सहा
स्किज़ोफ्रेनिया, हेंच सांगितलं
जेव्हां
मॉस्कोच्या बाहेर,
नदीच्या किना-यावर
स्थित, हल्लीच बनवलेल्या प्रख्यांत मानसिक रुग्णालयाच्या
अतिथि-कक्षांत पांढरा डगला घातलेला,
टोकदार दाढीचा एक माणूस आला,
तेव्हां रात्रीचा दीड वाजला होता. तीन स्वास्थ्य कर्मचारी सोफ्यावर
बसलेल्या इवान निकोलायेविचवर नजर लावून होते. तिथेच उद्विग्न कवि र्यूखिनसुद्धां
होता. ज्या टॉवेल्सने इवान निकोलायेविचला बांधलं होतं, त्यांचा
ढेर आता त्याच सोफ्यावर पडला होता. इवान निकोलायेविचचे हातपाय आता मोकळे होते.
आत येणा-या माणसाला बघतांच
र्यूखिन!चा चेहरा फिक्का पडला, तो किंचित खोकून
म्हणाला, “नमस्ते डॉक्टर!”
डॉक्टरने वाकून र्यूखिन!च्या
अभिवादनाचं उत्तर दिलं, पण वाकतांना तो त्याच्याकडे न
बघतां इवान निकोलायेविचकडे बघंत होता.
“डॉक्टर,
हा...माहित नाही कशाला...” घाबरलेल्या दृष्टीने इवान निकोलायेविचकडे
बघून र्यूखिन रहस्यमय ढंगाने पुटपुटला, “प्रसिद्ध कवि
बिज़्दोम्नी...तुम्हीं बघतांय नं...आम्हांला शंका वाटतेय की कुठे वात-भ्रम तर नाही
झाला!”
“काय ठासून प्यायलेत?”
डॉक्टरने दात न हलवतां विचारलं.
“नाही,
प्यायलेत, पण येवढी नाही की एकदम...”
“झुरळं,
उंदीर, शैतान, आवारा
कुत्रे तर नव्हते पकडंत?”
“नाहीं,”
र्यूखिनने घाबरंत उत्तर दिलं, “मी ह्यांना
काल बघितलं होतं आणि आज सकाळीपण. अगदी स्वस्थ्य होते...”
“मगर चड्डींत कां आहेत?
काय सरंळ बिस्त-यातूंन उचलून आणलंय?”
“डॉक्टर,
ते रेस्टॉरेन्टमधे ह्याच अवस्थेत आले होते.”
“आहा,
आहा!” डॉक्टरांने संतुष्ट भावाने म्हटलं, “ही
खरचटल्याची खूण कां आहे? कुणाशी भांडले होते कां?”
“जाळीवरून उडीमारून आत
येताना पडले होते. मग रेस्टॉरेन्टमधे एका माणसाला मारलंसुद्धां...आणि आणखीनही कुणाला...”
“बरं,
बरं, बरं,” डॉक्टरने
म्हटलं आणि इवानकडे वळून म्हणाला, “नमस्ते!”
”नमस्ते,
विध्वंसका!1 इवान रागाने ओरडला.
र्यूखिन घाबरला. नजर वर
करून सज्जन डॉक्टरकडे बघण्याची त्याची हिंमत नाही झाली. पण त्याने जरासुद्धां वाईट
वाटून घेतलं नाही, उलंट सवयीनुसार अगदी सहज चष्मा
काढला, आपल्या डगल्याचं पुढचं टोक उचलून त्याला पैंटच्या
मागच्या खिशांत खोवलं आणि मग इवानला विचारलं, “तुमचं वय काय
आहे?”
“तुम्हीं सगळे माझ्यापासून
दूर व्हा, नरकांत जा, खरंच
नरकांत जा!” इवान कोरडेपणाने ओरडला आणि त्याने तोंड फिरवलं.
“तुम्हीं रागावतांय कशाला?
मी काही अप्रिय बोललो कां?”
“माझं वय तेवीस वर्ष आहे,”
उत्तेजित होऊन इवान म्हणाला, “आणि मी तुम्हां
सर्वांची कम्प्लेन्ट करीन, आणि घाणेरड्या माणसां, तुला तर मी चांगलंच बघून घेईन!” त्याने –यूखिनला म्हटलं.
“तुम्हीं कशाबद्दल
कम्प्लेन्ट कराल?”
“हेंच,
की तुम्हीं सगळे मला, एका स्वस्थ्य माणसाला
बळजबरीने पागलखान्यांत घेऊन आलांत!” इवानने रागाने म्हटलं.
आता –यूखिनने लक्ष देऊन इवानकडे
बघितलं. त्याचे हातपाय गार झाले : खरंच, त्याच्या
डोळ्यांत पागलपणाचं कोणतंच लक्षण नव्हतं. आतां ते ग्रिबायेदवमधे दिसंत होते,
तसे निस्तेज नसून पूर्वीसारखेच स्पष्ट,
पारदर्शी दिसायला लागले होते.
‘बाप रे!’
–यूखिन गार झाला, ‘हो, हा
तर एकदम सामान्य आहे? ओह, काय गडबड
झाली! खरंच आम्ही ह्याला इथे कां खेचंत आणलंय? सामान्य आहे,
अगदी सामान्य, फक्त थोडसं खरचटलंय...’
“तुम्हीं आत्तां... चकचकीत
स्टूलवर बसंत डॉक्टरने शांतिपूर्वक म्हटलं, “पागलखान्यांत
नसून दवाखान्यांत आहांत, जिथे गरज नसल्यास कोणीही तुम्हांला
बळजबरीने थांबवून ठेवूं शकंत नाही.”
इवान निकोलायेविचने
अविश्वासाने त्याच्याकडे पाहिलं, पण तरीही तो
बडबडतंच राहिला.
“देव त्यांचं भलं करो.
मूर्खांच्या गर्दीत एक तरी सामान्य माणूस निघाला, त्या
मूर्खांमधे पहिला आहे मूढ आणि प्रतिभाशून्य साश्का!”
“हा प्रतिभाशून्य साश्का
कोण आहे?” डॉक्टरने विचारलं.
“हाच र्यूखिन!” इवानने आपलं
घाणेरडं बोट र्यूखिनकडे दाखवंत म्हटलं.
तो अपमानाने तळमळला.
‘हे बक्षिस आहे माझं, धन्यवादाच्या ऐवजी!’ त्याने कटुतेने विचार केला,
‘कारण की मी ह्या सगळ्यांत गुंतलोय! ही खरोखरंच फारंच गुंतागुंतीची
परिस्थिति आहे!’
“ह्याची मानसिकता एकदम कुलाका2सारखी
आहे,” इवान निकोलायेविच पुढे म्हणाला, त्याला र्यूखिनवर
आरोप करण्याची लहर आली होती, “असा कुलाक, ज्याने सर्वहारा वर्गाचा बुरका पांघरलाय. ह्याच्या मरतुकड्या शरीराकडे बघा
आणि त्याची तुलना ह्याच्या खणखणींत कवितेशी करा, जी ह्याने
एक मे3च्या निमित्ताने लिहिली होती : हा...हा...हा... “उंच उठा!” आणि “
विखरून जा!”...आणि तुम्हीं ह्याच्या हृदयांत बघा, की तो कसला विचार करतोय...आणि तुम्हांला आश्चर्याचा धक्काच बसेल!” इवान
निकोलायेविच भयानकपणे हसला.
र्यूखिन दीर्घ श्वास घेत होता. त्याचा चेहरा लाल
झाला होता. तो फक्त एकांच गोष्टीचा विचार करंत होता की त्याने आपणहूनंच नागाला
छातीवर बोलावलंय, की तो अश्या माणसाच्या भानगडींत पडलांय, जो त्याचा कट्टर शत्रू निघालांय. रडणं तर अशासाठी होतं, की आता काही करतासुद्धां येत नव्हते : वेड्यावर कोण रागावूं शकतो?
“फक्त तुम्हांलाच इथे, आमच्याकडे,
कां आणलंय?” डॉक्टरने लक्ष देऊन बिज़्दोम्नीचे
आरोप ऐकल्यावर विचारलं.
“मसणांत जावोत ते मूर्ख! मला धरून घेतलं, कोणच्यातरी
चिंध्यांनी बांधून टाकलं आणि ट्रकमधे फेकून दिलं!”
“कृपा करून हे सांगा, की
तुम्हीं फक्त चड्डीतंच रेस्टॉरेन्टमधे कशाला गेले होते?”
“ह्यांत आश्चर्य करण्यासारखं काहीही नाहीये,” इवानने
उत्तर दिलं, “मी मॉस्को नदींत पोहण्यासाठी उडी मारली,
आणि कोणीतरी माझे कपडे चोरले, फक्त ही चड्डीच
शिल्लक ठेवली. आता मी मॉस्कोत निर्वस्त्रावस्थेत कसा फिरणार? जे होतं, तेच घातलं, कारण की
मला ग्रिबायेदवच्या रेस्टॉरेन्टमधे पोहोचण्याची घाई होती.”
डॉक्टरने प्रश्नार्थक दृष्टीने र्यूखिनकडे
बघितलं. त्याने तोंड वेंगाडून उत्तर दिलं, “रेस्टॉरेन्टचं नाव हेंच आहे.”
“अहा,” डॉक्टर म्हणाला, “आणि तुम्हाला
इतकी घाई कशाची होती? काही ज़रूरी मीटिंग होती?”
“मी त्या कन्सल्टन्टला पकडतोय,” इवान
निकोलायेविचने उत्तर देऊन व्याकुळतेने चारीकडे बघितलं.
“कोणच्या कन्सल्टन्टला?”
“तुम्हीं बेर्लिओज़ला ओळखतां?” इवानने
अर्थपूर्ण दृष्टीने विचारलं.
“तो...संगीतकार?”
इवानला राग आला.
“कुठला संगीतकार? ओह, हो,
हो, नाही. संगीतकार आणि मीशा बेर्लिओज़चं एकंच
आडनाव आहे!”
र्यूखिनची काहीही बोलायची इच्छा नव्हती, पण
त्याला डॉक्टरला समजवावंच लागलं.
“मॉसोलितच्या सेक्रेटरी बेर्लिओज़ला आज संध्याकाळी
ट्रामगाडीने चिरडलंय.”
“जर माहीत नाहीये, तर खोटं बोलूं नकोस,” इवान र्यूखिनवर गरजला, “तिथे तू नसून मी होतो.
त्याने मुद्दाम ट्रामखाली त्याचा निकाल लावला.”
“धक्का दिला?”
“कसला धक्का?” ह्या बिनबुडाच्या प्रश्नाने इवान
पुन्हां क्रोधित झाला, “त्याच्या सारख्याला तर धक्का
देण्याचीपण गरंज नाहीये! तो असे-असे चमत्कार करूं शकतो, की
बस बघतंच रहा! त्याला आधीच माहीत होतं, की बेर्लिओज़
ट्रामखाली येणारेय!”
“तुमच्या शिवाय ह्या कन्सल्टन्टला आणखी कोणी बघितलंय?”
“हीच तर मुश्किल आहे, फक्त मी
आणि बेर्लिओज़नेंच त्याला बघितलं होतं.”
“बरं, त्या खुन्याला पकडण्यासाठी तुम्हीं कोणचे उपाय केलेत?”
डॉक्टरने वळून पांढरं एप्रन घातलेल्या नर्सकडे बघितलं, जी एका कोप-यांत टेबलाच्या मागे बसली होती. नर्सने फॉर्म काढला आणि ती
रिकाम्या जागा भरूं लागली.
“मी हे उपाय केलेंत : किचनमधून मेणबत्ती उचलली...”
“ही?” डॉक्टरने तुटलेल्या मेणबत्तीकडे बोट दाखवंत विचारलं,
जी नर्सच्या समोर टेबलावर येशूच्या फोटोच्या जवंळ पडली होती.
“हीच, आणि...”
“आणि हा फोटो कशासाठी?”
“अरे हो, येशूचा फोटो...” इवानचा चेहरा लाल
झाला, “ह्या फोटोमुळेंच तर मी खूप घाबरलो,” त्याने पुन्हां र्यूखिनकडे बोट दाखवलं, “गोष्ट अशी
आहे की तो, कन्सल्टन्ट, तो, मी स्पष्टंच सांगेन... त्याचा ताब्यांत काही दुष्ट शक्ती आहेत...आणि
त्याला पकडणंसुद्धां अशक्य आहे.”
स्वास्थ्य परिचारक माहीत नाही कां, हाथ
लटकवंत उभे होते आणि एकटक इवानकडे बघंत होते.
“हो...” इवानने आपलं बोलणं सुरूं ठेवलं, “नक्कीच
ताब्यांत आहेत! हे एक निर्विवाद सत्य आहे, त्याने स्वतः
पोंती पिलातशी गप्पा मारल्या आहेत. हो, माझ्याकडे असं
बघण्याची काही गरंज नाहीये! मी खरंच सांगतोय! सगळं बघितलंय त्याने – दालन, आणी ताडाची झाडं...थोडक्यांत असं की तो पोंती पिलातच्या जवळ होता, ही गोष्ट मी शप्पत घेऊन सांगू शकतो.”
“मग, पुढे सांगा...”
“तर, मी येशूच्या चित्राला छातीला लावलं आणि पळूं
लागलो...”
तेवढ्यांत घडाळ्याने दोन ठोके दिले.
“एहे-हे!!” इवान उद्गारला आणि सोफ्यावरून उठला, “दोन
वाजून गेलेत आणि मी तुमच्याबरोबर वेळ वाया घालवतोय. क्षमा करा, टेलिफोन कुठेय?”
“टेलोफोन दाखवा,” डॉक्टरने परिचारकांना सांगितलं.
इवानने टेलिफोनचा रिसीवर उचलला आणि महिला
परिचारिकेने हळूंच र्यूखिनला विचारलं, “ह्यांचं लग्न झालंय कां?”
“एकटांच आहे!” र्यूखिनने घाबरून उत्तर दिलं.
“प्रोफसयूज़चे (व्यावसायिक संघाचे) सदस्य?”
“हो, आहे.”
“पोलिस?” इवान टेलिफोनवर ओरडंत होता,
“पोलिस? ड्यूटीवाले कॉम्रेड, ताबडतोब पाच मोटरसाइकल स्वारांना मशीनगन्स घेऊन परदेशी कन्सल्टन्टला
पकडायला पाठवा...काय? मला घ्यायला या, मी
स्वतः तुमच्या बरोबर येईन...मी कवि बिज़्दोम्नी पागलखान्यांतून बोलतोय...तुमचा
पत्ता काय आहे?” रिसीवर हाताने झाकून इवानने हळूंच डॉक्टरला
विचारलं, “हैलो, तुम्हीं ऐकतांय नं?
बकवास!” अचानक इवान भडकला आणि त्याने रिसीवर भिंतीवर मारला. मग तो
डॉक्टरकडे वळला, त्याच्याकडे हात देत कोरडेपणाने ‘पुन्हां भेटूंया’ म्हटलं आणि निघायला लागला.
“माफ करा, तुम्हीं जाल कुठे?” डॉक्टरने इवानच्या डोळ्यांत बघंत विचारलं, “दाट काळोख्या
रात्रींत, चड्डी घालून! तुमची तब्येत बरी नाहीये, इथेच थांबून जा!”
“जाऊं द्या ना,” इवान परिचारकांना म्हणाला जे
त्याचा मार्ग रोखंत उभे होते, “सोडाल किंवा नाही?” डरकाळी मारंत कवि ओरडला.
र्यूखिन थरथरायला लागला, पण महिला
परिचारिकेने टेबलवर लावलेलं एक बटन दाबलं, त्याच बरोबर
टेबलावर एक चमकदार डब्बा आणि किटाणुरहित इंजेक्शनची बाटली प्रकट झाली.
“अस्सं, तर हे असं आहे!” इवान रानटी, आहत स्वरांत म्हणाला, “ठीकाय! गुडबाय...” आणि तो
डोकं वर करून खिडकीच्या पडद्याकडे धावला. जोरदार टक्कर झाली, पण खिडकीच्या न फुटणा-या काचाने त्याला थोपून धरलं, पुढच्यांच
क्षणी इवान परिचारकांच्या हातांत पडला होता. त्याच्या घशातून घरघरीचा आवाज येत
होता. तो चावायच्या पवित्र्यांत होता आणि किंचाळंत होता :
“कसे-कसे काच तुम्हीं लोकांनी लावून
ठेवलेत!...सोडा! सोडा, म्हणतोय, सोडा!”
डॉक्टरच्या हातांत सुई चमकली. नर्सने झटक्याने
जुन्या ढील्या-ढाल्या शर्टाची बाही फाडली आणि हळुवारपणे इवानचा हात धरला. ईथरचा
वास घुमला. इवान चार माणसांच्या हातात ढीला पडला. डॉक्टरने चपळतेने ह्या क्षणाचा
फायदा घेत इवानच्या हातात सुई खुपसली. ते इवानला आणखी काही क्षण धरून होते आणि मग
त्याला सोफ्यावर टाकून दिलं.
“दरोडेखोर!” इवान ओरडला आणि त्याने सोफ्यावरून उडी
मारली, पण त्याला पुन्हां सोफ़्यावर ढकललं, जसंच त्याला
सोडलं, तो पुन्हां उडी मारायचा बेतांत होता, पण मग आपणहूनंच तिथेंच बसून गेला. तो गप्प झाला, रानटीपणाने
इकडे तिकडे बघितलं, मग एकदम एक जांभई दिली, आणि कटुतेने हसला.
“पकडलंच, शेवटी,” आणखी
एक जांभई देऊन तो म्हणाला. एकदम लोळला, डोकं उशीवर ठेऊन,
लहान मुलांसारखी मूठ गालाखाली ठेऊन, आवाजांत
कटुतेचा लेशही न आणतां, झोपाळू स्वरांत बडबडू लागला :
“फार छान...तुम्हांलाच ह्याची किंमत
मोजावी लागेल. मी सावध केलंय, आता तुम्हांला जे वाटेल,
ते करा! मला आता सगळ्यांत जास्त पोंती पिलातची काळजी
आहे...पिलात...” आणि त्याने डोळे बंद केले.
“अंघोळ, एकशे सतरा नंबरची स्वतंत्र खोली
आणि सोबत चौकीदार,” डॉक्टरने चष्मा घालतां घालतां आदेश दिला.
र्यूखिन पुन्हां एकदा थरथरला : पांढरी दारं काही आवाज न करतां उघडली. त्यांच्या
मागे कॉरीडोरमधे मंद प्रकाश होता. कॉरीडोरमधून रबराची चाकं असलेला स्ट्रेचर आला
ज्याच्यावर शांत पडलेल्या इवानला टाकलं. तो पुन्हां कॉरीडोरमधे चालला गेला,
त्याच्या मागे दारं बंद झाले.
“डॉक्टर,” घाबरलेल्या र्यूखिनने हळूंच
विचारलं, “म्हणजे हा खरोखरंच आजारी आहे?”
“ओह, हो,” डॉक्टर म्हणाला.
“त्याला झालं काय आहे?” र्यूखिनने
नम्रतेने विचारलं.
थकलेल्या डॉक्टरने त्याच्याकडे बघून सुस्त आवाजांत
उत्तर दिलं, “चलन आणि वाणी प्रक्रियांचा उन्माद...भ्रमात्मक
निष्कर्ष...कारण, कदाचित, जटिल
आहे...स्किज़ोफ्रेनिया झाल्याचा अंदाज करूं शकतो. तसेंच दारूची सवयपण आहे...”
डॉक्टरच्या बोलण्यांतून र्यूखिनला काहीच समजलं
नाही. त्याने अंदाज लावला की इवान निकोलायेविचची अवस्था खराब आहे आणि त्याने दीर्घ
श्वास घेऊन विचारलं, “आणि तो कुण्या कन्सल्टन्टबद्दल काय म्हणंत होता?”
“कदाचित त्याने कोणालातरी बघितलंय, ज्याने
त्याच्या कल्पनाशक्तिला धक्का पोहोचलांय. कदाचित त्याने ह्याला सम्मोहित केलं
असावं...”
काही मिनिटांनी ट्रक र्यूखिनला परत मॉस्कोला घेऊन
चालला होता. उजेड होत होता, आणि रस्त्यावर जळंत असलेल्या ट्यूब लाइट्सचा प्रकाश
अप्रिय वाटंत होता. ड्राइवर चिडला होता, की त्याची रात्र
वाया गेली होती. त्याने सम्पूर्ण ताकदीने ट्रक भरधाव सोडला आणि घडी-घडी इकडे तिकडे
वळवूं लागला. आणि जंगल गायब झालं. दूर, मागे कुठेतरी राहिलं,
नदी कोप-यांत दबकली. ट्रकच्या समोर विभिन्न प्रकारचे दृश्य येत गेले
: चौकीदाराची पोस्ट असलेल्या काही फ़ेन्सिंग्स, लाकडाने लादलेल्या गाड्या,
झाडांचे खुंट, काही काठ्या, काठ्यांवर काही रील्स, रेतीचे ढीग, जमीन – कालव्यांच्या बारीक धारांनी सजलेली – असं वाटंत होतं, की मॉस्को आतां आलंच; मॉस्को बस, कोप-याच्या मागेच आहे आणि गाडी तिथेंच थांबेल.
र्यूखिन जोरजोरांत उसळंत होता, त्याला
हिचके बसंत होते. एका झाडाचं खुण्ट, ज्यावर तो बसला होता,
घडी घडी त्याच्या खालून निसटायचा प्रयत्न करंत होतं, रेस्टॉरेन्टचे टॉवेल्स, ज्यांना पोलिसवाला आणि
पंतेलेय फेकून ट्रॉलीबसने परत चालले गेले होते, सम्पूर्ण
ट्रकमधे विखुरले होते. र्यूखिनने त्यांना आवरायचा प्रयत्न केला पण मग कटुतेने
विचार केला, ‘जाऊं दे मसणांत! मी कशाला मूर्खासारखा चक्कर
खात बसूं...?’ त्याने लातेने त्यांना दूर फेकलं.
त्यांच्याकडे बघणंसुद्धां बंद केलं.
मुशाफिराचा मूड खूप खराब होता. स्पष्ट होतं की
पागलखान्याच्या ट्रिपने त्याच्या मनावर खोलवर परिणाम केला होता. र्यूखिन
समजण्याचा प्रयत्न करंत होता, की त्याला कोणची गोष्ट त्रास देतेय. निळ्या बल्बांचा
कॉरीडोर, जो त्याच्या डोक्यांतून निघंत नव्हता? ही भावना की बुद्धिभ्रंशाहून जास्त दुर्भाग्य जगांत कोणतेंच नाहीये. हो,
हो, हे पण. पण ही तर एक सामान्य समज होती.
ह्याच्याशिवायसुद्धां आणखी काहीतरी होतं, ते काय? अपमान? अगदी बरोबर, हो,
अपमानजनक शब्द, जे बिज़्दोम्नीने सरंळ त्याच्या
तोंडावर फेकून मारले होते. मुद्दा हा आहे, की ते शब्द फक्त
अपमानजनकंच नव्हते, पण हा, की ते सत्य
होते.
कवि आता इकडे तिकडे बघंत नव्हता. तो फक्त ट्रकच्या
घाणेरड्या फरशीकडे बघंत होता. मग त्याने स्वतःलांच दोष देत काही पुटपुटायला सुरुवात
केली.
‘हो, कविता...तो
बत्तीस वर्षाचा आहे! पुढे काय होणारेय? पुढे तो दरवर्षी काही
कविता करंत राहील – म्हातारपणा पर्यंत? हो, म्हातारपणापर्यंत. ह्या कवितांनी त्याला काय
फ़ायदा होईल? प्रसिद्धी? काय फालतूपणा
आहे! कमीत कमी स्वतःला तरी नको फसवूं. जो कसल्याही वेड्यावाकड्या कविता लिहितो,
त्याला कधीही प्रसिद्धी नाही मिळूं शकंत. वेड्यावाकड्या कशाला?
खरंच म्हटलं, अगदी खरं! र्यूखिनने स्वतःला
प्रताडित करंत म्हटलं – जे काही मी लिहितो, त्याच्यापैकी
कश्शावरसुद्धां मी विश्वास नाही करंत!...’
ह्याच विचारांमधे बुडालेल्या कविला एक झटका बसला.
त्याच्या खालची फरशी आता उसळंत नव्हती. र्यूखिनने डोकं वर केलं आणि पाहिलं की तो
मॉस्कोला पोहोचलांय, मॉस्कोत उजाडंत होतं, ढग
सोनेरी प्रकाशांत न्हायलेंत, तरुमंडित राजपथाच्या वळणावर
अन्य अनेक वाहनांच्या रांगेत ट्रक उभा आहे आणि त्याच्यापासून थोड्याच दूरीवर
धातूने बनलेला एक माणूस4 झाडांनी झाकलेल्या आळीकडे अलिप्ततेने बघतोय.
आजारी कविच्या मनांत काही विचित्र विचार तरळले : ‘हे आहे
वास्तविक सफलतेचं उदाहरण,’ र्यूखिन ताणून ट्रकमधे उभा
राहिला आणि त्याने अलिप्तपणे उभ्या असलेल्या त्या लौह-पुरुषाला मारण्यासाठी हात
उचलंला : ‘त्याने जीवनांत जे पण केलं, त्याच्याबरोबर
जे काही झालं, सगळ्याचा त्याला फायदांच झाला, सगळ्या घटनांनी त्याला प्रसिद्धीच दिली! पण त्याने केलं काय! मला कळंत
नाहीये...तूफानी धुंध...ह्या शब्दांमधे काहीतरी खासंच आहे? कळंत नाहीये! किस्मत वाला आहे, किस्मत वाला!’
र्यूखिनने म्हटलं आणि तेवढ्यांत त्याला जाणवलं की त्याच्या
पायाखालचा ट्रक सरकतोय, ‘मारून टाकलं, गोळीने
उडवून दिलं ह्याला त्या श्वेत सैनिकाने आणि अमर केलं...’
वाहनांची रांग पुढे सरकली. एकदम आजारी आणि
म्हातारा झालेला कवि दोन मिनिटातंच ग्रिबायेदवच्या दालनांत पोहोचला. दालन रिकाम
झालं होतं. कोप-यांत काही लोक आपली दारू संपवत होते आणि त्यांच्यांत एक उद्घोषक घट्ट
टोपी घालून, शैम्पेनचा ग्लास हातांत धरून धावपळ करंत होता.
टॉवेल्सच्या मागे लपलेल्या र्यूखिनची आर्चिबाल्द आर्चिबाल्दोविचची
टक्कर झाली आणि त्याने लगेच कविला त्या घाणेरड्या टॉवेल्समधून मुक्त केलं. जर दवाखान्यांत
आणि मग ट्रकमधे र्यूखिन अतिशय त्रस्त नसता झाला, तर त्याने अवश्य आनंदाने सांगितलं
असतं की दवाखान्यांत काय काय घडलं आणि आपल्या कल्पनेने जास्त चटकदार करूनंच सांगितलं
असतं. पण सध्यां तो त्या मनःस्थितीतंच नव्हता. त्याशिवाय, र्यूखिनची
निरीक्षण शक्ति कितीही कमी असली, तरी ह्या क्षणी, ट्रकच्या कटु अनुभवानंतर, त्याने जीवनांत पहिल्यांदा
ह्या समुद्री डाकूला तीक्ष्ण नजरेने बघितलं आणि त्याला समजलं की, जरी तो बिज़्दोम्नीबद्दल प्रश्न विचारंत होता, मधे मधे
“ओय-ओय-ओय!” म्हणंत होता, तरी बिज़्दोम्नीच्या भविष्याबद्दल तो
पूर्णपणे उदासीन होता. त्याला त्याच्याबद्दल जरासुद्धां दया वाटंत नव्हती. ‘शाबास! एकदम बरोबर!’ र्यूखिनने उन्मादपूर्ण,
आत्मनाशक कटुतेने विचार केला आणि पागलपणाच्या कहाणीला मधेंच थांबवून
विचारलं, “आर्चिबाल्द आर्चिबाल्दोविच, मला
थोडी वोद्का...”
समुद्री डाकू चेह-यावर सहानुभूतिचा भाव आणंत पुटपुटला, “ मी समजूं
शकतो...आत्ता घ्या...” आणि त्याने खूण करून वेटरला बोलावलं.
पंधरा मिनिटाने र्यूखिन अगदी एकटा बसून मास्याशी खेळंत
वोद्काचे ग्लास वर ग्लास पीत होता. त्याला कळंत होतं आणि तो स्वीकारपण करंत होता, की त्याच्या
जीवनांता आता काहीही सुधारणा शक्य नाही, फक्त विसरणंच जास्त चांगलंय.
कविने आपली रात्र वाया घालवली, जेव्हां इतर
व्यक्ति हर्षोल्लासांत गुंग होते, आता तो समजून चुकला,
की गेलेल्या रात्रीला परतवणं अशक्य आहे. फक्त लैम्पपासून दूर आकाशांत
डोकं वर करून बघणंच शिल्लक राहिलं होतं, हे समजायला की रात्र
निघून गेली होती, कधीच परत न येण्यासाठी. वेटर्स घाई घाईने टेबल्सवरून
टेबलक्लॉथ्स गोळा करंत होते. दालनाच्या जवळपास फिरण्या-या मांजरींवर सकाळची सावली होती.
स्वतःला सावरण्यांस असमर्थ सकाळ कवीवर कोसळली.
*********
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें