शनिवार, 12 अगस्त 2017

मास्टर आणि मार्गारीटा - 07


सात

शापित फ्लैट


जर दुस-या दिवशी सकाळी कोणी स्त्योपा लिखादेयेवला सांगितलं असतंकी स्त्योपा, जर तू लगेच नाही उठला,  तर तुला गोळी मारतील!” तर स्त्योपा आपल्या जड, मुश्किलीने ऐकू येणा-या आवाजांत म्हणाला असतां, “मारूं देत, माझं जे मनांत येईल ते करू द्या, पण मी उठणार नाही!”
असं नव्हतं की त्याला उठायचं नव्हतं. त्याला असं वाटंत होतं की तो डोळेच नाही उघडूं शकणार, कारण की जसांच तो असं करेल, डोक्यांत वीज कडकडेल आणी त्याचे तुकडे-तुकडे करून टाकेल. ह्या डोक्यांत वजनदार घंटे वाजंत होते. डोळ्यांच्या बुब्बुळांच्या आणि बंद पापण्यांच्या मधे सोनेरी हिरवी किनार असलेले तपकिरी गोळे फिरंत होते. त्याला मळमळंत होतं, पण त्याला हे सुद्धां कळंत होतं की ह्या मळमळण्याचा संबंध एका त्रासदायक ग्रामोफोनमधून येणा-या बेसु-या आवाजाशी होता.
स्त्योपा ने आठवण्यांचा प्रयत्न केला, पण त्याला फक्त एकंच गोष्ट आठवली की कदाचित काल, तो कुठेतरी हातांत रुमाल पकडून उभा होता आणि कोणत्यातरी महिलेचं चुम्बन घ्यायचा प्रयत्न करंत होता, ज्याच्यानंतर त्याने तिला सांगितलं, की दुस-या दिवशी बरोब्बर दुपारी तो तिच्या घरी येईल, महिलेने नाहीसांगंत म्हटलं : “नाही, नाही, मी घरी नसणार!” पण स्त्योपा हट्टंच करंत होता : “काहीही म्हण, पण मी तर येणारंच!”
ती महिला कोण होती? आता किती वाजलेत? कोणची तारीख आहे? कोणचा महिना आहे? स्त्योपाला नक्की माहीत नव्हतं आणि सगळ्यांत वाईट ही गोष्ट होती, की त्याला हे सुद्धां कळंत नव्हतं की तो सध्यां कुठे आहे! त्याने कमीत कमी ही शेवटची गोष्ट समजण्यासाठी डाव्या डोळ्याची चिकटलेली पापणी उघडण्याचा प्रयत्न केला. अंधुक प्रकाशांत कोणची तरी वस्तु चमकंत होती. शेवटी स्त्योपाने आरशाला ओळखलं आणि त्याला समजलं की तो आपल्या पलंगावर, म्हणजेच भूतपूर्व जवाहि-याच्या पलंगावर पडलाय. पापणी उघडतांच डोक्यावर जणू घणाचे घाव पडूं लागले, आणि त्याने विव्हळंत पटकन डोळा बंद केला.
चला, आम्हीं सांगून टाकतो : स्त्योपा लिखादेयेव, वेराइटी थियेटरचा डाइरेक्टर सकाळी आपल्या त्यांच फ्लैट मधे जागा झाला, ज्यांत तो मृतक बेर्लिओज़बरोबर राहात होता. हा फ्लैट सदोवाया स्ट्रीटवर U आकाराच्या सहामजली बिल्डिंगमधे होता.
इथे हे सांगावं लागेल, की हा फ्लैट, 50 नम्बरचा, बदनाम तर नाही, पण तरीही विचित्र रूपांत चर्चेत असायचा. दोन वर्षांपूर्वी ह्याची मालकीण देफुज़ेर ह्या जवाहि-याची बायको होती. पन्नास वर्षांची अन्ना फ्रान्त्सेव्ना देफुज़ेरने, जी खूप चपंळ आणि आदरणीय महिला होती, पाचपैकी तीन खोल्या भाड्याने दिल्या होत्या. एका माणसाला, ज्याचं, आडनाव, कदाचित, बिलामुत होतं, आणि दुस-या – आडनाव हरवलेल्या माणसाला.
आणि मागच्या दोन वर्षांपासून ह्या फ्लैटमधे विचित्र घटना व्हायला लागल्यात. ह्या फ्लैटमधून लोक काहीही मागमूस न सोडतां गायब व्हायला लागले1.
एकदा, एका सुट्टीच्या दिवशी फ्लैटमधे एक पोलिसवाला आला. त्याने दुस-या भाडेकरूला (ज्याचं आडनाव हरवलं होतं) बाहेर प्रवेशकक्षांत बोलावलं आणि म्हटलं, की त्याला एका कागदावर सही करण्यासाठी पोलिस स्टेशनवर बोलावलंय. भाडेकरूने अन्ना फ्रान्त्सेव्नाच्या विश्वासू मोलकरणीला, अन्फीसाला सांगितलं की तो दहा मिनिटांत परत येईल. येवढं सांगून तो पांढरे हातमोजे घातलेल्या चुस्त दुरुस्त पोलिसवाल्याबरोबर चालला गेला. पण तो दहा मिनिटांनीच काय, पण कधीच परत नाही आला. ह्याहीपेक्षा आश्चर्याची गोष्ट ही झाली की ताच्याबरोबरंच तो पोलिसवालासुद्धां नेहमीसाठी गायब झाला. 
धार्मिक प्रवृत्तीच्या, आणि स्पष्ट सांगायचं तर अंधविश्वासी, अन्फीसाने खूप वैतागलेल्या अन्ना फ्रान्त्सेव्नाला सांगितलं, की हा काळ्या जादूचा प्रकार आहे आणि तिला चांगलंच माहितीये की भाडेकरू आणि पोलिसवाल्याला कोणी खेचून नेलंय, पण रात्री त्याचं नाव नाही घेणार. पण काळा जादू जर कां एकदा सुरू झालां, तर त्याला कसंही करून थांबवणे शक्य नाहीं. दुसरा, हरवलेल्या आडनावाचा भाडेकरू, मला असं आठवतंय की, सोमवारी गायब झाला होता, आणि बुधवारी बिलामुत जणुं जमीनींत गडप झाला, पण वेगळ्या परिस्थितींत. सकाळी, रोजच्यासारखी, ऑफिसची कार त्याला न्यायला आली आणि घेऊन गेली, पण त्याला रोजच्या सारखं परंत नाही आणलं आणि पुन्हां कधी इकडे फिरकलीसुद्धां नाही.
बिलामुतच्या पत्नीचं दुःख आणि भीति अवर्णनीय आहे, पण, हाय, दोन्हींही जास्त दिवस नाही टिकले. त्याच संध्याकाळी अन्फीसाबरोबर दाचाहून, जेथे अन्ना फ्रान्त्सेव्ना घाईघाईने निघून गेली होती, परंत आल्यावर त्यांना बिलामुतची बायकोपण घरांत नाही दिसली. हे पण कमीच आहे : बिलामुतच्या दोन्हीं खोल्यांचे दारं सीलबंद दिसले.
कसे तरी दोन दिवस गेले. तिस-या दिवशी अनिद्रेने त्रस्त अन्ना फ्रान्त्सेव्ना पुन्हां घाईघाईने दाचावर निघून गेली...हे सांगावं लागेल की ती परत नाही आली.
एकटी राहिलेली अन्फीसा मनसोक्त रडून घेतल्यावर रात्री दोन वाजतां झोपली. तिचं पुढे काय झालं, माहीत नाही, पण दुस-या फ्लैट्समधे राहणा-यांनी सांगितलं की फ्लैट नं. 50मधे जणु रात्रभर लाइट जळंत  होता आणि खटखट होत होती. सकाळी कळलं की अन्फीसासुद्धां नाहीये.
गायब झालेल्या लोकांबद्दल आणि ह्या शापित फ्लैटबद्दल लोक अनेक प्रकारच्या गोष्टी सांगंत होते, जसं की काटकुळी, देवभीरू अन्फीसा एका पिशवींत अन्ना फ्रान्त्सेव्नाचे पंचवीस बहुमूल्य हीरे घेऊन गेली; की दाच्याच्या लाकडं ठेवण्याच्या खोलींत त्याच प्रकारचे कित्येक हीरे आणी सोन्याच्या अनेक मोहरा सापडल्यांत, आणि अश्याच काही काही गोष्टी; पण जी गोष्ट आम्हांला माहीत नाही, ती ठामपणे नाही सांगणार.
काहींही झालं असो, हा फ्लैट फक्त एक आठवडा रिकामा आणि सीलबंद राहिला, त्यानंतर त्यांत राह्यला आले मृतक बेर्लिओज़ – आपल्या बायको बरोबर आणि हाच स्त्योपा – आपल्या बायको बरोबर. स्वाभाविकंच आहे की जसेच ते ह्या घरांत राहूं लागले, त्यांच्या बरोबरसुद्धां सैतान जाणे काय काय होऊं लागलं. फक्त महिन्याभरांतच दोघांच्या बायका गायब झाल्या, पण काही मागमूस ठेवल्याशिवाय नाही. बेर्लिओज़च्या बायकोबद्दल ऐकण्यांत आलं की ती खारकोवमधे एका बैले प्रशिक्षकाबरोबर दिसली; आणि स्त्योपाची बायको बोझेदोम्कांत सापडली, जिथे, असं सांगतांत, की वेराइटीच्या डाइरेक्टरने आपल्या असीमित प्रभावाने तिला ह्या अटीवर एक खोली मिळवून दिली, की ती सदोवायावर पुन्हां दिसायला नको...
हो, तर, स्त्योपा विव्हळंत होता. त्याला आपली मोलकरीण ग्रून्या हिला बोलावून तिच्याकडून पिरामिदोनची गोळी मागावीशी वाटली, पण त्याला कळंत होतं, की असं करणं मूर्खपणाचं होईल...ग्रून्याकडे काही गोळी-बीळी नसेल. त्याने मदतीसाठी बेर्लिओज़ला बोलवायचा प्रयत्न केला. दोनदा विव्हळंत बोलावलं, “मीशा...” पण तुम्ही समजूं शकता, की त्याला उत्तर नाही मिळालं. फ्लैटमधे पूर्ण शांतता होती.
पायाच्या बोटांना थोडसं हलवतांच समजला, की तो मोजे घालूनंच झोपला होता. थरथरणारे हात अंगावर फिरवंत तो हे समजण्याचा प्रयत्न करूं लागला, की पैंट घातली आहे, किंवा नाही, पण समजलंच नाही.
शेवटी त्याला जाणीव झाली, की जणु सगळ्यांनी त्याला सोडून दिलंय आणि तो अगदी एकटा आहे; त्याची मदत करणारं कुणीच नाहीये आणि त्याने ठरवलं की कितीही प्रयत्न करावे लागले तरी उठायचंच.   
स्त्योपाने चिकटलेल्या पापण्यांना प्रयत्नपूर्वक सोडवंत आरशांत पाहिलं, स्वतःच प्रतिबिम्ब त्याला विस्कटलेले केस, सुजलेला काळा निळा चेहरा आणि सुजलेले डोळे, घाणेरडा, चुरगळलेला शर्ट, टाय, मोजे आणि अण्डरवियर घातलेल्या माणसाच्या रूपांत दिसलं.
असं त्यानी आरशाच्याआत स्वतःला पाहिलं आणि आरशाच्याबाहेर काळा सूट आणी काळी टोपी घातलेल्या एका माणसाला पाहिलं.
स्त्योपा पलंगावर उठून बसला. जेवढे शक्य होते, तेवढे आपले रक्तासारखे लाल डोळे विस्फारून त्याने अपरिचिताकडे बघितलं.
आपल्या जाड्या भरड्या आवाजांत अपरिचितानेंच परदेशी लकबीत “गुड मॉर्निंग, परम प्रिय स्तिपान बग्दानोविच!” म्हणंत शांतता भंग केली.    
थोडं थांबून, अतोनात प्रयत्नाने स्त्योपा बोलूं शकला, “तुम्हाला काय पाहिजे?” आणि स्वतःचाच आवाज न ओळखून त्याला धक्कांच बसला. त्याने “तुम्हांला” तारसप्तकांत, “काय” मंदसप्तकांत म्हटलं, आणि  त्याच्या तोंडून “पाहिजे” निघालंच नाही.
मैत्रीपूर्वक हसून, अपरिचिताने हि-याचं त्रिकोणी फ्रेम असलेलं सोन्याचं घड्याळ काढून अकरा वेळा वाजवलं आणि म्हणाला, “अकरा! बरोब्बर तासभरापासून मी तुम्हीं उठण्याची वाट बघतोय, कारण की तुम्हीं मला दहा वाजतां यायला सांगितलं होतं. हा मी आलोय!2
स्त्योपाने पलंगाजवळच्या खुर्चीवर अंदाजाने पैंट शोधली आणि पुटपुटला, “माफ़ करा...”
पट्कन पैंट घालून भसाड्या आवाजांत म्हणाला, “कृपा करून तुमचं नाव सांगाल कां?”
त्याला बोलताना खूप त्रास होत होता. प्रत्येक शब्दागणिक जणु कुणीतरी डोक्यांत एक सुई टोचंत होतं, ज्यामुळे त्याला  नारकीय यातना होत होत्या.
“काय? तुम्हीं माझं नावसुद्धां विसरलांत?” आणि अपरिचित हसला.
“माफ़ करा...” स्त्योपा बडबडला. त्याला भास होत होता, की हे हैंगओव्हरचं नवीनंच लक्षण आहे: त्याला वाटलं की पलंगाच्या जवळची फरशी कुठेतरी गायब झालीयं, आणि आत्ता ह्याच क्षणी तो उलटा लटकून सैतानाच्या मावशीकडे पाताळांत जाऊन पोहोचेल.
“प्रिय स्तिपान बग्दानोविच,” पाहुणा भेदक स्मित करंत म्हणाला,” गोळी-बिळीने काही फायदा नाही होणार, जुनी म्हण आठवां – जशास तसं. फक्त एकच गोष्ट तुम्हांला परत शुद्धिवर आणू शकते आणि ती आहे वोद्काच्या दोन पैग्सबरोबर काही तिखंट, चमचमीत ब्रेकफास्ट.”
स्त्योपा लबाड होता आणि आजारी असूनसुद्धां त्याला कळंत होतं, की जेव्हां तो ह्या अवस्थेत पकडलांच गेलाय, तर सगळं स्पष्ट कबूल केलंच पाहिजे.
“स्पष्टंच सांगायचं तर,” तो जीभेची थोडीशी हालचाल करंत सांगायला लागला, “काल मी थोडी...”
“बस, पुढे एकही शब्द नाही!” पाहुणा म्हणाला आणि खुर्चीसकट एका बाजूला सरकला. स्त्योपाने डोळे विस्फारून पाहिलं की छोट्याश्या टेबलवर एक ट्रे ठेवला गेलाय, त्यांत पांढ-या ब्रेडचे स्लाइसेस, बाउलमधे दाबलेले कैवियर, प्लेटमधे मश्रूमचं लोणचं, बंद वाडग्यांत आणखी काहीतरी आणि जवाहि-याच्या बायकोच्या मोठ्या काचेच्या सुरईत वोद्का अशी सामग्री होती. स्त्योपाला ह्या गोष्टीचं आश्चर्य वाटलं, की ह्या सुरईवर पाण्याचे थेंब जमले होते. पण ह्याचं कारण स्पष्ट होतं – सुरई बर्फाच्या प्लेटमधे ठेवली होती.
अपरिचिताने स्त्योपाच्या आश्चर्याला मानसिक आजाराच्या सीमेपर्यंत न जाऊं देता पटकन अर्धा पैग वोद्का त्याच्या समोर ठेवली.
“आणि तुम्हीं?” स्त्योपाने विचारलं.
“आनंदाने!”
थरथरत्या हाताने स्त्योपाने प्याला ओठांना लावला आणि अपरिचिताने एकाच घोटांत आपला पैग पिऊन टाकला. कैवियर चघळंत स्त्योपाने मोठ्या मुश्किलीने म्हटलं, “तुम्हीं...काय...खाल?”
“माफ़ करा, मी कधीच काहीही खात नाही,” अपरिचित म्हणाला आणि त्याने दुसरा पैग बनवला.
वाडग्याचं झाकण उघडतांच त्यांत टॉमेटो सॉसमधे सॉसेज आढळले.
डोळ्यासमोरची ती शापित हिरवळ विरघळूं लागली, बोलूं लागली, आणि मुख्य म्हणजे स्त्योपाला सगळं आठवलं. हे, की काल हे स्खोद्नी येथे झालं होतं, स्केच चित्रकार खुस्तोवच्या दाचावर, जिथे हाच खुस्तोव टैक्सीत बसवून स्त्योपाला घेऊन गेला होता. आठवलं की कशी मेट्रोपोलजवळ त्यांनी टैक्सी ठरवली होती. तेव्हां तिथे कोणी अभिनेता, नाही, अभिनेता नाही...अटैचींत ग्रामोफोन घेतलेला, हो, हो, हो, दाचांतच झालं होतं हे सगळं! आणि त्याला आठवलं की त्या ग्रामोफोनमुळे कुत्रे ओरडू लागले होते. बस, फक्त त्या महिलेशी, जिचं स्त्योपा चुम्बन घेऊं पाहत होता, बोलणं झालं नाही...सैतान जाणे, कोण होती ती...कदाचित रेडिओवर काम करंत असावी, किंवा नाही.
अश्या प्रकारे कालच्या घटना हळू-हळू स्पष्ट होत होत्या, पण स्त्योपाला आता ही गोष्ट गोंधळांत टाकंत होती, की त्याच्या शयनगृहांत हा अपरिचित वोद्का आणि खाण्यापिण्याचं सामान घेऊन घुसला कसा. हे माहिती करणं मूर्खपणा ठरणार नाही!
“तर, कदाचित, आता तुम्हांला माझं नाव आठवलं असेल?”
पण स्त्योपाने झेपून मंदस्मित केलं आणि हात हालवून दिले.
“चला, जाऊं द्या! मला वाटतंय की तुम्हीं वोद्का नंतर लगेच पोर्टवाइन घेतली असावी! असं करणं बरोबर होतं कां?”
“मी तुम्हांला विनंती करतो की कृपा करून ही गोष्ट आपल्या दोघांमधेच राहूं द्या...” स्त्योपाने गहि‌-या नजरेने त्याच्याकडे बघंत म्हटलं.
“ओ, शंकाच नाही, बिल्कुल शंका नाही! पण खुस्तोवबद्दल मी काही करूं शकणार नाही.”
“तुम्हीं खुस्तोवला ओळखतां?”
“काल तुमच्या ऑफिस रूममधे ह्या माणसाला ओझरतं पाहिलं होतं, पण त्याच्या चेह-यावर एक धावती नजर टाकतांच कळतं की तो कसा माणूस आहे : बदमाष, भांडखोर, चाटुकार आणि संधिसाधू!”
अगदी बरोबर! ह्या तंतोतंत, बरोबर आणि संक्षिप्त परिभाषेने हबकलेल्या स्त्योपाने विचार केला.
हो, कालचा दिवस तुकड्या तुकड्यांत आठवंत होता, पण तरीही वेराइटीच्या डाइरेक्टरची अस्वस्थता कमी नाही झाली. कारण हे होतं की ह्या कालच्या दिवसांत एक खूप मोट्ठं काळं भोक होतं. ह्या चौड्या टोपीवाल्या अपरिचिताला स्त्योपाने काल आपल्या ऑफिसरूममधे बघितलंच नव्हतं.
“काळ्या जादूचा प्रोफेसर वोलान्द3,” स्त्योपाचा अवघडपणा बघून पाहुण्याने जाड्या आवाजांत सगळं काही व्यवस्थित सांगायला सुरुवात केली.
काल दुपारी तो परदेशांतून मॉस्कोत आला होता आणि लगेच स्त्योपाला भेटून आपल्या कलाकार-मंडळाचा वेराइटींत प्रोग्राम ठरवण्याबद्दल त्याने प्रस्ताव ठेवला. स्त्योपाने मॉस्कोच्या क्षेत्रीय दर्शक कमिटीत फोन करून प्रोफेसरचा प्रस्ताव स्वीकार केला (स्त्योपाचा चेहरा पांढरा पडला आणि तो डोळे मिचकावू लागला), प्रोफेसरबरोबर सात कार्यक्रम करण्याच्या कॉन्ट्रैक्ट वर सही केली (स्त्योपाचं तोंड उघडंच राहिलं), असं ठरवलं की जास्त माहितीसाठी वोलन्द उद्या सकाळी (म्हणजे, आज सकाळी) दहा वाजतां त्याच्या घरी येईल...आणि वोलान्द आलांय!
येथे आल्यावर त्याला मोलकरीण ग्रून्या भेटली, जिने सांगितलं की ती आत्ताचं आली आहे, ती रोज येत-जात असते, बेर्लिओज़ घरी नाहीये, आणि जर पाहुण्याला स्तिपान बग्दानोविचला भेटायचं असेल तर त्याने सरळ त्याच्या बेडरूम मधे जावं. स्तिपान बग्दानोविचला इतकी गाढ झोप लागते, की त्याला उठवायची जवाबदारी ती नाहीं घेऊं शकंत. स्तिपान बग्दानिविचची अवस्था बघून कलाकाराने ग्रून्याला वोद्का आणि खण्यापिण्याच्या वस्तू आणायला जवळंच्याच दुकानांत पाठवलं, आणि बर्फासाठी मेडीकल शॉपमधे...
“तुमचा हिशेब करण्याची परवानगी द्या, प्लीज़,” पस्त झालेला स्त्योपा किंचाळला आणि आपला पर्स शोधूं लागला.
“ओह, हा काय मूर्खपणा आहे!” पाहुणा कलाकार खिदळला आणि त्याने पुढे काहीही ऐकण्यास नकार दिला.
अश्या प्रकारे, वोद्का आणि खाण्यापिण्याच्या सामानाबद्दल तर समजलं होतं, पण तरीही स्त्योपाकडे बघून दया येत होती : त्याला ठाम विश्वास होता, की त्याने ह्या वोलान्दला काल बघितलंच नव्हतं, आणि भले ही तुम्हीं मला फाशीवर चढवा, पण ह्याच्याबरोबर कॉन्ट्रैक्टसंबंधी काही गोष्टंच नाही झाली. हो, खुस्तोव होता, पण वोलान्द नव्हता.
“प्लीज़, कॉन्ट्रैक्ट दाखवा,” स्त्योपाने हळूच म्हटलं.
“घ्या, घ्या...”
स्त्योपाने तो कागद बघितला आणि जणु दगडंच झाला. सगळं अगदी बरोबर होतं. सगळ्यांत आधी, स्वतः स्त्योपाची फर्राटेदार सही! कोप-यांतून डोकावंत असलेली फिनडाइरेक्टरची4 तिरप्या अक्षरांत लिहिलेली अनुमति, जी कलाकार वोलान्दला सात कार्यक्रमांसाठी स्वीकृत 35,000 रूबल्सपैकी 10,000 द्यायची सिफारश करंत होती. त्यावरही शिरजोरी, म्हणजे ह्याच्याच बाजूला वोलान्दची स्वीकृति होती, जी हे दर्शवंत होती की त्याला हे 10,000 रूबल्स मिळालेंत!
हे सगळं काय आहे? दुर्दैवी स्त्योपाने विचार केला आणि त्याचं डोकं गरगरू लागलं. स्मृतिभ्रंश होतोय की काय? पण, स्पष्टंच आहे, की कॉन्ट्रैक्ट दाखवल्यानंतर त्याच्याबद्दल आश्चर्यासारख्या, रागीट अश्या कोणत्यांच विचाराला काही अर्थंच नव्हता, उलट ही असभ्यतांच दिसली असती. स्त्योपाने पाहुण्याकडून एका मिनिटासाठी बाहेर जाण्याची परवानगी घेतली आणि तसांच, मोजे घातलेलाच बाहेर प्रवेशकक्षांत पळाला जिथे टेलिफोन होता. जातां जातां तो किचनकडे तोंड वळवून ओरडला, “ग्रून्या!”
पण कोणीच उत्तर नाही दिलं. आतां त्याने बेर्लिओज़च्या खोलीच्या दाराकडे पाहिलं, जो प्रवेशकक्षातंच उघडंत होता, आणि तिथेच, जसं म्हणतांत, स्टेच्यू झाला. दाराच्या हैण्डलवर त्याने दोरीला लटकलेली मेणाची मोट्ठी सील5 पाहिली. नमस्कार! – स्त्योपाच्या डोक्यावर जणु कुणीतरी घणाने मारलं. बस, येवढंच शिल्लक होतं! आणि स्त्योपाचे विचार जणु आगगाडीच्या दोन्हीं रुळांवर धावूं लागले, पण एकांच दिशेने, आणि सैतानंच जाणे कुणीकडे, जसं साधारणपणे दुर्घटनेच्या वेळेस होतं. स्त्योपाच्या डोक्यांत चाललेल्या खळबळीचं वर्णन करणं कठीण आहे. एकीकडे गार वोद्का आणी अविश्वसनीय कॉन्ट्रैक्ट आणणा-या काळ्या टोपीवाल्याची भुताटकी; आणि दुसरीकडे दारावर लटकलेली सील! जणु काही हे सांगंत होती की बेर्लिओज़ने काहीतरी गडबड केलीय; कोणी विश्वासपण नाही करणार; ओय, ओय, नाही करणार विश्वास! पण, तरीही सील तर आहेच! हूँ...
लगेच स्त्योपाच्या डोक्यांत त्या लेखाबद्दल उलट-सुलट विचार यायला लागले, जो त्याने मिखाइल अलेक्सान्द्रोविचच्या पत्रिकेंत छापण्यासाठी त्याच्या हातांत ज़बर्दस्तीने खुपसला होता. तसं, ही आपली आपसांतली गोष्ट आहे, की लेख अगदीच फालतू होता! काही कामाचा नाही, आणि पारिश्रमिकसुद्धां कमींच होतं...
लेखाची आठवण झाल्यावर लगेच त्याच्या डोक्यांत तो संदेहास्पद वादविवाद तरळून गेला, जो चोवीस एप्रिलला रात्री जेवतांना त्या दोघांमधे झाला होता. त्या वार्तालापाला संदेहास्पद म्हणणं बरोबर नाहीये (कारण की स्त्योपा अशा वार्तालापांत कधीच भाग घेत नाही), पण हा वाद विवाद कोणच्या तरी अनावश्यक विषयावर होता. सार्वजनिक ठिकाणी, निश्चितंच, त्यावर खुलून बोलणं शक्य नव्हतं. सील लागायच्या आधी ह्या वार्तालापाला कोणीही फालतूम्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष केलं असतं, पण सील लागल्यावर...
ओह, बेर्लिओज़, बेर्लिओज़!स्त्योपाचं डोकं जणु उकळंत होतं – माझ्या डोक्यांत हा विचार घुसंत नाहीये!
पण तो जास्त वेळ शोकमग्न नाही राहूं शकला आणि स्त्योपाने वेराइटी थियेटरच्या फिनडाइरेक्टर रीम्स्कीचा नंबर फिरवला. स्त्योपाची अवस्था फारंच विचित्र झाली होती : एकीकडे ही भीति होती, की त्या परदेशी पाहुण्याला ह्या गोष्टीचा राग येईल, की कॉन्ट्रैक्ट दाखवल्यावरसुद्धां स्त्योपा त्याची शहानिशा करतोय; आणि फिनडाइरेक्टरशी बोलणंसुद्धां कठिणंच काम होतं. त्याला स्पष्टपणे विचारणं तर शक्यंच नव्हतं की मी काल काळ्या जादूच्या प्रोफेसरबरोबर 35,000रूबल्सच्या कॉन्ट्रैक्टवर सही केलीय कां?’ असं विचारणं बरोबर नाहीये!
“हैलो!” टेलिफोनच्या रिसीवरमधून रीम्स्कीचा कर्कश, अप्रिय आवाज आला.
“नमस्कार, ग्रिगोरी दानिलोविच,” स्त्योपाने हळूंच म्हटलं, “मी लिखोदेयेव बोलतोय. गोष्ट अशी आहे, की...अ...अ...माझ्याजवळ बसलाय तो...अ...कलाकार वोलान्द...तर...मला हे विचारायचं होतं, की आज संध्याकाळचा प्रोग्राम नक्की झालायं कां?”
“आह, काळा जादू?” रिसीवरमधे रीम्स्की बोलला, “इतक्यांत जाहिराती तयार होतीलंच.”
“अहा,” मरतुकड्या आवाजांत स्त्योपा म्हणाला, “भेटूं या...”
“तुम्हीं लवकरंच येताय नं? रीम्स्कीने विचारलं.
“अर्ध्या तासांत,” स्त्योपाने म्हटलं आणि रिसीवर टांगून आपल्या गरम डोक्याला दोन्ही हातांनी गच्च दाबलं. आह, हा काय गडबड घोटाळा होऊन बसलाय! माझ्या बुद्धिला काय झालंय, लोकांनो? आँ?
प्रवेश कक्षांत जास्त वेळ थांबणं ठीक नव्हतं. स्त्योपाने लगेच डोक्यांत एक योजना आखली : आपल्या विसरभोळेपणाला कोणताही प्रयत्न करून लपवायला हवं, आणी आता सगळ्यांत आधी परदेशी पाहुण्याला मोठ्या शिताफ़ीने हे विचारायला हवं, की तो वेराइटीमधे संध्याकाळी काय दाखवणार आहे? स्त्योपा टेलिफोनपासून वळला आणि तेव्हांच, खोलीतल्या आरशांत, जो आळशी ग्रून्याने बरेंच दिवसांत स्वच्छ नव्हता केला, त्याने स्पष्टपणे एका विचित्र माणसाला पाहिलं : खांबासारखा उंच, बिनफ्रेमचा चश्मा घातलेला (आह. जर इवान निकोलायेविच येथे असतां! त्याने ह्या नमुन्याला लगेच ओळखलं असतं). ही आकृति एकदा दिसून लगेच गायब झाली. स्त्योपाने उत्तेजनेने डोळे विस्फारून खोलींत बघितलं, आणि त्याला दुसरा धक्का बसला, कारण की आतां आरशांत एक हृष्ट-पुष्ट बोका प्रकट होऊन पुन्हां लुप्त झाला.
स्त्योपाच्या हृदयाची धडधड जणु बंद पडली, तो अडखळला.
हे सगळं काय आहे?’ त्याने विचार केला, ‘मला वेड तर नाही लागंत आहे? हे प्रतिबिम्ब कसलेंत?’ त्याने प्रवेश कक्षांत बघितलं आणि ओरडला:
ग्रून्या! हा बोका इथे कां फिरतोय? कुठून आलांय आणि त्याच्याबरोबर आणखी कोण आहे?”
“घाबरू नका, स्तिपान बग्दानोविच,” आवाज ऐकू आला, पण ग्रून्याचा नसून शयनगृहांत बसलेल्या पाहुण्याचा, “हा बोका माझा आहे. काळजी करूं नका. आणि ग्रून्यासुद्धां नाहीये, मी तिला वरोनेझला पाठवलंय, तिच्या गावांत, कारण ती कुरकुर करंत होती, की तुम्हीं तिला बरेंच दिवसांत सुट्टी नाही दिली.”
हे शब्द इतके आकस्मिक आणि निरर्थक होते, की स्त्योपाला वाटलं की त्याने काही चूक ऐकलंय. गडबडून तो आपल्या शयनगृहाकडे दुडदुड धावला आणि उंबरठ्यावरंच जणु थिजून गेला. त्याचे केसं उभे राहिले, कपाळावर घामाचे थेंब आले.
शयनगृहांत पाहुणा आता एकटा नव्हता, तो आपल्या सम्पूर्ण कम्पनीबरोबर होता. दुस‌-या खुर्चीत तोच माणूस बसला होता, जो आत्तांच आरशांतून प्रकट झाला होता. आता तो स्पष्ट दिसंत होता : पंखांसारख्या मिश्या, चश्म्याचा एक काच चमकंत होता आणि दुसरा गायब होता. शयनगृहांत आणखीही वाईट वस्तू दिसंत होत्या : गादी असलेल्या स्टूलवर मांडी घालून जो तिसरा प्राणी बसला होता, तो आणखी कुणी नसून तोच अकराळ-विकराळ बोका होता, ज्याने एका पंजांत वोद्काचा पैग आणि दुस-यांत मश्रूम लावलेला फोर्क धरला होता.
प्रकाश, जो शयनगृहांत तसाही कमी होता, स्त्योपाला गुल होतांना दिसला – कदाचित असेच पागल होत असतील!त्याच्या मनांत विचार आला आणि त्याने भिंतीचा आधार घेऊन स्वतःला सावरलं.
“मी बघतोय, की तुम्हांला थोडं आश्चर्य वाटतंय, परमप्रिय स्तिपान बग्दानोविच?” वोलान्दने स्त्योपाला म्हटलं, ज्याचे दात किटकिटंत होते, “खरं म्हणजे आश्चर्याची गोष्टंच नाहीये. हे माझे सहयोगी आहेत.”
बोक्याने वोद्काचा पैग संपवतांच स्त्योपाचा हात दाराच्या चौकटीवरून खाली घसरला.
“आणि ह्या सहयोग्यांना राहायला जागा पाहिजे,” वोलान्द बोलंतच होता, “म्हणजेच, ह्या फ्लैटमधे  आपल्या चौघांपैकी एक जास्तीचा आहे. मला वाटतंय की तो जास्तीचा म्हणजे तुम्हीं आहांत!”
“तेंच आहेत! तेंच आहेत!” स्त्योपासाठी बहुवचनाचा प्रयोग करंत, बकरीसारख्या आवाजांत चौकटवाला लम्बू म्हणाला, “विशेषकरून मागच्या काही दिवसांपासून तर फारंच डुक्करपणा करतांयत, सारखी दारू पीत असतांत, आपल्या पदाचा दुरुपयोग करून बायकांशी संबंध जोडतांत, काहींच काम करंत नाहींत, आणि करूंपण नाहीं शकंत, कारण की जे पण काम त्यांना देण्यांत येतं, ते त्यांना समजतंच नाही. आपल्या अधिका-यांच्या डोळ्यांत धूळ झोकतांत!”
“सरकारी कार उगीचंच दौडवतांत!” मश्रूम चघळंत बोका रुसलेल्या आवाजांत म्हणाला.
आणि तेवढ्यांत ह्या फ्लैटमधे चौथी आणि अंतिम घटना घडली, जेव्हां स्त्योपा फरशीवर जवळ-जवळ घसटंत दाराच्या चौकटीला खरचटू लागला.
आरशांतून सरळ खोलीत उतरला एक छोटा, पण असाधारण रुंद खांदे असलेला माणूस, ज्याने डोक्यावर हैट घातली होती आणि ज्याचा एक दात बाहेर निघाला होता. ह्या दाताने त्याच्या तश्याही घाणेरड्या असलेल्या व्यक्तित्वाला आणखीनंच अस्तव्यस्त केलेलं होतं. वरून त्याचे केसही लाल रंगाचे होते.
“मला,” हा नवीन माणूस वाद विवादांत टपकला, “समजंत नाहीये की हा डाइरेक्टर कसा काय झाला!”
लाल केस वाला अनुनासिक स्वरांत बोलंत होता, “हा तर तसलांच डाइरेक्टर आहे, जसा मी बिशप आहे!”
“तू तर बिल्कुल बिशप सारखा नाही वाटंत, अज़ाज़ेलो6!” बोक्याने आपल्या प्लेटमधे सॉसेजचा तुकडा टाकंत म्हटलं.
“तेंच तर मी म्हणतोय!” लाल केसवाल्याचं नाक बोललं, आणि वोलान्दकडे वळून तो आदरपूर्वक म्हणाला, “महाशय, ह्याला मॉस्कोच्या सगळ्या सैतांनाच्या पुढ्यांत फेकण्याची परवानगी द्या!”
“फेकून दे!!!” अचानक आपले केस ताठ करंत बोका गुरगुरला.
तेव्हां स्त्योपाच्या चारीकडे शयनगृह गरगर फिरूं लागलं, त्याचं डोकं उंबरठ्यावर आपटलं आणि शुद्धं हरपंत तो विचार करूं लागला, ‘मी मरतोय...
पण तो मेला नाही. हळू हळू डोळे उघडल्यावर त्याने बघितलं की तो दगड्याच्या कोणच्यातरी वस्तूवर बसलाय. त्याच्या चारीकडे कशाचा तरी गोंगाट ऐकूं येत होता. नीट डोळे उघडल्यावर त्याने बघितलं की तो समुद्राचा गोंगाट होता, लाटा अगदी त्याच्या पायांना स्पर्श करंत होत्या, थोडक्यांत सांगायचं म्हणजे, तो अगदी समुद्रावर बनलेल्या लाकडी प्लेटफॉर्मच्या कोप-यावर बसलेला आढळला, त्याच्या खाली चमचमणारा समुद्र आणि मागे टेकडीवर असलेलं एक सुंदर शहर होतं.
स्त्योपाला समजलं नाही, की ह्या परिस्थितींत त्याला काय करायला पाहिजे आणि तो थरथरत्या पायांनी प्लेटफॉर्म पार करून समुद्र तटाकडे जाऊं लागला.
ह्या प्लेटफॉर्मवर एक माणूस उभा होता, जो सारखा सिगरेट पीत होता आणि समुद्राच्या पाण्यांत थुंकंत होता. त्याने स्त्योपाकडे रानटीपणाने पाहिलं आणि थुंकणं थांबवलं. स्त्योपाला एक उपाय सुचला : तो सिगरेट पिणा-या अपरिचितासमोर गुडघ्यांवर बसला आणी म्हणाला, “मी विनंती करतो, कृपा करून मला सांगा, की हे कोणचं शहर आहे?”
“एकदाचा...!” हृदयहीन सिगरेटधारी म्हणाला.
“मी प्यायलो नाहीये,” भसाड्या आवाजांत स्त्योपा म्हणाला, “मी आजारी आहे, मला काही तरी झालंय, मी आजारी आहे...मी कुठे आहे? हे कोणचं शहर आहे?”
“अहं, याल्टा...”
स्त्योपाने दीर्घ श्वास घेतला, तो अडखळून एका कुशीवर पडला आणि त्याचं डोकं प्लेटफॉर्मच्या गरम दगडावर आपटलं.


*****

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें