कळेल?”
अजाजेलोने चुपचाप डोकं हलवलं.
“येईन!” मार्गारीटा पूर्ण ताकदीनिशी ओरडली आणि अजाजेलोचा हात धरून म्हणाली, “जिथे म्हणाल, तिथे येईन!”
अजाजेलोने सुटकेचा श्वास घेतला आणि बेंचच्या पाठीशी टेकून बसला, त्याने पाठीने बेंचवर लिहिलेलं नाव न्यूराझाकून टाकलं आणि उपहासाने म्हणाला, “ह्या बायका म्हणजे कटकटंच असतात!” त्याने खिशांत हात घालून पाय पसरले, “मलांच, उदाहरणार्थ, ह्या कामासाठी कां पाठवलंय! बेगेमोतसुद्धां येऊं शकंत होता, तो सगळीकडे अगदी फिट्ट बसतो...”
मार्गारीटा केविलवाणेपणाने हसंत म्हणाली, “तुम्हीं मला आपल्या उखाण्यांने आणि संमोहनाने दुःखी करणं थांबवा...मी एक दुःखी बाई आहे, आणि तुम्हीं ह्याचा फायदा उचलतांय...मी कोणच्यातरी भानगडींत अडकणार आहे, पण शप्पथ घेऊन सांगतेय, की फक्त त्याच्यासाठीच, कारण की त्याच्याबद्दल सांगून तुम्हीं मला आशेचा किरण दाखवलांय. ह्या उलंट-सुलंट गोष्टींनी तर माझं डोकंच भणभणू लागलंय...”
“नाटक नाही, नाटक नाही,” तोंड वाकडं करंत अजाजेलो म्हणाला, “माझ्या परिस्थितीचापण विचार करा. एडमिनिस्ट्रेटरला झापंड मारणं, किंवा मामाला घरांतून हाकलून लावणं, किंवा कुणावर गोळी चालवणं किंवा असली एखादी हल्की-फुल्की गंमत करणं – हे माझं वैशिष्ट्य आहे, पण प्रेम करणा-या बायकांशी बोलणं, माफ़ करा! मी अर्ध्या तासापासून तुमची मनधरणी करतोय...तर, तुम्हीं चलणार आहे?”
“चलणारेय!,” मार्गारीटा निकोलायेव्नाने संक्षिप्त उत्तर दिलं.
“तर मग कृपा करून हे घ्या,” अजाजेलोने खिशातूंन सोन्याची एक गोल डबी काढून मार्गारीटाच्या समोर करंत म्हटलं, “हो, हिला लपवून ठेवा, नाहीतर येणारे-जाणारे बघतील. तुम्हांला ह्याची गरंज पडेल, मार्गारीटा निकोलायेव्ना, मागच्या सहा महिन्यांत दुःखाने तुम्हीं खूपंच म्हाता-या दिसूं लागल्या आहांत.”
मार्गारीटा लाली-लाल झाली, पण ती काहीच बोलली नाही, आणि अजाजेलो बोलंत राहिला, “आज रात्री बरोबर साडे नऊ वाजतां, सम्पूर्णपणे विवस्त्र होऊन हे क्रीम चेह-यावर आणि पूर्ण अंगावर चोपडा. त्याच्यानंतर मनांत येईल ते करा, पण टेलिफोनपासून दूर नका जाऊं. दहा वाजतां मी फोन करून तुम्हांला सांगेन की पुढे काय करायचंय. तुम्हांला काहीही करावे लागणार नाहीये, तुम्हांला इच्छित जागेवर नेण्यांत येईल आणि तुम्हांला काहीही त्रास होणार नाही, समजलं?”
मार्गारीटा थोडावेळ चुपचाप राहिली, मग म्हणाली, “समजलं. ही वस्तू अस्सल सोन्याची आहे, वजनावरूनंच कळतंय. मला, चांगलंच समजतंय की मला विकंत घेताहेत आणि नंतर एखाद्या काळ्या धंद्यांत लावतील, ज्याची मला फार मोठी किंमत द्यावी लागणार आहे.”
“हे काय झालं?” अजाजेलो फुंकारंत म्हणाला, “तुम्हीं पुन्हां?”
“नाही, ऐका!”
“क्रीम परंत द्या!”
मार्गारीटाने ती डबी घट्ट पकडली आणि म्हणाली:
“नाहीं, थांबा!...मला माहितीये की मी काय करायला निघालेय. पण हे सगळं फक्त त्याच्यासाठीच आहे. मला जगांत आणखी कोणत्यांच वस्तूची अपेक्षा नाहीये. पण मला तुम्हांला फक्त येवढंच सांगायचंय की जर तुम्हीं मला मारून टाकलं, तर तुम्हांलाच लाज वाटेल! हो, लाजंच वाटेल! मी प्रेमासाठी जीव देते आहे!” आणि मार्गारीटामे हृदयावर हात मारंत सूर्याकडे बघितलं.
“परंत द्या!” अजाजेलो रागाने फुत्कारला, “परंत देऊन टाका, चुलींत जाऊ द्या हे सगळं! बेगेमोतलांच पाठवूं देत तुमच्याकडे.”
“ओह, नाही!” मार्गारीटा येणा-या-जाणा-यांना चकित करंत जो-याने ओरडली, “मी काहीही करायला तयार आहे. ही क्रीमची कॉमेडीदेखील करायला तयार आहे. सैतानाकडे जायलापण तयार आहे! नाही देणार!”
“ब्बा!” एकदम अजाजेलो गरजला आणि बगीच्याच्या भिंतीकडे डोळे विस्फारून बघंत त्याने एकीकडे बोट दाखवलं.
मार्गारीटाने तिकडे वळून पाहिलं, जिकडे अजाजेलोने बोट दाखवलं होतं, आणि तिथे काही विशेष न आढळल्यामुळे परंत त्याच्याकडे वळली ह्या अचानकंच फुटलेल्या “ब्बा!”चा अर्थ विचारायला, पण अर्थ सांगणारं कुणी तिथे नव्हतंच : मार्गारीटा निकोलायेव्नाचा हा गूढ मित्र गायब झाला होता. मार्गारीटा निकोलायेव्नाने पट्कन पर्समधे हात घालून बघितलं, ज्यांत तिने ह्या किंचाळीपूर्वी ती डबी लपवली होती. तिने खात्री करून घेतली, की डबी तिथेच आहे. मग आणखी काहीही विचार न करतां मार्गारीटा पट्कन अलेक्सांद्र-गार्डनच्या बाहेर धावली.


*******

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें