पाच
भानगड
ग्रिबायेदवमधेच होती
दुतर्फा झाडे असलेल्या
रिंगरोडवर एका खुरट्या बागेच्या आंत फिक्क्या पिवळ्या रंगाचं एक प्राचीन दोनमजली
घर होतं, ज्याला लोखंडाची एक सुरेख जाळी
रिंगरोडच्या फुटपाथापासून विभक्त करंत होती. घराच्या समोर सिमेन्टचा एक चौक होता.
हिवाळ्यांत ह्या चौकावर बर्फाचा ढेर लागायचा, ज्यावर एक
फावडा दिसायचा आणि उन्हाळ्यांत हाच चौक कैनवासच्या तम्बूखाली एका शानदार
रेस्टॉरेन्टमधे परिवर्तित व्हायचा.
घराच नाव होतं ‘ग्रिबायेदव भवन’. असं म्हणतांत की कधी काळी हे घर
अलेक्सांद्र ग्रिबायेदवच्या1 आत्याचं होतं. पण ते खरोखरंच तिचं होतं कां
– आम्हांला नक्की माहीत नाहीं. मल असंपण आठवतंय की कदाचित ग्रिबायेदवची अशी कोणतीच
आत्या नव्हती, जिच्या मालकीचं एखाद घर असावं...पण घर ह्यांच नावाने
ओळखलं जायचं. मॉस्कोच्या एका शेखीखोराने तर हे पण सांगितलं होतं की दुस-या
मजल्यावर असलेल्या स्तंभांच्या गोल हॉल मधे प्रख्यात लेखकाने आपल्या सुप्रसिद्ध ‘बुद्धिमुळे दुर्भाग्य’ ह्या रचनेचे काही अंश ह्याच
आत्याला वाचून दाखवले होते. ती सोफ़्यावर लोळून ऐकायची. वाचले असतील, नसतील, आम्हांला काय! मह्त्वाची गोष्ट ही नाहीये.
महत्वाची गोष्ट ही आहे,
की आजकाल ह्या भवनावर त्यांच ‘मॉसोलित’चा अधिकार आहे, जिचा अध्यक्ष पत्रियार्शी तलावावर
येईपर्यंत, दुर्दैवी मिखाइल अलेक्सान्द्रोविच होता.
साधारणपणे मॉसोलितच्या
सदस्यांपैकी कुणीच ह्याला ‘ग्रिबायेदव भवन’
म्हणंत नव्हतं. ते सगळे फक्त म्हणायचे – ‘ग्रिबायेदव’ : “मी काल दोन तास ग्रिबायेदवच्या जवळ घुटमळंत होतो”, “मग काय झालं?” “एका महिन्यासाठी याल्टाची ट्रिप पटकांवलीय”,
“शाबाश!” किंवा “बेर्लिओज़कडे जा, आज चार ते
पाच पर्यंत तो ग्रिबायेदवमधे लोकांना भेटतोय...” आणि असंच बरंचस.
मॉसोलित ग्रिबायेदवमधे
अश्या प्रकारे स्थित होतं की त्याच्यापेक्षां चांगला आणी आरामशीर विकल्प दुसरा
असूंच शकंत नव्हता. ग्रिबायेदवमधे येणा-या प्रत्येक व्यक्तीला,
इच्छा नसतांनासुद्धां, विभिन्न स्पोर्ट्स
ग्रुप्सचे विज्ञापनं आणि मॉसोलितच्या सदस्यांचे सामूहिक आणि व्यक्तिगत फोटोग्राफ़्स
बघावेंच लागायचे, ज्यांनी ह्या भवनाच्या दुस-या मजल्यावंर
जाणा-या जिन्याच्या भिंती सुसज्जित होत्या.
दुस-या मजल्याच्या
पहिल्याचं खोलीचा दारावर लिहिलं होतं. ’फिशिंग
एण्ड हॉलिडे सेक्शन’, आणि तेथेंच गळाला लागलेल्या मोट्ठ्या
लाल पंखांच्या मास्याचं चित्र लावलं होतं.
दुस-या नंबरच्या खोलीवर
काही-काही न समजणारा मजकूर होता : एक दिवसीय सृजनात्मक यात्रेचा पास. एम. वी.
पद्लोझ्नायाला भेटा’.
पुढच्या दारावर एक छोटंस,
पण बिल्कुलंच न समजणारं वाक्य लिहिलेलं होतं : ‘पेरेलीगिनो.’2 मग आगंतुकाची नजर आत्याबाईंच्या घराच्या अखरोटच्या मजबूत दारांवर
लटकलेल्या पट्ट्यांवर फिरायची : ‘पक्लेव्किनाला भेटण्यासाठी
इथे नाव नोंदावे’, ‘कैशियर’, ‘चित्रकारांचे
व्यक्तिगत हिशेब’...
खालच्या मजल्यावर एका
मोट्ठ्या रांगेच्या वरून, ज्यांत प्रत्येक
मिनिटाला लोकांची संख्या वाढंत होती, ती पट्टी दिसंत होती,
जिच्यावर लिहिलेलं होतं : ‘क्वार्टर-सम्बंधी
प्रश्न’.
‘क्वार्टर-सम्बंधी
प्रश्ना’च्या मागे एक शानदार पोस्टर दिसंत होतं. त्यांत एक भला
मोट्ठा खडक दाखवण्यांत आला होता. खडकाच्या काठाने फेल्टचा डगला घालून आणि
खांद्यावर राइफल घेऊन एक अश्वारोही जात होता. खाली लिण्डनचे वृक्ष आणि एक बाल्कनी.
बाल्कनीत एक तरूण पंखांचा टोप घातलेला, आपली धाडसी नजर वर कुठेतरी
लावून, हातांत पेन धरून बसलेला. ह्या पोस्टर खाली लिहिलं
होतं : ‘सृजनात्मक कार्यासाठी सर्व सुविधांसह सुट्ट्या – दोन
आठवडे ( कथा- दीर्घकथा), ते एक वर्ष (कादम्बरी- तीन खण्डाची
कादम्बरी), याल्टा, सूकसू, बोरावोये, त्सिखिजिरी महिंजौरी, लेनिनग्राद (शीत-महल3). ह्या दारासमोर सुद्धां लाइन होती,
पण फार मोठी नव्हती, जवळ-जवळ दीडशे माणसं
असतील.
पुढे,
ग्रिबायेदव-भवनाच्या प्रत्येक वळणांवर, जिन्यावर,
कोप-यांत कोणची न कोणची पट्टी दिसयचीच:
मॉसोलित एक्ज़ेक्यूटीव बोर्ड, काउन्टर नं, 2,3,4,5; सम्पादक
मण्डळ, मॉसोलित अध्यक्ष, बिलियर्ड रूम,
विभिन्न प्रकारचे प्रशासनिक कार्यालय. आणि शेवटी तोच स्तंभ असलेला
हॉल जेथे आत्याबाई आपल्या बुद्धिमान भाच्याच्या हास्यपूर्ण रचनेचा आस्वाद
घ्यायच्या.
ग्रिबायेदवमधे येणारा
प्रत्येक व्यक्ति, जर तो अगदीच मूर्ख नसेल, तर सहज समजू शकंत होता की मॉसोलितचे भाग्यशाली सदस्य किती मस्त जीवन जगंत
होते, आणि लगेच मत्सराची काळी सावली त्याच्या मानगुटीवर
बसायची. तो लगेच आकाशाकडे दुःखाने बघंत, त्या परमपिता
परमात्म्याला दोष द्यायचा की त्याने ह्या पामराला एकही साहित्यिक योग्यता कां नाही
दिली, जिच्याशिवाय मॉसोलितचं तपकिरी, महागड्या
चामड्यांत फ्रेम केलेलं, सोनेरी किनारीचं ओळख पत्र
बाळगण्याची कल्पनांच करता येत नव्हती, ज्याच्याशी मॉस्कोचे
जवळ-जवळ सगळेच लोक परिचित होते.
आतां मत्सराबद्दल कुणी काय
सांगू शकतं? हा एक वाईट गुण आहे, तरी पण अतिथिच्या दृष्टीने बघायला हवं. जे काहीं त्याने वरच्या मजल्यावर
पाहिलंय, ते आणि फक्त तेच सर्व काही नव्हतं. आत्याबाईंच्या
घराचा सम्पूर्ण खालचा मजला एका रेस्टॉरेन्टकडे होता, आणि ते
पण कसं रेस्टॉरेन्ट! खरं म्हणजे हे मॉस्कोचं सर्वोत्तम रेस्टॉरेन्ट होतं. फक्त
ह्यासाठींच नाही, की ते जांभळ्या,
असीरियन-आयाळ असलेल्या घोड्यांच्या चित्रांनी सुसज्जित कमानीदार छप्पर असलेल्या
दोन हॉल्समधे होतं, फक्त ह्याचसाठी नाही की त्याच्या
प्रत्येक टेबलावर सुंदर शॉलने झाकलेला लैम्प होता, फक्त
ह्याचसाठी नाही की रस्यावरून जाणा-या कोणच्याही माणसाला तिथे प्रवेश नव्हता,
पण ह्यासाठी कि त्यांत मिळणा-या पदार्थांमुळे ग्रिबायेदव मॉस्कोच्या
कोणत्याही रेस्टॉरेन्टला मागे टाकायचा, प्रत्येक पदार्थ
अत्युत्तम प्रतिचा असायचा, आणि अगदीच माफ़क दरांत मिळायचा.
म्हणून त्या वार्तालापांत
आश्चर्य करण्यासारखं काहींच नव्हतं, जो ह्या सत्य
ओळींच्या लेखकाने एकदा ग्रिबायेदवचा बाहेर, जाळीच्या जवळ
ऐकला होता :
“अम्रोसी,
तू आज रात्री कुठे जेवणार आहेस?”
“ही पण काय विचारायची
गोष्ट आहे, फोका! इथेच! अर्चिबाल्द अर्चिबाल्दोविचने
माझ्या कानांत सांगितलंय की आज जेवणांत एक खास प्रकारचा मासा आहे, एक सर्वोत्तम पदार्थ.”
“तुला जगण्यांची कला
माहितीये, अम्रोसी!” दीर्घ श्वास भरून हडक्या,
पस्त फोकाने, ज्याच्या मानेवर एक गळू होता,
गुलाबी ओठांच्या, महाकाय, सोनेरी केस, गोबरे गाल असलेल्या कवी अम्रोसीला
म्हटलं.
“माझ्यांत अशी कोणची विशेष
योग्यता नाहीये,” अम्रोसीने त्याचा विरोध करंत
म्हटलं, “फक्त माणसां सारखं जगण्याची साधारणशी इच्छा आहे.
फोका, तुला हेच म्हणायचं आहे न, की हा
विशिष्ठ प्रकाराचा मासा ‘कलीजे’ रेस्टॉरेन्टमधे
सुद्धां मिळतो. पण ‘कलीजे’मधे त्याची
किंमत आहे तेरा रूबल्स आणि पंधरा कोपेक्स, आणि आमच्याकडे पाच
पन्नास. शिवाय, ‘कलीजे’तील मासा तीन
दिवस शिळा असतो; आणि ह्या गोष्टीची पण ग्यारंटी नाहीये की ‘कलीजे’ मधे थियेटरच्या जवळच्या रस्त्यावरून घुसून
आलेला पहिलांच तरुण हातांतले द्राक्षाचे गुच्छे तुमच्या थोबाड्यावर मारणार नाही.
नाही, मी ‘कलीजे’च्या
अगदीच विरोधांत आहे.” गस्त्रोनोमच्या सम्पूर्ण गल्लीत अम्रोसीचा जोरदार आवाज घुमला,
“फोका, तू मला पटवण्याचा प्रयत्न नको करू!”
“मी तुला पटवण्याचा
प्रयत्न बिल्कुल करंत नाहीये,” फोका बडबडला,
“घरी सुद्धां तर जेवूं शकतो.”
“मी तुमचा आज्ञाकारी सेवक
आहे,” अम्रोसी आपलंच तुणतुणं वाजवंत होता, “ मी कल्पना करूं शकतो, की तुझी बायको कशी आपल्या
बिल्डिंगच्या कॉमन-किचन मधे विशेष मास्याचे कटलेट्स करंत असेल. ही...ही...ही!
गुडबाय, फोका! आणि गुणगुणंत ओसरीवर ताणलेल्या तंबूकडे
निघाला.
एह-हे-हे...हो,
बस झालं, गप बसा! मॉस्कोच्या जुन्या
नागरिकांच्या मनांत प्रख्यांत ग्रिबायेदवच्या आठवणी अजून शिल्लक आहेत! तुम्हीं
कोणत्या फालतू मास्याबद्दल बोलतांय! हा तर अगदीच बेकार पदार्थ आहे, प्रिय अम्रोसी! भरपूर मांस असलेला, उच्च कोटीचा
स्टर्जन, चांदीच्या प्लेटमधे त्याचे स्लाइसेस, ज्यांना क्रे फिशच्या शेपट्यांनी आणि ताज्या कैविअर ने सजवलेलं असायचं?
आणि छोट्या छोट्या प्लेट्समधे पांढरे मश्रूम्स कोकिळेच्या
अंड्याबरोबर? आणि चिमण्यांचं नरम-नरम मांस तुम्हांला आवडलं
नाही कां? आळंब्यांबरोबर? आणि लावा पक्षी?
साडे दहा रूबल्सचा? आणि संगीतमय वातावरण?
आणि अत्युत्तम, विनयपूर्ण सेवा! आणि जुलै
महिन्यांत, जेव्हां सम्पूर्ण परिवार गावांतल्या समर कॉटेजमधे
असतो आणि तुम्हांला अत्यावश्यक साहित्यिक कार्यकलापामुळे शहरांतंच थांबावं लागतंय –
तेव्हां ओसरीत द्राक्षाच्या वेली खाली, सोनेरी डिजाइनच्या
प्लेटमधे, चकचक करणा-या टेबलक्लॉथवर प्रेतानेर सूप! आठवतंय,
अम्रोसी? ह्यांत विचारायची काय गोष्ट आहे?
तुमच्या ओठांकडे बघूनंच कळतंय की तुम्हांला ते सगळं आठवतंय. तुमच्या
ह्या साधारण मास्याची त्या सगळ्याशी तुलनांच नाही! आणि मोट्ठा पाणलावा पक्षी,
सारस, बगळे, ऋतु प्रमाणे
जंगली पक्षी, घशांत शिट्टी वाजवणारी दारू? बस झालंय, वाचकहो, तुम्हीं
हरवून जाल! माझ्या बरोबर या!...
जेव्हां बेर्लिओज़
पत्रियार्शीवर मेला, त्या रात्री साडे अकरा वाजतां
ग्रिबायेदवच्या वरच्या मजल्यावर फक्त एकांच खोलीत उजेड होता, तिथे सुमारे बारा साहित्यकार मीटिंगसाठी दाटीने बसलेले होते आणि मिखाइल
अलेक्सान्द्रोविचची वाट बघंत होते.
टेबलांवर,
खुर्च्यांवर आणि दोन्हीं खिडक्यांच्या कट्ट्यांवर बसलेल्या ह्या
लोकांचा मॉसोलितच्या प्रबंधकाच्या खोलीत दमटपणा आणि उष्णतेमुळे दम घुटंत होता.
उघड्या खिडक्यांमधून ताज्या वा-याची छोटीशी झुळूकसुद्धां येत नव्हती. मॉस्को
दिवसभरांत सिमेन्टच्या रस्त्यांवर गोळा झालेली उष्णता बाहेर फेकत होता आणि हे
स्पष्टंच होतं, की ह्या उष्णतेपासून रात्रीपण आराम मिळणार
नव्हता. आत्याबाईंच्या घराच्या तळघरांत असलेल्या रेस्टॉरेन्टच्या किचनमधून
कांद्याचा वास येत होता. सगळेच तहानेले, घाबरलेले आणि
रागावलेले होते.
शांत स्वभावाच्या कथाकार
बेस्कुद्निकोवने व्यवस्थितपणे कपडे घातले होते. त्याचे
डोळे प्रत्येक वस्तूकडे लक्ष देऊन बघायचे, पण त्यांचा भाव
कुणावरंच प्रकट नाही व्हायचा. त्याने घड्याळ काढली. सुई अकराच्या अंकावर
पोहोचण्यांतच होती. बेस्कुद्निकोवने घडाळ्याच्या डायलवर बोटाने ठक-ठक केलं आणि
तिला जवळंच टेबलावर बसलेल्या कवि दुब्रात्स्कीला दाखवलं. तो व्याकुळतेने आपला पाय
हलवंत होता. त्याने पिवळे रबराचे बूट घातले होते.
“खरंच,”
दुब्रात्स्की बडबडला.
“पट्ठा कदाचित
क्ल्याज़्मांत अडकलांय,” जाड आवाजांत नस्तास्या
कुकिनीश्ना नेप्रेमेनोवाने म्हटलं. नस्तास्या मॉस्कोच्या व्यापारी वर्गातील एक
अनाथ मुलगी होती, जी लेखिका झाली होती आणि ‘नौचालक जॉर्ज’ ह्या टोपण नावाने समुद्री बटालियन
संबंधी गोष्टी लिहायची.
“माफ़ करा!” लोकप्रिय स्केच
लेखक जाग्रिगोवने बेधडक म्हटलं, “मला तर इथे
उकळंत बसण्यापेक्षां बाल्कनींत चहा प्यायला आवडलं असतं. सभा तर दहा वाजता होणार
होती नं?”
“आजकाल क्ल्याज़्मांत खूप
चांगलं हवामान आहे...” नौचालक जॉर्जने सर्व उपस्थितांना उचकावंत म्हटलं. तिला
माहीत होतं की क्ल्याज़्मावर असलेली साहित्यकारांची ग्राम्य-कॉलनी पेरेलीगिनो सगळ्यांचीच
दुखती रग आहे. “कदाचित, आतां
कोकिळेने पण गाणं सुरूं केलं असेल. मला तर, नेहमी शहरापासून
दूरंच काम करायला आवडतं, विशेष करून वसंत ऋतूंत.”
“तीन
वर्षापासून पैसे भरतोय, की गलगंडाने त्रस्त बायकोला ह्या
स्वर्गांत नेता येईल, पण सध्यां तरी दूर-दूर पर्यंत आशेचा
किरण दिसंत नाहीये,” विखारी आणि दुःखी आवाजांत कादम्बरीकार
येरोनिक पप्रीखिनने म्हटलं.
“हे तर ज्याचं त्याचं नशीब
आहे,” आलोचक अबाब्कोव खिडकीच्या कट्ट्यावरून
भुणभुणला.
‘नौचालक
जॉर्ज’च्या डोळ्यांत आनंद तरळला. ती आपल्या जाड्या आवाजाला
किंचित मऊ करंत म्हणाली, “मित्रांनो...आपलाल्या मत्सर नको
करायला. गावांतल्या त्या कॉलनींत आहेत फक्त बावीस दाचाज़4 आणि फक्त
सातंच नवीन दाच्यांचा निर्माण करण्यांत येणारेय, आणि आपण
मॉसोलितचे सदस्य आहोंत – तीन हजार.”
“तीन हजार एकशे अकरा,”
कोप-यांतून कुणीतरी दुरुस्ती केली.
“हूँ,
बघा,” ‘नौचालक जॉर्जने आपलं घोडं पुढे दामटलं,
“करणार काय? स्पष्टंच आहे की गावातील दाचे आपल्यापैकी
सर्वांत योग्य व्यक्तींनाच मिळाले आहेत...”
“जनरल्स!” सरंळ-सरंळ
भांडणांत पडंत स्क्रीनप्ले लेखक ग्लुखारेव म्हणाला.
बेस्कुद्निकोव कृत्रिम
जांभई देत खोलीतून बाहेर निघून गेला.
“पेरेलीगिनोच्या पाच
खोल्यांत फक्त एकटा!” तो गेल्याबरोबर ग्लुखारेव म्हणाला.
“लाव्रोविच तर सहा
खोल्यांमधे एकटा राहतोय,” देनिस्किन ओरडला, “आणि डाइनिंग रूम मधे पूर्ण ओकचं फर्नीचर आहे!”
“ऐ,
सध्यां मुद्दा हा नाहीये,” अबाब्कोव भुणभुणला,
“मुद्दा हा आहे, की साडे अकरा वाजलेत.”
इतक्यांत हल्ला ऐकूं आला,
कदाचित काही माणसं भांडंत होती. लोकं घृणित पेरेलीगिनोत फोन करूं
लागले, फोनची घण्टी दुस-यांच घरांत वाजली, जिथे लाव्रोविच रहायचां; असं सांगण्यांत आलं की
लाव्रोविच गेलाय, आणि हे ऐकल्यावर सगळ्यांना खूप राग आला. मग,
असंच, ललित कला संघांत एक्स्टेन्शन नं. 930वर
फोन करण्यांत आला, पण, स्पष्टंच आहे,
तेथून कुणीच उत्तर नाही दिलं.
”तो कमींत कमी फोन तर
करूंच शकंत होता,” देनिस्किन, ग्लुखारेव
आणि क्वांत ओरडले.
ओह,
ते सगळे उगीचंच ओरडंत होते : आतां मिखाइल अलेक्सान्द्रोविच कुठेंच
फोन करूं शकंत नव्हता. ग्रिबायेदवहून दूर, खूप दूर, एका मोट्ठ्या हॉलमधे, हज्जारों लैम्प्सच्या
प्रकाशांत, जस्त्याच्या तीन टेबलांवर तो पडला होता, जो काही वेळापूर्वी मिखाइल अलेक्सान्द्रोविच होता. पहिल्या टेबलवर –
निर्वस्त्र, कोरड्या रक्ताने माखलेला, तुटलेला
हात आणि आंत घुसलेल्या छातीचे धड, दुस-यावर तुटलेले दात आणि
निस्तेज डोळे असलेलं डोकं, ह्या डोळ्यांना आतां तीक्ष्ण भेदक
प्रकाशाचीसुद्धां भीति वाटंत नव्हती. आणि तिस-या टेबलवर पडला होता – कडक झालेल्या
चिंध्यांचा ढेर.
बिना डोक्याच्या मृत
शरीराजवळ उभे होते : फोरेन्सिक मेडिसिनचा प्रोफेसर, पैथोलॉजिस्ट
आणि शल्य क्रिया विशेषज्ञ, अन्वेषण दलाचे प्रतिनिधि आणि
मिखाइल अलेक्सान्द्रोविचच्या आजारी बायकोने फोन करून पाठवलेला मॉसोलितचा
उप-प्रबन्धक – साहित्यकार झेल्दीबिन.
झेल्दीबिनला आणण्यासाठी
कार पाठवण्यांत आली होती. सगळ्यांत आधी त्याला अन्वेषण दलाबरोबर मृतकाच्या
फ्लैटमधे नेण्यांत आलं (तेव्हां मध्य रात्र उलटून गेली होती),
तेथे त्याचे कागदपत्र सीलबंद करण्यांत आले. त्यानंतर ते सगळे
शवागारांत पोहोचले.
मृतकाच्या अवशेषांच्या
समोर उभे राहून ते विचार विनिमय करंत होते, की काय
करणं जास्त चांगलंय : छाटलेलं डोकं धडाला शिवून टाकावं किंवा मृत शरीराला
ग्रिबायेदव हॉल मधे असंच ठेवण्यांत यावं आणि त्याला हनुवटीपर्यंत काळ्या कापडाने
झाकावं?
हो,
मिखाइल अलेक्सान्द्रोविच आतां कुठेच फोन करूं शकणार नव्हता.
देनिस्किन, ग्लुखारेव, क्वान्त आणि
बेस्कुद्निकोव उगीचंच वैतागले होते आणि ओरडंत होते. बरोब्बर बारा वाजता ते बाराही
साहित्यकार वरच्या मजल्यावरून उतरून रेस्टॉरेन्ट कडे आले. तेथेपण त्यांने मिखाइल
अलेक्सान्द्रोविचला मनांतल्या मनांत खूप शिव्या दिल्या : दालनांतले सगळे टेबल्स,
स्पष्टंच आहे, आधीच भरले होते आणि त्यांना
डिनर ह्यांच सुंदर, पण दमट हॉल्समधे करावं लागलं.
ठीक अर्धरात्रीला
त्यांच्यापैकी पहिल्या हॉल मधे आधी काहीतरी पडलं, खणखणलं,
सांडलं आणि उसळलं आणि तेव्हांच बारीक पुरुषी आवाज जणु गातां-गातां
ओरडला “अल्लीलुइया!!” ग्रिबायेदवचा प्रख्यात जॉज़ सुरू झाला होता. मग घामाने
थबथबलेले चेहरे लखकन् चमकले, असं वाटलं की छतावर चित्रित
घोडे जणु सजीव झालेयंत. लैम्प्सचा प्रकाश द्विगुणीत झाला, अचानक,
जणु कारागृहाच्या साखळ्या तोडून दोन्हीं हॉल्स नाचूं लागले आणि
त्यांच्या बरोबर दालनसुद्धां नाचूं लागलं.
ग्लुखारेव कवियत्री तमारा
पलुमेस्यात्सबरोबर नाचंत होता; क्वान्त नाचंत
होता; कादम्बरीकार झकोपोव नाचंत होता, पिवळा
फ्रॉक घातलेल्या अभिनेत्रीबरोबर; आणि त्याचबरोबर नाचंत होते
: द्रागून्स्की, चेर्दाक्ची, छोटा सा
देनिस्किन विशालकाय ‘नौचालक जॉर्ज’ बरोबर;
सुंदर आर्किटेक्ट सिमेयकिना गॉल पांढरी विजार घातलेल्या अनोळखी
माणसाबरोबर नाचंत होती, ज्याने तिला घट्ट पकडलं होतं. सगळेच
नाचंत होते : आपले आणि आमंत्रित केलेले , मॉस्कोचे आणि बाहेरहून आलेले, क्रोन्श्दातहून आलेला
लेखक जोहान, रस्तोवचा कुणी वीत्या कूफ्तिक, जो कदाचित निर्देशक होता आणी ज्याच्या सम्पूर्ण गालावर एक जांभळा डाग
पसरला होता; मॉसोलितच्या काव्य-विभागाचे प्रख्यात प्रतिनिधि नाचंत
होते, जसे की पविआनोव, बोगाखुल्स्की,
स्लाद्की, श्पीच्किन आणि अदेल्फिना बुज़्द्याक;
काही असे लोकंही नाचंत होते, ज्यांचा व्यवसाय
माहीत नव्हता, बॉक्सर्स सारखे केस असलेले तरूण नाचंत होते;
पैड लावलेले खांदे असलेला कोणी दाढीवाला म्हातारा नाचंत होता,
ज्याच्या दाढींत हिरव्या कांद्याची पात अटकली होती, त्याच्या बरोबर मोठ्या वयाची, एनिमिक मुलगी, नारंगी रंगाचा सिल्कचा चुरगळलेला फ्रॉक घालून नाचंत होती.
घाम निथळंत असलेले वेटर्स
नाचणा-यांच्या डोक्यांवरून बियरचे फेसाळ ग्लास नेत होते. ते भसाड्या आणि
कटुतापूर्ण आवाजांत ओरडंत होते, “क्षमा करा,
नागरिक!” मागे कुठे माइक्रोफोनवर कोणीतरी हुकूम सोडंत होतं, “कार्स्की एक! ज़ुब्रोव्स्का दोन!” होम स्टाइल ट्राइप!” बारीक आवाज़ आता गात
नव्हता, फक्त “अल्लीलुइय्या!” ओरडंत होता. जॉज़च्या सोनेरी
प्लेट्सचा खणखणाट कधी कधी जेवणाच्या प्लेट्सच्या खडखडीला दाबंत होता, ज्यांना प्लेट धुणारे धुवून–धुवून खाली किचनपर्यंत जाणा-या घसरत्या फळीवर
सरकवंत होते. थोडक्यांत म्हणजे, अगदी नरक!
आणि ह्या नरकांत
अर्धरात्रीला एक भूत अवतरलं. काळे केस आणि डैगर-टाइप दाढी असलेला एक तरूण दालनांत
आला. त्याने फ्रॉक-कोट घातला होता. दालनांत येऊन त्याने शाही थाटांत आपल्या ह्या
संपदेकडे बघितलं. रहस्यवादी म्हणतांत की एके काळी हा तरूण फ्रॉक कोट घालंत नव्हतां,
उलंट त्याच्या कंबरेवर चामड्याचा चौडा पट्टा कसलेला असायचा, ज्यातूंन पिस्तूलांची मूठ दिसायची. कावळ्याच्या पंखांसारखे त्याचे केस लाल
रेशमी रुमालाने बांधलेले असायचे आणि त्याच्या हुकुमाने कराईब्स्की सागरांत समुद्री
दरोडेखोराची एक ब्रिगेड जायची, जिच्या काळ्या झेण्ड्यावर एक कवटी
आणि दोन हाडांच चित्र असायचं.
पण नाही,
नाही! हे रहस्यवाद अगदी बकवास करतांत, खोटं
बोलतांत, जगांत कुठेही कराईब्स्की नावांचा समुद्रंच नाहीये,
आणि त्यावर दरोडेखोरांची जहाजं देखील नाही जायची, त्यांच्या पाठलाग शस्त्रांनी सज्ज जहाजं नाही करायची, आणि तोपेचा धूरसुद्धां पाण्यावर नाही तरंगायचा. नाही, असं काहींच नव्हतं, अगदीच नव्हतं. बस, फक्त हेच, रोगंट लीपा वृक्ष आहे. त्याच्या मागे
लोखंडाची जाळी आणि जाळीच्या मागे दुतर्फा झाडं असलेला रस्ता...आणि फ्लॉवरपॉटमधे
तरंगणारा बर्फ, आणि बाजूच्या टेबलवर दारूमुळे लाल बुंद
झालेले जनावरांसारखे डोळे दिसतायंत, आणि सगळं कसं भीतिदायक,
प्रचण्ड भीतिदायक आहे...अरे देवा...माझ्या देवा, ह्याच्यापेक्षां बरं विषंच असेल, मला तेंच द्या!...
आणि अचानक एका टेबलाच्या
मागून ‘बेर्लिओज़’ शब्द
उसळला. जॉज़ एकदम विस्कटला आणि थांबला, जणुं त्याला कोणी
गुद्दा मारला असावा. “काय, काय, काय,
काय!!” “बेर्लिओज़!!!” आणि सगळे आपापल्या जागेवरून उड्या मारून उठले
आणि ओरडूं लागले.
हो,
मिखाइल अलेक्सांद्रोविचबद्दल ही भयानक बातमी ऐकून दुःखाची एक लाट
पसरली. कोणी काही कारण नसतांना उगीचंच धावपळ करूं लागला, ओरडूं
लागला, की ह्या क्षणाला सगळ्यांत महत्वाची गोष्ट ही आहे,
की आपल्या जागेवरून न हलतां एका सामूहिक टेलिग्रामचा मजकूर ठरवावा
आणि टेलिग्राम पाठवून द्यावा.
पण आम्हीं विचारतोय,
की कसला टेलिग्राम आणि कुठे पाठवायचां? आणि
कां? मुख्य प्रश्न आहे, कुठे? आणि त्याला कोणत्याही प्रकारच्या टेलिग्रामची आतां काय गरंज आहे, ज्याचं ठेचलेलं डोकं आता शल्य क्रिया विशेषज्ञाच्या रबरी हातमोजे
घातलेल्या हातांत होतं, ज्याच्या मानेवर आतां प्रोफेसर
तीक्ष्ण सुईने भोक करणार होते? तो मेलाय आणि त्याला आतां
कोणत्याही टेलिग्रामची काहींच गरंज नाहीये. सगळं संपलंय. आता टेलिग्राफ ऑफ़िसवर
आणखी ओझं कशाला...
हो,
मेलांय, मेलांय...पण आम्हीं तर जिवंत आहे!
हो,
तर दुःखाची लाट पसरली, पण तशीच थांबली. थांबून
गेली आणि हळू-हळू कमी होऊं लागली. कोणी-कोणी तर आपल्या टेबलवर परतला आणि आधी
लपून-छपून आणि मग खुल्लम खुल्ला वोद्काचा एक पैग पिऊन सोबत ठेवलेले पदार्थ खाऊं लागला.
खरंय, चिकन-कटलेट्सला कशाला फेकायचं? आम्हीं
मिखाइल अलेक्सांद्रोविचची मदत कशी काय करूं शकतो? काय उपाशी
राहून? पण आम्हीं तर जिवंत आहोत!
स्वाभाविकपणे,
पियानोला कुलूप लागलं, जॉज विखुरला; काही संवाददाता मृत व्यक्तिबद्दल मृत्युलेख लिहायला आपल्या ऑफिसला निघून गेले.
हे कळलं की शवागारातून झेल्दीबिन परंत आलांय. तो मृतकाच्या वरच्या मजल्यावरच्या
खोलींत बसून गेला. तेव्हांच हे पण कळलं की तोच बेर्लिओज़च्या जागेवर, म्हणजेच प्रमुखाच्या पदावर राहील. झेल्दीबिनने कार्यकारिणीच्या बारा
सदस्यांना रेस्टॉरेन्टमधून बोलावलं. बेर्लिओज़च्या खोलीत झालेल्या आपात-बैठकीत
अश्या काही प्रश्नांवर विचार होऊं लागला, ज्यांना स्थगित
करणे शक्य नव्हते. हे प्रश्न होते : स्तंभांचा हॉल स्वच्छ करून, त्यांत शवागाराहून आणून मृतदेह ठेवावा, तेथे
जाण्यासाठी रस्ता मोकळा करावा आणि इतरही काही, ह्या शोकपूर्ण
घटनेशी संबंधित गोष्टी.
आणि रेस्टॉरेन्ट पुन्हां
आपलं रात्रीचं जीवन जगूं लागला आणि बंद होई पर्यंत, म्हणजेच
सकाळी चार पर्यंत जगला असतां, जर एखादी अप्रत्याशित घटना
नसती घडली, ज्यामुळे रेस्टॉरेन्टच्या पाहुण्यांना धक्कांच
बसला, बेर्लिओज़च्या मृत्युच्या बातमीपेक्षां सुद्धां जास्त.
आधी ते कोचवान5
थक्क झाले, जे ग्रिबायेदव भवनच्या गेटवर असायचे.
सगळ्या उपस्थितांनी त्यांच्यापैकी एकाला बॉक्सवर चढून ओरडताना ऐकलं : “छिः! जरा
बघा तर!” मग जिकडे पहाल तिकडे, लोखण्डाच्या जाळी जवळ एक उजेड
दिसूं लागला, जो हळू हळू दालनाकडे येऊं लागला. टेबलांच्या
मागे बसलेले लोक आपल्या जागेवरून उठून-उठून बघूं लागले, बघतांत
काय, की ह्या उजेडाबरोबर रेस्टॉरेन्टच्या दिशेने एक पांढरं
भूत येतंय. जेव्हां ते जाळीच्या वळणावर पोहोचलं, तेव्हां सगळेच
आपापल्या टेबलाच्यामागे फोर्कने मासा उचललेल्या अवस्थेत, डोळे
विस्फारंत जणु जमून गेले. दरबानने, जो इतक्यातंच रेस्टॉरेन्टच्या
क्लोकरूम मधून सिगरेट प्यायला बाहेर निघाला होता, आपली
सिगरेट विझंवली आणि भुताला रेस्टॉरेन्टमधे येऊं न देण्यासाठी त्याच्याकडे जाऊं
लागला, पण माहीत नाही कां, त्याने असं
नाही केलं आणि मूर्खासारखा गालांत हसू लागला.
आणि भूत,
जाळीचं वळणं पार करून, बेधडक दालनांत घुसलं.
आता सगळ्यांनी बघितलं की ते काही भूत-बीत नाहीये, परंतु इवान
निकोलायेविच बिज़्दोम्नी – प्रख्यांत कवि आहे.
तो अनवाणी,
फाटक्या पांढ-या शर्टांत होता, ज्याच्यावर
समोर सेफ्टीपिनने कागदाचं एका अज्ञात संताचं चित्र लावलं होतं, त्याने पट्त्या पट्ट्यांची पांढरी लांब पायाची चड्डी घातली होती. इवान
निकोलायेविचने हातांत एक जळती मेणबत्ती पकडली होती. इवान निकोलायेविचच्या उजव्या
गालावर खरचटल्याची ताजी खूण होती. दालनांत सगळे चिडीचूप झाले, शांततेच्या गहनतेचा अंदाज़ करणं कठीण होतं. एका वेटरच्या हातांतल्या
प्याल्यातूंन फेसाळ बियर फरशीवर सांडत होती.
कवीने मेणबत्ती डोक्यावर
उंच केली आणि जो-याने म्हणाला, “कसे आहांत,
मित्रांनो?” मग जवळच्या टेबलवर नजर टाकून
विषादपूर्ण स्वरांत म्हणाला, “नाही, तो
इथे नाहीये!”
दोन आवाज ऐकूं आले,
एक जाडा आवाज निष्ठुरतेने म्हणाला, “काम तमाम!
वात-भ्रम!”
आणि दुसरा,
घाबरलेला, एका स्त्रीचा आवाज म्हणाला, “पोलिसवाल्यांनी ह्याला ह्या अवस्थेत रस्त्यावर कसं जाऊं दिलं?”
इवान निकोलायेविचने हे
ऐकलं आणि ह्याचं उत्तरपण दिलं, “दोनदा पकडण्याचा
प्रयत्न केला, स्कातेर्त्नीमधे आणि इथेंच ब्रोन्नायावर,
पण मी जाळीवरून उडी मारून आंत आलोय, बघा
गालावर खरचटलंय!”
इवान निकोलायेविचने
मेणबत्ती वर केली आणि ओरडला, “साहित्यिक
बंधूंनो!” (त्याचा जाडा भरडा आवाज आणखीनंच जोरदार आणि उत्साही झाला), सगळेजणं, प्लीज़, माझं बोलणं
ऐका! तो प्रकट झालांय! लवकर त्याला पकडा, नाहीतर तो
वर्णनातीत संकटांना आमंत्रित करेल!”
“काय?
काय? त्याने काय म्हटलं? कोण प्रकट झालांय?” चारीकडून आवाज यायला लागले.
“कन्सल्टन्ट!” इवानने
उत्तर दिलं, “आणि ह्या कन्सल्टन्टने आत्तांच
पत्रियार्शीवर मीशा बेर्लिओज़ला मारून टाकलंय.”
हे ऐकतांच आतल्या हॉलमधून
लोकं दालनांत यायला लागले. इवानच्या मेणबत्तीच्या चारीकडे गर्दी जमा व्हायला
लागली.
“माफ़ करा,
माफ़ करा, खरं खरं सांगा...” इवान
निकोलायेविचच्या कानाजवळ एक शांत आणि नम्र स्वर ऐकूं आला, “सांगा,
कसं मारून टाकलं? कोणी मारून टाकलं?”
“परदेशी सलाहकार,
प्रोफेसर आणि गुप्तचराने!” चारीकडे बघंत इवान उत्तरला.
“आणि त्याचं नाव काय आहे?”
हळूंच पुन्हां कानाजवळ त्याच आवाजाने विचारलं.
“ओह,
ओह, नाव!” हताश होऊन इवान ओरडला, “जर मला त्याचं नाव माहीत असतं! मी त्याच्या विज़िटिंग कार्डवर लिहिलेलं नावंच
तर नाही वाचलं...फक्त पहिलं अक्षर लक्षांत आहे ‘व’…नाव ‘व’ अक्षराने सुरू होतं! ‘व’ने सुरूं होत असलेलं नाव काय होतं बरं?”
विचार करण्याच्या
आविर्भावांत कपाळाला हात लावंत इवानने स्वतःलांच विचारलं आणि मग एकदम बडबडला,
“वे,वे,वे!
वा...वो...वाग्नेर? वायनेर? वेग्नेर?
विन्तेर?” उत्तेजनेमुळे इवानच्या डोक्यावरचे
केस उभे व्हायला लागले.
“वुल्फ?”
करुणा भावाने एक महिला ओरडली. इवानला राग आला.
“मूर्ख!” ओरडणा-या महिलेला
नजरेने शोधंत इवान ओरडला, “इथे वुल्फचं काय
काम आहे? वुल्फचा काहीच दोष नाहीये! वो...वो...नाही! नाही
आठवणार! बरं, नागरिकहो, लगेच पोलिसांत
फोन करा, की मोटर साइकलवर पाच बंदुकधा-यांना पाठवावे,
प्रोफेसरला पकडायला. हे सुद्धां नक्की सांगा की त्याच्या बरोबर आणखी
दोघं आहेत : एक लम्बू, चौकटवाला...चश्मा तुटलेला...आणि एक
काळा बोका, चमकदार; तोपर्यंत मी
ग्रिबायेदवमधे त्याला शोधतो...मला वाटतंय की तो इथेंच आहे!”
इवान पुन्हां अस्वस्थ झाला,
आजूबाजूच्या लोकांना धक्के मारंत, मेणबत्ती
इकडे तिकडे फिरवूं लागला; स्वतःवरंच मेण सांडंत, टेबलांच्या खाली बघूं लागला. तेवढ्यांत एक शब्द ऐकूं
आला : “डॉक्टरला बोलवा!” आणि इवानला कोणाचातरी भरलेला, पुचकारंत
असलेला, चिकणा, चरबी चढलेला, शिंगांच्या फ्रेमचा चष्मा लावलेला चेहरा दिसला.
“कॉम्रेड बिज़्दोम्नी,”
तो चेहरा थाटांत म्हणाला, “शांत व्हा! तुम्हीं
आपल्या सगळ्यांचे प्रिय मिखाइल अलेक्सांद्रोविचच्या, नाही –
फक्त मीशा बेर्लिओज़च्या मृत्युने खूप संतप्त झाले आहांत...आम्हाला हे चांगलंच
कळतंय. तुम्हांला विश्रांतीची गरज आहे. आता कॉम्रेड्स तुम्हांला नेऊन बिछान्यांत
झोपवतील आणि तुम्हीं सगळं विसरून जाल...”
“तू...” दात करकरंत इवान
मधेच म्हणाला, “तुला कळतंय का, की प्रोफेसरला पकडणं जरूरी आहे? आणि तू आपल्या मूर्ख
बडबडीने माझं डोकं चाटतोयस! मूर्ख!”
“कॉम्रेड बिज़्दोम्नी,
क्षमा करा,” चेहरा लाल पडंत, मागे होत म्हणाला, तो पस्तांवत होता की ह्या
भानगडींत कशाला पडला.
“नाही,
कुणा दुस-याला करूं शकतो, पण तुला तर मी माफ
नाही करणार!” शांत तिरस्काराने इवान निकोलायेविच म्हणाला.
आवेगामुळे त्याचा चेहरा
विकृत झाला. त्याने पटकन मेणबत्ती उजव्या हातांतून डाव्या हातांत घेतली. झटक्याने
हात उचलला आणि ह्या सहानुभूति दाखवणा-या चेह-यावर जोराने लगावला.
तेवढ्यांत सगळ्यांनी
इवानला पकडायचं ठरवलं आणि त्याच्यावर झपटले. मेणबत्ती विझली,
आणि त्याच्या चेह-यावरून खाली घसरून पडलेला चष्मा पायांनी चिरडला
गेला. इवानने भयंकर डरकाळी फोडली, जी रस्त्यापर्यंत ऐकू गेली,
आणि संरक्षणात्मक पवित्रा घेतला, टेबलांवरून
प्लेट्स झणझणंत खाली पडू लागल्या, बायका ओरडूं लागल्या.
जोपर्यंत रेस्टॉरेन्टचे कर्मचारी
इवानला टॉवेल्सने बांधंत होते, खाली क्लॉकरूमजवळ
चौकीदार आणि कमाण्डरमधे असा वार्तालाप झाला:
“तू बघितलं होतं नं की तो
फक्त चड्डींत आहे?” थण्ड आवाजांत त्याने विचारलं.
“हो,
आर्चिबाल्द आर्चिबाल्दोविच!” संकोचाने दबकंत चौकीदार उत्तरला,
“पण, जर ते मॉसोलितचे मेम्बर आहेत, तर मी त्यांना आत जाण्यापासून कसा थांबवूं शकतो?”
“तू बघितलंस नं की तो
चड्डीत आहे?” कमाण्डरने पुन्हां विचारलं.
“क्षमा करा,
आर्चिबाल्द आर्चिबाल्दोविच,” लाल चेह-याने चौकीदार
उत्तरला, “मी काय करूं शकंत होतो? मला
पण समजतंय की दालनांत बायका बसल्या आहेत...”
बायकांचं इथे काही काम
नाहीये, बायकांना ह्याने काही फरक पडत नाही,”
चौकीदाराला डोळ्यांने भस्म करंत कमाण्डर म्हणाला, “पण पोलिसला ह्याने फरक पडतो! चड्डी घातलेला माणूस मॉस्कोच्या रस्त्यांवर
फक्त तेव्हांच फिरूं शकतो, जेव्हां त्याला पोलिस पकडून
नेताहेत, आणि ते पण, जेव्हां त्याला
पोलिस स्टेशनवर नेत असतांत! आणि तुला, जर चौकीदार आहेस,
तर हे माहीत असायला पाहिजे, की अश्या माणसाला
बघतांच, क्षणाचाही विलम्ब न लावतां शिट्टी फुंकणं सुरू केलं
पाहिजे. तूं ऐकतोयस?”
अर्धवट पागल झालेल्या
चौकीदाराने आत, दालनांतून येत असलेले ऊई...ऊई...चे
आवाज, प्लेट्स फेकण्याचे आवाज आणि बायकांच्या किंकाळ्या
ऐकल्या.
“तर,
ह्याच्यासाठी तुझ्याशी कसं वर्तन करावं?” कमाण्डरने
विचारलं.
चौकीदारच्या चेह-याचा रंग
टाइफाइडच्या रोग्यासारखा झाला. डोळे मृतप्राय झाले. त्याला असा भास झाला की काळे,
व्यवस्थित सावरलेले केस आगीच्या ज्वाळांनी वेढलेय. कोट गायब झाला.
कमरेला बांधलेल्या बेल्ट मधून पिस्तौलचे टोक दिसूं लागले. चौकीदाराला भास झाला की
तो फासावर लटकलांय. स्वतःच्या डोळ्यांनी त्याने आपली जीभ बाहेर निघालेली पाहिली.
स्वतःचं निष्प्राण डोकं खांद्यावर कललेलं बघितलं. त्याला लाटांचा आवाज़सुद्धां ऐकूं
आला. चौकीदाराचे गुडघे थरथरू लागले. पण तेवढ्यांत कमाण्डरने त्याच्यावर दया करंत
आपली तीक्ष्ण नजर विझवली.
“बघ,
निकोलाय! हे शेवटचं सांगतोय, आम्हांला
तुझ्यासारख्या चौकीदारांची बिल्कुल गरज नाहीये. तू चर्चचा चौकीदार हो!” येवढं
सांगून कमाण्डरने शीघ्र, स्पष्ट, अचूक
आज्ञा दिली, “जलपान गृहातून पन्तेलेयला बोलाव. पोलिस रिपोर्ट. गाडी – पागलखान्यांत न्यावे,” आणि
पुढे म्हणाला, “शिट्टी वाजवं!”
जवळ-जवळ पंधरा मिनिटांनी
अति आश्चर्यचकित लोकांनी, फक्त रेस्टॉरेन्टमधूनंच
नाही, पण रस्त्यावरून आणि रेस्टॉरेन्टच्या बगिच्यांत उघडंत
असलेल्या खिडक्यांमधून पाहिलं की कसे ग्रिबायेदवच्या गेटमधून पन्तेलेय, चौकीदार, पोलिसवाले, रेस्टॉरेन्टचा
वेटर आणि कवि –यूखिन बाहुलीसारख्या गुंडाळलेल्या एका तरुणाला बाहेर नेताहेत. तरूण
रडंत-रडंत ओरडत होता, -यूखिनवर हल्ला करायला तयार होता,
आणि तो रडंत-रडंत ओरडला, “जंगली!”
बाहेर उभ्या असलेल्या ट्रक
ड्राइवरने चेह-यावर दुष्टपणाचे भाव आणंत इंजिन सुरू केलं,
जवळंच उभ्या असलेल्या निर्भीक गाडीवानाने आपल्या घोड्याला चाबुक
मारंत म्हटलं, “चला! मी पागलखान्यांत लोकांना घेऊन गेलेलो
आहे!”
गर्दींत हल्ला होत होता.
ह्या अप्रत्याशित घटनेवर वाद विवाद होत होता. थोडक्यांत,
खूपंच ओंगळवाणं, नीच, कलंकित,
खिळवून ठेवणारं दृश्य होतं, आणि हे तेव्हांच
संपलं, जेव्हां तो ट्रक दुर्दैवी इवान निकोलायेविचला,
पोलिसवाल्याला, पन्तेलेयला आणि –यूखिनला भरून
ग्रिबायेदवच्या गेटच्या बाहेर घेऊन गेला.
*******
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें