शनिवार, 4 नवंबर 2017

मास्टर आणि मार्गारीटा - 26



सव्वीस



अंतिम संस्कार



कदाचित ह्या संधिप्रकाशामुळेंच न्यायाधीशाचं बाह्य रूप परिवर्तित झालं. तो जणु बघतां-बघतांच म्हातारा झाला, त्याची कंबर वाकून गेली. ह्याबरोबरंच तो चिडखोर आणि उद्विग्न झाला. एकदा त्याने दृष्टी इकडे –तिकडे टाकली आणि न जाणे कां त्या रिकाम्या खुर्चीवर, जिथे त्याचा कोट पडला होता, नजर टाकून शहारला. सणाची रात्र जवळ येत होती, संध्याछायांचा आपलाच खेळ चालू होता, आणि कदाचित थकलेल्या न्यायाधीशाला आभास झाला, जणु कोणीतरी त्या खुर्चीवर बसलंय. भीत-भीत कोट झटकून न्यायाधीशाने त्याला पुन्हां तिथेच टाकून दिलं आणि बाल्कनीत धावू लागला; कधी तो हात चोळायचा, कधी टेबलाजवळ जाऊन प्याला हातांत घ्यायचा, कधी थांबून जायचा आणि विनाकारणंच फरशीच्या संगमरमराकडे बघायचा, जणु तिच्यांत लिहिलेलं काहीतरी वाचायचा प्रयत्न करतोय.
आज दिवसभरांत दुस-यांदा त्याला निराशेचा दौरा पडला होता. आपलं कानशील चोळंत, ज्यांत सकाळच्या यमयातनेची बोथंटशी, दुखरी आठवण होती, न्यायाधीश हे समजण्याचा प्रयत्न करंत होता, की ह्या निराशेचं कारण काय आहे. त्याला लवकरंच कारणही समजलं, पण तरीही तो स्वतःला धोका देत राहिला. त्याला कळलं की आजच्या दिवसांत तो एक अशी वस्तू गमावून बसलाय, जी परंत मिळवणं शक्य नाहीये आणि आता हीच चूक काही किरकोळ, निकृष्ट, विलम्बित कार्यकलापांनी काही प्रमाणांत सुधारण्याचा प्रयत्न करंत होता. न्यायाधीश स्वतःला हे समजावंत भ्रमांत ठेवंत होता, की संध्याकाळचे त्याचे हे कार्यकलाप तेवढेच महत्वपूर्ण आहे, जेवढी महत्वपूर्ण सकाळच्या मृत्युदण्डाची घोषणा होती. पण त्याला हे जमंत नव्हतं.
एका वळणावर येऊन तो झटक्याने थांबला आणि शिट्टी वाजवूं लागला. ह्या शिट्टीच्या प्रत्युत्तरांत कुत्र्याच्या भुंकण्याचा हल्का-सा आवाज आला आणि उद्यानांतून बाल्कनीत एक विशालकाय, तीक्ष्ण कानांचा आणि भु-या केसांचा कुत्रा उडी मारून आला. त्याच्या गळ्यांत सोनेरी साखळी होती.
“बांगा, बांगा,” न्यायाधीश अशक्त आवाजांत ओरडला.
कुत्रा मागच्या पंजांवर उभा राहिला आणि समोरचे पंजे त्याने आपल्या मालकाच्या खांद्यांवर ठेवले, ज्याने तो पडतां-पडतां वाचला, आणि त्याचा गाल चाटू लागला. न्यायाधीश खुर्चीवर बसला. बांगा जीभ काढून, जोर-जोराने धापा टाकंत आपल्या मालकाच्या पायांजवळ लोळला. कुत्र्याच्या डोळ्यांतील चमक हे प्रदर्शित करंत होती, की वादळ, जगांत फक्त ज्यानेच तो निडर कुत्रा भीत होता, आतां संपलंय; आणि हे सुद्धां की तो पुन्हां येथे आहे, त्या माणसाच्या सान्निध्यांत आहे, ज्याच्यावर त्याचे अगाध प्रेम आहे. तो न केवळ ह्या माणसावर प्रेम करायचा, अपितु त्याचा सम्मान देखील करायचा, त्याला जगांतील सर्वाधिक शक्तिशाली व्यक्ति, सर्वांचा शासक समजायचा, ज्यामुळे तो स्वतःलासुद्धां विशिष्ठ महत्व द्यायचा. पण मालकाच्या पायांजवळ पडल्या-पडल्या, त्याच्याकडे न बघतांसुद्धां कुत्र्याला लगेच कळलं, की आज त्याचा मालिक दुःखी आहे. म्हणून तो उठून उभा राहिला आणि वळून न्यायाधीशाच्या अंगरख्याच्या खालच्या किनारीला रेती लावंत, आपले समोरचे पंजे आणि डोकं त्याच्या गुडघ्यांवर ठेवून दिलं. बांगाचे हावभाव स्पष्टपणे दाखवंत होते, की तो आपल्या मालकाला सांत्वना आणि विश्वास द्यायचा प्रयत्न करतोय, की विपत्तींत तो त्याच्या बरोबर आहे. हे त्याने मालकाकडे तिरप्या नजरेने बघंत दाखवण्याचा प्रयत्न केला, कान उंचावून मालकाला चिटकूनसुद्द्यां तो हेंच दाखवंत होता. अशा प्रकारे ते दोघं, मालक आणि कुत्रा, जे एक दुस-यावर प्रेम करायचे, सणाच्या रात्रीचं बाल्कनींत स्वागत करंत होते.
ह्या वेळेस न्यायाधीशाचा पाहुणा खूप व्यस्त होता. बाल्कनीसमोरच्या उद्यानाच्या वरच्या मजल्यावरून उतरून तो आणखी एका छतावर आला, डावीकडे वळून महालाच्या आत असलेल्या बराकीकडे वळला. ह्याच बराकीत त्या दोन सैन्य तुकड्या होत्या, ज्या न्यायाधीशाबरोबर सणासाठी येर्शलाइमला आल्या होत्या; आणि न्यायाधीशाची ती गुप्त तुकडीदेखील होती, जिचा प्रमुख हा पाहुणा होता. पाहुण्याने बराकीत दहा मिनिटांपेक्षाही कमी वेळ घालवला. ह्या दहा मिनिटा नंतर महालाच्या बराकीतून तीन गाड्या निघाल्या, ज्यांच्यावर खंदक खणायचे अवजार आणि पाण्याच्या मशका ठेवल्या होत्या. ह्या गाड्यांबरोबर भु-या रंगाचे ओवरकोट घातलेले पंधरा व्यक्ती घोड्यांवर चालले होते. त्यांच्या निगराणींत ह्या गाड्या महालाच्या मागच्या द्वारातून निघाल्या आणि पश्चिमेकडे जाऊं लागल्या. शहराच्या वेढा घालणा-या भिंतीत असलेल्या दारातून निघून पायवाटेने आधी काही वेळ बेथलेहेम जाणा-या रस्त्यावर चालल्या आणि मग उत्तरेकडे वळल्या. मग खेव्रोन्स्की चौरस्त्यापर्यंत येऊन याफाला जाणा-या रस्त्यावर वळल्या, ज्याच्यावर दिवसां अभियुक्तांबरोबर मिरवणूक जात होती. आतापर्यंत अंधार झालेला होता आणि आकाशांत चंद्र निघाला होता.
निगराणी दलाबरोबर गाड्या निघाल्यानंतर थोड्याच वेळाने घोड्यावर स्वार होऊन न्यायाधीशाचा पाहुणासुद्धां महालाच्या सीमेतून निघाला. आता त्याने जुना, काळा चोगा घातला होता. शहराच्या बाहेर न जातां पाहुणा शहराच्या आंत गेला. थोड्या वेळाने त्याला अन्तोनियाच्या किल्ल्याजवळ बघण्यांत आलं, जो उत्तरेकडे, मंदिराच्या खूप जवळ होता. ह्या किल्ल्यांतसुद्धां पाहुणा खूपंच कमी वेळ थांबला. नंतर त्याचे पदचिह्न शहराच्या खालच्या भागांतल्या वाकड्या-तिकड्या, भूल-भुलैया गल्ल्यांमधे दिसले. इथ पर्यंत पाहुणा खेचरावर बसून आला होता.
शहराला चांगलंच ओळखंत असलेल्या पाहुण्याने ती गल्ली शोधून काढली, जिची त्याला गरज होती. त्या गल्लीचं नाव ग्रीक-गल्लीहोतं, कारण की इथे काही ग्रीक लोकांची दुकानं होती, ज्यांच्यांत एक दुकान ते सुद्धां होतं, जिथे गलीचे विकले जायचे. ह्या दुकानासमोर त्याने आपल्या खेचराला थांबवलं, उतरून त्याला समोरच्या दाराच्या एका गोल कडीशी बांधलं. दुकान बंद झालं होतं. पाहुणा दुकानाच्या प्रवेश द्वाराच्या बाजूला असलेल्या दारांतून एका छोट्याश्या अंगणांत आला, ज्यांत तिन्हीं बाजूला शेड्स होते. अंगणाच्या कोप-यांत वळून, पाहुणा एका घराच्या दगडाच्या गच्चीवर आला, जिच्यावर सदाबहारची वेल होती. त्याने इकडे-तिकडे बघितलं, घरांत आणि शेड्समधे अंधार होता. अजून पर्यंत दिवे नव्हते लावले. पाहुण्याने हळूच आवाज दिला, “नीज़ा!”
ह्या आवाजासरशी दार करकरलं आणि संध्याकाळच्या धूमिल प्रकाशांत एक पडदा न केलेली तरुणी गच्चीवर आली. तिने गच्चीच्या कठड्यावरून वाकून उत्सुकतावश बघितलं, की कोण आलंय. आगंतुकाला ओळखून तिने त्याच्या स्वागतार्थ स्मित केलं. डोकं झुकवून आणि हात हलवून तिने त्याचं अभिवादन केलं.
“तू एकटीच आहेस?” अफ्रानियसने हळूच ग्रीकमधे विचारलं.
“एकटीच आहे,” गच्चीवर उभी असलेली तरुणी कुजबुजली, “नवरा सकाळी सीजेरियाला निघून गेला.” तरुणीने दाराकडे बघंत, कुजबुजतंच पुढे सांग़ितलं, “पण मोलकरीण आहे घरांत ...” तिने खूण केली, ज्याचा अर्थ होता – आंत ये’.
इकडे-तिकडे बघून अफ्रानियस दगडाच्या पाय-या चढूं लागला. मग तो त्या तरुणीबरोबर घरांत लपला.
ह्या तरुणीजवळ अफ्रानियस थोडांच वेळ थांबला – पाच मिनिटाहूनही कमी. त्यानंतर त्याने गच्चीवरून उतरून टोपी डोळ्यांवर आणखी खाली सरकवली आणि रस्त्यावर आला. ह्या वेळेपर्यंत घरांमधे दिवे लागले होते. सणासाठी आलेली गर्दी अजूनही होती आणि येणा-या-जाणा-या लोकांच्यामधे आणि घोड्यांवर सवार लोकांच्या घाईगर्दीत अफ्रानियस आपल्या खेचरावर बसून कुठेतरी गायब झाला. पुढे तो कुठे गेला, ह्याचा कोणालांच पत्ता नाही.
ती तरुणी जिला अफ्रानियसने नीज़ाम्हणून संबोधित केलं होतं, एकटी राहिल्यावर लवकर-लवकर कपडे बदलू लागली. असं वाटंत होतं, की ती खूप घाईंत आहे. त्या अंधा-या खोलींत आपल्या आवश्यक वस्तू शोधायला बरांच त्रास होत होता, पण तरीही तिने दिवा नाही लावला, आणि मोलकरणीलापण नाही बोलावलं. तयार होऊन, डोक्यावर काळा बुरखा घातल्यावर घरांतून तिचा आवाज आला:
“जर माझ्याबद्दल कोणी विचारलं तर सांग की मी एनान्ताकडे गेलेय.”
अंधारांत म्हाता-या मोलकरणीच्या बडबडण्याचा आवाज ऐकूं आला:
“एनान्ताकडे? ओह, काय नमूना आहे ती एनान्ता! तुमच्या नव-याने तुम्हांला तिथे जायला नाही सांगितलंय नं? दलाल आहे तुझी एनान्ता! सांगेनंच मी तुझ्या नव-याला...”
“चुप, चुप, चुप!” नीज़ा म्हणाली, आणि सावलीसारखी बाहेर निसटली. तिच्या चपलांची खट्-खट् अंगणांत लावलेल्या दगडांवर होत राहिली. मोलकरणीने बडबडंत गच्चीचं दार बंद केलं. नीज़ाने आपलं घर सोडलं.
ह्याच वेळेस वाकडी-तिकडी होत तलावाकडे जाणा-या आणखी एका गल्लीतल्या घाणेरड्या घराच्या दारांतून एक तरुण निघाला. घराचं मागचं दार ह्या गल्लींत उघडंत होतं आणि खिडक्या होत्या अंगणांत. तरुणाची दाढी व्यवस्थित कापलेली होती. खांद्यांपर्यंत येत असलेली पांढरी टोपी, नवा निळा, कौड्या टाचलेला चोगा आणि नवीन करकरणारे जोडे घातले होते त्याने. पोपटासारखं नाक असलेला हा तरुण सणासाठी तयार झाला होता. तो सणासाठी घाई-घाईने घरी जाणा-यांना मागे टाकंत लवकर-लवकर बिनधास्त चालला होता. तो एका मागून एक खिडक्यांमधे होत चाललेला उजेड बघंत चालला होता. तरुण बाजारातून मंदिराच्या टेकडीखाली असलेल्या धर्मगुरू कायफाच्या महालाकडे जाणा-या रस्त्यावर चालला होता.      
थोड्याच वेळानंतर तो कायफाच्या महालाच्या अंगणांत प्रवेश करताना दिसला. आणखी काही वेळाने तो ह्या अंगणाच्या बाहेर येताना दिसला.
त्या महालांतून बाहेर आल्यावर, जिथे झाडफानूस, आकाशकंदील जळंत होते, आणि सणाची गडबड चालली होती, हा तरुण आणखीनंच बिनधास्त, निडर आणि आनंदांत परंत खालच्या शहराकडे चालला होता. त्या कोप-यावर, जिथे हा रस्ता बाजाराच्या चौकाला मिळंत होता, बुरखा घातलेल्या, ठुमकंत चालणा-या एका महिलेने ह्या गर्दींत त्याला मागे टाकलं. ह्या सुंरेख तरुणाच्या जवळून जाताना तिने क्षणभरासाठी आपल्या बुरक्याची नकाब वर उचलून त्याला डोळ्यांने खूण केली, पण आपली चाल हळूं नाही केली, उलट ती आणखीनंच लवकर-लवकर चालू लागली, जणु तिला त्याच्यापासून पळून लपायचं होतं, ज्याला तिने मागे सोडलं होतं.     
तरुणाने ह्या महिलेला फक्त बघितलंच नाही, पण त्याने तिला ओळखलंसुद्धा, आणि ओळखल्यावर तो थरथरंत थांबला आणि बावरल्यासारखा तिला जाताना बघंत राहिला. पण तेवढ्यांत स्वतःला सांभाळंत तिला पकडायला धावला. हातांत सुरई घेऊन जाणा-या एका माणसाला धक्का मारला, पण पट्कन तो त्या महिलेच्या जवळ पोहोचला आणि धापा टाकंत, उत्तेजित आवाजांत त्याने तिला आवाज दिला, “नीज़ा!”
महिला वळली, तिने कपाळावर आठ्या टाकंत त्याला बघितलं, पण तिच्या चेह-यावर होता एक थंड, हताश भाव. तिने ग्रीकमधे कोरड्या स्वरांत उत्तर दिलं, “आह, हा तू आहेस, जूडास! मी तुला पहिल्या नजरेंत ओळखलंच नाही. पण ही चांगली गोष्ट आहे, आम्हीं असं मानतो, की जर तुम्हीं एखाद्याला ओळखूं नाही शकला, तर समजावं की तो श्रीमन्त होणारेय...”
जूडासचं हृदय इतक्या जोराने धडधड करूं लागलं, जणु काळ्या कापडांत बांधलेला कोणी पक्षी फडफडतोय. ह्या भीतीने की येणा-याजाणा-यांना ऐकूं न जावो, त्याने हळू-हळू कुजबुजंत म्हटलं, “तू चालली कुठेयंस, नीज़ा?”
“तुला त्याच्याशी काय?” नीज़ाने आपला वेग मंदावंत आणि जूडासकडे तुच्छतेने बघंत उत्तर दिलं.
आतां जूडासच्या आवाजांत लहान मुलासारखा हट्टीपणा आला, तो गोंधळून कुजबुजला, “कां नाही?...आपण तर ठरवलं होतं. मी तर तुझाकडे येणार होतो. तू म्हटलं होतं की संध्याकाळी घरीच राहशील...”
“आह, नाही, नाही,” नीज़ाने उत्तर दिलं आणि हट्टी मुलाप्रमाणे आपला खालचा ओठ पुढे काढला, ज्याने जूडासला असं वाटलं, की जणु तिचा सर्वांत सुंदर चेहरा आणखीनंच सुंदर दिसूं लागलाय, “मी कंटाळले होते. तुझा तर सण आहे, पण मी काय करूं? बसल्या-बसल्या ऐकंत राहूं कां की तू कसा गच्चीवर उसासे भरतो आहेस? आणि वरून घाबरंतसुद्धां राहू, की मोलकरीण माझ्या नव-याला ह्याबद्दल सांगून टाकेल? नाही, नाही, आणि मी ठरवलं की शहराच्या बाहेर जाऊन बुलबुलची किलबिल ऐकंत बसेन.”
“असं कसं, शहराच्या बाहेर?” जूडासने गोंधळून विचारलं, “एकटी?”
“नक्कीच, एकटी,” नीज़ाने उत्तर दिलं.
“मला तुझ्याबरोबर येऊं दे,” जूडासने दीर्घ श्वास घेत विनंती केली. त्याचे विचार कुंद झाले, तो जगातल्या प्रत्येक गोष्टीबद्दल विसरून गेला आणि याचनापूर्ण नजरेनी नीज़ाच्या निळ्या, पण आतां काळ्या दिसंत असलेल्या डोळ्यांत बघत राहिला.
नीज़ाने काहीही न म्हणता आपला वेग वाढवला.
“तू काही बोलंत का नाहीस, नीज़ा?” जूडासने तिच्या पावलांशी पावलं मिळवंत तक्रारीच्या सुरांत विचारलं.
“आणि तुझ्याबरोबर मला कंटाळा नाही येणार कां?” नीज़ाने एकदम विचारलं आणि ती थांबली. आता जूडास पूर्णपणे गोंधळला.
“चल, ठीक आहे...” नीज़ाने किंचित नरमाईने म्हटलं, ‘चल.”
“कुठे, जाणार कुठे?”
“धीर धर...ह्या घराच्या अंगणांत जाऊन ठरवूया, नाहीतर , मला भीती वाटते, की जर कुण्या ओळखीच्या माणसानी बघितलं तर सांगत फिरतील की मी माझ्या प्रियकराबरोबर रस्त्यावर होते.”
तेव्हां बाजारांत ना तर नीज़ा उरली, ना जूडास. ते कोणच्यातरी घराच्या अंगणांत उभे राहून कुजबुजूं लागले.
“तेल्यांच्या वस्तीत चल,” नीज़ाने चेह-यावर नकाब टाकंत आणि कुण्या माणसापासून लपण्यासाठी गर्रकन फिरंत म्हटलं, जो बादली घेऊन तिथे आला होता, “केद्रोनच्या मागे, गेथ्समेनमधे. कळलं?”
“हो, हो, हो.”
“मी पुढे निघते,” नीज़ा पुढे म्हणाली, “पण तू  माझ्या मागे-मागे नको येऊं, माझ्यापासून दूर राहा. मी पुढे जाईन...जेव्हां ओढा पार करशीलतुला माहीत आहे कां, की गुफ़ा कुठे आहे?”
“माहितीये, माहितीये...”
“ऑलिव तेलाच्या घाण्याच्या बाजूने वर जाऊन गुफेकडे वळून जा. मी तिथेच असेन. पण आता माझ्या मागे नको येऊ, थोडा धीर धर, इथे थोडा वेळ थांब.” इतकं बोलून नीज़ा त्या गल्लीतून अशी निघून गेली, जणु ती जूडासशी बोललीच नव्हती.
जूडास काही वेळ एकटांच उभा राहिला, आपल्या धावणा-या विचारांना व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करू लागला. ह्या विचारांमधे एक विचार हा पण होता, की सणाच्या पंगतीच्या वेळेस आपल्या अनुपस्थितीचं तो नातेवाइकांना काय कारण सांगेल. जूडास उभ्या-उभ्या एखादी थाप मारण्याबद्दल विचार करूं लागला. पण, जसं नेहमीच होत असतं, मनातल्या घालमेलीमुळे तो काहीच विचार करूं शकला नाही आणि त्याचे पाय आपणहून त्याला गल्लीतून दूर घेऊन गेले.
आता त्याने आपला रस्ता बदलला. तो खालच्या शहरांत जाण्याऐवजी परंत कायफाच्या महालाकडे जाऊ लागला. जूडासला आता आजूबाजूच्या वस्तू बघण्यास त्रास होत होता. उत्सव शहराच्या आत प्रविष्ट झाला होता. जूडासच्या चारीकडे प्रत्येक घरांत आता फक्त दिवेच उजळले नव्हते, तर प्रार्थनासुद्धां ऐकूं येत होती.
उशीरा घरी जाणारे आपल्या-आपल्या गाढवांना चाबूक मारंत, ओरडंत पुढे ढकलंत होते. जूडासचे पाय त्याला घेऊन चालले होते, त्याला कळलंच नाही, की कसे त्याच्या समोरून काई लागलेले, भयानक अंतोनिओ-टॉवर्स तरंगत निघून गेले. त्याने किल्ल्यांत तुतारीचा आवाज नाही ऐकला. रोमच्या मशाली घेऊन चाललेल्या अश्वारोही तुकडीकडे त्याचं लक्ष नाही गेलं, जिच्या उत्तेजक प्रकाशांत रस्ता जणु न्हाऊन निघाला होता. टॉवरच्या जवळून जाताना जूडासने वळून पाहिलं की मंदिराच्या भीतिदायक उंचीवर दोन पंचकोणी दीप जळंत आहेत. पण जूडासला ते सुद्धा अस्पष्टंच दिसले. त्याला असं वाटलं, जणु येर्शलाइमच्या वरती दहा अतिविशाल दीप जळतांत आहेत, जे येर्शलाइमच्या वर चमकंत असलेल्या सर्वांत वरच्या दिव्याशी – चंद्राशी स्पर्धा करंत होते. आता जूडासला कोणाशीच काही देणं-घेणं नव्हतं. तो गेथ्समेनकडे चालला होता. तो लवकरांत लवकर शहराला मागे सोडायचा प्रयत्न करंत होता. कधी-कधी त्याला असा भास व्हायचा, जणु त्याच्या पुढे चालणा-यांच्या पाठींच्या आणि चेह-यांच्यामधे ठुमकंत असलेली आकृति चालली आहे, जी त्याला स्वतःकडे आकर्षित करतेय. पण हा फक्त भ्रम होता. जूडासला कळंत होतं, की नीज़ाने त्याला मुद्दाम मागे सोडलंय. जूडास सूदखोरांच्या दुकानांच्या समोरून पळत होता. शेवटी तो गेथ्समेनपर्यंत पोहोचूनंच गेला. अत्यंत अधीर असूनसुद्धां प्रवेशद्वारावर त्याला वाट बघावीच लागली. शहरांत उंटांचा काफिला प्रवेश करंत होता, ज्याच्या मागे होते सीरियन मिलिट्रीचे गस्ती-दल, ज्याला जूडासने मनांतल्या मनांत शिव्या दिल्या.
पण शेवटी सगळं संपतंच. अशांत आणि अधीर जूडास आता शहराच्या भिंतीबाहेर होता. डावीकडे त्याला एक छोटीशी दफनभूमी दिसली, त्याच्या जवळ काही भक्तजनांचे पट्ट्या-पट्ट्यांचे तंबू होते. चंद्राच्या प्रकाशांत न्हायलेला, धुळीने माखलेला रस्ता पार करून जूडास केद्रोन झरा पार करण्यासाठी पुढे गेला. जूडासच्या पायांखाली कलकल करणारे पाणी हळू-हळू वाहंत होते. एका दगडावरून दुस-या दगडावर उड्या मारंत तो शेवटी समोरच्या गेथ्समेनच्या किना-यावर आला. त्याला हे बघून आनंद झाला, की रस्ता अगदी निर्मनुष्य आहे. दूर तेल्यांच्या वस्तीचं अर्धवट द्वार दिसंत होतं.
शहराच्या दमंट वातावरणानंतर वसंती रात्रीचा सुगंध जूडासला जणु पागल करंत होता. बगीच्यातून बाभूळ आणि मेंदीचा सुगंध येत होता.
प्रवेशद्वारावर कोणीही पहारेकरी नव्हता, तिथे कुणी नव्हतंच; काही क्षणांनी ऑलिव वृक्षांच्या दाट, रहस्यमय सावल्यांखाली जूडास धावू लागला. रस्ता टेकडीकडे जात होता. लवकर-लवकर श्वास घेत जूडास अंधारातून उजेडांत चंद्राच्या प्रकाशाने विणलेल्या गालीच्यांवर चालंत वर चढूं लागला, जे त्याने नीज़ाच्या ईर्ष्यालू नव-याच्या दुकानांत पाहिलेल्या गालीच्यांची आठवण करून देत होते. काही वेळाने जूडासच्या डावीकडे मैदानांत तेल्यांचा घाणा दिसला. तिथे होतं एक अजस्त्र चाक. काही पोती सुद्धां ठेवलेली होती. सूर्यास्तापर्यंत सगळे कामं संपलेले होते. बगिच्यांत एकही प्राणी नव्हता आणि जूडासच्या डोक्यावर पक्ष्यांचा किलबिलाट ऐकूं येत होता.
जूडासचं गंतव्य जवळंच होतं. त्याला माहीत होतं की डावीकडे अंधारांत त्याला गुफेंत वाहणा-या पाण्याचा कलकलाट ऐकूं येईल. तसंच झालं, त्याने तो आवाज़ ऐकला. गारवा वाटंत होता.
तेव्हां त्याने आपला वेग मंदावंत आवाज दिला, “नीज़ा!”
पण नीज़ाच्याऐवजी ऑलिव वृक्षाच्या जाड खोडापासून एका शक्तिशाली माणसाच्या आकृतिने झेप घेतली. तिच्या हातांत काहीतरी चमकलं आणि लगेच विझून गेलं.
जूडा अडखळंत मागच्या बाजूला पडूं लागला आणि क्षीण आवाजांत उद्गारला, “आह!”
दुस-या माणसाने त्याला रोखलं.
पहिल्या माणसाने, जो समोर होता, जूडासला विचारलं, “आत्ता किती मिळालेंत? जीव वाचवायचा असेल, तर सांग!”
जूडासला आशा वाटली आणि तो घाबरून ओरडला, “तीस टेट्राडाख्म!1 तीस टेट्राडाख्म! जे काही मिळालंय, सगळं इथेच आहे. ह्या घ्या मुद्रा! घेऊन घ्या, पण माझा जीव नका घेऊं.”
समोरच्या माणसाने झटक्याने जूडासच्या हातांतून पिशवी हिसकली. त्याच क्षणी जूडासच्या पाठीमागे विद्युत गतीने चाकू चमकला ज्याने त्या प्रियकराच्या बरगड्यांवर हल्ला केला. जूडास अडखळंत पुढच्या बाजूला पडू लागला, आणि त्याने वाकडे-तिकडे बोटं असलेले आपले हात वर उचलले. समोर असलेल्या व्यक्तीच्या चाकूने जूडासला थोपवलं आणि त्याची मूठ जूडासच्या हृदयांत घुसली.
“नी...जा...,” आपल्या मोठ्या, स्पष्ट, तरुण आवाजाच्या ऐवजी जूडासच्या तोंडून एका खालच्या, भ्यायलेल्या, दूषण देणा-या आवाजांत फक्त येवढंच निघालं आणि तो पुढे काहीच बोलूं शकला नाही. त्याचं शरीर जमिनीवर इतक्या जो-याने पडलं, की ती झणझणून गेली.
आता रस्त्यावर एक तिसरी आकृति दिसली. ह्या तिस-याने अंगरखा आणि टोप घातला होता.  
“उशीर नका करू,” तिस-याने आज्ञा दिली. हत्या-यांनी लगेच पिशवीला तो कागद बांधला, जो तिस-या माणसाने त्यांना दिला होता. हे सगळं चामड्याच्या एका तुकड्यांत ठेवून त्यावर दोरी बांधून टाकली,  दुस-याने हे पाकिट आपल्या शर्टांत ठेवलं. ह्यानंतर दोन्ही हत्यारे रस्त्यातून दूर झाले आणि निघून गेले. ऑलिव वृक्षांच्यामधे अंधार त्यांना खाऊन टाकलं. तिसरा मात्र मृतकाच्या जवळ उक्कड बसून त्याच्या  चेह-याकडे बघू लागला. अंधारांत तो चेहरा चुन्यासारखा पांढरा दिसंत होता आणि खूप सुंदर दिसंत होता. काही क्षणांनी रस्त्यावर कोणीच जीवन्त प्राणी नाही उरला. निर्जीव शरीर हात पसरून पडलं होतं. उजवा पाय चंद्राच्या प्रकाशांत होता, ज्याच्यामुळे त्याच्या पादत्राणाचा बंद स्पष्ट दिसंत होता.
गेथ्समेन उद्यान पक्ष्यांच्या किलबिलाटाने भरून गेलं.
जूडासला मारणारे दोन्हीं हत्यारे कुठे लुप्त झाले, कोणालांच नाही माहीत. पण तिस-या, टोपवाल्याच्या मार्गाबद्दल आम्हांला माहीत आहे. रस्ता सोडून तो ऑलिव वृक्षांच्या दाटींतून दक्षिणेकडे गेला. प्रमुख द्वाराच्या आधीच, बागेच्या दक्षिणी कोप-यांतून, जिथे भिंतीचे दगड निघून पडलेले होते, त्याने भिंत ओलांडली; लवकरंच तो केद्रोनच्या किना-यावर पोहोचला. मग़ पाण्यांत उतरून काही वेळ चालला, जोपर्यंत त्याला दोन घोडे घेतलेला एक माणूस नाही दिसला. घोडेसुद्धां प्रवाहांतच उभे होते. पाणी त्यांच्या खुरांवरून वाहंत होतं. साईस एक घोड्यावर बसला आणि टोपवाला उडी मारून दुस-यावर बसून गेला आणि ते हळू-हळू प्रवाहातंच चालंत राहिले. घोड्यांच्या टापांच्या खाली गोट्यांच्या करकरण्याचा आवाज येत होता. मग घोडेस्वार पाण्याच्या बाहेर आले आणि शहराच्या भिंतीलगंत चालंत राहिले. इथे साईस घोड्याला टाच मारून दिसेनासा झाला. टोप घातलेला माणूस घोडा थांबवून खाली उतरला आणि त्या निर्जन रस्त्यावर त्याने आपला अंगरखा काढला आणि त्याला उलटलं; अंगरख्याच्या आतून त्याने एक चपटं, बिनपंखांचं शिरस्त्राण काढलं आणि घालून घेतलं. आता घोड्यावर उडी मारून सवार झाला फौजी वेष घातलेला, कमरेला तलवार लटकावलेला एक सैनिक. त्याने लगाम खेचली आणि फौजी तुकडीचा तुफ़ान घोडा स्वाराला हिसके देत तीरा सारखा पळाला. आता थोडांच रस्ता उरला होता – अश्वारोही येर्शलाइमच्या दक्षिणी द्वाराकडे जात होता. 
प्रवेश द्वाराच्या कमानीवर मशालींचा अधीर प्रकाश नाचंत होता. विद्युत गतीच्या दुस-या तुकडीचे सुरक्षा सैनिक दगडाच्या बेंचांवर बसून चौपड खेळंत होते. तीरासारख्या येणा-या सैनिकाला बघतांच ते आपआपल्या जागेवर उडालेच, सैनिकानी त्यांच्याकडे बघंत हात हलवला आणि शहरांत घुसला. 
शहर सणाच्या दिव्यांनी जगमगंत होत. सगळ्या खिडक्यांमधे प्रकाश खेळंत होता. चारीकडे प्रार्थनेचे स्वर घुमंत होते. बाहेरच्या बाजूला उघडणा-या खिडक्यांमधे बघंत अश्वारोही कधी-कधी लोकांना खाद्य पदार्थांनी सजवलेल्या जेवणाच्या टेबलाजवळ बघूं शकंत होता. खाण्यामधे होतं बकरीच मांस, दारूचे प्याले आणि कडु पाला असलेले आणखी काही पदार्थ. शिट्टीवर एक शांत गाणं वाजवंत अश्वारोही खालच्या शहराच्या निर्मनुष्य रस्त्यांवर हळू-हळू जात अंतोनियोच्या बुरुजाकडे आला, कधी तो मंदिराच्या वर असलेल्या त्या पंचकोणी दीपांकडे बघायचा, जसे जगांत आणखी कुठेही नव्हते; किंवा कधी चंद्राकडे बघायचा, जो ह्या पंचकोणी दीपांच्या वरती लटकंत होता.
सणाच्या रात्रीच्या आयोजनांमधे हिरोदच्या प्रासादाने बिल्कुल भाग नाही घेतला. दक्षिणेकडे उघडणा-या खालच्या खोल्यांमधे, जिथे रोमन सेनेचे अधिकारी आणि अश्वारोही तुकड्यांचे अधिकारी राहात होते, दिवे जळंत होते. तिथे थोडी फार हालचाल आणि जीवनाचे चिन्ह दिसंत होते, समोरच्या भागांत अनिच्छेने राहणारा प्रासादाचा निवासी न्यायाधीश होता. हा सम्पूर्ण भाग आपल्या स्तंभांसहित आणि सोनेरी प्रतिमांसकट जणु चंद्राच्या प्रकाशाने आंधळा झाला होता. महालाच्या आत स्तब्धता आणि अंधाराचं साम्राज्य होतं.
आणि जसं न्यायाधीशाने अफ्रानियसला सांगितलं होतं, त्याला आत जावंसं वाटंत नव्हतं. त्याने तिथेच, बाल्कनींत बिस्तरा टाकायची आज्ञा दिली, तिथेच, जिथे त्याने जेवंण केलं होतं आणि सकाळी खटल्याची तपासणी केली होती. न्यायाधीश बिस्त-यावर लोळला होता, पण झोप काही येत नव्हती. उघडा चंद्र वर, स्वच्छ आकाशांत लटकंत होता आणि कित्येक तास त्याच्यावरून नजर दूर नाही करूं शकला.                                                                                  
शेवटी मध्यरात्रीच्या सुमारास निद्रादेवीने महाबलीवर कृपा दृष्टी टाकलीच. थरथरंत एक मोट्ठी जांभई देऊन न्यायाधीशाने आपला अंगरखा काढून फेकला, कंबरेत बांधलेला पट्टा सोडून टाकला, ज्यांत खोळीत ठेवलेला स्टीलचा चाकू लटकंत होता, त्याला बिस्त-याजवळच्या खुर्चीवर ठेवून दिला, चप्पल काढ्ली आणि लोळला. बांगा लगेच त्याच्या बिस्त-यावर चढून त्याच्या बाजूला, डोक्याजवंळ डोकं ठेवून लोळला; न्यायाधीशाने कुत्र्याच्या मानेंवर हात ठेवून आपले डोळे बंद केले. तेव्हांच कुत्रापण झोपला.
बिस्तर अर्ध्या अंधारांत होता, स्तंभामुळे चंद्राचा प्रकाश त्याच्यावर नव्हता पडंत, पण पाय-यांपासून थेट बिस्त-यापर्यंत चंद्राच्या प्रकाशाचा पट्टा येत होता. न्यायाधीशाने वास्तविक जीवनाच्या घडामोडींशी संबंध तोडल्याबरोबर तो लगेच त्या चमचमत्या रस्त्यावरून सरंळ चंद्राकडे जाऊ लागला. स्वप्नांत तो आनंदाने हसंत होता, कारण की ह्या निळ्या-निळ्या, पारदर्शी रस्त्यावर सगळंच इतकं अद्भुत आणि सुंदर होतं. तो बांगाबरोबर चालंत होता, आणि त्याच्याबरोबर होता तो भटक्या दार्शनिक. ते कोणच्यातरी क्लिष्ट आणि महत्वपूर्ण विषयावर चर्चा करंत होते, पण कोणीही दुस-याला पराजित करंत नव्हता. त्यांचं कोणत्यांच  गोष्टींत एकमत होत नव्हतं आणि म्हणूनंच त्यांचा वादविवाद खूप मजेदार झाला होता आणि संपतंच नव्हता. स्पष्ट होतं, की आजचा मृत्युदण्ड अगदीच अकल्पनीय होता – हाच दार्शनिक, जो एका वेडपट विचाराचं समर्थन करंत होता, की सगळेचं लोक दयाळू असतांत , त्याच्या बरोबर चालंत होता, ज्याचा अर्थ हा झाला, की तो जिवन्त होता. हा विचारंच किती भयानक आहे, की अश्या व्यक्तीला मृत्युदण्ड दिला जाऊं शकतो. मृत्युदण्ड दिलाच नाही! बिल्कुल नाही दिला! चंद्राच्या पाय-यांवरून जाण्याची हीच सुखद जाणीव आहे.
रिकामा वेळ इतका होता, जितका आवश्यक होता, आणि वादळ फक्त संध्याकाळीच येईल, आणि कायरता सर्वांत भयंकर पापांपैकी एक आहे. हेच सांगितलं होतं येशुआ हा-नोस्त्रीने. नाही दार्शनिक, मी तुझ्याशी सहमत नाहीये : हे सर्वाधिक भयंकर पाप आहे.
उदाहरणार्थ, जेव्हां वैली ऑफ वर्जिन्समधे मदमस्त जर्मन विशालकाय क्रिसोबोयचे जवळ-जवळ तुकडे-तुकडे करणार होते, तेव्हां जूडियाच्या वर्तमान न्यायाधीशाने आणि अश्वारोही दळाच्या भूतपूर्व प्रमुखाने कायरतेचं प्रदर्शन नव्हतं केलं. पण, माझ्यावर दया कर, दार्शनिक! तुला काय आपल्या अकलेने समजतं नाहीये का, की सम्राटच्या विरुद्ध अपराध करणा-या व्यक्तीमुळे जूडियाच्या न्यायाधीशाने आपली नौकरी गमावली असती?”
“हो-हो,” झोपेतंच विव्हळंत आणि रडंत पिलात म्हणाला.
स्पष्ट आहे, की गमावली असती. दिवसा कदाचित त्याने असं नसतं केलं, पण आता, रात्री, सर्व काही सोडून देऊन, तो नौकरी गमावण्यासाठी उतावीळ झाला होता, ह्या सम्पूर्ण निरपराध माणसाला, ह्या माथेफिरू दार्शनिकाला आणि चिकित्सकाला मृत्युपासून वाचवण्यासाठी तो काहीही करायला तयार होता.
“आता आपण नेहमी बरोबर राहू,”2 स्वप्नांत फाटके कपडे घातलेल्या त्या भटक्या दार्शनिकाने म्हटलं. माहीत नही कसा तो सोनेरी भाला घेतलेल्या अश्वारोह्याच्या रस्त्यांत उभा होता. “जर एक आहे, तर ह्याचा अर्थ असा, की दुसरासुद्धां तिथेच आहे! माझी आठवण केल्याबरोबर लगेच तुझीसुद्धां आठवण काढतील! मला एका अनाथाच्या रूपांत, अज्ञात जन्मदात्यांच्या मुलाच्या रूपांत, आणि तुला – भविष्यवेत्ता राजा आणि गिरणीवाल्याची पुत्री, सुंदरी पिलाच्या3 पुत्राच्या रूपांत.”                           
“हो, तू विसरूं नकोस, आठवण ठेव माझी, भविष्यवेत्ताच्या मुलाची,” स्वप्नांत पिलातने विनंती केली आणि स्वप्नांत आपल्या बरोबर-बरोबर चालणा-या एन-सरीदच्या4 भिका-याने मान हलवून दिलेल्या स्वीकृतिनंतर जूडियाचा निर्दयी न्यायाधीश आनंदाने रडू लागला आणि स्वप्नांत हसंत राहिला.
हे सगळं खूप छन वाटंत होतं, पण म्हणूनंच महाबलीची झोप मोडणं खूप भयानक होतं. बांगा चंद्राकडे बघून ओरडला आणि न्यायाधीशाच्या डोळ्यांसमोरचा चिक्कण, तेलाने माखल्यासारखा निळा रस्ता गायब झाला. त्याने डोळे उघडले आणि पहिलीच गोष्ट, जी त्याला आठवली, ती ही की दार्शनिकाला सुळावर चढवलं गेलंय. उठल्याबरोबर न्यायाधीशाने सवयीप्रमाणे बांगाच्या मानेवर हात फिरवला, मग आजारी डोळ्यांने चंद्राला शोधूं लागला, तर त्याला दिसलं, की तो एका कोप-याकडे सरकलांय आणि पांढरा पडला आहे. त्याच्या प्रकाशाला छेदणारा एक अप्रिय, अधीर उजेड न्यायाधीशाच्या डोळ्यांच्या अगदी समोर बाल्कनीत खेळंत होता. ही मशाल होती, जी क्रिसोबोयच्या हातांत फडफडंत धूर ओकंत होती. तिला धरणारा भीति आणि घृणेने त्या भयानक प्राण्याच्या जवळ येत होता, जो त्याच्यावर झेप घेणारंच होता.  
”थांब, बांगा,” आजारी न्यायाधीशाने म्हटलं आणि तो खोकूं लागला. आपल्या हाताला मशालीसमोर धरून तो पुढे म्हणाला, “रात्रीसुद्धां, चंद्राच्या प्रकाशांतसुद्धां मला निवांतपणा नाहीये. अरे देवा! तुझं कर्तव्यसुद्धां खूप अप्रिय आहे, मार्क! शिपायांचं तर तू अंग-भंग करतो...”
मार्कने आश्चर्याने न्यायाधीशाकडे बघितलं, तसा तो सावरला. झोपेंत म्हटलेल्या फुकटच्या शब्दांवर सारवा-सारवी करण्यासाठी न्यायाधीश म्हणाला, “वाईट नको वाटून घेऊं, सेन्चुरियन, मी पुन्हां म्हणतोय, की माझी परिस्थिति तुझ्याहूनही वाईट आहे. काय पाहिजे?”
“गुप्तचर-सेवा प्रमुख तुम्हांला भेटायला आलाय,” मार्कने थंडपणे उत्तर दिलं.   
“बोलवा, बोलवा,” खोकून गळा मोकळा करून न्यायाधीशाने आज्ञा दिली आणि पाय घुमवंत आपल्या चपला शोधूं लागला. उजेड स्तंभांवर खेळंत होता. सेन्चुरियनच्या पावलांची खटखट फरशीवर ऐकूं येत होती. सेन्चुरियन उद्यानांत निघून गेला.
“चंद्राच्या प्रकाशांतसुद्धां मला शांतता नाही,” दात खाऊन न्यायाधीश स्वतःशीच बडबडला.
बाल्कनीत सेन्चुरियनच्या ऐवजी टोपवाला माणूस प्रकट झाला.
“बांगा, जवळ नको जाऊ,” न्यायाधीश हळूंच म्हणाला आणि कुत्र्याचं डोकं दाबून त्याला बसवून दिलं.
बोलायच्या आधी आपल्या सवयीप्रमाणे अफ्रानियसने चारीकडे नजर टाकून बघितलं, त्याने सावलींत जाऊन खात्री करून घेतली, की बांगाला सोडून बाल्कनींत आणखी कोणी नाहीये, मग हळूंच म्हणाला, “विनंती करतो की माझ्यावर खटला चालवण्यांत यावा, न्यायाधीश! तुम्हीं बरोबर सांगितलं होतं. मी किरियाथच्या जूडासची रक्षा नाही करू शकलो, त्याला मारण्यांत आलंय. मी विनंती करतो, की माझ्यावर खटला चालवा आणि मला सेवामुक्त करा.”
अफ्रानियसला वाटंत होतं की त्याच्याकडे चार डोळे एकटक बघताहेत, दोन कुत्र्याचे आणि दोन लांडग्याचे.
अफ्रानियसने कोटाच्या आतून दुहेरी सीलबंद केलेली रक्ताने माखलेली पिशवी काढली.
“ही पैश्यांची पिशवी हत्यारे धर्मगुरूच्या घरावर फेकून चालले गेले. ह्या पिशवीवर लागलेलं रक्त किरियाथच्या जूडासचं आहे.”
“किती पैसे आहेत, मला उत्सुकता वाटतेय?” पिलातने पिशवीकडे वाकंत विचारलं.
“तीस टेट्राडाख्म.”
न्यायाधीश हसला आणि म्हणाला, “खूपंच कमी आहेत.”
अफ्रानियस चुप राहिला.
“मृतक कुठे आहे?”
“ते मला नाही माहीत,” शांत, सम्मानजनक भावाने त्या माणसाने उत्तर दिलं, जो कधीच आपला टोप काढंत नव्हता, “सकाळी त्याचा शोध घेऊं.”
न्यायाधीश थरथरला, त्याने चपलेचा बंद तसांच सोडला, जो बांधतांच येत नव्हता.
“पण तुम्हांला नक्की माहीत आहे का, की त्याला मारून टाकलंय?”
ह्या प्रश्नाचं न्यायाधीशाला कोरडेपणाने उत्तर मिळालं:
न्यायाधीश, मी पंधरा वर्षांपासून जूडियांत काम करतोय. मी आपली नौकरी वालेरियस ग्रेटसच्या5 काळापासून सुरू केली होती. मला हे बघण्यासाठी, की माणसाची हत्या झालीयं, मृत शरीर पाहण्याची गरज नाहीये आणि मी तुम्हाला सूचित करतोय, की तो, ज्याला किरियाथ शहराच्या जूडासच्या नावाने ओळखायचे, त्याला काही तासांपूर्वी मारलंय.”
“माफ़ कर, अफ्रानियस,” पिलातने उत्तर दिलं, “मी अजून व्यवस्थित जागा झालेलो नाहीये, म्हणूनंच मी हे सगळं म्हटलं. मी नीट झोपू नाही शकंत,” न्यायाधीश हसला, “आणि नेहमी स्वप्नांत चंद्राचा प्रकाश पाहतो. कल्पना करा, हे किती हास्यास्पद आहे. असं वाटतं, जणु काही मी ह्या प्रकाशांत हिंडतोय. तर, ह्या घटनेबद्दल मला तुमचं मत ऐकायचं आहे. तुम्हीं त्याला कुठे शोधणारेय? बसा, गुप्तचर-सेवा प्रमुख.
मी त्याला गेथ्समेन उद्यानांत असलेल्या तेल्यांच्या घाण्याजवळ शोधणारेय.”
“बरं, बरं, पण नेमकं तिथेच कां?”
महाबली, माझ्या कल्पनेप्रमाणे, जूडासची हत्या येर्शलाइममधे नाही झालीये, आणि त्याच्यापासून फार दूरपण नाही झाली. त्याला येर्शलाइमच्या जवळंच मारण्यांत आलंय.”
“मी तुम्हांला आपल्या कामांत अत्यंत निष्णात मानतो. माहीत नाही की रोममधे काय परिस्थिति आहे, पण उपनिवेशांमधे तर तुमच्यासारखा कोणीच नाहीये. मला समजावून सांगा, कां?”
अफ्रानियसने हळू आवाजांत म्हटलं, “मी ह्या गोष्टीचा विचारसुद्धां नाही करूं शकंत, की जूडास, शहराच्या आंत, घाई-गर्दीत कोण्या संदेहास्पद लोकांच्या हातांत सापडेल. रस्त्यावर लपून मारणं शक्य नाहीये. ह्याचा अर्थ हा झाला, की त्याला फूस लावून एखाद्या तळघरांत नेण्यांत आलं. पण माझ्या सैनिकांनी त्याला खालच्या शहरांत शोधलं आणि शोधूनंच घेतलं असतं. पण तो शहरांत नाहीये, ह्या गोष्टीची मी हमी देतो. जर त्याला शहरापासून दूर मारलं असतं, तर पैशांची ही पिशवी इतक्या लवकर धर्मगुरूच्या घरांत फेकणं शक्य नव्हतं. त्याला शहराच्या जवळंच मारलंय. त्याला शहराच्या बाहेर नेण्यांत ते यशस्वी झाले.”

“मला कळंत नाहीये, की हे कश्या प्रकारे झालं असेल.”
“हो, न्यायाधीश, सम्पूर्ण घटनेंत हाच सर्वांत कठीण प्रश्न आहे आणि मला माहीत नाही, की मला तो सोडवतां येईल किंवा नाही.”
“खरंच, कोडंच आहे! सणाच्या रात्री, देवावर विश्वास ठेवणारा एक माणूस प्रार्थना आणि भोज सोडून न जाने कां शहराच्या बाहेर जातो, आणि तिथे मारला जातो. त्याला कोण, कसं फूस लावू शकलं? हे एखाद्या बाईचं काम तर नाहीये?” न्यायाधीशाने अचानक उत्साहित होऊन विचारलं.
अफ्रानियसने शांतपणे जोर देत म्हटलं, “कोणत्याही परिस्थितीत नाही, न्यायाधीश. ही शक्यता तर जराही नाहीये. जरा तर्कसंगत प्रकाराने बघा. जूडासला मारण्यांत कोणाला रस होता? कुणी आवारा स्वप्नदर्शीच असूं शकतो, एखादा असा समूह, ज्यांत बाई नव्हतीच. लग्न करण्यासाठी, न्यायाधीश, पैसे पाहिजेत; मानवाला जन्म देण्यासाठी त्यांची गरंज आहे; पण एका बाईच्या मदतीने कुण्या माणसाची हत्या करण्यासाठीतर खूप पैशांची गरज असते, आणि कुण्या भटक्याकडे येवढे पैसे नाहीत. ह्या कामांत बाई नव्हतीच, मी तर असंपण म्हणेल की ह्या दिशेने विचार केला तर मी आपला मार्गंच हरवून बसेन.”
“मला वाटतंय की तुम्हीं अगदी बरोबर म्हणताय, अफ्रानियस,” पिलातने म्हटलं, “मी तर फक्त मनांतील विचार मांडला होता.”
“पण, दुर्दैवाने तो बरोबर नाहीये, न्यायाधीश.”
“तर मग, मग काय...?” न्यायाधीशाने उत्सुकतेने अफ्रानियसच्या चेह-याकडे बघंत विचारलं.
“मला वाटतंय की ह्यामागे पैसा – हेच कारण आहे.”
“खूप चांगला विचार आहे! पण शहराच्या बाहेर, रात्री, त्याला कोणी पैश्यांसाठी बोलावलं असेल?”
“ओह, नाही, न्यायाधीश, असं नाहीये. माझा फक्त एकंच निष्कर्ष आहे आणि जर तो चुकीचा असला, तर दुसरा कोणचा निष्कर्ष मी काढूं शकणार नाही,” न्यायाधीशाच्या जवळ वाकून अफ्रानियस पुटपुटला, “जूडास आपल्या पैश्यांना एखाद्या निर्मनुष्य जागेवर लपवणार होता, जी फक्त त्यालाच माहीत होती.”
“अत्यंत बारकाईने समजावतांय. कदाचित असंच झालं असेल. आता कळतंय : त्याला लोकांनी नाही, तर आपल्याच्या विचारांनी फसवलं. हो, कदाचित असंच आहे.”
“हो, जूडास कोणाचाच विश्वास करंत नव्हता. तो लोकांपासून पैसे लपवंत होता.”
“तुम्हीं म्हणंत होतां, की गेथ्समेनमधे शोधणार, पण तुम्हीं त्याला तिथेंच कां शोधणारेय – मी स्वीकार करतो, की ही गोष्ट मला समजली नाहीये.”
“ओह, न्यायाधीश! अगदी सोपं आहे. पैसे कुणी रस्त्यांवर आणि रिकाम्या जागेवर तर नाही लपवणार. जूडास ना तर हेब्रोनच्या रस्त्यावर होता, ना बेथनीच्या. तो वृक्षांनी आच्छादित असलेल्या एखाद्या सुरक्षित जागेवरंच असेल. हे अगदी सोपं आहे. आणि येर्शलाइमच्या जवळ, गेथ्समेनच्या व्यतिरिक्त अशी दुसरी जागांच नाहीये. दूर तो जाऊंच शकंत नव्हता.”
“तुम्हीं माझं पूर्ण समाधान केलंय. तर, आता काय करायचंय?”
“मी लवकरंच त्या मारेक-यांचा शोध सुरू करेन, जे जूडासला आमिष दाखवून शहराच्या बाहेर घेऊन गेले, आणि त्याच बरोबर मी स्वतःला न्यायदेवतेच्या स्वाधीन करतोय.”
“कां?”
“जेव्हां तो कायफाच्या महालांतून परंत येत होता, तेव्हां माझ्या सैनिकांनी बाजारांत त्याचा माग हरवला. हे कसं झालं, ते मला कळंत नाहीये. माझ्या सम्पूर्ण आयुष्यांत असं कधीच झालेल नाही. आपल्या संभाषणानंतर मी त्याला लगेच माझ्या निगराणींत घेतलं होतं. पण बाजारांतून तो कुठेतरी निसटला, आणि त्याचं नामोनिशानंच हरवलं.”
“ओह, असं आहे! मी तुम्हांला सांगतोय, की तुमच्यावर खटला चालवण्याची मला काहीच आवश्यकता वाटंत नाही. तुम्हीं ते सगळं केलं, जे शक्य होतं,” न्यायाधीशाने स्मितहास्य करंत म्हटलं, “आणि जगांत कोणीही ह्याच्यापेक्षा जास्त आणखी काही करूंच शकंत नव्हता! शोधणा-या पथकालाच शिक्षा द्या, जे जूडासच्या मागावर होतं. पण मी सांगेन की ही शिक्षा कठोर नसली पाहिजे. आपण ह्या बदमाशाला वाचवण्यासाठी जे शक्य होतं, ते सगळं केलंय! हो, विचारायचं राहून गेलंय...” न्यायाधीशाने कपाळ पुसंत म्हटलं, “त्यांनी कायफाचा पैसा कसा परंत फेकला?”
“असं बघा, न्यायाधीश.... हे इतकं कठीण नाहीये. प्रतिशोध घेणारे कायफाच्या महालाच्या मागच्या बाजूला गेले, जिथे गल्ली मागच्या अंगणापेक्षा उंचावरती आहे. तिथेच त्यांनी भिंतीवरून पिशवी आंत फेकून दिली.”
“चिट्ठीसोबत?”
हो, अगदी तस्संच, जसं तुम्हीं सांगितलं होतं, न्यायाधीश. हो, बघा,” अफ्रानियसने पिशवीवर लागलेली सील तोडून तिच्या आतील वस्तू न्यायाधीशाला दाखवल्या.
“हे तुम्हीं काय करताय, अफ्रानियस, शुद्धीवर ये, सील तर कदाचित मंदिराची आहे!”
“न्यायाधीशाला ह्याबद्दल काळजी करण्याची गरज नाहीये,” अफ्रानियसने पिशवी बंद करंत म्हटलं.
“तुमच्याकडे काय सगळ्या प्रकारचा सील आहेत?” पिलातने हसंत विचारलं.
“दुसरा काही उपायंच नाहीये, न्यायाधीश,” अफ्रानियसने न हसतां, अगदी गंभीरतेने उत्तर दिलं.
“मी कल्पना करूं शकतो की कायफाच्या इथे काय तमाशा झाला असेल.”
“हो, न्यायाधीश, खूपंच हंगामा झाला. त्यांनी लगेच मला बोलावणं पाठवलं.”
अंधारांतसुद्धां स्पष्ट दिसंत होतं, की पिलातचे डोळे चमकताहेत.
“हे खूपंच मनोरंजक आहे, मनोरंजक...”
“मला खेद आहे, की मी तुमचा विरोध करतोय, न्यायाधीश, हे जरा पण मनोरंजक नव्हतं. सर्वांत जास्त कंटाळवाणं आणि थकवणारं काम होतं. माझ्या ह्या प्रश्नाच्या उत्तरांत, की कायफाच्या महालांतून कोणाला पैसे तर नव्हते दिलेत्या6नी दृढतेने सांगितलं, की असं नाही झालं.”
“ओह, तर असं आहे? जर म्हणतांतेय की नाही दिला, तर कदाचित नसेलही दिला. त्या परिस्थितीत तर मारेक-यांचा शोध लावनं आणखीनंच कठीण होईल.”
“अगदी बरोबर म्हणताय, न्यायाधीश.”
“हो, अफ्रानियस, अचानक माझ्या मनांत विचार आला, की त्याने कुठे आत्महत्या तर नसेल केली?”6
“ओह, नाही, न्यायाधीश!” विस्मयाने खुर्चीच्या पाठीशी टेकंत अफ्रानियसने उत्तर दिलं, “माफ़ करा, पण हे बिल्कुल असंभव आहे!”
“आह, ह्या शहरांत सगळं संभव आहे! मी चर्चा करायला तयार आहे, की काही वेळातंच ही अफवा सम्पूर्ण शहरांत पसरेल.”
आता अफ्रानियसने आपल्या विशिष्ठ नजरेने न्यायाधीशाकडे पाहिलं आणि थोडा विचार करून म्हणाला, “हे तर शक्य आहे, न्यायाधीश.”
असं दिसंत होतं, की जरी सगळं स्पष्ट झालेलं होतं, तरीही न्यायाधीश किरियाथच्या ह्या माणसाच्या हत्येच्या प्रश्नापासून दूर जात नव्हता, आणि त्याने काही विचार करण्याच्या आविर्भावांत म्हटलं, “मला बघायचं होतं, की त्याला कसं मारलं.”
“त्याला मोठ्या कौशल्याने मारलं, न्यायाधीश,” अफ्रानियसने उत्तर दिलं आणि तो उपहासाने न्यायाधीशाकडे बघू लागला.
“तुम्हांला कसं कळलं?”
“ह्या पिशवीकडे लक्ष द्या, न्यायाधीश,” अफ्रानियसने उत्तर दिलं, “मी ठामपणे सांगू शकतो, की जूडासचं रक्त फवा-यासारखं उसळलं, लाटेप्रमाणे वाहिलं. मी स्वतःच्या डोळ्यांनी हत्या होताना बघितल्यायेत.”
“तर, नक्कीच, तो उठणार नाही?”
“नाही, न्यायाधीश, तो उठेल,” अफ्रानियसने स्मित हास्य करंत दार्शनिकाच्या आविर्भावांत म्हटलं, “जेव्हां त्याच्या वरती मसिहाचा बिगुल वाजेल, ज्याची इथे सगळे वाट बघतायेत, पण त्याच्या आधी तो नाही उठणार!”
“बस, अफ्रानियस! आता ही गोष्ट मी समजलोय. आता दफ़न-विधिकडे वळूं या.”
“मृतकांना व्यवस्थितपणे दफन केलंय, न्यायाधीश.”
“ओह, अफ्रानियस, तुमच्यावर खटला चालवणं म्हणजे एक अपराधंच होईल. तुम्हांला सर्वोच्च पुरस्कार मिळायला पाहिजे. कशी पार पडली दफ़न-विधि?”
अफ्रानियसने सांगायला सुरुवात केली की जेव्हां तो जूडासच्या प्रसंगांत गुंतला होता, तेव्हां गुप्तचर सैनिकांची एक तुकडी त्याच्या सहायकाच्या नेतृत्वाखाली बाल्ड-माउन्टेनवर पोहोचली. संध्याकाळ झालेली होती. माउन्टेनवर एक मृत शरीर नव्हतं.
पिलात थरथरला आणि भसाड्या आवाजांत म्हणाला, “आह, मी ह्याबद्दल कसा विचार नाही केला!”
“काळजीची गोष्ट नाहीये, न्यायाधीश,” अफ्रानियसने म्हटलं आणि सांगितलं, “दिसमास आणि गेस्तासचे मृत शरीर, ज्यांचे डोळे पंक्ष्यांनी खाऊन टाकले होते, उचलले आणि लगेच तिस-या मृत शरीराचा शोध सुरू झाला. त्याला लगेच शोधलं. एक माणूस...”
“लेवी मैथ्यू...” पिलातने प्रश्नार्थक नाही, परंतु खात्री करण्याच्या अंदाजांत म्हटलं.
“हो, न्यायाधीश...”
लेवी मैथ्यू बाल्ड-माउन्टेनच्या उत्तरी उतारावर असलेल्या एका गुहेंत लपून अंधार पडायची वाट बघंत होता. येशुआ हा-नोस्त्रीचं नग्न शरीर त्याच्या जवंळ होतं. जेव्हां मशाली घेतलेले सैनिक गुहेंत पोहोचले, तेव्हां लेवी घाबरला आणि उत्तेजित झाला. तो ओरडून म्हणाला, की त्याने कोणताही गुन्हा केलेला नाहीये, आणि नियमानुसार, प्रत्येक माणसाला, जर त्याला वाटलं तर, अभियुक्त मृतकाला दफन करण्याचा अधिकार आहे. लेवी मैथ्यू म्हणाला की तो ह्या शरीराला स्वतःपासून दूर नाही करणार. तो खूप उद्विग्न होता, असंबद्ध बडबड करंत होता, ओरडंत होता, कधी विनंती करायचा, कधी धमकी द्यायचा, कधी शिव्या...
“त्याला पकडावं लागलं कां?” पिलातने निराशेने विचारलं.
“नाही, न्यायाधीश, नाही,” अफ्रानियसने शांतपणे उत्तर दिलं. “त्या हट्टी माथेफिरूला आम्हीं हे समजावून शांत केलें, की हे शरीर दफ़न केलं जाईल. लेवी ही गोष्ट समजून गेला, शांत झाला, पण त्याने हे म्हटलं, की तो कुठेही जाणार नाही आणि दफनविधीत भाग घेईल. तो म्हणाला, की त्याला मारून टाकलं, तरी तो इथून कुठेही जाणार नाहीये. त्याने आपल्या खिशांतून ब्रेड कापायचा चाकू सुद्धां काढून समोर केला.”
“त्याला पळवून लावलं?” दबक्या आवाजांत पिलातने विचारलं.
“नाही, न्यायाधीश, नाही. माझ्या सहायकाने त्याला दफ़न विधीत सहभागी व्हायची परवानगी दिली...”
“तुमच्या कोणत्या सहायकाने ह्याचं संचालन केलं?” पिलातने विचारलं.
“तोल्माय,” अफ्रानियसने उत्तर दिलं आणि थोड्या काळजीने विचारलं, “त्याने काही चूक तर नाही नं केली?”
“बोलंत राहा,” पिलात म्हणाला, “काही चूक नाही झाली. मी कधी-कधी भटकून जातो, अफ्रानियस, माझी गाठ कदाचित अश्या व्यक्तीशी पडलीये, जो कधी चूक करतंच नाही, आणि तो व्यक्ति – तुम्हीं आहांत!”
“लेवी मैथ्यूला मृतकांच्या गाडीबरोबर नेण्यांत आलं आणि सुमारे दोन तासांनी येर्शलाइमच्या उत्तरेकडे एका वाळवण्टी घाटीत पोहोचले. तिथे ह्या तुकडीने एक खोल खड्डा खोदला आणि त्यांत तिघा मृतकांना दफन केलं.”
“कफन न घालता?”
“नाही, न्यायाधीश, गुप्तचर तुकडी ह्या कामासाठी कापड घेऊन गेली होती. मृतकांच्या बोटांमधे आंगठ्या सुद्धां घातल्यात. येशुआला एका गाठीची, दिसमासला दोन आणि गेस्तासला तीन गाठींची. खड्डा बंद केला, त्याच्यावर दगड ठेवले. त्यावर बनवलेल्या खुणा तोल्मायला लक्षांत आहेत.”
“आह, जर मी ह्या गोष्टीबद्दल विचार केला असतां!” पिलातने कपाळावर आठ्या घालंत म्हटलं, “मला कमीत कमी ह्या लेवी मैथ्यूला भेटायला हवं होतं...”
“तो इथेच आहे, न्यायाधीश!”
पिलातचे डोळे विस्मयाने पसरले. त्याने थोडा वेळ अफ्रानियसकडे पाहिलं आणि म्हणाला, “ह्या घटनेशी संबंधित तू जे काही केलंय, त्याबद्दल खूप-खूप आभारी आहे. कृपा करून तोल्मायला उद्या माझ्याकडे पाढवून द्या, त्याला आधींच सांगून ठेवा, की मी त्याच्या कामगिरीने खूष झालोय, आणि तुम्हांला, अफ्रानियस...” न्यायाधीशाने टेबलावर पडलेल्या पट्ट्याच्या खिशांतून ही-याची अंगठी काढली आणि गुप्तचर सेवेच्या प्रमुखाला देत म्हटलं, “आठवणी प्रीत्यर्थ माझ्याकडून ही भेट!”
अफ्रानियसने झुकून अभिवादन केलं आणि विनयपूर्वक म्हटलं, “मी अत्यंत सम्मानित झालो, न्यायाधीश.”
“ज्या तुकडीने दफन-विधि पूर्ण केली, तिला कृपा करून पुरस्कार द्या. ज्या शोधी-तुकडीने जूडासच्या बाबतीत हलगर्जी केली, तिला सिक्षा द्या आणि लेवी मैथ्यूला लगेच माझ्याकडे पाठवा. मला येशुआच्या बाबतीत त्याला बरंच काही विचारायचंय.”
“जशी आज्ञा, न्यायाधीश,” अफ्रानियसने म्हटलं आणि तो अभिवादन करंत मागे सरकू लागला, आणि न्यायाधीशाने टाळ्या वाजवून जोराने म्हटलं, “माझ्याकडे ये! स्तंभांत दिवा लाव!”
अफ्रानियस उद्यानांत निघून गेला होता, आणि पिलातच्या पाठीमागे सेवकाच्या हातांत दिवे टिमटिमंत होते. न्यायाधीशासमोर टेबलावर दोन दिवे दिसू लागले आणि तेव्हांच चंद्राची रात्र उद्यानांत उतरून गेली, जणु अफ्रानियस तिला आपल्यासोबत घेऊन गेला होता. अफ्रानियसच्या जागेवर महाकाय सेन्चुरियनबरोबर एक अपरिचित व्यक्ती आला – छोटा-सा आणि अशक्त. न्यायाधीशाची नजर ओळखून, सेनाध्यक्ष लगेच उद्यानांत गेला आणि लुप्त झाला.
न्यायाधीश ह्या आगंतुकाकडे किंचित भयभीत, पण हाव-या नजरेने बघंत होता. अश्या नजरेने त्याच्याकडे बघतांत, ज्याच्याबद्दल खूप काही ऐकलेलं असतं आणि जणु आपण स्वतः सुद्धां त्याच्याबद्दल विचार करंत असतो आणि तो शेवटी तो प्रकटंच होतो.
सुमारे चाळीस वर्षांचा आगंतुक काळा, फाटक्या कपड्यांत होता, अंगावर कोरडं चिखलं लागलं होतं. तो लांडग्यासारखा, डोळ्यांच्या कोप-यांतून बघंत होता. थोडक्यांत तो अगदीच अप्रिय वाटंत होता. त्याला बघून असं म्हणता आल असतं, की तो शहरांतला एखादा भिकारी आहे, जसे मंदिराच्या गच्चीवर किंवा खालच्या घाणेरड्या शहराच्या गर्दीत दिसतांत.
बरांच वेळ शांतता राहिली, पिलातकडे आणलेल्या त्या माणसाच्या विचित्र व्यवहारानेंच ह्या शांततेला भंग केलं. त्याच्या चेह-याचा रंग बदलून गेला, तो ठेचकाळला. जर आपल्या घाणेरड्या हाताने त्याने टेबलाचा कोपरा नसतां धरला, तर तो पडलांच असतां.
“काय झालंय?” पिलातने त्याला विचारलं.
“काही नाही,” लेवी मैथ्यूने उत्तर दिलं आणि असं तोंड केलं, जणु काहीतरी गिळतोय. त्याची अशक्त, उघडी, घाणेरडी मान किंचित फुगून पुन्हां सामान्य झाली.
“तुला झालं काय आहे, उत्तर दे,” पिलातने पुन्हां विचारलं.
“मी थकलोय,” लेवीने उत्तर दिलं आणि निराशेने फरशीकडे बघू लागला.
“बस,” पिलातने त्याला विनंतीच्या नजरेने बघून खुर्चीकडे बोट दाखवलं.
लेवीने अविश्वासाने पिलातकडे बघितलं, तो खुर्चीकडे जाऊं लागला. घाबरंत-घाबरंत त्याने खुर्चीच्या सोनेरी हातांना हात लावला आणि मग खुर्चीच्या ऐवजी जवळंच फरशीवर बसून गेला.
“सांग, तू खुर्चीवर कां नाही बसला?” पिलातने विचारलं.
“मी घाणेरडा आहे, माझ्या बसण्याने खुर्ची घाण होईल,” लेवीने फरशीकडे बघंत उत्तर दिलं.
“आता तुला काहीतरी खायला देतील.”
“मला काहीच खायचं नाहीये,” लेवीने उत्तर दिलं.
“खोटं कां बोलतोय?” पिलातने शांतपणे विचारलं, “तू दिवसभर, कदाचित जास्तंच, काहीही खाल्लेलं नाहीये. ठीक आहे, नको खाऊ. तुला ह्याच्यासाठी बोलावलंय की मला तुझा चाकू बघायचांय.”
“जेव्हां मला इथे आणंत होते, तेव्हां शिपायांने हिसकावून घेतला.” लेवीने उत्तर देऊन निराशेने म्हटलं, “तुम्हीं मला तो परत देऊन द्या. मला त्याच्या मालकाला परंत करायचांय. मी तो चोरला होता.”
“कशासाठी?”
“दोर कापायला,” लेवीने उत्तर दिलं.
“मार्क!” न्यायाधीश ओरडला आणि सेनाध्यक्ष स्तंभांच्याजवळ प्रकट झाला, “ह्याचा चाकू मला दे.”
सेनाध्यक्षाने कंबरेंत अडकवलेल्या दोन म्यानींपैकी एकीतून घाणेरडा, ब्रेड कापायचा सुरा काढला आणि न्यायाधीशाला दिला, आणि स्वतः निघून गेला.
“चाकू घेतला कुठून होता?”
हेब्रोन गेट जवळ असलेल्या बेकरीतून, जसंच शहरांत घुसतां...डावीकडे...”
पिलातने त्या चाकूच्या चौड्या पात्याकडे पाहिलं. बोटाने त्याची धार तपासली, माहीत नाही कां, आणि म्हणाला, “चाकूची काळजी नको करूं, तो दुकानांत परंत दिला जाईल. आता मला दुसरी गोष्ट सांग : मला तू तो बस्ता दाखव जो तू बरोबर घेऊन फिरतोस, आणि ज्याचावर येशुआचे शब्द लिहिले आहेत!”
लेवीने तिरस्काराने पिलातकडे बघितलं आणि इतक्या कटुतेने हसला की त्याचा चेहरा वाकडा-तिकडा झाला.    
“सगळं हिसकावून घेशील? त्याची शेवटची आठवण सुद्धां, जी माझ्याकडे आहे?” त्याने विचारलं.
“मी तुला हे नाही म्हटलंय की दे!’, पिलातने उत्तर दिलं, “मी म्हटलं, ‘दाखव!’”
लेवीने आपल्या झोळ्यांत हात घातला आणि ताडपत्रीचा एक तुकडा काढला. पिलातने तो घेतला, उघडला, प्रकाशासमोर धरला आणि डोळे बारीक करून शाईने लिहिलेल्या आडव्या-तिरप्या चिन्हांना समजण्याचा प्रयत्न करू लागला. ह्या वाकड्या-तिकड्या रेघोट्यांना समजणं कठीण होतं, आणि पिलात डोळे बारीक करून ताडपत्रावर वाकून रेघांवर बोट फिरवूं लागला. शेवटी त्याला समजलं की ताडपत्र काही विचारांची, म्हणींची, काही तारखांची, काही निष्कर्षांची, कवितांची असम्बद्ध श्रूंखला आहे. त्यातील काही पिलातला वाचतां आलं : मृत्यु नाही...काल आम्हीं मधुर वसंती बकुरोती7 खाल्ले...तणावामुळे चेहरा विकृत करंत पिलातने डोळे बारीक करंत वाचलं : आम्ही जीवनाची स्वच्छ नदी पाहू8...मानवता पारदर्शी काचाने सूर्याकडे बघेल...
इथे पिलात थरथरला. ताडपत्रावर लिहिलेल्या शेवटच्या ओळींत त्याने वाचलं : ‘…महान पाप...कायरता.
पिलातने ताडपत्र गुंडाळलं आणी झटक्यांत लेवीकडे दिलं.
“घे,” त्याने म्हटलं आणि थोडावेळ चूप राहून पुढे म्हणाला, “मी बघतोय की तू शिकलेला वाटतोय. तुला फाटक्या कपड्यांत, बिना घरा-दाराचं राहण्याची काही गरंज नाहीये. सीज़ेरियामधे माझं एक मोट्ठं वाचनालय आहे, मी खूप धनवान आहे, आणि मला तुझ्या योग्यतेचा वापर करायचांय. तू जुने लेख वाचशील, समजावशील आणि त्यांना सांभाळून ठेवशील. खाण्या-पिण्याची कमतरता राहणार नाही.”
लेवी उठून उभा राहिला आणि म्हणाला, “नाही, मला नाही जायचं.”
“कां?” न्यायाधीशाने विचारलं. त्याचा चेहरा काळवंडला, “तू माझा तिरस्कार करतोस? मला घाबरतोस?”
लेवीच्या चेह-यावर तेंच कटु हास्य पसरलं. तो म्हणाला:
“नाही, कारण की तू मला घाबरंत राहशील. त्याला मारून टाकल्यानंतर माझ्याकडे बघणं तुझ्यासाठी सोपं नाहीये.”
“चुप राहा,” पिलात म्हणाला, “पैसे घे.”
लेवीने डोकं हालवंत नाही म्हटलं.
न्यायाधीश पुन्हां म्हणाला, “मला माहितीये, की तू स्वतःला येशुआचा शिष्य समजतोस. पण मी तुला सांगतोय की त्याच्या शिकवणीतूंन तुला काहीही समजलेलं नाहीये. जर असं असतं, तर तू माझ्याकडून नक्कीच काही न काही घेतलं असतं. जरा आठवं, मरायच्याआधी तो काय म्हणाला होता – की तो कुणालासुद्धां दोष देत नाहीये,” पिलातने अर्थपूर्ण ढंगाने बोट वर केलं, त्याचा चेहरा थरथरू लागला, “आणि त्याने स्वतः सुद्धां काही न काही नक्कीच घेतलं असतं. तू फार कठोर आहेस, पण तो कठोर नव्हता. तू जाशील कुठे?”
लेवी अचानक टेबलाजवळ आला. त्यावर दोन्हीं हात ठेवून उभा राहिला आणि जळजळत्या नेत्रांनी पिलातकडे बघंत कुजबुजला, “न्यायाधीश, तू जाणून घे की मी येर्शलाइममधे एका माणसाची हत्या करणार आहे. मी तुला हे अश्यासाठी सांगतोय, की तुला कळलं पाहिजे, की रक्ताच्या नद्या अजूनही वाहतील.”
“मलापण माहितीये, की वाहतील,” पिलातने म्हटलं, “तू मला जरासुद्धा विस्मित नाही केलं. नक्कीच तू मला मारणार आहेस?”
“तुला मारणं मला शक्य नाहीये,” लेवीने उत्तर दिलं. दात खांत, हसंत तो पुढे म्हणाला, “मी इतका मूर्ख नाहीये, की असली गोष्टसुद्धां मनांत आणेन, पण मी किरियाथच्या जूडासचे तुकडे-तुकडे करून टाकीन, माझं शेष जीवन ह्याच कामासाठी समर्पित करेन.”
न्यायाधीशाच्या डोळ्यांत समाधान दिसलं, आणि त्याने खुणेने लेवी मैथ्यूला आपल्या आणखी जवळ बोलावंत म्हटलं, “हे तुला नाही करता येणार, तू ह्याबद्दल काळजीसुद्धां करू नकोस. जूडासला आजच रात्री मारून टाकण्यांत आलंय.”
लेवी उसळला. रानटीपणाने बघंत तो ओरडला, “कुणी केलंय हे?”
“ईर्ष्या नको करूं,” दात दाखवंत पिलातने उत्तर दिलं आणि त्याने आपले हात चोळले, “मला भीति आहे, की तुझ्याशिवाय त्याचे आणखीही प्रशंसक होते.”
“हे कुणी केलंय?” लेवीने कुजबुजंत पुन्हां आपला प्रश्न विचारला.
पिलातने त्याला उत्तर दिलं:
“हे मी केलंय.”
लेवीचं तोंड उघडंच राहिलं. त्याने रानटीपणाने न्यायाधीशाकडे पाहिलं. पिलात म्हणाला:
“हे, जे काही मी केलय, खूपंच कमी आहे, पण केलंय हे मीच...” आणि पुढे म्हणाला, “तर, आता काही घेशील किंवा नाही?”
लेवीने काही विचार करून सौम्यपणे म्हटलं, “मला काही कोरे ताडपत्र दे,”
एक घण्टा झाला. लेवी महालांत नव्हता. आता उषःकालीन स्तब्धतेला फक्त पहारेक-याच्या पावलांचा आवाजंच भंग करंत होता. चंद्र शीघ्रतेने फिक्कट पडंत होता, आकाशाच्या दुस-या कोप-यावर उषःकालीन तारा चमकंत होता. दिवे कधीचं विझले होते. बिछान्यावर पडलेला न्यायाधीश एक हात गालाखाली ठेवून गाढ झोपला होता, शांतपणे श्वासोच्छ्वास करंत होता. त्याच्याजवळ झोपला होता बांगा.
अश्या प्रकारे निस्सान महिन्याच्या पंधराव्या तिथीच्या पहाटेचं स्वागत केलं जूडियाच्या न्यायाधीश पोंती पिलातने.



********

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें