रविवार, 12 नवंबर 2017

मास्टर आणि मार्गारीटा - 30



तीस


अखेरचा निरोप


“माहितीये,” मार्गारीटा म्हणंत होती, “काल रात्री तू झोपल्यावर मी त्या अंधाराबद्दल वाचंत होते, जो भूमध्यसागरातून उठला होता...आणि त्या प्रतिमा, आह, त्या सोनेरी प्रतिमा...माहीत नाही कां, त्या मला चैन नाही घेऊं देत. मला वाटतंय, की आत्तासुद्धां पाउस येणार आहे. तुला वातावरणाची प्रसन्नता जाणवतेय का?”
“हे सगळं गोड आणि हवंहवंस आहे,” मास्टरने सिगरेटचा कश घेऊन हाताने धूर सारंत म्हटलं, “ह्या प्रतिमासुद्धा...देव त्यांची रक्षा करो. पण पुढे काय होणार आहे, मला काही कळंत नाहीये!”
हा वार्तालाप सूर्यास्ताच्या वेळेस होत होता, तेव्हांच, जेव्हां छतावर वोलान्दकडे लेवी मैथ्यू आला होता. तळघराच्या घराची खिडकी उघडी होती, आणि जर कोणी तिच्यातून डोकावून बघितलं असतं, तर त्याला हे बघून आश्चर्य वाटलं असतं, की हे, वार्तालाप करणारे, किती विचित्र दिसताहेत. मार्गारीटाच्या अंगावर फक्त एक काळा लांब रेनकोट होता, आणि मास्टर आपल्या हॉस्पिटलच्याच कपड्यांत होता. ह्याच कारण हे होतं, की मार्गारीटाजवळ घालण्यासाठी काही दुसरं नव्हतंच, कारण तिच्या सगळ्या वस्तू त्या आलीशान महालांत होत्या, आणि, जरी तो आलीशान महल इथून बिल्कुल दूर नव्हता, पण, निश्चितंच, तिथे जाऊन आपल्या वस्तू घेऊन येण्याचा प्रश्नंच नव्हता. मास्टरचे पण सगळे कपडे तिथेच अलमारीत होते, जणु तो कुठे गेलेलाच नव्हता; त्यालापण, बस, कपडे घालणं आवश्यक नाही वाटलं. तो मार्गारीटासमोर हा विचार मांडंत होता, की बस लवकरंच कोणचातरी अद्भुत चमत्कार होणारंच आहे. हिवाळ्याच्या त्या रात्रीनंतर त्याने पहिल्यांदा आपल्या हाताने दाढी केली होती. हॉस्पिटलमधे त्याची दाढी मशीनीने करण्यांत येत होती.
खोली खूप विचित्र दिसंत होती. तिच्या अस्तव्यस्ततेत काहीही शोधणं बरंच कठीण होतं. गालिच्यावर हस्तलिखितांचा ढीग पडला होता. खुर्चीवर एक चुरगरळेलं पुस्तक पडलं होतं. गोल टेबलावर खाण्यापिण्याच्या वस्तूंबरोबर काही बाटल्यासुद्धां होत्या. हे सगळं कुठून आणि कसं आलं, ह्याच्याबद्दल ना तर मास्टरला माहीत होतं, ना ही मार्गारीटाला. जेव्हां ते झोपेतून उठले, तेव्हां हे सगळं टेबलवर ठेवलेलं होतं.
शनिवारच्या संध्याकाळ पर्यंत मस्त झोप घेतल्यानंतर मास्टर आणि मार्गारीटाला खूप उत्साही वाटंत होतं, आणि कालच्या अद्भुत घटनांची आठवण फक्त एकंच गोष्ट करून देत होती – दोघांचंही डावं कानशील दुखंत होतं. दोघांच्याही मानसिकतेंत बरेंच बदल झाले होते, हे त्या तळघरांत होत असलेल्या गोष्टी ऐकून कोणीही सांगू शकलं असतं. पण ऐकणारं कुणी नव्हतंच. हे अंगण अशासाठीसुद्धां चांगलं होतं, की ते नेहमीच रिकामं असयाचं. दररोज लिण्डनची हिरवीगार झाडं आणि खिडकीच्या बाहेरचे विलो वसंती सुगंध फेकायचे, जिला वाहंत असणारी हवा तळघरापर्यंत घेऊन यायची.
“छिः छिः!” अचानक मास्टर उद्गारला, “नुसता विचार करूनंच किती विचित्र वाटतंय,” त्याने उरलेली सिगरेट ऐश-ट्रेमधे विझवली आणि दोन्ही हातांनी डोकं धरून म्हणाला, “नाहे, ऐक, तू तर हुशार आहेस, आणि पागलसुद्धां नव्हती. तुला काय ह्या गोष्टीची पूर्ण खात्री आहे कां, की काल आपण सैतानाकडे होतो?”
पूर्ण खात्री आहे,” मार्गारीटाने उत्तर दिलं.
मास्टर उपहासाने म्हणाला, “नक्की, नक्कीच! आता एकाच्या ऐवजी दोन-दोन पागल झालें! नवरापण आणि बायकोसुद्धां!” त्याने आकाशाकडे हात उंचावून ओरडंत म्हटलं, “नाही, सैतान जाने हे काय आहे! सैतान, सैतान, सैतान!”
उत्तर देण्याऐवजी मार्गारीटा दीवानवर लोळूं लागली, ती आपले अनवाणी पाय जोरजोराने हालवंत हसू लागली आणि मग किंचाळली, “ओह, नाही! पुरे! सहन नाही होत! बघ तर खरं तू कसा दिसतोयंस?”
बराच वेळ हसल्यावर जेव्हां मास्टर लाजून आपले हॉस्पिटलचे अंतर्वस्त्र सांभाळंत होता, मार्गारीटा गंभीरतेने म्हणाली, “तू नकळतंच खरं सांगितलंय; सैतानालाच माहीत आहे, की ते काय होतं, आणि सैतान...माझ्यावर विश्वास ठेव, सगळं ठीक करेल!” तिचे डोळे अचानक चमकू लागले, ती उड्या मारंत आपल्याच जागेवर नाचू लागली आणि ओरडू लागली, “मी कित्ती भाग्यशाली आहे, मी कित्ती भाग्यशाली आहे...मी कित्ती भाग्यशाली आहे की त्याच्याबरोबर करार केला! ओह, सैतान, सैतान! माझ्या लाडक्या, तुला चेटकिणीसोबत राहावं लागेल.” ह्याच्यानंतर ती मास्टरच्या छातीला बिलगली आणि आवेगाने त्याच्या ओठांचे, नाकाचे आणि गालांचे मुके घेऊं लागली. काळ्या, विस्कटलेल्या केसांच्या लटा मास्टरवर खेळंत होत्या आणि त्याचं कपाळ आणि ओठ ह्या चुम्बनांनी जळजळ करूं लागले.
“तू खरंच चेटकिणीसारखी झालीये.”
“मी नाहीपण म्हणंत नाहीये!” मार्गारीटाने उत्तर दिलं, “मी चेटकीण आहे, आणि त्यामुळे फार खूष आहे.”
“बरं, ठीक आहे,” मास्टर म्हणाला. “चेटकीण तर चेटकीणं. खूप सुन्दर आणि शानदार आहेस! मला कदाचित हॉस्पिटलमधून चोरून आणल आहेस! हे पण खूप छान आहे! इथे आणून सोडून गेले, चला, हे पण कबूल आहे...हापण विचार कर, की आपल्याला पुन्हांतर नाही पकडणार, पण देवासाठी, मला येवढं सांग, की आपण जगूं कसे? हे मी ह्याच्यासाठी विचारतोय, की मला तुझी काळजी आहे, विश्वास ठेव.”
ह्याच वेळेस खिडकींत एक जोडी जोडे आणि धारी-धारीच्या पैण्टच्या खालचा भाग दिसला. मग ही पैण्ट गुडघ्यांवर वाकली, आणि दिवसाच्या प्रकाशाला कोणाच्या तरी मागच्या जाड्या भागाने झाकलं.
“अलोइज़ी, तू घरी आहेस कां?” एक आवाज ऐकू आला.
“बघ, झालं सुरू,” मास्टर म्हणाला.
मार्गारीटाने खिडकीजवळ येत म्हटलं, “अलोइज़ी?...काल संध्याकाळी त्याला पकडून नेलं. कोण विचारतंय? तुमचं नाव काय आहे?”
“गुडघे आणि शरीराचा मागचा भाग गायब झाले, आणि गेट बंद व्हायचा आवाज आला, मग सगळं सामान्य झालं. मार्गारीटा दीवानवर पडून इतकं हसली, की तिच्या डोळ्यांत अश्रू आले. पण जेव्हां ती शांत झाली, तेव्हां तिच्या चेह-याचा भाव एकदम बदलला. ती खूप गंभीरतेने बोलंत दीवानवरून उतरून गुडघ्यांवर चालंत मास्टरच्या जवळ आली आणि त्याच्या डोळ्यांत बघंत त्याचं डोकं कुरवाळू लागली.                           
“तुला कित्ती त्रास सोसावा लागला, कित्ती दुःख झेलावं लागल, माझ्या लाडक्या! हे फक्त मलांच माहीतीये. बघ, तुझ्या केसांत चांदी झळकतीये आणि ओठांच्याजवळ सुरकुत्या पडल्या आहेत. माझ्या लाडक्या, माझ्या आपल्या, आता कोणत्याच गोष्टीची काळजी नको करू. तुला खूप काही विचार करावा लागलाय आणि आता तुझ्यासाठी विचार करेन मी! मी वचन देते, वचन देते की सगळं ठीक होईल, जेवढी अपेक्षा आहे, त्याच्यापेक्षांही जास्त...”
“मला कोणत्याच गोष्टीची भीती नाहीये, मार्गो,” मास्टरने लगेच उत्तर दिलं आणि त्याने डोकं वर उचललं तर मार्गारीटाला वाटलं, की तो अगदी तस्साचं आहे, जसा तेव्हां होता, जेव्हां तो रचना करंत होता त्याची - जे कधी बघितलं नव्हतं, पण ज्याच्याबद्दल, कदाचित, त्याला माहीत होतं, की ते झालं होतं, “मी घाबरंतपण नाही, कारण की मी सगळं सहन केलंय, त्यांनी मला खूप भीती दाखवली, आता आणखी कोणच्याही गोष्टीने घाबरवूं शकंत नाही. पण मला तुझ्यासाठी दुःख वाटतंय, मार्गो! हेच महत्वपूर्ण आहे, म्हणूनंच मी पुन्हां-पुन्हां जोर देतोय. स्वतःला सांभाळ! एका आजारी आणि गरीब माणसासाठी तू आपलं जीवन कां बर्बाद करतेस? पुन्हां आपल्या घरी चालली जा! मला तुझी कीव वाटते...म्हणूनंच असं म्हणतोय.”
“आह! तू...तू...” विस्कटलेल्या केसांचं आपलं डोकं हालवंत मार्गारीटा कुजबुजली, “तू विश्वास नाही करंत, दुर्दैवी माणसा! तुझ्यासाठी कालची सम्पूर्ण रात्र मी नग्नावस्थेत थरथरंत राहिले! मी आपलं स्वरूप बदलून टाकलं, कित्तीतरी महिने मी अंधा-या कोठडीत बसून एकाच गोष्टीबद्दल – येर्शलाइमवर आलेल्या वादळाबद्दल विचार करंत राहिले, रडून-रडून माझे डोळे गेले, आणि आता...जेव्हां सुखाचे दिवस येण्यातंच आहेत, तर तू मला दूर लोटतो आहेस? मी चालली जाईन, चालली जाईन मी, पण लक्षांत ठेव, तू निष्ठुर आहेस! त्यांनी तुझी आत्मा चिरडून टाकलीये!”
मास्टरच्या हृदयांत कटु-कोमल भावनांनी गर्दी केली आणि न जाणे कां, तो मार्गारीटाच्या केसांत आपला चेहरा लपवून रडू लागला. ती रडतां-रडतां कुजबुजंत होती, तिची बोटं मास्टरची कानशिलं कुरवाळंत राहिली.
“हो, चांदीचे तार, चांदीचे, माझ्या डोळ्यांदेखत ह्या डोक्याला बर्फ झाकतोय. आह! दुःखाच्या ओझ्याने दबलेलं माझं हे डोकं. बघ, कसे झालेयंत तुझे डोळे! त्यांत वाळवण्ट आहे...आणि खांदे, खांद्यांवर कित्ती ओझं आहे...तोडून टाकलंय, तोडून टाकलंय त्यांनी तुला,” मार्गारीट असम्बद्ध शब्द बडबडंत राहिली, रडतां-रडतां ती थरथरू लागली.
तेव्हां मास्टरने आपले डोळे पुसले, मार्गारीटाला उभं केलं, स्वतःसुद्धां उभा राहिला आणि निश्चयपूर्वक म्हणाला, “बस! पुरे! तू मला लाजवलंय. आता मी कधीच हिम्मत नाही सोडणार आणि हा वादपण पुन्हां सुरूं नाही करणार; तूसुद्धां शांत हो. मला माहितीये, आपण दोघं आपल्या मानसिक आजाराने त्रस्त आहोत! कदाचित मी माझी मानसिकता तुला दिलीये...तर, आपण एकत्र सगळ झेलूं...”
मार्गारीटा मास्टरच्या कानाजवळ आपले ओठ आणंत म्हणाली, “तुझ्या जीवनाची शप्पथ, तू रचलेल्या भविष्यवेत्ताच्या मुलाची शप्पथ, सगळं ठीक होईल.”
मास्टरने हसंत म्हटलं, “बस...बस, गप्प बस. जेव्हां लोक पूर्णपणे लुटले जातांत, जसे आपण आहोत, तेव्हां कोणच्यातरी अलौकिक शक्तीतंच आधार शोधतांत! बर, मी पण हे करायला तयार आहे.”
“ओहतर तू...पहिल्या सारखा...हसतो आहेस,” मार्गारीटा म्हणाली, “तू आपल्या अवजड शब्दांबरोबर सैतानाकडे जा. लौकिक शक्ती किंवा अलौकिक शक्ती – काय सगळ्या एकसारख्या नसतांत? मला भूक लागलीये!”
ती मास्टरचा हात धरून त्याला टेबलाजवळ घेऊन गेली.
“मला विश्वास नाहीये, की ह्या खाण्यापिण्याच्या वस्तू इतक्यांतंच जमिनींत गडप होणार नाही, किंवा उडून खिडकीच्या बाहेर नाही चालल्या जाणार,” त्याने आता पूर्णपणे शांत होत म्हटलं.
“त्या नाही उडणार!”
तेवढ्यांत खिडकींत एक अनुनासिक आवाज ऐकू आला, “तुम्हांला शांती लाभो!”1  
मास्टर थरथरला, पण आता पर्यंत चमत्कारांची सवय झालेली मार्गारीटा ओरडली, “हो, हा अजाज़ेलो आहे! आह, कित्ती छान, कित्ती प्रिय आहे ही जाणीव!” ती मास्टरच्या कानांत कुजबुजली, “बघ, ते आपल्याला विसरले नाहीयेत!” ती दार उघडायला पळाली.
“तू कमीत कमी स्वतःला नीट झाकून तर घे,” मागून मास्टर ओरडला.
“जाऊ दे रे!” आता मार्गारीटा प्रवेशकक्षांत पोहोचली होती.
आता अजाज़ेलो अभिवादन करंत होता, मास्टरला नमस्कार करंत होता, त्याच्याकडे आपल्या चमकणा-या तिरप्या डोळ्याने बघंत होता, आणि मार्गारीटा आनंदाने ओरडली, “आह, मी कित्ती खूष आहे! जीवनांत येवढी खूष मी कधीच नव्हते! पण, माफ कर, अजाज़ेलो, माझ्या अंगावर कपडे नाहीत!”
अजाज़ेलो म्हणाला, की तिने काळजी करू नये, त्याने न केवळ बिनकपड्यांच्या, पण बिनचामडीच्या बायकासुद्धां पाहिल्या आहेत; आणि तो आनंदाने टेबलाजवळ बसला, आणि शेकोटीच्याजवळ, कोप-यांत, त्याने काळ्या ब्रोकेडमधे गुंडाळलेलं एक पैकेट ठेवून दिलं.
मार्गारीटाने अजाज़ेलोच्या प्याल्यांत कोन्याक भरली, जी तो लगेच पिऊन गेला. मास्टर त्याच्याकडे एकटक बघंत होता आणि मधून-मधून टेबलाच्याखाली आपल्या डाव्या हाताला चिमटासुद्धां काढंत होता. पण ह्या चिमट्यांनी काही फायदा नाही झाला. अजाज़ेलो हवेत विरघळून नाही गेला. ह्या लाल केस असलेल्या ठेंगण्या माणसांत काहीही विचित्र नव्हतं, फक्त त्याचा डोळा थोडा पांढरा होता; पण हे ज़रूरी तर नाही, की त्याच्या जादूशी सम्बंध असलाच पाहिजे. त्याचा पोषाकपण साधारणंच होता – काही चोगा, किंवा कोट! जर नीट विचार केला, तर असं पण असतं. कोन्याकसुद्धां तो सहजपणे पीत होता – इतर सगळ्या सभ्य माणसांसारखा, गटगट, काही न खाता. ह्या कोन्याकनेच मास्टरचं डोकं गरगरूं लागल आणि तो विचार करू लागला:
“नाही, मार्गारीटा बरोबर म्हणतेय! माझ्या समोर सैतानाचा दूतंच बसला आहे. मीच तर आत्ता परवाच रात्री इवानसमोर सिद्ध केलं होतं, की पत्रियार्शीवर तो सैतानाला भेटला होता आणि आता माहीत नाही कां, ह्या विचाराला घाबरून सम्मोहन आणि भ्रमांबद्दल बडबडू लागलो. कुठले आलेत सम्मोहक!”
तो अजाज़ेलोकडे लक्ष देऊन बघंत होता आणि त्याला विश्वास झाला की त्याच्या डोळ्यांत एक दृढ निश्चय आहे, काहीतरी विचार आहे, जो योग्य वेळ येईपर्यंत तो नाही सांगणार, तो फक्त भेटायला नाही आलाय, त्याला काही विशेष कामाने पाठवलंय,” मास्टरने विचार केला.
कोन्याकचा तिसरा पैग पिऊन, जिचा त्याचावर काहीही असर नव्हता झाला, पाहुण्याने आपली गोष्ट सुरू केली, “हे तळघर खूप आरामशीर आहे, सैतान मला घेऊन जावो! मी फक्त एकाच गोष्टीचा विचार करतोय, की ह्याच्यांत राहून करायचं काय?”
“हेच तर मीपण म्हणतोय,” मास्टरने स्मित करंत उत्तर दिलं.
“तू मला कां त्रास देतोय, अजाज़ेलो?” मार्गारीटाने विचारलं, “काहीही करून घेऊं!”
“तुम्ही काय म्हणताय?” अजाज़ेलो विस्मयाने म्हणाला, “माझ्या डोक्यांत तुम्हाला त्रास देण्याचा विचारपण नाही आला. मी तर स्वतःच म्हणतोय – काहीही करून घेऊं. हो, मी तर विसरूनंच गेलो होतो, मालकांनी तुम्हांला सलाम पाठवलाय आणि हे सांगायला पाठवलंय, की ते तुम्हांला एक छोटासा फेरफटका मारायचं निमंत्रण देताहेत...नक्कीच...तुमची इच्छा असल्यास. तुम्हीं काय म्हणताय?” मार्गारीटाने टेबलाच्या खाली मास्टरला पायाने धक्का दिला.
“आनंदाने,” मास्टरने अजाज़ेलोला परखंत उत्तर दिल, आणि तो पुढे म्हणाला:
“आम्हांला आशा आहे, की मार्गारीटा निकोलायेव्नापण नाही म्हणणार नाही?”
“मी तर कधीच नाही म्हणणार नाही,” मार्गारीटाने उत्तर दिलं आणि तिचा पाय पुन्हां मास्तरच्या पायावर रांगला.
अजाज़ेलो खिदळला, “खूप छान! मला असं आवडतं! एक-दोन आणि आम्ही तय्यार आहोत! नाहीतर तेव्हां...अलेक्सान्द्रोव्स्की पार्कमधे...आता तसं नाहीये.”
“आह, त्याची आठवण नका देऊं, अजाज़ेलो! तेव्हां मी मूर्ख होते. पण त्यासाठी फक्त मलांच दोष नको द्यायला – रोज-रोज तर कोणी सैतानी शक्तीला भेटंत नाही.”
“काय म्हणता!” अजाज़ेलोने पुष्टी करंत म्हटलं, “जर रोज-रोज भेटतां आलं तर चांगलं झाल असतं!”
“मला स्वतःलापण गति आवडते,” मार्गारीटा उत्तेजनेने म्हणाली, “आवडते गति आणि नग्नता. जसं पिस्तौलने – फट्! आह, काय नेम आहे ह्याचा,” मार्गारीटा मास्टरकडे बघंत म्हणाली, “सत्ती उशीच्या खाली, आणि कोणत्याही चिन्हांवर गोळी...” मार्गारीटाला नशा चढंत होता, ज्याने तिचे डोळे जळजळ करंत होते.
“मी पुन्हां विसरलो...” अजाज़ेलो ओरडला आणि त्याने आपल्या कपाळावर हात मारंत म्हटलं, “एकदम विसरलो. मालकांनी तुमच्यासाठी भेट पाठवली आहे,” आता तो मास्टरकडे वळला, “वाइनची ही बाटली. कृपा करून लक्ष द्या, ही तीच वाइन आहे जी जूडियाचा न्यायाधीश प्यायचा. फालेर्नो वाइन.”
स्वाभाविकंच होतं की ह्या दुर्लभ वस्तूने मास्टर आणि मार्गारीटाला बरंच आकर्षित केलं. अजाज़ेलोने काळ्या ब्रोकेडमधे गुंडाललेली ती गच्च भरलेली बाटली काढली. दारूचा वास घेऊन तिला प्याल्यांमधे ओतण्यांत आलं, त्याच्या आरपार खिडकीतून बाहेर वादळाच्या आधी लुप्त होत असलेला उजेड पाहिला. हे पण बघितलं की सगळंच लाल दिसंत होतं.
“वोलान्दच्या आरोग्यासाठी!”
तिघांनी आपले-आपले प्याले ओठांना लावले आणि एक-एक मोट्ठा घोट घेतला.
मास्टरच्या डोळ्यांसमोरून लगेच वादळाआधीचा प्रकाश लुप्त व्हायला लागला, त्याचा श्वास थांबू लागला, त्याला वाटलं की आता शेवटची घटका आलीये. त्याने हेसुद्धां बघितलं की प्रेतासारख्या पिवळ्या पडलेल्या मार्गारीटाने असहाय होऊन त्याच्याकडे हात केले, टेबलावर डोकं आपटलं आणि मग फरशीवर घसरू लागली.
“ विषारी...” मास्टर येवढंच ओरडला. त्याने टेबलावरून चाकू उचलून अजाज़ेलोवर फेकायचा प्रयत्न केला, पण त्याचा हात निढाल होऊन टेबलक्लॉथच्या खाली घसरला, आजूबाजूच्या सगळ्या वस्तू काळ्या पडल्या, आणि सगळंच लुप्त झालं. तो पाठीवर पडला. पडता-पडता अलमारीला घासून त्याच्या कानशिलावरची चामडी सोलली गेली.
जेव्हां विषाचे शिकार शांत झाले, तेव्हां अजाज़ेलोने आपलं काम सुरू केलं. सगळ्यांत आधी तो खिडकीच्या बाहेर आला आणि काही क्षणांतच त्या आलीशान घरामधे गेला, जिथे मार्गारीटा राहायची. नेहमी व्यवस्थितपणे काम करणारा अजाज़ेलो ही खात्री करून घेणार होता, की सगळं व्यवस्थित झालंय किंवा नाही. आणि, सगळं अगदी व्यवस्थित झालेलं होतं. अजाज़ेलोने बघितलं की कशी एक उदास, नवरा परंत येण्याची वाट बघंत असलेली महिला आपल्या शयनगृहातूंन निघाली, एकदम पिवळी धम्म् झाली, आणि छाती धरून असहायतेने ओरडली, “नताशा! कोणी आहे का...माझ्याकडे ये!” ती स्टडीरूममध्ये जाण्याआधीच ड्राइंगरूमच्या फरशीवर पडली.
“सगळं ठीक आहे,” अजाज़ेलोने म्हटलं. पुढच्याच क्षणी तो बेशुद्ध पडलेल्या प्रेमिकांच्या जवळ होता.
मार्गारीटा तोंडावर गालीच्यावर पडली होती. आपल्या पोलादी हातांनी अजाज़ेलोने तिला वळवलं, जणु एखाद्या बाहुलीला फिरवतोय. आणि तिच्याकडे बघूं लागला. बघतां-बघतां विष दिलेल्या महिलेचा चेहरा त्याच्या डोळ्यांसमोर बदलूं लागला. घुमडंत येणा-या वादळी अंधारांतसुद्द्धां स्पष्ट दिसंत होतं, की थोड्या वेळासाठी चेटकीपणामुळे झालेलं डोळ्याचं तिरकसपण, क्रूरतेचे भाव आणि नाका-डोळ्यांची उन्मादकता गायब झाले. मृत महिलेच्या चेह-यावर सौम्यतेचा भाव आला. तिचे उघडे दात लोलुपतेच्या ऐवजी आता स्त्रीसुलभ पीडा दर्शवंत होते. तेव्हां अजाज़ेलोने तिच्या पाढ-या दातांना वेगळं केलं आणि तिच्या तोंडांत त्याच वाइनचे काही थेंब टाकले, ज्याने तिला मारून टाकलं होतं. मार्गारीटाने उसासा घेतला, अजाज़ेलोच्या मदतीशिवाय उठू लागली आणि बसून अशक्त आवाजांत विचारूं लागली, “कां अजाज़ेलो, कशाला? तू मला काय करून टाकलंय?”
तिने पडलेल्या मास्टरकडे पाहिलं, थरथरली आणि कुजबुजली:
“मला ही अपेक्षा नव्हती...हत्यारा!”
“नाही, बिल्कुल नाही,” अजाज़ेलोने उत्तर दिलं, “आत्ताच तोसुद्धा उठेल. आह, तुम्हीं इतक्या बेहाल कां होता आहे?”
मार्गारीटाने लगेच त्याचा विश्वास केला, लाल केसवाल्या सैतानाचा स्वरंच इतका आश्वासक होता, मार्गारीटाने उडी मारली, जीवंत आणि शक्तीने भरपूर, आणि तिने पडलेल्या मास्टरला वाइनचे थेंब पाजण्यांत अजाज़ेलोची मदत केली. डोळे उघडल्यावर मास्टरने निराशेने इकडे-तिकडे पाहिलं आणि तिरस्काराने तोच शब्द उच्चारला, “विषारी...”
“आह! चांगल्या कामाचा पुरस्कार साधारणपणे अपमानाच्या स्वरूपातंच मिळते,” अजाज़ेलोने उत्तर दिलं, “तू आंधळा आहेस कां? पण तू लगेच बरा होशील.”
आता मास्टर उठला. निरोगी आणि स्वच्छ डोळ्यांनी इकडे-तिकडे बघंत विचारू लागला, “ह्या नवीन चमत्काराचा काय अर्थ आहे?”
“ह्याचा अर्थ आहे,” अजाज़ेलोने उत्तर दिलं, “की वेळ आलीये, विजा कडकडू लागल्याहेत, ऐकतोयंस नं? अंधार होतो आहे. घोडे चौफेर उधळंत येताहेत, लहानसा बगीचा हादरतोय. ह्या तळघराचा निरोप घ्या, लवकर निरोप घ्या.”
“ओह, समजतोय,” मास्टरने डोळे विस्फारंत म्हटलं, “तू आम्हांला मारून टाकलंय, आम्हीं मृत आहोत. आह, कित्ती हुशारीचं काम केलंय! कित्ती योग्य वेळेवर केलंय! आता मी तुम्हाला समजतोय.”
अजाज़ेलोने उत्तर दिलं, “कृपा करूनकृपा करून...मी तुम्हांलाच ऐकतोय कां? तुमची प्रेयसी तुम्हांला मास्टर म्हणते, तुम्हीं विचार करा, तुम्हीं कसे मरूं शकता? काय स्वतःला जीवन्त समजण्यासाठी तळघरांतच बसावं लागतं, शर्ट आणि हॉस्पिटलचे अंतर्वस्त्र घालून? हे हास्यास्पद आहे!”
“तुम्हीं जे काही म्हटलं, ते सगळं मला समजलंय,” मास्टर ओरडला, “पुढे काही नका बोलू! तुम्हीं हज्जारदा बरोबर आहांत!”
“महान वोलान्द!मार्गारीटा पुष्टी करंत म्हणाली, “महान वोलान्द! त्याने माझ्यापेक्षा कित्येक पटीने उत्तम गोष्टीचा विचार केला. पण फक्त कादम्बरी, कादम्बरी...” ती ओरडून मास्टरला म्हणाली, “कादम्बरी आपल्या बरोबर घे, कुठेही उडून जात असला तरी!”
“काही गरंज नाहीये,” मास्टरने उत्तर दिलं, “मला ती तोंडपाठ आहे.”
“पण, तू एकही शब्द...तिच्यांतला एकही शब्द विसरणार तर नाही?” मार्गारीटाने प्रियकाराला बिलगून त्याच्या कानशिलावर वाहणारं रक्त पुसंत विचारलं. 
“घाबरू नकोस! आता मी कधीही काहीही नाही विसरणार,” तो म्हणाला.
“तर मग आग!...” अजाज़ेलो ओरडला, “आग ज्याने सगळं सुरूं झालं आणि ज्याने आपण सगळं संपवूं.”
“आग!” मार्गारीटा भयंकर आवाजांत गरजली. तळघराची खिडकी फट्कन उघडली, वा-याने पडदा एकीकडे सरकावून दिला. आकाशांत थोडासा, छानसा कडकडाट झाला. अजाज़ेलोने शेकोटीत तीक्ष्ण नख असलेला हात टाकून एक जळंत असलेलं लाकूड उचललं आणि टेबलक्लॉथला आग लावली. मग दीवानवर पडलेले जुने वर्तमानपत्र जाळले. त्यानंतर हस्तलिखित आणि खिडकीचा पडदा. भविष्याच्या सुखद घोड्याच्या सहलीच्या कल्पनेंत गुंग मास्तरने शेल्फमधून एक पुस्तक टेबलावर फेकलं आनि त्याची पानं फाडून-फाडून जळंत असलेल्या टेबलक्लॉथवर फेकू लागला; पुस्तक त्या प्रसन्न आगीत भडकलं.
“जळून जा, जळून जा, जुनं जीवन!”
“जळून जा, दुःखांनो आणि पीडांनो!” मार्गारीटा ओरडली.
खोली लाल-लाल लपटांनी भरून गेली आणि धुराबरोबरंच तिघेही दारातून बाहेर धावले, दगडाची पायरी चढून ते अंगणांत आले. सगळ्यांत पहिली जी गोष्ट त्यांनी पाहिली, ती होती कॉन्ट्रॅक्टरची स्वयंपाकीण, जी जमिनीवर बसली होती. तिच्या जवळ पडला होता कांदे-बटाट्यांचा ढीग. स्वयंपाकिणीची दशा बघण्यालायक होती. तीन काळे घोडे घराच्या जवळ फुरफुरंत होते, आपल्या खुरांनी माती उधळंत होते, थरथरंत होते. सगळ्यांत आधी मार्गारीटा उडी मारून बसली, त्यानंतर अजाज़ेलो, शेवटी मास्टर.
स्वयंपाकिणीने विह्वळंत क्रॉसचं चिन्ह बनवण्यासाठी हात उचलला, पण घोड्यावर बसलेला अजाज़ेलो गरजला, “हात कापून टाकीन!” त्याने शिट्टी वाजवली आणि घोड्यांनी लिण्डनच्या फांद्यांना तोडंत, वर झेप घेतली आणि काळं ढग चिरंत लुप्त झाले. तेवढ्यांत तळघराच्या खिडकीतून धूर बाहेर निघाला आणि स्वयंपाकिणीचा बारीक, अशक्त आवाज ऐकू आला,
जळतोय!...”
घोडे मॉस्कोच्या घरांच्या छतांच्या वर पोहोचले होते.
“मला शहराचा निरोप घ्यायचाय,” मास्टरने ओरडून अजाजेलोला म्हटलं, जो सगळ्यांत पुढे होता. विजेचा कडकडाट मास्टरच्या वाक्याचा शेवट गिळून गेला. अजाज़ेलोने डोकं हालवलं आणि आपल्या घोड्याला सरपट जाऊं दिलं. उडणा-यांच्या स्वागतासाठी एक ढग तरंगंत आलं, पण त्याने अजूनपर्यंत पाण्याचा शिडकावा नाही केला.
ते दुतर्फा झाडं असलेल्या रस्त्यावर उडू लागले, बघितलं की लोकांच्या लहान-लहान आकृत्या पावसापासून स्वतःला वाचवायला इकडे-तिकडे पळतात आहे. पावसाचे थेंब पडूं लागले होते. ते धुराच्या ढगाच्या वरून उडंत होते – हे होते ग्रिबोयेदोवचे अवशेष. ते शहराच्या वर उडले, ज्याला आता अंधाराने गिळून टाकलं होतं. त्यांच्या वरती विजा चमकंत होत्या. मग घरांच्या छतांची जागा घेतली हिरवळीने, तेव्हां पावसाने त्यांना झोडपलं; उडंत असलेल्या त्या तिन्हीं आकृत्या पाण्याने गच्च भरलेल्या फुग्यांसारख्या दिसू लागल्या.
मार्गारीटाला आधीच उडायचा अनुभव होता, पण मास्टरला – नाही. त्याला हे बघून आश्चर्य झालं, की तो आपल्या लक्ष्याकडे किती लवकर पोहोचलांय – म्हणजे त्याच्याकडे, ज्याचा निरोप त्याला घ्यायचा होता. पावसाच्या चादरीत त्याने स्त्राविन्स्कीच्या हॉस्पिटलच्या बिल्डिंगला ओळखलं; नदी आणि तिच्या पलिकडच्या किना-यावर असलेल्या लिण्डन वनालासुद्धां त्याने ओळखलं, जे त्याला चांगलंच माहीत होतं. ते हॉस्पिटलपासून थोड्या दूरवर एका झाडीत उतरले.
“मी तुमची इथेच वाट बघेन,” अजाज़ेलो हाताची घडी घालून विजेच्या प्रकाशांत कधी प्रकट होत, तर कधी लुप्त होत ओरडला, “निरोप घेऊन या, पण लवकर.”
मास्टर आणि मार्गारीटा घोड्यांवरून उतरले आणि पाण्याच्या बुडबुड्यांसारखे उडंत हॉस्पिटलच्या बगीचाच्या वरून पुढे निघाले. एका क्षणानंतर मास्टरच्या सधलेल्या हातांनी 117नंबरच्या खोलीच्या बाल्कनींत उघडणारा जाळीचा दरवाजा उघडला, मार्गारीटा त्याच्या मागे-मागे गेली. ते इवानूश्काच्या खोलींत घुसले. न दिसतां. विजा कडाडंत होत्या. मास्टर पलंगाजवळ थांबला.
इवानूश्का चुपचाप लोळला होता. तसांच जसा तेव्हां लोळला होता, जेव्हां त्याने पहिल्यांदा आपल्या ह्या विश्रामगृहांत वादळ बघितलं होतं. पण तो तेव्हांसारखा रडंत नव्हता. जेव्हां त्याने पाहिलं की कशी एक काळी सावली बाल्कनीतून त्याच्याकडे येते आहे, तर तो उठला आणि आनंदाने हात पसरून म्हणाला, “ओह, हे तुम्हीं आहांत! मी तुमची कित्ती वाट बघितली. शेवटी आलेच तुम्हीं, माझे शेजारी.”
ह्यावर मास्टरने उत्तर दिलं, “मी इथे आहे! पण दुःखाची गोष्ट आहे, की मी आता तुझा शेजारी बनून नाही राहूं शकंत. मी नेहमीसाठी उडून चाललोय आणि फक्त तुला भेटायला आलोय.”
“मला माहीत होतं, मला अंदाज़ होता...” इवान हळूच म्हणाला आणि त्याने विचारलं, “तुम्हीं त्याला भेटलांत कां?”
“हो,” मास्टरने म्हटलं, “मी तुझा निरोप घ्यायला आलोय कारण की तूच एक असा आहे, ज्याच्याशी मी मागच्या काही दिवसांत बोललो होते.”
इवानूश्काचा चेहरा चमकला आणि तो म्हणाला, “हे चांगलं केलं की तुम्हीं इथे उडून आले. मी दिलेल्या शब्दाचं पालन करीन, आता कध्धीच कविता नाही लिहिणार. आता मला एका दुस-या वस्तूंत स्वारस्य आहे,” इवानूश्का हसला आणि रानटी नजरेने मास्टरच्या पलीकडे बघू लागला, “माझी दुसरं काहीतरी लिहायची इच्छा आहे. माहितीये, इथे पडल्या-पडल्या मला बरंच काही कळलं आहे.”
मास्टर हे शब्द ऐकून चिंतित झाला आणि इवानूश्काच्या पलंगाच्या काठावर बसून म्हणाला, “हे ठीक आहे, छान आहे. तू त्याच्याबद्दल पुढे लिहिशील!”
इवानूश्काचे डोळे विस्फारित झाले, “काय तू स्वतः नाही लिहिणार?” त्याने डोकं खाली केलं आणि विचारमग्न होऊन म्हणाला, “ओह, हो...हे मी काय विचारतोय!”
“हो,” मास्टर म्हणाला आणि इवानूश्काला त्याचा आवाज पोकळ आणि अनोळखी वाटला, “मी आता त्याच्याबद्दल नाही लिहिणार. मला दुसरे कामं करायचेत.”
दुरून वादळाच्या गोंगाटाला भेदत एक शिट्टी आली.
“तू ऐकतोयंस?” मास्टरने विचारलं.
“वादळाचा गोंगाट...”
“नाही, हे मला बोलावताहेत, माझी वेळ झाली,” मास्टरने समजावलं आणि तो पलंगावरून उठला.
“जरा थांबा! आणखी एक गोष्ट...” इवानने विनंती केली, “ती तुम्हाला भेटली कां? ती तुमच्याशी निष्ठावान राहिली?”
“ही बघ, ती...” मास्टरने उत्तर देत भिंतीकडे खूण केली. पांढ-या भिंतीतून वेगळी होत मार्गारीटा पलंगाच्या जवळ आली. तिने लोळलेल्या तरुणाकडे पाहिलं आणि तिच्या डोळ्यांत करुणा झळकली.
“ओह, बिचारा, गरीब!” मार्गारीटा स्वतःशीच कुजबुजली आणि पलंगाकडे वाकली.
“कित्ती सुन्दर आहे!” इवानने हेवा न करता, पण दुःखाने आणि किंचित कोमलतेने म्हटलं, “बघा, तुमचं सगळं कसं छान झालं. पण माझं तर तसं नाहीये,” काही वेळ विचार करून तो पुढे म्हणाला, “आणि कदाचित, शक्य आहे, की असं...”
“होऊं शकतं, होऊं शकतं,” मार्गारीटा कुजबुजली आणि लोळलेल्या तरुणावर वाकून म्हणाली, “मी तुझ्या कपाळाचं चुम्बन घेईन आणि मग सगळं तसंच होईल, जसं व्हायला पाहिजे...तू ह्या गोष्टीवर विश्वास ठेव, मी सगळं बघितलंय, मला सगळं माहीत आहे.”
लोळलेल्या तरुणाने आपल्या हातांनी तिच्या खांद्यांना धरलं आणि तिने त्याचं चुम्बन घेतलं.
“नमस्कार, माझ्या शिष्या,” मास्टरने हळूंच म्हटलं आणि तो हवेंत वितळू लागला. तो गायब झाला, त्याच्याबरोबर मार्गारीटापण लुप्त झाली. बाल्कनीची जाळी बंद झाली.
इवानूश्काला हुरहुर लागली. तो पलंगावर उठून बसला, उत्तेजनेने इकडे-तिकडे बघूं लागला, विव्हळू लागला, स्वतःशीच बोलूं लागला, उठून उभा राहिला. वादळाचा जोर वाढतंच होता. कदाचित त्यानेच इवान घाबरला होता. त्याला ह्या गोष्टीचीपण काळजी वाटंत होती, की त्याच्या दाराच्या मागे, जिथे नेहमी शांतता असायची, त्याला घाबरलेली चाहूल ऐकूं येत होती; दबके आवाजसुद्धां येत होते. त्याने थरथरंत आवाज दिला, “प्रास्कोव्या फ्योदोरोव्ना!”
प्रास्कोव्या फ्योदोरोव्ना खोलींत आली आणि काळजीने, प्रश्नार्थक नजरेने इवानूश्काकडे बघूं लागली.
“काय आहे? काय झालं?” तिने विचारलं, “वादळाची भीती वाटतेय? काही हरकत नाही, काही हरकत नाही...आता तुमची मदत करते. मी आत्ताच डॉक्टरला बोलावते.”
“नाही, प्रास्कोव्या फ्योदोरोव्ना, डॉक्टरला बोलवायची काही गरज नाहीये,” इवानूश्काने काळजीने प्रास्कोव्या फ्योदोरोव्नाच्याऐवजी भिंतीकडे बघंत म्हटलं, “मला काही विशेष त्रास नाहीये, तुम्हीं घाबरू नका, मला सगळं समजतंय. तुम्हीं कृपा करून सांगा...” इवानने कळकळीने म्हटलं, “तिथे, बाजूच्या, एकशे अठरा नंबरच्या खोलीत आत्ता काय झालं?”
“एकशे अठरामधे?” प्रास्कोव्या फ्योदोरोव्नाने प्रश्नंच विचारला आणि ती डोळे इकडे-तिकडे फिरवूं लागली, “तिथे काहीही झालेलं नाहीये!”
पण तिचा आवाज सपशेल खोटा वाटंत होता, इवानूश्काला हे लगेच समजलं आणि तो म्हणाला, “ए...प्रास्कोव्या फ्योदोरोव्ना! तुम्हीं इतक्या खरं बोलणा-या आहांत...तुम्हांला वाटतंय की मी काही गोंधळ घालेन? नाही, प्रास्कोव्या फ्योदोरोव्ना, असं काहीही नाही होणार. तुम्हीं खरं खरं सांगा. मला भिंतीच्या पलीकडून बराच काही आभास होतोय.”
“इतक्यांत तुमचा शेजारी मरण पावला!” प्रास्कोव्या फ्योदोरोव्ना कुजबुजली, आपल्या चांगुलपणाला आणि खरेपणाला ती थांबवूं शकली नाही, आणि विजेच्या प्रकाशाने आलोकित, घाबरलेल्या डोळ्यांनी इवानूश्काकडे बघूं लागली.
पण इवानूश्काला काहीही झालं नाही. त्याने आकाशाकडे अर्थपूर्ण ढंगाने खूण केली आणि म्हणाला, “मला माहीत होतं, की हेंच होणार आहे! मी खात्रीपूर्वक सांगतो, की आत्तांच शहरांतपण एका व्यक्तीचा मृत्य झालांय. मला हेसुद्धा माहीत आहे, की कोणाचा...” इवानूश्काने गूढ स्मित करंत म्हटलं, “ती एक महिला आहे!”


*********

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें