तेहतीस
उपसंहार
पण शनिवारी
संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळेस वरोब्योव टेकड्यांवरून वोलान्द आणि त्याची टोळी
राजधानी सोडून गेल्यावर मॉस्कोंत आणखी काय काय झाल?
बरेंच दिवस
सम्पूर्ण राजधानीत अगदीच अविश्वसनीय अफवा पसरंत होत्या, ज्या
लवकरंच प्रदेशाच्या दूर-दूरच्या आणि जवळ जवळ निर्मनुष्य भागांपर्यंत पोहोचल्या.
त्यांच्याबद्दल काही सांगणं व्यर्थ आहे, त्यांची नुसती आठवण
जरी आली तरी मळमळूं लागतं.
ह्या सत्य
ओळींच्या लेखकाने स्वतः फिओदोसियाला जात असताना ट्रेनमधे ही गोष्ट ऐकली, की
कसे मॉस्कोंत सुमारे दोन हजार व्यक्ती थियेटरमधून पूर्ण नग्नावस्थेंत बाहेर निघाले
आणि त्याच अवस्थेंत टैक्सींत बसून आपापल्या घरी गेले.
“सैतानी, अभिशप्त
शक्ती...” ही कुजबुज ऐकूं यायची दुधाच्या दुकानासमोर, ट्रामगाडींत,
दुकांनांमधे, घरांमधे, सामूहिक
किचन्समधे, ट्रेन्समधे, समर-कॉटेजेसमधे,
रेल्वे स्टेशन्सवर, समुद्र किना-यांवर...
स्पष्टंच आहे, की
उच्च शिक्षित आणि सुसंस्कृत लोकांनी सैतानी शक्तीशी संबंधित ह्या गप्पांमधे जराही
भाग नाही घेतला, उलट ते त्यांवर हसंत होते आणि गप्पा मारणा-यांना
समजावंत होते. पण तथ्य हे तथ्यंच असतं, आणि, जसं सगळेच म्हणतात, काही कारण न सांगता त्यांना
झटकणं शक्य नसतं: कोणीतरी राजधानीत हजर होतं, ग्रिबायेदवचे
अवशेषच ह्या तथ्याची जोरदार पुष्टी करंत होते, आणि अनेक इतर
घटनासुद्धां ह्याला नाकारू शकंत नव्हत्या.
सुसंस्कृत लोक
अन्वेषण करणा-यांच्या मताचं समर्थन करंत होते : की सम्मोहित करणा-या आणि गारुडवाही
लोकांची एक प्रवीण टोळी ह्याच्यामागे होती.
तिला पकडण्यासाठी
मॉस्कोमधे आणि बाहेरसुद्धां लगेच अनेक उपाय करण्यांत आले, पण
दुर्दैवाने त्यांचा काहीही परिणाम झाला नाही. स्वतःला वोलान्द म्हणणारा आपल्या
सहयोग्यांबरोबर गायब झाला आणि नंतर कधीही तो मॉस्कोत किंवा अन्य कुठे प्रकट झाला
नाही. स्पष्ट आहे, की सगळ्यांनी हा निष्कर्ष काढला की तो
परदेशांत पळून गेला, पण तिथेसुद्धां त्याने आपल्या
अस्तित्वाबद्दल काहीही संकेत नाही दिला.
ह्या ‘केस’चा तपास बराच काळ चालला. कशीही असली तरी ‘केस’
मोठी विचित्रंच होती! चार जळालेले घरं आणि शेकडो पागल झालेल्या
लोकांशिवाय काही लोक मेलेसुद्धा होते. कमींत कमी दोघांबद्दल तर खात्रीपूर्वक
सांगता येईल : बेर्लिओज़बद्दल आणि परदेशी पर्यटकांना मॉस्कोच्या दर्शनीय स्थळांची
माहिती देणा-या विभागांत काम करणा-या भूतपूर्व सामन्त मायकेलबद्दल. त्यांना तर
मारण्यांत आलं होतं. दुस-या व्यक्तीचा जळालेला सापळा सादोवायाच्या फ्लैट नंबर
50मधे सापडला होता, जेव्हां तिथे लागलेली आग विझवण्यांत आली
होती. हो, कित्येक व्यक्ती शिकार झाले होते, आणि हे शिकार तपासाची मागणी कर6त होते.
पण वोलान्द
राजधानी सोडून गेल्यावरही अन्य अनेक शिकार झाले होते आणि तुम्हांला कितीही दुःख
झालं तरी,
सांगावंच लागेल की हे शिकार होते – बोके.
जवळ-जवळ
शंभरापेक्षा जास्त, मानवाशी एकनिष्ठ आणि उपयोगीसुद्धां असलेले हे
पाळीव प्राणी कोणत्या ना कोणत्या पद्धतीने देशाच्या अनेक भागांत मारण्यांत आले.
15-20 गंभीर रूपाने जखमी मांजरांना भिन्न-भिन्न शहरांच्या पोलिस स्टेशनांत
आणण्यांत आलं. उदाहरणार्थ, आर्मावीरमधे एका निर्दोष
प्राण्याचे समोरचे पंजे बांधून एक नागरिक त्याला पोलिस स्टेशनवर घेऊन आला
होता.
ह्या बोक्याला
नागरिकाने तेव्हां पकडलं होतं, जेव्हां तो चोरासारखा...(काय करणार,
जर बोके तसेच दिसंत असले तर? ह्याचं कारण हे
नाहीये की ते पापी असतात, पण हे आहे की ते घाबरतात, की त्यांच्यापेक्षां जास्त शक्तिशाली प्राणी – कुत्रा किंवा माणूस त्यांना
नुकसान पोहोचवेल, त्यांचा अपमान करेल. दोन्हीपैकी काहीही
करणं अगदी सोपं आहे, पण मी तुम्हांला खात्रीने सांगतो की
ह्यांत कसलाच मोठेपणा नाहीये. हो, कसलाच नाही!) हो, तर चोरासारखा बोका माहीत नाही कां, मश्रूम्सवर
धडकणार होता.
बोक्यावर धडक
घालून त्याला बांधण्यासाठी गळ्यांतला टाय काढंत तो नागरिक धमकावंत बडबडंत होता, “आहा! कदाचित आता तुम्हीं आमच्याकडे, आर्मावीरमधे आले
आहांत, सम्मोहक महाराज! पण इथे तुम्हांला कोणीही घाबरणार
नाही. तुम्हीं मुके असल्याचं नाटक नका करूं. आम्हांला चांगलं माहीत आहे की तुम्ही
कोण आहांत!”
तो नागरिक
बोक्याला,
जो हिरव्या रंगाच्या टायने बांधलेला होता, समोरच्या
पंजांनी खेचंत पोलिस स्टेशनवर घेऊन आला; तो बोक्याला हळू-हळू
ठोकर सुद्धां मारंत होता, म्हणजे त्याला मागच्या पंजांवर
चालतां यावे. नागरिक आपल्या मागे-मागे शीळ घालंत चालणा-या मुलांना म्हणाला,
“तुम्हीं हा वेडेपणा बंद करा! ह्याने काही होणार नाही! जसे सगळे
चालतांत, तसेच चला!”
काळा बोका फक्त
आपल्या दुःखी डोळ्यांना इकडे-तिकडे फिरवंत होता. बोलूं न शकल्याने तो आपला खरेपणा
शाबीत करू शकंत नव्हता. आपल्या सुटकेसाठी तो दोन लोकांचा आभारी होता - पहिले, पोलिसचा आणि मग – आपल्या मालकिणीचा – एका
सम्माननीय विधवा वृद्धेचा. जसंच बोक्याला पोलिस स्टेशनांत आणलं, लोकांचा लगेच विश्वास बसला, की नागरिक दारूच्या
नशेंत धुंद होता, म्हणून त्याच्या सांगण्यावर कोणाचाही
विश्वास बसला नाही. येवढ्यांत वृद्धा मालकीण शेजा-यांकडून कळल्यावर की तिच्या
बोक्याला पकडलंय, पोलिस स्टेशनकडे धावली...तिथे ती अगदी
वेळेवर पोहोचली, तिने आपल्या बोक्याची भरपूर तारीफ केली;
सांगितलं की ती त्याला पाच वर्षांपासून ओळखते, तेव्हांपासून, जेव्हां तो अगदी लहान
होता; ती त्याच्याबद्दल इतक्यांच ठामपणे सांगू शकते, जितकं स्वतःबद्दल, की त्याने चुकीचं काम कधी केलंच
नाहीये; कसा त्याचा आर्मावीरमधे जन्म झाला, तिथेंच मोठा झाला, आणि तिथेच उंदीर पकडायला
शिकला.
बोक्याला मुक्त
करून मालकिणीकडे सोपवण्यांत आलं, फक्त तेव्हांच, जेव्हां त्याने दुःख़ाचा अनुभव घेतला, आणि आपल्या
अनुभवाने शिकला की चूक आणि दोषारोपण म्हणजे काय असतं.
बोक्यांच्या
व्यतिरिक्त काही लोकांना छोटे-मोठे त्रास सहन करावे लागले. काहींना अटक करण्यांत
आली. ज्या लोकांना थोड्या काळासाठी पकडलं गेलं, त्यांत होते :
लेनिनग्रादमधे – वोलमान आणो वोलपेर; सरातोवमधे, कीएवमधे आणि खारकोवमधे – तीन वोलोदिन; कज़ानमधे –
वोलोख आणि पेंज़ामधे, माहीत नाही कां रसायन शास्त्राचे
प्रोफेसर बेतचिंकेविच... हे खरं आहे की तो खूप विशाल शरीरयष्टीचा, सावळ्या रंगाचा, काळ्या केसाचा होता.
ह्याच्याशिवाय
वेगवेगळ्या ठिकाणांवर नऊ करोविन, चार करोव्किन आणि दोन करावायेव
पकडले गेले.
एका नागरिकाला
सेवास्तोपोलकडे जाणा-या ट्रेनमधून उतरवून बेलगोरद स्टेशनवर बांधून टाकण्यांत आलं.
हा नागरिक आपल्या बरोबरच्या मुशाफिरांचं पत्त्यांच्या खेळाने मनोरंजन करंत
होता.
यारोस्लाव्लमधे
दुपारी लंचच्या वेळेस एक नागरिक स्टोव घेऊन रेस्टॉरेन्टमधे घुसला, जो
त्याने आत्तांच रिपेयर करवून आणला होता. जसंच दोन्हीं दरबानांनी त्याला बघितलं,
ते आपापली जागा सोडून पळूं लागले, आणि
त्यांच्यामागे रेस्टॉरेन्टचे सगळे ग्राहकही पळूं लागले, नौकर,
कर्मचारीसुद्धां धावले. ह्याच गडबडींत कैशियरच्या हातून न जाणे कशी
सगळी कैश हरवली.
आणखीसुद्धां बरंच
काही झालं,
सगळंच तर लक्षांत नाही राहूं शकंत. बरीच डोकी धावपळ करंत होती.
अन्वेषण विभागाची
सुद्धां पुन्हां-पुन्हां तारीफ करावी लागेल. अपराध्यांना पकडण्यासाठी शक्य तेवढे
उपाय करण्यांत आले; त्याबरोबरंच घटनांच्या मागची कारणंसुद्धां
समजावण्यांत आली, ज्यांना अगदीच फाल्तू नाही म्हणतां येणार.
अन्वेषण दलाचा
प्रमुख आणि अनुभवी मनोवैज्ञानिकांनी स्पष्टीकरण दिलं, की
ह्या आपराधिक टोळीचे सदस्य किंवा त्यांच्यापैकी कुणी एक (सगळ्यांत जास्त सन्देह
करोव्येववर करण्यांत आला) अभूतपूर्व शक्तिशाली सम्मोहक होते, जे स्वतःला त्या ठिकाणी प्रकट नाही करायचे, जिथे ते
असायचे, पण काल्पनिक, परिवर्तित
परिस्थितीत प्रदर्शित करायचे. त्याशिवाय त्यांनी ह्या गोष्टीचं मोकळेपणाने समर्थन
केलं की काही वस्तू किंवा लोक तिथे दिसतात जिथे खरं म्हणजे ते नसतात; ह्याउलट त्या वस्तू किंवा लोक त्या दृष्टिक्षेपांहून दूर दिसतांत, ज्यांत ते असतात.
ह्या सगळ्या
स्पष्टीकरणांमुळे सगळ्या गोष्टी समजल्या; आणि नागरिकांना बुचकळ्यांत
टाकणारी ती घटनासुद्धां, जी सगळ्या स्पष्टीकरणांच्या वर होती,
म्हणजे पन्नास नंबरच्या फ्लैटमधे बोक्याला पकडण्याच्या प्रयत्नांत
त्याच्यावर केलेला गोळीबार, ज्याचा त्याच्यावर काहीही परिणाम
नव्हता झाला.
झुम्बरावर, स्पष्ट
आहे, काही बोका-बीका नव्हता, कोणीही
गोळ्या चालवण्याचा विचारसुद्धां केला नव्हता; ते सगळे
रिकाम्या जागेवरंच गोळ्या मारंत राहिले; जेव्हां करोव्येवचा
आवाज आला, की ह्या बोक्याच्या खोड्या आहेत, तेव्हां, कदाचित, तो आरामांत
गोळ्या झाडणा-यांच्या पाठीमागून त्यांना चिडवंत होता आणि जिथे-तिथे नाक खुपसायच्या
आपल्या सवयीनुसार त्याने तेल ओतून फ्लैटला आग लावून दिली.
स्त्योपा
लिखादेयेव कोणच्याच याल्टा-बील्टाला नाही गेला. (हे तर करोव्येवलापण शक्य नाहीये), तिथून
त्याने कोणतांच टेलिग्राम नाही पाठवला. करोव्येवच्या युक्तीने घाबरून, जो त्याला जवाहि-याच्या पत्नीच्या फ्लैटमधे फोर्कला टोचलेलं खारंट मश्रूम
खात असलेला बोका दाखवंत होता, तो बेशुद्ध झाला आणि तोपर्यंत
बेशुद्धंच होता, जोपर्यंत करोव्येवने त्याचा उपहास करंत
त्याला फर-कैप घालून मॉस्कोच्या विमानतळावर नाही पाठवून दिलं. स्त्योपाला भेटायला
आलेल्या गुप्तचर पोलिसला त्याने असं दाखवलं, जणु तो
सेवास्तोपोलहून येणा-या विमानाने आलाय.
हे खरं आहे, की
याल्टाचा गुप्तचर विभाग ही पुष्टी करंत होता की त्याने अनवाणी स्त्योपाला पकडलं
होतं, आणि स्त्योपाबद्दल मॉस्कोला टेलिग्राम पाठवला होता. पण
ह्या टेलिग्रामची कोणतीच प्रत कुठेच नाही सापडली. ह्याने असा दुर्दैवी आणि स्पष्ट
निष्कर्ष काढण्यांत आला, की सम्मोहन करणा-यांचा ह्या
टोळीकडे दूरपर्यंत सम्मोहित करण्याची शक्ती आहे; ते पण
एक-दोन लोकांनाच नाही तर विशाल समुदायाला सुद्धां. अश्या प्रकारे अपराधी अत्यंत
दृढ मानसिकता असलेल्या लोकांना सुद्धां पागल बनवूं शकले होते.
त्या
छोट्या-छोट्या गोष्टींबद्दल काय सांगाव – जसं एका माणसाच्या खिशांतून दुस-या
माणसाच्या खिशांत पत्त्यांची गड्डी जाणं; महिलांचे वस्त्र गायब होणं;
म्याऊँ-म्याऊँ करंत असलेला कोट आणि असंच बरंच काही. असल्या
युक्त्यातर कोणीही छोटा-मोठा सम्मोहक करूं शकतो, कोणत्याही
स्टेजवर, ज्यांत सूत्रधाराचं डोकं उपटून नेणंसुद्धां असूं
शकतं. बोलणारा बोका – शुद्ध बकवास आहे.
लोकांच्यासमोर असा बोका दाखवण्यासाठी गारुडवाहीच्या(पोटबोलीच्या) मूळ सिद्धांतांची
माहिती असणंच पुरेसं आहे, आणि ह्यांत शंकाच नाही, की करोव्येव ह्या कलेंत बरांच पुढे गेलेला होता.
मुद्दा
इथे पत्त्यांचा नाहीये, निकानोर इवानोविचच्या ब्रीफकेसमधे सापडलेल्या
खोट्या पत्रांचापण नाहीये, ह्या तर लहान-सहान खोड्या आहेत.
खरं म्हणजे, करोव्येवनेच बेर्लिओज़ला ट्रामगाडीच्या खाली
मारण्याच्या उद्देश्याने ट्रामगाडीच्या खाली ढकललं होतं. त्यानेच गरीब बिचा-या कवि
इवान बिज़्दोम्नीला पागल करून टाकलं होतं; त्याने त्याला
यातनामय स्वप्नांमधे येर्शलाइम आणि सूर्याच्या प्रकाशांत होरपळंत असलेल्या ‘बाल्ड माउन्टेन’ला बघण्यासाठी विवश केलं होतं,
ज्याच्यावर तीन अभियुक्तांना फासावर लटकावण्यांत आलं होतं. त्यानेच
आणि त्याच्या टोळीने मार्गारीटा निकोलायेव्ना आणि तिची मोलकरीण नताशाला मॉस्कोहून
गायब होण्यास विवश केलं होतं. आणखी एक मुद्दा : ह्या ‘केस’चा तपास खोलवर करण्यांत आला. हे स्पष्ट करणं आवश्यक होतं, की ह्या महिलांना हत्या आणि जाळपोळ करणा-या ह्या लोकांनी पळवून नेलं होतं,
की त्या आपल्या मर्जीने त्यांच्याबरोबर गेल्या होत्या? निकोलाय इवानोविचच्या अस्पष्ट आणि विसंगत पुराव्यावर, मार्गारीटा निकोलायेव्नाच्या विचित्र आणि हास्यास्पद चिट्ठीवर, जी तिने आपल्या नव-यासाठी सोडली होती – हे स्पष्ट करंत की ती चेटकीण बनून
चाललीये; आणि नताशाच्या आपल्या सगळ्या वस्तू जागच्याजागी
सोडून जाण्याच्या घटनेवर विचार केल्यावर तपास अधिकारी ह्या निष्कर्षापर्यंत
पोहोचले, की अन्य अनेक लोकांसारखंच मालकीण आणि मोलकरीण –
दोघींना सम्मोहित करून त्यांचं अपहरण
करण्यात आलं. ही शक्यतापण व्यक्त करण्यांत आली, की
अपराध्यांनी त्यांच्या सौंदर्यावर मोहित होऊन त्यांना पळवलं.
पण ज्या
गोष्टीचं काहीच प्रमाण नाही सापडलं, ती ही होती की मानसिक रुग्ण,
स्वतःला मास्टर म्हणणा-या
व्यक्तीला ही टोळी हॉस्पिटलमधून उडवून कां घेऊन गेली होती. ह्याचं कारण ते नाही
शोधू शकले आणि त्या मनोरुग्णाच्या नावाचा पत्ता पण त्यांना नाही लागला. तो ‘नम्बर एकशे अठरा’ ह्या संबोधनासकट नेहमीसाठी गायब
झाला.
अश्या
प्रकारे सगळ्या गोष्टी समजावून दिल्या गेल्या आणि तपासाचं काम पूर्ण झालं, तसंच,
जसं सगळं काही संपुष्टांत येतं.
काही
वर्ष गेले. लोक वोलान्द, करोव्येव आणि इतर लोकांना विसरू लागले. वोलान्द
आणि त्याच्या टोळीमुळे दुःखी झालेल्या लोकांच्या जीवनांत अनेक परिवर्तन झालेत आणि
हे परिवर्तन कितीही नगण्य असले तरी त्यांच्याबद्दल सांगणं चांगलं होईल.
उदाहरणार्थ, जॉर्ज
बेंगाल्स्की हॉस्पिटलमधे तीन महिने घालवून बरा झाला आणि त्याला घरी पाठवण्यांत आलं,
पण त्याला वेराइटीची नौकरी सोडावी लागली; आणि
विशेषकरून गर्दीच्या सीज़नमधे, जेव्हां जनता टिकिटांसाठी
तुटून पडंत होती – काळा जादू आणि त्याचं रहस्योद्घाटन करणा-या कार्यक्रमाच्या
आठवणी एकदम ताज्या होत्या. बेंगाल्स्कीने वेराइटी सोडून दिलं, कारण की तो समजून गेला होता, की दर संध्याकाळी दोन
हजार दर्शकांसमोर जाणं, कोणत्याही परिस्थितीत ओळखलं जाणं आणि
ह्या उपहासात्मक प्रश्नाला सामोरं जाणं, की त्याच्यासाठी काय
जास्त चांगलं राहील : डोकं असलेलं शरीर, की बिनडोक्याचं?
– हे सगळं खूपच पीडादायक होईल.
हो, शिवाय
सूत्रधार आपला नेहमीचा हसरेपणासुद्धां गमावून बसला, जो
त्याच्या व्यवसायासाठी नितांत आवश्यक होता. त्याला एक वाईट आणि जाचक सवय लागली :
दर पौर्णिमेच्या रात्री तो व्याकुळ होऊन आपली मान पकडून घ्यायचा, भीतीने इकडे-तिकडे बघायचा आणि मग रडू लागायचा. हे सगळं हळू-हळू कमी होत
गेलं, पण ह्या सवयी बाळगून जुनं काम करणं अशक्यंच होतं;
म्हणून सूत्रधाराने ती नौकरी सोडून दिली. तो शांत जीवन जगू लागला,
आपल्या बचतीवर जगू लागला, जी त्याच्या साधारण
जीवन-पद्धतीकडे बघता पंधरा वर्षांसाठी पुरेशी होती.
तो चालला
गेला आणि पुन्हां कधीही वारेनूखाला नाही भेटला जो थियेटर-एडमिनिस्ट्रेटर्समधे आपल्या
अविश्वसनीय सहृदयतेसाठी, सौजन्यपूर्ण व्यवहारासाठी आणि हजरजवाबीसाठी
लोकप्रिय झाला होता. फुकट टिकिट मागणारे तर त्याला ‘दयाळू
पिता’ म्हणायचे. कोणीही, कधीही
वेराइटींत फोन केला तर टेलिफोनवर नेहमी एक मृदु, पण उदास
आवाज ऐकू यायचा, “ऐकतोय –“ आणि वारेनूखाला टेलिफोनवर
बोलावण्याची विनंती करण्यांत यायची, तेव्हां तोच आवाज पट्कन
पुढे म्हणायचा, “मी हजर आहे, बोला काय करू.”
पण इवान सावेल्येविचला आपल्या सौजन्यासाठी सुद्धां त्रास सहन करावा लागंत होता.
स्त्योपा
लिखोदेयेवलापण आता वेराइटींत टेलिफोनवर बोलावं नाही लागंत. हॉस्पिटलमधून सुट्टी
मिळाल्यावर,
जिथे तो आठ दिवस होता, त्याला रोस्तोवला
पाठवण्यांत आलं. तिथे त्याला एका मोठ्या डिपार्टमेन्टल स्टोअरचा डाइरेक्टर नेमलंय.
म्हणतांत की आता त्याने पोर्ट वाइन घेणं पूर्णपणे बंद केलंय, आणि फक्त वोद्काच पितो – तीसुद्धां बेदाण्याची, ज्याने
त्याची तब्येत जास्तंच चांगली झाली आहे. असं पण म्हणतात की तो एकदम शांत झालांय
आणि बायकांपासूनसुद्धां दूर राहतो.
स्तेपान
बोग्दानोविचला वेराइटीतून काढून रीम्स्कीला इतका आनन्द नाही झाला, ज्याचं
तो कित्येक वर्षांपासून स्वप्न बघंत होता. हॉस्पिटल आणि किस्लोवोद्स्कनंतर बुड्ढा,
जक्खड बुड्ढा झालेल्या, डोकं हालंत असलेल्या
फिनडाइरेक्टरनेपण वेराइटीतून बाहेर जाण्यासाठी अर्ज दिला. मजेदार गोष्ट तर ही होती की हा अर्ज घेऊन ऑफिसमधे आली
त्याची बायको. ग्रिगोरी दानिलोविचला दिवसासुद्धां त्या बिल्डिंगमधे जाण्याची
हिम्मत नाही झाली, जिथे त्याने चंद्राच्या प्रकाशांत खिडकीचा
फुटका काच बघितला होता आणि बघितला होता तो लांबलचक हात जो खालच्या बोल्टकडे येत
होता.
वेराइटी
सोडून फिनडाइरेक्टर मुलांच्या पपेट-थियेटरमधे आला. ह्या थियेटरमधे त्याला
ध्वनि-संयोजनाच्या समस्यांचा सामना नव्हता करावा लागंत, ह्या
बाबतीत सम्माननीय अर्कादी अपोलोनोविचशी जामस्क्वोरेच्येमधे वादसुद्धां घालावा
लागंत नव्हता. त्याला दोनंच मिनिटांत ब्र्यान्स्कला पाठवण्यांत आलं आणि मश्रूम्सला
डब्ब्यांत बंद करायच्या कारखानाच्या डाइरेक्टर बनविण्यांत आलं. आता मॉस्कोवासी
खारवलेले लाल मश्रूम्स आणि पांढ-या मश्रूम्सचं लोणचं खातात, आणि
त्यांची खूप तारीफ करतात; ते ह्या ट्रान्सफरने खूष आहेत.
गोष्ट जुनी आहे आणि असं म्हणता येईल की अर्कादी अपोलोनोविचला ध्वनिसंयोजनाचं काम
जमंतच नव्हतं. त्याने कितीही प्रयत्न केले तरी ते जसंच तसंच राहिलं.
थियेटरशी
ज्यांचा संबंध तुटला त्यांत अर्कादी अपोलोनोविचच्या व्यतिरिक्त निकानोर इवानोविच
बासोयचं नाव पण घेता येईल, तसं पाहिलं तर निकानोर इवानोविचचा
फुकंटच्या तिकिटांना सोडून थियेटरशी काहीही संबंध नव्हता. निकानोर इवानोविच आता
कधीच थियटरमधे जात नाही: पैसे खर्च करूनही नाही, आणि
फुकंटसुद्धा नाही; येवढंच नाही, थियेटरचं
नाव घेतांच त्याच्या चेह-याचा रंग बदलून जातो. थियेटरबरोबरंच त्याला कवि पूश्किन आणि
सुयोग्य कलाकार साव्वा पतापोविच कुरोलेसोवच्या नावानेच फार चीड येते. त्याची तर
इतकी, की मागच्या वर्षी काळ्या चौकटींत ही बातमी बघून की
साव्वा पतापोविच आपल्या जीवनाच्या चरमोत्कर्षाच्या काळातं हृदय विकाराने मृत्यु
पावला – निकानोर इवानोविचचा चेहरा इतका लाल झाला की तो स्वतःपण साव्वा
पतापोविचच्या मागे जातां-जातां राहिला. तो गरजला, “त्याचं
असंच व्हायला पाहिजे!” शिवाय, त्याच संध्याकाळी निकानोर
इवानोविच, ज्याला लोकप्रिय कलाकाराच्या मृत्युमुळे अनेक कटु
गोष्टींची आठवण झाली होती, एकटाच, पौर्णिमेच्या
चंद्रासोबंत सादोवायावर बसून खूप दारू प्यायला. प्रत्येक प्यालाबरोबर त्याच्या
समोर घृणित आकृत्या येत होत्या आणि आकृत्यांच्या श्रृंखलेंत होते दुंचिल सेर्गेई
गेरार्दोविच आणि सुन्दरी ईडा हेर्कुलानोव्ना, आणि तो लाल केस
असलेला लडाकू हंसांचा मालक, आणि स्पष्टवक्ता कनाव्किन
निकोलाय.
आणि
त्यांचं काय झालं?
लक्ष द्या! जसं काही झालंच नाही, आणि होऊपण
शकंत नाही, कारण की त्यांचं अस्तित्वंच नव्हतं; जसं की आकर्षक कलाकार सूत्रधाराच, आणि खुद्द
थियेटरचं, आणि म्हाता-या आत्याबाई परोखोव्निकोवाचं, जिने तळघरांत परदेशी चलनाच्या मुद्रा लपवल्या होत्या; आणि, नक्कीच, सोनेरी तुता-या
नव्हत्या, आणि दुष्ट स्वयंपाकीपण नव्हते. निकानोर इवानोविचला
सैतान करोव्योवच्या प्रभावाने त्यांचं फक्त स्वप्न पडलं होतं. फक्त एक चालता-बोलता
माणूस जो ह्या स्वप्नांत हजर होता, तो होता फक्त साव्वा
पतापोविच – कलाकार, आणि तो स्वप्नाशी ह्या कारणाने जोडला
गेला होता, कारण की तो निकानोर इवानोविचच्या डोक्यांत आपल्या
रेडिओ कार्यक्रमांमुळे खोलवर होता. तो होता, बाकीचे नव्हते.
म्हणजे
अलोइज़ी मोगारिचपण नव्हता कां? ओह, नाही! तो
न केवळ तेव्हां होता, पण अजूनही आहे; त्याच
पदावर जे रीम्स्कीने सोडलं होतं, म्हणजे वेराइटीच्या
फिनडाइरेक्टरच्या पदावर.
वोलान्दशी
भेट झाल्यावर सुमारे चोवीस तासांनी, ट्रेनमधे, व्यात्काच्याजवळ
कुठेतरी अलोइज़ीला शुद्ध आली. त्याची खात्री झाली की उदास मनःस्थितीत न जाणे कां,
मॉस्कोहून निघताना तो पैण्ट घालायला विसरला होता, पण माहीत नाही कां कॉन्ट्रैक्टरचं भाडेकरूचं पुस्तक त्याने चोरून आणलं
होतं. कण्डक्टरला बरीच मोठी रकम दिल्यावर अलोइज़ीने त्याच्याकडून जुनी, घाणेरडी पैन्ट घेतली आणि ती घालून व्यात्काहून परंत आला, पण आता तो कॉन्ट्रैक्टरचं घर शोधूच नाही शकला. जीर्ण इमारत पूर्णपणे आगींत
स्वाहा झाली होती. पण अलोइज़ी अत्यंत हुशार होता, दोनंच
आठवड्यानंतर तो एका सुरेख खोलींत राहायला लागला, जी ब्रूसोव
गल्लींत होती, आणि काही महिन्यांनी तो रीम्स्कीच्या खुर्चीवर
देखील बसला. जसा आधी रीम्स्की स्त्योपामुळे त्रस्त होता, तसांच
आता वारेनूखा अलोइज़ीमुळे दुःखी होता. आता इवान सावेल्येविच एकंच गोष्टीच स्वप्न
बघायचा की कोणीतरी ह्या अलोइज़ीला त्याच्या नजरेपासून दूर केलंय; कारण, जसं वारेनूखा आपल्या घनिष्ठ मित्रांना कधी-कधी
सांगायचा, “अश्या डुकराला, जसा अलोइज़ी
आहे, त्याने आपल्या हयातींत कधीही बघितलेलं नाहीये आणि ह्या
अलोइज़ीपासून त्याला काहीही होऊं शकतं.”
कदाचित, एडमिनिस्ट्रेटर
पूर्वाग्रहाने ग्रासलेला होता. अलोइज़ीशी संबंधित कसलेंच काळे कारनामे कधीच
बघण्यांत नाही आले आणि तसं बघितलं तर, कोणतेच कारनामे नाही
दिसले – जर रेस्टॉरेन्ट प्रमुख सोकोवच्या जागेवर अन्य कोणाच्या नियुक्तीकडे
दुर्लक्ष केलं तर. अंद्रेइ फोकिच तर मॉस्को युनिवर्सिटीच्या एक नम्बरच्या
हॉस्पिटलमधे कैन्सरने मरून गेला. वोलान्द मॉस्कोत प्रकट झाल्याच्या नऊ
महिन्यांने...
हो, बरेच
वर्ष झाले आणि ह्या पुस्तकांत खरं खरं वर्णन केलेल्या घटना लोकांच्या स्मृतीतून
लुप्त होत गेल्या, पण सगळ्यांच्या नाही, सगळ्यांच्या स्मृतीतून नाही.
दरवर्षी, जेव्हां
वसन्त ऋतूतील पौर्णिमेची रात्र येते, संध्याकाळी लिण्डेन
वृक्षांच्या खाली, पत्रियार्शी पार्कमधे एक तीस-पस्तीस
वर्षांचा माणूस प्रकट होतो – लाल केस, हिरवट डोळे असलेला,
साधारण वेशभूषेंत. हा – इतिहास आणि दर्शन संस्थानाचा संशोधक आहे –
प्रोफेसर इवान निकोलायेविच पनीरेव.
लिण्डेनच्या
सावलीत येऊन तो त्याच बेंचवर बसतो, जिथे खूप आधी विस्मृतीच्या गर्तेत
बुडालेल्या बेर्लिओज़ने जीवनांत शेवटचाच तुकड्यांत विखुरलेला चंद्र बघितला होता.
आता तो
चंद्र,
पूर्ण, रात्रीच्या सुरुवातीला पांढरा, पण नंतर सोनेरी, काळ्या घोड्यासारख्या सापाच्या
आकृतिसह भूतपूर्व कवि इवान निकोलायेविचच्या वरती तरंगंत आहे; पण उंचावर आपल्याच जागेवर स्थिरसुद्धा आहे.
इवान
इकोलायेविचला सगळं माहीत आहे, त्याला सगळं माहीत आहे आणि सगळं
समजतंय. त्याला माहीत आहे, की तरुणपणी तो अपराधी सम्मोहनकारी
टोळीचा शिकार झाला होता, त्यानंतर त्याचा इलाज केला गेला आणि
तो बरा झाला. पण त्याला हेसुद्धा कळतंय, की काहीतरी आहे,
ज्याच्यावर त्याचं काहीही चालंत नाही. ह्या वसन्त ऋतूच्या चंद्रावर
त्याचा काही जोर नाही चालंत. जशी-जशी पौर्णिमा जवळ येऊं लागते, जसांच चंद्र मोठा होऊन सोनेरी व्हायला लागतो, जसा
कधी दोन पंचकोणी दिव्यांच्या वर चमकला होता, इवान
निकोलायेविच व्याकूळ व्हायला लागतो, तो उदास होतो, त्याची भूक मरून जाते, झोपं उडून जाते, तो वाट बघतो चंद्र पूर्ण व्हायची, आणि जेव्हां
पौर्णिमा येते तेव्हां कोणतीही शक्ती इवान निकोलायेविचला घरी थांबवू शकंत नाही.
संध्याकाळ होता-होता तो घरातून निघून पत्रियार्शीवर चालला जातो.
बेंचवर
बसल्या-बसल्या इवान निकोलायेविच स्वतःशीच मनमोकळ्या गप्पा मारू लागतो. सिगरेट ओढतो, डोळे
बारीक करून कधी चंद्राकडे बघतो, तर कधी स्मृतीत राहून
गेलेल्या त्या फिरत्या दरवाजाकडे.
अश्या
प्रकारे इवान निकोलायेविच घंटे-दोन घंटे घालवतो. मग आपल्या जागेवरून उठून नेहमी
एकाच रस्त्याने,
स्पिरिदोनोव्कातून होत भावहीन आणि काहीही बघंत नसलेल्या डोळ्यांनी
अर्बातच्या गल्ल्यांमधे हिंडतो.
तो
तेलाच्या दुकानाजवळून जातो, तिथे जाऊन वळतो, जिथे जुनी, तिरपी गैसबत्ती लटकते आहे आणि तो हळूंच
जाळीजवळ जातो, जिच्या पलीकडे त्याला सुन्दर, पण आता पर्णहीन उद्यान दिसतं; त्याच्या मधे एकीकडून
चंद्राच्या प्रकाशांत चमकंत असलेली तीन पटांची खिडकी आणि दुसरीकडून अंधाराने
वेढलेली ती आलीशान इमारत बघतो...
प्रोफेसरला
माहीत नाही,
की त्याला ह्या जाळीजवळ कोण खेचून आणतं, आणि
त्या इमारतींत कोण राहतं; पण त्याला येवढं माहीत आहे,
की ह्या पौर्णिमेला त्याला स्वतःशी संघर्ष नाही करावा लागंत. शिवाय, त्याला हे पण माहीत आहे, की जाळीने वेढलेल्या ह्या
उद्यानांत तो नेहमी एकंच दृश्य बघतो.
तो
बेंचवर बसलेल्या एका सभ्य, वयस्कर माणसाला बघतो, ज्याने चष्मा घातला आहे आणि ज्याचे नाक-डोळे किंचित डुकरासारखे आहेत. इवान
निकोलायेविच त्या इमारतीत राहणा-या ह्या माणसाला नेहमी विचारांत असल्यासारखाच बघतो,
चंद्राकडे बघंत असलेला. इवान निकोलायेविचला
माहीत आहे, की चंद्राकडे बरांच वेळ बघितल्यावर बसलेला माणूस
कोप-यावरच्या खिडकीकडे बघूं लागेल, जणु कोणाची तरी वाट बघतोय
की आत्ताच ती फट्कन उघडेल आणि चौकटीत एक अजबसं दृश्य दिसेल.
पुढचं
सगळं इवान निकोलायेविचला अगदी तोंडपाठ आहे. आता जाळींत थोडसं लपून राहण्याची गरंज
आहे,
कारण की बेंचवर बसलेला माणूस व्याकुळतेने डोकं इकडे-तिकडे हालवूं
लागेल, आणि दिपलेल्या डोळ्यांनी हवेंत काहीतरी पकडायचा
प्रयत्न करेल, मग तो उत्तेजित होऊन खिदळेल आणि हात नाचवंत
एका गोड वेदनेंत हरवून जाईल आणि मग ज़ोरज़ो-याने बडबडू लागेल, “वीनस!...आह, मी, मूर्ख!”
“अरे
देवा,
अरे देवा!” इवान निकोलायेविच कुजबुजेल आणि जाळीच्यामागे लपून आपले
चमकते डोळे त्या गूढ अपरिचितावर रोखून ठेवेल – हा होता चंद्राचा आणखी एक शिकार,
“हो, हासुद्धां आणखी एक शिकार आहे, माझ्याचसारखा.”
आणि
बसलेला माणूस बडबडंत राहील, “आह, मी
मूर्ख! मी तिच्याबरोबर कां नाही उडून गेलो? कां घाबरलो?
कोणाला घाबरलास, म्हाता-या गाढवा! आपल्यासाठी
सर्टिफिकेट घेत बसला! आता कर सहन, म्हाता-या डुकरा!”
असं
तोपर्यंत चालंत राहील, जोपर्यंत त्या इमारतीच्या अंधा-या भागांत खिडकी
नाही उघडणार, तिच्यांत एक पांढरी सावली नाही तरंगणार आणि
बाईचा एक कर्कश आवाज नाही ओरडणार, “निकोलाय इवानोविच,
कुठे आहेस तू? ही काय कल्पना आहे! काय मलेरिया
होऊं द्यायचा आहे? चल, चहा प्यायला!”
ह्यावर
तो बसलेला माणूस जागेल आणि कृत्रिम आवाजांत म्हणेल, “गार वारं, गार वारं घ्यायचं होतं, माझ्या लाडके! हवा कित्ती
सुरेख आहे!...”
तो
बेंचवरून उठेल,
खाली बंद होत असलेल्या खिडकीला मुक्का दाखवेल आणि हळू-हळू आपल्या
घरांत तरंग़ून जाईल.
“खोटं
बोलतोय तो,
खोट! अरे देवा, किती खोटं!” जाळीपासून दूर होत
इवान निकोलायेविच बडबडतो, “त्याला ह्या उद्यानांत हवा नाही
खेचून आणंत; वसंती पौर्णिमेला तो चंद्रांत, उद्यानांत आणि वर, उंचीवर काही तरी बघतो. आह,
त्याचं रहस्य जाणून घेण्यासाठी मी काहीही दिलं असतं, फक्त हे जाणून घेण्यासाठी की तो कोणत्या वीनसला हरवून बसलाय आणि आता तो उगाचंच
हवेंत हात फिरवंत तिला पकडण्याचा प्रयत्न करतोय?”
आणि
प्रोफेसर एकदम आजा-यासारखा घरी परततो. त्याची बायको असं दाखवते, जणु
त्याची अवस्था बघंत नाहीये, आणि लवकर-लवकर त्याला बिछान्यांत
झोपवूं लागते. पण ती स्वतः नाही झोपंत, तर लैम्प जवंळ एक
पुस्तक घेऊन बसून जाते, उदास डोळ्यांने झोपणा-याकडे बघंत.
तिला माहितीये की सकाळी इवान निकोलायेविच किंचाळून उठेल, रडू
लागेल आणि इकडे-तिकडे फिरूं लागेल. म्हणूनंच तिने आधींच स्प्रिटमधे बुडवून
इंजेक्शनची सिरिंज आणि दाट चहाच्या रंगाचं औषध लैम्पवाल्या टेबलावर तयार ठेवली
आहे.
ही गरीब
बाई,
आजा-याशी बांधलेली, आता आरामांत झोपूं शकेल,
कोणत्याही भीती शिवाय. आता इवान निकोलायेविच सकाळ पर्यंत झोपेल,
त्याच्या चेह-यावर असतील प्रसन्नतेचे भाव आणि तो स्वप्न बघंत असेल
उदात्त विचार असलेले, सौभाग्यशाली, ज्यांच्याबद्दल
बायकोला काहीही माहीत नाही.
वैज्ञानिकाला
पौर्णिमेच्या रात्री वेदनापूर्ण किंकाळीसोबंत नेहमी एकंच गोष्ट जागवते. तो बघतो –
बिना नाकाचा मारेकरी, जो उसळून ओरडंत भाल्याची नोक वध-स्तंभाशी
जखडलेल्या बेसुध कैदी गेस्तासच्या छातींत घुसवतो. पण मारेकरी इतका भयानक नाहीये
जितका स्वप्नांत दिसंत असणारा तो अप्राकृतिक प्रकाश, जो
अश्या कोणच्यातरी ढगांतून येतो आहे, जे उकळतं आहे आणि
पृथ्वीवर सांडत आहे, जसं पृथ्वीवर येणा-या विपदांपूर्वी होत
असतं.
इंजेक्शनच्या
नंतर झोपणा-याच्या समोरचं दृश्य बदलतं. बिछान्यापासून खिडकीपर्यंत चंद्रप्रकाशाचा
रस्ता उलगडतो आणि ह्या रस्त्यावर चालू लागतो रक्तवर्णी किनारीचा पांढरा अंगरखा
घातलेला माणूस आणि जाऊं लागतो चंद्राकडे. त्याच्याबरोबर एक तरुणपण चालतोय, जुने-फाटके
कपडे घातलेला, विद्रूप केलेल्या चेह-याचा. चालणारे कोणत्या
तरी गोष्टीबद्दल वाद घालतात आहे, बोलतांत आहे, त्यांना काहीतरी सांगायचंय.
“अरे
देवा,
देवा!” अंगरखा घातलेला माणूस आपला कठोर चेहरा आपल्या बरोबर
चालणा-याकडे वळवून म्हणतो, “कसला मृत्युदण्ड होता! किती
निकृष्ट! पण तू, कृपा करून मला सांग,” त्याच्या
चेह-यावर याचनेचा भाव आला, “मृत्युदण्ड तर देण्यांतंच नाही
आला नं! मी विनंती करतो, मला खरं-खरं सांग, नाही दिला नं?”
“नक्कीच, नाहीच
दिला गेला,” त्याच्याबरोबर चालणा-या तरुणाने भसाड्या आवाजांत
उत्तर दिलं, “तुला तसा भ्रम झाला होता.”
“तू
शप्पथ घेऊन सांगू शकतोस कां?” अंगरखा घातलेल्या माणसाने परीक्षा
पाहण्यासाठी विचारलं.
“शप्पथ
घेऊन सांगतो,”
तरुणाने उत्तर दिलं आणि त्याचे डोळे न जाणे कां, स्मित करूं लागले.
“मला
आणखी काहीही नको,”
फाटक्या आवाजांत अंगरखा घातलेला माणूस ओरडला आणि तो चंद्राकडे वर,
वर जाऊं लागला, आपल्या मित्राला बरोबर घेऊन.
त्यांच्या मागे-मागे थाटांत चालंत होता शांत आणि विशालकाय, तीक्ष्ण
कानांचा श्वान.
तेव्हां
चंद्राचा प्रकाश उफाळू लागतो, त्यांतून चांदीची नदी चारी
दिशांमधे वाहू लागते. चंद्र हुकुमंत करंत खेळतोय, चंद्र
नृत्य करंत डोळे मिचकावतोय. तेव्हां त्या धारेतून एक अद्भुत सुंदरी प्रकट होते आणि
ती इवानकडे एका धास्तावलेल्या दाढीवाल्याला खेचंत आणते. इवान निकोलायेविच लगेच
त्याला ओळखतो. हा – तोच एकशे अठरानंबर आहे, त्याचा रात्रीचा
पाहुणा. इवान निकोलायेविच स्वप्नांतंच त्याच्याकडे हात पसरतो आणि अधीरतेने विचारतो,
“तर, कदाचित असंच सगळं संपलं?”
“असंच
संपलं,
माझ्या शिष्या,” एकशे अठरा नंबर उत्तर देतो,
आणि ती सुंदरी इवानकडे येऊन म्हणते, “हो,
नक्की, असंचं. सगळं संपलं आणि सगळं
संपतंय...आणि मी तुझ्या कपाळाचं चुम्बन घेईन, तेव्हां
तुझ्यासोबतपण सगळं तस्संच होईल, जसं व्हायला पाहिजे.”
ती
इवानकडे वाकते आणि त्याच्या कपाळाचं चुम्बन घेते, इवान तिच्याकडे खेचला जाते
आणि तिच्या डोळ्यांत बघू लागतो; पण ती मागे-मागे सरकंत
आपल्या मित्राबरोबर चंद्राकडे जाऊं लागते.
तेव्हां
चंद्र मोठा होऊं लागतो, आपले किरण सरळ इवानवर फेकतो; तो चारी दिशांमधे प्रकाश पसरवतो आहे, खोलींट
चंद्राचा प्रकाश शिगोशीग भरून जातो, प्रकाश उसळू लागतो,
वर जातो आणि बिछान्याला बुडवतो. तेव्हांच इवान निकोलायेविच शांततेने
झोपतो.
सकाळी तो
उठतो. चुपचाप,
पण पूर्णपणे शांत आणि स्वस्थ. त्याच्या बेचैन आठवणी शांत होतात आणि
पुढच्या पौर्णिमेपर्यंत प्रोफेसरला कोणीही त्रास नाही देत. ना तर गेस्तासचा बिन-नाकाचा
हत्यारा, ना जूडियाचा क्रूर पाचवा न्यायाधीश अश्वारोही
पोन्ती पिलात.
समाप्त
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें