बुधवार, 15 नवंबर 2017

मास्टर आणि मार्गारीटा - 32



बत्तीस


क्षमा आणि चिरंतन आश्रय


अरे देवा! अरे माझ्या देवा! संध्याकाळची पृथ्वी किती उदास भासते! तळ्यांच्या वरती असलेलं धुकं कित्ती गूढ असतं! ह्याची जाणीव त्यालाच असूं शकते, जो ह्या धुक्यांत हरवला आहे, ज्याने मृत्युच्या आधी असीम यातना झेलल्या आहेत, जो ह्या पृथ्वीवर उडला आहे, ज्याने आपल्या मनावर अवजंड ओझं सहन केलेलं आहे. हे एक थकल्या-भागलेल्या माणसालांच कळू शकतं. तेव्हां तो धुक्याचं हे जाळं काहीही दुःख़ न होता सोडून जाऊ शकतो, पृथ्वीवरच्या नद्यांपासून, तलावांपासून तोंड फिरवूं शकतो, निश्चिंत मनाने स्वतःला मृत्यूच्या हातांत सोपवूं शकतो, हे माहीत असून की फक्त तीच त्याला शांती प्रदान करू शकते.
जादुई काळे घोडेपण थकले होते आणि आता ते आपल्या स्वारांना हळू-हळू नेत होते, आणि अपरिहार्य रात्र त्यांच्या मागावर होती. रात्रीला आपल्या पाठीमाग़े अनुभव करून धृष्ठ बेगेमोतसुद्धां शांत झाला, तो खोगीरांत आपले पंजे घट्ट रुतवून बसला होता, आपली शेपूट फुगवून तो चुपचाप आणि गंभीरतेने उडंत होता. रात्र आपल्या काळ्या पदराने जंगलांवर आणि मैदानांवर  पांघरूण घालंत चालली होती, दूर कुठेतरी खाली टिमटिमंत असलेले उदास दिवे लावंत चालली होती; ज्यांत आता ना मार्गारीटाला आणि ना ही मास्टरला काही रस होता आणि त्यांची काही गरंजही नव्हती – परके दिवे. रात्र घोडेस्वारांना मागे सोडून, वरून त्यांच्यावर उदास आकाशांत इथे-तिथे ता-यांचे पांढरे थेंब पेरंत होती.
रात्र दाट होत गेली; त्यांच्या बरोबर उडताना ती मधून-मधून घोडेस्वारांचे कोट पकडायची आणि त्यांना खेचून सगळी माया, सगळे भ्रम दूर करायची. जेव्हां गार वा-याचे फटके सहन करंत मार्गारीटाने आपले डोळे उघडले, तेव्हां बघितलं की आपल्या उद्दिष्टाकडे उडंत असलेल्या सगळ्यांच रूप कसं परिवर्तित झालेलं आहे. जेव्हां त्यांच्या स्वागतासाठी जंगलाच्या मागून लाल-लाल पूर्ण चंद्र उदित होऊ लागला, तेव्हां सगळेच भ्रम गळून पडले, जादुई पोषाक घसरून दलदलीत पडले, धुक्यांत वितळून गेले.
करोव्येव-फागोतला ओळखणं अशक्य होतं, तोच जो स्वतःला त्या रहस्यमय आणि कोणत्याही भाषातरांची गरज नसलेल्या कन्सल्टेन्टचा अनुवादक म्हणवायचा, आणि जो आता वोलान्दच्या बाजूला, मास्टरच्या प्रियतमेच्या उजवीकडे उडंत होता. करोव्येव-फागोतच्या नावानी जो व्यक्ति सर्कसच्या जोकरचा पोषाक घालून वरोब्योव टेकड्यांवरून उडाला होता, त्याच्या जागेवर घोड्यावर सवार होता मंद किणकिण करंत असलेली सोनेरी लगाम धरलेला काळसर-जांभळ्या रंगाचा सामन्त, त्याचा चेहरा अत्यंत उदास होता, तो कदाचित कधीच स्मितसुद्धा करंत नसावा. त्याने आपली हनुवटी छातीवर टेकवली होती, तो चंद्राकडे बघंत नव्हता, आपल्या खालच्या मागे सुटंत असलेल्या पृथ्वीत त्याला काही रस नव्हता. वोलान्दच्या बाजूने उडताना तो आपल्याच विचारांत मग्न होता.
“तो इतका कां बदललाय?” शीळ घालंत असलेल्या वा-यांत मार्गारीटाने हळूच वोलान्दला विचारलं.
“ह्या सामन्ताने कधी चुकीचा विनोद केला होता,” वोलान्दने अंगा-यासारखा डोळा असलेला चेहरा मार्गारीटाकडे वळवून म्हटलं. “अंधार-उजेडाबद्दल बोलताना त्याने केलेली शब्दकोटी बिल्कुल चांगली नव्हती. म्हणूनंच ह्या सामन्ताला त्यानंतर दीर्घ काळासाठी आणखी जास्त विनोद करावा लागला, त्याच्या कल्पनेपेक्षांही जास्त. पण आज ती रात्र आहे, जेव्हां कर्मांचा हिशेब तपासला जातो. सामन्ताने आपला हिशेब पूर्णपणे चुकवलाय आणि त्याचं खातं बंद झालंय!”
रात्रीने बेगेमोतची लुसलुशीत शेपूट गिळून टाकली, त्याच्या अंगावरून केसाळ कातडी खेचून तिचे तुकडे-तुकडे करून तळ्यांवर फेकून दिले. तो जो बोका होता, रात्रीच्या राजकुमाराचं मनोरंजन करायचा, आता झाला होता एक कृश तरुण, सैतान-दूत, अत्युत्तम विनोद करणारा, जो एकेकाळी जगांत राहात होता. आता तोपण मौन झाला होता आणि चुपचाप उडंत होता, आपला तरुण चेहरा चंद्रामधून झरझर झरंत असलेल्या प्रकाशाकडे करून.
सगळ्यांत कोप-यावर उडंत होता अजाज़ेलो, चमकत्या स्टीलच्या पोषाकांत. चद्राने त्याचासुद्धा चेहरा बदलून टाकला होता. त्याचा बाहेर निघालेला घाणेरडा दात गायब झाला होता, डोळ्याचं तिरपेपणा सुद्धा मायावीच निघालं. अजाजेलोचे दोन्हीं डोळे एकसारखेच होते, काळे आणि भावरहित, आणि चेहरा पांढराफट्ट आणि सर्द. आता अजाज़ेलो आपल्या ख-या स्वरूपांत उडंत होता, वाळवंटाच्या सैतानाच्या रूपांत, सैतान-हत्या-याच्या रूपांत.
स्वतःला तर मार्गारीटा बघू नाही शकली, पण तिने नीट बघितलं की मास्टरसुद्धां बदललाय. आता चंद्राच्या प्रकाशांत त्याचे केस चमकंत होते आणि मागे एका वेणीसारखे एकत्र झाले होते, जी वा-यांत उडंत होती. जेव्हां मास्टरच्या पायांवरून कोट दूर व्हायचा, मार्गारीटाला त्याच्या लांब-लांब जोड्यांमधे जळंत असलेले, विझंत असलेले तारे दिसायचे. तरुण सैतानासारखाच मास्टरपण चंद्रावरून नजर न काढता उडंत होता, त्याच्याकडे बघून असा हसंत होता, जणु पूर्व परिचित प्रियतमा असावी. एकशे अठरा नंबरच्या खोलींत लागलेल्या सवयीप्रमाणे स्वतःशीच काहीतरी बडबडंत होता.
आणि, शेवटी, वोलान्दपण स्वतःच्या ख-या स्वरूपांत उडंत होता. मार्गारीटाला समजलं नाही की त्याच्या घोड्याची लगाम कश्याची बनली आहे, आणि ती विचार करंत होती की त्या चंद्राच्या साखळ्या आहेत, आणि त्याचा घोडा – नैराश्याची प्रतिमूर्ती; घोड्याची ग्रीवा – काळ्या ढगाची, आणि घोडेस्वाराची रिकीब – ता-यांच्या पांढ-या गुच्छ्यांची भासंत होती.
अश्या प्रकारे शांततेत बराच वेळ उडत राहिले, जोपर्यंत खालचं दृश्य बदलू नाही लागलं.
उदास, निराश जंगल अंधा-या पृथ्वीच्या गर्भांत बुडून गेले आणि आपल्यासोबत टिमटिम करणा-या नद्यांच्या धारांनासुद्धां घेऊन गेले. खाली शिलाखण्ड दिसूं लागले, ते चमकंत होते आणि त्यांच्या मधे मधे खोल जागा होत्या, जिथे चंद्राचा प्रकाश पोहोचंत नव्हता.
वोलान्दने एका दगडी, विषण्ण, सपाट उंचवट्यावर आपल्या घोड्याची लगाम सैल सोडली आणि तेव्हां घोड्यांच्या खुरांच्या खाली चरमरंत असलेल्या गोट्यांचा आणि खुंटांचा आवाज ऐकंत मण्डळी हळू-हळू जाऊ लागली. चंद्र ह्या ठिकाणी आपला सम्पूर्ण, हिरवंट प्रकाश पसरंत होता आणि लवकरंच मार्गारीटाने ह्या विषण्ण जागेवर बघितली एक खुर्ची आणि तिच्यांत बसलेल्या माणसाची श्वेत आकृति. शक्य होतं, की तो माणूस एकदम बहिरा होता, किंवा आपल्या विचारांत हरवला होता. त्याने घोड्यांच्या वजनामुळे दगडी जमिनींत होत असलेल्या कम्पनांना नाही ऐकलं, आणि मण्डळीसुद्धां त्याला त्रास न देता त्याच्याजवळ गेली.
चंद्र मार्गारीटाची मदत करंत होता; तो विजेच्या सर्वोत्तम लैम्पपेक्षाही छान चमकंत होता. ह्या प्रकाशांत मार्गारीटाने पाहिलं की बसलेला माणूस, ज्याचे डोळे आंधळ्यासारखे वाटंत होते, आपले हात चोळंत होता आणि ह्याच निर्जीव नेत्रांना चंद्राकडे लावून होता. आता मार्गारीटाने हेसुद्धां बघितलं, की त्या वजनदार पाषाणाच्या खुर्चीजवळ, जिच्यावर चंद्राच्या काही ठिणग्या चमकताहेत, एक काळा, भव्य, तीक्ष्ण कान असलेला कुत्रा लोळला आहे, जो आपल्या मालकासारखाच व्याकुळतेने चंद्राकडे बघंतोय.
खुर्चीवर बसलेल्या माणसाच्या पायांजवळ तुटलेल्या सुरईचे तुकडे विखुरले आहेत आणि न वाळलेल्या काळपट-लाल द्रवाचं छोटसं तळं बनलंय.
घोडेस्वारांनी आपले घोडे थांबवले.
“तुमची कादम्बरी वाचली गेलीये,” वोलान्दने मास्टरकडे वळून सांगायला सुरुवात केली, “आणि तिच्याबद्दल फक्त येवढंच सांगितलं आहे, की ती अपूर्ण आहे. म्हणून मी तुम्हांला तुमचा नायक दाखवूं इच्छित होतो. जवळ-जवळ दोन हजार वर्षांपासून तो इथे बसलेला आहे आणि झोपेत असतो, पण जेव्हां पौर्णिमेची रात्र येते, तर, तुम्हीं बघताय ना, की कशी अनिद्रा त्याला सतावते. हा चंद्र न केवळ त्याला, पण त्याच्या स्वामिभक्त कुत्र्यालासुद्धां व्याकूळ करतो. जर हे खरं असलं, की कायरता – सर्वाधिक अक्षम्य अपराध आहे;, तर ह्यांत कुत्र्याचा तर काही दोष नाहीये. हा बहादुर कुत्रा फक्त ज्या वस्तूला भ्यायला, ती म्हणजे – वादळ! चला, जाऊं द्या, जो प्रेम करतो, त्याला प्रियकराच्या नशीबाचा वाटा भोगावांच लागतो.”
“तो काय म्हणतोय?” मार्गारीटाने विचारलं आणि तिच्या शांत चेह-यावर सहानुभूती झळकली.
“तो म्हणतो आहे...” वोलान्दचा आवाज घुमला, “बस एकंच गोष्ट, ती ही की चंद्राच्या प्रकाशांतसुद्धां त्याला चैन नाहीये आणि त्याचं कर्तव्यंच इतकं वाईट आहे. असं तो सारखा म्हणंत असतो, जेव्हां झोपलेला नसतो, आणि जेव्हां झोपतो, तेव्हा त्याला फक्त एकंच दृश्य दिसतं – चंद्र प्रकाशाचा रस्ता, ज्याच्यावर चालंत त्याला जायचं आहे कैदी हा-नोस्त्रीच्या जवळ आणि त्याच्याशी बोलायचं आहे, कारण की त्याला खात्री आहे, की तेव्हां, वसन्त ऋतूच्या निस्सान महिन्याच्या चौदा तारखेला तो त्याच्याशी नीट बोलूं शकला नव्हता. पण, हाय, तो ह्या रस्त्यावर जाऊं शकंत नाही; कोणी त्याच्याजवळ येऊसुद्धा शकंत नाही. तर मग, काय करायचं, बस, तो स्वतःशीच बोलंत बसतो. पण काहीतरी परिवर्तन तर व्हायलांच पाहिजे नं. म्हणून चंद्राला सांगंत असलेल्या आपल्या गोष्टींमधे तो कधी कधी हेसुद्धां जोडून देतो, की त्याला सगळ्यांत जास्त चीड आपल्या अमरत्वाची आहे, आणि आपल्या अभूतपूर्व प्रसिद्धीचीसुद्धां. तो ठामपणे सांगतो, की तो आनन्दाने आपलं भाग्य लेवी मैथ्यूच्या भाग्याशी बदलायला तयार झाला असता.”
“कधीsss… एका चंद्रासमोर केलेल्या चुकीच्या बदले बारा हजार चंद्र! काय हे खूप जास्त नाहीये?” मार्गारीटाने विचारलं.
“काय फ्रीडाच्या गोष्टीची पुनरावृत्ती होते आहे?” वोलान्दने म्हटलं, “पण मार्गारीटा, इथे तुम्हीं काळजी करू नका. सगळं ठीक होईल, जगाचा निर्माण ह्याच सिद्धांतावर झाला आहे.”
“त्याला सोडून द्या,” मार्गारीटा अचानक किंचाळली, तशीच, जेव्हां ती चेटकीण असताना ओरडली होती आणि ह्या किंचाळीने एक दगड गडगडून खाली अनंतांत विलीन झाला, पहाड गरजले. पण मार्गारीटा हे नाही सांगू शकली, की हा गडगडाट दगड पड्ल्याचा होता, की सैतानाच्या हसण्याचा, काहीही असो, वोलान्द मार्गारीटाकडे बघून हसंत होता, तो म्हणाला, “पहाडांवर किंचाळायची गरज नाहीये, त्याला ह्या शिळांच्या पडण्याची सवय झालीये, आणि त्याने तो उत्तेजित नाही होत. तुम्हांला त्याची सिफारश करण्याची गरंज नाहीये, मार्गारीटा, कारण की त्याच्यासाठी प्रार्थना केली आहे खुद्द त्याने, ज्याचाशी त्याला बोलायचं आहे,” आता तो मास्टरकडे वळून म्हणाला, “तर, मग, आता तुम्ही आपली कादम्बरी फक्त एका वाक्याने पूर्ण करूं शकता!”
पुतळ्यासारख्या उभ्या, आणि बसलेल्या न्यायाधीशाकडे बघंत असलेल्या मास्टरला कदाचित ह्याचीच प्रतीक्षा होती. तो हातांना तोंडाजवळ ठेवून असा ओरडला, की त्याचा आवाज सुनसान, निर्जन पहाडांवर प्रतिध्वनित होऊं लागला, “मुक्त आहेस! मुक्त आहेस! तो तुझी वाट बघतोय!”
पहाडांनी मास्टरच्या आवाजाला कडकडाटांत परिवर्तित केलं आणि ह्याच कडकडाटाने त्यांना छिन्न-भिन्न करून टाकलं. शापित प्रस्तर भिंती कोसळल्या. तिथे उरली फक्त ती – चौकोर जमीन, पाषाणाच्या खुर्चीसकट. त्या अंधा-या अनंताच्या वर, ज्यांत ह्या भिंती लुप्त झाल्या होत्या, धू-धू करंत जळू लागलं ते विशाल शहर आपल्या चमकत्या प्रतिमांसकट, ज्या हज्जारों पौर्णिमांच्या अवधीत फुलंत असलेल्या उद्यानाच्या वरती स्थित होत्या. सरळ ह्याच उद्यानापर्यंत पसरला न्यायाधीशाच्या तो चिरप्रतीक्षित चंन्द्रप्रकाशाचा रस्ता, आणि सगळ्यांत आधी तिकडे धावला तीक्ष्ण कानांचा श्वान. रक्तवर्णी किनारीचा पांढरा अंगरखा घातलेला माणूस आपल्या आसनावरून उठला आणि आपल्या भसाड्या, तुटक्या-फुटक्या आवाजांत काहीतरी ओरडला. हे समजणं कठीण होतं की तो रडतोय, की हसतोय, आणि तो काय ओरडतोय? फक्त येवढंच दिसलं, की आपल्या स्वामिभक्त रक्षकाच्या मागे-मागे तोसुद्धां चंद्राच्या रस्त्यावर पळाला.
“मला तिकडे जायचं आहे, त्याच्याकडे?” मास्टरने व्याकुळतेने विचारलं आणि घोड्याची लगाम खेचली.
“नाही,” वोलान्दने उत्तर दिलं, “जे काम पूर्ण झालेल आहे, त्याच्यामागे कां पळायचं?”
“तर, म्हणजे, तिकडे...?” मास्टरने विचारलं आणि मागे वळून तिकडे बघितलं, जिथे खेळण्यांसारख्या मीनारी आणि तुटक्या सूर्याच्या खिडक्या असलेलं शहर मागे राहिलं होतं, जे तो आत्तांच सोडून आला होता.
“तिकडेपण नाही,” वोलान्दने उत्तर दिलं, त्याचा आवाज गूढ होत शिळांवर वाहू लागला, “स्वप्नदर्शी, छायावादी मास्टर! त्याने, जो तू निर्मित केलेल्या नायकाला भेटण्यासाठी उत्सुक आहे – ज्याला तू इतक्यांतच मुक्त केलं आहेस – तुझी कादम्बरी वाचली आहे.” आता वोलान्दने मार्गारीटाकडे वळून म्हटलं, “मार्गारीटा निकोलायेव्ना! ह्या गोष्टीवर अविश्वास करणं अशक्य आहे, की तुम्हीं मास्टरसाठी सर्वोत्तम भविष्य शोधायचा प्रयत्न केला; पण हेसुद्धां खरं आहे की आता मी तुम्हाला जे सांगणार आहे; ज्याबद्दल येशुआने विनंती केली होती, ते तुमच्यासाठी, तुम्हां दोघांसाठी जास्त चांगलं आहे. त्यांना एकटं सोडून द्या,” वोलान्दने आपल्या खोगीरावरून मास्टरच्या खोगीराकडे वाकून दूर गेलेल्या न्यायाधीशाच्या पदचिन्हांकडे खूण करंत म्हटलं, “त्यांना त्रास नाही देणार. कदाचित ते आपसांत विचार-विमर्श करून एखाद्या निर्णयापर्यंत पोहोचतील, आता वोलान्दने येर्शलाइमकडे बघंत आपला हात हालवला आणि ते विझून गेलं.
“आणि तिकडेपण...” वोलान्दने पृष्ठभूमीकडे इंगित करंत म्हटलं, “त्या तळघरांत कराल तरी काय?” आता खिडकीतला तुटका सूर्य विझला. “कशाला?” वोलान्द दृढतेने, पण प्रेमाने म्हणंत होता, “ओह, त्रिवार रोमान्टिक मास्टर, तुला काय दिवसा आपल्या प्रियतमेसोबत चेरीच्या झाडांखाली हिंडायला नाही आवडणार कां, ज्यांच्यावर आत्ता बहर येण्यांतच आहे? आणि संध्याकाळी शूबर्टचं संगीत ऐकावसं नाही आवडणार कां? तुला मेणबत्तीच्या प्रकाशांत हंसाच्या पंखाच्या लेखणीने लिहायला नाही आवडणार कां? तुला असं नाही वाटंत का, की फाउस्टसारखा, प्रयोगशाळेत रेटॉर्टच्याजवळ बसून नवीन होमुनकुलसच्या निर्माणाची आशा करावी? तिकडे, तिकडे...तिकडे वाट बघतंय तुझं घर, म्हाता-या सेवकासह, मेणबत्त्या जंळत आहेत, आणि त्या लवकरंच विझण्यांत आहेत, कारण लवकरंच तुझं स्वागत करेल सकाळ, ह्या रस्त्यावर, मास्टर, ह्या रस्त्यावर! नमस्कार! माझी वेळ झालीये!”
“नमस्कार!” मास्टर आणि मार्गारीटाने एकदम ओरडून वोलान्दला उत्तर दिलं, तेव्हां काळ्या वोलान्दने कोणताही रस्ता न शोधता, खिंडारांत उडी घेतली, आणि त्याच्या मागे-मागे ओरडंत, हल्ला करंत. त्याच्या टोळीनेपण उडी घेतली. मग काहीही शिल्लक नाही उरलं – ना पाषाण शिळा, ना सपाट छोटासा चौरस्ता, ना चंद्रप्रकाशाचा रस्ता, ना येर्शलाइम, काहीही उरलं नाही. काळे घोडेपण लुप्त झाले. मास्टर आणि मार्गारीटाने पाहिली उषःकालीन लालिमा, जिच्याबद्दल त्यांना वचन दिलेलं होतं. ती इथेंच सुरू झाली होती, अर्धरात्र असतानांच. मास्टर आपल्या प्रियतमेबरोबर, सकाळच्या पहिल्या किरणांच्या प्रकाशांत छोट्याश्या दगडी पुलावर चालू लागला. त्याने पुल पार केला. झरा ह्या ख-या प्रेमिकांच्या मागे राहिला आणि ते वाळू असलेल्या रस्त्यावर निघाले.
“ऐक, स्तब्धतेला,” मार्गारीटाने मास्टरला म्हटलं आणि त्यांच्या अनवाणी पायांखाली वाळू करकरू लागली, “ऐक, आणि त्या सगळ्याचा आनंद घे, जे जीवनांत तुला नाही मिळालं – शांततेचा. बघ, समोर; हे राहिलं तुझं घर – शाश्वत, चिरंतन घर जे तुला पुरस्कारस्वरूप मिळालंय. मला इथूनंच वेनिशियन खिडकी आणि द्राक्षाचा लटकंत असलेला वेल दिसतोय, ती छ्तापर्यंत उंच झालेली आहे. हे तुझं घर आहे, तुझं घर...शाश्वत. मला माहीत आहे, की संध्याकाळी तुझ्याकडे ते येतील ज्यांच्यावर तू प्रेम करतोस, ज्यांच्यांत तुला रस आहे आणि जे तुला त्रास नाही देत. ते तुझ्यासाठी साज वाजवतील, तुझ्यासाठी गातील; तू बघशील, खोलींत कसा अद्भुत प्रकाश असेल, जेव्हां मेणबत्त्या जळूं लागतील. तेव्हां तू आपली डाग पडलेली, सदाबहार टोपी घालून झोपी जाशील, तू ओठांवर स्मित घेऊन झोपशील. गाढ झोप तुला शक्त्ती देईल, तू खोलवर विश्लेषण करूं शकशील. आणि मला तर तू आता पळवूंच शकणार नाही. तुझ्या झोपेची रक्षा करेन मी.”
मास्टरच्यासोबत आपल्या शाश्वत घराकडे जाता-जाता असं बोलंत होती मार्गारीटा आणि मास्टरला अनुभव होत होता, की मार्गारीटाचे शब्द अगदी तसेंच झंकृत होताहेत, जसा आत्ताच मागे सुटलेला झरा झंकारंत होता. मास्टरची स्मरण शक्ती, व्याकुळ वेदनेच्या सुयांनी चालणी झालेली स्मरण शक्ती हळू-हळू विझूं लागली. कोणीतरी मास्टरला मुक्त केलं, अगदी तस्संच, जसं त्याने आपल्या नायकाला आत्तांच मुक्त केलं होतं. हा नायक लुप्त झाला अनंतात, लुप्त झाला कधी न परतण्यासाठी; भविष्यवेत्ता सम्राटाचा पुत्र, रविवारच्या पूर्वसंध्येंत त्याला क्षमा मिळाली, जूडियाचा पाचवा क्रूर न्यायाधीश अश्वारोही पोन्ती पिलात.


********

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें